एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः ।
एकधा दशधाऽऽत्मानं विभजन् जुषते गुणान् ॥४॥
एशीं स्त्रजिलीं भूतें महाभूतें । जीं जड मूढ अचेतें ।
त्यांसी वर्तावया व्यापारार्थें । विभागी आपणातें तत्प्रवेशीं ॥८५॥
पंचधा पंचमहाभूतें । तें कार्यक्षम व्हावया येथें ।
पंचधा विभागें श्रीअनंतें । प्रवेशिजे तेथें तें ऐक राया ॥८६॥
’गंध’ रुपें पैं पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंतें ।
पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥८७॥
पृथ्वीं प्रवेशला भगवंतु । यालागीं ते आवरण-जळांतु ।
उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥८८॥
धरा धरी धराधर । यालागीं विरवूं न शके समुद्र ।
धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणें वाहे ॥८९॥;
’स्वाद’ रुपें उदकांतें । प्रवेशोनि श्रीअनंतें ।
द्रवत्वें राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥९०॥
जीवनीं प्रवेशे जगज्जीवन । याकारणें आवरण तेंचि जाण ।
न शोषितां उरे जीवन । हें लाघव पूर्ण हरीचें ॥९१॥;
तेजाचे ठायीं होऊनि ’रुप’ । प्रवेशला हरि सद्रूप ।
यालागीं नयनीं तेज अमूप । जठरीं देदीप्य जठराग्नि जाहला ॥९२॥
रुपयोगें लवलाहीं । हरि प्रवेशे तेजाच्या ठायीं ।
तें आवरण-वायूमाजीं पाहीं । न मावळे कांहीं यालागीं राया ॥९३॥;
वायूमाजीं ’स्पर्श’ योगें । प्रवेशु कीजे श्रीरंगें ।
यालागीं प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥९४॥
वायूच्या ठायीं हृषीकेश । स्पर्शरुपें करी प्रवेश ।
यालागीं वायूचा ग्रास । सर्वथा आकाश करुं न शके ॥९५॥;
’शब्द’ गुणें हृषीकेश । आकाशीं करी प्रवेश ।
यालागीं भूतांसी अवकाश । सावकाश वर्तावया ॥९६॥
शब्दगुणें गगनीं । प्रवेशला चक्रपाणी ।
यालागीं तें निजकारणीं । लीन होऊनि जाऊं न शके ॥९७॥;
महाभूतीं निरंतर । स्वाभाविक नित्य वैर ।
येरांतेम ग्रासावया येर । अतितत्पर सर्वदा ॥९८॥
जळ विरवूं पाहे पृथ्वीतें । तेज शोषूं पाहे जळातें ।
वायु प्राशूं धांवे तेजातें । आकाश वायूतें गिळूं पाहे ॥९९॥
तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्यांतें करोनियां निर्वैर ।
तेचि येरामाजीं येर । उल्हासें थोर नांदवी ॥१००॥;
एवं पंचभूतां साकारता । आकारली भूताकारता ।
तेथें जीवरुपें वर्तविता । जाहला पैं तत्त्वतां प्रकृतियोगें ॥१॥
त्यासी ब्रह्मांडीं ’पुरुष’ हें नांव । पिंडीं त्यातें म्हणती ’जीव’ ।
हा मायेचा निजस्वभाव । प्रतिबिंबला देव जीवशिवरुपें ॥२॥
शिवीं जे ’योगमाया’ विख्यती । जीवीं तीतें ’अविद्या’ म्हणती ।
हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती । स्वप्नस्थिती संसारु ॥३॥
ज्यातें म्हणती ’दीर्घस्वप्न’ । तो हा मायावी संसार संपूर्ण ।
निद्रेमाजीं दिसे जें भान । तें जीवाचें स्वप्न अविद्यायोगें ॥४॥
येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न । बोध जाहलिया मिथ्या भवभान ।
हें अवघें मायेचें विंदान । राया तूं जाण निश्चित ॥५॥;
आतां जीवाची विषयावस्था । विषयरसीं विषयभोक्ता ।
एकधा दशधा विभागता । आईक नृपनाथा सांगेन ॥६॥
एकधा भागें अंतःकरण । स्वयें झाला जनार्दन ।
मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभागें ॥७॥
जीव आपुल्या परिपूर्णता । ’अहं’ म्हणे निजात्मसत्ता ।
तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥८॥
अहंकारु वाढवितां देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता ।
तो विसरु वाढवी विषयचिंता । तेचि ’चित्त’ तत्त्वतां महामाया ॥९॥
देहअहंता अतिचपळ । तीतेंच म्हणती ’मन’ चंचळ ।
नाना संकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय-शोक-दुःख ॥११०॥
देहअंहतेचें शहाणपण । तिये नांव गा ’बुद्धि’ जाण ।
ते बुद्धीनें निश्चय केला पूर्ण । आम्हां जन्ममरण अनिवार ॥११॥
एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टयअवस्था ।
मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥१२॥
अहंकार धरी सोहंपण । तैं चित्तीं प्रगटे चैतन्यघन ।
तेव्हां मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं ॥१३॥
समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कैंचें मन ।
बुडे चित्ताचें चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥१४॥
’एकधा’ विभाग अंतःकरण । त्याची उणखूण निजलक्षण ।
राया सांगितलें संपूर्ण । आतां ’दशधा’ लक्षण तें ऐक ॥१५॥
दशधा इंद्रियें अचेतन । तयांतें चेतविता नारायण ।
दशधारुपेम प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥१६॥
दृष्टीमाजीं झाला ’देखणें’ । दृश्य प्रकाशी दृश्यपणें ।
ऐसेनि प्रकाशकपणें । दृश्याभरणें दाखवी ॥१७॥;
श्रवणीं झाला तो ’ऐकणें’ । शब्द प्रकाशी शब्दलक्षणें ।
मग अर्थावबोधकरणें । शब्दविंदानें ऐकवी ॥१८॥;
रसीं ’रसस्वादु’ नारायण । रसने तोचि रसस्वादन ।
यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजीं ॥१९॥;
सुमनीं श्रीहरि ’सुगंध’ । घ्राणीं तोचि जाणे गंधावबोध ।
यापरी सुमनमकरंद । भोगवी गोविंद निजांगयोगें ॥१२०॥:
शीत-उष्ण-मृदु-कठिण । ’स्पर्श’ प्रकाशिता नारायण ।
त्वचेमाजीं तोचि स्पर्शज्ञ । यापरी जगजीवन भोगवी स्पर्श ॥२१॥;
वाचेचा ’वाचकु’ कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती ।
नाना शब्दार्थव्युत्पत्ती । वदवी निश्चितीं वाचाळपणें ॥२२॥;
करांच्या ठायीं ’देती घेती’ । अकर्तेनि कर्तव्यशक्ती ।;
चरणा आचरणें निगुती । ’गमनस्थिती गोविंदें’ ॥२३॥;
उपस्थसुखाची ’सुखप्राप्ती’ । तेणें सुखें सुखावे श्रीपती ।
स्त्रीपुरुषमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिप्रीतीं पुरुषोत्तमु ॥२४॥;
गुदाचे ठायीं जें का ’क्षरण’ । तेंही अक्षरें होय जाण ।
यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देहीं ॥२५॥;
यापरी गा देहयोगें । विलासे विषयसंभोगें ।
भोग्य भोक्ता उभय भागें । प्रकाशूनि अंगें स्वयें भोगी ॥२६॥
जेवीं साळईच्या रुखा । साळईचि बीज देखा ।
साळईचि शाखोपशाखा । न विकारतां असका वृक्ष होये ॥२७॥
जेवीं कां ऊंस बीजीं पडे । तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे ।
जरी भिन्न भिन्न कांडें चढे । तरी मागें पुढें रस एकु ॥२८॥
तेवीं विषय आणि करणें । प्रकाशूनि एकपणें ।
मग विषयरस सेवणें । जीवपणें स्वयें सेवी ॥२९॥;