श्री दत्तप्रबोध - अध्याय पाचवा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥श्रीगणेशसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुदत्तात्र्येनमः ॥

जयजयाजी सद्‌गुरु अनंता । कृपाघना षड्‌गुणभरिता । तुझिया चरणीं ठेविला माथा । तारी समर्था उदारा ॥१॥

तूं मज दीनाचें माहेर । सदय कोमळ तुझें अंतर । मी तुझें लडिवाळ पामर । करी अंगिकार आपंगी ॥२॥

तूं भाग्याचा गा उदधी । तोडि माझी आधिव्याधी । लागों नेदी कांहीं उपाधीं । नासी दुर्बुद्धी अंतरीची ॥३॥

तूं सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी । कृपावलोकनें मातें लक्षी । भय वारोनि दीना रक्षी । कदा नुपेक्षी बाळका ॥४॥

सद्‌गुरु तूं परम कृपाळ । तूं माउली मी लडिवाळ । पुरवी जननी माझी आळ । कथा रसाळ वदवी पुढें ॥५॥

माझें सामर्थ्य नसे कांहीं । बोलवितां तुझा तूंचि पाहीं । नून्य तें पूर्णं ये ठाईं । करणें तेंही तुम्हा तें ॥६॥

तूंचि श्रोता आणि वक्ता । लखकी तूंचि शक्तिदाता । या बुद्धीते प्रेरिता । सद्‌गुरु समर्था तूंचि होसी ॥७॥

गत कथाध्यायींचें निरोपण । अत्रि-अनसूयेसी विचारुन । नारद जाता झाला तेथून । पाताळभुवन पाहावया ॥८॥

मागें अत्रि आनंदभरित । अनसूया बाळां तोषवीत । नाना कौतुकें खेळवीत । मुख चुंबीत वेळोवेळां ॥९॥

हें परिसोनि श्रोतेजनीं । आनंदभरित झाले मनीं । पुढलिया कथेचे अनुसंधानीं । वक्तया विलोकोनि पहाति ॥१०॥

जेवोनि जेवणाराची आवडी । ओळखोनि रसनेची गोडी । तोचि पदार्थ आणोनि वाढी । करोनि तातडी सुगरणी ॥११॥

तेवीं श्रोत्याचा अर्थ देखोन । वक्ता विनवी जी सावधान । सुग्रास कथा आवदान । वोपितो पूर्ण स्वीकारिजे ॥१२॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । स्वपदा त्यजोनि सत्वर । निघतां न जाणविती विचार । कांता कलत्र कवणासी ॥१३॥

अतित्वरें येवोन । अनसूये मागीतलें नग्नदान । तिनें बाळरुप ठेविलें करोन । हें वर्तमान न कळे तयां ॥१४॥

परी गेले कवणिया ठायां । कोणतें काज योजोनिया । काय म्हणावें स्वामीराया । कळवोनिया न गेले ॥१५॥

सचिंत झाल्या तेव्हां कामिनी । निद्रा न लगेचि दिनयामिनी । अहा कैसें केलें हें स्वामींनी । आम्हां त्यजोनि गेलेती ॥१६॥

त्यासी तो झाले बहु दिवस । अजोनी न येती परत ठायास । आतां पुसावें कवणास । कोण आम्हांस निवेदी ॥१७॥

ऐशा तिघीही परस्परी । उद्विग्न झाल्याति अंतरी । शोध आणविती नानापरी । सेवका करीं तेधवां ॥१८॥

स्वर्गलोक धांडोळिला । भूलोक सर्व पाहिला । पाताळही सर्व शोधिला । कोठें कवणाला न भेटती ॥१९॥

पाहिले गिरी आणि कंदर । कपारी गुव्हा सानथोर । आश्रम गुंफा अपार । सविस्तर शोधिल्या ॥२०॥

शोध न पडे कवणिया ठायीं । मग बुडाल्या चिंताडोहीं । सावित्री उठोनि लवलाही । उमेगृहीं पावली ॥२१॥

बाई कोठें गेल प्राणश्वर । येरी म्हणे न कळे विचार । कवण रोष धरोनी आपणावर । आलिप्त प्रियकर झालेती ॥२२॥

शोधिलें गे सर्व त्रिभुवन । ठायीं न पडती कोठे अजून । आपणालागीं सांगेल कवण । होती प्राण कासावीस ॥२३॥

सावित्री म्हणे अपर्णेसी । चाल जाऊं वैकुंठासी । कांहीं कळलें असेल लक्ष्मीसी । विचारुं तियेसी साक्षपै ॥२४॥

तात्काल विमानीं बैसोन । पाहिलें तेव्हां वैकुंठभुवन । तव तेथील पाहतां चिन्ह । उदास मान पाहिले ॥२५॥

विमान खालत्या उतरल्या । जावोनि रमेलागीं भेटल्या । येरयेरा पुसत्या झाल्या । नेत्रीं चालिल्या अश्रुधारा ॥२६॥

ठाव न कळेची कांहीं पतींचा । दुःखसागर लोटला शोकाचा । आक्रोश मांडला करुणेचा । शब्द वाचा न फुटे ॥२७॥

कांहीं गहिंवर सावरोन । उमा बोलती झाली वचन । बाई होवोनि सावधान । विवेकें मन आवरावें ॥२८॥

विवेकेंचि करावा विचार । काय निमित्तें पडलें अंतर । काय म्हणोनि प्राणेश्वर । होवोनि क्रूर गेलेती ॥२९॥

सावित्री म्हणे पदासी । कोण्ही दैत्य न आले हरावयासी । काय तरी गती कैसी । झाली स्वामीसी जावया ॥३०॥

कोण्ही करी अनुष्ठान । कोण्ही करिती जपध्यान । तैं करावया वरप्रदान । तयासी गमन घडतसे ॥३१॥

जैं ऐसिया कारणां लक्षिती । तैं वर देवोनि सत्वर येती । आतां लागली दिवसगती । म्हणोनि चित्तीं चिंता मज ॥३२॥

कीं न कळे करावया तपाचरण । गेले वाटती आपुले रमण । तैसाहि न लभेचि ठिकाण । जाऊं आपण त्या ठायां ॥३३॥

तंव बोलती झाली गौरी । तपा गेला म्हणूं हा त्रिपुरारी । तरी शोध घेतला म्यां माहेरीं । स्मशानांतरी धुंडिलें ॥३४॥

तपोवनही विलोकिलें । ऋषि तापसीही शोधिले । दरीं पर्वतीं पाहिले । गण श्रमले उमगिता ॥३५॥

यद्यपि जातां तीर्थाटणा । मज समागमें नेती जाणा । तथापि शोधिले क्षेत्र नाना । पंचवदनाकारणें ॥३६॥

भक्ता लावावया कस । गेला म्हणों जरी उदास । तंव हे दिवस लोटले बहुवस । अद्यापि तामस नयेची ॥३७॥

तंव लक्ष्मी म्हणे साजणी । मग स्वामीची अद्‌भुत करणी । ती न कळेची कोण्हालागोनी । वेदपुराणीं अतर्क्य ॥३८॥

लुब्ध होतो भोळ्या भाविका । कीर्तनीं लुब्धोनी जाय निका । पदींच बैसवी तो सेवका । दास देखा होय त्यांचा ॥३९॥

हा तो संताचा अंतरंग । वर्ततो त्याचा पाहोनि प्रसंग । रुपें धरोनि करी संग । शेखी निःसंग म्हणवितो ॥४०॥

याशीं थोरपणीं नाहीं चाड । नेणेचि प्रापंची सुरवाड । भावभक्तीच यासी गोड । येर अनावड सर्वथा ॥४१॥

शोध करावा जरी निश्चित । तरी नामा रुपा नाहीं गणित । म्हणोनिया ते म्हणती अनंत । आनुवादत श्रुती हे ॥४२॥

मजपासी नाहीं प्रीती । कौस्तुभ नावडे वैजयंती । पठशैया वैकुंठवस्ती । तया निश्चिती नावडे ॥४३॥

भ्‍रुगुलता वत्सलांछन । ब्रीद चरणींचें जें पावन । आणि आवडती अनन्यशरण । प्राणाहून अधिक हे ॥४४॥

बहु भागले शोध करितां । तो न चढे कवणाच्या हातां । माझा पाड तो केउता । तया अनंता धुंडावया ॥४५॥

परी चिंता मनीं रात्रंदिवस । विव्हळ होतें गे साजणी मानस । काय म्हणोनिया पुराणपुरुष । उपेक्षूनी आम्हांसी पै गेला ॥४६॥

तंव चातुर्य चंपकमराळी । लावण्यसरिता हिमनगबाळी । विचार करोनि हृदयकमळीं । म्हणे नव्हाळी परियसा ॥४७॥

एक आठवली कल्पना । परिसा करिते निवेदना । येईल जरी तुमच्या मना । तरि ध्याना आणिजे ॥४८॥

ऐसें ऐकतांचि बोल । ते रमा सावित्रीसी वाटले अमोल । म्हणे आतां न लावी वेळ धीर पळ असेना ॥४९॥

उमा म्हणे परिसा सादर । तुम्हासी आठव नोव्हेची निर्धार । योजिता योजना अपार । न लागे थार याची गुणें ॥५०॥

बहु दिवसाचें कथन । असें कराजी आठवण । तंव सावित्री म्हणे आपण । करोनी स्मरण निरोपिजे ॥५१॥

उमा म्हणे सावित्रीसी । नारदें कथिलें स्वामीपाशीं । वाणिलें तया अनसूयेसी । येर सकळांसी निंदिले ॥५२॥

तैं तयातें दटावोन । बोलते झालों शापवचन । शेवटीं बोलिला जो कठिण । ते आठवण आहे कीं ॥५३॥

मन खोंचलें तयाच्या बोलें । मग आपुले पति आपण आराधिले । प्रसन्नीं वचनातें मागितलें । शब्दीं गोंविलें आठवतें कीं ॥५४॥

तें करिताचि ज्ञानप्रबोध । आपण केला भेदवाद । शेखी माजविता आल्हाद । केले विनोद आठवतें कीं ॥५५॥

मग दृढ घेतलें भाकेसी । जाणेचि प्राप्त आलें तयांसी । हेचि गोष्टी आठवली मजशी । ते तुम्हांसी सांगितली ॥५६॥

तंव रमा सावित्री बोलत । बाई सत्यचि कीं हे मात । परी त्याचि कार्या नेमस्त । गेले सिद्धांत केवी कळे ॥५७॥

शोध बहुतापरि आणविले । शोधिता स्थळची नाहीं उरलें । तिघांतुन एकही न भेटले । आश्चर्य वाटलें मानसीं ॥५८॥

एक म्हणे हा नारदची कळकूटा । येणेंचि केल्या बारा वाटा । काय करावें याचिया ओंठा । करित चेष्टा फिरतो ॥५९॥

कमळा म्हणे लावोनि कळी । तो तरी गेला परस्थळीं । परत न ये अद्याप वेळीं । दुःखमेळीं घातलें ॥६०॥

तो जरि येता परतोन । त्यासीच पुसतों वर्तमान । स्वामीचा शोध त्याजविण । कदापि जाण लागेना ॥६१॥

तंव ती बोले अंबिका । मज उपजली आशंका । नारद न येचि सन्मुखा । श्रापधोका आपुला त्या ॥६२॥

मग तिघी बैसोनि येकांतीं । म्हणती कैसी तरी करावी गती । ज्या युक्तीनें स्वामी भेटती । तेचि रीती कोण सांगे ॥६३॥

अंबा म्हणे धरोनी निजध्यान । करुं कांहीं तपाचरण । जेणें पतीचे चरण । पाहूं आपण साजणी ॥६४॥

हें मानलें तिघिसीं । तपाचरणीं बैसल्या वेगेसी । जपध्यान अहर्निशीं । नाना व्रतांसी आचरती ॥६५॥

सिंहावलोकन करुन । श्रोते परिसावें मागील कथन । नारदें पाहिलें पाताळ भुवन । शोभायमान सुंदर तें ॥६६॥

आतळ वितळ सूतळ । तळातळ आणि रसातळ । सातवें निरखिलें पाताळ । जळ बंबाळ तळवटीं ॥६७॥

कूर्म वराह नाग । हाटकेश्वर देखिला सांग । भोगावती वंदोनी सवेग । मनीं स्वर्ग इच्छिला ॥६८॥

स्वर्गाप्रती नारद आला । सकळ स्वर्ग विलोकिला । कैलासभुवन देखता डोळां । उदास भासला नारदा ॥६९॥

कुडी जैसा प्राणावीण । वनिता जैसी कुंकुमहीन । भूपतिवांचोनि सिंहासन । कैलासभुवन तेंवि दिसे ॥७०॥

नारद पुसे नंदिकेश्वरासी । शिव अपर्णा कोठें सांग मजसी । येरु म्हणे मुनीसी । काय तुम्हांसी सांगू आतां ॥७१॥

शिव गेले बहु दिवस । न येती मागुती गृहास । शुद्धीही न लभे निःशेष । म्हणोनी तपास अंबा गेली ॥७२॥

उमा सावित्री आणि रमा । मार्ग पाहतां पावल्या श्रमा । न येती तिघेही आश्रमा । म्हणोनि उत्तमा तपाचरणी ॥७३॥

ऐकोनी नंदिकेश्वराच्या बोला । नारद गदगदां हासिन्नला । म्हणे ईश्वरी अद्‌भुतलीला । कदा कवणाला न कळेची ॥७४॥

विस्मये करितसे भाषण । केवढा पहा धरिला अभिमान । संकटीं घालोनि पडिल्या आपण । वृथा शीण जोडिला ॥७५॥

नारद पुसोनि नंदिकेश्वरासी । धुंडीत चालिला तपोवनासी । तंव तपाचरणीं देखोनि तिघींसी । अनन्येसी नमियेल्या ॥७६॥

नारद पहातांची नयनीं । जवळी पाचारिती त्यालागुनी । म्हणती बा आलासि कोठोनी । वडील नयनीं देखिलें का ॥७७॥

आमुचे स्वामी टाकोनी आम्हांसी । नेणो गेले कवणे देशीं । झाली दिवसगती बहु त्यांसी । म्हणोनी तुजसी विचारितों ॥७८॥

नारद म्हणे ओ माते । मी गेलों होतों पाताळातें । तेथील सिद्धयोगी तीर्थे । क्षेत्र दैवतें पाहिली ॥७९॥

तेथूनि माते आगमन । येतां पाहिले कैलासभुवन । तंव तें पाहोनिया शून्य । माझें मन गजबजिलें ॥८०॥

तेथें गण गणपती वीरभद्र । आणि षडानन नंदिकेश्वर । म्लान सकळांचे वगत्र । कोण्ही उत्तर न बोलती ॥८१॥

तंव पुसता झालों नंदीसी । न देखेची येथें शिवउमेसी । तेणें कथिलें मज वृत्तासी । अंबा तपासी पै गेली ॥८२॥

पति गेले कवणिया ठाया । बहुत दिवस झालति तया । त्यायोगें शुष्क काया । तिघी माया झाल्याती ॥८३॥

तिघी एकत्र मिळोन । दुःखें करिती तपाचरण । ब्रह्मा विष्णु यावा ईशान्न । म्हणोनि यत्‍न करिताती ॥८४॥

ऐसें नंदिकेश्वरें निवेदिता । खेद वाटला मम चित्ता । शीण पावलों तुम्हां शोधितां । आलों अवचितां या ठाया ॥८५॥

अंतरज्ञानी असे नारद । पिंडब्रह्मांडींचे जाणतो भेद । परी लीलालाघव प्रसिद्ध । दावी अगाध करोनिया ॥८६॥

सोंग ऐसी संपादनी । दावी ऐसा तोचि गुणी । तेवी नारदाची करणी । कर्म करोनी वेगळा ॥८७॥

खेळीयामाजी नारद बळी । वेगळा राहोनि लावी कळी । सहज विनोदाचे मेळीं । करी रळी अनुपम्य ॥८८॥

असों तो हा नारदमुनी । विनवोनि सांगे माते लागुनी । गेलों होतों पाताळभुवनीं । न देखें नयनीं तेथें त्या ॥८९॥

अहो माते तुम्हीं तरी । शोध केला सांगा कोठवरी । काय निमित्तें निर्धारी । कोणते परि गले ती ॥९०॥

सावित्री म्हणे निमित्त नसता । तिघेहि उठोनि अवचिता । गेले नेणो कवणीया पंथा । हे तो सर्वथा न कळेची ॥९१॥

नारद म्हणे निमित्त्या वांचून । जाईल तरी कोठें कोण । येर्‍हवी जातां परतोन । येती क्षण न लागता ॥९२॥

गेल्यासि सांगता बहुदिवस । म्हणोनी आश्चर्य वाटे आम्हांस । कारणावाचोनि निःशेष । जाणे तयांस न घडेचि ॥९३॥

तंव अंबा बोले नारदातें । ऐके बा तूं मम वचनातें । माझे मनीं जें कां गमतें । ते मी तूं ते सांगेन ॥९४॥

तुवां मागें येवोनी । निरोपिलें होतें स्वामी लागोनी । धन्य पतिव्रता शिरोमणि । अत्रिराणी अनसूया ॥९५॥

ज्या पतिव्रता युवती । त्या अनसूयेसी दासी शोभती । तैं जावोनी श्रापोक्ति । तुजप्रति आम्ही बोलों ॥९६॥

ते शब्द तुवां परिसोन । बोलिलासी असत्य करा मम भाषण । तैच होय शापबंधन । मज लागुन तूमचें ॥९७॥

ऐसें बोलोनि तुम्ही गेला । मागें आर्चिल आम्हीं पतिला । दिवानिशी राहोनि सेवेला । प्रसन्न त्यांजला पै केलें ॥९८॥

तपांसी सुप्रसन्न देखोनी । मग प्रार्थिलें नम्र वचनीं । ते म्हणती कोण मनीं । आम्हां लागुनी अर्थ सांगा ॥९९॥

प्रथम वचनी गुंतविलें । मग वृत्तातें कळविलें । नारदें अम्हातें दूषिलें । बहु वर्णिले अनसूयेतें ॥१००॥

तरी तेथें जाऊन । करा जी सत्त्वाचें हरण । ऐकोनि प्रबोधिता आम्हां लागुन । मग रुसोन बैसलों ॥१॥

देखोनि आमुच्या हट्टासी । दया उपजली पतीसी । म्हणती सत्य दिधलें वचनासी । सत्त्वहरणासी जाऊ आम्ही ॥२॥

कांहींक दिवस लोटतां । तिघे उठोनि गेले अवचिता । कोठें न लभति शोध करितां । जीवीं चिंता झोंबली ॥३॥

नाहीं विचारिलें आम्हांतें । कांहीं न कळविलें वृत्तातें । त्यजोनि कांता प्रजापदातें । गेले आता ते निघोनि ॥४॥

नारदा त्या दिवसापासून । आम्हीं त्यजिलें अन्नपान । न रुचे कांहीं सुखशयन । प्रपंचीं मन उदास ॥५॥

अहा पति गेले टाकोनिया । नारदा आतां काय ठेवोनि काया । जिणें यर्थची हे सखया । पतिपायां अंतरलों ॥६॥

एकोनि उमेचें उत्तर । नारद देतसे प्रत्युत्तर । तुम्हींच अभिमान धरोनि थोर । केला विचार अविवेकीं ।॥७॥

कासया वचनीं गुंतवावें । ऐसें कार्या तुम्हीं योजावें । हें काय माते तुम्हासी बरवें । अपाय घ्यावे करोनी ॥८॥

अनसूया पतिव्रता दारुण । हें प्रथमचि केलें म्या निवेदन । तुम्ही तयाचे मनोनि दूषण । केलें कारण भलतेची ॥९॥

अनसूयेचें अद्‌भुत तपतेंज । जें या भास्कराहूनि असें सतेज । तेंथें अप्रयोजक काज । योजिलें सहज तुम्हीं वाटे ॥१०॥

तेथें ब्रह्मा आणि ईश । काय करील सांग तो रमेश । गेलें असतां नाश । वरील आपेश वाढतें ॥११॥

मद्भाषणीं तुम्हा राग । वाटतांची वाढला हा रोग । आतां न चुके भोगल्याविण भोग । कैसा उद्योग हा केला ॥१२॥

हे तिघे जरी असतील तेथें गेले । तरी जाणा तुम्हीं सत्य गुंतलें । किंबा श्रापोनिया टाकिले । मज तो गमले येणेंची ॥१३॥

तुम्हीं करोनियां विवाद । हें कर्म करविलें जी अशुद्ध । मोठाचि घडविला अपराध । येणें निषध सर्वांसी ॥१४॥

ऐसी घडोनि येता गोष्टी । मग तुम्हां तया कैसेनि भेटी । प्रस्तुतची पडली तुटी । तुम्हां दृष्टीं पडतसे ॥१५॥

तुम्ही हे वासना धरोनि कुडीं । आपआपणा घडविली बेडी । कोण ऐसा बळी या तोडी । वारी सांकडी तुमची ॥१६॥

ते न जातील जरी त्या ठायां । कधीं न पडती अपाया । येतील सत्य फिरोनिया पहाल तया आनंदें ॥१७॥

ऐकोनिया नारद-उत्तरा । सुटला भय कंप दरारा । जीव प्याला बहुत वारा । जैशा गारा वीरती ॥१८॥

नारदवचनाचे बाण । तेणें हृदय केलें चूर्ण । नेत्रीं बाष्प कंपायमान । शरिरीं म्लान पै झाल्या ॥१९॥

मग विनविती तेव्हां नारदासी । कृपादान दे गा तूं आम्हांसी । जावोनिया सिंहाचळासी । अत्रिआश्रमासी शोधी त्या ॥२०॥

नारद म्हणे आज्ञा प्रमाण । मी अवश्य शोधासी जाईन । दैवभागें आलों परतोन । तरी करीन श्रुत मातें ॥२१॥

ऐसें कां जरी म्हणसी । तरी ऐक निवेदितों तुजसी । जरी गुंतविलें असेल तिघांसी पहातां मजसी तेचि परी ॥२२॥

ते करितां सत्त्वहरण । अनसूया क्षोभली असेल दारुण । मी शुद्धीस जातां निरखोन । करील ताडण वाटतें ॥२३॥

येर्‍हवी भीती मज न वाटे । परी तुमच्या करणीचे उद्भवती कांटे । कर्तृत्व करोनी अचाटे । कर्म खोटें भोगवीत ॥२४॥

तुमची अवज्ञा करावी । तैसी नाहींच आमुची पदवी । आपुलीं पदवचनें वंदावीं । हेचि बरवी श्लाघ्यता ॥२५॥

नमस्कारोनिया नारदमुनी । सव्य तिघींसी घेऊनी । ब्रह्मवीणा स्कंधीं वाहुनी । नामस्मरणीं चालिला ॥२६॥

सप्रेमें आनंदमेळी । गर्जत नामाचे कल्लोळी । नारद पावला सिंहाचळीं । आश्रमाजवळी अत्रीच्या ॥२७॥

ध्वनी ऐकोनि नामाची । मूर्ति उठली करुणेची । काया कवळी नारदाची । उपमा तयाची काय वाणूं ॥२८॥

जैसा कच आणि बृहस्पती । कीं भरत आणि रुघुपती । कीं शिव आणि विष्णु मूर्ती । तेवी प्रीती भेटले ॥२९॥

तव अनूसया आली धावोन । नारद पूजिला आदरें करुन । येरयेरा क्षेम पुसोन । आनंदघन मानसीं ॥३०॥

अनसूयेनें बाळ आणिलें । तें नारदापाशीं पहुडविलें । पहातांचि मन संतोषलें । बाळें विलोकिलें सप्रेमें ॥३१॥

बाळें करिती तेव्हां हास्य । तें नारदची जाणें रहस्य । चरित्र दावावयातें अवश्य । झालों वश्य मुनेंद्रा ॥३२॥

नारदें तुकवोनि मान । हास्याहास्य मेळवी पूर्ण । अत्रि अनसूयेतें लक्षून । म्हणे धन्य तुम्ही कीं ॥३३॥

हा वैकुंठपुरविलासी । पैल तो सत्य लोकवासी । एक वसणार जो कैलासी । तुम्ही ऐसियासी पावला ॥३४॥

तुम्हांऐसे भाग्यनिधी । म्यां तंव देखिले नाहींत कधीं । वाढावया वंशवृद्धी । बरवीं संधी तुम्हां हे ॥३५॥

हें सकळांचें अधिष्ठान । झालेति तुमचे स्वाधीन । अनंत जन्मीचें तपाचरण । हेंचि जाण फळ त्याचें ॥३६॥

याचिलागी बहु तपति । योगयागादि साधनें आचरती । दानें वृत्तें नाना करिती । परि न पावती या फळा ॥३७॥

तंव अनूसया म्हणे मुनिवर्यां । ही तव तुमची सर्व दया । हीं बाळकें प्राप्‍त व्हावया । रचिले उपाया तुम्हींच की ॥३८॥

असो नारदा हें भाषण । सांगा कोठोनि केलें आगमन । येरु म्हणे स्वर्गलोकींहून । येथें येऊन पावलों ॥३९॥

तंव अनूसया विनवीत । पुसतें सांगा तोचि वृत्तांत । तिन्ही बाळकें येथें स्वस्थ । कांता विचरत कैशा त्या ॥४०॥

परिसोनि सतीच्या प्रश्नासी । नारद निवेदिता झाला तियेसी । पाताळयात्रा करोनि वेगेसीं । गेलो स्वर्गासी त्वरेनें ॥४१॥

लोकालोक सर्व पाहिले । वैकुंठ सत्य कैलास देखिले । तंव शून्य दिसती सर्व स्थळें । चुकूर जालें मन माझें ॥४२॥

जेवी विगतविधवेचें वदन । कीं रजनी जैसी चंद्रावीण । कीं कुडी जैसी प्राणहीन । तेंवी भुवन तें दिसे ॥४३॥

लोक दिसती हीनकळा । जेवी आमची अंबकुळा । दिसती क्षीण अवकळा । जाल्या विकळा सकळांच्या ॥४४॥

तंव देखिला नंदिकेश्वर । तयाचाही उतरला नूर । त्यासी विचारीला प्रकार । तेणे सविस्तर सांगितला ॥४५॥

रमावर उमावर विधाता । नेणों गेले कवणिया पंथा । त्यांची कोठें न कळे वार्ता । म्हणोनि दुःखिता स्वामिणी ॥४६॥

तया दुःखभरें करोनी । सावित्री रमा उमा वनीं । बैसल्या जावोनि तपाचरणीं । सर्व त्यजोनी उपभोग ॥४७॥

वचन परिसोनि तयाचें । शोधोनि दर्शन घेतलें मातेचें । शुष्क शरीर झालें त्यांचें । नेत्रीं साचे पाहिलें ॥४८॥

तयांसी करोनी नमन । विचारितांचि वर्तमान । उमा करी सत्य निरुपण । तें म्यां श्रवण सर्व केलें ॥४९॥

मग जाणविलें म्यां बहुतापरी । अहो कोण बुद्धि केली तरी । स्वामीसी लावोनिया दुरी । दुःखांतरी पडिलों कीं ॥५०॥

तंव त्या येती काकुलती । कीं आम्हा शोध न लगे निश्चिती । तरी तुंवा जावोनि सत्वर गती । प्राणपती शोधावे ॥५१॥

अत्यंत देखोनि दीन अवस्था । पाहोनि तयांची ग्लानता । दया उपजली मम चित्ता । मग अवश्य तें बोलिलों ॥५२॥

नमस्कारोनि तयांसी । शोधानिमित्त आलों आश्रमासी । तयापरी सुचवीं तुम्हांसी । सावध मानसीं असावें ॥५३॥

रमा सावित्री उमा । आचरती दिव्य व्रतनेमा । पावावया ह्या उत्तमा । करिती सीमा जीवप्राणें ॥५४॥

आहार निद्रेचा केलां त्याग । न आंगिकारिती कांहीं भोग। त्यांसी चिंतेचा लागला रोग । कांहीं उद्योग न सुचें तयां ॥५५॥

अभिमान जालासे गलित । पतिदर्शनातें इच्छित । चातकाऐसी वाट पहात । शोकाकुलीत मानसीं ॥५६॥

तंती प्राण त्यांचे उरले । तें न जाय मज निरोपिलें । ऐसिया नारदाचे बोले । चित्त द्रवलें अनसूयेचें ॥५७॥

तयांची दुःखवार्ता ऐकोनी । सद्गद अश्रु वाहती नयनीं । अहा कर्म कसें ओढवोनी । दोही स्थानीं पावले ॥५८॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । सर्वाधिष्ठ असती थोर । ऐसें असोनी भ्रतार । तया अंतर पडलें कीं ॥५९॥

चरणसेवा रात्रंदिन । करी स्वयें रमा आपण । तयासी अंतराय कम करुन । आला वोढवून पहा कीं ॥६०॥

मम श्वसा सावित्री पतिव्रता । तत्भ्रतार विधिसृष्टिकर्ता । कर्म वोढविलें पाहतां पाहतां । जाला परता कुबुद्धीनें ॥६१॥

केवढी कर्माची विचित्र गती । जी शंकराअंकीं बैसणार पार्वती । ती पतिवियोगें भोगी ग्लांती । दुःख चित्तीं अनिवार ॥६२॥

सृष्टी रचिता हा चतुरानन । सत्यलोकवासी सर्व संपन्न । तो हा कर्मच पेटें जाण । बाळ होवोनि गुंतला ॥६३॥

तेवींच हा वैकुंठींचा राणा । जो अतर्क्य वेदपुराणा । तो कर्मयोगें मम भुवना । त्यजोनि आसना गुंतला ॥६४॥

यापरीच हा महेश । स्मशानवासी जो उदास । कर्मेंचि पावोनि बाळवेष । मग स्थळास गुंतला ॥६५॥

अनिवार कर्माची गती । जीवमात्र सर्व भोगिती । कर्म न सोडी कोणाप्रती । यातायाती कर्मबळे ॥६६॥

नारदा या कर्माचे विधान । पहा तूं नित्य करिसी भ्रमण । ग्रह शशी सूर्य तारांगण । कर्मे स्थिरपण नसे त्या ॥६७॥

कर्मे विष्णूसी अवतार । कर्मे स्मशानवास भोगी शंकर । कूर्म वराह वहाती भार । कर्मे फणीवर धरा वाहे ॥६८॥

कर्मे विधी जाला कुल्लाळ । सहस्त्रभगी जाला अखंडळ । कर्माऐसे फेरे सकळ । ब्रह्मांडगोळ व्यापिला ॥६९॥

मुनी कर्म जैसें करावें । तयापरी तैसेंची भोगावे । पेरिलें तेचि उगवावें । फळ पावे तैसेंची ॥७०॥

कर्मचि लागलें याचे पाठीं । तैसीच भोगिती हे रहाटी । कर्मलेख आमुचे अदृष्टीं । म्हणोनी गोष्टी जाली हे ॥७१॥

असो कर्मे केलें तें बरवें । परी दुःख माते हें न ऐकवें । तरी एवढेंचि कृपादान मज द्यावें । पती भेटवावे ज्याचें त्या ॥७२॥

नारद म्हणे धन्य माते । सदयत्‍वें बोलसी कृपावंते । तंव आज्ञेकरोनि अतौंते । आणितों तिघीतें या ठाया ॥७३॥

तूंतेही होईल दर्शन । परस्परें होईल क्षेमालिंगन । परी कांहीं लीला दाऊन । छेदी अभिमान प्रयुक्तीं ॥७४॥

विनोदें अभिमान हरावा । सन्मानोनी संतोष करावा । कार्यार्थ युक्तीनें साधावा । उपाय योजावा कुशलत्वें ॥७५॥

तूं तंव सर्व कळा जाणसीं । देही अभिमानातें नुरवीसी । एक तत्त्वें सर्व निरखीसी । अद्वय मानसीं तूं माये ॥७६॥

जयातें करिसी कृपें अवलोकन । तो तात्काळची होय सधन । मूर्ख तोचि पंडित जाण । अज्ञाना ज्ञान होय प्राप्ति ॥७७॥

विनवोनिया नारदऋषी । म्हणे मी जातो स्वर्गासी । तेवीच नमोनि अत्रीसी । अतिवेगेंसी निघाला ॥७८॥

हे संवादरुपी प्रेमळ कथा । दत्तची स्वयें झाला मज निवेदिता । तेचि ग्रंथीं लिहूनि आतां । जालों अर्पिता आदरें ॥७९॥

इच्छा होती बहुमानसीं । प्रेमें पूजोनि सज्जनासी । भोजन घालावें संतमहंतांसी । दीनदुर्बळांसी प्रियकर ॥८०॥

हेतू उपजला अत्यंत गहन । परि मी पडलों दरिद्री अकिंचन । जीवीं तळमळ रात्रंदिन । हे दत्तदयाघन जाणतसे ॥८१॥

ती आळ पुरवावयासी । मज पावला तो अविनाशी । प्रेमे करोनि प्रबोधासी । दे साहित्यासी मेळवोनी ॥८२॥

म्हणे अक्षयी होय समाराधन । सकळ वर्णासी मिळे भोजन । तेंचि सुरुची निर्मी पक्वान्न । जेणें प्रसन्न सेवणारे ॥८३॥

या प्रयोजनींचे मुख्य प्रकार । ते द्वितीयांत दाविले प्रखर । वरप्रसादनी विचार । सारासार जाणविला ॥८४॥

येथें कासया पाहिजे अनुमान । सहजची होय संतर्पण । लेखक वाचकालागून । तृप्ती गहन श्रोतीयां ॥८५॥

स्वीकारितां क्षुधा वाढे । तुष्टी पुष्टी अधिक जोडे । अर्थज्ञाचे पुरें कोडें । सुख रोकडें लाभते ॥८६॥

दत्त तोची सद्‌गुरु अनंत । देखोनि सुताचा भावार्थ । पूर्ण करावया मनोरथ । ग्रंथी वदवीत स्वलीला ॥८७॥

येथें दशसान्निध्यसंवाद । संवादीच प्रगटला आनंद । पुढिले प्रसंगी विरोध । सर्व विषाद हारतील ॥८८॥

समदृष्टी होतील सकळांसी । आलिंगनीं वर्षतील आनंदराशी । सुर मानव देव ऋषी । महोत्सव सकळांसी होईल ॥८९॥

श्रोत्यांसी विनवी अनंतसुत । मज निमित्यासी पुढें करोनी सत्य । ज्याचा ग्रंथ तोचि बोलत । श्रवणीं रत असावें ॥९०॥

ग्रंथी स्थापिती कामना । लाभ दर्शविती नाना । बोलतों न करोनी योजना । जैसी भावना तैसें फळ ॥९१॥

फळ असें वृक्षासी । वृक्षरोपे त्या भूमीसी । भूमीतें संत तेजोराशी । सेविंजे त्यासी सप्रेम जीवनें ॥९२॥

काया वाचा आणि जीवें । संतासी सेवीजे निजभावे । ते कृपा करितांची आघवें । फळ तें पावे सहजची ॥९३॥

म्हणोनी संतचरणीं रत । जीवेंभावें अनंतसुत । अपराधी परी दास म्हणवीत । द्वारी तिष्ठत किंकरसा ॥९४॥

मग तया साधुसज्जना । आली दीनाची करुणा । जाणोनि अंतरींची वासना । करिती कामना पूर्ण माझी ॥९५॥

इति श्रीदत्तप्रबोध ग्रंथ । नारदभृगूचे संमत । श्रोते परिसोत भाविक भक्त । पंचमोध्यायार्थं गोड हा ॥१९६॥

॥ इति पंचमोध्यायः समाप्‍तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP