श्री दत्तप्रबोध - अध्याय बारावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥ श्रीगणेशायनमः ॥

नमो सद्‌गुरु अविनाश निर्मळा । सच्चिदानंद परम सुशीळा । विज्ञानरूपा दयाळा । त्रैलोक्यपाळा सनातना ॥१॥

अजी श्रीदत्तदयाघना । परिसाजी दीनाची विज्ञापना । तुझिया लीलेची रचना । प्रीती निरोपणा चालविजे ॥२॥

मी नसे येथे बोलता । तुझा तूचि होसी बोलविता । काय आम्हां पामरांसी सत्ता । आळ पुरविता तूचि की ॥३॥

सिद्ध करोनी वावडीदोर । मनी वाटे भेदावे अंबर । परी न सुटता समीर । वेघे वर कैसी ते ॥४॥

तैसा तव कृपेचा नसता प्रभंजन । केवी रसना वदेल सुरस गहन । जैसा वायूविण पतंग हीन । तैसाचि जाण मी रंक ॥५॥

यासाठी सद्‌गुरु दत्तात्रेया । विनीत झालो तुझिया पाया । तरी कृपादान करोनि दया । द्या वरा या जगद्‌गुरु ॥६॥

मी म्हणवितो तुमचा दास । समर्था धरिली तुमची कास । माझी न कीजे जी निरास । पुरवा आस सदयत्वे ॥७॥

आजवरी माते पाळिले । लळे आवडीचे पुरविले । त्याहूनि अधिक आगळे । मनोरथ अयाळे पूर्ण कीजे ॥८॥

तुमचेचि आधारे करून । मग झाले निरोपण । पुढेही करविजे श्रवण । अमृताहून गोड कथा ॥९॥

नत होवोनी प्रेमेसी । आता विनवी श्रोतियांसी । दत्ते आज्ञा तीर्ता जावयासी । मातापित्यांसी मागितली ॥१०॥

उभयतांचे समाधान । करोनि बोलिले अभयवचन । नित्य अस्ती तुमचे दर्शन । घेऊ प्रमाण बोलिले ॥११॥

वचनी उभय आनंदता । येरी ठेविला चरणी माथा । आशीर्वचने उभयतां । देती सुता सप्रेमे ॥१२॥

हे गत कथाध्यायी परिसिले । श्रोतेजनी अवधान दिले । आता या प्रसंगी जे निवेदिले । आवडी ऐकिले पाहिजे ॥१३॥

दुर्वास दत्त अंबुधर । जोडोनिया प्रेम कर । अत्रिअनसूयेचे समोर । राहोनि प्रियकर बोलती ॥१४॥

वडिली आता दया कीजे । यात्रागमनी आज्ञा दीजे ।सिद्धी संकल्पाते नेइजे । कृपे पाळिजे वत्साते ॥१५॥

ऐकोनिया बाळबोला । मोहे अश्रू लोटले डोळा । तिगे सद्गद तये वेळा । चरण कमळा लागती ॥१६॥

स्फुंदता नेत्री वाहे जीवन । तेणे पुजिले उभयांचे चरण । येरे ह्रदयी बाळा धरोन । देती आलिंगन प्रेमभरे ॥१७॥

अलिंगनी पडली मिठी । जीवे करवे न कदा सुटी । अनसूया म्हणे गोमटी । केव्हा दृष्टी पडती पुढे ॥१८॥

बाळ हो तुम्ही टाकोनि जाता । जीवी झोंबली फार चिंता । केधवा परतोनि याल आता । ह्रदयी व्यथा हे थोर ॥१९॥

अवधूत म्हणे वो माते । गुह्य विनवोनि निवेदिले तूते । ते विसरसी भूलोनी मोहाते । सांडी भ्रमाते सावध हो ॥२०॥

तूते म्या दिधले वचन । वाटते गेलीस विसरोन । त्याचे करी तू स्मरण । नोव्हे अप्रमाण सत्य माते ॥२१॥

मी तूते विसरोन न राहे । तूते भेटेन मज तू पाहे । माझे वचन दृढ आहे । स्वस्थ होय मानसी ॥२२॥

तुझीच शपथ आहे मजसी । नेमा न ढळे निश्चयेसी । अस्तसंधी दर्शनासी । येईन तुजपासी निर्धारे ॥२३॥

तू होवोनिया सुप्रसन्न । मज मार्गस्थ करी आनंदघन । मोह खेद परता सारोन । जीवींची खूण जीवी धरी ॥२४॥

अनसूया म्हणे रे सखया । धीराविसी अश्वासूनिया । परि दुर्धर हो मोहमाया । शिवणी काया काय करू ॥२५॥

अत्रि म्हणे न करी शोका । व्यत्यय येतसे गमनी बाळका । संतोषे वाटे तया लावि का । पावतील सुखा ऐसे करी ॥२६॥

जव जव तू शोक करिसी । तव तव बाधक होय बाळासी । हे जाणोनिया मानसी । शोकसागरासी आटोपी ॥२७॥

ऐकोनी पतीचे वचन । विवेके बाणवी समाधान । बाळकांचे चुंबोनि वदन । देत आलिंगन बहुप्रीती ॥२८॥

असो आज्ञा घेवोनि त्वरित । तिघेही करिती प्रणिपात । तेवींच अत्रीलागी दंडवत । साष्टांगी नमीत प्रेमभावे ॥२९॥

सव्य घालोनि तयांसी । मागुती प्रणम्य उभयांसी । करोनि लक्षिती चरणांसी । सपेम मानसी त्रिवर्ग ॥३०॥

तो ऋषिपत्‍न्यांसहित । भेटीस भार पावले समस्त । त्रिवर्गसकळांते नमीत । मिसळनी होत आलिंगनी ॥३१॥

आलिंगन होता सकळांचे । वर्षाव झाले प्रेमाचे । ते न वर्णवेची मज वाचे । पूर मोहाचे लोटले ॥३२॥

अविनाश म्हणे सकळांसी । लोभवृद्धि असावी मानसी । आमुचे रंजवावे मायपित्यांसी । विनंती तुम्हांसी हे माझी ॥३३॥

तंव बोलती अवघे जन । तुजवांचोनि उदास तपोवन । तेवींच जाण सकळांचे मन । आतांचि शून्य दिसतसे ॥३४॥

उद्भवतां तुझा विरह पोटीं । दिशा लागती आमुचे पाठीं । ओस दिसती आम्हां खोपटीं । दशा ओखटी जीवीं वाटे ॥३५॥

तुझिया गमनें तळमळ । तुज न देखतां जीव व्याकुळ । पाहावयासी चंचळ । न धरवे कळ दिन एक ॥३६॥

तंव अविनाश बोले वाणी । म्हणे ऐकिजे सकळ श्रवणीं । मज सांभाळितां लोभें करुनी । स्वपुत्राहूनी आगळें ॥३७॥

यास्तव हेचि विनंती । माझा विसर न पडो तुम्हांप्रती । मज आठवावें दिनराती । यावीण खंती नसो दुजी ॥३८॥

दृध धरिजे माझा ध्यास । तुम्हांविण कोण हो आम्हांस । संसारीं राहोनि उदास । गमवा जीवास ममछंदें ॥३९॥

जंव जंव ध्यास तुम्ही करा । तंव तंव तेंचि माझिया अंतरा । सुखरुप भेटेन पुनरा । तुमचेनि वरा योग माझा ॥४०॥

सप्रेमें कराल तुम्ही आठवण । मग तुम्हां आम्हां दुःख तें कवण । तुमच्या कृपेचीच हे आंगवण । जाणा श्रवण गुह्य केलें ॥४१॥

आणिक एक सांगतों तुज । जें कां स्मरण करितील सहज । तया भेटोनि जाणें मज । पुरविणें चोज स्मरत्यांचें ॥४२॥

हेंही स्मरण तुम्ही धरा । मज जीवेंभावें अंगीकारा । येणेंचि आलों मी आकारा । तुम्हांविण थारा मज कोठें ॥४३॥

तुमचा प्रेमा माझे ठायीं । मज आठवितां तुम्ही हृदयीं । तुम्हांपासूनी मी दूर नाहीं । किती कांहीं सांगावें ॥४४॥

मातेसि दर्शन द्यावया नित्य । अस्तमानीं येईन ठाया । ते संधी करोनी दया । दाविजे पायां तुमच्या ॥४५॥

ऐसें ऐकोनि अभयोत्तर । सकळीं केला जयजयकार । मुखें बोलती अमृतोत्तर । यात्रा समग्र सुफळ हो ॥४६॥

परिसोनि आनंदाची वाणी । प्रणिपात करोनि सर्वांचरणीं । तया त्रिकुटाचळालागोनी । करिती नमोनी प्रदक्षिणा ॥४७॥

ते अवघे तपोवन । गुंफा कुटिका भुवन । सकळां सव्य प्रदक्षिणा करोन । घालिती लोटांगण जन्मभूमी ॥४८॥

आदरें मागुती सर्वा नमिलें । प्रेमें मातापित्यांसी वंदिलें । शब्दगौरवें निवविलें । अश्रूनें कमळें हेलावती ॥४९॥

अनसूया म्हणे दुर्वासा । ज्येष्ठ तूं सांभाळी राजसा । अतिक्रमणीं मनसा । दुःख सहसा न द्यावें ॥५०॥

तेवींच माय वदे दत्तासी । त्रिगुणातीता सुज्ञ होसी । सांभाळी श्रेष्ठा ज्येष्ठपदासी । सुख दे चंद्रासी बाळका ॥५१॥

सवेंची वदे त्या इंदूतें । सकुमारा ऐके वचनातें । भावें सेवुनी राहे उभयातें । शिरीं या आज्ञेतें वंदिजे ॥५२॥

ऐसियापरी निरोपितां । त्रिवर्ग वंदिती आज्ञा माथा । न करी माउली कांहीं चिंता । आज्ञा आतां देइजे ॥५३॥

अवश्य म्हणतां मार्गीं लागले । अवघे बोळवोनी ऋषी परतले । आपुलाले आश्रमीं पावले । मोहीं गुंतले प्रपंचीं ॥५४॥

असो इकडे अवधूत । आनंदे करोनी पंथ क्रमीत । देव क्षेत्रें तीर्थें पहात । पूर्वपंथ लक्षिला ॥५५॥

वाराणसीक्षेत्रीं जातां । मध्यें माधव देखिला अवचिता । स्वस्थान देखोनि झाला रमत । अनंद चित्ता ते ठायीं ॥५६॥

तंव गंगा यमुना सरस्वती । देखोनि प्रगटल्या महामूर्ती । भेटोनि दत्तातें प्रार्थिती । बहु स्तविती आदरें ॥५७॥

जयजय अविनाश निर्मळा । जय सच्चिदानंदा पूर्ण दयाळा । त्रिगुणात्मका त्रिभुवनपाळा । सदय कृपाळा तुज नमो ॥५८॥

जय निर्विकारा निरंजना । जयजय पूर्णं ब्रह्म सनातना । सर्वसाक्षी चैतन्यघना । पतितपावना नमो तुज ॥५९॥

जय अपरिमित आनंदा । जय षड्‌गुणसंपन्ना परमानंदा । जय भेदातीत तूं अभेदा । प्रीतीं तव पदा नमितों जी ॥६०॥

स्तुतिसंवाद ऐकतां । आनंद वाटला श्रीदत्ता । म्हणे तुम्ही सकळ तीर्थांची दैवता । स्तविता अर्था कोणत्या ॥६१॥

तंव त्या वदती कर जोडोनी । जन पावती आम्हां पाप आचरोनी । ते भार होती आम्हांलागुनी । म्हणोनि विनवणी करीतसों ॥६२॥

सिद्ध साधु संत तापसी । अकस्मात येती जैं स्नानासी । त्यायोगें नाश दुरितासी । होय आम्हांसी पवित्रता ॥६३॥

यदर्थीं कृपा करोनिया । नित्या आम्हांवरी कीजे दया । स्नानें करोनी दत्तराया । पाप विलया लाविजे ॥६४॥

आनंदें करिती भाषण । नित्य येथेंचि चांग करुं स्नान । पुढतीं स्व इच्छें करुं गमन । शुचित पूर्ण असावें ॥६५॥

म्हणोनिया अद्यापवरी । आनंदें टाकिती लहरीवरी लहरी । सदा सुशीळ निर्मळ अंतरीं । पाप हारी जगताचें ॥६६॥

तेथें सिद्ध साधु योगेश्वर । स्नानासी येताति अपार । प्रयागमाहात्म्य अत्यंत थोर । होय उद्धार स्नानेंची ॥६७॥

अवधूतें करोनिया स्नान । सकळ तीर्थां केलें पावन । काशी गया जगन्नाथ पाहून । सव्य गमन रामेश्वरीं ॥६८॥

पाहोनि गोकर्णमहाबळेश्वर । शिवकांची विष्णुकांची सुंदर । शेषाचलीं दैवते अपार । उमाकुमर पाहिला ॥६९॥

श्रीपंढरीक्षेत्र पुरातन । गुप्त अविनाश वस्तूचें स्थान । तेथें सकळ ऋषी देवगण । सदा प्रार्थून तिष्ठती ॥७०॥

द्वीपद्वीपांतरींची तीर्थे । सकळ लोकीचीं दैवतें । मूळ पीठासभोंवतें । वास करिते पैं होती ॥७१॥

तें दंडकारण्य अतिपावन । सकळ बीजांचें बीज स्थान । अनुपम्य जेथींचें महिमान । परब्रह्म पूर्ण सएव ॥७२॥

जें अनंत ब्रह्मांडींचें बीज । जें या वेदशास्त्रांचें गुज । जें साधुसंतसिद्धांचें निज । तें अविनाश सतेज तें ठायीं ॥७३॥

तया स्थळासी पाहतां । दत्त अविनाशी झाली ऐक्यता । समरुपीं समरसता । आनंद चित्ता न समाये ॥७४॥

चित्त चैतन्य मुसावलें । द्वैतपणातें हारपलें । अद्वयेंचि संचलें । सागरीं मिळालें सैंधव ॥७५॥

अवतारचरित्र दावावया । प्रगट केल्या बिभक्त काया । शरणागताची दया । देवराया म्हणोनी ॥७६॥

करावया जगदुद्धार । जगद्‌गुरु हा दत्त अवतार । तोचि उभा विटेवर । दिगंबर स्वमी हा ॥७७॥

बिंदुतीर्थीं आपण । शेषातळीं घालोनि आसन । दावीतसे योगध्यान । उन्मिलीत नयन करोनिया ॥७८॥

तंव शंकरविभूति दुर्वास । काय बोले तेव्हां अवधूतास । विनटलां या बिंदुतीर्थास । कोण विशेष सांगा तें ॥७९॥
प्रश्न देखोनि सुलक्षण । दत्त विनविते झाले आपण । जी स्वामी सावधान । परिसा निरोपण आघवे ॥८०॥

हें आठाविसाचें मूळ । वर्णितां आठाविसां आकळ । आठींच आठाविसांचा खेळ । मात्रामेळ पन्नास ॥८१॥

हा प्रसर मात्र पन्नास । विचारींच हा विलास । याहीवरी पाहा विशेष । विरळ तयास जाणता ॥८२॥

उरल्या भागीं दोन । ते हे सहस्त्रदळीं आसन । योगी साधकसिद्धांचें धन । गुज खूण संताची ॥८३॥

सर्वां अलिप्त हा बिंदु । मीच गातों परमानंदु । भेदीं असोनी अभेदू । येथें अनुवादू खुंटला ॥८४॥

येणेंचि बीजें विस्तारलें । अब्रह्म स्तंभ व्यापलें । मागुती समावोनि राहिलें । विटीं मिरविलें अवीट हें ॥८५॥

हे ऐकोनि गुजवार्ता । दुर्वास झाला संतोषता । अविनाश आणि दत्ता । समसाम्यता देखिली ॥८६॥

दत्त अविनाशीं झाली भेटी । तेथें उद्धरिल्या तीर्थकोटी । पावन करावया सृष्टी । चरणांगुष्टी नत गंगा ॥८७॥

अविनाश अवीट अभंग । तो हा बिंदुतीर्थीं पांडुरंग । करावया जगदुद्धार । भवभंग । निर्विकार निःसंग ठेलासे ॥८८॥

पुरवावया दासांची आयनी । अभयवर देसी कर सघनीं । सधीटपणीं आलिंगनीं । पाहे निरखोनी कृपादृष्टीं ॥८९॥

नोव्हे अकिंचन आदत्त । स्वात्मत्व करावया दत्त । सदयपणें अवतार दत्त । प्रगट साक्षात जगद्‌गुरु ॥९०॥

तेथें श्रीरमारमण । आयुधें करवीं स्वयें धारण । अद्वय आनंदें समरसोन । उभा चिद्धन विलासे ॥९१॥

तोचि स्वस्थळातें निरखोन । मनीं झाला आनंदघन । जड जीव करावया पावन । तिलक धारण नेमिले ॥९२॥

अद्यापि तो देव दत्त । बिंदुस्थळा नित्य येत । क्षेत्र पंढरीसी विख्यात । तिलक रेखीत आनंदें ॥९३॥

हें संत वैष्णवाचें माहेर । तारक अवीट दिगंबर । दावी तिलकाचे प्रकार । द्वादशसार भागवतीं ॥९४॥

ऐशा दावोनी खुणा । दावोनि पुढें चालिला योगिराणा । तीर्थ क्षेत्र दैवत नाना । ऋषिस्थाना विलोकी ॥९५॥

तुळजापुरातें जावोन । कल्लोळ भागीरथीचें केले स्नान । आदिमायेसी स्तवोन । वंदिले चरण तुळजेचे ॥९६॥

शिवप्रिया हे हिमनगनंदिनी । श्रीरामछलना जी पावली येवोनि । जानकीऐसी उठवोनि ध्वनी । प्रगट वनीं रामदृष्टी ॥९७॥

राम परब्रह्म सांवळा । ओळखोनि म्हणे ही शिवकोकिळा । तूं कां आई दाविसी लीला । राहे स्थळा स्वस्थ येथें ॥९८॥

तैंपासोनि हे जगदीश्वरी । शेषाद्रीवरी वास करी । तियेसी अवधूत सत्वरी । लक्षोनि करी नमनातें ॥९९॥

नाना परी केलें स्तवन । हृदयीं रेखिलें जगदंबेचें ध्यान। प्रदक्षिणा करोनिया तीन । लोटांगण घालिती ॥१००॥

तंव तात्काळ ती जगदंबिका । प्रगट झाली शिवअंबिका । तें ध्यान वर्णावया आवाका । शेषादिका असेना ॥१॥

आनंदी आनंद करोनिया । क्षेम देती झाली तयां । म्हणे बा धन्य दत्तात्रेया । अनसूयामाया धन्य ती ॥२॥

त्रिगुणात्मकें पावली निधान । जें सनकादिकांचें ध्येयध्यान । तो तूं सगुणरुप प्रगटोन । अवतारमहिमा न दाविसी ॥३॥

करावया जगदुद्धार । होवोनि विचरसी दिगंबर । तूतें पाहतां आनंद थोर । माझें अंतर सुखावलें ॥४॥

जयाचे गांठीं सबळ पुण्य । तोची पावे तुझें दर्शन । तूं कृपें ज्या करिसी पावन । त्रिलोकीं धन्य तो नर ॥५॥

तुझिया कृपेच्या ज्या विभूती । अद्‌भुत तयांची ख्याती । शरणागतांतें उद्धरिती । मुक्त करिती जीवातें ॥६॥

तुळजा वदे दत्तासी । अलभ्य लाभ झाला मजसी । नित्य ऐसेंचि दे दर्शनासी । तोषवी मानसीं मज येथें ॥७॥

देखोनि तुळजेचा अर्थ । अवश्य म्हणे अवधूत । येथें भोजनासी यथार्थ । येईन येथें जगन्माते ॥८॥

ऐकोनिया दत्तवचन । अंबा झाली सुप्रसन्न । रत्‍नखचित मुगुट आणोन । करवी धारण मस्तकीं ॥९॥

कुरवाळोनी वदनासी । म्हणे बापा सांभाळी वचनासी । येरु अवश्य म्हणोन तियेसी । वंदोनि चरणांसी निघती ॥११०॥

पाहोनि अंबेचें नगर । पश्चिममार्गें चाले सत्वर । पावेल येवोनि नीरातीर । नरसीपुर पाहिलें ॥११॥

तीर्थी करोनि वंदन । घेतलें नरहरीचें दर्शन । करोनिया स्तुतिस्तवन । आज्ञा मागुन चालिले ॥१२॥

औटपीठांतील पीठ । क्षेत्र कोल्हापूर श्रेष्ठ । महालक्ष्मी सर्वावरिष्ट । सर्वारिष्ट निवरिणी ॥१३॥

तया स्थळातें पावले । तीर्थ रंकाळें वंदिले । मंदिरी ध्यान विलोकिलें । स्तवन आरंभिलें प्रीतीनें ॥१४॥

जय जय आदिमाते जननी । मूळप्रकृति भवानी । जय त्रिभुवनपाळके स्वामिनी । जगन्मोहनी जगदंबे ॥१५॥

जय विष्णुप्रिये सुंदरी । जय प्रलंबे सिंधुकुमरी । जय दारिद्रयनाशके गौरी । जय जगदीश्वरी तुज नमो ॥१६॥

जयजय कमलासने कमलभूषणे । कमलप्रिये कमललोचने । कमलोद्भवमाते कमलधारिणे कमलवासिने कमले नमो ॥१७॥

जय लक्ष्मी लक्षणयुक्ते । लक्षोनि कृपें रक्षीं मातें । आक्षेपें नच तरी पक्षपातें । देई भिक्षे दक्ष मी ॥१८॥

तूं सदय शांत निर्मळ । सौभाग्यदायिनी कोमळ । उदारत्वें पुसविसी आळ । होसी स्नेहाळ सर्वज्ञे ॥१९॥

ऐसें स्तवितां श्रीदत्त । अंबा प्रगटली साक्षात । क्षेमालिंगन देवोनि त्वरित । म्हणे संतोषित मज केलें ॥१२०॥

आदिमाया वदे दत्ता । तूं त्रिगुणात्मकें नटलासि आतां । पावन करी या जगता । अपेक्षिता पुरवी धणी ॥२१॥

धन्य धन्य तुमचे अवतार । धरोनि हरतां भूमिभार । लीला दावितां अगोचर । न कळे पार कवणासी ॥२२॥

तुमचेनि थोरीव आम्हांसी । मान्य झालों कीं सकळांसी । धन्य धन्य तूं अविनाशी । उदारमानसी सदयत्वें ॥२३॥

तरी नित्य मातें द्यावे दर्शन । माझें घ्यावें भिक्षादान । तुमचेयोगेंकरुन । होतील पावन सकळही ॥२४॥

दत्त बोले तैं मातेसी । अंगिकारिलें म्यां तव वचनासी । नेम न टळे निश्चयेंसी । नित्य भिक्षेसी येईन ॥२५॥

ऐसें होतांचि भाषण । अंबा झाली संतोषमान । कर्णी कुंडलें भूषण । दैदीप्यमान शोभविलें ॥२६॥

देखोनि अवधूत सत्पात्र । भिक्षेलागीं दे सुवर्णपात्र । माजी भिक्षा आणून पवित्र । वोपी विचित्र दिव्य अन्न ॥२७॥

तें करोनि धारण । केले मातेसि तेव्हां नमन । जननीचें निरखोन वदन । आज्ञा मागून चालिले ॥२८॥

अवधूत भिक्षा अद्यापवरी । नित्य होतसे कोल्हापुरीं । भेटीसाठीं नानापरी । युक्ति करी जन तेथें ॥२९॥

निग्रह निजध्यास पाहून । शुद्ध भावातें ओळखोन । स्वामी अद्यापि देती दर्शन । आळ पूर्ण करिताती ॥१३०॥

असो अवधूत मार्गीं चालले । महाबळेश्वराप्रति पावले । तंव तेथें नवल वर्तले । तेंचि परिसिलें पाहिजे ॥३१॥

कृष्णा आणि भागीरथी । गायत्री सावित्री सरस्वती । सतेज दिव्य रुपें प्रगटती । अवधूत भेटती येवोनी ॥३२॥

अवधूताचें करोनि स्तवन । सांगती आपुलें नामाभिधान । म्हणती संगम करा जी पावन । चालोनि आपण ते ठायीं ॥३३॥

अवश्य म्हणोनिया योगीराणा । विलोकिता झाला संगमस्थाना । संकीर्ण देखोनि नयना । आनंद मना न वाटे ॥३४॥

ओळखोनि दिगंबराचें चित्त । पांची गंगा विनवीत । पुढे प्रवाह प्रशस्त । झालों विभक्त निवेदितों ॥३५॥

येथे मूळ कृष्णेचा उगम । भेटीसाठीं चौघींचा संगम । येथोनि वेगळाचि क्रम । तोही उत्तम सांगतों ॥३६॥

महापर्व कन्यागतीं । प्रगट वाहे येथें भागीरथी । गायत्री सावित्री सरस्वती । गुप्त असती मिश्रित ॥३७॥

ह्या पश्चिममार्गे करुन । प्रवाहरुप वाहतीपूर्ण । दक्षिणपंथातें लक्षून । दोघी चालिलों ॥३८॥

माहुली क्षेत्र अत्यंत सुंदर । तेथें मज कृष्णेचा विस्तार । वेण्या मिळाली प्रियकर । संगम थोर ते ठायीं ॥३९॥

तरी विज्ञापना परिसावी । नित्य विश्रांती तेथें व्हावी । सकळ तीर्थे पावन करावीं । दुरितें वारावीं सकृपें ॥१४०॥

विनीत उत्तरें परिसोन । अवधूत देती प्रतिवचन । नित्यनेम करुन । संध्यावंदन करुं येथें ॥४१॥

परिसोनि अभय वचनासी । आनंदभरित झाल्या मानसीं । अवधूतें पाहूनि महाबळेश्वरासी । माहुली क्षेत्रासी विलोकिलें ॥४२॥

क्षेत्र अत्यंत सुंदर । रमणीय देखिलें कृष्णातीर । संगमीं वंदोनि सत्वर । पैलपार उतरले ॥४३॥

तीर्थदेवतीं आवडी । सिद्धसाधुदर्शनीं गोडी । शोधीत चालती तांतडी । कडोविकडी गुहा वनें ॥४४॥

स्वछंदें करोनि विचरती । मार्गी जीवजंतु उद्धरिती । ज्योतिर्लिंगें अवलोकिती । प्रेमें पूजिती आदरें ॥४५॥

पर्वतदरी पंथ क्रमोनी । सप्तश्रृंगीस पावले येवोनी । ते विशाळ दैदीप्य भवानी । शिखरस्थानीं पाहिली ॥४६॥

ते जगदीश्वरी साक्षात । तिची कृपा व्हावया प्राप्त । तापसी तपातें आचरत । फळ पावत कामनेचें ॥४७॥

ते माता पाहूनि नेत्रकमळीं । स्तवोनिया पादें वदिलीं । अंबा प्रगटोनि तये वेळीं । मुख कुरवाळी तयांचें ॥४८॥

म्हणे चिरकाळ क्षेमकल्याण । तुम्हां असो गा परिपूर्ण । सिद्धि ऋद्धि योगज्ञान । येणें संपन्न सुखी असा ॥४९॥

त्रिगुणात्मकें साचार । तुम्ही धरिलासे अवतार । उतरावया भूमिभार । जगदुद्धार करावया ॥१५०॥

दत्त म्हणे वो जननी । तूं अर्धपीठ निवासिनी । तुझिया कृपायोगें करोनी । अद्‌भुत करणी होतसे ॥५१॥

स्वइच्छें घडमोडिसी । अनंत ब्रह्मांडें खेळविसी । कोण विधानें तुझी कैसीं । आगमनिगमासी न कळती ॥५२॥

त्रिगुणात्मकें बीजासनीं । षड्‌भुजे तूं प्रणवरुपिणी । विश्वात्मके सर्व साक्षिणी । गुणवर्धनी गुणातीते ॥५३॥

स्तवनीं होवोनि तोषमान । लेववी चरणीं ब्रीदभूषण । अभयहस्त मस्तकीं ठेवून । कृपें करुन बोळवी ॥५४॥

मातेसी करोनि प्रणिपात । त्र्यंबकेश्वरीं पावले त्वरित । तेथें त्रिगुणात्मक दैवत । पाहिले साक्षात अनुपम्य ॥५५॥

त्रिगुणात्मकाशीं त्रिगुणात्मक । भेटते झाले आवश्यक । कुशावर्ती बैसोनि नावेक । गिरीं आवश्यक वेधलें ॥५६॥

हें मूळ गौतमाचें स्थान । प्रसंगीं आलें निरोपण । श्रोते होवोनि सावधान । कीजे श्रवण साक्षेपें ॥५७॥

पूर्वीं गौंतम आचरे तपासी । शांतिशील सदय कुटुंबेंसी । सवें अहिल्या गुणराशी । पतिआज्ञेसी तत्पर ॥५८॥

उभयतां ही आनंदघन । नित्यानित्य साळी पिकवोन । दुकळीं घालोनि भोजन । करी पालन बहुतांचें ॥५९॥

तेथें हिमनगबाळी । गौतमीवेषें खाय साळी । तेथें गौतमें देखोनि नेत्रकमळीं । धांवोनि जवळी पावला ॥१६०॥

श्रोते म्हणती कासयासाठीं । हे गौतमीरुप धरी गोरटी । वक्ता म्हणे पडिली हाटीं । तेही गोष्टी परिसावी ॥६१॥

कवणें एके काळीं । शंकर आणि हिमनगबाळी । परमानंदाचे मेळीं । द्यूत खेळीं बैसले ॥६२॥

उभय सारीपाट खेळती । तंव जटेकडे पाहे पार्वती । तेथें ललनेची आकृती । देखोनि चित्तीं विस्मित ॥६३॥

म्हणे जी शंकरा करुणाकरा । जाश्वनीळा दिगंबरा । अहो स्वामी कर्पूरगौरा । विनंती अवधारा एक माझी ॥६४॥

जटाजूटीं निगुती । दिसती ललनेची आकृती । ते सांगा कृपामूर्ती । मजप्रती येधवां ॥६५॥

तंव शंकर बोले गिरिजेसी । तें सलील ठेविलें शीततेसी । दृष्टि तरळोनी निश्चयेंसी । ललना म्हणसी तियेतें ॥६६॥

उमा म्हणे कुचाग्र । ते दिसताती अति सुंदर । शिव म्हणे मनोहर । हंस नागर द्वयभागीं ॥६७॥

मागुती बोले भवानी । दिसती नेत्रभरित अंजनीं । हर बोले जळस्थानीं । मच्छ तळपोनी राहिले ॥६८॥

हिमनगजा म्हणे भ्रकुटी । सुनीळ दिसती धूर्जटी । नीलकंठ म्हणे कच्छपृष्टीं । दिसे दृष्टी कृष्ण तें ॥६९॥

जी तें ललाट दिसतें विशाळ । कुंकुमचिरी वरी गुंजाळ । हर म्हणे मगर प्रबळ । कमळनाळ आरक्त दिसे ॥१७०॥

तंव ते बोले मृडानी । कुरळ दिसती बरवेपणीं । त्रिपुरारी म्हणे कुरंगनयनी । लहरा जीवनीं एकसरा ॥७१॥

इभजननी म्हणे पंचवदना । मुक्तमंडित तेजभूषणा । निरखितां भास माझिया मना । कृपाघना दिसती ॥७२॥

तंव बोले चंद्रमौळी । नग नव्हेत वेल्हाळी । कमळपुष्पें विकासलीं । वर्ण पिंवळीं सतेज ॥७३॥

जळीं तरंगांचे आकार । ते तुज दिसती मुक्ताकार । किंवा कमळी गुंजार । घालिती भ्रमर जाण तूं ॥७४॥

अपर्णा म्हणे कुसरी । दाविली वदोनी नाना परी । अद्‌भुत लीला सर्वेश्वरी । सवत वरी पाळिली ॥७५॥

उमा न दावितां वदोनी । सवतमत्सर धरिला मनीं । ही विशेष आगळी मजहूनी । मौलस्थानी प्रिय झाली ॥७६॥

असो अंबा सखेद मानसीं । श्रुत करी एकदंतासी । कोण विचार करुं यासी । गंगा शिवासी आवडली ॥७७॥

मजहूनि ते अधिक झाली । मस्तकीं जावोनि सवत बैसली । हे मज तो नव जाय साहेली । त्वरें सांडविली पाहिजे ॥७८॥

कवण करुं यासी उपाय । ज्या गुणें येथोनि जाय । हे असतां घडविल अपाय । तया ठाय सांडवावा ॥७९॥

मातेसी बोले गजवदन । माझेनि न बोलवे वडिलां वचन । तुमचें तुम्ही साधा कारण । साह्यपण माझें तुज ॥१८०॥

ऐसा करोनि संकेत । अंबा कारणातें योजित । भूलोकीं धांडोळित । कार्य विपरीत करावया ॥८१॥

तों अकस्मात तपोराशी । दाता शांत सदय मानसीं । आनंदें पाळी काळीं जिवासी । नित्य साळीसी पिकवोनी ॥८२॥

ऐसा तो गौतम महामुनी । अहिल्येसहित देखिला आचरणीं । त्याचें चरित्र दृष्टीं देखोनी । आनंद मनीं वाटला ॥८३॥

अंबा म्हणे गा लंबोदरा । येथेंचि रचूं कर्तृत्वविचारा । तूं गोरक्षक होवोनि सुंदरा । गाई बरा राखी येथें ॥८४॥

मीही गौतमी दुबळी होईन । साळीमाजी प्रवेश करीन । थैक म्हणतां सोडीन प्राण । पाहे दुरुन तूं धुंडी ॥८५॥

तोषवितां मुनिवर । प्रगट करी तूं सत्वर । दूषणावांचोनि हा प्रकार । सिद्धी पर नवजे कीं ॥८६॥

ऐशापरी आज्ञापितां । तैसेंचि होणे आलें गणनाथा । गौभारातें होय चारिता । झाली माता गौतमी ॥८७॥

ते साळींत करितां प्रवेशन । गौतम त्वरें आला धांवून । कृश गौतमी अत्यंत देखोन । न करी ताडन कळवळें ॥८८॥

सहज मोहोरीप्राय कंकर । उचलोनि पाणी केला वर । थैक म्हणतां सत्वर । टाकी शरीर गौतमी ॥८९॥

क्षण न लागता सोडिला प्राण । दचकलें गौतमाचें मन । विघ्नेश पाहे दुरोन । पुढील कारण लक्षीत ॥१९०॥

गौतम म्हणे ही कर्मगती । कैसी ओढवली मजप्रती । थैक म्हणतां सहज स्थिती । हत्या मजप्रती लागली ॥९१॥

न करिता कांहीं ताडन । व्यर्थ आलें हें वेहेरण । असो क्षुधित येतील ब्राह्मण । तयांसि भोजन देणें कीं ॥९२॥

प्रगट न करितांची मात । सदनीं जावोनिया त्वरित । वेगीं पाका सिद्ध करवीत । शुचिष्मंत आदरें ॥९३॥

चहूंकडोनि पातले द्विजवर । पात्रेंहि विस्तारिलीं अपार । षड्‌रस अन्नें परिकर । वाढोनि सत्वर सिद्ध केलीं ॥९४॥

ब्राह्मण पात्रीं बैसले । गौतमें उदक करी घेतलें । मंत्रोक्त संकल्प सोडिले । ते जाणवले परशुधरा ॥९५॥

ब्राह्मण बैसतां भोजनीं । तों विघ्नेश आला धावोनी । गोरक्षवेषातें दावोनी । काय वचनी बोलत ॥९६॥

हे गौतमा तपोधना । सदय म्हणविसी तूं आपणा । कां गा धरोनी निदर्यपणा । गौतमी हनना केलें त्वां ॥९७॥

माझी गाय मारोनि टाकिली । हत्या तुजवरी थोर आली । वार्ता ऐकोनी द्विजमंडळी । जेवितां राहिली स्तब्ध उगी ॥९८॥

पुसते झाले धरामर । केउता घडला हा विचार । गोरक्षक सांगे सत्वर । दावी कलेवर गौतमीचें ॥९९॥

भोजन सांडोनी द्विज उठले । गौतमा गोहत्येतें स्थापिलें । स्वस्थळालागीं विप्र गेले । गुप्त झाले गजानन ॥२००॥

गौतम झाला चिंताक्रांत । कळाहीन झाला निश्चित । बुद्धि न सुचे किंचित । झाला भ्रमित मानसीं ॥१॥

यासी उपाय कोण करावा । विचार कवणासी पुसावा । कैसेनि दोष हरावा । घोर जीवा दिनरजनी ॥२॥

इकडे पार्वती सांगे गजानना । तूं जाय वेगीं गौतमवना । विप्रवेंष धरोनी सगुणा । सांगे निवारणा उपाय त्या ॥३॥

शिवमौलीं गंगा आहे । ते जरी स्नाना मिळेल पाहे । दोष तात्काळ तो जाये । पवित्र काय होईल तुझा ॥४॥

अवश्य म्हणोनी सिद्धिदाता । झाला गौतमासी भेटता । सांगोनि गुह्य गुजवार्ता । झाला जाता मागुती ॥५॥

गौतमासी कैसें वाटलें । जेवीं बुडतिया तारिलें । कीं वणव्यांतुनि काढिलें । कीं सोडविलें व्याघ्‍रमुखी ॥६॥

कीं तस्करापासुनी सोडविलें । कीं चुकतां मार्गी लाविलें । धन्य उपाय निवेदिले । ऐसें वाटलें तयांसी ॥७॥

सांगितलें जें हित । तेचि करावें गा निश्चित । म्हणोनि गौतम आरंभित । तप आचरत अनिवार ॥८॥

शिवदीक्षा करोनि धारण । कामक्रोधादिक वर्जोन । वादसंवादाते त्यजून । घोर तपाचरण मांडिलें ॥९॥

बहुत काळपर्यंत । आहरनिद्रारहित । तप आचरतां शुचिष्मंत । उमाकांत तोषला ॥२१०॥

तात्काळ प्रगटला कैलासरमण । वरं ब्रूहि बोलिला वचन । येरु पाहे जंव सावधान । तंव पंचवदन देखिला ॥११॥

मग जोडोनि बद्धपाणी । करिता झाला विनवणी । जय करुणाकरा मोक्षदानी । शूळपाणी नमो तुज ॥१२॥

जयजय शंकरा गिरीजावरा । जय पशुपते त्रिपुरसंहारा । जयजयाजी पन्नगहारा । कर्पूरगौरा कपर्दिशा ॥१३॥

पिनाकपाणी शांभवा । करुनानिधे उमाधवा । नीलप्रीवा सदाशीवा । हेतु पुरवा दीनाचा ॥१४॥

भोळा उदार सर्वेश्वर । गौतमा देतसे अभयकर । कोण हेतु सांग सत्वर । तो मी निर्धार पुरवीन ॥१५॥

गौतम जोडोनि करकमला । विनविता झाला जाश्वनीला । गोहत्तेचा दोष घडला । तो निवारिला पाहिजे ॥१६॥

यालागीं स्वामी धूर्जटी । गंगा असे तव जटाजूटीं । तेचि या पातकानें निवटी । स्नानासाठीं देइजे ॥१७॥

अवश्य म्हणोनि मदनारी । तैं गंगेलागीं पाचारी । ती न निघेची बाहेरी । जटेअंतरी स्तब्ध पैं ॥१८॥

नानापरि तिज आळविलें । परि ती न निघे कदा काळें । शिवें कोपोनि तये वेळें । क्रोधें घातले विरासन ॥१९॥

जटा भवंडोनि शिळेवरी । आपटोनि काढिलें बाहेरी । गौतमासी म्हणे ईतें धरीं । पापहारी तात्काळ ॥२२०॥

शिव देखोनि कोपायमान । प्रगटोनि अदृश्य झाली आपण । तैं गौतमें पाटलाग करुन । करी स्तवन करुणोत्तरीं ॥२१॥

मग औदुंबरीं प्रगटली । मागुती तेथोनि गुप्‍त झाली । प्रीतीं गौतमें आळविली । किंचित उदेली मध्यते ॥२२॥

गौतमें घेवोनि कुशजुडी । करुणास्वरें प्रार्थी आवडीं । म्हणे माये दडादडी । करोनि परवडी मांडिली ॥२३॥

माझें अघ अत्यंत थोर । तुज दिसतें गंगे अनिवार । म्हणोनि तूंतें न धरवे धीर । भीति दुर्धर वाटे तुज ॥२४॥

माझिया अघासाठीं । पळसी देवोनि त्वरें पाठी । येणें योग्यतेसी मोठी । हानी खोटी तुज गंगे ॥२५॥

पंचमहापातकी अघोर । ते त्वां उद्धरिले साचर । माझें पाप तुज अनावर । म्हणोनि समोर न राहसी ॥२६॥

तुझिया कीर्तीचें महिमान । कळों आलें मजलागून । हें मिरवीन जगीं भूषण । भोगूं प्राक्तन आपुलें ॥२७॥

उण्या शब्दाचा अभिमान धरीं । तात्काळ प्रगटली ते अवसरीं । गौतम धांवोनि आवर्त करी । स्नान सारी लगबगें ॥२८॥

तेथें गोहत्येचा दोष गेला । गौतमऋषी पावन झाला । कुशावर्त नाम तयाला । अद्यापि लीला अनुपम्य ॥२९॥

श्रोतियांच्या प्रश्नासी । कथनेचि आलें कथेसी । गतनिरोपणीं अविनाशी । वंदोनि तीर्थासी गिरि वेघें ॥२३०॥

औदुंबरी गंगा वंदिली । पुढें शिवें जटा आपटिली । तेही शिला दृष्टीं पाहिली । खूण ओळखिली वीरासन ॥३१॥

पुढें मुख्य अधिष्ठान । पाहूं जाती त्वरें करुन । तों प्रत्यक्ष त्र्यंबकराजदर्शन । देखिलें पूर्ण सतेज ॥३२॥

अवधूत देखोनि मूर्ती । आनंद न समाये चित्तीं । पाणी जोडोनि पुढतीं । स्तवन आरंभिती प्रीतीनें ॥३३॥

जयजय करुणाकरा विश्वपालका । कृपासमुद्रा कर्ममोचका । भवानीधवा भवनाशका । भाळपावका नमो तुज ॥३४॥

जय अजअजीता अव्यया । गुणातीता गुणमया । सर्वातीता करुणालया । शिवसदया नमो तुज ॥३५॥

जय त्रिगुणात्मका त्रिनयना । त्रिदशपालका त्रिदलभूषणा । त्रिपुरांतका त्रिशूलधारणा । त्रितापहरणा त्र्यंबका ॥३६॥

स्तवनीं तोषोनि उमापति । तिघां आलिंगी परमप्रीतीं । दत्तासि बोले कृपामूर्ती । अद्वय निश्चितीं उभय कीं ॥३७॥

त्रिगुणात्मकें तुझा अवतार । तोचि त्र्यंबकराज निर्धार । कैचा येथें द्वैतविचार । दावोनि प्रकार जग तारा ॥३८॥

स्वयें अपर्णा वेंगीं आली । उभय त्रिगुणात्मक मूर्ति देखिली । आनंदें करोनी अर्चिली । ध्यानीं गुंतलीं नेत्रपातीं ॥३९॥

एक रुप पाहोनि डोळां । परमानंदें केला सोहळा । शिव कर्पूरगौर भोळा । देत मेखळा दत्तातें ॥२४०॥

त्रिशूळ डमरु दिधला करीं । म्हणे तुज शोभती हे साजिरी । अक्षय मिरवोत भूषणें बरीं । येणें अंतरीं सुखावें मी ॥४१॥

ऐकोनिया अमृतवाणी । अविनाश तात्काळ लागे चरनीं । सांब म्हणे तरणी । तोवरी मेदनी राहे तूं ॥४२॥

योगमार्ग परिकर । अवलंबोनि दावी ज्ञान प्रखर । या जगतीचा करी उद्धार । मायाविकार हारपवी ॥४३॥

तूं सकळां श्रेष्ठ मुगुटमणी । सरी न पाबे तुझी कोणी । स्वच्छंदें तूं वर्ते जनीं । अद्‌भुतकरणी दावोनिया ॥४४॥

सकळ सिद्धींचा दाता । तूंचि होसि गा दत्ता । बालोन्मत्त पिशाचता । ह्या अवस्था तुज वसो ॥४५॥

तूं कृपें करिसी अवलोकन । तो तात्काळची तुजसमान । तुज अनन्य जे शरण । तेचि पावन जाणावे ॥४६॥

सकळ लोक लोकाधिपति । तुझिया दर्शनातें इच्छिती । आदरें करोनि माया पार्वती । येतील प्रीतीं नित्यत्वें ॥४७॥

तूं अविनाश गा निर्गुण । सत्य शाश्वत निरंजन । अद्वय निःसंग चैतन्यघन । ब्रह्मानंदपूर्ण तूं दत्त ॥४८॥

क्षराक्षररहित । तो तूं होसी सर्वांतीत । तुज जाणावया सत्य । तूंचि समर्थ होसी कीं ॥४९॥

ऐसा करितां वाग्वाद । तल्लीनपणें झाला आनंद । तो आनंदाचा कंद । ब्रह्मानंद हेलावे ॥२५०॥

उभय संवादीं गुज एक । एकापासून झाले अनेक । अनेकींच ते एक । संत आवश्यक जाणती ॥५१॥

संत तेथेंचि शांति । शांति तेचि विरक्ति । विरक्ति तेथेंचि उपरति उपरतीं अनुरक्ति जडलीसे ॥५२॥

जडतांचि झालें उन्मन । हरपलें तेथें मीतूंपण । खुंटले व्यवहार सरले गुन । वृत्ति तल्लीन संतांच्या ॥५३॥

त्या संतांच्या वाहणा । रुचल्या अनंतसुताच्या मना । लक्षीतसे प्रेमें सेवना । जैसें माखणा मांजर ॥५४॥

म्हणोनि विनवी संतांसी । मज ठेवा चरणसेवेसी । आणीक न मागें तुम्हांसी । द्यावी मजसी दान सेवा ॥५५॥

किंचित उद्‌भवला सेवाभाव । तितुक्याचियोगें हा अपूर्व । प्रसादरुपें लाघव । ग्रंथ अभिनव बोलविता ॥५६॥

हे दत्तकथा अलोकिक । श्रोत्या वक्तया सुखदायक । भोळ्या भाविका तारक । क्षेमकारक सकळांसी ॥५७॥

पुढले प्रसंगीं शिवासी । आज्ञा मागेल अविनाशी । पश्चिममार्गे तीर्थासी । गमन वेगेंसी करितील ॥५८॥

संत श्रोते सज्जन । येथील विभागी असती पूर्ण । लाभ न जोडे भाविकावीण । जीवीं हे खूण राखावी ॥५९॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रीनारदपुराणीचें संमत । श्रोते परिसोत भाविकभक्त । द्वादशोध्यायार्थ गोड हा ॥२६०॥

॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP