श्री दत्तप्रबोध - अध्याय चौदावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीसद्‌गुरु दत्तदिगंबराय नमः

श्रींमत्सद्‌गुरु अविनाशा । ब्रह्मानंदा तूं परेशा । जगद्वयापका पुराणपुरुषा । नमो सर्वेशा सनातना ॥१॥

अनंतवेषा अनंता । आनंदरुपा अपरिमिता । अगोचरा अपराजिता । अनाथनाथा नमो तुज ॥२॥

सर्वातीता सर्वज्ञा । सर्व साक्षी सर्व सुज्ञा । सत्तात्मका सत्प्रज्ञा । सर्व गुणज्ञा नमो तुज ॥३॥

निर्विकारा निरंजना । निराभारा तूं निर्गुण । निगमागम वंद्या तूं निपुणा । निजानंदसघना नमो तुज ॥४॥

विमलरुपा विश्वोद्धारा । विज्ञानसिद्धा विश्वंभरा । विराजिता विवेकसागरा । विनत दातारा तव पदीं ॥५॥

अनुपम्य अवीट तुझी लीला । वर्णितां वाढवी रस आगळा । जेणें सुख उपजे प्रेमळा । आणिक जिव्हाळा भक्तीचा ॥६॥

तुझी कीर्ती वाखाणितां । आनंद वाटे माझिया चित्ता । तरी दया करोनि कृपावंता । पुरवी हेता अंतरींच्या ॥७॥

तव कीर्तिकथामृतरस । प्राशवोनि तारी जीवास । तोडी तोडी भवपाश । न करीं उदास निजदासा ॥८॥

पूर्ण कृपेचें देवोनि दान । तुझा तूं चालवी निरोपण । मी नोव्हे रचिता पूर्ण । तुझें महिमान तूंचि बोले ॥९॥

गत कथाध्यायीं अवधूत । उरकोनि यात्रा आश्रमपंथ । धरोनि त्रिवर्गें त्वरें येत । आनंद भरीत अंतरीं ॥१०॥

आतां श्रोते सावधान । पुढील कथा किजे श्रवण । मायापुरीचें सन्निधान । तपोधन पावले ॥११॥

जवळी येतां अविनाश दत्त प्रगट झाली तेव्हां मात । अत्रि धांवे ऋषिसमवेत सप्रेमभरित अंतरीं ॥१२॥

जेथें अविनाश प्रगटला । तोचि पुण्यकाळ अमृतवेळा । मुहूर्त अभिजित साधिला । सकळ कळा प्रकाशित ॥१३॥

ऋषिसहित अत्रिमुनी । सामोरा येतां देखोनी । त्रिवर्ग जाती लोटांगणीं । बाष्प नयनीं दाटलें ॥१४॥

अविनाशीं होतांचि भेटी । जन्ममरणा झाली तुटी । दुःख पीडा दरिद्र कचाटी । जाती उठाउठी पळोनी ॥१५॥

पाप ताप दैन्य गेलें । आनंदसुख भाग्य पावलें । सतेज पाटव्य देह झाले सफळित फळले वृक्ष तेव्हां ॥१६॥

दुर्वास आणि चंद्रासी । आलिंगन झालें सर्वांसी । तिघे पाहतां तेजोराशी । आनंद मानसीं न समाये ॥१७॥

पुत्र पाहोनि अत्रिमुनी । हृदयीं दाटला उचंबळोनी । तंव तिघेहि आले लोटांगणीं । दृढ चरणी विनटले ॥१८॥

अंकावरी तिघेजण । घेता झाला ब्रह्मनंदन । माथा करोनि अवघ्राण । कुरवाळी वदन प्रीतीनें ॥१९॥

नित्य प्रगटतां स्वामिदत्त । परि तो आठव न ये मनांत । वाटे आजचि आला अकस्मात । हेंचि भासत सकळांतें ॥२०॥

भेटी सारोनि पर्वतशिखरीं । वंदिते झाले ते अवसरीं । अनसूयेचे मंदिरी । मिळती सुंदरी ऋषिपत्‍न्या ॥२१॥

पर्वतीं चढतां अविनाशी । शोभा पावली त्या वनासी । वक्ष टवटवले फलघोसीं । पुष्पें चौपासी दाटलीं ॥२२॥

पक्षी वनचरांचे पाळे । आनंदें किलकिलाट करुं लागले । दिसूं लागलीं रम्य स्थळें कौतुक वाटलें सकळांसी ॥२३॥

जेवीं जयश्री जिंकोन । स्वपुरा पावले रघुनंदन । अयोध्यावासी अवघे जन । आनंदघन तेविं हे ॥२४॥

आदरें जेवीं कौसल्येसी । तिघे नमिती सद्भावेंसी । तेवीं तिघे अनसूयेसी । नमिती पायांसी सप्रेमें ॥२५॥

माता हृदयीं धरी बाळां । दाटला प्रेंमाचा जिव्हाळा । सद्गद कंठ अश्रू डोळां वर्षाव कळा पावली ॥२६॥

मेघ मंद गडगडती । तेवीं कंठनाद उमटती । जैशा विद्युल्लता झमकती । तेवीं उठती लहरा देहीं ॥२७॥

मातापुत्रांचे आलिंगनीं । प्रेमाश्रु सकळांचे नयनीं । स्फुंदताती कवटाळोनि । रोम थर्थरोनी उठती ॥२८॥

अनसूया म्हणें बाळसुकुमार । चालतां शिणलां तुम्हीं नागर । उल्लंघिली हे भूमि अपार । दुःख थोर सोशिलें ॥२९॥

शीत उष्ण पर्जन्यधारा । धुधाट सोशिला तुम्हीं वांरां । क्लेश बाळकांच्या शरिरां । विश्रांत थारा कोठोनी ॥३०॥

क्षुधा तृषें असेल पीडीलें । नग्नपदीं कंटक रुतले । माझ्या तान्हुल्यांनीं सोशिलें । सुख पाहिलें नाहीं कीं ॥३१॥

ऐसें वेळोवेळां आठवून । बाळें हृदयीं धरी कवटाळोन । करें कुरवाळी वदन । मोहें स्फुंदन नावरे ॥३२॥

त्रिगुणात्मक विनवी मातेसी । किती हा मोह माते वाहसी । तुझिया कृपायोगें आम्हांसी । दुःख निश्च्येसी न बाधी ॥३३॥

तुम्हां उभयांचे दयें करुन । यात्रा झाली आनंदघन । दुःखलेशाचें भान । अणुमात्र जाण न देखों ॥३४॥

तुझी असतां पूर्ण दृष्टी । न पडूं माते कधीं संकटीं । दग्ध होतील दुःखाच्या कोटी । मग आटाटी कैची आम्हां ॥३५॥

पुरे मोह खेद न करीं । आम्हां बाळां पाहे बरी । सुखसंतोषें अंतरीं । विवेक विवरी तूं माये ॥३६॥

अविनाश झाला शांतवितां । आनंदें निर्भर झाली माता । तेवींच सुखावला तो पिता । सुख समस्तां वाटलें ॥३७॥

ऐसी होतां अस्तवेळ । तंव स्वर्गवासी पावले सकळ । विमानें दाटलीं तुंबळ । वाद्यकल्लोळ नानाविध ॥३८॥

तेहतीस कोटीं सुरवर । ऐरावतारुढ मुख्य अमर । यम वरुण नळ कुबेर । यक्ष किन्नर गंधर्व ॥३९॥

सनकसनंदन बृहस्पती । सनत्कुमार नारदमूर्ती । तुंबर विद्याधर सत्वर गती । दर्शनाप्रती पावले ॥४०॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । सिद्धिदाता विघ्नहर । लोकाधिपती गणभार । दर्शना समग्र दाटले ॥४१॥

रमा उमा सावित्री । सरस्वती आणि गायत्री । देवललना सुहास्य वक्‍त्री । दीपपात्रीं उज्वळिले ॥४२॥

आपुलाले बैसोनि वहनीं । चामुंडा पावल्या कात्यायनी । अंतराळ भरलें दुमदुमोनी । वाद्यध्वनी अपार ॥४३॥

ग्रह तारा ऋषिभार । सिद्ध साधु थोर थोर । योगी संन्यासी दिगंबर । भाविक नारीनर सर्व येती ॥४४॥

भू आणि अंबरा । दाटणी झाली एकसरा । पाहावया अविनाशदातारा । हर्ष अंतरा सकळांच्या ॥४५॥

सकळीं देखोनि तयासि । आरंभिते झाले स्तवनासी । देवांमाजी नारदऋषी । बहु प्रेमेंसी स्तवियलें ॥४६॥

ऋषिभारीं भ्‍रुगुमुनी । तोहि सरसावे दत्तस्तवनीं । बृहस्पति आदि करोनी । सप्रेम ध्यानीं स्तव करिती ॥४७॥

एकाग्र करोनी मानस । विलोकितें झाले त्या ध्यानास । पाहातां न परतवे नयनास । गुंतले सावकाश तद्रूपिं ॥४८॥

तें नारदें अवलोकिलें । म्हणे याचें तों रुपीं चित्त गुंतलें । केंवीं यातें जाय वर्णिलें । वृथा गेलें न हो ऐसें ॥४९॥

जगदुद्धारासाठीं । अवतार धरिला येणें सृष्टीं । आतां हें ध्यान सकळां दृष्टी । अतर्क्य गोष्टी पुढिलिया ॥५०॥

म्हणोनिया परोपकारी । वर्णूं ध्यान ये अवसरीं । तया ध्यानें नरनारी । हृदयांतरीं ध्यातील ॥५१॥

हें गुज जाणोनि मानसीं ध्यान वर्णिती नारदऋषी । म्हणोनि विनवितों श्रोत्यांसी । सावध श्रवणासी असावें ॥५२॥

बाळार्कमूर्ति प्रभायमान । गौर श्याम कर्पूरवर्ण । जटाभार भस्मोद्धारण । भीमासुरवदनत्रय कमळ ॥५३॥

कमलदलाक्ष आकर्ण विराजित । श्याम कुरळपत्रें भ्‍रुकुटी विराजित । सोज्वळ षड्रसतेज लखलखित । लाल श्वेत सुनीळ चक्रें ॥५४॥

भाळ विशाळ सुंदर । त्यावरी तिलक रेखिले नागर । सुनीळ वरीं कुरळभार । तेजाकार मुगुटशोभा ॥५५॥

जडित कादण मुगुटासी । मणीफणीवरी तेजोराशी । मकरकेयूर कुंडलांसी । श्रवणीं मुद्रेसी शोभविलें ॥५६॥

आजानबाहू दंड सरळ । रक्तपाणी सुकोमळ । अतिदिव्य हृदयस्थळ । कंठनाळ तयावरी ॥५७॥

त्रिवळी शोभे उदरावरी । नाभी वर्तुळ साजिरी । जानुजंघा कर्दळीपरी । गुल्फेवरी पदांच्या ॥५८॥

पाउलें द्वय सकुमार । जें शरणागताचें तारुं थोर । तयावरी शोभे तोडर । नाद गंभीर पावनाचा ॥५९॥

सुंदर शोभती मेखळा । वनमाळा शोभते गळा । कासे पितांबर पिंवळा। सोनसळा लखलखित ॥६०॥

यज्ञोपवीत शोभायमान । दंडी ब्रीद्राचें भूषण । मणिमय करी दिव्य कंकण । उत्तरीवसन मुद्रांगुली ॥६१॥

शंक चक्र गदां पाणी । त्रिशूल डमरु वाद्यरंजनी । दंडकमंडलू कौपिनी । मालास्मरणी कमळ तें ॥६२॥

शार्दूलचर्म सुंदर । तया आसनीं तो दिगंबर । कामधेनु सवें निरंतर । झोळीपात्र कनकाचें ॥६३॥

पादुका चरणीं मिरवीत । आनंददृष्टीं अवलोकित । विदेहवृत्ति सदा शांत । स्वानंदीं रमत सर्वदा ॥६४॥

एवं वर्णितां नारद । ध्यानधारणीं परमानंद । म्हणे हा असे कीं स्वतःसिद्ध । अवतरोनि अभेद वर्ते जगीं ॥६५॥

ऐसें हृदयीं धरोनि ध्यान । मानसीं करावें नित्य पूजन । षोडशोपचार करोनि अर्पण । पुढतीं स्तवन आरंभावें ॥६६॥

तंव प्रश्न करिती श्रोते । त्रिमुख निवेदिलें आम्हांतें । कवण स्थळीं असे कोणतें । सांगा निगुतें निवडोनी ॥६७॥

आणिक बोलतां षड्‌पाणी । आयुधें आणिलीं वर्णनीं । तरी तीं कैसीं कवणे स्थानीं । सांगा निवडोनी पृथकत्वें ॥६८॥

ऐकोनि श्रोतियांचा प्रश्न । वक्ता बोले तैं वचन । श्रीसद्‌गुरुप्रसादें करुन । सांगतो निवडोन परिसा जी ॥६९॥

नारदपुराणींचें संमत । मुनी स्वमुखें असे वर्णित । तें तुम्हीं ऐका सावचित्त । आठवलें किंचित निवेदूं ॥७०॥

जो सृष्टिकर्ता चतुरानन । विधि म्हणती जयालागून । तोचि गौरवर्ण करुन । शोभे वदन प्रथम तें ॥७१॥

जो सकळांचा नियंता । जो कर्म करोनि अकर्ता । जो अनंत ब्रह्माडें पाळिता । कमलोद्भवपिता म्हणती ज्या ॥७२॥

जो निर्विकार निर्गुण जो मायातीत सर्वज्ञ । जो ब्रह्मानंद चैतन्यघन । अवतार सगुण घेता जो ॥७३॥

जो शेषशयन क्षिराब्धिजामात । जो कमललोचन कमलाकांत । तो श्यामसुंदर मध्यस्थ । रुप विराजित मनोहर ॥७४॥

जो व्यालभूषण पंचवदन । जो कैलासपति उमारमण । जो हिमनगजामात पतितपावन । जो नंदीवहन दिगंबर ॥७५॥

जो जटाजूट गंगाधर । पिनाकपाणी सर्वेश्वर । जो त्रिनयन विषधर । व्याघ्रांबर शोभे ज्या ॥७६॥

जो त्रिपुरांतक मोक्षदानी । जो भोळा उदार शूळपाणी । तो कर्पूरगौर अंतस्थानीं । भस्मोद्धारणी मंडित ॥७७॥

ऐंसें त्रिगुणात्मकाचें मुखस्थान । तुम्हां केलें निवेदन । कैसें केलें आयुधधारण । तेही निवडून सांगतों ॥७८॥

तुम्हां श्रवणाची आवडी । अर्थ परमार्थी विशेष गोडी । हें ओळखोनि चोखडी । करोनि निवडी दावितों ॥७९॥

तळवटीचे उभय कर । तेथील परिसा जी प्रकार । माळाकमंडलुदंडधर । अति सुंदर शोभती ॥८०॥

मध्यस्थ जे का द्वय कमल । तेथें डमरु आणि त्रिशूळ । खडगतेजायमानतेजाळ । अति झल्लाळ तयाचा ॥८१॥

ऊर्ध्वबाहु अभय पाहीं । शंख चक्र हे तये ठायीं । क्वचित्गदा पद्म तेही । एवं साही शोभती ॥८२॥

ऐसा हा दत्त सत्पात्र । कक्षे झोळी हेमपात्र । रुप धरी नाना विचित्र । सवें पवित्र कामधेनु ॥८३॥

ऐसें परिसोनि विवरण । संतोषलें श्रोतयांचें मन । म्हणती पुढील निरोपण । करवी पान रस आम्हां ॥८४॥

अवश्य म्हणे तैं वक्ता । श्रवणीं सादर व्हावें आतां । ध्नानीं लक्षोनि या दत्ता । झाला स्तविता नारद ॥८५॥

जयजयाजी अविनाशा । निर्गुण निरामया परेशा । मायातीता तूं सर्वेशा । अनंतवेषा नमो तुज ॥८६॥

जयजय निखिल ब्रह्म सनातना । सर्वात्मका सर्वभूषणा । षड्‌गुण ऐश्वर्यसंपन्ना । दयाघना नमो तुज ॥८७॥

जय सर्वसाक्षी सर्वज्ञा । जयजयाजी गुणप्रज्ञा । सकळातीता सर्व सुज्ञा । भक्तवरज्ञा नमो तुज ॥८८॥

जयजय सगुणवेषा सुंदरा । जय रजोगुणा सृष्टिविस्तारा । जय सृष्टिपालना सत्त्वधीरा । सृष्टिसहारा तामसा नमो ॥८९॥

जयजयाजी अत्रिनंदना । जय अनसूयात्मजा कुलभूषणा । त्रिगुणात्मका त्रितापहरणा । भवभंजना नमो तुज ॥९०॥

जयजय सिंहाचलनिवासिया । मायापुरवासी करुणालया । जयजय भक्तवत्सला दत्त सदया । प्रेमें तव पायां प्रणम्य ॥९१॥

जयजय सिद्धा योगेश्वरा । पापमोचका कृपासागरा । जीवपालका जगदुद्धारा । अचल अगोचरा नमो तुजा ॥९२॥

जय त्रिगुणात्मक त्रिवदना । जय षट्‌कमलराजीवनयना । जय शंकरमंडित भस्मविलेपना । भूषित भूषणा नमो तुज ॥९३॥

जय शंखचक्रगदाधरा । सर्वोत्तमा दुष्टसंहारा । अज्ञानछेदका दिगंबरा । अपरंपारा नमो तुज ॥९४॥

जय त्रिशूल डमरुं खड्‌ग धारणा । अनन्यप्रिया भयवारणा । जय सकलनियंता कार्यकारणा । अगा सच्चिद्धना नमो तुज ॥९५॥

जय ब्रम्हचर्यव्रत संपादका । दंडकंमडलुकौपीनधारका । जय शार्दूलचर्मविराजका । सुखदायका नमो तुज ॥९६॥

जयतटि प्रियवासा । आनंदरुपालक्ष्मी निवासा । चतुर्थाश्रम पर विलासा । पंचमभूषा नमो तुज ॥९७॥

जयजय पावना परमानंदा । जय ब्रह्ममूर्ते आनंदकंदा । जय भेदातीता तूं अभेदा । अद्वयबोधा नमो तुज ॥९८॥

जय जगद्‌गुरु अविनाशा । निश्चळ निर्मळा वंद्य सुरेशा । अनंता अभंगा सकळाधीशा । परात्परपरेशा नमो तुज ॥९९॥

अगा दीनोद्धारणा दीनबंधू । तूतें ध्याती सुरवृंदू । स्तुतिस्तवनाचा संवादू । सिद्धमुनिसाधू करिताती ॥१००॥

तुज ध्याती सकल लोक । देव अमर ब्रह्मादिक । मूर्ति पाहोनि हरिहरात्मक । पूजिती आवश्यक ध्याति मुनी ॥१०१॥

श्यामसुंदर सुहास्य रुप देखोन । अनन्ययोगें सर्व शरण । म्हणती दाता तूं जगत्पावन । कृपादान दे आम्हां ॥२॥

तूं सदय आणि उदार । अनंत सिद्धिऋद्धींचें भांडार । द्वय कामधेनु निरंतर । सकळ सार तुजपाशीं ॥३॥

तूं भुक्तिमुक्तीचा दाता । तूं सदयपणें जीव रक्षिता । तूं चुकविसी सकळ आघाता । इच्छित पदार्था देसी तूं ॥४॥

तूं सदा शांत सुप्रसन्न । अनन्या पाळिसी कृपें करुन । आवडीचें भातुकें देसी पूर्ण । भवबंधन तोडिसी ॥५॥

तूं सकळ देवांचाहि देव । तूं सकळ सिद्ध योगियांचा राव । अनंतब्रह्मांडींची ठेव । तूंचि जीव जीवाचा ॥६॥

तूं आम्हां सकळांचा अधिपती । ज्ञेय ज्ञान ज्ञाता निश्चिती । तुझ्या कृपेविण कैचि गती । मूढमती जीव सर्व ॥७॥

तरि आतां होवोनि सुप्रसन्न । दत्ता दीजे स्तवनीं मान । तुझें नाम पतितपावन । करी कल्याण सकळांचें ॥८॥

अमंगळ सकळ हरावें । सुमंगल दान वरदीं द्यावें । अनन्यातें तोषवावें । अंगीकारावे सकळही ॥९॥

यापरी ऋषि मुनि सुरवर । यक्षगण गंधर्व किन्नर । मानव आणि विद्याधर । स्तवन अपार करिताती ॥११०॥

मुख्य नारद भृगुविरचित । स्तवन करिती अत्यद्‌भुत । हें परिसोनी देवदत्त । कृपावंत अभय दे ॥१११॥

ते अभ्यवरदवाणी । स्तोत्रीं स्थापिली मुनींनीं । तेचि या ग्रंथीं विवरोनी । तुम्हां निरोपणी निवेदितों ॥१२॥

मुख्य येथें धरोनि भाव । ध्यान प्रथम करावें अपूर्व । मानसपूजा विधि सर्व । सारोनि स्तव करावा ॥१३॥

या स्तोत्राचें पठण । करावें वीस आवर्तन । एवं सहस्त्र संख्येचें आवर्तन पूर्ण । करितां प्रसन्न दत्त होय ॥१४॥

भूत पिशाच समंधभय । जे नाना परींचे अपाय । ते निवटोनि करी उपाय । रक्षी काय सकृपें ॥१५॥

यशदायक कीर्तिवर्धन । पुत्र पौत्रं दे धनधान्य । क्षेम आयुरारोग्य कल्याण । जयश्री पूर्ण प्राप्त होय ॥१६॥

राजप्रजादि सकळिक । वश्य होती आवश्यक । श्रेष्ठपणीं सकळ लोक । वंदिती अनेक सेविती ॥१७॥

क्षय अपस्मारादि रोग जाती । कूष्मांड डांकिणी यक्ष पळती । यंत्र मंत्र तंत्र न बाधती । संरक्षिती अवधूत ॥१८॥

ग्रहपीडा नाना उपाधी । तुटती अवघ्या आधिव्याधी । वन जळ अग्निसंधीं । कुपानिधी तारील ॥१९॥

वितळोनि जाय अज्ञान । प्राप्त होय इच्छित ज्ञान विद्या होय आयुष्यवर्धन । भुक्ति मुक्ति पूर्ण लाभावी ॥१२०॥

प्रतिकार्या नेमिल्या नेमा । आचरण कीजे सोसोनि श्रमा । फळ पावे पूर्ण कामा । तया उत्तमा दया उपजे ॥२१॥

मनीं नाणावें विपरीत । अनुष्ठानीं बैसावें निवांत । परान्न प्रतिग्रह शय्यारत । विवर्जित असावें ॥२२॥

एवं साधितां निश्चयेंसी । त्वंरित पावे अविनाशी । नाचरतां जो यातें दूषी । तो रवरवासी पावेल ॥२३॥

जो व्रतस्थें करील पठण । तया शत्रु होतील शरण । इच्छित कामना होतील पूर्ण । दत्तदर्शन लाभेल ॥२४॥

हे मुनीचे भाष्यार्थी । वरप्रदानें दिधलीं असती । तेचि निवेदिले प्राकृती । मिळवोनि संमत्ति श्रोतिया ॥२५॥

तंव श्रोते म्हणती पावन । कथा करविली आम्हां श्रवण । धन्य या स्तोत्राचें महिमान । कल्पद्रुम पूर्ण उभारिला ॥२६॥

पुरवावया सकळांचें मानस । हा अवतरला सद्‌गुरु अविनाश । परि याची स्थिति गति आम्हांस । निरोपा सुरस आवडीं ॥२७॥

वक्ता म्हणे येचविषयीं । मुनीनें निश्चय केला पाहीं । ते निरोपितों नवलाही । सांठवा हृदयीं आवश्यक ॥२८॥

न कळे अवघूताचि स्थिती । बालोन्मत्त पिशाच अवस्थि । कधीं नग्नदिगंबर फिरती । फकीर होती तुर्कादि ॥२९॥

कधीं जोगी कधी भोगी । कधीं संगी कधीं निःसंगी । नानारुपें धरोनि जगीं । प्रगट योगी फिरतसे ॥१३०॥

इच्छामात्रें जया गमन । इच्छिला ठाव पावती जाण । जो करी सहज स्मरण । तेथें येऊन पावती ॥३१॥

राज हट दोन्ही मार्ग । हें जाणोनि वेगळेचि अंग । नाना मुद्रा योग प्रसंग । कळा सांग जाणती ॥३२॥

जाणोनि अजाणता असे । व्यापोनि अव्याप्ति वसे । भासोनि अभासत्व विलसे । करोनि नसे कर्तृत्वीं ॥३३॥

ऐसा हा अविनाश दत्तराणा । असे अतर्क्य वेदपुराणा । नये कवणाच्या अनुमाना । गुणातीत निर्गुणा कोण जाणे ॥३४॥

परी तोचि होय जरी कृप । अंतरीं उजळी ज्ञानदीप । तरी ध्याना येईल तें रुप । एर्‍हवीं अरुप सर्वदा ॥३५॥

त्या कृपेच्या प्राप्तीसाठीं । योगी सोशिती कचाटी । जीवप्राणें आटाटी । भोगिती कपाटी बैसोनी ॥३६॥

तैसी अबला वृद्ध जना । न घडेचि या अवघड कारणा । म्हणोनि स्वल्प हे धारणा । निवडोनि प्रेरणा केला ग्रंथीं ॥३७॥

परि यासि पाहिजे भक्ति दृढभाव । इंद्रियनेमें करी उपाव । ध्यान स्तोत्र जें अपूव । क्रम सर्व जाणावा ॥३८॥

निवेदिल्या ऐसें । पठण कीजे अनन्य तैसें । मग तो पावेल करुणारसें । दृढ भरवसें साधकां ॥३९॥

हें नोहे अप्रमाण । नारदभृगूचें सत्य वचन । पंरी एकाग्रे करोनि मन । करा पठण ऐसें ॥१४०॥

लोकोपकारासाठीं । निवेदिली ग्रंथीं हातवटी । प्रेमभावें धरोनि पोटीं । साधा गोष्टी आवडीची ॥४१॥

या धारणेच्या साधनीं । अनुभव आला मजलागुनी । म्हणोनि ग्रंथीं ठेविलें लिहोनी । अर्थिक जनीं स्वीकारिजे ॥४२॥

असो सुरवरसमुदाय ऋषिभार । येणें स्तवनें करोनि अपार । तोषविला दत्तदिगंबर । जो का उदार जगद्‌गुरु ॥४३॥

अविनाश झाला संतोषित । नाभीकरे अभय देत । तुम्हां सकळांचे मनोरथ । पूर्ण असोत सर्वदा ॥४४॥

अभयवाणी ऐकतां कानीं । दुंदुभीनाद झाले गगनीं । देवललना गाती गाणीं । आनंद मनीं सकळांच्या ॥४५॥

कळा पात्रें नाचती । गंधर्व रागउपराग गाती । ओवाळोनि पंचारती । कुरवंडी करिती जीवप्राणें ॥४६॥

विमानीं दाटले सुरवर । करिती पुष्पवष्टिसंभार । दत्तनामाचा करिती गजर । जयजयकार सप्रेमें ॥४७॥

काया वाचा आणि मन । दत्तचरणीं केलें अर्पण । ऋषि वेदघोषें करुन । भावे सुमन अर्पिती ॥४८॥

परमानंद दाटला मानसीं । सप्रेमें वंदिला अविनाशी । आज्ञा घेवोनि देवऋषि । स्वस्थळासी चालिले ॥४९॥

देवऋषि नारी नर बाळा । योगी सिद्ध साधूंचा पाळा । प्रदक्षणा घाली तये वेळां । सिंहाचळाभोंवतीं ॥५०॥

पुनरा घालिती लोटांगण । जयशब्दें मागुती गर्जून । द्त्तमूर्ति करोनि अवलोकन । पावले स्वस्थान सर्वही ॥५१॥

धन्य या अधूवताची लीला । वर्णित जाती आपुलिया स्थळा । हे मूर्ति पाहतांची डोळां । आनंद सकळा जीवासी ॥५२॥

श्रीसद्‌गुरुदत्त दयाघन । शरणागतासि करितो पावन । आवडीचें देतसे दान । कामना पूर्ण करीतसे ॥५३॥

अविनाश सदय दिगंबर । हें साधुसज्जनाचें माहेर । तया समाजीं हा निरंतर । उदार धीर वसतो कीं ॥५४॥

तयांचें व्हावें जरी दर्शन । तरी संतांसि रिघावें शरण । पदीं अर्पावा जीवप्राण । करावें सेवन आवडीं ॥५५॥

संत सदयपणें वोळतां । भेटी करवितील अविनाशदत्ता । दुरीं करितील अवघी चिंता । निर्विकल्पता देतील ॥५६॥

म्हणवोनिया अनंतसुत । झाला संतचणांचा अंकित । सत्कृपाळ सदय शांत । पुरवितील अर्थ दीनांचे ॥५७॥

त्याचेचि हे दयेकरुन । रसाळ चालिलें निरोपण । पुढील कथा गोड गहन । अमृताहून आगळी ॥५८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणींचें संमत । परिसोत प्रेमळ भाविक भक्त । चतुर्दशोध्यायार्थ गोड हा ॥५९॥

॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP