कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मागां वर्णिली कथा सुंदर ॥ उखेसी जोडला अनिरुध्द वर ॥

पुढें प्रभावतीसि परिकर ॥ हंसीण सांगे ॥१॥

हंसीण ह्मणे वो सुंदरी ॥ मग कोणे एके अवसरीं ॥

बाण असतां सभांतरीं ॥ चमत्कार जाहला ॥२॥

ध्वजस्तंभ होता अंगणीं ॥ तो मोडोनि पडला तत्क्षणीं ॥

त्रिखंड होवोनि मेदिनी ॥ जाहली गर्जना ॥३॥

थरथरां भूमी कांपत ॥ खळखळां मेघ वर्षे शोणित ॥

ऐसे दुर्निमित्त उत्पात ॥ जाहले नगरीं ॥४॥

ते देखोनियां नयनीं ॥ बाण शंकला निजमनीं ॥

ह्मणे जाहली रुद्रवाणी ॥ सत्य आजी निश्चयें ॥५॥

ऐसा पडिला चिंतावनीं ॥ तंव गगनींची ऐकोनि ध्वनी ॥

उखा आली धांवोनी ॥ पहावया ॥६॥

राव पाहे जंव उखा ॥ तंव पुरुषभुक्त दिसे मुखा ॥

मग तो विचारी देखा ॥ मनामाजी ॥७॥

तंव आठवूनि गगनवाणी ॥ उखे देऊनि पाठवणी ॥

प्रधानासि सांगें वचनीं ॥ वृत्तांत सर्व ॥८॥

हे उखेचीच करणी ॥ खांब पडिला असे धरणीं ॥

आतां करा धांडोळणी ॥ उखेमंदिरीं ॥९॥

पाहूं धाडिली परिचारिका ॥ तेथें पुरुषासहित उखा ॥

देखती जाहली ऐका ॥ मंदिरांत ॥१०॥

परतोनि आली बाणाजवळी ॥ समीप पावली तत्काळीं ।

ह्मणे राया उखाबाळी ॥ पुरुषसंगीं मीनली ॥११॥

मग आवेशला बाणासुर ॥ ह्मणे आणारे तो तस्कर ॥

जेणें उखेसि व्यवहार ॥ केला मंदिरीं ॥१२॥

तंव निघाला दळभार ॥ वेढिला उखेचा आवार ॥

नगरामाजी हाहाःकार ॥ थोर जाहला ॥१३॥

जैं उखेसि जाहलें श्रुत ॥ तंव ते थरथरां कांपत ॥

आतां नाशपावेल ह्मणत ॥ पतिनिधान ॥१४॥

अहो अंबे गिरिजे माते ॥ तुवां पति दीधला मातें ॥

तरि आतां याअरिष्टातें ॥ टाळीं माये ॥१५॥

अंधा जोडली जों दृष्टी ॥ सवेंचि पायीं लागली कांटी ॥

तैशापरी पापिष्टी ॥ जाहल्यें मी ॥१६॥

दुःखें कोमाइलें वदन ॥ मुखीचें पळालें जीवन ॥

आसुवें भरिलें नयन ॥ देखिलें अनिरुध्दें ॥१७॥

मग तो उखेसि विचारी ॥ काय जाहलें हो सुंदरी ॥

येरी दाटली गहिंवरीं ॥ बोलों नये ॥१८॥

तंव ह्मणे उखानारी ॥ आतां काय सांगों उत्तरीं ॥

मी स्त्री नव्हे हो वैरी ॥ तुह्मां जाहल्यें ॥१९॥

तंव येरू साक्षेपें निचारी ॥ हनवटी धरूनि करीं ॥

ह्मणे सांग हो प्राणेश्वरी ॥ काय जाहलें ॥२०॥

तयेनें सांगतां वृत्तांत ॥ हांसिन्नला मदनसुत ॥

ह्मणे मी आपुला पुरुषार्थ ॥ दाविन तुज ॥२१॥

मी यादवभद्रजाती ॥ मजसी भिडे क्षेत्रवृत्ती ॥

प्रिये ऐसा वीर क्षितीं ॥ नाहीं जाण ॥२२॥

तंव आला बाणदैत्य ॥ दळ चाले अपरिमित ॥

सिंहनादें वीर गर्जत ॥ परमावेशें ॥२३॥

गजबज ऐकोनि थोर ॥ उपरीवरी चढला उखावर ॥

जैसा तारांमाजी चंद्र ॥ पौर्णिमेचा ॥२४॥

जन देखती वोहरें ॥ दिसती लावण्य सुंदरें ॥

ह्मणती आतां बाणासुरें ॥ यासीच द्यावी कन्यका ॥२५॥

तंव सैनिक ह्मणती पुरुषा ॥ बोलावितो बाण देखा ॥

येथें तूं आलासि मूर्खा ॥ मूळाविण ॥२६॥

तयांसि ह्मणे अनिरुध्द ॥ मज तुमचा काय रे बोध ॥

आलों करावया वध ॥ सकळांचा मी ॥२७॥

मग धाविन्नलें सैन्य ॥ टाकिती विटप पाषाण ॥

एक शिडिया घेऊन ॥ लाविती आवारा ॥२८॥

युध्दा सिध्द जाहला अनिरुध्द ॥ तंव उखा बोले शब्द ॥

माझा करूनियां वध ॥ जावें तुह्मीं ॥२९॥

येरु ह्मणे ऐक विचार ॥ आमुचा ब्रीदीं बडिवार ॥

तरि यांस भीतां श्रीवर ॥ हांसेल मज ॥३०॥

ते धांवोनि देई आलिंगन ॥ कवणा जावें जी शरण ॥

ह्मणे मजनिमित्त मरण ॥ आलें तुह्मां ॥३१॥

तो ह्मणे चिंता नकरीं ॥ ऐसें ह्मणोनि सांडिली उपरी ॥

मग वीर त्या सैन्यावरी ॥ एकाएकीं उठावला ॥३२॥

घेतली द्वाराची अर्गळा ॥ तेणें वीरां झोडिलें सकळा ॥

तेथें युध्दा होतां तुंबळां ॥ सैन्य पडलें असंख्य ॥३३॥

अर्गळेच्या अनंत घाई ॥ अस्थिमांसा ठाव नाहीं ॥

एकएका धरूनि पायीं ॥ आपटी तो भुजबळें ॥३४॥

खेटकें खड्गें सबळ ॥ धनुष्यें बाण मुद्गल ॥

ऐसें मारिलें सकळ ॥ सैन्य देखा ॥३५॥

सैन्य सर्वही आटलें ॥ एक जीव घेऊनि पळाले ॥

घायाळ सांगावया गेले ॥ बाणापाशीं ॥३६॥

दुर्बळें बाणाप्रति सांगती ॥ त्याची अद्भुत असे शक्ति ॥

मारिली सैन्यसंपत्ती ॥ अर्गळेनें सकळही ॥३७॥

लोटले अशुध्दांचे पूर ॥ वधियेले अश्व कुंजर ॥

पाडले प्रेतांचे डोंगर ॥ राया रणामाजि पैं ॥३८॥

उखा देखे रणधुमाळी ॥ मग मनामाजी वोंवाळी ॥

नेत्रदीपांतें उज्ज्वळी ॥ अनिरुध्द प्रियातें ॥३९॥

इकडे कोप आला बाणासुरा ॥ ह्मणे सैन्यातें हाकारा ॥

अश्वां घालारे पाखरा ॥ निघा युध्दा सत्वर ॥४०॥

अश्व रथ हाकारिले ॥ सर्व सैन्य एकवटलें ॥

वीर बाणाजवळी आले ॥ सर्व सैन्येशीं तेधवां ॥४१॥

ऐसा आला सैन्यसिंधु ॥ वीराम जाहला रणसन्नध्दु ॥

बाण ह्मणे करावा वधु ॥ अनिरुध्दाचा ॥४२॥

तंव तो वीरशिरोमणी ॥ सैन्य हाकित चालिला रणीं ॥

सैन्याचा वर्षाव असंख्यबाणी ॥ होत तयावरी ॥४३॥

पुढील मोडोनि पाय भारु ॥ मारित चालिला उखावरु ॥

तंव गज रथ कुंजरु ॥ उठावले एकदांची ॥४४॥

तयांसि एकला झुंजत ॥ तृणें वेष्टिला जैसा पर्वत ॥

अशुध्दें फुलला दीसत ॥ पळस जैसा ॥४५॥

तें देखोनि बाणासुर ॥ मनीं विस्मय करी थोर ॥

कीं धाकुटा परि वीर ॥ झुंजार असे ॥४६॥

मग चिंता करी मनीं ॥ ह्मणे वाचा बोलिली गगनीं ॥

तेंचि आतां निर्वाणीं ॥ दीसत असे ॥४७॥

परि आवेशें ह्मणे बाणु ॥ म्यां शिवासि केला पणु ॥

तरि आतां मागें चरणु ॥ घालों नये ॥४८॥

ह्मणोनि चालिला रोषें ॥ हातीं पांचशतें धनुष्यें ॥

लक्षुनि विंधीत विशिखें ॥ अनिरुध्दासी ॥४९॥

अनिरुध्दें त्याचि क्षणा ॥ रणींच्या घेतलें धनुष्यबाणां ॥

दैत्यबाणांच्या निवारणा ॥ करावयासी ॥५०॥

कीं मेघ येतां दारुण ॥ त्यासि वितळी जैसा पवन ॥

तैसा अनिरुध्द बाणें बाण ॥ निवारीतसे तेधवां ॥५१॥

ऐसा तो प्रंचड वीर ॥ शस्त्रें वर्षला अपार ॥

तंव बाणें नागशस्त्र ॥ प्रेरियेलें तयावरी ॥५२॥

कडकडोनि आलें बहुवस ॥ अंगीं जडले नागपाश ॥

कंठ आणि करचरणा ॥ गुंडाळती एकसरें ॥५३॥

सर्पास्त्रें जाहला बध्द ॥ ह्मणोनि सांपडला अनिरुध्द ॥

बाण करूं पाहे वध ॥ अनिरुध्दाचा ॥५४॥

तंव ह्मणे कुंभकप्रधान ॥ धरिल्या मारितां अति हीण ॥

आतां याचा जाईल प्राण ॥ नागपाशीं सहजचि ॥५५॥

हा नागपाशीं बांधला ॥ मग ह्मणे हो चलाचला ॥

आतां मृत्यु पावेल वहिला ॥ आपणचेइ सत्य ॥५६॥

तयासि ठेविलें रक्षण ॥ मग बाण गेला तेथुन ॥

उखा तें सर्व ऐकोन ॥ दुखावली अंतरी ॥५७॥

तंव तेथें आला नारद ॥ उखेसि करी अनुवाद ॥

ह्मणे तूं वो न करीं खेद ॥ अणुमात्र उखे ॥५८॥

तूं काहीं चिंता न करीं ॥ मी येथें आणीन मुरारी ॥

सहस्त्रभुजांची कांडोरी ॥ करील कृष्ण ॥५९॥

आतां पावेल गोविंद ॥ करील बाणाचा वध ॥

सुटेल पति अनिरुध्द ॥ सत्य जाण मानसीं ॥६०॥

ऐसें सांगोनि नारदमुनी ॥ ह्मणे तूं स्मर हो भवानी ॥

नागपाशांतें जाणोनी ॥ करील ढिलें ॥६१॥

मग गेले नारदमुनी ॥ उखा स्मरे देवी भवानी ॥

नानाप्रकारीं स्तुति करोनी ॥ ह्मणे अंबिके पावें ॥६२॥

आतां येई हो अंबिके ॥ वेगीं पाव भद्रकाळिके ॥

आपुलें वचन लटिकें ॥ न करीं माये ॥६३॥

तुवां जें भक्तांसि देणें ॥ तें निश्चयें अक्षयी होणें ॥

आता पति जातसे प्राणें ॥ कैसें करूं ॥६४॥

तंव ते पावली भद्रकाळी ॥ बांधला देखे नागकुळीं ॥

ढिलीं केलीं बंधनें सकळीं ॥ अनिरुध्दाचीं ॥६५॥

नारद पावला द्वारका ॥ जाणविलें यदुकुळटिळका ॥

म्यां अनिरुध्द केला ठाऊका ॥ शोणितपुरीं ॥६६॥

चित्ररेखेचा वृत्तांत ॥ नारद सांगे समस्त ॥

अनिरुध्द धरिला जित ॥ बाणासुरें ॥६७॥

मग युध्द जाहलें बहुत ॥ हा एकला ते अपरिमित ॥

नदी लोटली शोणित ॥ महापुराची ॥६८॥

तो नागवसेचि क्षेत्रीं ॥ ह्मणोनि धरिला कुजंत्री ॥

देवा सर्पाचिये अस्त्रीं ॥ बांधोनियां ॥६९॥

बाण करूं पाहे वधु ॥ परि कुंभकें राखिला अनिरुध्दु ॥

नागपाशें होतसे खेदु ॥ चालवहिला ॥७०॥

तंव निघाले यादव वीर ॥ कृष्णेम राहविले समग्र ॥

सात्यकिसि द्वारकानगर ॥ निरविलें देवें ॥७१॥

निघता जाहला श्रीधरु ॥ सवें घेतला बळिभद्रु ॥

आणि मदन कुमरु ॥ प्रद्यम्नु तो ॥७२॥

ऐसे निघाले तिघेजण ॥ गरुडावरी बैसोन ॥

जाती परम वेगेंकरून ॥ शोणितपुरा ॥७३॥

ऐसें असे भागवतीं ॥ सर्वसैन्येंशी श्रीपती ॥

हरिवंशींची भारती ॥ तिघेचि गेले ॥७४॥

मग त्राहाटिला शंख ॥ मार्गीं जात यदुनायक ॥

धरूनि बाणावरी रोख ॥ वेगें जाती ॥७५॥

ते निघालें उत्तरपंथीं ॥ गिरिव्रज नामें पर्वतीं ॥

तेथें रुदगण राखिती ॥ बाणासुरासी ॥७६॥

त्यांही हटकिलें श्रीधरा ॥ मग उठिला अंगिरा ॥

तेणें केला पाठिमोरा ॥ गरुड तो ॥७७॥

देवें करूनियां संधान ॥ त्याचें केलिया पातन ॥

मग उठिले कृशान ॥ तिन्ही अग्नी ॥७८॥

ते चालिले जाळित ॥ चौघे राहिले तटस्थ ॥

कल्लोळ उठती अद्भुत ॥ कल्पांतींचे जैसे ॥७९॥

कांहीं करितां नाटळे ॥ आकाश पोळतसे ज्वाळें ॥

मग ह्मणितलें गोपाळें ॥ वैनतासी ॥८०॥

आह्मी येथें राहतों नावेक ॥ तंव तूं आणीं गंगोदक ॥

विझवीं हा अंगारक ॥ जाईं वहिला ॥८१॥

मग तो जाऊनि रोखें ॥ उदक आणी आपल्या मुखें ॥

अग्नि विझविला कौतुकें ॥ तत्क्षणीं ॥८२॥

तंव नारद आला तेथें ॥ शोणितपुर दाखवी हातें ॥

मग शंख श्रीअनंतें ॥ वाजविला ॥८३॥

तो शंखनाद ऐकोनी ॥ अनिरुध्दा जाहली धरिवणी ॥

दिव्यशंखाचिये स्फुरणीं ॥ आनंदला तो ॥८४॥

कीं बाणासि केलें सावधान ॥ कीं रुद्रासि दाविली आंगवण ॥

ऐसा देवें पांचजन्य ॥ वाजविला ॥८५॥

श्रीभागवतींचे मत ॥ सात्यकी सैन्य बहुत ॥

घेवोनि नगर वेढित ॥ बाणासुराचें ॥८६॥

देवें सोडियेलें चक्र ॥ नगर मोडिलें समग्र ॥

तंव आलें शिवाचें अग्न्यस्त्र ॥ तयेवेळीं ॥८७॥

धडमुंड नर कुंजर ॥ कंपित जाहले वीर फार ॥

अश्व रथ महाभार ॥ कंपचकित ॥८८॥

एका झडपी पक्षिवीर ॥ वरी हाणी बळिभद्र ॥

अस्थिमांसांचे डोंगर ॥ होती तेणें ॥८९॥

कीं तें कुंकुंमाचे पर्वत ॥ नदी वाहतसे शोणित ॥

युध्द जाहलें अद्भुत ॥ सांगो काय ॥९०॥

तंव बाणाचे वहना समोर ॥ तो चालिला गरुड मोहर ॥

गरुडें करूनि जर्जर ॥ पाडिला तो ॥९१॥

इकडे कैलासा गेला नारद ॥ शिवासि करी अनुवाद ॥

बाणासि वधावया गोविंद ॥ आला असे ॥९२॥

होत असे महाक्षेत्र ॥ कापितील बाणाचें शिर ॥

तुमच्या पुत्रासि श्रीधर ॥ मारितो कीं ॥९३॥

मग आला महारुद्र ॥ सवें सकळ परिवार ॥

सकळीं देखतां गौरीहर ॥ नमस्कार घातला ॥९४॥

समरीं काय करी शंकर ॥ पाठविता झाला शीतज्वर ॥

तयानें उदरीम रिघोनि थोर ॥ केला कंप ॥९५॥

तेणें कृष्ण जातसे चांचरी ॥ बळिभद्र ह्मणे गा निवारीं ॥

मग विचारी मुरारी ॥ मनामाजी ॥९६॥

कृष्णें केला चमत्कार ॥ दुसरा रचिला उष्णज्वर ॥

तेणें पळविला सत्वर ॥ शीतज्वर तो ॥९७॥

मग तया मारूं पाहे हरी ॥ तंव वाचा जाहली अंबरीं ॥

यासि न मारावें मुरारी ॥ रक्षीं वहिला ॥९८॥

तेणें केलें कृष्णस्तवन ॥ त्यासि असती त्रिचरण ॥

स्थावरजंगमासि पीडण ॥ होत तेणें ॥९९॥

साधन केलें रुद्रगणीं ॥ तें प्रद्युम्नें निवारुनी ॥

सेनेसि केली भंगवणी ॥ मदनवीरें ॥१००॥

ऐसी ते उणीव देखोनी ॥ स्वामी कार्तिक आला धांवोनी ॥

तंव पळाली सेना भिऊनी ॥ रणांतूनी ॥१॥

तो ब्रह्मचारी केवळ ॥ त्यासि असे बहु बळ ॥

तेणें सात्यकीचा कल्लोळ ॥ केला रणीं ॥२॥

ऐसा तो षडानन ॥ विंधीत चालिला दारुण ॥

तो अनिवार देखोन ॥ कृष्णें काय केलें ॥३॥

तयाचें तोडावया शिर ॥ कृष्णें चालविलें चक्र ॥

तंव नग्न उभी समोर ॥ कैटभी ते ॥४॥

ते उमेची प्राणसखी ॥ नग्न चालली विकटमुखी ॥

ऐसिये स्त्रियेसी पुरुषीं ॥ देखों नये ॥५॥

ऐसा विचारूनि विवेक ॥ देवें हात आवरिला नावेक ॥

मागुती पातला कार्तिक ॥ रणभूमीसी ॥६॥

आणि आवेशला रुद्र ॥ त्राहाटिला शंख डंबर ॥

पुढें केला वीरभद्र ॥ सेनाधिपती ॥७॥

तो अष्टमहाबाहो ॥ वीरभद्र सैन्यरावो ॥

धरणीपासूनि त्याचा भवो ॥ रुद्रकोपें ॥८॥

रणीं दोघां जाहली बोली ॥ तों मदनें पैज घातली ॥

मग वीरभद्रें चाली केली ॥ मदनावरी ॥९॥

तया वीरभद्रासरिसा ॥ मदन जुंझे प्रतापवयसा ॥

तेणें केला कासाविसा ॥ वीरभद्र ॥११०॥

सोडी बाणामागें बाण ॥ करितसे घोरसंधान ॥

परि वीरभद्र निवारण ॥ करी त्यांचें ॥११॥

दोघां चढलें अति बळ ॥ द्वंद्वयुध्द जाहलें तुंबळ ॥

बाणीं भरिलें अंतराळ ॥ मदनवीरें ॥१२॥

वीरभद्र खोंचला बाणीं ॥ पराजित जाहला रणीं ॥

मग मूर्छना येवोनी ॥ पडियेला ॥१३॥

तें देखोनियां कार्तिक ॥ त्वरें धाविन्नला सन्मुख ॥

मदनावरी धरोनि रोख ॥ आला युध्दा ॥१४॥

भिडती स्वामी आणि मदन ॥ युध्द जाहलेंसे दारुण ॥

एकमेकांचें वैरपण ॥ प्रथमचेंची ॥१५॥

मग मदनें काय केलें ॥ स्त्रीमोहनास्त्र घातलें ॥

तें असंभाव्य विस्तारलें ॥ रणामाजीं ॥१६॥

बाळा मुग्धा प्रौढा नारी ॥ युवती स्वरूपें सुंदरी ॥

प्रकटल्या नाना शृंगारीं ॥ शतें पांच ॥१७॥

हातीं व्यंजनें घेवोनी ॥ श्रीगंध पुष्पमाळा आणुनी ॥

नाना उपचार घेवोनी ॥ धाविन्नल्या ॥१८॥

स्वामी कार्तिका भोंवत्या ॥ मिळाल्या असती सकळिका ॥

संकट पडिलें षण्मुखा ॥ तयेवेळीं ॥१९॥

एकी तयासि तांबूल देती ॥ एकी चंदन चर्चिती ॥

एकी द्यावया धांवती ॥ सुखोपभोग ॥१२०॥

ऐसा तो स्त्रियांनीं वेष्टिला ॥ येरु युध्द करूं विसरला ॥

रणांतुनी पळता झाला ॥ तयेवेळीं ॥२१॥

जटा असती मोकळ्या ॥ पळे रण सांडोनियां ॥

तंव नारी पाठीं लागल्या ॥ उपचारेंसीं ॥२२॥

कार्तिकस्वामी पुढें पळती ॥ पाठीं नारी त्या धांवती ॥

ऐसी रणीं केली ख्याती ॥ मदनवीरें ॥२३॥

तें देखोनि ईश्वर ॥ कोपा चढला अपार ॥

देखती रणीं हरिहर ॥ एकमेकां ॥२४॥

रणीं उभा महादेवो ॥ त्यासि भिडे कृष्णरावो ॥

चराचरासि अति भय ॥ होत तेव्हां ॥२५॥

दोघे झुंजती हरिहर ॥ केंवि उरेल चराचर ॥

मग पृथ्वी गेली शीघ्र ॥ ब्रह्मयापाशीं ॥२६॥

ते सांगे चतुरानना ॥ युध्द होत शिवकृष्णा ॥

बाणानिमित्त त्रिभुवना ॥ आकांत होत ॥२७॥

प्रळय मांडला जी स्वामी ॥ तरि वेगीं चला तुह्मी ॥

ऐसें विनवीतसे भूमी ॥ ब्रह्मयासी ॥२८॥

तत्काळ आला चतुरानन ॥ जो त्रिगुणीं भाग रजोगुण ॥

पिंडा वांचूनियां प्राण ॥ एक तिघांचा ॥२९॥

तेणें श्रीकृष्ण पाचारिला ॥ तैसेंचि पाचारिलें रुद्राला ॥

प्रार्थोनि स्तविता झाला ॥ चतुरानन ॥१३०॥

तुह्मी झुंजतां हरिहर ॥ नासावयासि चराचर ॥

तरि कैसा हा विचार ॥ केला असे ॥३१॥

ब्रह्मा ह्मणे गिरिजावरा ॥ तूं पूजितोसि श्रीधरा ॥

मग युध्द कोणत्या विचारा ॥ करीतसां ॥३२॥

जयासि भावें पूजणें ॥ तयासि रणीं भिडणें ॥

ऐसें परस्पर भक्तिगुणें ॥ योग्य नव्हें ॥३३॥

तंव ईश्वर बोलत ॥ माझे बाणासि कां मारित ॥

यालागीं झुंजणें सत्य ॥ मजलागीं ॥३४॥

मग ब्रह्मा बोले शिवासी ॥ त्वांचि वर दीधला यासी ॥

कीं हरण व्हावें भुजांसी ॥ रणामाजी ॥३५॥

जैं बाणें प्रसन्न करून ॥ तुजसीं मागितलें वरदान ॥

व्हावें भुजांचें कंदन ॥ समरांगणीं ॥३६॥

तें तुझें वरद वचन ॥ सत्य करावया जाण ॥

यालागीं आला श्रीकृष्ण ॥ द्वारकेहुनी ॥३७॥

तो विष्णु परोपकारी ॥ नाना अवतार धरी ॥

दुष्टांची करावया बाहेरी ॥ अवतरला हा ॥३८॥

तरि शंकरा श्रीकृष्णासी ॥ त्वां न झुंजावें परियेसीं ॥

नातरी मिथ्यापण वरासी ॥ होय तुमच्या ॥३९॥

ऐसेम ब्रह्मदेवें सांगितलें ॥ तें पार्वतीवरें मानिलें ॥

ऐसे हरिहर संतुष्टले ॥ विधिवाक्यें ॥१४०॥

ब्रह्मा ह्मणे विश्वनाथा ॥ तुह्मीं कैलासीं जावें आतां ॥

निजस्थानीं भवानीकांता ॥ सुखें करोनी ॥४१॥

तंव बोले श्रीभवानीवर ॥ आतां मी जातों निर्धार ॥

परि जीवें न मारीं बाणासुर ॥ सर्वथाही ॥४२॥

तंव ब्रह्मा बोले शिवासी ॥ तुह्मीं वर दीधला दैत्यासीं ॥

तरि मी निजांगें तयासी ॥ रक्षीन सत्य ॥४३॥

तेथूनि परतला शंकर ॥ हा बाणासि कळला समाचार ॥

कीं माघारा गेला रुद्र ॥ युध्द करितां ॥४४॥

श्रीभागवतींचे मता ॥ श्रीकृष्ण आणि विश्वनाथा ॥

युध्द जाहलें उभयतां ॥ महाथोर ॥४५॥

ब्रह्मा जावोनी कृष्णासी ॥ वृत्तांत सांगे विस्तारेंसीं ॥

आह्मीं शांतविलें शिवासी ॥ आपुल्या बोलें ॥४६॥

आतां दोन भुजा ठेविजे ॥ जीवेंसिं बाण रक्षिजे ॥

मग सर्वभुजा तोडिजे ॥ शस्त्रघायें ॥४७॥

यापरी ब्रह्मा सांगोनी ॥ तोही गेला निजस्थानीं ॥

तंव इकडे कृष्णासि रणीं ॥ पाचारिलें बाणें ॥४८॥

बाण रथारूढ जाहला ॥ सैन्यभारा पुढें चालिला ॥

धनुष्यांसी गुण चढविला ॥ पांचशतां ॥४९॥

जया पांचशत धनुष्यें ॥ सज्ज केलीं तेणें एकें ॥

आला कृष्णासि सन्मुखें ॥ आवेशोनी ॥१५०॥

सिंहमुखी रहंवर ॥ वरी बैसला बाणासुर ॥

तंव तयाचा पडिला मयूर ॥ दुश्चिन्हेंसीं ॥५१॥

परि आवेशा चढला वीर ॥ केला धनिष्यां टणत्कार ॥

सोडिता जाहला निर्वाण शर ॥ श्रीकृष्णावरी ॥५२॥

वोढी वोढोनियां पूर्ण ॥ पांचशतें सोडिले बाण ॥

करीतसे घोर संधान ॥ तयेवेळीं ॥५३॥

मग उठिले श्रीपती ॥ बाण उडविले गगनपंथी ॥

ध्वज तोडोनि सारथी ॥ पाडिला त्याचा ॥५४॥

वेगें विंधीत श्रीधर ॥ ते निवारूं न शके असुर ॥

तंव चारी अश्व सत्वर ॥ पाडिलें देवें ॥५५॥

मग बाण झाला विरथ ॥ आला गदा भोवंडित ॥

तंव तो वेगें उठत ॥ संकर्षण ॥५६॥

तयासि वारिलें श्रीकृष्णें ॥ एकासि दोघे जुंझणें ॥

हें यदुवंशा येईल उणें ॥ बंधुराया ॥५७॥

रणश्री पहावया कोडें ॥ देव आले असती वर्‍हाडें ॥

नाचे आकाशीं नारदु कोडें ॥ कृष्णनोवरा रणधेंडा ॥५८॥

आतां असो हा युध्दविचार ॥ सर्व वर्णावा तरि अपार ॥

ग्रंथा होईल पसर ॥ येथेंचि आतां ॥५९॥

मग वर्षले शस्त्रास्त्रीं ॥ निवारिती परस्परीं ॥

बळिभद्र ह्मणे मुरारी ॥ सोडीं चक्र ॥१६०॥

बंदीं कष्टतो अनिरुध्द ॥ वेगीं करीं याचा वध ॥

मग चक्रेंसिं गोविंद ॥ सरसावला ॥६१॥

सकळ दैवतांचि स्तुती ॥ करीतसे श्रीपती ॥

ह्मणे तुह्मीं यावें त्वरितीं ॥ चक्राअंगीं ॥६२॥

एकादशी सोमवार ॥ आणि पतिव्रतेचा आचार ॥

त्यांचिया तेजें बाणासुर ॥ वधो चक्रें ॥६३॥

तप दानवाचेम सत्य ॥ औषधी आणि सर्व तीर्थ ॥

त्यांचे सत्वें होवो पतित ॥ शिर बाणाचे ॥६४॥

अग्नी इंद्र यम वरुण ॥ सकळ देव आदिकरून ॥

त्यांच्या सत्वें वधो हा बाण ॥ सहस्त्रबाहो ॥६५॥

यापरि सर्वांसि सत्वातून ॥ आव्हानिलें मग सुदर्शन ॥

केलें बाणासि अनुमान ॥ हाणावया ॥६६॥

तंव पातली भवानी ॥ सवें जया विजया दोनी ॥

श्रीकृष्णासि करी विनवणी ॥ बाणासाठीं ॥६७॥

गिरिजा ह्मणे नारायणा ॥ मज बाण द्यावा दाना ॥

म्यां पुत्रपणें या बाणा ॥ ह्मणविलें असे ॥६८॥

तेव्हां नावेक श्रीधर ॥ करें झांकी आपुले श्रोत्र ॥

मग बोलिला उत्तर ॥ भवानीसी ॥६९॥

सत्य करीन रुद्रवचन ॥ तयाच्या राखीन हो प्राणा ॥

मग हा तुज आंदणा ॥ देईन अंबे ॥१७०॥

हा बळीचा असे नंदन ॥ ह्मणोनि याचा रक्षीन प्राण ॥

परि सहस्त्र भुजा छेदीन ॥ भवानीये ॥७१॥

स्वस्थळा गेली भवानी ॥ बाणासि पाडी चक्रपाणी ॥

मग तो मूर्छना सांवरूनी ॥ सावध जाहला ॥७२॥

मग ह्मणे नारायण ॥ बाणा घेई व्याहीपण ॥

आदरें पाहील त्रिनयन ॥ आतां तुज ॥७३॥

तूं आमुचा सोइरा संबंधी ॥ तुज आतां न्हाणूं अशुध्दीं ॥

मर्दन करील खांदीं ॥ सुदर्शन ॥७४॥

ऐसें बोलिला कृष्ण ॥ बाणा सावधरे ह्मणोन ॥

टाकिताझाला सुदर्शन ॥ मंत्रूनियां ॥७५॥

कीं दोन्ही राखाव्या भुजा ॥ येरा कापाव्या सहजा ॥

आव्हानोनि ऐशा मंत्रबीजा ॥ सोडिलें चक्र ॥७६॥

तें सहस्त्रधारा तिखट ॥ सुर्या ऐसें तेज वरिष्ठ ॥

धुंधुकारें चालिलें नीट ॥ बाणावरी ॥७७॥

कांहीं केलिया नावरे ॥ विंधिलें नाना शस्त्रास्त्रें ॥

परि कापित आलें धारें ॥ करदंडांसी ॥७८॥

भोंवती करीतसे फेरी ॥ केली भुजांची कांदोरी ॥

भुजभार मेदिनीवरी ॥ कोसळत सर्वही ॥७९॥

तयासि हालों न ये तेथ ॥ भोंवतें असे चक्र फिरत ॥

शिरा लागेल ह्मणोनि भीत ॥ बाणासुर ॥१८०॥

परशुरामें सहस्त्रार्जुन ॥ कीं गर्भीं सुभद्रानंदन ॥

त्यापरि भुजा खंडोनि बाण ॥ रक्षिला देवें ॥८१॥

जैसे कृषीवल शरत्कालांतीं ॥ वक्रसुरीनें कणसेम कापिती ॥

तैसा यदुनायकें चक्रघातीं ॥ खंडिल्या भुजा ॥८२॥

किंवा पळस फुलला वनीं ॥ तैसा दिसत असे नयनीं ॥

असंभाव्य रुधिर मेदिनीं ॥ वाहत असे ॥८३॥

गगनीं तुटती नक्षत्रभार ॥ त्यापरि चक्रें तुटती कर ॥

मग करीतसे थोर ॥ महाशब्द ॥८४॥

शेष राहिले दोन कर ॥ येर कापिले समग्र ॥

मग बोलाविलें चक्र ॥ नारायणें ॥८५॥

बाण पाहातसें नेत्रीं ॥ भुजा नेती श्वापदें घारी ॥

वाणें देताति खेचरी ॥ करकमळांचीं ॥८६॥

जैसी कृपणाची संपत्ती ॥ त्या देखतां चोर नेती ॥

तैशा भुजा पक्षी खाती ॥ बाणादेखतां ॥८७॥

शेष राखिले दोन हस्त ॥ येर कापिले समस्त ॥

हें हरिवंशींचेम मत ॥ बोलिलेंसें ॥८८॥

श्रीभागवतींचें मत ॥ राखिले असती चारी हस्त ॥

येर कापिले समस्त ॥ यदुनायकें ॥८९॥

मग बोले शार्ङ्गधर ॥ तुज म्यां दीधला वर ॥

स्वर्गीं होवोनि अमर ॥ राहें बाणा ॥१९०॥

बाण ह्मणे कृपानिधी ॥ फार कष्टलों रणखेदीं ॥

दुःख हरे ऐसी बुध्दी ॥ सांगा मज ॥९१॥

तंव बोले चक्रधर ॥ तूं नाचोनि तोषवीं रुद्र ॥

मग हरेलरे समग्र ॥ शीण तुझा ॥९२॥

बाण जाऊनि कैलासभुवनीं ॥ लागला उमावराचे चरणीं ॥

मग नृत्य मांडिलें अंगणीं ॥ शिवापुढें ॥९३॥

नाचतां देखतसे बीभत्स ॥ खदखदां हांसे महेश ॥

रंग आणोनि सुरस ॥ नोखाविला ॥९४॥

मग बोले जाश्वनीळ ॥ तुझें नाम महांकाळ ॥

आतां तूं राहें निश्चळ ॥ शिवलोकीं ॥९५॥

कैलासा गेला महेश्वर ॥ सवें नेला बाणासुर ॥

हे मात ऐकोनि सैन्यभार ॥ वोहोटला ॥९६॥

नगरा आला गोविंद ॥ तंव तेथें आला नारद ॥

दाविता झाला अनिरुध्द ॥ श्रीहरीसी ॥९७॥

तेथें कारागारीं तयासी ॥ बंधन होतें नागपाशीं ॥

तें सुपर्णपक्षवातेंसीं ॥ गेलें देखा ॥९८॥

मग अनिरुध्द सूटला ॥ आधीं बलभद्रासि भेटला ॥

श्रीहरीसि वंदिता झाला ॥ तदनंतरें ॥९९॥

आणि पितया प्रद्युम्नासी ॥ नंतर भेटला गरुडासी ॥

क्षेमालिंगन समस्तांसी ॥ देता झाला ॥२००॥

भेटते झाले पितापुत्र ॥ पुष्पवृष्टी करिती सुरवर ॥

दुंदुभींच्या नादें अंबर ॥ कोंदलेंसे ॥१॥

मग नारदें आणिली उखा ॥ ह्मणे ही तुमची सून देखा ॥

तयेसि कृष्णें कौतुका ॥ बैसविली ॥२॥

आला कुंभक प्रधान ॥ घालितसे लोटांगण ॥

ह्मणे आलोंजी मी शरण ॥ देवा तुह्मां ॥३॥

तयासि देवें उठविलें ॥ नाभी नाभी ऐसें बोलिले ॥

मस्तकीं करकमळ ठेविलें ॥ अभयवरदें ॥४॥

ह्मणे तूं आमुचा परमभक्त ॥ तुझें आह्मीं ऐकिलें वृत्त ॥

तंव तो प्रधान विनवित ॥ गोविंदासी ॥५॥

आतां यादव कुळटिळका ॥ लग्न लावोनि न्यावी उखा ॥

हे तुमची सून देखा ॥ बाणकन्या ॥६॥

देवासि मानवलें उत्तर ॥ वर्‍हाडी आले सुरवर ॥

मग जाहला विधिमंत्र ॥ चारी दिवस ॥७॥

सुखी जाहले देवगण ॥ कुंभकें दीधलें आंदण ॥

तंव बोले नारायण ॥ कुंभकासी ॥८॥

हें शोणितपुर नगर ॥ हत्ती घोडे आणि समग्र ॥

तुज दीधलें भांडार ॥ राज्य सकळ ॥९॥

मग बोले प्रधान कुंभक ॥ देवा पश्चिमेचा नायक ॥

त्याजवळी गोधनें सकळिक ॥ बाणाचीं असती ॥२१०॥

तीं दोनलक्ष गोधनें ॥ तुह्मीं न्यावीं जी आंदणें ॥

ऐसें विनविलें प्रधानें ॥ वासुदेवासी ॥११॥

मग तो उखा नोवरी ॥ बैसविली मयूरावरी ॥

आणि अनिरुध्द रथावरी ॥ बैसविला हरिखें ॥१२॥

द्वारके धाडिलें वधुवरां ॥ निरोप दीधला सुरवरां ॥

मग कृष्ण गेला वरुणपुरा ॥ तये वेळीं ॥१३॥

वरुणासि ह्माणितलें श्रीकृष्णें ॥ तुज जवळी बाणाचीं गोधनें ॥

तीं आह्मासि तेणें आंदणें ॥ दीधलीं असती ॥१४॥

वरुण बोले नेमवचनें ॥ त्या बाणाचे खुणे विण ॥

सहसा न देववती गोधनें ॥ मजसी देवा ॥१५॥

तंव क्रोध आला खगेंद्रा ॥ धांडोळिलें समुद्रनीरा ॥

चंचुवारीं मारिलें मगरां ॥ मत्स्यादिकांसी ॥१६॥

वरुण आला काकुळती ॥ ह्मणे गरुडा वाराजी श्रीपती ॥

आतां गाई देतों समस्तीं ॥ बाणाचिय तुह्मासी ॥१७॥

मग त्या धेनु सकळ घेऊन ॥ द्वारके आला श्रीकृष्ण ॥

मार्गीं वधुवरेंसि सैन्य ॥ भेटलें सर्व ॥१८॥

मग पाहोनि सुमुहुर्त ॥ नगरीं श्रीकृष्ण प्रवेशत ॥

द्वारके केला उत्साह बहुत ॥ नानाप्रकारीं ॥१९॥

सकळां जाहला आनंद ॥ रतीसि भेटला अनिरुध्द ॥

भाट वर्णिती सुबुध्द ॥ यदुवंशासी ॥२२०॥

सकळिकांहीं देखिली उखा ॥ गोपी पाहती सुनमुखा ॥

निंबलोण करिती देखा ॥ कृष्णपत्न्या कौतुकें ॥२१॥

त्यांहीं वधुवरांसहित ॥ वोवाळिला श्रीअनंत ॥

मग मंदिरीं प्रवेशत ॥ नारायण ॥२२॥

आनंद जाहला नगरीं ॥ गुढिया तोरणें मखरीं ॥

शृंगारिली द्वारकापुरी ॥ नारी नर संतुष्ट ॥२३॥

ऐसें हें उखाहरण ॥ श्रीभागवतींचें कथन ॥

तुज सांगितलें संपूर्ण ॥ प्रभावतीये ॥२४॥

हंसीण ह्मणे वो सुंदरी ॥ उखा असोनि दैत्यकुमरी ॥

जाहली अनिरुध्दाची अंतुरी ॥ हें आश्चर्य नव्हे ॥२५॥

तयेनें भवानी पूजिली ॥ ह्मणोनि द्वारका पावली ॥

कृष्णवंशासि मीनली ॥ पवित्रपणें ॥२६॥

आतां असो हा गतकथार्थ ॥ तुज सांगितला मन्मथ ॥

त्याचा पुरुषार्थ अद्भुत ॥ प्रभावतीये ॥२७॥

पुढें वर्णिजेल कथा निर्मळ ॥ दमयंतीनें वरिला नळ ॥

तया कथेचा परिमळ ॥ भाविकभक्त सेविती ॥२८॥

ऐसें असे हें उखाहरण ॥ जे करिती श्रवण पठण ॥

ते पावती वैकुंठभुवन ॥ श्रीहरीचें सहजची ॥२९॥

कुमरासि मिळेल नारी ॥ पतिव्रता होईल कुमरी ॥

भावें ऐकतां कर्णसूत्रीं ॥ उखाहरण ॥२३०॥

ऋषि ह्मणे गा भारता ॥ श्रवण करी जो हरिकथा ॥

तया भक्ताची संकटव्यथा ॥ निरसेल सर्व ॥३१॥

आतां असो हे संजोगणी ॥ प्रभावतीसि सांगे हंसिणी ॥

तें ऐका चित्त देवोनी ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ प्रथम स्तबक मनोहरू ॥

उखाहरणप्रकारू ॥ सप्तमोध्यायीं कथियेला ॥२३३॥

श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP