श्री दत्तप्रबोध - अध्याय तेवीसावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीसद्‌गुरु दत्तात्रेयाय नमः ॥

जयजय सद्‌गुरु श्रीअनंता । सदय उदारा भाग्यवंता । अनाथनाथा कृपावंता । तव पदीं माथा समर्पिला ॥१॥

तुझे सुकुमार हे पादपद्म । भवाब्धि तरावया तारु उतम । जे भाविक सेवितील सप्रेम । स्वपदधाम देसी त्या ॥२॥

तुझिया चरणींचें तीर्थ । सकळ तीर्थां करी पुनीत । सेवितां पाप नुरवि देहांत । होय शुचिष्मंत ज्ञानप्राप्ती ॥३॥

तुझिया चरणींचे रजरेण । सहजीं पावले करितां नमन । त्याचें तुटलें भवबंधन । भानुनंदन शरण त्या ॥४॥

सहजें वंदोनि तुज कवटाळी । त्या भी काळ मग स्वकवटाळीं । देखोनि वाजवी वासव टाळी । योग्य पटाळी मान्य बहु ॥५॥

तुझी भावें घडतां प्रदक्षिणा । तो तव कृपें पावे सुलक्षणा । यम वर्णी न दे दक्षणा । करी रक्षणा गुरुपक्षा ॥६॥

तुझें प्रितीं करीं जो सेवन । तया आदरें वंदी त्रिभुवन । वर्णिती गुण करिती स्तवन । पद पावन प्राप्त तया ॥७॥

अनन्य प्रेमा धरोनि चित्तीं । भाव सद्‌गुरु तुज जे अर्चिती । त्यांच्या पुण्या नाहीं गणती । न कळे त्यांप्रती फळ कोण ॥८॥

हा शरण शरणागताचा महिमा । वर्णितां न वर्णवे जाली सीमा । तुझा पार सद्‌गुरुसर्वोंत्तमा । अगमनिगमा न कळेची ॥९॥

तेथें मी गा अल्पमती । करुं काय जाणे तुझी स्तुती । म्हणोनि मौन्य सप्रेम चित्तीं । न्याहाळी मूर्ती करुणेची ॥१०॥

न्याहाळितां सद‌गुरु तव रुपासी । ठक पडले एकादश नेत्रांसी । पार न कळे द्विसहस्त्र नयनासी । केवीं अष्टदळासी मग पावे ॥११॥

नेत्र द्वादशें शिणला । संख्या सहस्त्राचा दीपोनि थिजला । जो जो स्वरुपा पाहूं गेला । तो तो विरला ते ठायीं ॥१२॥

तुझें स्वरुप काय कैसें । पाहतां न सांगवे जालों पिसे । वर्णावया अठावीस अतिसरसें । जालें बावळसे चांचरती ॥१३॥

रुप गुणा नाहीं अंतपार । शिणले पाहतां वर्णितां थोर थोर । तेथें केउता मी पामर । व्यर्थ बडिवार वाचा वंदू ॥१४॥

मी अत्यंत दीन अज्ञान । मतिमंद मूढ बुद्धिहीन । परी हाव मनीं वंदावे चरण । प्रेमें कवळून धरावें ॥१५॥

परी न सुचतो उपाय । तळमळ जीवीं करुं काय । कोण दावील मज सोय । म्हणोनी पाय आठविले ॥१६॥

संत सद्‌गुरु दयाघन । तेणें वोळखिलें माझें चिन्ह । वोळखोनि प्रीतीं मजलागून । सगुण ध्यान निवेदिलें ॥१७॥

ते आज्ञा वंदोनि शिरीं । ध्यान आरंभिलें हृदयांतरीं । नित्य नेमें पूजा बरी । निरोपिल्यावरी साधीत ॥१८॥

मनीं जडतां प्रेमभाव । तोचि सद्‌गुरु प्रगटला देव । मनोपचार समर्पितां सर्व । रुप अपूर्व पाहिलें ॥१९॥

षोडशोपचारें केलें अर्पण । सप्रेमें धरिलें दृढचरण । काया कुरवंडी करोन । स्तुती स्तवोन तोषविला ॥२०॥

दंडप्राय करितां नमस्कार । सद्‌गुरु समर्थ सदय थोर । माथां ठेवोनि अभयकर । दिधले प्रियकर आलिंगन ॥२१॥

आलिंगनीं पडतांची मिठीं । हितगुज सांगे कर्णपुटीं । म्हणे मद्रूप पाहें सर्व सृष्टी । मजविण गोष्टी आन नसे ॥२२॥

मीच बाप निर्विकार । स्वइच्छें जालों साकार । मीच नटलों चराचर । सर्व विस्तार माझाच मी ॥२३॥

मजपासाव हें ब्रह्मांड । मजमाजींच माझा पिंड । पिंडी दावीं मी सुरवाड । माझेनि गोड सर्व दिसे ॥२४॥

मी वसतां वसलें पाहीं । मी नसतां नसे कांहीं । मीतूंपण एक ठायीं । करोनि घेईं त्या अर्था ॥२५॥

मी तूं अक्षरें दोन । पाहे लोमविलोमें करोन । तोचि अर्थ राहे गिळोन । चकार घालोन मध्यस्त ॥२६॥

सद्‌गुरुकृपेची हे समज । साधवितां साधली तैं उमज । तो आनंद साठवोनी मज । सांगणें नुमज सांगवेना ॥२७॥

हें वर्म जेणें दाविले । तया हृदयस्थातें वंदिलें । सद्‌गुरु अनंता विनविलें । सबाह्य पाहिलें रुप त्याचें ॥२८॥

अनंत रुपीं नटला अनंत । तोचि जगद्‌गुरु प्रगटला दत्त । त्रिगुणात्मक मूर्ती गुणातीत । संख्या चोविसांत अवतार हा ॥२९॥

तो विदेहात्मक स्थिती वर्ते जगीं । अविनाश वृत्ती सदा निःसंगी । पंचमाश्रमी निजानंद भोगी । स्वात्मरंगी रंगला तो ॥३०॥

जगदोद्धाराचिया कारणा । अवतारचरित्रें दावी नाना । ये अवताराची अतर्क्य रचना । हो योगिराणा योगवासी ॥३१॥

सच्चिदानंदमूर्ती अविनाशी । स्मरगामी असती निश्चयेंसी । देती दर्शन भाविकांसी । पुरविती अर्थासी तयांच्या ॥३२॥

आपुलें जें गुह्यधन । द्यावयासी उदार पूर्ण । परी घेतां कोण्ही विरळाची जाण । कामीजन येर सर्व ॥३३॥

परी अद्वयपणें तो अभेद । जैसा जया मानसिक छंद । तो पुरवोनि दे त्या आनंद । कृपें आल्हाद उपजवी ॥३४॥

पूर्व सुकृत आचरणें भेटी । होय परि न घडे स्वात्मगोष्टी । सिद्धि विषय भोग चावटी । मागती हाटीं बैसोनिया ॥३५॥

मग जैं जया साचा निग्रह पुरा । तो कळतसे जगदोद्धारा । इच्छित मनोरथ करोनि पुरा । दिगंतरा जाय त्वरें ॥३६॥

अवघे विषयाच्या भ्रमणीं । निष्काम नैराश्य न भेटे कोण्ही । हेचि इच्छा अवधूताचे मनीं । स्वात्मत्व धणी द्यावयाची ॥३७॥

यास्तव न बोले कवणासी । मौनचि धुंडी सत्पात्रासी । तो अकस्मात सोमवंशी । यदु अवधूतासी भेटला ॥३८॥

अविनाशमूर्ती पाहतां । संतोष जाला यदूच्या चित्ता । अनन्यभावें जाला स्तविता । परम लीनता धरोनी ॥३९॥

विसरवोनि आपुले वैभवासी । दुरी त्यजोनि भूपत्त्वासी । किंचित उर्मी नाणोनि मानसीं । शरण पदासीं पैं जाला ॥४०॥

विषयसुखातें धिःकारिलें । आपुले वपूतें बहु निंदिलें । अनुतापें मन तापलें । हृदय जालें सद्गदित ॥४१॥

अष्टभाव दाटले हृदयीं । स्तवोनि प्रेमें लागला पायीं । अंतर वोळखोनि ते समयीं । जाला तये ठायीं स्थिर योगी ॥४२॥

निःस्पृहतेचें करोनि उत्तर । शोधिलें रायाचें अंतर । अहेरणघणीं हीरा गार । सोनें घेणार पाहती कसीं ॥४३॥

तेवी कसोनि पाहतां । खरी रायाअंगीं मुमुक्षुता । वोळखोनिया देवदत्ता । उपजली चित्ता दया बहु ॥४४॥

करोनि तयाचा अंगीकार । मस्तकीं ठेविला अभयकर । प्रबोध करोनि केला स्थिर । स्वात्मत्व विचार बाणविला ॥४५॥

आत्मस्वरुपीं बिंबवोन । अविनाशपदीं बैसविला नेवोन । मन करोनिया उन्मन । काजकारण आज्ञापिलें ॥४६॥

यदु प्रथम शिष्य दत्ताचा । अद्यापि वाखाणिती कवी वाचा । भागवतीं संवाद कृष्ण उद्धवाचा । चोवीस गुरुंचा गुणग्राह्य ॥४७॥

हे कथा पूर्वीं निश्चिती । श्रवण केली संतश्रोतीं । किंचित अनुसंगें आली पुढती । तरी कृपावंतीं न कोपावें ॥४८॥

पात्रीं जेवण जेवितां । पदार्थ मात्र दिसे पाहतां । परी मागून सेवणें पुढतपुढतां । आपुलिया स्वार्था रुचीच्या ॥४९॥

तेवींच संदर्भसाधनी । वर्णिलेंचि आणावें वर्णनीं । यासी दोष न ठेविजे सुज्ञीं । विचार मनीं जाणोनिया ॥५०॥

असो हें कृतयुगींचें निरोपण । अवधूतें यदु केला पावन । त्रेतायुगीं सहस्त्रार्जुन । जाला शरण गुरुदत्ता ॥५१॥

अनन्यें तो विनय जाला । सेवनीं अवधूत संतोषविला । मुमुक्षूपणें प्रश्न केला । बहुत स्तविला जगद्‌गुरु ॥५२॥

देखोन तयाचा सेवाभाव । प्रसन्न जाला योगीराव । अनुग्रह देऊनी अपूर्व । स्वात्मानुभव बोधिला ॥५३॥

आध्यात्मिक जें वेदांतज्ञान । सिद्धांत कथिला तयालागोन । पिंडब्रह्मांड भूगोलवर्णन । आत्मत्व संपूर्ण बोधवी ॥५४॥

ज्ञान विद्या कला नीती । सकृपें अवधूत देत तयाप्रती । अभेदकवच लेववी विभूती । बळ संपत्ती पराक्रम दे ॥५५॥

क्षत्रियांमाजीं अनिवार । वीर पराक्रमी अति थोर । याचे उपमेसी अवनीवर । अस्त्रधर असेना ॥५६॥

या सहस्त्रार्जुनें बळें करोनी । पराक्रमें जिंकिली अवनी । कोण्हा न भिडवेचि समारांगणीं । राहती होवोनि शरण त्या ॥५७॥

तो अजिंक्य जाला सकळा । सुरां मानवां आणिली अवकळा । धाक लाविला कळिकाळा । प्रतापज्वाळा धडकल्या ॥५८॥

दत्तकवच तया अंगी । कोण्ही नसेचि बळिया भंगी । यश पावे सर्व प्रसंगीं । वीर निःसंगी सहस्त्रार्जुन ॥५९॥

तेजस्वी उगवतां भास्कर । नक्षत्रें लोपली समग्र । अंबरीं दिसे जरी निशाकर । होय साचार तेजहीन ॥६०॥

बृहस्पतीचिया वादापुढें । मूर्खसमुदाय दिसती बापुडे । गज पराक्रमी सिंहा भिडे । हें तों घडे तेजहीन ॥६१॥

तेवीं सहस्त्रार्जुन वीर निधडा । कोण्ही न पवेचि त्या पडिपाडा । दत्तप्रसादें करीत रगडा । नुरवी झगडा करील त्या ॥६२॥

प्रतापें भरलें भूअंबर । सर्वांतें केलें तेणें जर्जर । जैसादिवा तपें दिवाकर । दुजिया संचार करवेना ॥६३॥

हें अनिवारत्व पाहोन । चिंत्तार्णवीं पडले देव संपूर्ण । ते श्रीविष्णूचें करिती आराधना । स्तुतिस्तवन अनन्यत्वें ॥६४॥

तवं अभयाची वाणी । पडती जाली देवश्रवणीं । धरितो अवतार श्रेष्ठवर्णीं । स्वस्थ स्वस्थानीं असावें ॥६५॥

क्षत्रिय माजले अपार । पाप आचरती ते अनिवार । पीडा पावती ऋषिभार । मोडिती अध्वर द्वेषगुणें ॥६६॥

भलतेसे कर्म आचरती । मर्यादा कोण्हाची न मानितीं । मस्त रेडयापरी माजले क्षितीं । त्यांची अनीती न वर्णवे ॥६७॥

क्षितीस न साहे पापभार । हें देखोनिया सर्वेश्वर । त्वरें धरिता जाला अवतार । दुष्टसंहार करावया ॥६८॥

सर्व वर्णांसी गुरुत्वें ब्राह्मण । आणि क्षत्रिय शिक्षावया योग्य स्थान । तरी याच कुळीं अवतार धरुन । साधावें कारण सर्वहितां ॥६९॥

तंव तपोधनामाजीं श्रेष्ठ । मुनी जमदग्नी वरिष्ठ । तामसगुणें अति कोपिष्ठ । तप उत्कृष्ठ साधिलें ॥७०॥

तयाची कांता रेणुका । परम सुशील ती अंबिका । पतिव्रता शिरोरत्‍न जगदंबिका । न तुके तुका पार्वती ॥७१॥

परम पवित्र तिचें जठर । तेथें प्रभूनें धरिला अवतार । नवमास भरतां निर्धार । प्रसवे सुंदर योग साध्वी ॥७२॥

सहजीं कोण्ही लाभकारणा । करोनि जाती मुहूर्तविचारणा । हा तंव जगतीं उद्धारणा । करुं पालना अवतारे ॥७३॥

पूर्ण व्हावे सकळांचे मनोरथ । अवतारींचा साधावा कार्यार्थ । यास्तव निरखोनि सुमुहूर्त । प्रयाणी साधीत वेळ निका ॥७४॥

मंगळ सुकार्या निश्चित । संवत्सरीं साधिले दिवस सात । तयामाजीं रजनीचा संकेत । औट यथार्थ स्थापिला ॥७५॥

तैसेचि औट असती दिन । त्यांत नाहीं दोषगुण । सुमुहूर्त सकळां प्रमाण । ऐसें वचन वेदशास्त्रीं ॥७६॥

याचा विस्तार सांगतां । ग्रंथीं वाढेल बहुत कथा । सारचि घेतलें कार्यार्था । विस्तारवार्ता टाकोनी ॥७७॥

तवं श्रोते म्हणती वक्तिया । सांग जयंती निवडोनिया । उपासकालागीं कळावया । आचरावया व्रतसार ॥७८॥

जी जी श्रोते सावधान । करावें जन्मकथारसपान । विमानीं दाटले सुरगण । करिती अवलोकन समयासी ॥७९॥

भरोनि पुष्पांचे संभार । वाट पाहती अवघे सुर । किन्नर गंधर्व अप्सर । विद्याधर देवांगना ॥८०॥

सकळांचे लागलेति नयन । चातकाऐसें वेधलें मन । संधि ऐकावया योजिले कर्ण । तें पर्व कोण अवधारा ॥८१॥

वसंतऋतु वैशाखमास । शुक्लपक्षीं तृतिया दिवस । मृगसुकर्मायोग विशेष । प्रगट इंदूस अभेजितीं ॥८२॥

अवतार होतांचि प्रगट । विमानी तुरे वाजती अचाट । पुष्पें वरुषती घनदाट । वर्णिती भाट बंदीतें ॥८३॥

ताल मृदंग वाद्यें नाना । गाती गंधर्व संगीत नाना । दुंदुभी वाजती शब्द दनाना । घंटा घणाणा वाजती ॥८४॥

देखोनि सुरांचा आल्हाद । घोष करिती ऋषिवृंद । वेदोक्त देती आशीर्वाद । परमानंद नारीनरां ॥८५॥

प्रेमाचीं उभारलीं मखरें । स्वानंद तोरणें परिकरें । उल्हास गुढिया फडत्कारें । जिव्हाळा नीरें हेल वाहती ॥८६॥

द्विज मिळाल्या सुवासिनी । तोषविती सौभाग्य साखरपाणी । रात्रिवर्ग दाही दिनीं । केला द्विजगणीं गजराने ॥८७॥

शांतिपाठ दहा दिवस । शुद्ध स्नान अक्राव्यास । बारसें करोनि बाराव्यास । तेराव्यास पालख तो ॥८८॥

वाद्यें वाजती परोपरी । वाणें विडा आणिती नारी । न्हाणेनि माता बाळ शृंगारी । पालखातरीं घातला ॥८९॥

नाना प्रकारीं हाल्लर । गीत गाती गोड मधुर । पालख गावोनिया सुंदर । करिती गजर रामनामें ॥९०॥

शर्करा सुंठोडा पानें । हरिद्रा कुंकुम वांटिती मानें । नामकर्म जातकर्म क्रमानें । करोनि दानें देती द्विजा ॥९१॥

तेथें उपाध्या पुरोहित । अत्रि अग्रगण्य विख्यात । कौतुक पहावया स्वामी दत्त । पावला पुनीत त्यासंधीं ॥९२॥

सकळ विधी संपादिला । समूह सन्मानें बोळविला । देवऋषि वर्णीत बाळा । आपल्या स्थळा पावले ॥९३॥

दिवसमासें तो बाळ । वाढतां मौंजी केली तात्काळ । दीक्षा होतांचि विद्या प्रबळ । पढे सकळ गुरुआज्ञें ॥९४॥

गुरु आणि पितयापासून । संपादिलें अवघें विद्याधन । कला विद्या कौशल्य पूर्ण । लाधला आशीर्वचन गुरुचें ॥९५॥

आणिक बंधु असती । परि ऐसी नयेचि गति । हे प्रत्यक्ष अवतारमूर्ती । कोण पावती सरीया ॥९६॥

स्वकर्मी साधी तपाचरण । ब्रह्मचर्यव्रत निर्वाण । सर्वदा मुखीं वेदध्ययन । जेवीं नारायण तपतसे ॥९७॥

तया तपातें तोषोनि फार । प्रसन्न झाला श्रीगंगाधर । धनुर्विद्या देऊनी समग्र । अभयकर दीधला ॥९८॥

त्र्यंबक धनु आणि फरश । ते वज्‍रतुल्य दिधले त्यास । कदा न पावे हे अपेश । साधले यश समरांगणी ॥९९॥

भार्गवासि सांगे उमारमन । येणें शत्रू पावतील मरण । याचिया तेजा पुढें टिकोन । न राहे जाण कोण्हीही ॥१००॥

जया कारणासाठीं । तूं अवतरलासी या सृष्टीं । तया सहस्त्रार्जुना येणें निवटी । क्षत्रियां अटी येणेंची ॥१॥

यापरी प्रसाद करोनी । कैलासीं गेला शूळपाणी । रामें आयुधें अंगीकारोनी । शिवध्यानीं नित्य अर्ची ॥२॥

तो भार्गव महावीर । धरोनि मातेचा कैवार । क्षत्रियां करोनि समर । करी संहार पराक्रमें ॥३॥

महावीरांतें विभांडिलें । भूमि सांडोनि भयें पळाले । हरिलीं क्षत्रियांची बळें । पराभविलें परशरामें ॥४॥

हें सहस्त्रार्जुनें ऐकोन । करुं पावला समरांगण । फरशधरें त्र्यंबक सज्ज करोन । युद्ध निर्वाण पैं केलें ॥५॥

अनिवार योद्धा सहस्त्रकर । तेणें देखोनि विकट समर । पांच शत धनुष्यीं लावोनिशर । वर्षें अपार घनदाट ॥६॥

अस्त्र अस्त्रासी झगटती । रथ रथासी थडकती । शराग्नी रणीं भडकती । विमानें पळविती सुरभेणें ॥७॥

रामार्जुना होय झगडा । येर येरां करिती निकुरे रगडा । क्रोधें चाविती अधरदाढा । न धरोनि भिडा भिडती रणीं ॥८॥

राम योद्धा अनिवारु । करीत सेनेचा संहारु । छेदिले अर्जुनाचे रथ वारु । उडवी शीरु सारथ्याचें ॥९॥

सहस्त्रार्जुनें करोनि त्वरा । चढे दुसरिया रहंवरा । शर वर्षोनीं प्रळय थारा । पेटला मारा प्रळयत्वें ॥११०॥

दिव्य बाण वेगीं लावोन । तोडिला रामाचा स्यंदन । वारु सारथी मारोन । विरथ करोनि टाकिला ॥११॥

विरथ होतांचि फरशधर । क्रोधें पेटला अनिवार । बाणें छेदिला रहंवर । भेदिलें तूनीर चापमाळा ॥१२॥

जंव जंव तो सहस्त्रार्जुन । घे रथ तूनीर चाप बाण । तितुकेहि तोडी न लागतां क्षण । चपळ संधान रामाचें ॥१३॥

रथ शस्त्रें तोडिलीं असंख्यात । किती म्हणोनी नाहींच गणित । उभय वीर रथरहित । समरीं तळपत पदगामी ॥१४॥

उभयही करोनि गर्जना । वर्मीं खोंचती वाग्बाण । निकुरें साधोनि संधाना । वर्मस्थाना ताडिती ॥१५॥

एक मेरु एक मांदार । एक त्रिपुर एक शकर । कीं कश्यपू नरहर । ऐसे वीर दोघेही ॥१६॥

मदोन्मत्त दोघे भिडती । कोणी कोणासी नाटोपती । विमानीं देव अवलोकिती । धन्य म्हणती उभयतां ॥१७॥

राम ताडी क्रोधेंकरुन । परी सहस्त्रार्जुना न रुते बाण । फरशें करिता झाला ताडण । तेणें खंडण रोम नोहे ॥१८॥

आश्चर्य मनातें वाटलें । मग राम कैलासी पावले । शस्त्रें शिवातें अर्पिलें । काय बोले वचन त्या ॥१९॥

म्हणे शिवा चंद्रमौळी । तव प्रसादा म्हैसी लागली । युद्धीं धारा फिरोनि गेली । नाहीं रुपली सहस्त्रार्जुना ॥१२०॥

आतां तयाच्या वधासी । काय करावें सांग मसी । उणीव आलें आम्हातुम्हासी । हानी ब्रीदासी होउं पाहे ॥२१॥

ऐकोनि रामाचें उत्तर । तात्काळ उठला तैं शंकर । येवोनी सहस्त्रार्जुनासमोर । प्रकट सत्वर शिव झाला ॥२२॥

पाहोनिया स्मशानवासी । सहस्त्रार्जुन लागे चरणासी । पीनाकपाणी वदे तयासी । कां तुम्हांसी शस्त्र न रुपे ॥२३॥

मग सहस्त्रार्जुनें जोडोनि पाणी । बोले शिवासी प्रार्थोनी । आपण वर्म विचारितां मजलागोनी । करितों चरणीं विदीत ॥२४॥

महाराज स्वामी समर्थ । दत्त दिगंबर अवधूत । अत्रि अनसूयेचा म्हणवी सुत । तो सद्‌गुरुनाथ माझा कीं ॥२५॥

भावें विनटतां त्याचे चरणीं । तेणें तोषविलें मज कृपादानीं । अभेद कवच लेववोनी । आत्मत्व देवोनि मज गेले ॥२६॥

सद्‌गुरु माझा अविनाश । तोचि तूं होसी गा महेश । तुमच्या प्रसादा लावील दोष । हें तों आम्हास दिसेना ॥२७॥

ऐकोनि शिव रामा पाहे । म्हणे हें वर्म सत्यचि आहे । फरशधार केंवी वाहे । काळ राहे उगाची ॥२८॥

अद्‌भुत दत्ताची करणी । कोण उल्लंघू शके त्यालागोनी । तो प्रगटला विश्वोद्धारणी । अलोट देणी तयाची ॥२९॥

युगायुगीं अनंत अवतार । होती जाती न कळे पार । परी अवधूत अविनाश निर्धार । अगम अगोचर मूर्ति हे ॥१३०॥

तेणें पूर्वीं यदु बोधिला । तेवीच हा सहस्त्रार्जुन उपदेशिला । यापुढें न चलती कांहीं कळा । बळें आगळा गुरु वर दे ॥३१॥

तवं भार्गव वदे शिवासी । अवतार संबंध तूं जाणसी । उभय पक्ष आणोनि मानसीं । योजी उपायासी सर्वेशा ॥३२॥

परिसोनि भार्गवाचें उत्तर । सहस्त्रार्जुनासी वदे शंकर । धन्य पावलासी सद्‌गुरुवर । कृपाकर मस्तकीं ॥३३॥

नधनें जालासि सधन । पावलासि दत्तकवच अभेद पूर्ण । भोगिलें संपत्ति वैभव स्वबळें करोन । आयुर्यशधन विपुलतें ॥३४॥

सकळ जगतींचे उपभोग । पराक्रमें भोगोनि केले योग । व्रतेंदानें सांगोपांग । फेडिलासे पांग क्षत्रियांचा ॥३५॥

जाणसी वेदशास्त्रींच्या भेदा । वोळखिसी गर्वपद आपदा । राखिसी सकळांची मर्यादा । अर्भकछंदा नातळसी ॥३६॥

विवेकी ज्ञाता प्रौढ होसी । पाहतां पद पावला अविनाशी । मग सांग कां गुंतावें वासीं । आयुर्मर्यादेशी उल्लंघोनि ॥३७॥

ऐकोनि शिवाची उक्ती । जाणीतल्या अंतरींच्या क्लृप्ती । मग अत्यंत करोनिया शिवस्तुती । करी विनंती आदरें ॥३८॥

अहो जी देवा शूळपणी । जें आपण उपदेशिलें मम श्रवणीं । तो गुह्यार्थ जाणितला मनीं । मजकारणीं अवतार हा ॥३९॥

तुझी आज्ञा नुल्लंघीं कदा । नेम नुल्लंघी मर्यादा । येथोनि पावे विशादा । आपुलिया पदा मज नेई ॥१४०॥

मदर्य अवतार हा व्हावया मान । तव दत्तशस्त्रीं न घडो अवमान । सद्‌गुरुप्रसाद न घडो खंडण । राखिजे समान सर्व भावा ॥४१॥

ऐकोनी बोलाची चातुरी । संतोषता जाला त्रिपुरारी । म्हणे जैसें इच्छिलें त्वां अंतरी । पावसी निर्धारीं भाष्य माझें ॥४२॥

तुज न घडवितो निर्वाण । परी या स्पर्शाला क्षत्रियांचा दुष्ट गुण । तुज आश्रयें माजलें पूर्ण । पापाचरण आचरलें ॥४३॥

विषयलोभें बुद्धिमंद । अति उन्मादें जाले अंध । न विचारोनि शुद्ध अशुद्ध । बळे अपवाद घेतले ॥४४॥

आचरोनि नाना दुष्टचरणें । ग्राह्य केलीं दुर्व्यसनें । श्रेष्ठ पदा लाविली दूषणें । आणि विटंबणें आरंभिली ॥४५॥

उपसर्ग दिधले द्विजांसी । स्पर्धा केली महत्पदासी । त्रास दिधला सुजनांसी । यज्ञयागासी निर्भत्सिले ॥४६॥

अपराध आचरोनी बहुत । केले पापाचे पर्वत । अभक्ष्य भक्षणीं उन्मत्त । भोग भोगित अभोग्य जे ॥४७॥

त्यांचिये बुद्धीं तूं भ्रमलासी । तुजही घडलीं आचरणें तैसी । स्पर्धा करोन सुरां मानवांसी । नष्ट पदांसी त्या केलें ॥४८॥

वेदविरुद्ध कर्म केलें । गाई ब्राह्मणांतें पीडिले । याग यज्ञ तुच्छ मानिलें । बहुत पिडिलें संतद्विजां ॥४९॥

जाला भूमीसी क्षत्रियभार । न साहे इतें हा अणुमात्र । यदर्थी भार्गवाचा अवतार । करील संहार पराक्रमें ॥१५०॥

तुझें पूर्वीचें विशेष सुकृत । इह जन्मीं सद्‌गुरुकृपा प्राप्त । हें जाणोनि मी साक्षात । तुज बोधार्थ प्रगटलों ॥५१॥

बोध करितां बाणला तुजसी । त्वांही प्रार्थोनि मागितलें मजसी । तें पद तूं आतांचि पावसी । स्मरें मानसीं गुरुवर्या ॥५२॥

धन्य सद्‌गुरु दत्तयोगि राणा । त्याचिया करितां नामस्मरणा । तात्काळ पालटोनि देहभावना । शिवीं जीवपणा मुराला ॥५३॥

एवं श्रीदत्त अनुग्रहीं । दो युगांत दोन शिष्य पाहीं । आणि या द्वापारयुगाचे ठायीं । उपदेश नाहीं प्रगटविला ॥५४॥

परि या जगदोद्धाराठीं । दया फारसी दत्तपोटीं । म्हणोनि मातेसि सांगे गुह्यगोष्टी । अध्यात्मवृष्टी करोनिया ॥५५॥

जगतीं हेचि जाणिजे माता । अवधूत द्रवला जनांच्या हिता । बोधरुपें होय अनुग्रहिता । धन्य तारकता समर्थाची ॥५६॥

करावें मुमुक्षूंचें कल्याण । यदर्थींच अनसूयेचे असती प्रश्न । करी दत्त तयांचें निरसन । तेवींच ज्ञान आध्यात्मिक ॥५७॥

मागिले अध्यायाचे अंतीं । प्रश्न अनसूयेचे असती । ते ऐकिले परम प्रीतीं । तुम्ही श्रोतीं आदरें ॥५८॥

तया प्रश्नांचें उत्तर । बोलतसे पहा दिगंबर । श्रोते श्रवणीं होवोनि सादर । परिसा नागर पिंडरचना ॥५९॥

नाना शास्त्रींचें संमत । निवडोनि सांगतसे अवधूत । तो महाराज सदय समर्थ । कळावया अर्थ निवेदी ॥१६०॥

पिंडज्ञानावांचोनी । वेदांत बोलती कहाणी । आत्मानुभवाची लेणीं । तयां कोठोनी प्राप्त होती ॥६१॥

आपुलें आपणां न कळे कांहीं । श्रवणीक ज्ञान कथीं पाहीं । अनुभवावांचोनि लाभ नाहीं । जन्मोनि देहीं मूढ तो ॥६२॥

आत्मानुभव गांठीं धन । तो पुरुष गा सभाग्य पूर्ण । तोचि परतीरा पावे जाण । नेईल आन स्वसंगे ॥६३॥

तो पुरुष गा असे विरळा । त्याची न कळे कोण्हासी कळा । तो जगीं वावरोनि निराळा । खेळे खेळां अंतरंगीं ॥६४॥

स्फटिकापरी तो असे । रंगीं रंगातुल्य दिसे । कुरळीं ठेवितां भांग भासे । पाहतां नसे कांहीं तो ॥६५॥

म्हणोनीया जगासी । कदापि तो नये वोळखीसी । वर्म कळे वर्म ज्ञानियासी । येर इतरांसी काय कळे ॥६६॥

जग हें मायावेष्टित जाण । तिमिर अंधत्वें दाटलें दारुण । मोह लोभें गेलें भुलोन । ज्ञान कोठोन कैंचे या ॥६७॥

अज्ञानयोगें सर्व बुडती । म्हणोनि दया उपजली दत्तचित्तीं । जगद्‌गुरु हा कृपामूर्ती । रची युक्ती तरावया ॥६८॥

माता निमित्तासि योजून । जगोपकारार्थ निरोपी ज्ञान । प्रबोध अनुग्रह सर्वांलागोन । करीं आपण स्वयें दत्त ॥६९।

तो गुह्यार्थ प्राकृतीं । लिहितों श्रवण कीजे श्रोत्रीं । साठविजे एकाग्र चित्तीं । बुडी अर्थीं देवोनिया ॥१७०॥

तंव श्रोते म्हणे वक्तिया । क्षुधित श्रवण ऐकावया । कैसे संवाद होती उभया । ते विवरोनिया सांग आतां ॥७१॥

दत्तप्रबोधीं अद्‌भुतगोडी । ते ऐकावयाची आम्हां आवडी । तुझिया निरोपणें जोडेल जोडी । वासना कुडी खंडेल ॥७२॥

वक्ता विनवी कर जोडोन । श्रोतीं श्रवण कीजे सावधान । दत्त प्रार्थी मातेलागून । पिंडप्रकरन परियेसी ॥७३॥

शिव सांगे भवानीसी । ते कथा माते निवेदितों तुजसी । एकाग्र चित्त देइजे कथेसी । नाणीं मानसी अन्य वार्ता ॥७४॥

स्त्रीपुरुष हे उभयतां । स्वच्छंदें उल्हासें रमतां । रमणीसीं रममाण होतां । प्रेमचित्ता उद्भवे ॥७५॥

ब्रह्मस्थानींचा सिंधू । तो उचंबळतां पडे बिंदू । उत्तरें मणिपुरमार्गें न करोनि शब्दू । रवरव गद्गदू वदवेना ॥७६॥

उभय प्रेम ऐक्यवेळां । नळनीय बिंदू वोतिला । तो कमळगर्भीं प्रवेशला । त्रिगुणी जाला मेळ तेथें ॥७७॥

रक्तबिंदु तिसरा पवन । हे एकत्व जाले असती त्रिगुण । एक ठायीं गेले मुसावोन । वाढे तो गुण वेगळाची ॥७८॥

अमृताचा वर्षें तुषार । तो सत्रावींचा जाण प्रकार । त्यायोगें वृद्धि साचार । फुटती अंकुर भागात्मकें ॥७९॥

या स्वाधिष्ठानावरुती । आणि मणिपुराखालती । उभयांचे मध्यवर्ती । पिंड निश्चिती वाढूं लागे ॥१८०॥

प्रथम मासीं शुद्ध गोळा । तया अंगी वाढती कळा । द्वितीय मासीचा सोहळा । शिरकमळा प्रगटवी ॥८१॥

तिसरे मासीं चंद्रसूर्याचीं। बैसतीं ठाणें तयांचीं । देखती दृष्टी अंतरींची । आकृती कमळाची पसरली ॥८२॥

चौथे मासीं शाखा चार । तया नामें चरण कर । पल्लव फुटले अपार । जाला विस्तार अस्थि शिरा ॥८३॥

पांचवे मासाभीतरीं । पंचभूत आत्म निर्धारीं । पंचतत्त्वाची व्याप्ती बरी । सर्वांतरीं व्यापिली ते ॥८४॥

प्रेमतत्त्व तैं संचारलें । हंसत्वें माझारीं बिंबलें । साकार रुपें विस्तारलें । साक्षित्वें वसलें ते ठायीं ॥८५॥

षट्‌कमळें मासीं साहाविया । आणि फुटल्या अंगोळिया । मुखघ्राण आकृतिया । ठायठायां निपजती ॥८६॥

सप्तधातु सातवे मासीं । नखें केश उद्भवले देहासी । पिंड येतसे आकारासी । डोहोळे मातेसी जाणवती ॥८७॥

आठवे मासीं अष्टांग । सबळ जालीं सांगोपांग । तयामाजी न दिसे व्यंग । करी ढंग मग हाले चळे ॥८८॥

आठव्यांत जाली सिद्धता । जीवशिवा नेमिली स्थानता । तें सांगतों ऐकिजे आतां । सावध श्रोता लक्ष दीजे ॥८९॥

शंखिनीनाळें जीव संचरे । शिव विरुढे सुषुण्माद्वारें । बंकनाळें रस भरे । जीव पुरस्कारें ते सेवी ॥१९०॥

जीवा भोगणें गर्भवास । तेथें जपे सोहंमंत्रास । उबगोनि तेथें पावला त्रास । करुणा शिवास उदेली ॥९१॥

मास मानवतांचि नवम । बळावले तेव्हांअ इंद्रियग्राम । चलन करी व्हावया निर्गम । साधी क्रम प्रयाणीं ॥९२॥

ते व्यथा मायेसी जाणवली । कळाव्याप्ति उदरीं जाली । प्राणांत वेळ सोसिली । द्वारें फांकली आपोआप ॥९३॥

तैं प्रसूतीचा उद्भवला वात । कमळांतुनी गर्भ सुटत । माय अंगांतुनी रीग करीत । जननी आक्रंदत तेधवां ॥९४॥

उदरा बाहेरी तो आला । बाह्य वायो त्या स्पर्शला । मुख्य जपतपातें विसरला । टाहो फोडीला कोहं कोहं ॥९५॥

आपआपणातें विसरोन । कोहं टाहो फोडितां जाण । तव तो क्षुधानळ पेटला दारुण । माया आवरण वरी घाली ॥९६॥

असो आधीं रचिला पिंद । मग हें रचिलें ब्रह्मांड । नववें मासीं नवखंड । रचली प्रचंड धरा हें ॥९७॥

हें औट मात्रीं युक्त । येथेंचि औट लोकसमस्त । औट करायाची गणित । वोळखोनि निभ्रांत घेइजे ॥९८॥

माया हीच पंचभूतें । ती व्याली पंचभूतातें । माजीं मिळविलें पांचातें । वरी मुख्यातें ते स्थानें ॥९९॥

तें म्यां तूंतें मागें निवेदिलें । छत्तीसही विभक्त दाविले । दश प्राण योजुनी भले । श्रुत केलें कार्य आहारा ॥२००॥

रुचि शस्त्र वर्णद्वार । प्रचीतीस दाविलें सर्वांचें घर । इंद्रियाचें नेमुनी प्रकार । तोही विचार श्रुत केला ॥१॥

येथें किमपि द्वैत नाहीं । पिंडी ब्रह्मांड एकचि पाही । विवेकें शोधितां देहीं । सर्व ठायीं पडेल ॥२॥

शोध करुं जातां बळें । हातीं न चढे कदा काळें । गुरुकृपेवांचोनि आंधळे । पायावीण पांगुळे बोलती ॥३॥

लाधतां गुरुकृपेचा पाया । सहजची अज्ञान जाय विलया । ज्ञानगोपुरीं वेंधावया । उशीर कासया पाहिजे ॥४॥

यालागीं सद्‌गुरुनाथा । शरण जावें आपुल्या हिता । गुह्य गुप्त दावोनि पंथा । देतील स्वात्मता स्वकृपें ॥५॥

कृपाघन जगद्‌गुरु उदार । दत्त योगी हा दिगंबर । प्रबोधें करी जगदोद्धार । प्रश्नोत्तर वाढवोनी ॥६॥

पुढिले प्रसंगीं अनसूया । प्रश्न करील दत्तात्रेया । उत्तरें तोषवील तो माया । होईल श्रोतिया आनंद ॥७॥

अवधूत आनंदाची राशी । सप्त सागरींचा निवासी । दत्तवरद इच्छा मानसीं । तेणें संतांसी भजावें ॥८॥

संत महंत हे उदार । धीर सधन परम गंभीर । यांचें धरोनि राहिजे द्वार । म्हणवोनि किंकर निशिदिनीं ॥९॥

जे निर्धार धरोनि राहिले । तयां संती आपंगिलें । दत्तदिगंबरा भेटविलें । वोसंगा घातलें विनयेंसी ॥२१०॥

हे ऐकोनिया वार्ता । प्रेम दाटलें अनंतसुता । जीवभावें शरण संता । अर्पिला माथा पदकमळीं ॥११॥

इति श्रीदत्तप्रबोध ग्रंथ । यासी नारदपुराणींचें संमत । परिसोत भाविक संतमहंत । त्रयोविंशोध्यायार्थ गोड हा ॥२१२॥

॥ इति त्रयोविंशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP