श्रीगणेशाय नमः ॥
भारतीराजा जनमेजयो ॥ वैशंपायन ऋषिरावो ॥
यादोघांचा संवादप्रवाहो ॥ हा ग्रंथ असे ॥१॥
वैशंपायन व्यासशिष्य ॥ तयांसि पुसे जनमेजय ॥
ह्मणे एक फेडावा संशय ॥ माझे मनींचा ॥२॥
तूं ज्ञानियांचा ऋषी । ह्मणोनि पुसतों तुजसी ॥
तें सांगाजी आह्मासी ॥ कृपा करोनी ॥३॥
मी पुसतों ह्मणोनी ॥ कोप न धरावा मनीं ॥
मग सांगे लीलावचनीं ॥ वैशंपायन ॥४॥
ऋषि ह्मणेगा भारता ॥ श्रोता असावा ज्ञाता ॥
बरवी पृच्छा करितां ॥ सांगे वक्ता तयासी ॥५॥
सावधान श्रोता ॥ जरी मिळेल प्रश्न करिता ॥
तरी संतोषे वक्ता ॥ चातुर्यपणें ॥६॥
या दोघांचे संवादें ॥ कथा वाढेल आनंदें ॥
ते पावतील पदें ॥ श्रीहरीचीं ॥७॥
तरि तूं राजा सज्ञान ॥ पुसतोसि सावधान ॥
ह्मणोनि तुज सांगेन ॥ हरिकथा ॥८॥
आणि तूं प्रश्न करिसी ॥ श्रीहरीचे कथेसी ॥
तरी उद्धार वाचेसी ॥ होईल मज ॥९॥
हरिकथा वाढेल ॥ विश्वजन उद्धरेल ॥
वाचेसि उच्चारेल ॥ नारायण ॥१०॥
हरिनामावीण कथा ॥ ते अपवित्र गा भारता ॥
उदकावीण सरिता ॥ तैसी जाण ॥११॥
प्राणावीण शरीर ॥ जैसें प्रेत अपवित्र ॥
तैसी कथा सुंदर ॥ नव्हे हरिवीण ॥१२॥
श्रीहरीच्या नामें ॥ पाविजेति पदें उत्तमें ॥
तूं पुसतोसि प्रेमें ॥ तरी सांगों तुज ॥१३॥
पुनः राजा भारत ॥ वैशंपायनातें पुसत ॥
सांगावा जी वृत्तांत ॥ मुनिवर्या ॥१४॥
त्या श्रीहरीची कथा ॥ मज संतोष ऐकतां ॥
आणि हरिनामामृता ॥ श्रद्धा मज ॥१५॥
तरी माझेमनींचा भावो ॥ तो फेडाजी संदेहो ॥
तूं ज्ञानियांचा रावो ॥ सांगें मज ॥१६॥
अंत मांडलिया द्वापारीं ॥ श्रीकृष्ण यादव समग्रीं ॥
पडिले परस्परीं ॥ युद्ध करितां ॥१७॥
पुरली अवताराची अवधी ॥ शाप पावले कुबुद्धीं ॥
आटले सर्व संबंधी ॥ गोत्रज ते ॥१८॥
एवढा तो गोतवळा ॥ निमाला एकेचि वेळां ॥
वंशींचा नाहीं उरला ॥ संसारीं कोणी ॥१९॥
जरी त्याचे संसारिकासी ॥ कोणी राहिला असेल वंशीं ॥
त्याची कथा आह्मासी ॥ सांगा स्वामी ॥२०॥
तंव ह्मणे वैशंपायन ॥ राया बरवा केला प्रश्न ॥
तरी ऐक सावधान ॥ सांगों तुज ॥२१॥
कृष्णाचे नंदन ॥ जे सांब आणि मदन ॥
ते चिरंजीव होवोन ॥ असती पैं ॥२२॥
ते नांदती पुत्रपौत्रीं ॥ असताति वज्रपुरीं ॥
कृष्णवंश अद्यापवरी ॥ नांदत असे ॥२३॥
आणि कृष्णाचा सापत्नबंधु ॥ जया नाम बोलिजे गदु ॥
तो असे वंशकंदु ॥ श्रीहरीचा ॥२४॥
कनकमेरुचे पाठारीं ॥ वज्रपुरी नामें नगरी ॥
तेथें असती निर्धारीं ॥ तिघेजण ॥२५॥
वज्रनाभाची कुमरी । प्रभावती नामें सुंदरी ॥
ते मदनाची अंतुरी ॥ जाहली असे ॥२६॥
त्या वज्रनाभासि वधोन ॥ राज्य करिती तिघेजण ॥
चिरंजीव होवोन ॥ नांदती तेथें ॥२७॥
तंव पुसतसे रावो ॥ हा फेडावा संदेहो ॥
या कथेचा गर्भभावो ॥ सांगा मज ॥२८॥
तो वज्र वधावया ॥ काय कारण ऋषिराया ॥
त्याच्या अभिप्राया ॥ सांगावें जी ॥२९॥।
त्या वज्रपुरीसि जावया ॥ आणि चिरंजीवी व्हावया ॥
सांगाजी मुनिराया ॥ कारण कायी ॥३०॥
अहो श्रीकृष्णाची कथा ॥ मज तृप्ति नाहीं ऐकतां ॥
मीन काय जळसरिता ॥ मुकों शके ॥३१॥
वज्रनाभाची कुमरी ॥ जाहली मदनाची नोवरी ॥
ते कथा विस्तारीं ॥ सांगा मज ॥३२॥
चातक जाहलें तृप्ती ॥ तरी न सांडी चंद्रदीप्ती ॥
कीं गर्भांधु नेत्रपातीं ॥ न सांडी लवलवां ॥३३॥
बाळकाचिया लाथां ॥ अधिक पान्हावे माता ॥
तैसी मी पुसतों कथा ॥ स्वामी तुह्मां ॥३४॥
तुमचे कृपावचनीं ॥ उघडेल भक्तीची खाणी ॥
विश्वासि पारणीं ॥ होति जाणा ॥३५॥
मग ह्मणे मुनीश्वर ॥ तूं हरिकथेसि सादर ॥
तुझे प्रश्नें हरिहर ॥ येतील वाचे ॥३६॥
विचक्षण मिळेल श्रोता ॥ तरी संतोषेल वक्ता ॥
आतां सांगों कृष्णकथा ॥ तुजप्रती ॥३७॥
आतां होईं सावधान ॥ सांगों श्रीहरीचें कथन ॥
जेणें संतोषे मन ॥ वैष्णवाचें ॥३८॥
हे श्रीहरीची कथा ॥ भावें ऐक गा भारता ॥
तरी क्षण न लागतां ॥ उद्धरसी ॥३९॥
जरी होईल दुश्चित्तता ॥ तरी व्यर्थ जाईल कथा ॥
कुपात्रावरी अमृता ॥ सांडिजे जैसें ॥४०॥
पूर्वीं कश्यपाचा सुत ॥ दितीपोटीं जन्मत ॥
वज्रनाभ नामें दैत्य ॥ प्रतापीया ॥४१॥
सुनाभ नामें महावीर ॥ तो धाकुटा सहोदर ॥
प्रतापप्रौढीचा डोंगर ॥ कथिला तो ॥४२॥
कनकमेरुचे पाठारीं ॥ त्याची असे वज्रपुरी ॥
द्वादश योजनें विस्तारीं ॥ वस्ती नगर ॥४३॥
त्या भोंवतीं उपनगरें ॥ ग्रामखेडीं अपारें ॥
आणि बहुत विचित्रें ॥ असंख्यात ॥४४॥
तो दितीचा नंदन ॥ तपोबळें संपूर्ण ॥
तेणें हटयोगें चतुरानन ॥ प्रसन्न केला ॥४५॥
दिव्यसहस्त्र वर्षवरी ॥ शीतउष्णें निराहारी ॥
मौनमुखी ब्रह्मचारी ॥ वज्रनाभ तो ॥४६॥
ऐसें तप देखोन ॥ ब्रह्मा जाहला प्रसन्न ॥
मग तयापाशीं येवोन ॥ माग ह्मणे ॥४७॥
दैत्य ह्मणे दातारा ॥ म्यां जिंकावें सुरवरां ॥
आणि अजित चराचरा ॥ करावें मज ॥४८॥
हे पृथ्वीचे भूपाळ ॥ अष्टदिशांचे दिक्पाळ ॥
चंद्रसूर्य सकळ ॥ आज्ञेंत माझे ॥४९॥
आणि मज अमर करीं ॥ न मरेंचि शस्त्रास्त्रीं ॥
काष्ठें कुजंत्रीं ॥ नाहीं मरण ॥५०॥
देव आणि राक्षस ॥ कीं पन्नग मनुष्य ॥
त्यांचे हस्तें नाश ॥ नसो मज ॥५१॥
पक्षी पतंग श्वापद समस्त ॥ तया सर्वांशीं मी अजित ॥
क्षत्रियापासाव मृत्य ॥ नव्हे मज ॥५२॥
आणि जितका शरीरधारी ॥ वर्तत असे चराचरीं ॥
मरण त्याचे करीं ॥ न यावें मज ॥५३॥
पुरुष अथवा नारी ॥ आंगें वर्तत भूमीवरी ॥
मरण त्यांचे करीं ॥ न यावें मज ॥५४॥
मग ब्रह्मा ह्मणत ॥ जितका आंगें वर्तत ॥
त्यांचेनि हातें मृत्य ॥ नाहीं तुज ॥५५॥
शस्त्रा आणि अस्त्रा ॥ मरण नाहीं समग्रा ॥
सकळ चराचरा ॥ अजित तूं ॥५६॥
ऐसा ब्रह्मा बोलिला ॥ तयासि वर दीधला ॥
मग ब्रह्मा गेला ॥ सत्यलोकासी ॥५७॥
ऐसा वर होतां तयासी ॥ मग तो आला नगरासी ॥
दैत्य तयापाशीं ॥ मिळाले समस्त ॥५८॥
अश्व रथ कुंजरां ॥ गणित नाहीं पायभारां ॥
सर्व सामुग्री शस्त्रास्त्रा ॥ पावला तो ॥५९॥
पृथ्वीचिया भूपाळां ॥ जिंकिलिया सकळां ॥
आणि अष्टदिक्पाळां ॥ आज्ञा त्याची ॥६०॥
ऐसा तो राज्य करित ॥ वज्रनाभ दैत्य ॥
कवणासि नाटोपत ॥ समरंगणीं ॥६१॥
जितुके पृथ्वीचे भूपाळ ॥ दिव्य आणि प्रबळ ॥
त्यांवरी राज्य केलें अढळ ॥ तया दैत्यें ॥६२॥
सुनाभ बंधु धाकुटा ॥ तो पराक्रमी लाटा ॥
राज्य करी अलोटा ॥ वज्रपुरीचें ॥६३॥
तंव कोणे ऐके अवसरीं ॥ प्रधानातें ह्मणे अवधारीं ॥
आमुची वृत्ति अमरपुरी ॥ भोगीतसे इंद्र ॥६४॥
आह्मी कश्यपाचे असतां नंदन ॥ दोघां सारिखें भागदान ॥
तरी इंद्र कां अमरभुवन ॥ पावों शके ॥६५॥
तो वसे अमरापुरीं ॥ आह्मी मृत्युलोकीं अवधारीं ॥
तरी जावोनि तयावरी ॥ भाग मागों ॥६६॥
आतां जावोनि वेगेंशीं ॥ मागेन अमरपुरीच्या विभागासी ॥
नेदी तरी तयाशीं ॥ युद्ध करीन ॥६७॥
तंव प्रधान करी बोधु ॥ पिता तैसा ज्येष्ट बंधु ॥
तयासि न करावा विरोधु ॥ सत्य राया ॥६८॥
तुह्मां काय असे उणें ॥ कासया अमरावती घेणें ॥
जें दीधलें चतुराननें ॥ तेंचि भोगावें ॥६९॥
मग तयाचिया वचना ॥ दैत्य ह्मणे गा प्रधाना ॥
तूं बोलतोसि जया वचना ॥ तें राजनीतीवेगळें ॥७०॥
॥श्लोक॥ असंतुष्टा द्विजा नष्टाः संतुष्टा ये च पार्थिवाः ॥
सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जाश्च कुलांगनाः ॥
॥टीका॥ विप्र संतोषी असावे ॥ रायें नाना हव्यास करावे ॥
चित्तीं संतुष्ट नसावें ॥ राज्य करितां ॥७१॥
आणि असती वारांगना ॥ त्यांही त्यागावें सल्लजपणा ॥
परि धरावें सलज्जपणा ॥ कुलांगनाहीं ॥७२॥
राजा हिंडतां वाढे राज्य ॥ सार्वभौमत्व तेणेंचि सहज ॥
यास्तव जाणें लागे मज ॥ अमरावतीसी ॥७३॥
मग निघाला त्वरितीं ॥ वेगें पावला अमरावती ॥
सभे बैसला सुरपती ॥ वज्रनाभें देखिला ॥७४॥
मग त्या इंद्ररायासी ॥ दैत्य बोले वचनासी ॥
माझें वचन परियेसीं ॥ सुरपती तूं ॥७५॥
देवां प्रसवली अदिती ॥ आणि दैत्यमाता ते दिती ॥
परि कश्यप उभयां प्रती ॥ पिता सत्य ॥७६॥
तरी तुह्मां आह्मां अमरावती ॥ दोघां समान असोनि प्राप्ती ॥
आह्मां दीधली त्वां क्षिती ॥ मृत्युभार ॥७७॥
आतां सांडीं हे अमरावती ॥ जरी तुज देहप्रीती ॥
किंवा पावोनि शस्त्रघातीं ॥ देसी सांग ॥७८॥
सांडीं वेगीं सिंहासन ॥ जंव आहे महिमान ॥
मी कोपल्या त्रिभुवन ॥ कोण रक्षी ॥७९॥
धाकें ह्मणे सुरेश्वरु ॥ आह्मासि वडील असे गुरु ॥
तयासि सांगों विचारु ॥ तंव राहिजे शांत ॥८०॥
महाज्ञानी बृहस्पती ॥ तया सांगे सुरपती ॥
या अरिष्टाची शांती ॥ केंवि होय ॥८१॥
मग ह्मणे देवगुरु ॥ त्यासि ब्रह्मयाचा वरु ॥
तरी समरंगणीं शार्ङगधरु ॥ पुरों न शके ॥८२॥
परि सांगावें कश्यप अदिती ॥ तीं बुद्धीतें योजिती ॥
मग अविलंबें शांती ॥ होय याची ॥८३॥
आणिक असे विचारु ॥ बुद्धीनें काळ हरुं ॥
हरिश्चंद्रें आपुला कुमरु ॥ राखिला जैसा ॥८४॥
मग विचारी सुरेश्वरु ॥ कैसा राखिला कुमरु ॥
तैं बोले देवगुरु ॥ इंद्राप्रती ॥८५॥
हरिश्चंद्र राज्य करितां ॥ तया पुत्र नाहीं सर्वथा ॥
हे ऐकें कथा ॥ ब्रह्मपुराणींची ॥८६॥
हरिश्चंद्रे पुत्राकारणें ॥ केलीं तपें दारुणें ॥
होमहवनें उद्यापनें ॥ केलीं बहुत ॥८७॥
जळीं करितां अनुष्ठान ॥ वरुणमंत्रें जालें साधन ॥
तंव तो येवोनि वरुण ॥ प्रसन्न झाला ॥८८॥
वरुण ह्मणे रायासी ॥ काय इच्छा असे मानसीं ॥
ते माग मजपासीं ॥ देईन तुज ॥८९॥
तंव ह्मणे हरिश्चंद्र ॥ मज द्यावा यक पुत्र ॥
ह्मणोनियां नमस्कार ॥ केला तयासी ॥९०॥
मग ह्मणे प्रतीचीनाथ ॥ तुज होईल सुलक्षणी सुत ॥
परि तो मज द्यावा त्वरित ॥ मागतांची ॥९१॥
मग राव विचारी मनीं ॥ मी पुत्र न देखें स्वप्नीं ॥
तो देखों दृष्टी भरोनी ॥ डोळां आपुल्या ॥९२॥
पुत्र जालिया भूषण ॥ माझें हरेल पितृऋण ॥
मग पुत्र देईन ॥ तुमच्या करीं ॥९३॥
स्वस्थाना गेला वरुण ॥ रायासि वर देवोन ॥
राव नगरा येवोन ॥ प्रवेशे मंदिरीं ॥९४॥
हरिश्चंद्र आला मंदिरासी ॥ रावराणी संतोषी ॥
गर्भ राहिला तारामतीसी ॥ तये वेळीं ॥९५॥
तारामती जाहली प्रसूती ॥ नाम ठेविलें पुरोहितीं ॥
रोहिदास सुमुहूर्तीं ॥ पुत्र जाहला ॥९६॥
रायासि पुत्र जाहला ॥ सोहळा बरवा केला ॥
पुत्र देखे तंव भला ॥ पवित्ररावो ॥९७॥
स्नेहें पाहिलें पुत्रमुख ॥ रायासि जाहलें सुख ॥
मग गुरु ह्मणे ऐक ॥ राया इंद्रा ॥९८॥
जालिया दिवस बारा ॥ जाणिवलें प्रतीचेश्वरा ॥
त्वरें मागावया पुत्रा ॥ आला वरुण ॥९९॥
वरुण आला अयोध्येसी ॥ भेटला हरिश्चंद्रासी ॥
मागतसे पुत्रासी ॥ तयेवेळीं ॥१००॥
राया भाष्य करीं सत्य ॥ देगा हें पुत्र अपत्य ॥
येरु ह्मणे निघालिया दंत ॥ न्यावें तुह्मीं ॥१॥
ऐसी हरिली ती वेळा ॥ मग आला मासां सोळा ॥
राया देइं गा बाळा ॥ रोहिदासासी ॥२॥
राया देईं रोहिदास ॥ आह्मां नरयागाचा उद्देश ॥
बत्तीसलक्षणी पुरुष ॥ हाचि असे ॥३॥
मग ह्मणे हरिश्चंद्र ॥ हा व्रतबंधावीण शूद्र ॥
व्रतबंधा नंतरें पुत्र ॥ न्यावा तुह्मीं ॥४॥
ऐसें क्रमिलिया दिवसां ॥ मग आला आठा वर्षी ॥
देगा रोहिदासा ॥ ह्मणवोनी ॥५॥
राव ह्मणे रोहिदासा ॥ अंगीं अज्ञान वयसा ॥
विद्या शिकवूं बहुवसा ॥ तंव राहिजे तुह्मीं ॥६॥
ऐसी टाळिली ते वेळा ॥ तंव भरलीं वर्षें सोळा ॥
पुत्रें शस्त्रविद्या सकळा ॥ अभ्यासिलिया ॥७॥
तो हरिश्चंद्राचा नंदन ॥ शस्त्रविद्येंत जाहला निपुण ॥
मागुती आला वरुण ॥ पुत्र मागों ॥८॥
येरु ह्मणे हरिश्चंद्रा ॥ आतां देईं गा कुमरा ॥
शस्त्रास्त्रविद्या समग्रा ॥ जाहल्या यासी ॥९॥
राव ह्मणे वचन सत्य ॥ तुह्मीं काळ क्रमिला बहुत ॥
आतां नेइंजे अपत्य ॥ गजशाळेहोनी ॥११०॥
तंव ते वरुणाचे भृत्य ॥ तयासि धरुं धांवले समस्त ॥
ते बांधिले क्षणांत ॥ रोहिदासें ॥११॥
मग धरुं गेला वरुण ॥ येरें चढविला धनुष्यासि गुण ॥
वोढी वोढोनि आकर्ण ॥ बाण योजिता जाहला ॥१२॥
बाळ बोले वरुणासी ॥ पुढें पाय जरी घालिसी ॥
तरी तूं वृथा मरसी ॥ जाण वरुणा ॥१३॥
वरुण विचारी मानसीं ॥ ह्मणे हा क्षत्रिय सूर्यवंशी ॥
महा योद्धा तामसी ॥ नासील याग ॥१४॥
हरिश्चंद्र कोपला तयासी ॥ मग तो पळोनि गेला वनासी ॥
वरुणही गेला स्थानासी ॥ आपुलिया ॥१५॥
मग कोणे एके अवसरीं ॥ हरिश्चंद्र गेला नदीतीरीं ॥
स्नान करितां वरुण धरी ॥ जळामाजी तयातें ॥१६॥
तें ऐकिलें नंदनें ॥ हरिश्चंद्र धरिला वरुणें ॥
मग केलें धावणें ॥ रोहिदासें ॥१७॥
अभिमंत्रोनि अग्निबाण ॥ उदकीं घातलें संधान ॥
आपुला पिता सोडवून ॥ नेला पुत्रें ॥१८॥
वरुण राहिला निवांत ॥ पुत्रें चुकविला अनर्थ ॥
हरिश्चंद्रें रक्षिला सुत ॥ ऐशियापरी ॥१९॥
मग अजीगर्ताचा सुत ॥ हरिश्चंद्रें घेतला विकत ॥
तो देवोनि प्रतीचीनाथ ॥ तोषविला ॥१२०॥
यापरी ते काळवेळा ॥ रायें राखिली तयेवेळां ॥
गुरु सांगे युक्तिकळा ॥ राया इंद्रासी ॥२१॥
गुरु ह्मणे सुरपती ॥ ऐसी आहे राजनीती॥
वैरी आणि व्याधीप्रती ॥ न करावा आळस ॥२२॥
तरी त्वां वज्रनाभासी ॥ ऐसें बोलावें नेमेसीं ॥
कीं वडील पिता सकळांसी ॥ कश्यप असे ॥२३॥
आपण जाऊं तयापासीं ॥ तो निवडील न्यायासी ॥
ऐसें वज्रनाभासी ॥ ह्मणावें तुह्मीं ॥२४॥
यापरी करोनि विचार ॥ सभेसि आला सुरेश्वर ॥
वज्रनाभाप्रति मंत्र ॥ अनुवादला ॥२५॥
ह्मणे आमुचा पिता कश्यप ॥ तया सांगों श्रमताप ॥
तो देईल निरोप ॥ तेंचि करणें ॥२६॥
तें मानलें दैत्यासी ॥ दोघे आले वेगेसीं ॥
अदिती आणि कश्यपासी ॥ भेटावया ॥२७॥
तंव तो समुद्राचे तीरीं ॥ कश्यप घेवोनि अदिती सुंदरी ॥
यज्ञस्वाहाकारीं ॥ करीतसे ॥२८॥
दोघे आले तये स्थानीं ॥ भेटले पितया येउनी ॥
सांगते जाहले वचनीं ॥ निजवृत्त ॥२९॥
दोघे धरोनि चरण ॥ सांगती आपुलें वर्तमान ॥
तुह्मीं वडील आपण ॥ करावी नीती ॥१३०॥
मग मुनी तयांप्रति ॥ ऐसा विचार सांगती ॥
आह्मी असों दीक्षावृत्तीं ॥ यज्ञाचिया ॥३१॥
यज्ञाची होय जों समाप्ती ॥ तंव राहावें निश्चिती ॥
बोलोंनये अन्य उक्ती ॥ यागसमयीं ॥३२॥
होईल यागपूर्णाहुती ॥ मग करुं भागस्थिती ॥
तों राहावें निवांतीं ॥ ह्मणे कश्यप ॥३३॥
तें मानलें दोघांजणां ॥ मग निघाला दैत्यराणा ॥
पितयाच्या वचना ॥ दीधला मान ॥३४॥
यागा होईल पूर्णाहुती ॥ मग घेईन अमरावती ॥
ऐसें ह्मणोनि निश्चिती ॥ गेला वज्रनाभ ॥३५॥
आपुले भृत्य ठेवोनी ॥ तयांसि ह्मणे वेगें करोनी ॥
पूर्णाहुती होतां मजलागुनी ॥ सांगों यावें ॥३६॥
ऐशा युक्तीतें करोनी ॥ दैत्य निघाला तेथुनी ॥
वज्रपुरीं येवोनी ॥ प्रवेशला ॥३७॥
भेटता झाला सुनाभासी ॥ सांगितलें वृत्तांतासी ॥
मग गेला मंदिरासी ॥ आपुलिया ॥३८॥
तंव आली प्रभावती ॥ पितयाजवळी प्रीतीं ॥
कन्या असे आवडती ॥ वज्रनाभासि ॥३९॥
ते वज्रनाभाची आत्मजा ॥ जिचें स्वरुप निर्मी गिरिजा ॥
प्रसन्न करोनि वृषभध्वजा ॥ नवस करोनी ॥१४०॥
तिची सुशीला माता ॥ ते वज्रनाभाची कांता ॥
तयेनें गौरीसि पूजितां ॥ प्रसन्न केलें ॥४१॥
मग गौरी ह्मणे प्रसन्न ॥ येरी मागे कन्यारत्न ॥
जें त्रिभुवनीं मनमोहन ॥ द्यावें मज ॥४२॥
कीं मदनाचा प्रयत्न ॥ व्हावया उत्तीर्ण ॥
गौरीनें रचिलें कन्यारत्न ॥ मदनाकारणें ॥४३॥
मदन जाळिला त्रिपुरारीं ॥ पुत्र मागितला मुरारीं ॥
तो अनंग जन्मला द्वापारीं ॥ सानंगपणें ॥४४॥
शिवें कृष्णासि दीधला मदन ॥ तेंचि गौरीनें लक्षोन ॥
हे कन्या रचिली ह्मणोन ॥ तया लागीं ॥४५॥
आतां असो हे योग्यता ॥ जयेसि घडी विश्वमाता ॥
तयेसि मी प्राकृता ॥ केंवि वर्णूं ॥४६॥
परि जिव्हा न राहे आकुळी ॥ हे हरिवंशींची बोली ॥
ह्मणोनि ते वर्णिली ॥ दैत्यकुमरी ॥४७॥
स्वरुपें सुंदर गोरटी ॥ ठेंगणी दीर्घ ना धाकुटी ॥
चंद्ररेखा व्यंकटीं ॥ रुळती नखीं ॥४८॥
चंद्राऐसें वदन ॥ परि ते उपमा न्यून ॥
चंद्रासि शापदान ॥ गणेशाचें ॥४९॥
चंद्रबिंब विटाळलें ॥ गुरुद्रोहें काळवंडलें ॥
राहुमुखींचें गळालें ॥ क्षीणत्व तया ॥१५०॥
ते उपमा काय कारण ॥ हे कृष्णपक्षी संपूर्ण ॥
यदुवंशप्रभापूर्ण ॥ रत्नकळा ॥५१॥
उपमा देऊं कमळिणी ॥ ते मधुकराशीं व्यभिचारिणी ॥
अस्त जालिया तरणी ॥ वैधव्य पावे ॥५२॥
नेत्र उपमा व्यकंटीं ॥ देऊं हरिणीबरवंटी ॥
परि त्याही रानटी ॥ हे सुकुमार ॥५३॥
भोंवया अत्यंत सुरेखा ॥ जैशा धनुष्याच्या रेखा ॥
तैशियापरी सुरेखा ॥ दिसताती ॥५४॥
नेत्र जैसें कमळ ॥ ऐसे सदा सोज्वळ ॥
बुबुळ अलिकुळ ॥ शोभा दिसे ॥५५॥
उदरीं शोभे रोमरेखा ॥ जाणों कृष्ण पिपीलिका ॥
नाभिरंध्रीं अधोमुखा ॥ अनुक्रमें ॥५६॥
सरळमांसाळ भुजदंड ॥ जैसी नागिणीची सोंड ॥
हेमरंग उदंड ॥ मुद्रिकांसी ॥५७॥
माज दिसे मुष्टीभरी ॥ देऊं उपमा केसरी ॥
तुंबीफळांचे परी ॥ वक्षयुगुळें ॥५८॥
चंद्र लज्जित देखतां वदन ॥ सिंह लज्जित कटि पाहोन ॥
करींद्रगमनातें पाहुन ॥ लज्जित होय ॥५९॥
पृष्ठीसि रुळे वेणी ॥ जैसी ते सर्पिणी ॥
गुंफित तो सिंमतमणी ॥ माथां सर्पिणीसी ॥१६०॥
भाळीं शोभे कस्तूरी ॥ जैसी ते अर्धचंद्राची चिरी ॥
भांग भरिला शिरीं ॥ मुक्ताफळीं ॥६१॥
कर्णीं कर्णपत्रें बरवंटी ॥ मुक्ताफळें चोखटीं ॥
विरहव्यथेनें कष्टी ॥ जाहली दिसे ॥६२॥
मुखीं रंगलें तांबूल ॥ दशन रत्नांची कीळ ॥
साक्ष जेवीं प्रवाळ ॥ अधरपुटीं ॥६३॥
करमुद्रिका सुलक्षणी ॥ अलंकार नानारत्नी ॥
नासिकीं मुक्त सुपाणी ॥ सोज्वळ दिसे ॥६४॥
कांसे शोभे पाटोळी ॥ वर मधूची घातली चोळी ॥
रत्नहार मुक्ताफळीं ॥ कंठीं शोभे ॥६५॥
ते वाचेनें अति मंजुळ ॥ बोले जैशी कोकिळ ॥
हंसगमनी सोज्वळ ॥ पद्मिणी ते ॥६६॥
धरोनि सख्यांचा कर ॥ घेवोनियां उपचार ॥
दुर्वासऋषेश्वर ॥ नित्य पूजी ॥६७॥
तो रुद्राचा अवतार ॥ तयाप्रति मागे वर ॥
भक्तिभावें ऋषेश्ववर ॥ प्रसन्न केला ॥६८॥
ऋषि जाणोनि मानसीं ॥ बोले प्रभावतीसी ॥
तूं वर सुंदर पावशी ॥ सद्वंशाचा ॥६९॥
तूं जन्मसावित्री होसी ॥ चंद्रार्क वरी राहसी ॥
क्षत्रियोत्तमवंशासी ॥ पावसी तूं ॥१७०॥
तुह्मां उभयतां नाहीं मरण ॥ सुखें नांदाल राज्य करुन ॥
पति भोगिशी रत्न ॥ जन्मवरी ॥७१॥
प्रसन्न होतां ऋषेश्वर ॥ मग ते जाहली हर्षनिर्भर ॥
सत्वर पावली मंदिर ॥ जेथें रावो ॥७२॥
मुखींचिया तांबूला ॥ वोडविलें करकमळा ॥
रायें उचलिली बाळा ॥ बैसविली मांडीवरी ॥७३॥
राव पाहे दृष्टीं ॥ तंव तारुण्यें बरवंटी ॥
कंचुकी पीन गोरटी ॥ उंचावली दिसे ॥७४॥
तयेसि देखोनि उपवर ॥ राव ह्मणे करुं स्वयंवर ॥
समस्त राजकुमर ॥ बोलावूनियां ॥७५॥
तंव वाचा झाली अंतरीं ॥ इचा वर तो तुझा वैरी ॥
कुळा करील बोहरी ॥ ऐकें वज्रनाभा ॥७६॥
ऐसी वार्ता ऐकिली ॥ रायासि चिंता प्रवर्तली ॥
तंव बुद्धी आठवली ॥ वज्रनाभासी ॥७७॥
मग सप्तखणांची माडी ॥ राखण ठेवी कडोविकडी ॥
प्रभावती सैंवराची घडी ॥ उपेक्षिली ऐसी ॥७८॥
प्रभावतीसि रक्षण ॥ वज्रनाभें ठेवून ॥
मग निश्चिंत झालें मन ॥ तया दैत्याचें ॥७९॥
अंतरीं विचारी सुंदरी ॥ ह्मणे आतां न घडे उरी ॥
पितया मरण निर्धारीं ॥ तें केंवि घडे ॥१८०॥
व्यासशिष्य वैशंपायन ॥ रायासि सांगे कथा पावन ॥
अखिल पातकां होय दहन ॥ श्रवणमात्रें करोनियां ॥८१॥
आतां असो हे प्रभावती ॥ इकडे व्याकुळ सुरपती ॥
ह्मणे कैशी करावी युक्ती ॥ दायादासी ॥८२॥
यागाची होईल समाप्ती ॥ दायाद घेईल अमरावती ॥
तरी जावें द्वारावती ॥ कृष्णभेटीसी ॥८३॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथमस्तबक मनोहरु ॥
प्रभावतीवर्णनप्रकारु ॥ द्वितीयोऽध्यायीं कथियेला ॥१८४॥
श्रीराधाकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्यासंख्या ॥१८४॥