लब्धानुग्रह आचार्यात्तेन संदर्शितागमः ।
महापुरुषमभ्यर्चेन्मूर्त्याभिमतयाऽऽत्मनः ॥४८॥
प्रवृत्तिनिवृत्तिकृत कार्या । अवश्य पाहिजे आचार्या ।
आपमतीं भजतां राया । अनेक अपायांमाजीं पडे ॥८०७॥
भोयी पाय सिद्ध आहेती । भोयाळेंवीण वृथा भ्रमती ।
तेवीं गुरुवीण जे जे करिती । ते ते अहंमतीं दृढ भ्रमले ॥८०८॥
गुरु ब्रह्म दोनी ऐक । ऐशिया भावना आवश्यक ।
सेवा करुनि भावपूर्वक । संतोषवूनि देख अनुग्रहो घ्यावा ॥८०९॥
तेथ निजाधिकारप्राप्तें । जे मूर्ति आवडेल आपणियातें ।
तेचि मंत्रविद्या तेथें श्रद्धासंभरितें अंगीकारावी ॥८१०॥
तेव्हां गुरुमुखें मिश्र वोजा । पुरुषोत्तममहापूजा ।
शिकोनियां निजकाजा । भजावें अधोक्षजा शिक्षिता मतीं ॥८११॥
ते चि भजती हातवटी । आगमोक्त निजपुष्टी ।
राया सांगेन गोमटी । सावधानदृष्टीं अवधारीं ॥८१२॥