मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक २५ वा

एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षां कैवल्यमनिकेतताम् ।

विविक्तचीरवसनं सन्तोषं येनकेनचित् ॥२५॥

सद्गुरुवचनविश्वासें । मानी सर्वत्र परमात्मा ऐसें ।

तेचि निजबुद्धी निश्चयवशें । निजमानसें विवंची ॥७७॥

मजमाजीं परमात्मा वसे । तेणें स्थूळदेहो वर्ततसे ।

त्याचेनि पूर्ण चित्प्रकाशें । जग भासे जगद्रूपें ॥७८॥

तेणें निजात्मप्रकाशें । माझे दृष्टीसी दृश्य दिसे ।

दृश्यद्रष्टृदर्शनविलासें विलसतसे परमात्मा ॥७९॥

दृश्य दृश्यपणें जें जें उठी । तें तें निजात्मता पाठींपोटीं ।

तेणें अन्वयें देवो देखे दृष्टी । आहाळबाहाळ सृष्टि दुमदुमित ॥४८०॥

तेव्हां जें जें देखे भूताकृती । तेथ परमात्मा ये प्रतीती ।

मी नियंता ईश्वर त्रिजगतीं । हेही स्फूर्ती स्फुरों लागे ॥८१॥

जग वर्ते माझिया सत्ता । मी कळिकाळाचा नियंता ।

मी उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । हे मूळ अहंता स्वभावें स्फुरे ॥८२॥

येणें पूर्वान्वयें जंव पाहे । तंव सर्वीं सर्व मीचि आहें ।

तें पाहतें पाहणें पाहों ठाये । तेथें ’अहं’ जाये विरोनि ॥८३॥

तेथें परब्रह्मैक प्रसिद्ध । कोंदला ठाके सच्चिदानंद ।

ऐसा गुरुवाक्यें प्रबोध । शिष्य अतिशुद्ध पावती ॥८४॥

तेव्हां वैकुंठीं देवो आहे । हें बोलणें त्या आहाचि होये ।

क्षीरसागरीं देवो राहे । हें ऐकतांचि पाहें अनिवार हांसे ॥८५॥

देवावांचोनि तत्त्वतां । तिळभरी ठावो नाहीं रिता ।

त्यातें एकदेशी नेमितां । न मने वस्तुतां सच्छिष्यासी ॥८६॥

वैकुंठ आणी क्षीराब्धी । ज्याचेनि प्रकाशे ज्यामधीं ।

तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धीं । हे बोल सोपाधी शबलत्वाचे ॥८७॥

जेथ सर्वीं सव परमात्मा । तेथे एकदेशी न सरे महिमा ।

तो पूर्णब्रह्म अनाश्रमा । वैकुंठादि आश्रमा वश नव्हे ॥८८॥

अखंडातें आवाहन । अधिष्ठानातें आसन ।

सर्वगता सिंहासन । कल्पिती स्थान निजकल्पना ॥८९॥

तेही कल्पिती निजवृत्ती । जे ब्रह्मरूप नित्य पाहती ।

त्यांची परब्रह्मस्थिती । कद कल्पांतीं भंगेना ॥४९०॥

ऐशी परब्रह्म‍आवाप्ती । साधकीं पावावया निश्चितीं ।

नित्य बसावें एकांतीं । द्वैताची स्फूर्ती त्यागोनी ॥९१॥

साधितां परमार्थनिधान । साधकां आडवी वस्त्रअन्न ।

निमोली वल्कलें परिधान । कां त्यागिलीं अतिजीर्ण वस्त्रें घ्यावीं ॥९२॥

शाकफलमूलकंदभोजन । येणें करावें जठरतर्पण ।

सांडूनि परमार्थसाधन । जोडावया अन्नधन न वचावें कदा ॥९३॥

चौपालवी बांधोनि करीं । भीक मागावी दारोदारीं ।

परी अन्नआच्छादनावरी । आयुष्य तिळभरी न वेंचावें ॥९४॥

मेळवावया अन्नआच्छादन । न शिणती साधक सज्ञान ।

देह अदृष्टाधीन । तें सहजें जाण प्रतिपाळी ॥९५॥

स्वयें शिणतां अहोराती । अदृष्टावेगळी अणुभरी प्राप्ती ।

कदा न चढे कोणाचे हातीं । हें साधक जाणती सज्ञान ॥९६॥

यालागीं अदृष्टें जें प्राप्त । तेणें निर्वाहें सदा निश्चिंत ।

साधक परमार्थ साधित । संतोषयुक्त गुरुवाक्यें ॥९७॥

देहअदृष्टपरवडी । होती सुखदुःखघडामोडी ।

साधकां संतोषु चढोवढी । गुरुवाक्य गोडी दृढ लागली ॥९८॥

जैसें देहाचें प्राक्तन । तैसें होय अशन-वसन ।

परी गुरुवाक्यसुख सांडून । देहावरी मन ममत्वें न ये ॥९९॥

याञ्चेवीण यथाकाळें । यदृच्छया जें जें मिळे ।

तें तें सेवी सकळ मंगळें । गुरुवाक्यमेळें स्वानंदें ॥५००॥

शरीरनिर्वाहाविखीं । कोठें कांहीं नाभिलाखी ।

जें जें मिळे तेणेंचि सुखी । निजात्मतोखीं संतुष्ट ॥५०१॥

प्रारब्धें सुखदुःख भोगितां । संतोष साधकांच्या चित्ता ।

हें गुरुवाक्यें विश्वासतां । चढे हाता शिष्याच्या ॥५०२॥

त्याच्या दृढ विश्वासासीं । भगवतशास्त्र गुरुपाशीं ।

अभ्यासावें आदरेंसीं । दृढनिश्चयेंसीं प्रबोधक ॥५०३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP