कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

मग तये हंसिणीप्रती ॥ हर्षें पुसतसे प्रभावती ॥

सांग वो मज उत्पत्ती ॥ तया मदनाची ॥१॥

तंव ह्मणे हंसिणी ॥ देह त्यागिलिया दाक्षायणी ॥

तया दुःखें शूळपाणी ॥ वनीं राहिले ॥२॥

उमा जन्मली हिमवंतोदरीं ॥ तंव तारक उदेला क्षत्री ॥

तेणें त्रिभुवन वो सुंदरी ॥ जिंकियेलें ॥३॥

स्वर्गीं इंद्रादि देवांप्रती ॥ वृत्तांत सांगे बृहस्पती ॥

कीं त्यासि प्रसन्न प्रजापती ॥ जाहला असे ॥४॥

दैत्या दीधला दुर्घट वर ॥ कीं पाहिजे रुद्रकुमर ॥

तयावीण संव्हार ॥ नव्हे असुराचा ॥५॥

मग इंद्र काय करित ॥ त्वरें बोलाविला मन्मथ ॥

सवें देऊनि वसंत ॥ काम्यकवनीं पाठविला ॥६॥

वायूसि ऐसें सांगत ॥ त्वांही वना जावें त्वरित ॥

ढाळावा कैलासनाथ ॥ तपश्चर्येपासुनी ॥७॥

मन्मथ आला हिमाचळासी ॥ काय्मकवनीं शिवापाशीं ॥

सर्वोपचारें श्रृंगार वनासी ॥ करोनियां ॥८॥

तंव तया वनासी ॥ स्वरुपें लावण्यखाणी जैशी ॥

गौरी नित्य येत फुलांसी ॥ वेंचावया ॥९॥

ते शिवा जवळी हिंडत ॥ रुप आपुलें दावित ॥

व्रत ढाळावें ह्मणत ॥ महादेव ॥१०॥

इतुक्यांत प्राप्त झाला मन्मथ ॥ संगें वायु आणि दुसरा वसंत ॥

ऐसा तिघांचा संघात ॥ जाहला तेथें ॥११॥

कीं शिवासि व्रतें ढाळावें ॥ तिघे असती याचि भावें ॥

मग वसंतें बरवें ॥ श्रृंगारिलें वन ॥१२॥

चंदन चांफे बकुळ ॥ पुष्पीं भरले असती सकळ ॥

तेथें क्रीडा अलिकुळ ॥ करिताती ॥१३॥

डोलती आंबे जांभळी ॥ द्राक्षी केळी पोफळी ॥

उतोनिया नारळी ॥ लवताती ॥१४॥

उदकें पूर्ण सरोवर ॥ कोकिळांचे ध्वनी सुस्वर ॥

स्वच्छंदें नाचती मयूर ॥ आनंदेंसीं ॥१५॥

तंव आली हैमवती ॥ शिवापुढें वोळंगती ॥

एकाकी मदनें पशुपती ॥ विंधिला तो ॥१६॥

लागतां मदनाचा बाण ॥ ध्यान सांडी त्रिनयन ॥

पाहे नेत्र उघडोन ॥ महादेव ॥१७॥

शिवें उघडिली दृष्टी ॥ तंव गिरिजा दिसे गोरटी ॥

कामातुर होवोनि गोष्टी ॥ करीतसे तिशीं ॥१८॥

ऐसा मदनें विंधितां ॥ भुलला विश्वनाथ सर्वथा ॥

मग झाला गौरीसि धरिता ॥ बलात्कारें ॥१९॥

झडकरी करीं धरोनियां ॥ पर्णशाळेंत नेवोनियां ॥

विषयसंगें रमूनियां ॥ शांत झाला ॥२०॥

दोघां सुरत संग घडला ॥ वीर्यपातु जाहला ॥

ह्मणे सर्वस्वीं घडला ॥ तपोभंग ॥२१॥

मग विचारीं पडिला ॥ भोंवतें पाहों लागला ॥

तंव दृष्टीं मदन देखिला ॥ महादेवें ॥२२॥

शिवें देखोनियां मदन ॥ त्यावरी कोपला त्रिनयन ॥

ह्मणे कांरें पापिया बाण ॥ विंधिला मज ॥२३॥

कृतांतवत खवळला रुद्र ॥ आणि उघडिला तिजा नेत्र ॥

केला मदनाचा संहार ॥ जाहला भस्म ॥२४॥

रती त्या मदनाची राणी ॥ ते तेथें आली ऐकोनी ॥

रुदन करी विलापोनी ॥ वनामाजी ॥२५॥

यापरी करितां रुदना ॥ जाणवलें तें त्रिनयना ॥

कीं रती करीत करुणा ॥ पतिकारणें ॥२६॥

जंव ज्ञानीं पाहिलें रुद्रें ॥ तंव तो धाडिलासे इंद्रें ॥

तयासि नेणोनि क्रोधें ॥ जाळिलें म्यां ॥२७॥

मनीं विचारी कैलासनाथ ॥ मदन तो इंद्राचा भृत्य ॥

त्यासि म्यां जाळिलें व्यर्थ हा अनर्थ ॥ केला असे ॥२८॥

पूर्वीं सुग्रीवाची कांता ॥ वालीनें बळेंचि भोगितां ॥

ह्मणोनि रामें अवचितां ॥ वधिला तो ॥२९॥

तें त्रेतांयुगीचें उसनें ॥ द्वापारीं अवतार धरोनि कृष्णें ॥

फेडिलें जराव्याधा कारणें ॥ कृष्णावतारीं ॥३०॥

तैसेंचि येथें म्यां केलें ॥ इच्या पतीस नेणोनि जाळिलें ॥

ह्मणोनि मग बोलाविलें ॥ रतिलागीं ॥३१॥

शंकरें रतीसि बोलाविलें ॥ प्रियवचनीं संबोखिलें ॥

पतिप्राप्त्यर्थ सांगीतलें ॥ बीजाक्षर ॥३२॥

ह्मणे वो रती सुंदरी ॥ पति भेटेल तुज द्वापारीं ॥

आतां तूं जाई निर्धारीं ॥ न करीं शोक ॥३३॥

मग वनासि आली नारी ॥ ब्रह्मचर्यें राहोनि निर्धारीं ॥

तपश्चर्या ते सुंदरी ॥ करीतसे ॥३४॥

तें उसनें फेडावया रुद्र ॥ स्वयें जाहला शंबर ॥

स्कंदपुराणींचा विचार ॥ ऐसा असे ॥३५॥

तंव तो शंबर एके वेळीं ॥ वनीं आला जळ केली ॥

नयनीं देखिली बाळी ॥ मदनकांता ॥३६॥

देखोनि तिची स्वरुपता ॥ कामें झाला बोलता ॥

ते ह्मणे गाताता ॥ न घडे ऐसें ॥३७॥

मी असें वो पतिव्रता ॥ आणि मदनाची कांता ॥

मजशीं कुकर्मीं बोलतां ॥ त्यजीन प्राण ॥३८॥

मग तयेसि ह्मणे शंबर ॥ तूं येथें न राहें स्थिर ॥

सुखें चालें वो निर्धार ॥ ममगृहीं ॥३९॥

तूं माझी कन्या तैसी ॥ विश्वासें संबोखी तयेसी ॥

वेगें चलावें मंदिरासी ॥ ह्मणे शंबर ॥४०॥

मग ते घालोनि रथावरी ॥ आणिता जाहला मंदिरीं ॥

ऐशी संरक्षिली सुंदरी ॥ त्या शंबरें ॥४१॥

यापरी शंबराचे घरीं ॥ राहिली असे रती सुंदरी ॥

तंव श्रीकृष्ण द्वापारीं ॥ अवतरला ॥४२॥

सांगतां कृष्णकथेचा विस्तर ॥ तोचि ग्रंथ वाढेल अपार ॥

मग मदनकथेचा विसर ॥ पडेल तुज ॥४३॥

असो कोणे एके अवसरीं ॥ भीमकी आणि मुरारी ॥

एकांतीं असतां शेजेवरी ॥ प्रीति करोनी ॥४४॥

श्रीगोपालकृष्णाप्रती ॥ रुक्मिणी करित विनंती ॥

मज उत्तम पाहिजे संतती ॥ पुत्र प्रजेची ॥४५॥

पुत्राविणें तत्वतां ॥ मज न गमे गोपीनाथा ॥

गेली असे बाल्यावस्था ॥ मागें माझी ॥४६॥

पुत्राविण गा श्रीपती ॥ वृथा वाटे धनसंपत्ती ॥

ऋणत्रयाची निर्गती ॥ नाहीं पुत्राविण ॥४७॥

मग तयेसि ह्मणे मुरारी ॥ तूं स्वरुपें अत्यंत सुंदरी ॥

अससी तरी मदन उदरीं ॥ येईल तुझे ॥४८॥

मदन व्यापक चराचरीं ॥ जाळी जयासि त्रिपुरारी ॥

तो रुपें गुणें योग्य सुंदरी ॥ पुत्र होय ॥४९॥

तो आला असे माझिये मानसा ॥ तपा जाणें लागेल कैलासा ॥

मागूं भक्तीनें महेशा ॥ तोषवोनी ॥५०॥

मग पाचारिला बळिभद्र ॥ त्यासि कथिला समाचार ॥

द्वारकेचा सकळ भार ॥ निरविला देवें ॥५१॥

ह्मणे आह्मीं जातों शिवापाशीं ॥ मागावया पुत्ररत्‍नासी ॥

तुह्मीं स्वबळें द्वारकेसी ॥ सांभाळावें ॥५२॥

आतां वासुदेव पौंड्रक ॥ येथें येणार असे देख ॥

धाडी घालितील घातक॥ रात्रीमाजी ॥५३॥

त्यांसवें येतील लक्ष कोळी ॥ द्रोणशिष्य जे महाबळी ॥

आपण असोनि सावध सकळीं ॥ राखावी हे द्वारका ॥५४॥

तो नांदत असे काशीपुरीं ॥ मी तपासि गेलिया दूरी ॥

एकाएकीं येईल झडकरी ॥ रात्रिमाजी ॥५५॥

ऐसें बळदेवा सांगोनी ॥ श्रीकृष्ण निघाला तेथोनी ॥

आला बदरिकाश्रमस्थानीं ॥ गरुडारुढ होवोनियां ॥५६॥

तेथें ऋषींस भेटोन ॥ तिहीं पूजिला नारायण ॥

ह्मणोनि नांव तेथोन ॥ बद्रिनारायण जाहलें ॥५७॥

ऐसा तो गोपालकृष्ण ॥ तेणें उद्धरिला घंटाकर्ण ॥

महादेवाचा तो गण ॥ प्रभावतीये ॥५८॥

मग मेरुचे पाठारीं ॥ तपीं बैसला मुरारी ॥

शीत उष्ण उपचारीं ॥ साहे अंगें ॥५९॥

करी सदाशिवाचें ध्यान ॥ मनीं पुत्रइच्छा धरोन ॥

एकनिष्ठेनें नारायण ॥ करी तप ॥६०॥

ऐसें आचरितां बहुत दिवसां ॥ मनीं जाणवलें महेशा ॥

तत्काळ आला उमे सरिसा ॥ कृष्णाजवळी ॥६१॥

दोघीं प्रेमें केलें नमन ॥ भेटले हरिहर आपण ॥

मग शिव बोले वचन ॥ श्रीकृष्णाप्रती ॥६२॥

श्रीहरी तूं सर्वांचें दैवत ॥ तुज ऐसें हें तप अनुचित ॥

तूं अससी माझें दैवत ॥ नारायणा ॥६३॥

मग शंभूसि ह्मणे हृषीकेशी ॥ मनीं असे पुत्राची असोशी ॥

ह्मणोनियां देवा तुह्मांसी ॥ प्रार्थिलें असे ॥६४॥

ऐसा तयाचा जाणोनि भाव ॥ कृपेनें बोले महादेव ॥

आतां मदना होय उद्धव ॥ तुमचे पोटीं ॥६५॥

एक लक्ष साठ सहस्त्र ॥ तुह्मांस होतील सुपुत्र ॥

आणि कन्या ऐशी सहस्त्र ॥ होतील जाणा ॥६६॥

ऐसें बोलोनि कृष्णासी ॥ रुद्र गेला स्वस्थानासी ॥

मग हरि निघाला वेगेंसीं ॥ तेथूनियां ॥६७॥

निघूनि आला जंव द्वारके ॥ तंव वेढिलें पौंड्रकें ॥

शस्त्रास्त्रीं सहस्त्र अनकें ॥ विंधिताती ॥६८॥

मिळाले एक लक्ष कोळी ॥ ते रामें हाणिले मुसळीं ॥

मुसळघायें समुद्रजळीं ॥ पाडिले ते ॥६९॥

संपूर्ण सांगतां रणक्षेत्र ॥ तेचि कथा वाढेल अपार ॥

असो देवें टाकोनि चक्र ॥ वधिला पौंड्रक तो ॥७०॥

श्रीकृष्ण भेटला सहोदरा ॥ आणि समस्त परिवारा ॥

पुढें हर्षें आले मंदिरा ॥ भीमकीच्या ॥७१॥

पुष्टयर्थ केलें शांतिहवन ॥ भावें रुद्रासि पूजा अर्पोन ॥

भीमकीच्या घरीं शयन ॥ केलें देवें ॥७२॥

शिवप्रसादें त्याच दिवशीं ॥ गर्भ राहिला भीमकीसी ॥

अति संतोष जाहला मानसीं ॥ उभयवर्गां ॥७३॥

गर्भा भरले पूर्ण दिवस ॥ संतोष न मावे आसमास ॥

पुत्र जाहला भीमकीस ॥ मदन तो ॥७४॥

तंव कोणे एके अवसरीं ॥ शंबर खेळतां सागरीं ॥

अशरीरिणी अंबरीं ॥ वदती झाली ॥७५॥

अरे शंबरा तुझा वैरी ॥ जन्मेल भीमकीच्या उदरीं ॥

व्याधी उठला नाहीं जोंवरी ॥ तोंवरी औषध ॥७६॥

तो तुझा करील संहार ॥ तेथें अणुमात्र नाहीं उशीर ॥

ऐसें ऐकतां शंबर ॥ चिंतावला ॥७७॥

शंबरें घेवोनियां हेर ॥ द्वारकेसि आला सत्वर ॥

परि चिंता जाहली थोर ॥ शंबरासी ॥७८॥

तेथें सुदर्शन होतें फिरत ॥ प्रवेश न होय द्वारकेंत ॥

मग तेथेंचि बैसला तिष्ठत ॥ रात्रदिन ॥७९॥

जंव डोळियाचें पातें लवें ॥ तों एकवीस वेळां चक्र भोंवे ॥

वायूसही रीघ नोहे ॥ अभ्यंतरीं ॥८०॥

ऐसें त्या शंबरें देखोन ॥ परि निश्चयें बैसला आपण ॥

रिघावया अनुदिनीं प्रयत्‍न ॥ करीतसे तो ॥८१॥

प्रसूतीस पांचवा दिवस ॥ विचार करी यादवाधीश ॥

कीं येणें असे सटवीस ॥ प्रसूति पाशीं ॥८२॥

ह्मणोनियां तो मुरारी ॥ चक्र काढूनि घेतसे करीं ॥

मोकळी केली ते रात्री ॥ श्रीकृष्ण देवें ॥८३॥

चक्र घेवोनियां श्रीधर॥ गेले ऐसें देखोनि शंबर ॥

रात्रीमाजी जागर ॥ करीतसे ॥८४॥

निशी जालिया दोन प्रहर ॥ नगरीं आला पैं सत्वर ॥

रात्रीं चोरोनियां कुमर ॥ नेला तणें ॥८५॥

नेला नगरांतूनि बाहेरी ॥ समुद्राच्या भव्य तीरीं ॥

जंव शस्त्र घालूं पाहे उदरीं ॥ बाळकाचे ॥८६॥

तंव स्नेहें न वाहे करु ॥ ह्मणे बाळक कैसें मारुं ॥

ह्मणोनि टाकिला कुमरु ॥ सागरामाजी ॥८७॥

बाळ टाकोनि सागरीं ॥ शंबर गेला आपुले नगरीं ॥

निर्भय होवोनि मंदिरीं ॥ प्रवेशता जाहला ॥८८॥

इकडे रुक्मिणी मंदिरीं कृष्ण ॥ आला पुत्रवार्ता ऐकून ॥

बळिभद्रही येवोन ॥ दुःख करी ॥८९॥

सकलयादव करिती शोक ॥ कृष्ण न देखे पुत्रमुख ॥

जाहलें दुःसह महादुःख ॥ सर्व जनांसी ॥९०॥

रुक्मिणी माता शोक करी ॥ दुःखाग्नि उठिला उदरीं ॥

ललाट आपटी भूमीवरी ॥ ह्मणे काय करुं ॥९१॥

आह्मीं शंभू केला प्रसन्न ॥ तेणें दीधलें पुत्ररत्‍न ॥

तरि कां ऐसें महा विघ्न ॥ चालें देवा ॥९२॥

ईश्वरें आपुले भक्ता देईजे ॥ तें असत्य केवीं होईजे ॥

आतां कोण्या देवें पाविजे ॥ मजदीना ॥९३॥

मिळाला शंभूचा वर ॥ पुत्रफळासि तो साचार ॥

मज देवें देवोनि पुत्र ॥ नेला पुनरपि ॥९४॥

नवां मासांचिया कष्टा ॥ तूं जाणसी नीलकंठा ॥

पुत्र देवोनि कटकटा ॥ कां गा नेला ॥९५॥

जें कां ईश्वराचें देणें ॥ तें अक्षयीं सफळ होणें ॥

ऐशीं गर्जती पुराणें ॥ सकळिक ॥९६॥

तें आजि असत्य जाहलें ॥ ईश्वरकाक्य वृथा गेलें ॥

आजि देवासि आलें ॥ लटकेपण ॥९७॥

श्रीकृष्ण आणि बळिभद्र ॥ असतां प्रतापसमुद्र ॥

कोण्या दुष्टें माझा कुमर ॥ नेका कपटें ॥९८॥

ऐसी दीनवचनीं कृष्णाप्रती ॥ भीमकी करी विनंती ॥

ह्मणे प्रसन्न करुनि पशुपती ॥ लाधलां पुत्र ॥९९॥

त्यासि ऐसें केवीं जाहलें ॥ बाळकासि चोरोनि नेलें ॥

ऐसें कोठें नाहीं देखिलें ॥ चराचरीं ॥१००॥

आतां मी जाईन प्राणें ॥ पुत्राविण व्यर्थ जिणें ॥

मग तयेसि नारायणें ॥ संबोखिलें ॥१॥

ज्ञानीं पाहे गोपाळकृष्ण ॥ ह्मणे हा ईश्वरदत्त मदन ॥

तो आमुचा नंदन ॥ नेईल कोण ॥२॥

आह्मां ईश्वराचा वर ॥ तो मदनाचा अवतार ॥

त्यासि केवीं पापी चोर ॥ घेवोनि जाय ॥३॥

ऐसा ज्ञानीं विचारी ॥ तंव जाणवलें मुरारी ॥

मग स्वमनाभीतरीं ॥ राहे निश्चित ॥४॥

मग तये भीमकीसी ॥ स्नेहें सांगे हृषीकेशी ॥

पुत्र भेटेल आह्मांसी ॥ आहे जीवंत ॥५॥

प्रिये चिंता न करीं काहीं ॥ तो भेटेल लवलाहीं ॥

सत्य मानोनि स्वस्थ राहीं ॥ माझे बोला ॥६॥

ऐसी भीमकी संबोखिली ॥ मग ते उगीच राहिली ॥

इकडे सागरीं वर्तली ॥ कथा कैसी ॥७॥

तें बाळ गिळिलें मत्स्यें ॥ कृष्णवीर्य केवीं नासे ॥

त्याची कथा परियेसें ॥ प्रभावती ॥८॥

त्या मत्स्याचिये उदरीं ॥ बाळ जीवंत क्रीडा करी ॥

साह्य असतां मुरारी ॥ काय नोहे ॥९॥

तंव शंबराच्या नगरीं ॥ तो मत्स्य धरिला धीवरीं ॥

मग आणिला मंदिरीं ॥ आपुलिया ॥११०॥

धीवरी ह्मणे वो धीवरा ॥ हा द्यावा राया शंबरा ॥

तरि दिव्यवस्त्रें अवधारा ॥ पावाल तुह्मी ॥११॥

धीवरें नेला राजभेटी ॥ देखोनि राव संतुष्टी ॥

परि विष आहे पोटीं ॥ नेणवे तें ॥१२॥

शंबरें दीधला राणिये प्रती ॥ तिणें बोलाविली रती ॥

मत्स्य दीधला तिचे हातीं ॥ पाकास्तव ॥१३॥

रतियें नेला पाकशाळे ॥ मग चिरिला तो बळें ॥

तों बाळ देखिलें सांवळें ॥ लावण्यरुप ॥१४॥

महा सुंदरा त्या बाळा ॥ रतियें देखिलें डोळां ॥

परस्परां नेत्रकमळा ॥ साक्ष दिसे ॥१५॥

मग जाहली विस्मित ॥ हर्षित परि काहीं दुश्चित्त ॥

तंव नारद आले तेथ ॥ रतियेपाशीं ॥१६॥

तिसी नारद बोले वचन ॥ हाचि गे तुझा पति मदन ॥

याचें करावें पाळण ॥ बरवेपणें ॥१७॥

हा जन्मला यादववंशीं ॥ कृष्णरुक्मिणीचे कुशीं ॥

ईश्वरवाक्यें तूं पावसी ॥ प्राणेश्वर ॥१८॥

कवणासी न करीं श्रुत ॥ बारा वर्षें पर्यंत ॥

वाचा ईश्वराची सत्य ॥ द्वापारिंची ॥१९॥

हा बारावे संवत्सरीं ॥ शंबराचा वध करी ॥

मग उभयतां जावें झडकरी ॥ द्वारकेसी ॥१२०॥

तंव रती बोले वचन ॥ मी केवीं करुं पाळण ॥

यासि शंबर देखोन ॥ वधील कीं ॥२१॥

तयेसि नारदें दीधला मंत्र ॥ अदृश्य केला असे पुत्र ॥

कीं रतीवेगळा निर्धार ॥ न दिसे कवणा ॥२२॥

ऐसें लवलाहें करोनी ॥ वेगें गेले नारदमुनी ॥

रती हर्षित झाली मनीं ॥ नारदकृपें ॥२३॥

यापरी अदृश्य तिये मुग्धें ॥ बाळ वाढविलें वरदुग्धें ॥

पाळणा लावोनि आनंदें ॥ हालवीतसे ॥२४॥

विचार आणिके पुराणीं ॥ इंद्रें कामधेनु पाठवोनी ॥

तियेच्या दुग्धें करोनी ॥ वाढला मदन ॥२५॥

आपुला वेंचोनि प्राण ॥ केलें तारकासुराचें मरण ॥

हरिलें इंद्राचें व्यसन ॥ तया मदनें ॥२६॥

त्या उपकारास्तव इंद्रें ॥ धेनु पाठविली आदरें ॥

परि बाळ अदृश्य खरें ॥ तेथें असे ॥२७॥

ऐसा तो बारा वरुषें ॥ प्रौढ केला सायासें ॥

मग इच्छामानसें ॥ धरितसे रती ॥२८॥

तयासि काम चेष्टवी ॥ दृष्टी पाहे भोगवी ॥

बळेंचि यौवन लावी ॥ शरीरासी ॥२९॥

ऐसें करी रती नारी ॥ कामदृष्टीनें पाहे सुंदरी ॥

मग मदन बोले उत्तरीं ॥ ऐसें न घडे ॥१३०॥

मदन तयेसि ह्मणत ॥ पाहसी कांहो विपरित ॥

जेणें पातक असे घडत ॥ तें न कीजे ॥३१॥

मातामोहें वो सुंदरी ॥ मज पाळिलें तुवां तरी ॥

आतां कुडें अंतरीं ॥ धरुं नको ॥३२॥

मग तयासि ह्मणे रती ॥ हे सांडावी भ्रांती ॥

तूं माझा प्राणपती ॥ शंका न धरीं ॥३३॥

मदना आठवली पूर्वस्थिती ॥ आपण जाळिलें पशुपतीं ॥

तैंची प्रिया हे निश्चिती ॥ पूर्वील होय ॥३४॥

ऐसें होतां पूर्वज्ञान ॥ मदन पावला तारुण्य ॥

मग करुनि गंधर्वलग्न ॥ भोगिली रती ॥३५॥

ऐसी घडली संगती ॥ परमसुख दोघें भोगिती ॥

तंव पातले पुढती ॥ नारदमुनी ॥३६॥

नारद ह्मणे मदना ॥ तुझी माता करित्ये रुदना ॥

तुवां जावें येचि क्षणा ॥ भेटावयासी ॥३७॥

तुज आणिलें चोरुन ॥ त्याशंबरासि टाकीं वधोन ॥

मग जावें येथोन ॥ द्वारकेसी ॥३८॥

तुझी माता भीमकी ॥ झाली असे अतिदुःखी ॥

तूं जावोनि भेटें हरिखीं ॥ पितयासी ॥३९॥

ऐसा वृत्तांत सकळ ॥ नारदें कथिला तत्काळ ॥

मदन जाहला उताविळ ॥ जावयासी ॥१४०॥

तंव शंबराची युवती ॥ तिनें बोलाविली रती ॥

शृंगारचेष्टा जाणवती ॥ अंतर्भावें ॥४१॥

राणी पाहे मुखकमळ ॥ तंव गळालें असे तांबूल ॥

जाहले पीन युगुळ ॥ पयोधर ते ॥४२॥

ऐसी देखिली नयनीं ॥ वोळखिली पुरुषचिन्हीं ॥

मग जावोनि सांगे वचनीं ॥ शंबरासी ॥४३॥

तिनें सांगितलें शंबरा ॥ तेणें पिटविला डांगोरा ॥

पुरुष एक व्यभिचारा ॥ आणिला रतीनें ॥४४॥

ऐसा विचार करितां ॥ मदन देखिला अवचिता ॥

शंबर ह्मणे समस्तां ॥ धरा धरा कीं ॥४५॥

चालिला सैन्य परिवार ॥ येरु यदुवंशीय वीर ॥

सकळांचा केला संहार ॥ एकले वीरें ॥४६॥

सांगतां सर्व रणविस्तार ॥ तोचि ग्रंथ वाढेल थोर ॥

असो मग चालिला शंबर ॥ त्रिशूळेंशीं ॥४७॥

त्रिशूळें हाणिलें मन्मथा ॥ येरें धरिला येतयेतां ॥

त्याचि त्रिशूळें हाणिता ॥ मदन होय ॥४८॥

तयाच्याच शस्त्रें त्यासी ॥ मृत्यु असे निश्चयेंसीं ॥

ह्मणोनि त्रिशूळें शंबरासी ॥ वधियेला ॥४९॥

आणिका पुराणींचें मत ॥ मदन होता विंधित ॥

तंव रतीनें विंधिला त्वरित ॥ सुमनवाणीं ॥१५०॥

ऐसा शंबर वधिला ॥ मदनबाळ जय पावला ॥

पुष्पवर्षाव देवीं केला ॥ स्वर्गींहुनी ॥५१॥

मग त्या शंबराचे रथीं ॥ मदनें बैसविली रती ॥

दोघें निघालीं त्वरितीं ॥ द्वारकेसी ॥५२॥

मदन येतां द्वारकेसी ॥ सवें घेवोनि रतीसी ॥

तंव नारद वेगेंसीं ॥ सांगति कृष्णा ॥५३॥

म्यां मदनाची शुद्धि केली ॥ रति स्त्री त्यासि मीनली ॥

आतां येतील वहिलीं ॥ भेटावया ॥५४॥

शंबर मदनें मारिला ॥ म्यां असे पाचारिला ॥

ऐसें लगबगां बोलिला ॥ नारदमुनी ॥५५॥

तंव रुक्मिणीच्या मंदिरीं ॥ गोपी बैसल्या शतें चारी ॥

गोष्टी करिती नानापरी ॥ कौतुकेंसीं ॥५६॥

तंव मदनासि येतां ॥ देखती कांता समस्ता ॥

मग त्या झाल्या विस्मिता ॥ देखोनियां ॥५७॥

संभ्रमें बोलती येरयेरी ॥ काय कृष्णें आणिली नोवरी ॥

बैसोनियां रथावरी ॥ येत आहे ॥५८॥

सोळासहस्त्र स्त्रिया असतां ॥ आणिक आणिली हे कांता ॥

विनोदें ह्मणती योषिता ॥ रुक्मिणीसी ॥५९॥

ही स्वरुपसुंदर नारी ॥ आणिता होय मुरारी ॥

ऐसें सांगती सुंदरी ॥ भीमकीसी ॥१६०॥

तंव पाहतसे रुक्मिणी ॥ बाळ आपुला लोचनीं ॥

ह्मणे नव्हे हो चक्रपाणी ॥ सत्यजाणा ॥६१॥

स्नेहें उचंबळली जननी ॥ पयधारा लागती स्तनीं ॥

गहिंवर दाटला मनीं ॥ अत्यानंदें ॥६२॥

कृष्ण नव्हे हो बोलत ॥ पुत्रस्नेह मज बाधत ॥

तंव येऊनि नारद तेथ ॥ काय ह्मणती ॥६३॥

नारद ह्मणे भीमकीसी ॥ आतां भेटें हो पुत्रासी ॥

आणि आपुल्या सुनेसी ॥ कौतुकानें ॥६४॥

मदन खालीं उतरला ॥ मातेच्या चरणीं लागला ॥

तयेनें वोसंगां घेतला ॥ पुत्र प्रेमें ॥६५॥

पुन्हां दुग्धपूर लोटला ॥ मदन घटघटां प्याला ॥

बारावर्षांहीं भेटला ॥ पुत्र माते ॥६६॥

मग उठिला झडकरी ॥ समागमें रती सुंदरी ॥

तीसह भीमकीसि करी ॥ दंडवत ॥६७॥

सभे नारद जावोनी ॥ कृष्णासि सांगे वचनीं ॥

मदन आला घेवोनी ॥ रतीयेसी ॥६८॥

मग श्रीकृष्ण आले मंदिरा ॥ भेटले सुने आणि कुमरा ॥

पुत्रमुख वर्षें बारा ॥ देखिलें देवें ॥६९॥

वाद्यें धडकलीं थोर ॥ देव वर्षती पुष्पसंभार ॥

आजि भेटले पितापुत्र ॥ ह्मणोनियां ॥१७०॥

सांगतां तेथील सुखा ॥ मज न वर्णवे एकमुखा ॥

एक वर्ष ती द्वारका ॥ श्रृंगारिली होती ॥७१॥

ऐसा असे तो मदन ॥ श्रीकृष्णाचा प्रियनंदन ॥

जो अरिगजपंचानन ॥ प्रभावतीये ॥७२॥

आतां तो जरी तूतें वरी ॥ तरि धन्य तूं या संसारीं ॥

मदन सर्वांच्या शरीरीं ॥ पाविजे पूर्ण ॥७३॥

सखे पूर्वपुण्यां वांचोन ॥ त्याचें अंग न पावे कवण ॥

सर्व अवयव शून्य ॥ मदना विण ॥७४॥

स्त्री बालक आणि घर ॥ मदनालागीं घराचार ॥

तयाविण हें समग्र ॥ शून्य अवघें ॥७५॥

हें सांगतां बरवें ॥ श्रोतीं सावध परिसावें ॥

कामाचें तत्व सदैवें ॥ सभाग्य पावे ॥७६॥

प्रभावती ह्मणे सूचीमुखे ॥ तूं सांगसी स्वप्नींचीं सुखें ॥

तीं मिथ्यामय म्यां रंकें ॥ केंवि पाविजे ॥७७॥

मी वो असतां दैत्यकुमरी ॥ मज मदन केवीं वरी ॥

काळ सर्पाचिये मंदिरीं ॥ रिघे कवण ॥७८॥

तरि हें आसे अनघटित ॥ वायां दुःख दुणावत ॥

परि सेवावा तुज ऐसा संत ॥ आत्मकार्या ॥७९॥

अहो सखिये हंसिणी ॥ कांहीं करावी धांवणी ॥

जंव देह पंचप्राणीं ॥ सांडिला नाहीं ॥१८०॥

तया मदनाचा शर । साहों न शके शंकर ॥

मज जाहला दुस्तर ॥ हें नवल नव्हे ॥८१॥

सखे तुझिया शब्दबाणें ॥ माझें दुःख झालें दुणें ॥

पाडिलें असे कामबाणें ॥ विंधोनियां ॥८२॥

तूं जवळी धन्वंतरी ॥ तंव मी रोगी दृढ शरीरीं ॥

आतां गेलिया दूरी ॥ होईन विकळ ॥८३॥

तूं मजजवळी असतां ॥ तंव सुख माझे जीविता ॥

काहीं सांगावी अमृता ॥ गोष्टी मज ॥८४॥

मदन आणि ते रती ॥ तीं चिरकाल असोत प्रीतीं ॥

त्या दोघांची सेवावृत्ती ॥ मी वो करीन ॥८५॥

तंव ह्मणे राजहंसी ॥ तो जन्मला कृष्णकुशी ॥

सोळासहस्त्र स्त्रिया ज्यासी ॥ न पुरती ॥८६॥

तो पिता नारायण ॥ सोळासहस्त्रांचा प्राण ॥

परि आणखी लागुन ॥ हिंडतसे ॥८७॥

धर्मन्यायी कृष्णराणा ॥ राज्य दीधलें उग्रसेना ॥

आणि छत्र सिंहासना ॥ नातळेची ॥८८॥

जो पूर्वजांचें वचन ॥ पाळित असे अनुदिन ॥

राज्यछत्रादि टाकुन ॥ वर्तत असे ॥८९॥

तंव पुसे प्रभावती ॥ येवढा राजा श्रीपती ॥

छत्रसिंहासनीं नसे प्रीती ॥ कवण्या गुणें ॥१९०॥

त्याचा सकल पुर्ववृत्तांत ॥ मज करावा जी श्रुत ॥

सिंहासनीं तो न बैसत ॥ कवण्या गुणें ॥९१॥

तंव हांसोनि ह्मणे येरी ॥ तुज सांगेन हो नारी ॥

कथा मदनाचियेपरी ॥ करीन श्रुत ॥९२॥

ते असो आतां योग्यता ॥ त्वां पुसिली मदनकथा॥

ते जाहली असे पूर्णता ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथमस्तबक मनोहरु ॥

मदनाआख्यान विस्तरु ॥ चतुर्थोध्यायीं कथियेला ॥१९४॥

श्रीसांब सदाशिवार्पणमस्तु ॥ ओव्यासंख्या ॥१९४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP