आविर्होत्र उवाच-कर्माकर्मविकर्मेति वेदवादो न लाकिकः ।
वेदस्य चेश्वरात्मत्वात्तत्र मुह्यन्ति सूरयः ॥४३॥
कर्माकर्मविकर्म जाणा । सामान्य नव्हे नृपनंदना ।
करितां विभागविवंचना । नुगवे सज्ञानां स्मृतिकारांसी ॥७६०॥
जे स्वयें प्रतिसृष्टिकारी । तेही भुलले कर्मविभागावरी ।
जे समुद्र घोंटिती चुळेकरीं । तेही कर्मसागरीं बुडाले ॥७६१॥
येचि कर्मविवंचनेसाठीं । ऋषिमर्षींचिया कोटी ।
मताभिमानें झाले हिंपुटी । त्यांसीही शेवटीं नुगवेचि ॥७६२॥
कर्माकर्मविभाग जाणा । स्वयें नुगवेचि चतुरानना ।
इतरांची कोण गणना । कर्मविवंचना करावया ॥७६३॥
कर्म वेदमूळ जाण । वेदु स्वयें नारायण ।
वेदवादविवंचन । करितां मौन श्रुतिशास्त्रां ७६४॥
कर्म-अकर्म-विकर्म जाण । एकचि परी त्रिविध भिन्न ।
तेंही विभागविवंचन । सावधान अवधारीं ॥७६५॥
श्वेत मृदु मधुर । त्रिविधभेदें एक साखर ।
तेवीं एकचि त्रिप्रकार । कर्मठ नर मानिती कर्म ॥७६६॥
भिन्न करितां मधुरता । तीमाजीं ये मृदु-श्वेतता ।
श्वेतताचि भिन्न करितां । मृदु-मधुरता तीमाजीं ॥७६७॥
तेवीं भिन्न करितां ’कर्म’ । कर्मा सर्वांगीं ’अकर्म’।
कर्म अकर्मामाजीं ’विकर्म’ । मिरवे परम सौभाग्यें ॥७६८॥
मुख्य मूळीं जें कां निपजे । ’कर्म’ ऐसें त्यातें म्हणिजे ।
विहिताविहितक्रिया जे जे । ’विकर्म’ म्हणिजे तिये नांव ॥७६९॥
कर्म अकर्मयोगें चळे । ऐसें विकर्मीं ज्यासी विवळे ।
त्यास ’निष्कर्मता’ आकळे । गुरुकृपाबळें तत्काळ ॥७७०॥
कर्मावरी कर्म विशेष वाढे । ’विकर्म’ त्यातें म्हणणें घडे ।
जेथें कर्म रिघों न शके पुढें । ’अकर्म’ चोखडें या नांव ॥७७१॥
ऐशी कर्मविवंचना अटक । हा प्रश्न केला तैं तूं बाळक ।
त्याचिलागीं गा राया देख । सनकादिक न सांगितीचि ॥७७३॥
कर्माकर्मविवंचना । अधिकारेंवीण कोणा ।
सांगों नये नृपनंदना । कर्म सज्ञाना अतिदुर्बोध ॥७७३॥