श्रीगणेशाय नमः ॥
श्रीहरीच्या अनंत कथा ॥ फळ भारीं शोभती ग्रंथा ॥
ह्मणोनि कथाकल्पतरु सर्वथा ॥ नाम ठेविलें संतजनीं ॥१॥
असो पूर्वाध्यायाचे अंतीं ॥ द्वारके आला श्रीपती ॥
ऐसी कथा प्रभावती प्रती ॥ हंसिणीनें सांगितली ॥२॥
तंव प्रभावती ह्मणे हंसिणी ॥ दोन वृक्षांचे संघटणीं ॥
उत्पन्न होवोनियां अग्नी ॥ त्याचि वृक्षां जाळितो ॥३॥
मज झालिया तुझी भेटी ॥ विरहज्वर माझिये पोटीं ॥
उठिला तो तुझेनि बरवंटी ॥ शांत होऊं शकेना ॥४॥
तुवां सांगितली ते उखा ॥ तीस साह्य होती चित्ररेखा ॥
ह्मणोनि जोडला पति निका ॥ तैसें मज केंवि घडे ॥५॥
आणिक एक अवधारीं ॥ चित्ररेखा चातुर्य सुंदरी ॥
चित्रें लिहोनि क्षणाभीतरीं ॥ आणिला वर तयेने ॥६॥
तूं पक्षिणी अससी अशक्त ॥ एवढें करवें कैसें गणित ॥
आतां त्यजावें हो जीवित ॥ ऐसें मज वाटतें ॥७॥
मग बोलिली ते हंसिणी ॥ नाभी नाभी कदा साजणी ॥
वेळेवांचोनि कमळिणी ॥ केंवि प्रकाशे सांग पां ॥८॥
होय सूर्याचा जैं प्रकाश ॥ तैं कमळिणी पावे विकास ॥
मग तो आपणचि सौरस ॥ होय तया सत्वर ॥९॥
तूं ह्मणसी पक्षिकुळें निर्बळ ॥ तरि आह्मीं भेटविला दमयंती नळ ॥
तेथें हंसचि होता येकल ॥ वर्हाडिकेसी सुंदरी ॥१०॥
आतां मी साह्य असें दुसरी ॥ आणि हंस माझे बरोबरी ॥
तरी इंद्रादिक क्षणांतरीं ॥ आणूं शकों येथें हो ॥११॥
मग पुसे प्रभावती ॥ कवण नळ दमयंती ॥
तयांची कैसी घडली संगती ॥ ते सांगें सविस्तर ॥१२॥
हंसिणी ह्मणे अवधारीं ॥ राजा चैद्य देशाभीतरीं ॥
वीरसेन महा क्षेत्री ॥ सूर्यवंशीं विख्यात ॥१३॥
तयाचा तो पुत्र नळ ॥ यशें पुण्यें कीर्तिशीळ ॥
काश भाषेचा निर्मळ ॥ तोचि येक भूपती ॥१४॥
तो कवणे एके काळीं ॥ खेळों आला व्याहाळी ॥
तंव राजहंस देखिला पाळीं ॥ सरोवराचे ॥१५॥
देखोनियां हेमकांती ॥ राव आला शीघ्रगती ॥
त्याते जाणोनि पुण्यकीर्ती ॥ न उडेचि हंस ॥१६॥
तयासि दोनी करपुटीं ॥ रायें धरिलें तळवटीं ॥
हात फिरवोनियां पाठीं ॥ हंसाप्रती पुसतसे ॥१७॥
तंव हंस बोले तयाप्रती ॥ भलें केलें हो पुण्यकीर्ती ॥
आतां मी निवालों तवहस्तीं ॥ पृष्ठिस्पर्शें ॥१८॥
ऐकतां राव झाला विस्मित ॥ ह्मणे तूं कोणाचारे दूत ॥
तुज येथें यावया निमित्त ॥ काय सांग ॥१९॥
आनंदोनि बोले राजहंस ॥ आह्मां ब्रह्मभुवनीं वास ॥
तुझा ऐकोनि गुणप्रकाश ॥ आलों येथें ॥२०॥
राया हेचि उत्कंठा अंतरीं ॥ तुजयोग्य आहे नोवरी ॥
ते सांगावया निर्धारी ॥ आलों असें ॥२१॥
मग उत्कंठेनें पुसे रावो ॥ तयेचा असे कोठें ठावो ॥
कोण देश कोण रावो ॥ पिता तियेचा असे पैं ॥२२॥
हंस ह्मणे वो अवधारीं ॥ वैदर्भदेशा भीतरीं ॥
कौंडिण्यपूर नामें नगरीं ॥ पवित्रपणें अत्यंत ॥२३॥
तेथें भीमक राज्य करी ॥ तयाची कन्या ते सुंदरी ॥
दमयंती नामें कुमरी ॥ रुपें गुणें वरिष्ठ ॥२४॥
ते लावण्याची कूपिका ॥ कोमळ जैसी सुमनकळिका ॥
वदनीं तुळितां शशांका ॥ उणीव येत ॥२५॥
ते सुंदर आणि सकोमळ ॥ जैसें फुललें कनक कमळ ॥
तयेचे गतीचें पाउल ॥ नये आह्मां टाकितां ॥२६॥
जानुजघनींची पाहतां शोभा ॥ उणा वाटे कर्दळीगाभा ॥
ऐसी तिची अंगप्रभा ॥ नवर्णवे सर्वथा ॥२७॥
कंठीं ल्याइली मुक्तावळी ॥ कीं नक्षत्रमाळा गगनमंडळीं ॥
चंद्रकांती असे निढळीं ॥ अखंड जीचे ॥२८॥
ऐसी ते निर्मळ लता ॥ पतिव्रतांची जीविता ॥
करीं स्त्राव असे अमृता ॥ अखंड तयेचे ॥२९॥
तरी ते दमयंती सती ॥ तुज वरील गा भूपती ॥
तूंचि अससी पुण्यकीर्ती ॥ लोकांमाजी वरिष्ठ ॥३०॥
मग ह्मणतसे नैषधु ॥ तूं हो माझा प्रेमबंधु ॥
तुझिये वचनीं सर्व खेदु ॥ हरिला असे आमुचा ॥३१॥
आतां त्वां जावें तेथवरी ॥ प्रबोधावी ते सुंदरी ॥
कीं आह्मांसि सैंवरीं वरी ॥ करीं ऐसा प्रयत्न ॥३२॥
यापरि बोलोनियां तांतडी ॥ हंस सोडिला तयेवेळीं ॥
राव आकाशीं न्याहाळी ॥ उड्डाण त्याचें ॥३३॥
नळ जाहला असे विकळ ॥ विरहाग्नीचे उठले ज्वाळ ॥
विरह तापें तापला प्रबळ ॥ तयेवेळीं भूप तो ॥३४॥
हंस पावला कौंडण्यपुरा ॥ वृक्षछायेसि सरोवरा ॥
रम्य देखोनियां तीरा ॥ उतरला तेथें ॥३५॥
नावेक केला कुरवाळा ॥ सुवास घेतला कमळां ॥
तंव तेथें आली राजबाळा ॥ दमयंती ॥३६॥
सवें स्त्रियांचा संभारु ॥ आली गौरीची पूजा करुं ॥
मग पावली सरोवरु ॥ हंस जेथें ॥३७॥
दमयंती लावण्य सुंदरी ॥ निघाली असे सरोवरीं ॥
तंव देखती जाहली नेत्रीं ॥ राजहंसा ॥३८॥
सख्यांतें ह्मणे राजबाळी ॥ नावेक असावें वनस्थळीं ॥
मी हा धरीन करतळीं ॥ आपुलीया राजहंस ॥३९॥
मग निघाली शीघ्रगती ॥ वेगीं आली हंसाप्रती ॥
तेणें नेली पुढपुढती ॥ चालवोनी तयेतें ॥४०॥
जाऊनि बैसला रहाटीं ॥ तयेसि आरंभिल्या गोष्टी ॥
तंव ते लज्जेनें वरवंटी ॥ मनीं शंकली वेल्हाळी ॥४१॥
मग बोले राजहंस ॥ मी नव्हे जी यक्ष राक्षस ॥
नव्हे भूत आणि पिशाच ॥ सत्यजाण सुंदरी ॥४२॥
जाणवली भीमकीची कीर्ति ॥ आणि तवरुपाची आकृती ॥
कीं भूमंडळीं दमयंती ॥ येक रत्न तूंचि पैं ॥४३॥
ऐसें सुंदर रुप तुझें ॥ पहावया इच्छी मन माझें ॥
ह्मणोनि आलों मी याच काजें ॥ येथंवरी राजसे ॥४४॥
आतां तुज देखतां सत्य ॥ पुरला माझा मनोरथ ॥
तुज घडविता येक चित्त॥ उमा होती वाटतें ॥४५॥
तुझिये स्वरुपाची सरी ॥ नदेखें त्रिभुवना भीतरीं ॥
तूं कंदर्पाची लहरी ॥ लावण्यलतिका ॥४६॥
तुझिये तारुण्य वयसा ॥ वरी बरवेपणाचा ठसा ॥
आणि रुपा तुकिजे ऐसा ॥ नाहीं वर त्रिभुनीं ॥४७॥
जरी वानूं पूर्वेचा इंद्र ॥ परि तो परद्वारी साचार ॥
यम वानूं तरी निष्ठुर ॥ कोमळ नव्हे ॥४८॥
आणिक पृथ्वीचे भूपाळ ॥ म्यां पाहिले हो सकळ ॥
ते दुर्दर तूं कमळ ॥ मज पाहतां ॥४९॥
परि त्यांत गे पाहतां ॥ येक आला माझिये चित्ता ॥
तो तुज वरील तरी उभयतां ॥ उघडे दैव ॥५०॥
सांगतों ऐक सूर्यवंशीं ॥ पवित्र रावो नैषधदेशीं ॥
प्रौढीं आथिला गुणराशी ॥ वीरसेन भूप तो ॥५१॥
त्या वीरसेनेचा बाळ ॥ पुण्यवंत राव नळ ॥
तूं पद्मिणी तो अलिकुळ ॥ सत्य असे ॥५२॥
तो काशभाषेचा पवित्र ॥ संग्रामीं महा धीरवीर ॥
कीं लावण्यामृत सागर ॥ प्रथम वयसा ॥५३॥
सर्व विद्येमाजी कुशळ ॥ आचार संपन्न महाशीळ ॥
तो येक वर्णिजे हो नळ ॥ माझिये दृष्टीं ॥५४॥
मज करावया अनुवाद ॥ पक्षिमानवां काय संबंध॥
परि तुज देखतां आनंद ॥ झाला ह्मणोनि बोलिलों ॥५५॥
हेंचि मनीं असे कारण ॥ जे कनकासि मिळवावें रत्न ॥
घडी तयाचे होती पूर्ण ॥ मनोरथ ॥५६॥
अहो कनकाचे कोंदणीं ॥ माणिका तेज होतसे दुणी ॥
ह्मणोनि बोलिलों दृष्टांतवचनीं ॥ तुजलागीं कळावया ॥५७॥
मग बोले ती दमयंती ॥ तुझी अमृतारुपा गा भारती ॥
तेणें निवालें सुललितीं ॥ कर्णद्वारें प्राशुनी ॥५८॥
माझिये मनींचें आर्त ॥ त्वां सांगितलें हो समस्त ॥
परि अग्नि शिंपिजे घृत ॥ तैसें जाहलें ॥५९॥
तूं मज पावलासि देवा ॥ बोलसी मनींचा गुप्त भाव ॥
त्वां फेडिला सर्व संदेह ॥ वरशुद्धीचा ॥६०॥
हंसा ऐसा तो नृपनाथ ॥ मज केंवी होय प्राप्त ॥
हा तरी पितयासि वृत्तांत ॥ सांगतां नये ॥६१॥
चंद्र पिकलासे अंबरीं ॥ तें पिक घ्यावें कीं चकोरीं ॥
तेथें यत्न करितां अन्यत्रीं ॥ केविं पाविजे ॥६२॥
जेणें पूजिली असेल गौरी ॥ ते नळा पावेल शेजारीं ॥
येवढी कैंची पां किंकरी ॥ मज दैवरेखा ॥६३॥
तरि नळराय चक्रवर्ती ॥ मज केंवीं होय त्याची प्राप्ती ॥
ऐसी दुःखें ते दमयंती ॥ बोलिली हंसा ॥६४॥
मग हंस बोले उत्तर ॥ त्वां मांडावें हो सैंवर ॥
तेथें पृथ्वीचे येतील समग्र ॥ राव देखें ॥६५॥
त्यांमाजी तो भूपाळ नळ ॥ सैंवरा येईल पुण्यशीळ ॥
मग वोळखोनि तात्काळ ॥ माळ घालीं ॥६६॥
मी जाऊन सांगेन त्यासी ॥ पाठवीन हो सैंवरासी ॥
ऐसें वचन दमयंतीसी ॥ सांगे हंस ॥६७॥
मग बोले ते दमयंती ॥ हंसा जावें त्वरितगती ॥
मज घालीं तयाचे चित्तीं ॥ रुपविलासें ॥६८॥
ऐसें ऐकतां पावला सुख ॥ ह्मणे मीं तुह्मांसि करीन ऐक्य ॥
तुज नेईन अवश्यक ॥ नळाजवळी ॥६९॥
मी आतां जातों येथुनी ॥ तया आणितों वशकरुनी ॥
अथवा देतों पाठवूनी ॥ सैंवरासी ॥७०॥
तंव पातला सखिजन ॥ हंसें पाहूनि केलें उड्डाण ॥
नळाप्रति नेलें मन ॥ दमयतीचें ॥७१॥
सहचरी पुसती काय झालें ॥ येरी विरहें बरळ बोले ॥
आंगारे लावोनि ह्मणती झडपिलें ॥ हंसभूतें इयेसी ॥७२॥
त्यांहीं आणिली मंदिरीं ॥ चित्रशाळेसि सुंदरी ॥
उश्वास टाकोनि दुस्तरी ॥ मंचकी बैसे ॥७३॥
मग ह्मणत असे माता ॥ सखये तुझा विंचरुंदे माथा ॥
हात लावी तंव व्यथा ॥ दिसे मदनाची ॥७४॥
अंगीं भरला महाज्वर ॥ तेणें मातेचा पोळला कर ॥
मग तयेसि पडिला विचार ॥ दमयंतीचा ॥७५॥
इसी असतां तारुण्यमेळ ॥ व्याधीविण जीव का व्याकुळ ॥
तरी निश्चयें जाळितो विरहानळ ॥ इचे अंगीं ॥७६॥
अंगा लावितां मलयागर ॥ तंव अधीकचि उठे ज्वर ॥
ह्मणोनि मातेनें मानिला विचार ॥ ज्वरविरहाचा ॥७७॥
भीमक आला मंदिरीं ॥ तयासि ह्मणतसे अंतुरी ॥
दमयंतीसि पहावा सैंवरीं ॥ प्राणेश्वर ॥७८॥
ऐसें ऐकतां उत्तर ॥ तंव सावध जाहली सुंदर ॥
मग मातेनें मानिला निर्धार ॥ तेंचि करण्याचा ॥७९॥
इकडे राव बैसला भंद्रीं ॥ बोलाविले प्रधान गुरुमंत्री ॥
ह्मणे सैंवर मांडिजे सुंदरी ॥ दमयंतीचें ॥८०॥
कुंकुमपत्रिका लिहिल्या मेळें ॥ भूपांसि पाठविली मूळें ॥
सकळ देशींचीं राजकुळें ॥ बोलाविलीं रायें ॥८१॥
हंस गेला नळाप्रती ॥ तया सकळ सांगितली स्थिती ॥
म्यां तुज वश केली दमयंती ॥ ह्मणे हंस ॥८२॥
तयेचें मांडलें स्वयंवर ॥ तुह्मीं तेथें जावें शीघ्र ॥
ऐसें सांगोनि उत्तर ॥ गेला हंस स्वस्थळा ॥८३॥
हंस गेलिया सत्यलोका ॥ आली भीमकाची पत्रिका ॥
थोरथोरां सकळिकां ॥ पाठवी रावो ॥८४॥
तें नारदा झालें श्रुत ॥ कीं सैंवर दमयंतीचें होत ॥
ह्मणे कांहीं करावी मात ॥ सैवरीं या ॥८५॥
मग पर्वत आणि नारदमुनी ॥ शीघ्र गेले स्वर्गभुवनीं ॥
इंद्र पुसे विनीत वचनी ॥ नारदासी ॥८६॥
अहो भूमंडळींचे भूपती ॥ सदां झुंजतां नावरती ॥
धारातीर्थी मृत्यु पावती ॥ नित्य येती स्वर्गातें ॥८७॥
आजि जाहले दिवस दोन्ही ॥ कोणी नयेती अमरभुवनीं ॥
तरि तयांचें युद्ध कैसेनी ॥ राहिलें असे निवांत ॥८८॥
ते भूमंडळींची कथा ॥ आणिसी गा ब्रह्मसुता ॥
ते कवण्या गुणें आतां ॥ स्थिरावले ॥८९॥
तयां काय जाहलें उणें ॥ युद्ध राहिलें कवण्या गुणें ॥
तव नारद बोले वचनें ॥ इंद्राप्रती ॥९०॥
सुरपते कौंडण्यपुर नगरीं ॥ राया भीमकाचे घरीं ॥
रुपें गुणें वयें साजिरी ॥ दमयंती ते ॥९१॥
उपमा देऊं अप्सरा ॥ तरि त्या व्यभिचारी समग्रा ॥
हे त्यांहून आगळी सुंदरा ॥ पतिव्रतारत्न ॥९२॥
सकळ त्रैलोक्याभीतरीं ॥ तिये ऐसी नाहीं दुसरी ॥
स्त्रवत असे अमृत करीं ॥ जयेचिया ॥९३॥
चंद्रबिंब अखंड निढळीं ॥ कुंकुमलांछन असे कपाळीं ॥
तें रंगलें कोणेकाळीं ॥ सुगंधराजें ॥९४॥
तयेचें होतसे सैंवर ॥ तेथें गेले नृप धनुर्धर ॥
ह्मणोनि भूमंडळीं निर्वैर ॥ जाहलें असे ॥९५॥
ऐसिये वचनीं इंद्राप्रती ॥ नारदें सांगीतली स्थिती ॥
सभेमाजी समस्त ऐकती विस्मयें ॥ सभालोक ॥९६॥
तेथें बैसले होते दिक्पती ॥ यम अग्नि वरुण सुरपती ॥
त्यांहीं ऐकिली दमयंती ॥ रुपें गुणें आगळी ॥९७॥
मग ते बैसले विचारीं ॥ ह्मणती जावें कौंडण्यपुरीं ॥
सैंवरीं जिंकावी नोवरी ॥ आपुलिया प्रतापें ॥९८॥
जरी आपेंआप आह्मांसि वरी ॥ तरि ते गोष्टी बहु बरी ॥
नातरी कपटरुपें सुंदरी ॥ आणूं येथें ॥९९॥
ऐसी असोनि लावण्यलहरी ॥ केंविं भोगिजे नृपवरीं ॥
ह्मणोनि निघाले चारी ॥ दिशानाथ ॥१००॥
चौघे निघाले तत्काळ ॥ तंव मार्गीं भेटला नळ ॥
सैंवरा जातसे उतावेळ ॥ त्याचिमार्गें ॥१॥
दिक्पती देखती नळासी ॥ तो केवळ भासे रुपराशी ॥
पाहूनि मग त्या चौघांसी ॥ उपजला खेद ॥२॥
इंद्र ह्मणे गा अग्नियमा ॥ याच्या रुपें केली सीमा ॥
हा सैंवरीं असतां आह्मां ॥ न वरी दमयंती ॥३॥
आतां हाचि शिष्ट करावा ॥ तये जवळी बोधून पाठवावा ॥
कीं चौघांमध्यें वरावा ॥ दिक्पती एक ॥४॥
मग त्या पुण्यरुपा नळासी ॥ इंद्र पुसे त्याचिये नांवासी ॥
कवण देश कवण वंशासी ॥ जन्म तुझा ॥५॥
तंव ह्मणे तो राव नळ ॥ मी नैषधदेशींचा भूपाळ ॥
वीरसेनाचा असें बाळ ॥ नळनामें ॥६॥
मग तो ह्मणे सुरनाथ ॥ तूं होई गा आमुचा भृत्य ॥
दमयंतीसि आमुचें वृत्त ॥ सांगावें जाउनी ॥७॥
तंव नळ इंद्रासि पुसत ॥ तुमचा सांगाजी वृत्तांत ॥
मग इंद्रें सकळ वृत्तांत ॥ सांगीतला आपुला ॥८॥
ह्मणे मी असें इंद्र जाण ॥ दुसरा हा यम आपण ॥
आणि तिसरा तो वरुण ॥ चौथा अग्नी ॥९॥
मग बोलती दिक्पती ॥ नळा शिष्टाई करीं त्वरिती ॥
जाऊनि बोधावी दमयंती ॥ नानाप्रकारीं ॥११०॥
सांग कीं चौघे दिक्पती ॥ आले तुझी ऐकोनि कीर्ती ॥
यांत जो येईल तुझे चित्तीं ॥ तोचि वरीं ॥११॥
आतां नळा तूं जाईं शीघ्र ॥ तयेसि सांगावें समग्र ॥
तंव नळ बोले उत्तर ॥ दिक्पाळांसी ॥१२॥
ह्मणे देवहो राजमंदिरीं ॥ म्यां रिघावें कैशापरी ॥
मज मारितील कीं निर्धारीं ॥ देखोनियां ॥१३॥
त्या भीमकाचे मंदिरीं ॥ द्वारीं रक्षण अहोरात्रीं ॥
ह्मणोनि जाणें भीतरीं ॥ माझें न घडे ॥१४॥
तंव इंद्र ह्मणे आपण ॥ मी तुज देतों अदृश्यपण ॥
तरि मग जातां तुज कवण ॥ न देखे तेथें ॥१५॥
तूं आमुचें शिष्यपण ॥ जरी करिसी भावें करुन ॥
तरीच तुज अदृश्यपण ॥ वसे अंगीं ॥१६॥
आणि कपट जरी धरिसी चित्तीं ॥ तरि तुज सकळही देखती ॥
यापरि विद्येची प्रचीती ॥ ऐसी असे ॥१७॥
मग तेथूनि निघाला नळ ॥ नगरीं प्रवेशला तत्काळ ॥
सवेंचि आला उतावेळ ॥ मंदिरातें ॥१८॥
पाहे बहुत कुमारींसी ॥ परि न देखे दमयंतीसी ॥
मग विचारी मानसीं ॥ नळ राव ॥१९॥
ह्मणे आतां काय करणें ॥ केवीं दमयंती वोळखणें ॥
येथें आलों अदृश्यपणें ॥ तें व्यर्थ गेलें ॥१२०॥
तंव हंसाचें आठवलें वचन ॥ कीं निढळीं कुंकुमाची खुण ॥
आणि ललाटीं चंद्रचिन्ह ॥ असे तयेचे ॥२१॥
कपाळीं असे चंद्रमा ॥ बरवा दिसे त्याचा महिमा ॥
खूण सांगीतली आह्मां ॥ तया हंसें ॥२२॥
मग तेचि खुणेनें पाहतां ॥ सर्व मंदिर धुंडाळितां ॥
तंव देखिली त्वरिता ॥ येकांतीं ते ॥२३॥
ते परम चिंताक्रांतीं ॥ बैसली असे एकांतीं ॥
तंव नळ गेला तेथें निगुती ॥ दूतपणें ॥२४॥
ह्मणे ऐक वो सुंदरी ॥ मज धाडिलें सुरवरीं ॥
सैंवरीं दिक्पाळ आले चारी ॥ तुजकारणें ॥२५॥
यम अग्नि इंद्र वरुण ॥ आले असती स्वर्गींहुन ॥
जयासि वरील तुझें मन ॥ तो करीं भर्ता ॥२६॥
तरी भूमंडळींचे भूपाळ ॥ हे केवळ मृत्तिकागोळ ॥
आणि देव तरी अढळ ॥ जाणसी तूं ॥२७॥
मग ह्मणे दमयंती ॥ तूं राक्षस किंवा भूपती ॥
सत्य सांगावें मजप्रती ॥ पूर्वसुकृतें ॥२८॥
येरु ह्मणें मी नृपवर ॥ परि त्यांचा भृत्य निर्धार ॥
तुज सांगावया आलों विचार ॥ त्यांचे मनींचा ॥२९॥
दमयंती बोले वचन ॥ माझें लागलें असे लग्न ॥
सैंवर हें बाह्यमंडन ॥ लोकाचारीं ॥१३०॥
जो वीरसेनाचा बाळ ॥ नैषधदेशींचा भूपाळ ॥
पुण्यवंत राव नळ ॥ तो पति माझा ॥३१॥
माझें सकळ मानस ॥ घेवोनि गेला राजहंस ॥
येथें देहमात्र शेष ॥ राहिला असे ॥३२॥
कीं लग्न झालियावरी ॥ न बोलावें मग उत्तरीं ॥
ह्मणोनि मी नव्हे कुमरी ॥ सत्य जाण ॥३३॥
तो माझा असोनि भ्रतार ॥ आतां जरि तेणें केला अव्हेर ॥
तरि त्यजीन हो निर्धार ॥ प्राण आपुला ॥३४॥
मग तयेसि ह्मणे भूपती ॥ तुझी अज्ञान वो शक्ती ॥
देह त्यजणें हे अवगती ॥ होय जाण ॥३५॥
जरी प्राणघातीं घेसी विखा ॥ तरि नेतील यमलोका ॥
तोचि आलासे यम देखा ॥ तुजसी वरुं ॥३६॥
सांगतों ऐक जळीं बुडतां ॥ वरुण नेईल सर्वथा ॥
तोचि गे येथें येऊनि आता ॥ माग तो तुज ॥३७॥
अथवा केलिया शस्त्रघाता ॥ इंद्र नेईल तत्वता ॥
तरि मग तोचि कां आतां ॥ पर्णूं नये ॥३८॥
नातरी अंतीं मेलिया ॥ अग्नीमाजी जाणें प्राणिया ॥
तोचि आपण होऊनियां ॥ आला पर्णूं ॥३९॥
सुकुमारे हे चौघेजण ॥ मेलियाही न सुटती जाण ॥
तरि आतां कां अनुमान ॥ वरावयासी ॥१४०॥
ते नेणार तरी शेवटीं ॥ मग सुखें कां न बैसावें पाटीं ॥
ऐसी मनीं करोनि बळकटी ॥ दे उत्तर ॥४१॥
तंव ह्मणे ती दमयंती ॥ तुह्मीं जावें तयांप्रती ॥
सांगावी लग्नाची स्थिती ॥ माझिये तुह्मीं ॥४२॥
मग तो धार्मिक राजा नळ ॥ निघाला तेथूनि उतावेळ ॥
तयांजवळी आला तत्काळ ॥ सांगावया वृत्त ॥४३॥
मग दमयंतीचें सकलवृत्त ॥ देवां सांगितलें सत्य ॥
ह्मणे मजवरी भावार्थ ॥ असे तिचा ॥४४॥
देव ह्मणती भलारे भला ॥ गुप्तभावेंसीं प्रगटला ॥
तूं तरी बा सत्याचा दादुला ॥ अससी नळा ॥४५॥
तूं पुण्यश्लोक अससी राजा ॥ आह्मीं पाहिला भाव तुझा ॥
इंद्र ह्मणे कार्यभाग माझा ॥ केला तुवां ॥४६॥
मग ते चारी दिक्पाळ ॥ रुपें पालटोनि झाले नळ ॥
सैंवरमंडपा आले सकळ ॥ देवभूपती ॥४७॥
भीमकें केला बैसकार ॥ चादरिया घातल्या अरुवार ॥
लग्नमंडपीं राजकुमर ॥ बैसविले सर्व ॥४८॥
समस्त पृथ्वीचे राव आले ॥ भीमकें दृष्टीनें पाहिले ॥
नोवरी आणण्याचें पुसिलें ॥ सकळरायां ॥४९॥
राजे ह्मणती भीमाकाप्रती ॥ आतां नोवरी आणावी त्वरितीं ॥
छत्तीस कुळींचे भूपती ॥ आलों आह्मी ॥१५०॥
मग श्रृंगारिली दमयंती ॥ पुष्पमाळा देवोनि हातीं ॥
चालत असे हंसगती ॥ मंडपांत ॥५१॥
ते सभाजनांहीं देखिली ॥ जैसी चित्रींची बाहुली ॥
रायांसि अंतरीं भुली पडली ॥ देखोनियां तयेतें ॥५२॥
येरी पाहे सर्वभूपाळ ॥ तंव देखिले पांच नळ ॥
मग हातीं धरोनि माळ ॥ काय बोले ॥५३॥
अहो माये तूं धरणी ॥ पवन सोम आणि तरणी ॥
तुह्मी सत्य तरी नयनीं ॥ दिसो नळ ॥५४॥
नैषधपती वीरसेनसुत ॥ तोचि नळ असे माझा कांत ॥
धर्म आचरिला असेल सत्य ॥ तरि दिसो आतां ॥५५॥
अहो उमा लक्ष्मी सावित्री ॥ अहल्या अनुसूया नारी ॥
तुह्मी सत्य तरी नेत्रीं ॥ दिसो नळ ॥५६॥
ऐसें ह्मणोनि अक्षता ॥ घातल्या अवघ्यांचिये माथां ॥
ह्मणे मी तुमची कन्या तत्वता ॥ नळाविणें ॥५७॥
वरुण ह्मणे गा सुरपती ॥ पतिव्रता हे दमयंती ॥
कपट केलिया निश्चितीं ॥ शापील येथें ॥५८॥
मग देव आपुलीं रुपें धरित ॥ पाहोनि सभा झाली तटस्थ ॥
सभानायक ह्मणती सत्य ॥ हे पतिव्रता ॥५९॥
जैं तयेनें देखिले दिक्पाळ ॥ कीं वेगळे दिसती भूपाळ ॥
मग कंठीं घातली माळ ॥ नळरायाचे ॥१६०॥
जाहलीं मंगळवायनें ॥ सखिया करिती निंबलोणें ॥
भीमकें आणिलीं भूषणें ॥ वरपूजेसी ॥६१॥
मग ते दिक्पती झाले सुखी ॥ दोघां वानिती निजमुखीं ॥
ह्मणती मिळालीं सारिखीं ॥ पुण्यशीळ ॥६२॥
कृपावलोकनें दीक्पती ॥ नळासि प्रसन्न जाहलों ह्मणती ॥
तुज आह्मीं पाऊं आकांतीं ॥ चारीजण ॥६३॥
जळशक्ती दिधली वरुणें ॥ अग्निशक्ती हुताशनें ॥
अश्वविद्या ते यमानें ॥ दीधली असे ॥६४॥
सुरपतीनें अदृश्यपण ॥ तें पूर्वींच दीधलें होतें जाण ॥
आतां कंठींची माळ देऊन ॥ सुखी केला नळ ॥६५॥
ऐसे देवोनि दिव्यवर ॥ मग निघाले सुरवर ॥
भीमकें देवोनि वस्त्रालंकार ॥ वधुवरांतें पूजिलें ॥६६॥
मग रायें चारी दिवस ॥ आनंद केला बहुवस ॥
संतोषविलें याचकांस ॥ नाना दानीं ॥६७॥
तंव कलि आणि द्वापार ॥ पाहों येत होते सैंवर ॥
कीं आह्मां वरील सुंदर ॥ एखादियातें ॥६८॥
यापरि चालता उतावेळ ॥ मार्गीं तयांसि भेटले दिक्पाळ ॥
मग जाहलें क्षेमकुशळ ॥ परस्परांसी ॥६९॥
इंद्र ह्मणे कलि द्वापारा ॥ तुह्मी जातसां कवण्या नगरा ॥
येरु ह्मणती दमयंतीसैंवरा ॥ कौंडण्यपुरीं जातसों ॥१७०॥
तंव ह्मणती दिक्पाळ ॥ तयेनें घातली नळासि माळ ॥
ऐसें पाहूनियां सकळ ॥ आलों आह्मी ॥७१॥
मग कलि बोले उत्तर ॥ धिग् धिग् तुह्मी सुरवर ॥
तुह्मां देखतां सुंदर ॥ नेली नळें ॥७२॥
ते क्षणभंगुर भूपाळ ॥ तुह्मी देव तरी अचळ ॥
तुह्मां त्यजूनियां माळ ॥ घातली मानवा ॥७३॥
मग बोलती सुरवर ॥ कां बोलतां हा अविचार ॥
ब्रह्मयानें लिहिलें अक्षर ॥ टाळी कवण ॥७४॥
मागुती तयांसि ह्मणे कली ॥ माझी पैज ऐकावी सकळीं ॥
तया नळासि वनस्थळीं ॥ हिंडवीन मी ॥७५॥
दोघां करीन विघडणें ॥ हिंडवीन अटव्यवनें ॥
अर्धवस्त्र दोघां कारणें ॥ लावीन बळें ॥७६॥
स्वस्थळा गेले दिक्पती ॥ कलि आला नळाप्रती ॥
अदृश्यरुपें संगतीं ॥ असता जाहला ॥७७॥
इकडे जाहले चारी दिन ॥ भीमकें दीधलें बहु आंदण ॥
वधुवरां केली बोळवण ॥ सन्मानेंसीं ॥७८॥
आनंदगजरीं नैषधपुरा ॥ नळ आला निजनगरा ॥
सवें आणिली सुंदरा ॥ दमयंती ॥७९॥
मग तो महाराज नळ ॥ धर्मिष्ठ सुशीळ पुण्यशीळ ॥
जयामाजी पातकमळ ॥ अणुमात्र नसेची ॥१८०॥
ऐसा तो राव सूर्यवंशीं ॥ नित्यशास्त्राचा तापसी ॥
अग्रहाराचा अधिकार विप्रांसी ॥ देता जाहला ॥८१॥
रायासि जाहलीं अपत्यें दोनी ॥ इंद्रसेन आणि इंद्रसेनी ॥
कन्या पुत्र सुलक्षणी ॥ रत्नें जेवीं ॥८२॥
राज्य करितां नृपवरा ॥ जाहलीं असती वर्षें बारा ॥
परि पातका अणुमात्र थारा ॥ नाहीं शरीरीं ॥८३॥
नळाअंगीं पातकाविण ॥ न होय कलीचें संचरण ॥
परि राहिला अदृश्य होवोन ॥ नळाजवळी ॥८४॥
आतां असो हा सुखसोहळा ॥ अविद्या उपजली राया नळा ॥
कलीनें गांजिलें भूपाळा ॥ तें परिसिजे पुढें ॥८५॥
हंसीण ह्मणे प्रभावती ॥ नळा जोडली दमयंती ॥
तैसीच तुज मदनप्राप्ती ॥ करुं आह्मी ॥८६॥
नाना कथांचा पडिभांरु ॥ तया नाम कथाकल्पतरु ॥
हा जाणावा पुण्यसागरु ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥
दमयंतीस्वयंवरप्रकारु ॥ अष्टमोध्यायीं कथियेला ॥१८८॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥