श्रीगणेशाय नमः । श्रीसद्गुरुदत्तात्रेयाय नमः ॥
जय सद्गुरुस्वामी अनंता । अनाथनाथा तूं समर्था । कृपें सांभाळी शरणागता । दीनमाता तूं होसी ॥१॥
तूं शरणागताचें माहेरु । दीनदुर्बळांचा दातारु । सर्वस्वीं आम्हां तुझाचि आधारु । हा भवपारु कर्ता तूं ॥२॥
तूं सद्गुरुमाउली दयाळ । तुझे आम्ही लाडके लडिवाळ । आमुचे अंतरींची आळ । तूंचि सकळ पुरविता ॥३॥
तव कृपा होतांचि पाहीं । ज्ञान प्रगटे दिव्य देहीं । न होतां कृपा न घडे कांहीं । ऐसी नवलाई कृपेची ॥४॥
सद्गुरु तुझें अभय होतां । कोठोनि देहीं बाधे चिंता । दुःख दारिद्रय व्यथा । क्षण न लागतां निवटेल ॥५॥
म्हणोनि तुझिया चरणीं । शरण झालों मोक्षदानी । सर्व अपराध क्षमा करोनी । कृपा करोनि अंगीकारी ॥६॥
सद्गुरु अनंता कृपाराशी । मम अंतरींचे हेतू जाणसी । ते पुरवावया समर्थ होसी । अपंगी दीनासी स्वामिया ॥७॥
तुझिया कृपाबळें करुन । चालिलें या ग्रंथीं निरोपण । कर्ता करविता तूंचि पूर्ण । निमित्तासि दीन किंकर हा ॥८॥
सद्गुरु तूंचि या ग्रंथींचा वक्ता । तूंचि स्वामिया होसी श्रोता । ग्रंथीं अक्षरें लिहविता । कथानुसंगविता तुझा तूं ॥९॥
शुद्ध अशुद्ध आणि प्रसिद्ध । तूंचि जाणता भेदाभेद । रस उद्भवोनि आनंद । कर्ता स्वतः सिद्ध तुझा तूं ॥१०॥
मागां तुझें त्वांचि निरोपिलें । तेवींच पुढें चालवी रसागळें । श्रोती श्रवणीं क्षुधित बैसलें । तयां तोषविलें पाहिजे ॥११॥
हे सद्गुरु अविनाश दत्ता । श्रवणीं वाट पाहे अनसूयामाता । तिचे प्रश्न आदरोनि आतां । पुरवी मनोरथा स्वामिया ॥१२॥
केले प्रश्न गताध्यायीं । कीं चंद्रसूर्यकळा सांगे लवलाहीं । सत्रावी कोणती निरोपी तेही । उत्साह देहीं श्रवणार्थीं ॥१३॥
यदर्थी श्रोते सावधान । प्रश्नोत्तरें कीजे श्रवण । सकृपें अवधूत दयाघन । करिती निरोपण साक्षेपें ॥१४॥
अविनाश प्रार्थी मातेसी । प्रश्नोत्तरें निरोपितों तुजसी । तें तूं सांठवी निजमानसीं । नाणीं देहासी आळस श्रवणीं ॥१५॥
माते चंद्रसूर्य कोठें राहती । या देही तयांची सांगतों वस्ती । ते तूं परिसोन ओळखी चित्तीं । स्थानें त्यांप्रती पृथकची ॥१६॥
त्या चंद्राचें तालुकास्थान । जेणें शोभविलें तें गगन । सोळा कळा परिपूर्ण । प्रभायमान शीतळ तो ॥१७॥
आतां त्या कळा परियेसी । पृथक नामें सांगतों तुजसी । शंखिनी पद्मिनी लक्ष्मिणीसी । एवं तिघांचीं नामें हे ॥१८॥
कामिनी पुंखिणी शापिनी । विद्या मोहिनी प्रमोदिनी । मंथुवी आणि विकाशिनी । अमृता अमृतश्रवणी तेरावी ॥१९॥
निजन विज्ञान दृष्टी पाहावी । एवं सोळांची संख्या जाणावी । अनुभवियें ओळखावी । केवीं लक्षावी अज्ञानमूढें ॥२०॥
सोळा कळांसहित शशी । अधोमुखें धांवे पूवसी । हें वर्म ओळखी जो निश्चयेंसी । तोचि ज्योतिषी ज्ञानी पुरा ॥२१॥
आतां या भानूचें निरोपण । यथाक्रमें सांगतों निवडोन । तें माते करी श्रवण । कळा संपूर्ण निवेदितों ॥२२॥
बाराही कळांसमवेत । नाभोमुळीं सूर्य तपत । तेथें असतें निभ्रांत । तेज लखलखीत तयांचे ॥२३॥
त्या बारा कळांची नामें । तुज मी सांगतों अनुक्रमें । तें तूं सांठवी संभ्रमें । स्वानंदप्रेमें करोनिया ॥२४॥
ज्वालिनी करुणी दहनी । दीपिनी ज्योतिनी तेजिनी । विद्या आठवी मोहिनी । ज्वाळा जेतिनी दहावी ॥२५॥
प्रकाशिनी दीपकळिका । ह्या बारा कळी सूर्य देखा । पश्चिमे चाले चालणीं निका । अतिसुरेखा सोज्वळ ॥२६॥
कळांसहित सूर्यभानू । यांचें करोनि सांगितलें प्रमाणू । यांतें ओळखावयाचें कारणू । मुख्य पवनू पाहे नाकीं ॥२७॥
नासिकींचे दोन्ही दळ । तेथें पवन वाहे हा सरळ । यामाजीं राविशशीचा खेळ । होय निश्चळ वामसव्य ॥२८॥
डावे अंगीं चंद्र जाण । उजवे अंगीं उगवे भान । चंद्र म्हणजे तो मन । सूर्यं पवन होय हा ॥२९॥
अडीच घटिका यांची चाल । एक एकाच नेम निश्चळ । न वाढे कोणीही एक पळ । उणेही विपळ न होती ॥३०॥
दोन्ही स्वर वाहती समान । तया म्हणिजे संक्रमण । सर्व कार्यासी होय शून्य । आणी वैगुण्य निश्चयें ॥३१॥
या चंद्रसूर्याचे प्रवाहीं । तत्त्वें असती पांचही । कैसे म्हणसील तरी तेंही । सांगतों लवलाही परियेसी ॥३२॥
न लगतां कवणे स्थानीं । मध्यें वाहे ते जाणा धरणी । अधोमुख जयाची वाहणी । आप जाणोनी घेईजे ॥३३॥
ऊर्ध्वा वाहे जे सतेज । त्या नांव ओळखिजे तेज । जो धरोनि वाहे भुज । वातराज होय तो ॥३४॥
हेचि ओळखी आकाशाची । व्यापकता सर्व ठायाची । अर्ध ऊर्ध्व वाम सव्याची । पूर्व पश्चिमेची दिशायुक्त ॥३५॥
शुक्ल पक्ष तो चंद्राचा । कृष्ण पक्ष तो सूर्याचा । प्रतिपदेंपासोनि तृतीयेचा । भोग एकाचा जाणिजे ॥३६॥
एकाआड एक येती । दिवस तीन तीन भोगिती । एवं मास पाक्षिक तिथी । उभयांप्रती योजिल्या ॥३७॥
तेवींच उभयातें वासर । तुज सांगतों ऐक विचार । रवि शनि भौमवार । हा तो प्रकार भानूचा ॥३८॥
सौम्य सोम आणि भृगु । हा नेमिला असे चंद्रभागू । संक्रमणीं गुरुसंयोगू । नक्षत्रविभागू ऐसाची ॥३९॥
चंद्र विभाग नक्षत्र । अश्विनीपासोनि सलग चार । आर्द्रेपासोनि तत्वपर । नव निर्धार हे झाली ॥४०॥
पूर्वषाढापासोनि तीन । रेवती अनुराधा निवडून । हे चंद्रनक्षत्रें चौदा जाण । रविसी कोण तें ऐके ॥४१॥
पूर्वापासून सलग सहा । धनिष्टा चार मिळोनि दहा । मृग ज्येष्टा मूळ पहा । तेरा मुदा वहा रवीचीं ॥४२॥
संक्रमणीं असे अभिजित । हा सर्वामाजी व्यापक सत्य । सांपडावया युक्त बहुत । करोनि थकित पैं होती ॥४३॥
असो आतां हें बहु वर्णन । ग्रंथीं घेतलें कार्याकारण । तें सांगतोकिंचित निवडोन । साधेल साधन तरीं साधा ॥४४॥
चंद्रसूर्य माझारीं । तत्वओळखी साधिजे बरी । मग कार्यअकार्याची उतरी । किंचित परी निवेदितों ॥४५॥
चंद्रसूर्य सुफळ असती । परि त्यांची जाणिजे अंतरगती । तत्वा ऐसे प्रकार घडती । तेही निश्चिती ऐकिजे ॥४६॥
पृथ्वीं धीर कार्य कीजे । सुलग्न आपतत्त्वीं साधिजे । तेजीं शीघ्र इच्छिलें होइजे । वायुनें रोखिजे समत्व ॥४७॥
आकाश करितसे निष्फळ । संक्रमण नाशक प्रबळ । जाणती हें ज्योतिष्य सकळ । गुरु कृपाळ भेटतां ॥४८॥
इडा चंद्र तो वामांगीं । पिंगळा सूर्य तो दक्षिणभागीं । संक्रमण सुषुम्णा संयोगीं । मध्यरंगीं रंगली ते ॥४९॥
इडा तेचि भागीरथी । पिंगळा ते यमुना निश्चिती । सुषुम्णा मध्यें सरस्वती । पाहा हे वाहती वरोनी ॥५०॥
हें इतुकें तुज केलें श्रवण । आतां सत्रावीचें ऐक निरोपण । तया नांव निरंजन । दैदीप्यमान जिव्हा ते ॥५१॥
तया शक्तिबळें पाहे । देहीं प्राण सुखी या राहे । औट हितातें पुष्टी होये । तिचेनि सोये इंद्रिया ॥५२॥
ती सतरावी जीवनकळा । तियेपासोनि अमृतगरळा । वाहतसे घुळघुळा । वृद्धि सकळां तिचेनी ॥५३॥
अक्षय ओलावा जिव्हेसी । त्यांत मिष्टता उद्भवें अमृतरसीं । हें कां न कळे या रुचीसी । शोधुनी मानसीं पहा बरें ॥५४॥
ते या पंचप्राणातें वाढवी । हे बाह्यदृष्टीं ओळखावी । ज्ञानदृष्टीं पहावी । जीवीं ओळखावी सोळांत ॥५५॥
जियेचेनि बळाश्रयें । पंचभूतांचा विस्तार होये । आनंद तिन्ही ताळीं न समाये । डोलत राहे सुखी एकी ॥५६॥
ते अमृतसंजीवनी । होय सतरावी जननी । योगियांचे ध्यानीं मनीं । दिवारजनीं वसतसे ॥५७॥
सद्गुरुप्रसादें ध्यान हातवटी । पावतां होय ऊर्ध्वदिठी । ते समावेल जैं पोटीं । तै ती भेटी अभ्यासें ॥५८॥
सत्रावीचें दर्शन । होता नुरेची अज्ञान । जया सत्रावीचें पान । तो पुरुष धन्य ये लोकीं ॥५९॥
सत्रावीतें जो पावला । सर्व सिद्धी वोळंगती त्याला । त्यांतें लोटोनि सरसावला । अविनाश पावला पद तोची ॥६०॥
जैं समर्थ सद्गुरु भेटेल । तैंच हा मार्ग दावील । अभ्यासबळें रिघवील । प्राप्त करवील गुज हें तो ॥६१॥
येथें दाविलें असोनि नाहीं । ज्ञानिकावांचोनि कळे कायी । जो हातवटी वळखोनि घेई । तोचि ठायीं ठसावे ॥६२॥
हें सिद्धयोगियांचें ज्ञान । संत साधूची वर्मखूण । या सत्रावे कामधेनूचें लक्षण । न कळे यावीण आणिकां ॥६३॥
पाहिलें जरी नाना मत । ग्रंथ अवलोकोंनि झाला पंडित । कथिता झाला जरी वेदांत । अभ्यासरहित वृथा सर्व ॥६४॥
नाना पदार्थिक नांवें घेतलें । बहु मिष्ट म्हणोनि वाचें वर्णिलें । तेणें क्षुधार्थी तृप्त झाले । ऐसें वागले काय तुम्हां ॥६५॥
जेवीं वांझेचा डोहोळा । गर्भावांचोनि फोल जाला । तेवीं अनुभवावांचोनि ज्ञानाला । काय त्याला करावें ॥६६॥
अनुभवी अभ्यास नाहीं । त्याचें कोरडे ज्ञान ऐकोनि काई । उभय नारी रमतां पाही । फळ न देहीं संभवे ॥६७॥
यदर्थ समर्थ गुरु करावा । अभ्यास बरवा साधावा । उगवा करोन सर्व घ्यावा । प्रसाद पावावा कृपेचा ॥६८॥
तंव अनसूया म्हणे रे बाळा । तुझिया निरोपणीं अद्भुत लीला । ऐकता उद्भवे आनंद सोहळा । ब्रह्मांडगोळा उजेडवी ॥६९॥
जंव जंव करावें श्रवण । तंव तंव आठवती मज प्रश्न । देहीं सप्तद्वीप सागर पूर्ण । अद्री ते कोण कवणे ठायीं ॥७०॥
आणी नव खंडे कोठें वसती । कवणिये नामें विराजती । हें पृथक सांगे मजप्रती । इच्छा श्रवणार्थी उदेली ॥७१॥
तुझें निरोपण बहु गोड । मज श्रवणीं विशेष आवड । तें पुरवी माझे कोड । साधवी जोड परमार्थाची ॥७२॥
परिसोनि मातेचे शब्द । अवधूतासी जाला परमानंद । धन्य म्हणे तुझी मती शुद्ध । बरवें साधन श्रवण तुझें ॥७३॥
प्रथम सांगतो तुज द्वीपावळी । ते तूं सांठवी हृदयकमळीं । नामें निवेदितों निराळीं । स्थानादि वेगळीं करोनिया ॥७४॥
जंबुद्वीप शंखद्वीप । कुशद्वीप क्रौंचद्वीप । श्वेतद्वीप पुष्करद्वीप । शाल्वद्वीप सातवें ॥७५॥
कोण कोणे ठायी वसती । तें परियेसीं तूं निगुतीं । अस्थिठायी जंबूची वस्ती । मेदीं निश्चिती शंखद्वीप ॥७६॥
मांसी कुशद्वीप जाणिजे । शिरीं क्रौंचद्वीप वोळखिजे । त्वचें शाल्वद्वीप वोलिजे । रोमीं निरस्विजे श्र्वेतद्वीप ॥७७॥
पुष्करद्वीप तें नाभीसी । एवं सप्तद्वीपें जाणिजे ऐसीं । आतां निवेदितों सागरासी । स्थान नामेंसीं युक्त तुज ॥७८॥
नीर क्षीर दधी पक्ष । सागर रत्नाकर मधु प्रत्यक्ष । हे सप्त सागर सरिताध्यक्ष । स्थानीं लक्ष देई आता ॥७९॥
नेत्रीं नीर समुद्र वाहे । क्षीरसागर सतरावीसीं राहे । दधीसमुद्र नासिर्की पाहे । क्षार तो आहे तळवटीं ॥८०॥
नाभीं वसे रत्नाकर । मधुसमुद्राचे स्थान शीर घृतसमुद्र हृदयांतर । वसती सागर स्थाननेमें ॥८१॥
आतां गिरीचें प्रमाण । स्थानासहित करितों निरोपण । पूर्वे उदयेगिरी जाण । अस्ताचळ स्थान पश्चिमे ॥८२॥
उत्तरे गिरी असे कनक । दक्षिणे शेषगिरी देख । नैऋत्ये नारायणगिरी वोळख । वसे औषधिक वायवे ॥८३॥
इशान्यकोनीं महिगीरी वसे । अग्निकोणी सिंहाद्री असे । एवं अष्टगिरी विलसे । अष्ट दिसे पाहे पां ॥८४॥
अष्ट गिरीहुनी मेरु आगळा । हा याहोनी असे निराळा । जैशा कमळीच्या अष्ट कळा । तैसे भूगोळा शोभविती ॥८५॥
सर्व गिरीमाजीं श्रेष्ठ । मेरु सर्व गुणें वरिष्ठ । हें भूमीचें मध्यपीठ । दिसे गोमठ कनकाचें ॥८६॥
सर्व लोकांची रचणुका । त्यावरी असे देखा । तयाचा न पवे कोण्ही तुका । वास देवादिकां ते ठायीं ॥८७॥
आतां नवखंडींचे भाग । ते मी निवेदितों सांग । सोडोनिया अनेक उद्योग । श्रवणीं लाग करि माये ॥८८॥
भरतखंड व्रतखंड । रमेशखंड द्राक्षखंड । द्राक्षमाळखंड केतुखंड । विधिवंशखंड सातवें ॥८९॥
हरिखंड तें आठवें । नवम सुवर्णखंड जाणावें । हे खंडांचीं वोळखिजे नांवें । नव इंद्रियें बरवें नवखंड ॥९०॥
दहावें खंड ते कासी । दशमद्वार निश्चयेंसी । विश्वनाथदेव तया स्थळासी । आनंदवासी आनंदवनी ॥९१॥
पूर्वदिशेसी भरतखंड आहे । अग्निकोणीं व्रतखंड पाहे । दक्षिणे रम्यखंड होये । द्रामळाखंड राहे नैऋतीं ॥९२॥
पश्चिमे केतुखंड वसे । वायव्ये हरिखंड असे । उत्तरे द्राक्षमाळाखंड विलसे । रामेश्वर वसतसे ईशानें ॥९३॥
सुवर्णखंड मध्यस्थानीं । ते हे मेरुची मांडणी । दहावें खंड दशम स्थानीं । योगियां ध्यानीं सदा वसे ॥९४॥
मातें त्वां प्रश्न केले चार । ते तुज म्यां सांगितलें निर्धार । आतां खाणींचा विचार । तोहि सुंदर निवेदितों ॥९५॥
जारज आणी स्वेदज । अंडज आणी उद्भिज । यांची कोठोनि देहीं उपज । बोलतों सहज निरोपणीं ॥९६॥
स्वेदीं असे स्वेदजखाणी । अंडज होती अस्थिस्थानीं । मज्जा जारज निवडोनी । रोमस्थानीं उद्भिज ॥९७॥
तवं अनसूया म्हणे कुमारा । तूं हेतु पुरविसी माझा खरा । उरलें निरोपण स्मरण करा । कथा विस्तारा मेरुची ॥९८॥
मातेची देखोनि सावधता । पुनरा दत्त जाला निरोपिता । तरी सावधान होवोनि श्रोता । संवादीं अवधानता देईजे ॥९९॥
दत्त म्हणे सकळ गिरींत । विशाळ असे मेरुपर्वत । तो पीत सुवर्ण लखलखीत । विस्तार अद्भुत जयाचा ॥१००॥
उंची योजनें खर्व तीन । ऐसें शास्त्राचें प्रमाण । रुंदीची संख्या नेमून । चार लक्ष करुन ठेविली ॥१॥
सोळा सहस्त्र भूमिगर्भात । टेकणें लागले तीन पर्वत । कमलपुष्पाऐसा विकासित । शिखरें शोभत तीन वरी ॥२॥
बाहात्तर द्वारें तया शोभती । टाकें नव विराजती । नवग्रह तेथें वसती । रक्षण करिती सर्वदा ॥३॥
ऐसा हा जाणिजे मेरु । सर्वांमाजीं श्रेष्ठ गंभीरु । भ्रामदेवीचा अंकुरुं पंच प्रकारु मंडित ॥४॥
मेरु दक्षिणभागीं निर्धार । असे जें अमरावतीनगर । नव सहस्त्र योजनें विस्तार । तेंथें अमरेंद्र देवांसह ॥५॥
वरी तीन शिखरें असती । त्यांची परिसिजे विभक्ती । पूर्वभागीं विधी बसतीं । लोक म्हणती सत्य तया ॥६॥
तेरा सहस्त्र योजनें विस्तीर्ण । तेथें राहती ब्रह्मगण । करितसे उत्पत्तिकारण । ललना तीन शोभती ॥७॥
आतां पश्चिम शिखराचे ठायीं । वैकुंठ वसतसे पाहीं । अद्भुत तेथील नवलाई । भक्तसमूहीं नांदे विष्णू ॥८॥
तया रुंदीची गणित । सात सहस्त्र योजनें नेमस्त । रजाकरी रमायुक्त । शरणागत देव सारे ॥९॥
आतां उत्तरेचें शुभ्र शिखर । त्या कैलासीं नांदे शंकर । अर्धांगी अपर्णा सुंदर । एकोणीस सहस्त्र विस्तीर्ण र्तें ॥११०॥
रुद्रगण तेथें वसती । अनन्यें शिवातें भजती । सुरवर दर्शना येती । कैलासपती पाहावया ॥११॥
एकवीस स्वर्ग सप्त पाताळ । यांतची आलें भूमंडळ । हें देहींच वोळखिजे सकळ । निरोपितों निवळ परिसीजे ॥१२॥
अतळ वितळ सुतळ । तळ तळातळ रसातळ । सातवें जाणिजे पाताळ । कंठापासोनि सरळ जाणिजे ॥१३॥
आतां यांची वोळखी । तुम्हां निवेदितों निकी । राहती कोण कोणत्यां लोकीं । हेंही आवश्य कीं ऐकिजे ॥१४॥
पायातळींतें अतळ । त्याउपरी उर्ध्व वितळ । घोटे जाणिजे सुतळ । पोटरी महातळ वोळखा ॥१५॥
सांधे तळातळ जाणिजे । मांडया रसातळ वोळखिजें । कंठीं तळपाताळ म्हणविजे । एवं विलोकिजे सात हे ॥१६॥
पहिलें पाताळ सुंदर । तेथें पुष्पावतीनगर । रक्तगुंज असे नृपवर । परम सुखकर राज्य करी ॥१७॥
दुसरिया पाताळीं जाण । शैल्यपुरनगर विस्तीर्ण । तेथें गंधनामा नृपनिधान । राज्यकारण चालवी ॥१८॥
तिसरिया पाताळाआंत । नरुकुमळजा विख्यात । श्रीघरपट्टण शोभत । दिव्य विराजत तें ठांयीं ॥१९॥
चौथिया पाताळाभीतरीं । चातकपुर नाम नगरी । मलुध्वनराजा राज्य करी । सहपरिवारीं आनंदें ॥१२०॥
पांचवे पाताळीं विलसे । रुद्रावतीनगर असे । ईशान्यराजा नागु वसे । सुखसंतोषें राज्य करी ॥२१॥
साहाविया पाताळभुवनीं कंजवायुनगरी तये स्थानीं । तेथें चक्रनाग राज्यांसनीं । अति सन्मानीं नांदत ॥२२॥
सातवें जें का पाताळ । तेथें उग्रावतीनगर विशाळ । शत्रुत्वती असे नृपाळ । परम सबळ राव तो ॥२३॥
एवं पाताळें हीं सात । निवेदिलीं असतीं भूपासहित । हे जाणिजे या देहांत । विवेकयुक्त ज्ञानदृष्टीं ॥२४॥
उरले एकवीस जे का स्वर्ग । ते मणी एकवीस सुभंग । तो योगिजनांचा होय मार्ग । तेचि लाग साधिती ॥२५॥
येरा पामरा न घे गती । गुरुकृपें मुकुक्षू पावती । यालागीं सेवन साधिजे प्रीतीं । लीनवृत्ति करोनिया ॥२६॥
हे ज्ञान गुह्यात्मक असे । गुरुकृपें होतील लाभ सरसे । हे बोलणें नोहे अन्या ऐसे । अनुभव दिसें अभ्यासिया ॥२७॥
प्राण अपाना होय भेटी । तो भरे कुंडलिनी पोटीं । परेपासुनी खाय उठी । जाय भेटी मणिमागें ॥२८॥
व्यानमार्गे त्वरें जाइजे । प्राण आवरते तें साहिजे । सोळापासोन उड्डाण साधिजे । मग पाविजे रंध्रद्धारीं ॥२९॥
असो तेथील परिजाण । साहणें असे परम कठिण । कुंडलिनी जातसे भडकोन । वाद्यें दारुण वाजती ॥१३०॥
तेथें सर्व भावें होय घाबरा । पळों पाहे सैरावैरा । धारिष्टें साधिजे वायो आवरा । फुटों बाहेरा न दीजे ॥३१॥
हें गुरुकृपें साधन । जैं परिपक्व होय पूर्ण । तैं पूर्वद्वारीं घडे गमन । स्वरुपीं संधान लाधला ॥३२॥
असो हें बोलिलों उघड । परी तें करणें असे अवघड । गुरुकृपेवीण नुघडे कवाड । न जोडे जोड फुकट हे ॥३३॥
सहस्त्रामाजीं विरळा । जाणे आत्मगुह्याच्या कळा । तो पुरुष होय दैवागळा । त्या चरणकमळा वंदिजे ॥३४॥
मागुतीं अनसूया म्हणे दत्ता । तुवां अद्भुत निवेदिली हे गुह्य वार्ता । सद्गुरुची दावील या पंथा । त्यावीण सर्वथा सापडेना ॥३५॥
तूं जग तारावयासी । प्रगट जालासि गा अविनाशी । जे जे मार्ग तूं बोधिसी । ते ते हितासी मज होय ॥३६॥
परी आणिक एक आठवलें । तेंही पुंसू तुज वागलें । तें ऐकोनि उगवी भलें । निरोपण चांगलें करोनिया ॥३७॥
सांगे त्रिगुणाचें वर्णन । देहीं स्थळें सांग नेमून । हें निवडोनिया प्रमाण । बाणवीं पूर्ण अंगीं मज ॥३८॥
दुसरा प्रश्न अवधारीं । पदपिंड निवडोनि सत्वरीं । कोण रुप तें विस्तारी । रुपातीत परी कैसी तें ॥३९॥
सखोल प्रश्न मातेचे । ऐकोनि उल्हासलें चित्त दत्ताचें । म्हणे धन्य माते श्रवण तुमचें । धन्य बुद्धीचे तर्क तुझ्या ॥१४०॥
ऐसी हे विचारणा । नुपजे कवणाचिया मना । ते अतर्क्य रचिसी तूं प्रश्ना । पुससी खुणा जीवींचिया ॥४१॥
हे अत्यंत प्रश्न नागर । ऐकतां सुखावे मम अंतर । निरोपणीं उद्भवे उल्हास थोर । सेवेसि तत्पर अनुसरतों ॥४२॥
हें एकाग्रतेचें निरोपण । सर्व त्यजोनि व्यवधान । सावध कीजे माते श्रवण । आदरें निवेदन करितों तुज ॥४३॥
रजोगुण तमोगुण सत्त्वगुण । हे मागां केले तुज निरोपण । आतां यांचें कोन वर्णन । तेंही निवडून सांगतों ॥४४॥
सत्त्व हा गौर जाणिजे । रजते पीत ओळखिजे । निबिड काळें देखिजे । तम म्हणजे त्या नांव ॥४५॥
प्रभाते सत्त्व सात्त्विक । माध्यान्हीं तामस वोळख । अस्तीं राजस चोख । तिन्ही प्रकाशक स्वतेजें ॥४६॥
या त्रिगुणांपासोनि । असे या देहाची उभारणी । परी राहती कवणियें स्थानीं । तेंही श्रवणीं सांठवीं ॥४७॥
रजोगुण तो स्वाधिष्ठानीं वसे । सत्वगुण नामीस्थानीं विलसे । तमोगुण अनुहातीं असे । त्रिगुण दिसे पिंड हा ॥४८॥
अनसूया म्हणे हे त्रिगुण । यांचें निवेदिलें लक्षण । परी एक आठवलें मजलागून । करी श्रवण किंचित ॥४९॥
या पिंडाच्या पोषणा । जीव सेविती उदक अन्ना । हे जाय कवणिया स्थाना । तेथील खुणा सांग मज ॥१५०॥
तंव दत्त म्हणे जी माते । दोन कोठे विशाळ उदरातें । ते सांठवण अन्नोदकातें । तया नामातें परियेसी ॥५१॥
पोटीं उजवे अंगीं जीवन । डावे अंगीं असे अन्न । ऐसे दोहीं कोठयामाजीं जाण । अन्नोदक जाऊन सांठवे ॥५२॥
उदरीं जठराग्नी प्रदीप्त असे । तो अन्नातें पचवींतसे । रसइंद्रियां देवोनि सुरसे । बाकस त्यागितसे तळकोठीं ॥५३॥
तळीं कोठे दोन असती । तेथें मळमूत्र जावोनि बैसती । तेथील काजकर्ते दोघे निश्चितीं । तेहीं निगुतीं निवेदितों ॥५४॥
प्राण आणि अपान । तेथील कर्गे दोघे पवन । आपुलाले करिती कारण । परम सावधान सर्वकाळ ॥५५॥
प्राण रसातें घेतसे । भाग इंद्रियांतें देतसें । अपान मळमूत्रा लोटीतसे । करिती ऐसे उभय काज ॥५६॥
प्राण तृप्तीचा देववी ढेंकर । न्यूनाधिक जाणवी प्रकार । समत्व स्वादाचा उद्गार । दावी बाहेर करावया ॥५७॥
तेवींच अपानवाया साचा । त्याग करवी अन्नोद्भव वायोचा । कोठा शुद्ध ठेवी करवोनि रेचा । जीर्णअजीर्णाचा प्रकार दावी ॥५८॥
जेव्हां जागृत होय अग्नी । तेव्हां मागे अन्नपाणी । शांत असतां समाधानीं । प्रकृतिस्थानीं शांत राहे ॥५९॥
तोच अग्नि सक्रोधें भडकतां । होय अस्थिमांसातें दाहितां । तेणें बाह्य उद्भवें ज्वरता । होय अरुचिता जिव्हेसी ॥१६०॥
तोचि अग्नि मंद होये । प्राणि न जाणतां अन्न खाये । तेणें ती पाचणिक सोयें । जेथिंची राहे तेथेंची ॥६१॥
तेणें रस न मिळे इंद्रियांसी । तेणें क्षीणतां पावे त्यासी । त्या मोडसीपासोनि रोगासी । आरंभ निश्चयेसी जाणिजे ॥६२॥
त्याच अग्निमुखीं देख । उदक न्यून अन्न अधिक । तें पचवितां कर्पे आवश्यक । ढेंकर भडक नाकीं उठे ॥६३॥
तया मोडसीचे विकारें । दिवसेंदिवस व्याधी भरे । हे अनुभव देही जाणवती खरे । केविं विस्तारें निवेंदू ॥६४॥
यदर्थ राहिजे सावधान । जाणोनि सेविजे अन्नपान । चतुर्थांश क्षुधा ठेवून । सुखसमाधान राहिजे ॥६५॥
असो आतां हा विस्तार । वदूं पदपिंडाचा विचार । रुपरुपांतीत प्रकार । तो निर्धार निरोपितों ॥६६॥
पद परमात्मा जाणिजे । तोचि ओंकार आदिपुरुषा बोलिजे । सकळ आदींचें बीज बोलिजे । गुरुगमें निरखिजे या पदा ॥६७॥
पिंड म्हणजे कुंडलिनी । आदिशक्ति सकळस्वामिनी । दश वायोगुण अधिष्ठानी । पिंडव्यापिनी ही होय ॥६८॥
रुप म्हणजे नादबिंद । कळा ज्योती वर्णभेद । हे साकारले प्रसिद्ध । रुप विविध दाविलें ॥६९॥
रुपातीत ते निरंजन । निराकार पाहे ते निर्गुण । तेंचि अरुप होय निर्वाण । निरामय जाण निःसंग ॥१७०॥
एवं हें ज्ञान जीवींचें । तें म्यां निवेदिलें सत्य साचें । ओळखावया अधिकार गुरुपुत्राचे । येर इतरांचे असेना ॥७१॥
हें ज्ञान जाणावया । शरण जाई जीवें गुरुराया । ते दावितील करोनि दया । निरसोनि माया अंतरींची ॥७२॥
अनन्यभावें जाता शरण । ते तात्काळ छेदितील अज्ञान । दिव्य दृष्टीं प्रकाशवून । आत्मज्ञान बाणविती ॥७३॥
तया ज्ञानासी पावतां । तात्काळ तुटे देहीं अहंता । देहातीत होय अवस्था । स्वप्नींहि चिंता नुपजे कधी ॥७४॥
तवं अनसूया म्हणे राजसा । श्रवणीं आनंद उपजे मानसा । जे रत जालेती अभ्यासा । त्यांच्या विलासा कोण पावे ॥७५॥
ते सुखानंदसागरीं । बुडोनि भोगिती स्वरुप लहरी । तया नावडती मोक्ष चारी । सुख चिदबंरीं सर्वदा ॥७६॥
अभ्यास करणें असे कठीण । परी वाटे करावें श्रवण । यदर्थीं आठवा ऐसे प्रश्न । तुजलागीं करुन ऐकते ॥७७॥
जें जें तुवां निरोपिलें । तें आवडीनें म्यां श्रवण केलें । श्रवणज्ञानें आणिक सुचले । सुचवितां निवेदिलें पाहिजे ॥७८॥
ते प्रश्न कोण म्हणसी । ऐक निरोपितें आतां तुजसी । कोठें वस्ती नादबिंदासी । मनपिंडपवनासी योजिले कोठें ॥७९॥
यावरी वदे स्वामी दत्त । या ब्रह्मांडशिखरांआंत । नादबिंद वास्तव्य करीत । हे जाण निश्चित अंबिके ॥१८०॥
हृदयी वसतसे हें मन नाभीं वसतसे पवन । एवं चौघांचें स्थान । तुज निवेदन पैं केलें ॥८१॥
या शरीराभीतरीं । यांचें वास्तव्य असे निर्धारीं । या पिंडाची कर्तृत्वपरी । यांचेनि बरी चालतसे ॥८२॥
तंव आणिक अनसूया पुसे । हृदय नसतां मन कोठें वसे । नाभी नसतां पवन विलसे । ठायीं बैसे कवणिया ॥८३॥
तंव उत्तर निरोपी दिगंबर । जंव नव्हतें हृदयभांडार । तंव शून्यामाजीं निर्धार । होत साचार मन तेथें ॥८४॥
नव्हतें जेव्हां नाभीस्थान । तैं निराकारीं होता पवन । ऐसें उभयांचें निरोपण । करविलें श्रवण जीवीं धरी ॥८५॥
हें परिसोनि अनसूया । म्हणे बरवें निरोपिलें प्राणसखया । आणिक मन इच्छी पुसावया । तेंही सदया ऐक तूं ॥८६॥
निराकार साकार आलें । पंचभौतिक विस्तारलें । शेवटीं कैसे समावलें । तें मज वहिलें सांग आतां ॥८७॥
तंव अवधूत म्हणें वो जननी । हे पंच प्रळयाची विंदानी । तूं पुससी मजलागोनी । तेचि निरोपणीं निवेदितों ॥८८॥
जीवमात्र हे वावरती । अन्नोदकांतें सेविती । नाना उपभोग क्रीडा भोगिती । सुखें पहुडतीं स्वानंदे ॥८९॥
वावरती असतां दिनमान । रजनींत करिती शयन । हा नित्य प्रळयो जाण । पुनरा जनन प्रभातीं ॥१९०॥
ऐसा आयुष्यमर्यादेचा भर । तोंवरी नित्य मृत्युजनन साचार । तें आयुष्य सरतां निर्धार । होय हरिहर देहाचा ॥९१॥
हे दोन प्रळय जीवां असती । तिसर्या प्रळयातें ऐक निश्चिती । चार युगें सहस्त्र वेळां जाती । तो दिवस म्हणती ब्रह्मयाचा ॥९२॥
तो नित्य करी उत्पत्तिकारण । तया प्रपंचाचा लोटतां दिन । होतां विधातियाचा अस्तमान । करी शयन सुखासनीं ॥९३॥
विधि करितांचि शयन । मर्यादा देतील अवघे सांडोन । अद्भुत होईल पापाचरण । कंपायमान होय धरा ॥९४॥
पापें न पिके धरणी । जीव मरती अन्नावांचोनी । अर्काची पडेल बहुतपणी । मेघ गद्बदोनी सुटती ॥९५॥
ते उदक शोषितील सैरा । वर्षतील तेव्हां मुसळधारा । बुडोनीया जाईल अवधी धरा । ठाव सागरा मग कैचा ॥९६॥
अवघे जळबंब होईल । सत्यलोकातें पाणी चढेल । निशी सरतां अगुष्ट भिजेल । तैं जागेल तो विधी ॥९७॥
एवं हा देखिजे तिसरा प्रळयो । पाहोनि विधीसी होय विस्मयो । अहा केलियाचा जाला लयो । निद्रेंत क्षयो जाला की ॥९८॥
ब्रह्मपळयो म्हणती यासी । मागुती विधाता सावध मानसीं । होवोनि रचिता होय सृष्टीसी । स्वसंसारासी जाण तूं ॥९९॥
एवं उत्पत्तिलयो होतां । पूर्ण आयुष्यीं विधी भरतां । मग रुद्रप्रळयाची ऐसी वार्ता । पृथक सांगतां ग्रंथ वाढे ॥२००॥
पुढें शक्तीचा महाप्रळय । सर्व एवं आटोनिया जाय । पंचभौतिकां होय लय । पावती ठाय जन्मतांतो ॥१॥
आपीं शोषिलें पृथ्वीतें । तेज शोषी त्या आपातें । पवन शोषी तेजातें । गगन पवनातें गिळीतसे ॥२॥
शून्यें ग्रासिलें तें गगन । साकार गेलें मावळोन । शून्याकार निराकारीं जाण । बीजीं समावोन वृक्ष गेला ॥३॥
तत्त्वापासाव तत्वें जालीं । तत्त्वींच तत्त्वें समावलीं । निराकार होवोनि ठेलीं । जळीं विरालीं जळगार ॥४॥
जितुकें हें दृश्य दिसे । तितुकेंही अवघें नासे । सांडी मिथ्या भ्रम कैसे । जावोनि बैसे अविनाशीं ॥५॥
जीव न गुंते मायापाशीं । तरी हाचि होय अविनाशी । मायायोगें जीवपणासी । नाम यांसी स्थापिलें ॥६॥
पाहतां अरुप रुपा आलें । मायादेवीनें नाम केलें । अहं उद्भारेंची प्रगटलें । रुप उदेले मायेचें ॥७॥
आपआपुली छाया । तैसीच जाण ईश्वराची मामा । आप आपणातें विसरोनिया । भुलला वांया छायेसी ॥८॥
जैं छाया अचळ राहे खरी । ते सत्य माय जाण निर्धारी । छाया माया बरोबरी । पाहे विचारीं शोधोनीं ॥९॥
छायेची करोनिया सांडी । विवेकें आत्मविचारणा मांडी । शोधोनि घेईं आपुले भांडी । वाउगी वितंडी सांडोनी ॥१०॥
सांडी जो मायिक पसारा । तोचि पावे आत्मिक सारा । हाचि तूंतें दिधला विसारा । टाकोनि आसरा सार घेईं ॥११॥
सार ज्याचें त्यापासीं आहे । आत्मविचारणीं विचारोनि पाहे । ज्याचा लाभ त्यासी होये । जाणिजे सोये गुरुकृपें ॥१२॥
श्रीगुरुकृपायोगें प्रसिद्ध । जाणिजे षड्चक्रींचे भेद । ते गती जाणोनिया शुद्ध । घेइजे बोध सातव्याचा ॥१३॥
जो सर्वज्ञानाची जाणे वोज । तो सातव्याची घेईल समज । साधील आपुलें स्वहित गुज । आपुलेंचि बीजा आपण पाहे ॥१४॥
तें बीज जया हातीं आलें । गुरुप्रासादें पूर्ण लाधलें । ते जन्ममरणापासो चुकले । पद पावले अविनाश ॥१५॥
नाश नाहीं जयासी । अविनाश म्हणविजे तयासी । तया भेटतां तेंचि होसी । ये वोळखीसी वर्म ऐका ॥१६॥
भ्रमरीचे स्पर्शे करुन । भ्रमरीच जाली आळिका पूर्ण । अग्निसंगें काष्ठपण । होउन हरण अग्नि होय ॥१७॥
वाती दीपा भेटूं जातां । स्वयेंचि पावली ती दीपता । बिंदु सिंधुमाजीं पडतां । नये काढितां सिंधु होय ॥१८॥
तेवीच हेंही जाण माते । वर्म निवेदिलें सत्य तूंतें । अभ्यासीं योजि या मनातें । साधी कार्यातें स्वदिताच्या ॥१९॥
येचि कारणासाठीं । पावली नरदेहाची कोटीं । येथचि होय श्रमनिवटी । साधितां हातवटी गुरुकृपें ॥२२०॥
तंव अनसूया म्हणे गुणनिधाना । निंबलोण करुं तुझिया निरोपणा । जेणें बोध केला माझिया मना । भाविक सज्जना लहानथोरां ॥२१॥
बोध नोहे हा उपदेश । नुरवी अज्ञानाचा लेश । श्रवण करितां दिवसेंदिवस । ज्ञान विशेष लाधवी ॥२२॥
श्रवणेचि करीतसे सधन । मननीं अधिकार वाढे गहन । निजध्यासें अभ्यासितां पूर्ण । सत्वर दर्शन पावेल पैं ॥२३॥
निजतत्त्वीं होतां भेटीं । मुसवळोनी होय खोटी । सबाह्य तोची पाठींपोटीं । द्वैत गोष्टी हारपली ॥२४॥
द्वैत अवघें निरसलें । अद्वयत्व जीवीं ठसलें। तें निराकारीं जावोनि वसलें । घृतीं समरस जालें नवनीत ॥२५॥
असें तुझें हें निरोपण । तेणें तृप्त केलें माझें श्रवण । परि आणिक ऐकावया इच्छी मन । उबग वाटो नये जीवा ॥२६॥
षट्चक्राचे ऐकावे भेद । येविसीं उपजला जीवीं आनंद । तूं ज्ञाता होसी स्वतःसिद्ध । निरोपी सावध श्रवणीं मी ॥२७॥
मज श्रवणावांचोनि पाहीं । गोड न लगे आन कांहीं । जागृतीं स्वप्न सुषुप्तीठायीं । श्रवणचि देहीं आठवंते ॥२८॥
श्रवणीं चित्त जडलें मातेचें । हें अवधूतासी कळलें साचें । निरोपणीं पात्र नोव्हे काचें । सांठवण सुरसाचें होय निकें ॥२९॥
हें जाणोनि मानसीं । अंतरीं उल्हासला अविनाशी । म्हणें निरोपणीं तोषवूं मातेसी । जेणें तिजसी सुख होय ॥२३०॥
हा अवधूत सदय उदार । आर्त भूतांचें जाणतो अंतर । पुरवी मनोरथ समग्र । दयासागर दीनबंधु ॥३१॥
पुढीले प्रसंगीं निजमायेसी । निरोपणीं तोषवील श्रोतयांसी । सांगेल षट्चक्राचिया भेदासी । अनुक्रमेंसी आदरें॥३२॥
अहो तुम्ही संत श्रोते जन । तुम्हा विनवितों कर जोडून । हें पिकलें क्षेत्र तुम्हांलागोन । अधिकारी पूर्ण येथिंचे तुम्ही ॥३३॥
आवडी करोनी रस सेविजे । तृप्तीपर्यंत स्वीकारिजे । पंक्तीं अनंतसुता घेइजे । लाभ देइजे निजशेष ॥३४॥
इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रीनारदपुराणींचें संमत । परिसोत भाविक ज्ञानी पंडित । पंचविंशोध्यायार्थ गोड हा ॥२३५॥
॥ इति पंचविंशोध्यायः समाप्तः ॥