श्रीगणेशाय नमः ॥
ईश्वरीं जयाची निष्ठा सबळ ॥ तो क्षणें जिंकील कळिकाळ ॥
उरों नेदी पातकमळ ॥ आपुलीये शरीरीं ॥१॥
पूर्वाध्यायीं वर्णिली कथा ॥ राजमातेचे मंदिरीं सर्वथा ॥
कष्टें राहिली नैषधकांता ॥ पतिविरहेंकरोनी ॥२॥
आतां असो हे दमयंती ॥ वनीं सोडूनि आपुली युवती ॥
नळ निघाला शीघ्रगती ॥ वनामाजी हिंडत ॥३॥
मनीं परम वैराग्य धरोन ॥ राव जातसे दुःखेंकरुन ॥
मग पावला दारुण वन ॥ निर्जन जें कां ॥४॥
दावाग्नी पेटलासे प्रबळ ॥ असंभाव्य धडकती ज्वाळ ॥
वृक्षश्वापदां हलकल्लोळ ॥ होत असे ॥५॥
ऐसें जळत असे वन ॥ तेथें नळ जातसे आपण ॥
तंव वणव्यांत केलें स्मरण ॥ कर्कोटकें नागें ॥६॥
ह्मणे धांवगा भूपाळा ॥ पुण्यश्लोका राया नळा ॥
या दावाग्नीपासोनि वेगळा ॥ करीं मज ॥७॥
ऐकोनि नळ धांविन्नला ॥ भोंवतें जंव पाहों लागला ॥
तंव अग्नींत असे सांपडला ॥ महासर्प ॥८॥
नळ साक्षेपें पुसे तयासी ॥ तूं कोण बा सांग मजसी ॥
मग येरु आपुल्या वृत्तांतासी ॥ सांगता होय ॥९॥
ह्मणे माझें नाम कर्कोटक ॥ सर्पांमाजी मी नायक ॥
तुज जाणोनि पुण्यश्लोक ॥ बोभाइलों ॥१०॥
तरि मज या अग्नीवेगळा ॥ सत्वर काढीं गा भूपाळा ॥
मज देखोनियां काळा ॥ भिऊं नको ॥११॥
रायें तयासि उचलोनि करीं ॥ नेवोनि सोडिला असे दूरी ॥
परी सर्प ह्मणे अवधारीं ॥ विनवणी माझी ॥१२॥
मज उचलीं गा मागुता ॥ आणि पाउलें मोजीं चालतां ॥
दूरी नेवोनियां सुपंथा ॥ सोडीं मज ॥१३॥
मग तैसेंचि करी नरेश ॥ एकापासोनि मोजिलीं दश ॥
दश ह्मणतां केला दंश ॥ नळरायासी ॥१४॥
रायासि बोले सर्पवर ॥ नाभी नाभी धरीं धीर ॥
हा तुज म्यां केला उपकार ॥ राया नळा ॥१५॥
माझिये मुखींचे गरळें ॥ तुझें अंग होईल काळें ॥
मग तुज हिंडतां अवकळें ॥ नाहीं नाश ॥१६॥
नव्हे दुःख व्याधी जरा ॥ विष आलें असे शरीरा ॥
रुपवंतता मात्र अवधारा ॥ पावेल नाश ॥१७॥
संग्रामीं होसील अजित ॥ तुज भेटतील दारासुत ॥
आणि पावसील राज्यार्थ ॥ आपुला तूं ॥१८॥
अवदशा गेलिया जाण ॥ माझें करावें तुवां स्मरण ॥
मग विशेष येईल सुंदरपण ॥ विष उतरोनी ॥१९॥
ऋतुपर्णराजा सूर्यवंशी ॥ राज्य करीत अयोध्येसी ॥
तेथें जावोनि दिवसांसी ॥ क्रमावें आतां ॥२०॥
मग तेथें अक्षमंत्र ॥ पावसील तूं निर्धार ॥
परि नळनाम हा उच्चार ॥ न सांगीं कवणा ॥२१॥
तुझें नाम जरि ते पुसती ॥ तरि बाहुक सांगें तयांप्रती ॥
अश्वविद्येची व्युत्पत्ती ॥ करीं तेथें ॥२२॥
ऐसी सर्पें नळाप्रती ॥ सांगोनि दिधली स्थिती ॥
कीं त्वां जावें अयोध्येप्रती ॥ राया आतां ॥२३॥
ऐसें नळासि सांगोन ॥ दीधलें एक दिव्य वसन ॥
मग अदृश्य जाहला आपण ॥ कर्कोटक तो ॥२४॥
तें जाणोनि आश्वासन ॥ नळाचें निवालें अंतःकरण ॥
जैसा ग्रीष्मीं वर्षोनि वन ॥ निववी ताप ॥२५॥
तेथोनि निघाला सामोरा ॥ मग पावला अयोध्या नगरा ॥
भेटला ऋतुपर्ण नृपवरा ॥ दीनस्वभावें ॥२६॥
रायासि केला नमस्कार ॥ राव ह्मणे काय विचार ॥
आणि तुझें नांव सत्वर ॥ सांग मज ॥२७॥
येरु ह्मणे मी नामें बाहुक ॥ अश्वगुण जाणें बहुतेक ॥
आणि दुसरा अन्नपाक ॥ जाणतों स्वामी ॥२८॥
ऐसें ऐकोनि ऋतुपर्ण ॥ त्यासि घेतला राहवोन ॥
आपुली अश्वशाळा संपूर्ण ॥ त्याचे करीं दीधली ॥२९॥
येरु अश्वविद्या बहु जाणत ॥ वारुंतें नित्य शिकवित ॥
मग भोजन स्वयें सारित ॥ रात्रिकाळीं ॥३०॥
घेवोनियां शुष्क अन्न ॥ स्वहस्तें त्याचें करी रांधन ॥
मग करीत असे भोजन ॥ राजानळ ॥३१॥
मग तो राव शयन करी ॥ हृदयीं आठवी आपुली नारी ॥
स्फुंदस्फुंदोनि रुदन करी ॥ रात्रिसमयीं ॥३२॥
तंव जवळील सेवक देखा ॥ पुसती तयासि दुःखविवेका ॥
कां पां रडतोसि बाहुका ॥ सांगें आह्मां ॥३३॥
येरु ह्मणे म्यां घोरवनीं ॥ परमदुःखें आहाळोनी ॥
निद्रिस्थ सांडोनि कामिनी ॥ आलों येथें ॥३४॥
ते सुकुमार आणि सुजाती ॥ तिची लागली असे खंती ॥
त्याकारणें माझिये चित्तीं ॥ दुःख वाटे बहुवस ॥३५॥
ते असे परम पतिव्रता ॥ प्राण सांडील मज न पाहतां ॥
कीं आतां श्वापदमुखीं कांता ॥ पडली असेल ॥३६॥
अहो ऐसा मी भाग्यमंद ॥ आणिक काय सांगूं खेद ॥
यापरि सांगोनि अनुवाद ॥ रुदन करी ॥३७॥
इकडे भीमकाचिये घरीं ॥ इंद्रसेनी बरळे निदसुरी ॥
माता दमयंती अजगरीं ॥ गिळिली ह्मणोनी ॥३८॥
भीमका आला गहिंवरु ॥ पोटासिं धरिलें लेंकरुं ॥
ह्मणे आतां शुद्धी करुं ॥ दमयंतीची सत्वर ॥३९॥
दैव कैसें जाहलें विचित्र ॥ द्यूतीं दवडिलें सर्वत्र ॥
आतां शुद्धीलागीं हेर ॥ पाठवावे लौकरी ॥४०॥
मग भीमक बोले द्विजांसी ॥ जो ठाईं पाडील दमयंतीसी ॥
सालंकृत गाई देईन तयासी ॥ येक सहस्त्र ॥४१॥
तंव सुदेव पुरोहित ॥ शुद्धासि निघाला असे त्वरित ॥
देश नगरें ग्रामें पाहत ॥ दमयंतीलागीं ॥४२॥
नगरें पुरें आणि पट्टणें ॥ पाहिली वनें उपवनें ॥
बहु हिंडतां कष्टला प्राणें ॥ अत्यंत तो ॥४३॥
ऐसा हिंडत हिंडत ॥ आला असे चैद्यदेशांत ॥
वीरबाहूच्या नगरीं प्राप्त ॥ जाहला असे ब्राह्मण ॥४४॥
तंव त्या वीरबाहूचे घरीं ॥ सोहळा होतसे गजरीं ॥
गवाक्षामधोनि नारी ॥ देखिली असे तयानें ॥४५॥
बहुत मिळाला स्त्रीजन ॥ त्यांत वोळखिलें चिन्ह ॥
कीं ललाटीं असे लांछन ॥ कुंकुमाचें ॥४६॥
तंव तो सुदेव उचितीं ॥ बोभाइला दमयंती प्रती ॥
येरी नाम ऐकोनि त्वरितीं ॥ गजबजली असे ॥४७॥
ते आपुलें नाम ऐकोनी ॥ परम चमत्कारली मनीं ॥
मग भोंवतें पाहे नयनीं ॥ नामास्तव ॥४८॥
जंव दमयंती ऐकत ॥ तंव द्वारीं आली धांवत ॥
कोण आलें ह्मणोनि पाहत ॥ विस्मयचित्तें ॥४९॥
तिणें देखिलें पुरोहिता ॥ सुदेव जैसा भीमकपिता ॥
मग चरणीं ठेविला माथा ॥ प्रेमादरें ॥५०॥
अंतरीं दाटला गहिंवर ॥ द्विजवर ह्मणे राहें स्थिर ॥
तुझीं कन्या आणि कुमर ॥ क्षेम असती ॥५१॥
तंव सुनंदा गेली धांवत ॥ मातेसि सांगे वृत्तांत ॥
ह्मणे सैरंध्री आसे रडत ॥ कवण्यागुणें ॥५२॥
मग आली राजमाता ॥ ब्राह्मणासि पुसे कथा ॥
द्विज ह्मणे भीमकसुता ॥ दमयंती हे ॥५३॥
ऐकतां ऐशिया वचना ॥ राजमाता ह्मणे ब्राह्मणा ॥
म्यां न ओळखिली हे अंगना नळभूपाची ॥५४॥
दोघी दाटल्या गहिंवरीं ॥ आलिंगिती परस्परीं ॥
दमयंती चरण धरी ॥ राजमातेचे ॥५५॥
येरी ह्मणे दमयंतीये ॥ उठीं क्षेम देईं बाइये ॥
मी वो तुझी माउशी होये ॥ सत्य जाण ॥५६॥
मग त्या नळाचा वृत्तांत ॥ दमयंतीसि सुदेव पुसत ॥
येरीनें सांगितलें यथार्थ ॥ पूर्वकथन ॥५७॥
राणी ह्मणे वो दमयंती ॥ नेणोनि सांगितली सेवावृत्ती ॥
तरी अपराधाची मजप्रती ॥ क्षमा करीं ॥५८॥
तुझी माता माझी बहीण ॥ तूं माझी कन्या सुजाण ॥
ह्मणोनि सेवावृत्तीचें दूषण ॥ नाहीं तुज ॥५९॥
आमुचा तो सुदामा पिता ॥ आह्मी दोघी असों दुहिता ॥
भीमका दीधली सर्वथा ॥ वडील बहिण ॥६०॥
माये मी धाकुटी परियेसीं ॥ मज दीधलें वीरबाहूसी ॥
तरि मी वो तुझी माउशी ॥ दमयंतीये ॥६१॥
ये पां न्हाणुंदे घेईं पडदणी ॥ जटा जाहल्या उकलुंदे वेणी ॥
उपचारेंसीं येवोनि आंगणीं ॥ उभी राहे ॥६२॥
दमयंती ह्मणे वो माउशी ॥ जैं देखेन राया नळासी ॥
तैं वांचोनि वेणियेसी ॥ न लावीं हात ॥६३॥
जैसें प्राणाविण शरीर ॥ कीं प्रेतासि भोग अलंकार ॥
तैसे भ्रताराविण श्रृंगार ॥ व्यर्थ होती ॥६४॥
आतां तूं माझी माउशी ॥ मज पाठवीं माहेरासी ॥
आजवरी तुझिये गृहासी ॥ होतें माये ॥६५॥
मग घालोनि सुखसनीं ॥ पाठविली ते भीमकनंदिनी ॥
राजमातेनें केली बोलवणी ॥ ऐसियापरी ॥६६॥
दमयंती येवोनि माहेरा ॥ भेटली कन्ये आणि कुमरा ॥
पितया भीमकनृपवरा ॥ क्षेम देत ॥६७॥
आणि आपुले मातेप्रती ॥ क्षेम देतसे दमयंती ॥
नळाची कथिली सर्व स्थिती ॥ वनांतील ॥६८॥
भीमकें पूजोनि द्विजवर ॥ सवत्स धेनु देवोनि सहस्त्र ॥
साष्टांग घातला नमस्कार ॥ सुदेवासी ॥६९॥
दमयंतीसि योजिलीं वस्त्रें ॥ तंव ते दाटली गहिंवरें ॥
कीं पति आपुला कांतारें ॥ हिंडत असेल ॥७०॥
दमयंती ह्मणे हो माते ॥ पतिविण न घेयीं वस्त्रांतें ॥
तयाविण म्यां पंच प्राणांतें ॥ धरिलें मात्र ॥७१॥
आतां भेटीचिये आर्ता ॥ म्यां धरिलें असे जीविता ॥
नातरी वनींच प्राण जाता ॥ तोचि समयीं ॥७२॥
जैसा अष्टमीचा चंद्र ॥ तैसा जाणिजे हा विचार ॥
तो पौर्णिमे वांचोनि समग्र ॥ केविं होय ॥७३॥
माते माझें अर्धचीर ॥ तेणें केलें असे धोतर ॥
तें होईल जैं एकत्र ॥ तैं मी पुरति ॥७४॥
तुह्मीं आतां वेग कीजे ॥ नळाची शुद्धी लाविजे ॥
शोधोनियां ठायीं पाडिजे ॥ राजा नळ ॥७५॥
मग रायें बोलाविला सुदेवो ॥ ह्मणे तूं आमुचा गुरुदेवो ॥
शोधोनि आणिल्या नळरावो ॥ देईन नगर ॥७६॥
तंव पर्णाद नामा विप्र ह्मणत ॥ मी पूर्वीं होतों हिंडत ॥
तेव्हां अयोध्येमाजी मात ॥ ऐकिली एक ॥७७॥
मी होतों शरयूतीरीं ॥ ऋतुपर्णाचे वारु अवधारीं ॥
उदकालागीं वेगवत्तरीं ॥ आले तेथें ॥७८॥
त्या वारुवांवरील भृत्य ॥ येकमेकांसि होते बोलत ॥
अश्वशाळेसि नित्य रडत ॥ बाहुक तो ॥७९॥
ह्मणतो म्यां स्त्री सांडिली वनीं ॥ भक्षिली असेल श्वापदांनीं ॥
तरि त्याचे मनींची काय करणी ॥ काहीं न कळे ॥८०॥
ऐसे एकमेकां बोलिले ॥ तें सर्व म्यां परिसिलें ॥
ह्मणोनियां गमन केलें ॥ अश्वशाळेसी ॥८१॥
तंव तेथें देखिला बाहुक ॥ दमयंती ह्मणोनि करी शोक ॥
परि रुप दिसे कुरुपक ॥ अत्यंत त्याचें ॥८२॥
तंव आड धरुनी जवनिक ॥ दमयंती ऐकतसे वाक्य ॥
मनीं ह्मणे तो नळ सम्यक ॥ निश्चयें होय ॥८३॥
पितयासि ह्मणे दमयंती ॥ तरि पत्रिका लिहावी त्वरितीं ॥
कीं सैंवर मांडिलें पुढती ॥ दमयंतीचें ॥८४॥
नळाची काहींच न कळे शुद्धी ॥ मारिला किंवा गिळिला श्वापदीं ॥
ह्मणोनि आतां त्रिशुद्धी ॥ मांडिलें सैंवर ॥८५॥
मुहूर्ता राहिलें स्वल्प अंतर ॥ उदयीख असे सैंवर ॥
ह्मणोनि यावें वेगवत्तर ॥ ऋतुपर्ण राया ॥८६॥
येरी ह्मणे शतयोजनें दूरी ॥ लांब असे अयोध्या नगरी ॥
ह्मणोनि येणें नघडे निर्धारीं ॥ ऋतुपर्णाचें ॥८७॥
जरि तेथें असेल नळ ॥ अश्वज्ञानी परम निर्मळ ॥
तरीच आणील उतावेळ ॥ ऋतुपर्णासी ॥८८॥
मग तया रायें भीमकें ॥ तेंचि लिहिलें असे पत्रिके ॥
सुदेवकरीं बहु हरिखें ॥ देतसे राव ॥८९॥
मग ते पत्रिका खोवोनि शिरीं ॥ सुदेव निघाला झडकरी ॥
पावला अयोध्या पुरनगरीं ॥ ऋतुपर्णाचे ॥९०॥
विप्र भेटला भूपाळासी ॥ वाचोनि दाविलें पत्रिकेसी ॥
कीं मांडिलें सैंवरासी ॥ उदयीक दिनीं ॥९१॥
मग पाचारोनि बाहुकासी ॥ ऋतुपर्ण पुसे तयासी ॥
आतां युक्ति कीजे कैसी ॥ जावयाची बाहुका ॥९२॥
वैदर्भदेशीं कौंडण्यपुर ॥ तेथें दमयंतीचें सैंवर ॥
होत असे ह्मणोनि शीघ्र ॥ जाणें असे आपणां ॥९३॥
पहावे आपुले अश्वशाळेंत ॥ वारु परमवेगवंत ॥
कीं शतयोजनें पंथ ॥ जातील जे त्वरेनें ॥९४॥
दमयंतीचें हें दुजें सैंवर ॥ ह्मणोनि गेले राजे समग्र ॥
आतां आमुचें जाणें शीघ्र ॥ होय केवीं सांगपां ॥९५॥
बाहुक ह्मणे न करीं चिंता ॥ अश्व आणितों तत्वतां ॥
शतयोजनें क्रमोनि पंथा ॥ जातील ऐसे ॥९६॥
बाहुकें जावोनि अश्वशाळेसी ॥ वेगवंत निवडिलें वारुंसी ॥
आणूनि जोडिले रथासी ॥ रायासमक्ष ॥९७॥
राव ह्मणे बाहुकासी ॥ टाकोनि उत्तम वारुवांसी ॥
तुवां जुंपिलें रोडक्यांसी ॥ काय कारण ॥९८॥
बाहुक ह्मणे अहो जी राया ॥ वृथापुष्ट ते न येति कार्या ॥
हे जातिशुद्ध पाहोनियां ॥ आणिले असती ॥९९॥
कीं जो जातीचा असेल शुद्ध ॥ तोचि कार्य करील सिद्ध ॥
ह्मणोनि आणिले सुबुद्ध ॥ उत्तम वारु ॥१००॥
हे नयेति आपुले मनासी ॥ परि करितील चिंतिले कार्यासी ॥
ऐसें सांगोनि रायासी ॥ जुंपिले अश्व ॥१॥
पाठी थोपटूनि केले हुशार ॥ नेत्र पुसोनि धरिले वाग्दोर ॥
कर्णीं सांगितला मंत्रोच्चार ॥ रथावरी बैसतां ॥२॥
रथीं राजा धुरेसि बाहुक ॥ तिसरा वार्ष्णेय घेतला सम्यक ॥
समागमींचे येर लोक ॥ राहविलें रायें ॥३॥
मग बाहुकें घोडे हांकिले ॥ ते गगनमार्गीं चालिले ॥
पवनासि मागें टाकिलें ॥ तया वारुंनीं ॥४॥
रथ जातसे अंतराळीं ॥ राव बोले तये वेळीं ॥
झणी होयगा तूं मातली ॥ सुरपतीचा ॥५॥
ह्मणे कैसे घोडे निवडिले ॥ जातिशुद्ध हे ओळखिले ॥
मग ऋतुपर्ण रायासि कळलें ॥ अश्वज्ञान ॥६॥
रथीं वाष्णेंय आणि राजा ॥ अंतरीं विस्मय करिती वोजा ॥
बाप हो सामर्थ्य शुद्धबीजा ॥ असे मोठें ॥७॥
ऐसे जातां वेगवत्तर ॥ पावले भोगावतीतीर ॥
तेथें पडलें उत्तरीयवस्त्र ॥ ऋतुपर्णाचें ॥८॥
रथ राहवीं ह्मणे बाहुका ॥ माझें पडलें वस्त्र देखा ॥
येरु ह्मणे योजनावरी ऐका ॥ राहिलें मागें ॥९॥
ऐकोनि राव जाहला विस्मित ॥ ह्मणे पवनाहूनि वेग बहुत ॥
ऐसें पृथ्वीमाजी सामर्थ्य ॥ नाहीं देखिलें ॥११०॥
हा असे अश्वविद्येंत पूर्ण ॥ माझिये गणितविद्ये समान ॥
तरि त्या विद्येचें महिमान ॥ दावितों आतां ॥११॥
तंव तेथें देखिला भल्लात ॥ राव ह्मणे मी जाणें यथार्थ ॥
याच्या फलपत्रांचें गणित ॥ केलें असे अंतरीं ॥१२॥
एक सहस्त्र पंचाण्णव फळें॥ पानें दशसहस्त्र एक आगळें ॥
आणि चवदा असती डाहाळें ॥ यया वृक्षा ॥१३॥
बाहुकें भूमीसि उतरुनि रथ ॥ तया वृक्षावरी चढत ॥
मग मोजितां जाहलें सत्य ॥ गणित तयाचें ॥१४॥
मनीं होवोनि परमविस्मित ॥ ह्मणे अद्भुत हें सामर्थ्य ॥
तरि हे विद्या आपणा प्राप्त ॥ होईल कैसी ॥१५॥
मग ह्मणे राया ऋतुपर्णा ॥ ही विद्या देइंजे आह्मां ॥
मी आपुली अश्वविद्या तुह्मां ॥ देतों बरवी ॥१६॥
परस्परीं केलें विद्यादान ॥ ऋतुपर्ण होवोनि आनंदघन ॥
अक्षविद्या तेहि संपूर्ण ॥ देता झाला बाहुकासी ॥१७॥
अक्षविद्या प्रवेशतां अंतरीं ॥ बाहुका वमन झालें सत्वरीं ॥
विष पडलें बाहेरी ॥ कलिमलासह ॥१८॥
तत्काळ कलि प्रकट होऊन ॥ नळासि दीधलें आशीर्वचन ॥
ह्मणे तूं होसी बा धन्य ॥ सर्वजनांत ॥१९॥
मग कलि नळासि विनवित ॥ ह्मणे मी तुज शरणागत ॥
शापों नको सर्व वृत्तांत ॥ ऐक माझा ॥१२०॥
तुह्मां उभयतां गांजिलें ॥ तेणें मज शासन घडलें ॥
माझें सर्वअंग जाहलें ॥ भस्मीभूत ॥२१॥
आतां तुज स्त्रीपुत्र होतील प्राप्त ॥ राज्य होईल हस्तगत ॥
अवदशा गेली निश्चित ॥ राया तुझी ॥२२॥
ऐसें बोलोनियां वचन ॥ कलि जाहला गुप्त आपण ॥
तया भल्लांतकवृक्षीं जाण ॥ संचरला तो ॥२३॥
इतुका जाहला वृत्तांत ॥ परि येरां काहीं नसे विदित ॥
मग जाते जाहले त्वरित ॥ कौंडण्यपुरा ॥२४॥
दृष्टीं देखिलें कौंडण्यपुर ॥ तंव मांडलें नाहीं सैंवर ॥
ह्मणोनि वाटलें विचित्र ॥ ऋतुपर्णासी ॥२५॥
इकडे दमयंती ह्मणे मातेसी ॥ माझिये वामनेत्र आणि बाहूसी ॥
स्फुरण होतसे दिवसनिशी ॥ शुभ चिन्हें जाणवती ॥२६॥
गोपुरावरी दमयंती ॥ पाहूं ठेली अतिप्रीतीं ॥
तंव ऋतुपर्ण आणि सारथी ॥ तिसरा बाहुक ॥२७॥
भीमक आला सामोरा ॥ भेटला ऋतुपर्ण राजेश्वरा ॥
मग नेला आपुले मंदिरा ॥ सन्मानेंशीं ॥२८॥
राव पुसे ऋतुपर्णांतें ॥ तुह्मी आलेति कवण्या अर्थें ॥
येरु ह्मणे भेटीचेनि आर्तें ॥ आलों सहज ॥२९॥
मग त्यासि रहावया मंदिर ॥ दीधलें परम सुंदर ॥
बाहुका अश्वशाळेसि बिढार ॥ दीधलें असे ॥१३०॥
केशिनी नामें अंगना ॥ तयेसि नळाच्या सर्व खुणा ॥
सांगोनि पाठवी जाणा ॥ दमयंती ते ॥३१॥
ह्मणे तो नळ राव आपण ॥ अन्यकरींचें पक्क अन्न ॥
नेघे स्वहस्तें करी रांधन ॥ ऐसा नेम जाणिजे ॥३२॥
नलगे तयासि हुताशन ॥ सामर्थ्यें आणील जीवन ॥
तरि कोरडें नेवोनि अन्न ॥ द्यावें तया ॥३३॥
दासी निघाली तेथुन ॥ नळाजवळी आली आपण ॥
ह्मणे तुह्मासि आणितें भोजन ॥ सुपक्क करोनी ॥३४॥
तयेसि ह्मणतसे बाहुक ॥ आह्मी करुं स्वयंपाक ॥
शुष्क अन्न देइजे सम्यक ॥ आह्मालागीं ॥३५॥
मग ते दासी केशिनी ॥ सत्वर आली राजसदनीं ॥
सर्व सामुग्री घेउनी ॥ मागुती गेली ॥३६॥
अग्निउदका विरहित ॥ दीधलें असे सर्व साहित्य ॥
आणि रिती घागर ठेवित ॥ उदका लागीं ॥३७॥
इतुकें तयासि देऊन ॥ येरी गुप्त राहिली लपोन ॥
कर्तव्य पाहतसे दुरोन ॥ बाहुकाचें ॥३८॥
मग तो विद्यावंत नळराज ॥ जपता जाहला अग्निबीज ॥
तंव अग्नि पडला सतेज ॥ मंत्रें करोनी ॥३९॥
घागरीं करितां अवलोकन ॥ उदक जाहलें परिपूर्ण ॥
मग करीतसे रांधन ॥ स्वयंपाक ॥१४०॥
येरी विस्मय करी अंतरीं ॥ ह्मणे विद्येची नवलपरी ॥
तरि जावोनि सांगावें सुंदरी ॥ दमयंतीसी ॥४१॥
ते दासी निघाली तेथुन ॥ सांगे दमयंतीसि भेटोन ॥
बाहुकाचें सर्वकथन ॥ वर्तलें तें ॥४२॥
तंव दमयंती बोलत ॥ नळचि होय गे निभ्रांत ॥
परि कुरुप असे दीसत ॥ कवण्या गुणें ॥४३॥
मागुती ह्मणे दासीतें ॥ हा बाळ गे नेवोनि तेथें ॥
तया बाहुकाचे दृष्टीतें ॥ दावीं त्वरित ॥४४॥
आणि त्या बाहुका देखतां ॥ बाळा हाणावें मुष्टिघाता ॥
कीं ह्मणावें रे नळसुता ॥ निर्दैवा तूं ॥४५॥
तयाकडे पहावें क्षणभरी ॥ चडका हाणाव्या मुखावरी ॥
मग जे होईल ते परी ॥ सांगें मज ॥४६॥
ऐसें ह्मणूनि दासीचिया कडवां ॥ पुत्र बैसविला बरवा ॥
दासियें आणिला तेधवां ॥ नळाजवळी ॥४७॥
तंव बाहुक असे पुसत ॥ ह्मणे हा कवणाचा सुत ॥
येरी सांगे सकळ वृत्तांत ॥ इंद्रसेनाचा ॥४८॥
ह्मणे हा पुत्र दमयंतीचा ॥ नळराजा पिता ययाचा ॥
परि हा असे दुर्दैवाचा ॥ सत्य जाण ॥४९॥
पुत्र होता कडेवरी ॥ तया हाणिलें करप्रहारीं ॥
ह्मणे जारे पितयाचे परी ॥ निघोनियां ॥१५०॥
मरमर रे नळसुता ॥ सांडोनि गेला तुझा पिता ॥
तूंही जाईरे परता ॥ देशांतरातें ॥५१॥
तुज नाहीं रे दैवरेखा ॥ कैसा बैसों पाहसी अंका ॥
तंव गहिंवर त्या बाहुका ॥ दाटला थोर ॥५२॥
ह्मणे तें बाळ गे अज्ञान ॥ काय जाणे दुर्दैवपण ॥
तुझें तरी वो निष्ठुर मन ॥ जाईं येथोनियां ॥५३॥
अत्यंत गहिंवरें दाटला ॥ आणि दासीवरी कोपला ॥
ह्मणे बालक वृथा मारिला ॥ निष्ठुरे तुवां ॥५४॥
मग ते निघाली परिचारिका ॥ आली दमयंती जवळी देखा ॥
सांगीतला वृत्तांत निका ॥ तयेपाशीं ॥५५॥
तें जाणोनि दमयंती ॥ करी पितयासि विनंती ॥
ह्मणे मी जातें पहावयाप्रती ॥ बाहुकासी ॥५६॥
ताता नळाच्या सर्वखुणा ॥ बाहुका अंगीं दिसती अभिन्ना ॥
ह्मणोनि जाणें असे दर्शना ॥ आतां मज ॥५७॥
पितयाप्रति सांगोनी ॥ मग दासी सवें घेवोनी ॥
आली अश्वशाळे लागुनी ॥ दमयंती ते ॥५८॥
नळें देखिली आपुली नारी ॥ गहिंवरें दाटला अंतरीं ॥
शब्द नये मुखाबाहेरी ॥ स्त्रवती नेत्र ॥५९॥
मनीं ह्मणे हें सतीरत्न ॥ म्यां वनीं सांडिलें आपण ॥
तरि मी जाहलों पृथक्जन ॥ यथार्थ देवा ॥१६०॥
गहिंवरें बोले दमयंती ॥ अजूनि कां नये काकुळती ॥
अर्धवसनें आहें दुःखिती ॥ आजवरी वल्लभा ॥६१॥
तूं ह्मणसी मांडिलें सैंवर ॥ तरि इंद्राहूनि कोण थोर ॥
यावया लागोनि तुजसि पत्र ॥ पाठविलें व्याजें ॥६२॥
हें जरी असेल असत्य वचन ॥ तरि साक्ष तुमचेचि चरण ॥
तुजवांचोनि अन्य जन ॥ बंधु माझे सर्वही ॥६३॥
अहो लक्ष्मी आणि सावित्री ॥ सती अनुसूये तुह्मी गौरी ॥
आतां साक्ष द्यावी झडकरी ॥ गगनवाचे ॥६४॥
अगे माये सती धरणी ॥ चंद्र तारा आणि तरणी ॥
मी पतिव्रता तरी गगनीं ॥ फुटो वाचा ॥६५॥
तंव वाचा जाहली गगनीं ॥ पतिव्रता हे शिरोमणी ॥
नळा तुजवांचोनि कोणी ॥ स्वप्नींहि नेणे ॥६६॥
भाग्यवंता नळा भूपती ॥ बहु कष्टली हे दमयंती ॥
आतां हे अंगिकारोनि सती ॥ राज्य करीं आपुलें ॥६७॥
ऐसी जाहली गगनवाणी ॥ नळरायें ती ऐकिली श्रवणीं ॥
मग स्मरिला कर्कोटक मनीं ॥ विष उतराया ॥६८॥
तंव कर्कोटक पातला ॥ आपुलें विष काढिता झाला ॥
मग तो रुपवंत जाहला ॥ नळराव तत्काळ ॥६९॥
पहिलें होतें जें स्वरुप ॥ त्याहोनि तेज आलें अमूप॥
गेली अवदशा समूळ पाप ॥ पळोनियां तेव्हांची ॥१७०॥
मग दमयंती गेली मंदिरा ॥ सांगितलें मातापितरां ॥
ह्मणे जावोनि भेटा नृपवरा ॥ नळरायासी ॥७१॥
त्वरें भीमक आला तेथ ॥ पाहोनि जाहला आनंदभरित ॥
मग परस्परां क्षेम होत ॥ अतिप्रीती करोनी ॥७२॥
नळासि पाहोनि ऋतुपर्ण राजा ॥ मनीं विस्मित जाहला वोजा ॥
ह्मणे अपराध क्षमा माझा ॥ करीं आतां नैषधा ॥७३॥
नळा ऐसा तूं भूपती ॥ अवदशेनें आलासि मजप्रती ॥
परि मज पडली भ्रांती ॥ नेणवेचि काहीं ॥७४॥
ह्मणोनि लागला चरणा ॥ येरें दीधलें आलिंगना ॥
ह्मणे चिंता न धरीं धन्या ॥ तिळमात्र राया ॥७५॥
मग तो भीमक भूपती ॥ नळासि आणी गृहाप्रती ॥
मंगळस्नान घालोनि निगुती ॥ सुखासनीं बैसविला ॥७६॥
कंठिलीं दुःखें वर्षें चारी ॥ आतां भेटी नळावरी ॥
सुधापानी पुष्पें अंबरीं ॥ वर्षते झाले अपार ॥७७॥
मग दोघां पाटीं बैसवोनी ॥ सर्वोपचार अर्पोनी ॥
याचक तृप्त केले दानीं ॥ अति सोहळा होतसे ॥७८॥
जैसी मेघांचे शिंपणीं ॥ तापली निवे मेदिनी ॥
तैसी ते दमयंती विरहिणी ॥ नळासि मिळतां ॥७९॥
नगरीं उभविलीं गुढिया तोरणें ॥ रायें दीधलीं अपार दानें ॥
परमानंद सकळां कारणें ॥ प्रकट जाहला सर्वस्वें ॥१८०॥
भीमकें वस्त्रालंकारेंसीं ॥ सन्मानिलें ऋतुपर्णासी ॥
मग पाठविला निज नगरासी ॥ अयोध्येप्रती ॥८१॥
तंव तया भीमकाप्रती ॥ नळराज करी विनंती ॥
ह्मणे जाणें आतां देशाप्रती ॥ आपुलिया आह्मा ॥८२॥
मग भीमकें नळरायासी ॥ सवें देवोनि सैन्यासी ॥
बोळविलें निज नगरासी ॥ अति संतोषें ॥८३॥
दहा दीधले कुंजर ॥ पांचशत अश्व सुंदर ॥
आणि दीधले पायभार ॥ रथांसहित ॥८४॥
ऐशा सैन्येंशीं नळ निघाला ॥ आपुलिया नगरा आला ॥
मग पुष्करासि हाकारिला ॥ नळरायें तेधवां ॥८५॥
ह्मणे आतां येरे तस्करा ॥ परम कपटिया पुष्करा ॥
मज युद्धासि होईं सामोरा ॥ अक्षविद्येच्या ॥८६॥
नातरी युद्ध करीं निश्चित ॥ ह्मणोनि घातला खड्गासि हात ॥
येरु ह्मणे मी शरणागत ॥ आलों असें जी ॥८७॥
पुष्कर होतां शरणागत ॥ नळासि भेटले अमात्य ॥
नगरीं जाहले आनंदभरित ॥ प्रजानन सर्वही ॥८८॥
मग ते दमयंती राणी ॥ अपत्यांसह आणिली तत्क्षणीं ॥
अभिषेक करोनि सिंहासनीं ॥ बैसला नळ ॥८९॥
उभविलीं गुढिया तोरणें ॥ नगरीं जाहलीं वाधावणें ॥
मग करिती अक्षयवाणें ॥ नळदमयंती ॥१९०॥
भद्रासनीं बैसतां भूपाळ ॥ पळोनि गेले दोषदुष्काळ ॥
नगरीं होतसे परम मंगल ॥ नारी नर संतुष्टले ॥९१॥
मग तो चक्रवर्ती नळराजा ॥ पुत्रा ऐशा पाळी प्रजा ॥
गोब्राह्मणांची नित्यपूजा ॥ करीतसे आनंदें ॥९२॥
रायांमाजी परमश्रेष्ठ ॥ साधूंमाजी अति वरिष्ठ ॥
ईश्वरभक्तीसि एकनिष्ठ॥ नळराज तो ॥९३॥
पुण्यश्लोक तो नळ नृपवर ॥ दोषतमासि जैसा दिनकर ॥
तयाची कथा परम पवित्र ॥ तिहीं लोकीं विख्यात ॥९४॥
हे कथा नळोपाख्यान ॥ जे करिती श्रवण पठण ॥
त्यांचीं पातकें दोष दारुण ॥ भस्म होती क्षणार्धें ॥९५॥
नळ कर्कोटक आणि दमयंती ॥ चौथा ऋतुपर्ण भूपती ॥
यांचिये स्मरणें कलिमल नासती ॥ हें असे ऋषिवाक्य ॥९६॥
हंसीण ह्मणे प्रभावती ॥ अनंत असे जैशी वसुमती ॥
तैसीच हे कथा भारती ॥ कथिली तुज दृष्टांतें ॥९७॥
बाई जें कां तुवां पुसिलें ॥ तें सर्वही सांगितलें ॥
यथामति चरित्र वर्णिलें ॥ नळरायाचें ॥९८॥
तयांची तेथें वर्हाडिका ॥ हंसेंचि घडविली येका ॥
तैशीच तुझी मदनासि देखा ॥ करुं आह्मी जोडणी ॥९९॥
जनमेजय ह्मणे वैशंपायना ॥ कथा कथिली कोणें कवणा ॥
आणि तुमचिया अंतःकरणा ॥ आली कैसी ॥२००॥
मुनि ह्मणे गा भारता ॥ पांडव वनीं राहिले असतां ॥
बृहदश्चा होय सांगता ॥ धर्मरायासी कथा हे ॥१॥
कथा होती बहुजुनाट ॥ ऋषिरायें केली प्रगट ॥
ते मज जाहली असे पाठ ॥ व्यास कृपेनें ॥२॥
कौरवीं खेळोनि कपटद्यूत ॥ राज्य घेतलें समस्त ॥
आणि धाडिलें वनांत ॥ पांडवांसी ॥३॥
हें ऐकोनि दूतद्वारें ॥ बृहदश्चा धाडिला इंद्रें ॥
तेणें धर्मासि मनोहरें ॥ कथिलीं पुराणें ॥४॥
बृहदश्चा ह्मणे पंडुसुता ॥ तुवां न करावी काहीं चिंता ॥
वेळ पडलिया सर्वथा ॥ सोसणें घडे प्राणिमात्रां ॥५॥
अनुतापें धर्म ह्मणे हो स्वामी ॥ थोर दंडलों द्यूतकर्मीं ॥
सकळ राज्य अधर्मीं ॥ हारविलें म्यां ॥६॥
मग बृहदश्चा होय सांगता ॥ ऐसें घडलें पूर्वीं बहुतां ॥
परि नळाची जाहली अवस्था ॥ राया ते फार दुःसह ॥७॥
तया ऐसी पूर्वीं कवणा ॥ झालीच नाहीं देहदंडणा ॥
एकटा पडला घोरवना ॥ माजी सदार ॥८॥
तुज सांगातें सहोदर ॥ आणि द्रौपदी सुंदर ॥
तैसेच धौम्यादि मुनिवर ॥ सवें असती ॥९॥
तुझा वनवास हा सोपा ॥ नळाचा न सांगवे बापा ॥
धर्मा तयाच्या दुःखतापा ॥ मिती नाहीं सत्य पैं ॥२१०॥
आवडीं ह्मणे पंडुसुत ॥ कोण कोठील नैषधनाथ ॥
कैसा हारविला राज्यार्थ ॥ सांगा मज स्वामिया ॥११॥
मग हे दोषहारिणी कथा ॥ बृहदश्चें कथिली पंडुसुता ॥
तेचि कथिली गा भारता ॥ हंसिणीनें ॥१२॥
हे अरण्यपर्वीं भारतीं ॥ कथिली असे संस्कृतीं ॥
ते सांगितली म्यां प्राकृतीं ॥ श्रोतेजनांसी ॥१३॥
आतां पुढिले प्रसंगीं गहन ॥ प्रभावतीचें गांधर्वलग्न ॥
ते कथा ऐकोत सज्जन ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥
नलदमयंतीआख्यानविस्तारु ॥ दशमोऽध्यायीं कथियेला ॥२१५॥
श्रीरुक्मिणीरमार्पणमस्तु ॥ ओंव्या २१५॥