येथें न चले अन्योक्ती । हें आपुलें स्वछंदेंचि वागती । मायिक पदार्था नातळती । अवलोका प्रीतीं याची लीला ॥७१॥
जगासी करावया पावन । आणि तुमचें करावया सेवन । प्रगटले अवतार घेऊन । यांचें महिमान न कळे वेदा ॥७२॥
तुमचे हेतू पूर्णतेला । अधिकार पाहोनि चंद्र सोंपिला । वृद्धिकार्यार्थ येणें झाला । न छळी उभयांला कल्पांती ॥७३॥
ऐकोनि अत्रीचें उत्तर । अनसूयेचें सुखावें अंतर । चिंता दवडोनिया दूर । आनंद थोर मानिला ॥७४॥
आनंदयुक्त देखोनि माता । उभय चरणीं ठेविती माथा । येरी अंकीं घेवोनि उभयतां । आवडीं सुतां चुंबित ॥७५॥
म्हणे आतां सुखें करुन । स्वइच्छें रमावें आनंदघन । आवडीचे हेतु होतील पूर्ण । नित्य दर्शन आम्हां दीजे ॥७६॥
क्षेम कल्याण असो तुम्हांसी । म्हणोनि माथा ठेवी कृपा करासी । तंव नमी पुन्हा तो अविनाशी । वचन मातेसी बोलत ॥७७॥
तुम्हां उभयतांवांचून । आम्हांलागीं दैवत कोण । नित्य प्रेमें वंदूं चरण । हेचिं ध्यान पूजन आमुचें ॥७८॥
मातापितयांतें न भजती । जे अन्य दैवतें आराधिती । ते कैसेनि मुक्त होती । फेरीं पडती बहुसाल ॥७९॥
पुत्रासी मातापिता दैवत । गृहिणीसी पति निश्चित । शिष्यासी सद्गुरुनाथ । मूर्तिमंत सत्य हें ॥१८०॥
सेवकनिष्ठा स्वामीठायीं । गृहस्थासी दैवत अतिथि पाहीं । ब्राह्मणावांचोनि दैवत नाहीं । अन्य कांहीं वर्णांतें ॥८१॥
ब्राह्मणाची उपासना । सूर्य अग्नी गौतमी जाणा । याव्यतिरिक्त इतर जना । भावनिष्ठपणा दैवता ॥८२॥
यायोगें हा शास्त्रार्थ । वेदीं निवडोनि ठेविला परमार्थ । या स्वधर्मे पुरती अर्थ । अधर्म अनर्थ नाचरतां ॥८३॥
हा धर्म जाणोनि जननी । आम्ही विनय तुमचे चरणीं । येथोनि कल्पना नाणिजे मनीं । स्वानंदे भुवनीं असावें ॥८४॥
नित्य भ्रमण असे तिघांसी । कारण सुख द्यावया लोकांसी । परी नित्य रजनीं तुजपाशीं । येऊं निश्चयेंसी जननिये ॥८५॥
तुझिया दर्शनावांचून । आम्हां न गमे एकही दिन । माते सत्य सत्य हें वचन । अन्यथा भाषण नोव्हे हें ॥८६॥
मी सर्वा ठायीं व्यापलों । नाना रुपें विस्तारलों । निष्ठाभावें जगीं प्रगटलों । भरोनि उरलों तुजपाशीं ॥८७॥
तें कैसें म्हणसी माते । अविनाश वदे निवेदितों तूतें । किंचित् आत्मैव शब्दातें । लावोनियातें बोलतों ॥८८॥
सिंहाद्री ढिसाळ हा कायापर्वत । शिखरीं मंदिर शोभिवंत । प्रणवरुप अत्रि विराजित । तपें तपत तेजःपुंज ॥८९॥
अर्ध जेथें शशांककोरी । ते तूं अनसूया सुंदरी । पाहे मी तयाचे वरी । व्यंजनापरी गुणातीत ॥१९०॥
जें वेदाचें होय निज । तेंचि या सकळांचें बीज । तया जाणती योगिराज । सकळ काज त्याचेनी ॥९१॥
तो मी साकार प्रगटलों जनीं । सर्वस्व दत्त करावयालागुनी । घेईल त्याची पुरेल धन । आद्यंतपारणीं फिटतील ॥९२॥
अत्रि सद्गुरु हा दयाघन । येणें मातें भेटविलें मजलागोन । तैं एकत्व पावलों सदयपण । करावें पावन हेंचि वाटे ॥९३॥
यालागीं माये परियेसी । तूं शरण जाय अत्रीसी । देहींच भेंटसी विदेहासी । दृष्टी अविनाशीं जडेल ॥९४॥
मूळ वस्तु ते अविनाश । मायिक पदार्थी असे नाश । कल्पनेचा नुरे लेश । कैंचा पाश मग तेथें ॥९५॥
हें वर्म न कळे संतांसी । जाणोनि रमती अविनाशी । अभेदत्वें ते मानसीं । सर्वात्मकासी पाहाती ॥९६॥
अद्वयपदातें पावतां । भेद नाहीं संत दत्ता । गुरुकृपेविण पंथा । केंवी पावता जीव होय ॥९७॥
यदर्थ गुरुपदासी । शरण जावें अनन्यभावेंसी । तन मन धन अर्पोनिया पायांसी । सकळ अपायासी दवडावें ॥९८॥
उपायेंचि हरावे अपाय । अपाय सरतां कैचें भय । भय नसतांचि सहज निर्भय । होतां अभय सद्गुरुचें ॥९९॥
ऐसें कथितां निरोपण । अनसूया झाली तल्लीन । वृत्ति होवोनि निमग्न । नादी फण होय जेवीं ॥२००॥
पुढिले प्रसंगीं संवाद । प्रश्नोत्तरीं उद्भवतील आनंद । गुणग्राह्य गुरु प्रसिद्ध । दत्त विविध सांगतील ॥१॥
दत्त सकृप दयाघन । प्रबोधें करितील पावन । जें ऐकतां होय ज्ञान । सुख समाधान साधकां ॥२॥
साधक सिद्धांचे समूहीं । अविनाश वसे त्या ठायीं । तो संतकृपेवीण कांहीं । प्राप्त नाहीं कवणातें ॥३॥
म्हणोनिया संतपदा । अनंतसुत विनय सदा । त्यायोगें सच्चिदानंदा । आनंदकंदा भोगी तूं ॥२०४॥
इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासि नारदपुराणींचें संमत । सदा परिसोत भाविक भक्त । षोडशोध्यायार्थ गोड हा ॥२०५॥
॥ इति षोडशोध्यायः समाप्तः ॥