श्री दत्तप्रबोध - अध्याय एकविसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ।

ॐ नमो सद्‌गुरु सच्चिदानंदा । परमकृपाळा अद्वैतबोधा । अविनाशरुपा स्वतःसिद्धा । सर्वज्ञ अभेदा सुखाब्धे ॥१॥

आदि अनादि विश्वंभरा । सर्वात्मका तूं सर्वेश्वरा । गुणातीता निर्विकारा । दयासागरा दीनबंधो ॥२॥

हे ज्ञानप्रज्ञा चैतन्यघना । जय मायातीता निरंजना । हे अज्ञानच्छेदका भवभंजना । अनाथपावना आनंदकंदा ॥३॥

जय परब्रह्ममूर्ते परात्परा । जय शुद्धसत्त्वा वेदसारा । अखिल अभंगा उदारा । जगदुद्धारा जगत्पते ॥४॥

जयजयाजी अव्यक्तव्यक्ता । निर्विकल्पा अचल शांता । विमलरुपा सर्वातीता । स्वामी दत्त नमो तुज ॥५॥

तूं दीनदाता परम सदय । दूरी करावया हें भवभय । धरोनिया अवतार नामें दत्तात्रेय । दाविसी उपाय जडजीवां ॥६॥

प्रगटोनिया तूं त्रिगुणात्मक । त्रितापा वारिसी आवश्यक । रुपें धरोनिया अनेक । दाविसी कौतुक भुवनत्रया ॥७॥

तूं अलक्षण अगोचर । तुझे लीलेसि नाहीं पार । उपमा द्यावया विचार । न दिसे साचार धुंडितां ॥८॥

तूं निरुपम गा सर्वसाक्षी । तुझें सदयत्वें चित्त मुमुक्षीं । रक्षिसी त्या आपुलें पक्षीं । न घडे उपेक्षी तयां कधीं ॥९॥

एवं पावन ब्रीद चरणीं । तुझिया असे मोक्षदानी । हेंचि वर्म जी लक्षोनी । आलों लोटांगणीं शरण तुम्हां ॥१०॥

आपण सकृप उदाराचे राणे । ऐसें गातीं वेदपुराणें । पापाचळें घेतलीं राणें । नामस्मरणें हें कळे ॥११॥

ऐसीं तव नामाची प्रौढी । पळविली समूळ वासना कुडीं । रसनेसी उद्भवली गोडी । जडली आवडी तव गीतीं ॥१२॥

गावें गीत हें विशेष । वर्णावे तव कीर्तिघोष । हा छंद उद्भवला मनास । विनवी पदास यासाठीं ॥१३॥

प्रेमें भाळातें वोपोनी । विनत झालों तव चरणीं । साह्य कीजे कृपा करोनी । वदविजे वाणी रसाळ हे ॥१४॥

तव प्रासादिक हा संवाद । म्हणोनि ग्रंथा नाम दत्तप्रबोध । तें मागील निरोपण शुद्ध । आहे प्रसिद्ध वीस पैं ॥१५॥

त्या विसाव्याचे अंतीं गोसाविया । प्रश्न करिती झाली अनसूया । मज अध्यात्मज्ञान कथीं गुणवर्या । ज्ञानसूर्या प्रकाशका ॥१६॥

पिंडब्रह्मांडींची कैसी रचना । कोणा आधीं कोण जाणा । तत्त्वज्ञानाचिया विवरणा । सांगे सगुणा मज आतां ॥१७॥

मातेचे प्रश्न ऐकोनि सुंदर । अवधूत त्या प्रश्नाचा करी आदर । मातेसी विनवी जोडोनि कर । श्रवणीं सादर असावें ॥१८॥

माते म्यां शिष्य यदु बोधिला । तो भाग तूतें निवेदिला । त्यापरी सहस्त्रार्जुन शरण आला । तेणें प्रश्न केला ऐसाची ॥१९॥

बोधितां त्यातें ज्ञान झालें । उपरी आध्यात्मिक प्रश्न केले । तेवींच त्वांहीं मज विचारिलें । मन आनंदलें बहु फार ॥२०॥

ऐसाचि प्रश्न जोडोनि करा । उमा पुसती झाली शंकरा । अर्थभाव ओळखोनि ते अवसरा । सदय अंतरा शिव होय ॥२१॥

होवोनिया तो सुप्रसन्न । गौरीचे आदरिले प्रश्न । म्हणे होवोनिया सावधान । करी श्रवण आध्यात्मिक ॥२२॥

ते उभयांचे वाग्विलास । बोधिले सद्‌गुरुरायें मज विशेष । आर्थिक देखोनि सहस्त्रार्जुनास । निरोप सुरस भाग तया ॥२३॥

तो इतिहास आध्यात्मिक । मज तूं विचारिसी आवश्यक । तरी सिद्ध श्रवणीं होय नेटक । सागतों मी ऐक सप्रेमें ॥२४॥

कळा कुशळता विद्या ज्ञान । चौदा चौसष्टींचे प्रमाण । परि हे लौकिकसंबंधीचें लक्षण । नोव्हे कारण स्वात्महितीं ॥२५॥

स्वात्महिताची जया चाड । अध्यात्मश्रवणीं तया आवड । आपआपणियामाजी कळे निवड । अत्यंत जोड जोडी पुढें ॥२६॥

याचि विचारणीं जो बरवा । तोचि उत्तम नरदेही जाणावा । तो स्वात्मसुखाचा ठेवा । पावेल अवघा आनंद ॥२७॥

त्या आनंदाचा जो भाग । घ्यावया पावे बुद्धिलाग । त्याचेंचि पूर्वकर्म चांग । तया उद्योग आठवे हाची ॥२८॥

अनंत पुण्याच्या पूर्वराशी । तोचि पावे या आध्यात्मिकासि । येरा न पावे हे मूढासी । खीर खरासी काय ते ॥२९॥

माते तव भाग्य बुद्धि दैदिप्यमान । जेवीं पळोपळ वाढे चंडकीर्ण । तो जेविं रश्मीनें शोषी जीवन । तेवीं तूं ज्ञान स्वीकारिसी ॥३०॥

येणें मन माझें आल्हादे । वाटे कवळावीं तुझीं हीं पदें । तूं स्वीकारिसील तीन्हीं पदें । वाटतें संवादें माझिया ॥३१॥

धन्य माते तुझे हे प्रश्न । धन्य तुझें पवित्र श्रवण । धन्य संवाद हे पावन । जगदुद्धारण कर्ते जे ॥३२॥

आतां या प्रश्नाचें उत्तर । वदेल अवधूत योगेश्वर । तें श्रोतीं श्रवण कीजे सादर । अध्यात्मविचार सुरस ॥३३॥

श्रवणींच पावे सत्य ज्ञाना । मननीं राखिजे अनुसंधान । आपली ठेव पावे आपण । सुखसंपन्न निजभाग्यें ॥३४॥

अवधूत म्हणे वो जननी । एकाग्र लक्ष्य दीजे श्रवणीं । आध्यात्मिक सांगतो विवरोनी । मूळापासोनी सविस्तर ॥३५॥

मूळ आधीं निराकार । तेथें कैंचा कोण प्रकार । नवते पवन पाणी भू अंबर । तेज संस्कार कोठोनी ॥३६॥

चंद्र सूर्य तारा ग्रहगण । नव्हते भू पाताळ स्वर्ग स्थान । यक्ष राक्षस मनुष्यगण । नक्षत्रें कोठून मेघमाळा ॥३७॥

तीर्थ देव नव्हत्या देवता । ठाव कोठोनि वृक्ष पर्वता । कैंचे सागर कैंची सरिता । शब्द नामता वार्ता नसे ॥३८॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । नव्हते वेद शास्त्रप्रकार । कांहींच नसे आकार विकार । म्हणोनि निराकार त्या म्हणिजे ॥३९॥

मन बुद्धि नव्हतें चित्त । अहंकार चैतन्य नवतें सत्य । द्वीप खंडें कोठोनि असत । मेरुची अमत कोठोनि ॥४०॥

नाद बिंदु नाहीं कळा ज्योति । वर्णभेद शब्द वाचा नव्हती । नव्हती खाणी योनीची गती । निराकार म्हणती निःशून्य ॥४१॥

जया नाहीं कांहीं आकार । तया नाम म्हणिजे निराकार । तया निराकारापासोनि प्रकार । परियेसी विस्तार कैसा तो ॥४२॥

निराकार आणि निशूःन्य । येथें नाहीं द्वैतपण । त्या निराकारापासून । जालें शून्य निरालंब ॥४३॥

शून्य ब्रह्म तें साकारलें । तयापासोनि आकाश जालें । आकाश पवनातें प्रसवलें । पवनीं निपजलें तेज तें ॥४४॥

तेजापासोनि जालें जीवन । जीवनापासोनि भूमी जाण । एवं पंचभूतें निर्माण । एकापासूनि एक जालीं ॥४५॥

या पंचभूतांचे एकवटीं । येथोनि जाली हे भूतसृष्टी । चराचराची राहाटी । मूळ खटपटी येथोनी ॥४६॥

या पंचभूता कर्ते उद्भव । तें निराळेंचि गा प्रेमतत्त्व । सकळ उभाराचें वैभव । व्यापकत्व लाघव तयाचें ॥४७॥

आतां शुद्ध निखिल ब्रह्म जाण । चैतन्य इच्छा जाली जयापासून । तया महातत्त्व म्हणोन । नामाभिधान पैं जालें ॥४८॥

तेथोनिया माया प्रगट ॐकार । त्या इच्छामाये पासाव प्रकार । दो गुणें जाला विस्तार । तोहि विचार परियेसा ॥४९॥

पुरुष आणि प्रकृति । ऐसे हे दोन गुण प्रगटती । ऐसी व्हावया कोण गती । ती ही निगुती अवधारा ॥५०॥

शुद्ध ब्रह्म मुळीं असतां । इच्छा उद्गार जाला पावता । त्या अविद्येकरोनि जीवता । जाला पावता दशातें ॥५१॥

अहं ब्रह्मोस्मि हा उद्गार । हा महामायेचा उभार । तेथुनि इच्छारुपी माया सुंदर । ते इच्छा उत्तर बहुश्याम ॥५२॥

ऐसी उद्भवतां आशा । पावला पुरुष प्रकृतिदशा । यासी दृष्टांत म्हणाल जरी कैसा । घठमठआकाशासारिखा ॥५३॥

मायातीत तो परमात्मा । तत्पद जाणिजे या क्रमा । त्वं पद म्हणजे जीवात्मा । पावला भ्रमा मायिकदशा ॥५४॥

विकार मायेचा पावला । मूळ स्वरुपातें विसरला । अविद्यें वेष्टित जाला । जीव हें त्याला नाम जालें ॥५५॥

आणिक तया जाणावयासी । योग असे निश्चयेसी । तोही सांगतों परियेसी । विवेकें मानसीं सांठवी ॥५६॥

पूर्ण चैतन्य म्हणजे काय । तरी तोचि परमात्मा होय । प्रत्यङ्‌ चैतन्याची नाम सोय । जीव पाहे तोचि तो ॥५७॥

या दोहींमिश्रित मंथनिक । साधनात्मक जाणिजे आवश्यक । त्रिगुण हे प्रापंचिक । येथोनि देख विस्तारले ॥५८॥

मूळ महातत्त्वचि हे माया । ॐकारस्वरुप साधिलें आया । ती अर्धमात्रा होऊनिया । ती गुणत्रया प्रसवली ॥५९॥

आकार उकार आणि मकार । त्रय मात्रा मिळोनि ओंकार । आतां देवतेचा प्रकार । तोही निर्धार परियसी ॥६०॥

आकारमत्रीं ब्रह्मदेव । उकारमात्रीं विष्णुस्वयमेव । मकारमात्रा तोचि शिव । गुण लाघव ऐक त्यांचें ॥६१॥

ब्रह्मयाचा असे रजोगुण । विष्णु सत्त्वगुणी प्रमाण । शिव तमोगुणी जाण । याहोनि भिन्न मूळ तत्त्व ॥६२॥

मूळ प्रकृति तोचि देहे । मातृकाअन्वयें पुरुष ॐकार होये । परवाचेचेनि सोये । अभिमानीं राहे सर्व स्वरुपीं ॥६३॥

परियेसी तेथील अवस्था । सर्व साक्षिणी दिसे पाहतां । सर्वाधिक्य तिची सत्ता । सकळ प्रसवता येथोनी ॥६४॥

आतां या त्रिगुणाचा त्रिभाग । तोही माते परियेसी प्रसंग । अंतरिंचे सांडोनि उद्योग । श्रवण चांग करी आतां ॥६५॥

येथें विलोमें करुन । तुज सांगतों त्रिमात्रेचें निरोपण । तयांचें कीजे अवधारण । एकाग्र मन करोनिया ॥६६॥

मायादेहो जेथें योजिला । तेथें अभिमानी रुद्र स्थापिला । वाचा पश्यंती बोले बोला । प्रळय अवस्थेला नेमिला ॥६७॥

हा मकारमात्रेचा विचार । तुज निरोपणीं निरोपिलें सार । आतां उकारमात्रेचा प्रकार । तोही सविस्तर परिसिजे ॥६८॥

हिरण्यगर्भ देहाआंत । उकार अभिमानी विष्णुदैवत । मध्यमा वाचा तेथें वदत । पालनार्थ रक्षिती तया ॥६९॥

दो मात्रेचा निवेदिला भाव । आतां उरला तृतीयेचा ठाव । तोही सांगतों अभिप्राव । न करीं वाव श्रवणीं तूं ॥७०॥

आकारमात्रा विराटदेहीं । तेथें अभिमानी ब्रह्मदेव पाहीं । वैखरीवाचा तये ठायीं । अवस्था तेही उद्भवार्थ ॥७१॥

रचावें सर्व या ब्रह्मदेवें । यातें विष्णूनें पाळावें । रुद्रें सकळां संहारावें । एवं करावें कार्या तिहीं ॥७२॥

आतां या त्रिमात्रेपासोन । तीन अहंकार जाले निर्माण । ते त्रिगुणिक अंशपूर्ण । यापासाव उत्पन्न ते ऐका ॥७३॥

सात्त्विक अहंकाराची उत्पत्ती । कोणती ऐकावी निगुती । निवडोनी सांगतों प्रचीती । घेईं निश्चिती बाणवोनि ॥७४॥

अंतःकरण आणी मन । बुद्धि चित्त चौथें जाण । अहंकार पांचवा निर्माण । वोळखे खूण तयाची ॥७५॥

याचा म्हणसी कोण प्रकार । तरी आत्म्याकडे करी संचार । विवेकादि सर्व विचार । येथोनि समग्र घडताती ॥७६॥

आतां राजस अहंकाराची वार्ता । परियेसी होय सावध चित्ता । श्रवण करीं एकाग्रता । तरीच सार्थकता निरोपणीं ॥७७॥

तंव अनसूया म्हणे योगिया । तूं शिणविसी निरोपणीं काया । तेवींच मी सादरें ऐकावया । नवजे वायां निरोपण ॥७८॥

आनंदोनि बोले अवधूत । राजस अहंकाराचें ऐके वृत्त । तयापासाव जाले जे निर्मित । ते मी श्रुत करितो तुम्हां ॥७९॥

पंच ज्ञानेद्रियातें व्यालें । तेवींच तन्मात्रेतें उदेलें । आणी पंच कर्मेद्रियें निर्मिले । एवं हे जाले ते ठायीं ॥८०॥

पंच ज्ञानेंद्रियें म्हणसी कोन । तेंही सांगतो निवडोन । श्रवण घ्राण आणि नयन । रसना त्वक्‌ नेमून स्थापिले ॥८१॥

आतां तन्मात्रेची नांवें । तेंहीं तुज सांगतो आघवें । शब्द स्पर्श रुप बरवें । रस गंध जाणावे हे पांच ॥८२॥

या कर्मेंद्रियांची खूण । सांगतों प्रगट नामाभिधान । वाचा पाणी आणी चरण । उपस्थ गुद मिळोन पांच हें ॥८३॥

ज्ञानेंद्रियें वोळखिजे ज्ञानासी । कर्मेंद्रियें राहटती कर्मासी । युक्त मात्रा या उभयांसी । सुखदुःखासी भोगविते ॥८४॥

आतां तामस अहंकारापासून । आकाश जालें हें निर्माण । आकाश उद्भव वायोपासून । वायो प्रसवून तेज दावी ॥८५॥

तेज व्यालेसें आपातें । आप व्यालें या भूमीतें । हें पूर्वीच निवेदिलें तूंतें । शून्य वीतें जालें या ॥८६॥

निशूःन्याचेंचि शून्य जालें । चैतन्यरुपें तुसावलें । इच्छामात्रें स्फुरण जालें । तत्त्व प्रगटलें महामाया ॥८७॥

तया अर्धमात्रेचा प्रसर । तोचि प्रकटला ओंकार । तेथुनी त्रिमात्रिक अक्षर । गुणप्रकार त्रिधैव ॥८८॥

उद्भव स्थिति प्रलय । त्रिकार्य हें तिघां होय । वृद्धयर्थ वेगळाचि उपाय । त्रिमात्रीं सोय काढिली ॥८९॥

त्रिमात्रिक तीन गुण । तीन अहंकार झाले उत्पन्न । तया अहंकारापासोन । वस्तु लक्षण वेगळेंची ॥९०॥

सात्त्विकापासोनि झाले पांच । राजसापासोनि एक पांच । तामसापासोनि एक साच । सह पांच अनुक्रम ॥९१॥

सात्त्विक अंतःकरणपंचक । राजसीं झालें त्रिपंचक । ज्ञानेंद्रिय तन्मात्रा कर्मेंद्रिय देख । एवं निःशंक उद्भवलीं ॥९२॥

तामसीं पंचभूतें झालीं । येरयेरातें प्रसवलीं । तयापासोनि जे विस्तारली । ते संख्या झाली पंचवीस ॥९३॥

आतां पंचविसांचा प्रकार । विभक्त असे गुणविचार । तें पुढील प्रसंगीं सुंदर । प्रश्नोत्तर गोड बहु ॥९४॥

अनुसूयेचिया प्रश्नासी । उत्तरें तोषवील अविनाशी । त्या निरोपणीं सुख श्रोतियांसी । योगी ज्ञातियासी आल्हाद ॥९५॥

सदयत्वें हा योगीराव । जाणे आर्थिकाचे सर्व भाव । तैसाचि दावितसे उपाव । तरावे जडजीव म्हणोनी ॥९६॥

न करी कांहीं विवंचना । बोधवी आपुलिया स्वात्मज्ञाना । आध्यात्मिक निरोपोनी खुणा । बाणवी सज्जना स्वकृपें ॥९७॥

उदार संपन्न हा गुरुदत्त । ज्ञानसूर्य हा प्रकाशवंत । विवेकें अज्ञान निरसित । ज्ञान बोधित निज दासां ॥९८॥

अनसूयेचे निमित्तें करोनी । ज्ञान प्रतिपादिता होय या जनीं । जया चाड उपजेल मनीं । तेची श्रवणीं सांठविती ॥९९॥

मुक्त मुमुक्षू अवघे जन । कराया ज्ञानगंगेमाजीं स्नान । श्रवणेंचि जाती दोष जळोन । विवरिता पावन पद पावे ॥१००॥

स्वपद करावें जीवा प्राप्त । म्हणोनि नामें प्रगटला दत्त । हा होय अनाथाचा नाथ । कृपावंत जिवलग ॥१॥

जिवाची जाणोनि वणवण । सदयत्वें बोधी आपण । जन्ममरणाचा वारी शीण । तोडी बंधन भवपाश ॥२॥

अनंत रुपीं जनीं वागें । भाविक भक्तजनीं रंगे । निवास करी संतसंगें । स्वहित सांगे गुजगोष्टी ॥३॥

जेथें संतांचे समाज । तेथेंचि वसे दत्त योगिराज । जया करुनी घेणें स्वहित काज । तेणेंचि बोज जाणिजेती ॥४॥

भावें संतसंगीं कीजे वास । पदसेवनीं असावा उल्हास । अनन्यपणें म्हणवावें दास । कधीं उदास न व्हावें तेथें ॥५॥

दिनरजनी न जाणोन । करावें प्रीतिभावें सेवन । मग तो वोळेल कृपाघन । देईल दर्शन संतसंगें ॥६॥

निष्ठाबळें घालोनि कास । भेटीविण मनीं न धरिजे आस । त्याग कीजे अन्य लाभास । राहिजे भेटीस इच्छोनी ॥७॥

संतसेवनी नुपुजे कंटाळा । ऐसिया ओळखी तो सुशीळा । मग अवधूतीं उपजे कळवळा । कळवळी बाळा माय जैसी ॥८॥

संतसेवेचें माहात्म्य विशेष । तें प्राप्‍त नोव्हे देवादिकांस । रात्रंदिन करिती आस । पावूं संगास म्हणोनी ॥९॥

संतचरणींची ही सेवा । कोठोनि प्राप्‍त आम्हां निर्दैवा । तो भाग प्राप्‍त मानावा । तेणेंचि या भवा दवडीती ॥११०॥

जया घडे संतसेवन । तया भाग्यासी पावेल कोण । स्वर्गादि पदें ओवाळून । टाकावे त्यावरुन यज्ञयाग ॥११॥

राम कृष्ण नामीं छंद । भावनिष्ट प्रेमें सद्गद । अद्वयपणें वागती अभेद । परमानंद गीत नृत्यीं ॥१२॥

तो ब्रह्मानंद विलोकोनी । तीर्थे पुनीत व्हावया येती धांवोनी । भावें जाती लोटांगणीं । दिव्य होवोनी स्तविती त्यां ॥१३॥

जो सकळ देवाचांही देव । जया हृदयीं ध्यातो शिव । तो हा अविनाश स्वयमेव । नाचे वैभव सर्व सांडोनी ॥१४॥

सांडोनिया मानापमान । सप्रेम कीर्तनी गेला भुलोन । सर्वातीत दिगंबर प्रगटोन । होवोनि तल्लीन भोवतां फिरे ॥१५॥

ते भाग्यवंत पाहिले । गुज संतांचें प्रगटलें । विठेवरी तें उभें ठेलें । अवीट संचलें सर्वाघटीं ॥१६॥

परी तें संतसेवेवांचोन । प्राप्त नोव्हे कवणालागोन । जरी घडे संतकृपा संपादन । तरिच कारण हातां ये ॥१७॥

संतकृपा व्हावयासाठीं । भावें जडावें चरणपुटीं । सेवा साधोनि गोमटी । घेइजे भेटी त्यायोगें ॥१८॥

संत सदय उदार शांत । पवित्र भजनीं सदा रत । अभय देवोनि शरणागत । प्रेमें आपंगीत पूर्णत्वें ॥१९॥

सकळ दुःखांतें हारिती । आपुलें सुख तया देती । स्वात्मीं सखया भेटविती । लोचनीं दाविती निजरुप ॥१२०॥

रुपीं रुपवोनि अरुपासी । नेवोनि पावविती अविनाशी । न वर्णवे तेथींचिया सुखासी । तें पद जीवासी लाभविती ॥२१॥

पहा याचि लाभासाठीं । नरजन्म दिधला शेवटीं । येथें गोष्टी त्यजोनी खोटी । साधिजे हतवटी स्वहितार्थ ॥२२॥

येथेंचि साधितां साधे स्वहित । बुद्धिबळें साधी प्याद मात । गंजिफाचा खेळितां खेळ अखेरींत । जाणा कार्यार्थ याचि गुणें ॥२३॥

हा व्हाया जरी लाभगुण । तरि धरावे संतांचे चरण । ते जीवाचें वारितील मरण । संशयछेदन करोनिया ॥२४॥

कृपें करितील अजरामर । निजधनें करितील सभाग्य थोर । खुंटवोनिया येरझार । पदा पर नेतील ते ॥२५॥

नेतां नेतील शिखरीं । कृपें ठेवितील चिदंबरीं । तेथून उठे द्वैतलहरी । लवण सागरीं मिळेल ॥२६॥

ऐसे साधु हे दयानिधी । यांतें शरण जावें आधीं । दर्शनेंचि तुटती आधिव्याधी । सर्व उपाधी तुटती संगें ॥२७॥

ते संत अनंत सद्‌गुरुनाथ । यांचे पदीं जडतां सप्रेमें सुत । वोळखोनि आपुला अंकित । हेतु पुरवीत आवडीचे ॥२८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । नारदपद्मपुराणींचें संमत । सदा परिसोत भाविक संतमहतं । अध्याय समाप्त एकविसावा ॥१२९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP