नैतन्मनो विशति वागुत चक्षुरात्मा, प्राणेन्द्रियाणि च यथाऽनलमर्चिषः स्वाः ।
शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूल-मर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः ॥३६॥
वैकुंठ कैलास क्षीराब्धी । मन कल्पी कल्पनाविधी ।
परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी । मनबुद्धयादी सरेना ॥६४७॥
स्वयें कल्पीं त्रिभुवन । तें स्वरूपीं रिघों न शके मन ।
बुद्धि निश्चयात्मक पूर्ण । तीसही जाण अगम्य वस्तु ॥६४८॥
जें मनबुद्धिअगोचर । तें वाचेसी अति दुस्तर ।
वस्तु नव्हे शब्दगोचर । परात्पर परब्रह्म ॥६४९॥
मोटे बांधतां आकाशातें । चारी पालव पडती रिते ।
तेवीं शब्दें बोलावें वस्तूतें । तंव शब्द शब्दार्थें निर्धर्म ॥६५०॥
प्राणाचेनि निज ढाळें । जे कां क्रियाशक्ति चळे ।
ते क्रियेसी वस्तु नातळे । मा इंद्रियां आकळे कैसेनी ॥६५१॥
जेवीं थिल्लराआंतौता । बिंबोनि वोला नव्हे सविता ।
तेवीं मनबुद्धिइंद्रियांपरता । जाण तत्त्वतां परमात्मा ॥६५२॥
जो मनाचें अनादि मन । जो बुद्धीची बुद्धि सज्ञान ।
जो नयनाचें आदि नयन । जो श्रवणाचें श्रवण सावधानत्वें ॥६५३॥
जो घ्राणाचें निजघ्राण । जो रसनेची रसना आपण ।
जो त्वचेची निजत्वचा पूर्ण । जीवाच जो जाण जीवु स्वयें ॥६५४॥
जो इंद्रियांचा प्रकाशिता । जो कर्म करोनि अकर्ता ।
तो इंद्रियीं इंद्रियार्था । विषयी सर्वथा हों नेणे ॥६५५॥
जेथ बुद्धीची दृष्टि न वळंघे । तेथे मन मनपणें केवीं रिघे ।
मा श्रवणनयनघ्राणयोगें । विषयसंयोगें केवीं भेटे ॥६५६॥
जेथ प्राणशक्ति न चले पुढें । जेथ वाचा स्वयें लाजिली मुरडे ।
मा कर्मेंद्रियांसी कोणीकडे । पवाडु पुढें जोडेल ॥६५७॥
अग्नीपासूनि आह्या अनेग । क्षणक्षणां निघती चांग ।
परी आह्यांमाजीं अग्नींचें अंग । सर्वथा साङग प्रगटेना ॥६५८॥
कां सूर्यापासून सूर्यकांत । प्रकाशती असंख्यात ।
परी सूर्यकांताआंत । कदा भास्वत प्रगटेना ॥६५९॥
जेवीं सिंधूपासूनि तरंग । प्रकाशति अति अनेग ।
परी तरंगीं सिंधूचें अंग । सर्वथा साङ्ग पगटेना ॥६६०॥
तेवीं ब्रह्मापासोनि करणें । प्रकाशती अनेकपणें ।
तरी त्या इंद्रियां ब्रह्म जाणणें । हें जीवें प्राणें घडेना ॥६६१॥
जरी केळापासूनि केळी निपजे । कां साखरेपासूनि ऊंस उपजे ।
तरी इंद्रियीं ब्रह्म जाणिजे । हें न ये निजवोजें ब्रह्मादिकां ॥६६२॥
आशंका ॥ इंद्रियीं नव्हे ब्रह्मज्ञान ।
तैं जीवाचें भवबंधन । कदा काळीं न तुटे जाण ।
जन्ममरण अनिवार ॥६३॥
’शब्दादेवापरोक्षमति’ । ऐशी श्रुतिशास्त्र-उपपत्ति ।
तेही मिथ्या वाटे वदंती । ऐसें तूं निश्चितीं मानिसी राया ॥६६४॥
तेही अर्थींचें निरूपण । ऐक राया सावधान ।
शब्द निमोनि आपण । दे ब्रह्मज्ञान जीवासी ॥६६५॥
(पूर्वील श्लोकार्ध ) -
शब्दोपिबोधकनिषेधतयात्ममूलमर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः’ ॥
जीवु सोडवावया होडा । शब्दें सवेग उचलिला विडा ।
तेणें घेतां तत्त्वांचा झाडा । आपणही पुढां निमाला ॥६६६॥
श्रुति ’नेते नेते’ येणें शब्दें । अतद्यावृत्तिनिषेधबोधें ।
परी साक्षात् वेदानुवादें । निज वस्तु शब्दें न बोलवे ॥६६७॥
शब्दासी जें वाच्य नोहे । तेंचि परब्रह्म जाणावें ।
तेथील जो खुणे पावे । तो ब्रह्म सद्भावें स्वयें होय ॥६६८॥
श्रुति ’नेति नेति’ येणें वचनें । शब्द निषेधूनि वस्तु दावणें ।
शब्दीं निःशब्द जो लक्षूं जाणे । तेणें पावणें परब्रह्म ॥६६९॥
शब्दु निजनिषेधें जें बोधी । तेथ समरसे ज्याची बुद्धि ।
तेंचि परब्रह्म गा त्रुशुद्धि । निषेधावधि तो ठावो ॥६७०॥
शब्द निमोनि सर्वशक्तीं । जीवासी दे ब्रह्मप्राप्ति ।
’शब्दादेवापरोक्षेति’ । जाण निश्चितीं या नांव ॥६७१॥
वाचा निःशेष निवर्ते । मन बुद्धि न पवे जेथें ।
तेचि अवधि निषेधातें । ’परब्रह्म’ त्यातें बोलिजे ॥६७२॥
जें वाचेचें वदवितें । परी वाचा वदों न शके ज्यातें ।
जें मनबुद्धयादिकां जाणतें । परी मन बुद्धि ज्यातें नेणती ॥६७३॥
जें नयनातें दाखवितें । परी नयन न देखती ज्यातें ।
जें श्रवणघ्राणांतें चेतवितें । परी श्रवण घ्राण ज्यातें नेणती ॥६७४॥
एवं सर्वांचें जाणतें । परी सर्व सर्वथा नेणे ज्यातें ।
ज्यासी जाणावयालागीं येथें । आणिक जाणतें असेना ॥६७५॥
ऐसें स्वसंवेद्य निजज्ञातें । ज्यासी दुजें नाहीं जाणतें ।
शब्द रिघावया तेथें । रिगमु त्यातें असेना ॥६७६॥
जें कृश ना पुष्कळ । जें वक्र ना वर्तुळ ।
जें सूक्ष्म ना नव्हे स्थूळ । वस्तु केवळ निर्विकार ॥६७७॥
ज्यासी नाहीं रूपगुण । ज्यासी नाहीं आश्रमवर्ण ।
ज्यासी नाहीं मीतूंपण । ज्यासी जन्म-मरण असेना ॥६७८॥
जें हळुवट ना गहिंस । जें चिवळ ना सपोस ।
जें वसतें ना वोस । जें का निःशेष निर्धर्म ॥६७९॥
जें र्हस्व ना मोठें । जें वडील ना धाकुटें ।
जें विचारितां विवेकवाटे । विवेकुही आटे निःशेष ॥६८०॥
ज्यासी आदि ना अंतु । जे मध्यस्थितीरहितु ।
जें गुण ना गुणातीतु । अच्युतानंतु अद्वयत्वें ॥६८१॥
त्या स्वरूपाचा वचनपाठ । करावया वेदें केली खटपट ।
तेथ श्रतीचाही बोभाट । लाजिला करूनि कष्ट नेतिनेतिवादें ॥६८२॥
वेदु काय नेणोनि परतला । जाणोनि न बोलिवेचि बोला ।
याचिलागीं तो मौनावला । तटस्थ ठेला निःशब्दें ॥६८३॥
वेदें धरितां दृढ मौन । शास्त्रें भांबावलीं जाण ।
तिहीं धरोनि मताभिमान । करिती वल्गन अतिवादें ॥६८४॥
’शब्दांतीं ब्रह्मज्ञान’ । हे वेदें पावोनि पूर्ण खूण ।
शब्दें शब्द निषेधून । दृढ मौन तेणें धरिलें ॥६८५॥
वेदरायें धरितां मौन । शास्त्रें भांबावलीं जाण ।
शोधितां शब्दांचें रान । निजसमाधान न पावती ॥६८६॥
ज्यासी शब्दांतीं ब्रह्मप्राप्ति । त्यासी दर्शनें ऐक्या येती ।
शास्त्रें स्वयेंचि समजतीं । ऐक्यें त्रिजगती आभासे ॥६८७॥
ब्रह्म एकाकी अद्वयस्थिति । तुवांचि दाविली उपपत्ति ।
तेथें ऐक्यरूपें त्रिजगती । म्हणसी कवणाप्रती आभासे ॥६८८॥
ज्याची तुटली वासनाफांसोटी । विराली अहंकाराची गांठी ।
प्रारब्ध उतरलें देहाचे तटीं । त्यासी ऐक्यें सृष्टी आभासे ॥६८९॥
त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी । सांगावया उल्हास पोटीं ।
पिप्पलायनु स्वानंदतुष्टी । ब्रह्मैक्यें सृष्टी वाखाणी ॥६९०॥