श्रीगणेशाय नमः ॥
सभाग्यें खणितां वैरागर ॥ रत्नांहूनि रत्नें परिकर ॥
जैसीं निघती अपार ॥ तैसें येथें जाहलें ॥१॥
असो पूर्वील अध्यायांतीं ॥ मदना जोडली प्रभावती ॥
मग श्रृंगारादि भोगस्थिती ॥ उभयतां होत ॥२॥
मदन दिवसा जाय बिढारीं ॥ रात्री प्रभावतीचे मंदिरीं ॥
दिवस क्रमिले यापरी ॥ बहु आनंदें ॥३॥
तंव सुनाभाच्या नंदिनी ॥ प्रभावतीच्या चुलतबहिणी ॥
त्या आलिया दोघीजणी ॥ भेटावया तीतें ॥४॥
एकी नाम चंद्रावती ॥ दुसरी ते गुणवंती ॥
बैसल्या येऊन प्रभावती ॥ जवळिकें पैं ॥५॥
जंव पाहती तयेलागुनी ॥ तंव पुरुषभुक्त दिसे चिन्हीं ॥
गालीं तांबूलरंग लागुनी ॥ मुद्रित झाले ॥६॥
प्रसन्न दिसे मुख कमळ ॥ उरोजतेज अति बंबाळ ॥
मस्तकींचे बीभत्स कुरळ ॥ जाहले असती ॥७॥
नेत्रीं पाहे अतिउन्मत्त ॥ पति भुक्त जाहली सत्य ॥
यास्तव होवोनि विस्मित ॥ पुसती तयेसी ॥८॥
बाई तुझा नवा श्रृंगार ॥ अनारिसा दिसतो मुखचंद्र ॥
तरि कोण जोडला वर ॥ सांग आह्मां ॥९॥
तूं आमुचि जिवलग बहीण ॥ सुखदुःखासि कारण ॥
साजणी सत्य सांगें वचन ॥ आह्मां प्रती ॥१०॥
तुज प्रसन्न दुर्वास देवो ॥ तरि कैसी पावलीस नाहो ॥
तो दाखवीं आमुचा भावो ॥ दृष्टीं आह्मां ॥११॥
मग तयेनें धरोनि हातीं ॥ घेवोनि गेली एकांतीं ॥
दाखविती जाहली मूर्ती ॥ तया मदनाची ॥१२॥
त्यांहीं नयनीं तो देखिला ॥ रत्नमंचकीं असे बैसला ॥
कीं पौर्णिमेचा उगवला ॥ चंद्र जैसा ॥१३॥
येरी संभ्रमें पुसती ॥ तूं कैसेनि पावलीस पती ॥
बाई ते सांगावी युक्ती ॥ आह्मालागीं ॥१४॥
मग ह्मणे प्रभावती ॥ ब्रह्मवाक्य सत्य निश्चिती ॥
मज जोडले मदनपती ॥ ऋषिवरदें ॥१५॥
दुर्वासगुरुचा मंत्र ॥ तयाचा करावा उच्चार ॥
जपावा एक सहस्त्र ॥ पतिप्राप्तीसी ॥१६॥
ऐसा नित्यनेम साचार ॥ पवित्रपणें जपावा मंत्र ॥
तरि मग सुंदर भ्रतार ॥ प्राप्त होय निश्चयें ॥१७॥
तंव पुसती दोघीजणी ॥ यांचे कुळीं असेल कोणी ॥
तरि तोचि मेळवीं गे साजणी ॥ पति आह्मातें ॥१८॥
मग ते प्रीतीनें प्रभावती ॥ वृत्तांत पुसे मदनाप्रती ॥
कीं आणखी तुमचे सांगाती ॥ कोण असती ॥१९॥
हे सुनाभाची चंद्रावती ॥ आणि दुजी हे गुणवंती ॥
तुमचे वंशींचा भ्रतार इच्छिती ॥ प्रीतीकरोनी ॥२०॥
मग मदन करी अनुवादु ॥ ह्मणे आमुचा चुलता गदु ॥
आणि सांब माझा सावत्र बंधु ॥ प्रचंडवीर ॥२१॥
रुक्मीणीसैंवरीं तो गद ॥ करोनियां तुंबळ युद्ध ॥
मस्तकीं हाणितला जरासंध ॥ रणामाजी ॥२२॥
आतां सांब बंधु अवधारीं ॥ तेणें दुर्योधनाची कुमरी ॥
पराक्रमें हरिली सैंवरीं ॥ एकटया वीरें ॥२३॥
मग ह्मणे प्रभावती ॥ सांबें हरिली सैंवरीं युवती॥
ते कथा सांगावी मजप्रती ॥ कृपा करोनी ॥२४॥
येरु ह्मणे धृतराष्ट्रपुत्र ॥ हस्तनापुरीचा नृपवर ॥
दुर्योधन महावीर ॥ कौरववंशीं ॥२५॥
तयाची लक्ष्मणा नामें कुमरी ॥ रुपें गुणें वयें साजिरी ॥
राजे मिळाले तिचिया सैंवरीं ॥ सकलपृथ्वीचे ॥२६॥
तेथें आमुचा सांब बंधु ॥ पहावया गेला विनोदु ॥
तंव तेणें देखिली वधु ॥ स्वरुपवंत ॥२७॥
मांडलें होतें सैंवर ॥ निश्चयें कोणा न कळे वर ॥
ह्मणोनि येरें उचलिली शीघ्र ॥ बलात्कारें ॥२८॥
रथीं वाहिली नोवरी ॥ तंव वीर उठिले हाहाःकारीं ॥
सांब बंधु निघे मोहरीं ॥ द्वारकेच्या ॥२९॥
पाठीं धांवला दुर्योधन ॥ शकुनी आणि दुसरा कर्ण ॥
जयद्रथ दुःशासन ॥ कौरव सर्व ॥३०॥
आलें जाणोनि धांवणें ॥ रथ मुरडिला कृष्णनंदनें ॥
इतुकियांत विंधिला कर्णें ॥ सातबाणीं ॥३१॥
ऐसें देखोनि संधान ॥ येरु निवारी बाणें बाण ॥
आणि सोडिले अपार मार्गण ॥ कर्णावरी तेधवां ॥३२॥
चारी वारु वेगवत्तर ॥ सारथ्यासह पाडिले शीघ्र ॥
रथ केला समरीं जर्जर ॥ तया कर्णाचा ॥३३॥
विरथ झाला वीर कर्ण ॥ संधान काहींच न करी जाण ॥
तंव आला दुःशासन ॥ रथवेगेंसीं ॥३४॥
तेणें विंधिला कृष्णसुत ॥ जैसा तृणें झांकिला पर्वत ॥
तोही केला असे विरथ ॥ जांबीवतीसुतें ॥३५॥
तंव धांवूनि आला शकुनी ॥ मारित चालिला मार्गणीं ॥
त्यासही विंधोनियां रणीं ॥ केला विरथ ॥३६॥
मग चालिला मारित ॥ वीर पाडिले असंख्यात ॥
अस्थिमांसांचे पर्वत ॥ पाडिले तेथें ॥३७॥
तें देखोनि युद्ध दारुण ॥ पळ काढीत दुर्योधन ॥
तंव बोले भानुनंदन ॥ दुर्योधनासी ॥३८॥
हा श्रीकृष्णाचा नंदन ॥ नाटोपे कवणासि जाण ॥
तरी युद्ध बहुत मिळोन ॥ करावें यासी ॥३९॥
वेढोनियां सभोंवता ॥ बाणीं विंधावा सर्वथा ॥
करोनि ऐसी येकमत्ता ॥ धरावें यासी ॥४०॥
मग तया वेढोनि समस्तीं ॥ सभोंवताले विंधिती ॥
तरी नागवे महारथी ॥ सांबवीर ॥४१॥
हा येकला ते बहुत ॥ जैसे टोळ तरुवेष्टित ॥
परि वारु पाडोनि मूर्छागत ॥ केला सांब ॥४२॥
मग मिळोनि समस्तीं ॥ आकळिला वीर हस्तीं ॥
बांधोनि हस्तनापुरीं नेती ॥ सांबवीरा ॥४३॥
तंव आले नारदमुनी ॥ सांब देखिला बंधनीं ॥
मग बोलते झाले वचनीं ॥ कौरवांसी ॥४४॥
अरे हा सिंहाचा बालक ॥ बंदीं रक्षितां तुह्मी जंबुक ॥
परि कोपल्या यदुनायक ॥ बरवें न दिसे ॥४५॥
तो महाराज उग्रसेन ॥ आणि तैसाच रेवती रमण ॥
टाकितील हें खणोन ॥ हस्तनापुर ॥४६॥
गर्वें बोले दुर्योधन ॥ किती वानाल उग्रसेन ॥
कीं गजयुद्धीं पंचानन ॥ निर्भय सदा ॥४७॥
प्राप्त नसतां सैंवरपाट ॥ कन्या घेवोनि गेला नष्ट ॥
वानितां कृष्णाचा थोरवट ॥ तुह्मी व्यर्थ ॥४८॥
आह्मां कोपलिया कौरवां ॥ कोण रक्षील यादवां ॥
आह्मीं काय केलें पांडवां ॥ तें नेणा तुह्मीं ॥४९॥
ऐसे तयाचे बोल ऐकोनी ॥ मग निघाला नारदमुनी ॥
वेगें पातला द्वारकाभुवनीं ॥ कृष्णाजवळी ॥५०॥
कृष्णें देखिला नारदमुनी ॥ उभा राहिला कर जोडोनी ॥
मान देवोनि आसनीं ॥ बैसविला तो ॥५१॥
सभा असे घनवटली ॥ त्यांत नारदें गोष्टी काढिली ॥
कीं तुमची प्रौढी जाणवली ॥ नारायणा ॥५२॥
नारद ह्मणे हो मुरारी ॥ सांब बांधिला हस्तनापुरीं ॥
तेथें लक्ष्मणेच्या सैंवरीं ॥ गेला होता ॥५३॥
ते दुर्योधनाची कुमरी ॥ आणीत होता बलात्कारीं ॥
ह्मणोनि युद्ध महाथोरी ॥ जाहलें तेथें ॥५४॥
हा येकला ते बहुत ॥ युद्ध जाहलें अद्भुत ॥
मग सर्वीं कारेनि येकमत ॥ धरिते झाले ॥५५॥
समरंगणीं धरोनि बांधिला ॥ नगरीं नेवोनि बंदीं रक्षिला ॥
तेणें अवकळा पावला ॥ बहुत साच ॥५६॥
ऐकोनि कोपला उग्रसेन ॥ ह्मणे आमुचा केला अपमान ॥
तरि आणावा दुर्योधन ॥ बांधोनियां ॥५७॥
पालाणारे सर्व दळभार ॥ प्रळयकाळींचा सागर ॥
तंव बोलिला बळिभद्र ॥ उग्रसेनासी ॥५८॥
माझी तुह्मी ऐका बुद्धी ॥ नको सैन्याची करुं सिद्धी ॥
तो अनुसरेल संबंधी ॥ सोयरिकेसी ॥५९॥
मी जाईन हस्तनापुरा ॥ वधूसह आणीन कुमरा ॥
तरी तुह्मीं दळभारा ॥ न पाठवावें ॥६०॥
ऐसें ह्मणोनि निघाला बळिभद्र ॥ खांदीं घेवोनि मुसळनांगर ॥
क्षणें पावला हस्तनापुर ॥ महाप्रतापी ॥६१॥
आला नगराच्या बाह्यदेशीं ॥ बोलाविलें दुर्योधनासी ॥
तंव तो येवोनि गुरुसी ॥ सन्मानिता जाहला ॥६२॥
राम बोले दुर्योधनासी ॥ तुह्मीं धरिलेंति सांबासी ॥
येणें गुणें तुमचे यशासी ॥ भलेपण साजलें कीं ॥६३॥
ऐसे चांगले नीतिवंत ॥ तो येकला तुह्मी बहुत ॥
येणें काजें काय जैत ॥ आलें तुह्मां ॥६४॥
तुह्मीं बांधिला कृष्णनंदन ॥ ह्मणोनि कोपला उग्रसेन ॥
तंव तो बोले दुर्योधन ॥ रामाप्रती ॥६५॥
गुरुजी उग्रसेन तो किती ॥ आणि वाखाणितां श्रीपती ॥
कोण रक्षील द्वारावती ॥ मी कोपलिया ॥६६॥
ऐसें ह्मणोनि उठिला शीघ्र ॥ घरा गेले कौरव समग्र ॥
बळिभद्र नगरा बाहेर ॥ येकलेचि असे ॥६७॥
कोप आला रेवतीवरा ॥ ह्मणे काय सांगों शार्ङगधरा ॥
येथें सांडोनि वधुवरां ॥ जातां नये ॥६८॥
मज कोपलिया बळिभद्रा ॥ उलथूं शके हे वसुंधरा ॥
तरि आतां मारितां कुरुपुत्रां ॥ काय सायास ॥६९॥
या दुष्टांचें हस्तनापुर ॥ गंगेमाजी टाकीन समग्र ॥
कीं लीलेनें उलथिजे पत्र ॥ पुस्तकाचें जैसें कां ॥७०॥
यद्वा पितृतर्पणाची अंजुळी ॥ तैसें नगर घालीन जळीं ॥
हाहाःकार करवीन येवेळीं ॥ या कौरवांसी ॥७१॥
मग भूमींत घालोनि हल ॥ उचलूं पाहे भूमंडळ ॥
तंव नगरीं पडती घळघळ ॥ मंदिरें सर्व ॥७२॥
असंख्य पडलीं उपमंदिरें ॥ ढळलीं अवघीं दामोदरें ॥
हांटवटिया आणि मखरें ॥ पडलीं भूमी ॥७३॥
मग पुसे गंगाकुमर ॥ कवण आला असे वीर ॥
एक ह्मणती रोंविला नांगर ॥ बाह्यदेशीं ॥७४॥
तंव जाणितलें दुर्योधनें ॥ कीं हें बळदेवाचें करणें ॥
मग धांवोनि आला तत्क्षणें ॥ रामाजवळी ॥७५॥
केला साष्टांग नमस्कार ॥ ह्मणे काढीं जी नांगर ॥
गुरुजी तुमचाचि आधार ॥ पृथ्वीसिया ॥७६॥
आह्मी अपराधी सर्वथा ॥ तुह्मीं सांभाळावें आतां ॥
ह्मणोनि चरणीं ठेविला माथा ॥ कौरवेश्वरें ॥७७॥
ऐसा रामासि प्रार्थोनी ॥ मंदिरा नेला समजावोनी ॥
वस्त्रालंकार देवोनी ॥ संतुष्ट केला ॥७८॥
वधुवरें रथीं वाहोन ॥ मग बोलिला दुर्योधन ॥
आतां द्वारकेसि जावोन ॥ सुखें असिजे ॥७९॥
मग निघाला हलधर ॥ द्वारके आला सत्वर ॥
वधुवरें प्रवेशलीं मंदिर ॥ आनंदगजरीं ॥८०॥
तैंपासोनि हस्तनापुर ॥ गंगातीरीं जाहलें वक्र ॥
बळदेवाचें ऐसें चरित्र ॥ प्रभावतीये ॥८१॥
ऐसी ऐकोनि प्रतापकीर्ती ॥ अवस्थें व्यापिली चंद्रावती ॥
आणि दुजी ते गुणवंती ॥ तन्मय जाहली ॥८२॥
तयांसि ह्मणे प्रभावती ॥ कांहीं करुं नको गे खंती ॥
मंत्रशक्तीनें येतील पती ॥ तुमचे येथें ॥८३॥
मग दीधला विधियुक्त मंत्र ॥ नेमस्त जपतां एकसहस्त्र ॥
तंव ते आले भ्रतार ॥ मंदिरासी ॥८४॥
जैसे जन्मेजयाचे यज्ञीं ॥ सर्प आणिले ब्राह्मणीं ॥
तैसे ऋषिमंत्रें आकर्षोनी ॥ आणिले भ्रतार ॥८५॥
दोघां करोनि मार्जनें ॥ दीधलीं वस्त्रें आणि भूषणें ॥
मग घातलीं आसनें ॥ वोहरांपासी ॥८६॥
प्रीतीनें ह्मणे प्रभावती ॥ जयेची जयावरी प्रीती ॥
तोचि वरा गे निगुती ॥ पाहोनियां ॥८७॥
मग ते चंद्रावती कामिनी ॥ पुष्पमाळा हातीं घेवोनी ॥
गदाकंठीं प्रीतीकरोनी ॥ अर्पिती हाय ॥८८॥
तैसीच ते गुणवंती ॥ रत्नमाळा घेवोनि हातीं ॥
वरियेला लक्ष्मणापती ॥ सांब तयेनें ॥८९॥
त्या तीघी मृगलोचना ॥ यापरि वरितां तिघांजणा ॥
प्रेमप्रीती सुखशयना ॥ क्रमिले दिवस ॥९०॥
ऐसिया रतिसुखसंभोगीं ॥ गरोदर जाहल्या तिघी ॥
गर्भोद्गमाचें तेज अंगीं ॥ प्रकट जाहलें ॥९१॥
तंव प्रभावती आणि मदन ॥ सारी खेळतां एकदिन ॥
गगनीं वर्षे निबिड घन ॥ श्रावणमासीं ॥९२॥
तयेसि ह्मणे मन्मथ ॥ हा वर्षाकाळ असे ऋत ॥
गगनीं चंद्र झांकोळत ॥ अभ्रांमाजी ॥९३॥
हा निशीचा अवसर ॥ गगनीं लपाला शशधर ॥
परि तुझा वो मुखचंद्र ॥ प्रकाशला येथें ॥९४॥
तुझे मस्तकींचे कुरळ ॥ तेंचि जाणावें मेघपडळ ॥
आणि दशन शोभती कीळ ॥ विजू देखा ॥९५॥
बरवा तुझा आचार ॥ मुखचंद्र मनोहर ॥
पूर्ण असोनि दिसे पवित्र॥ पौर्णिमेचा सदैव ॥९६॥
परि तो ब्राह्मणांचा राजा ॥ औषधी त्याचिया प्रजा ॥
आणि देवांचे अन्नबीजा ॥ आधिपती तो ॥९७॥
जयाचा असे बुध सुतु ॥ पुरुरवा जयाचा नातु ॥
पुरुषाचे पोटीं जन्मतु ॥ भूपती तो ॥९८॥
ह्मणोनि बोलिजे सोमवंश ॥ यादवकुळप्रकाश ॥
त्यातें नमस्कारी हृषीकेश ॥ प्रभावतीये ॥९९॥
तंव बोले प्रभावती ॥ कैसा पूर्वज निशापती ॥
तयापासाव बुधाची उत्पत्ती ॥ जाहली कैसी ॥१००॥
आणि पुरुरवा पुरुषोदरीं ॥ जाहला असे कैसियापरी ॥
हें मज सांगाजी विस्तारीं ॥ कृपा करोनी ॥१॥
मग कथा सांगे मन्मथ ॥ हा अत्रीचा रेतजात ॥
षोडशकळांहीं पूर्णभरित ॥ पूर्वीं होता ॥२॥
तो आत्मप्रौढीं आथिला ॥ ब्रह्मयाचा वंश झाला ॥
ह्मणोनि द्विजराज बोलिला ॥ शास्त्रांमाजी ॥३॥
हा वनस्पतींचा पोषिता ॥ अमृतकर जाण तत्वतां ॥
तेणें हरिली गुरुची कांता ॥ भोगेच्छेनें ॥४॥
स्नाना गेला बृहस्पती ॥ तंव चंद्र आला घराप्रती ॥
स्वरुपवंत देखोनि युवती ॥ धरिली करें ॥५॥
मग उचलोनि तयेसी ॥ नेली आपुले मंदिरासी ॥
भोगिता जाहला परियेसीं ॥ प्रभावतीये ॥६॥
इकडे गुरु आला मंदिरा ॥ तंव न देखे आपुली दारा ॥
ह्मणोनि पुसे देवां समग्रां ॥ तारेप्रती ॥७॥
गुरु निजमनीं विचारी ॥ तंव ते असे चंद्राचे घरीं ॥
मग सांगता झाला झडकरी ॥ देवांप्रती ॥८॥
चंद्रासि ह्मणती देव समग्र ॥ त्वां केलें रे कर्म अपवित्र ॥
असो आतां देईं सुंदर ॥ गुरुची पत्नी ॥९॥
तूं ब्रह्मवंशीं निष्कलंक ॥ येणें लागला तुज कलंक ॥
आतां निंदितील लोक ॥ गुरुद्रोही ह्मणोनी ॥११०॥
मग बोलिला शीतकर ॥ ह्मणे मी तारा नेदीं सुंदर ॥
ऐसें ऐकोनि देवभार ॥ युद्धालागीं उठावले ॥११॥
देवीं हाणिलीं अमित शस्त्रें ॥ परि तीं साहिलीं शीतकरें ॥
मग हींव घातलें चंद्रें ॥ देवांवरी तेधवां ॥१२॥
तंव देवांचा सर्व परिवार ॥ हिवें जाहला अति जर्जर ॥
ऐसें एक संवत्सर ॥ युद्ध झालें दारुण ॥१३॥
त्रिशूळें हाणीतसे रुद्र ॥ चक्रें हाणी श्रीकरधर ॥
चंद्राचा करावया संहार ॥ प्रवर्तले सर्व ॥१४॥
तें ब्रह्मदेवा जाहलें श्रुत ॥ मग तो आला धांवत ॥
जयेस्थळीं होते झुंजत ॥ देव सकळ ॥१५॥
सामोरा येवोनि ब्रह्मा ॥ विनवीतसे पुरुषोत्तमा ॥
कीं चंद्र वधिलिया तुह्मां ॥ कैसें भोजन ॥१६॥
तेणें जाणवे दिनमाना ॥ आणि आयुष्याची गणना ॥
चंद्र बोधोनि गुरुअंगना ॥ आणीन मी ॥१७॥
ब्रह्मा निघाला तेथून ॥ चंद्रा जवळी पातला आपण ॥
तयासि बोले निषेधवचन ॥ कोपोनियां ॥१८॥
चंद्रासि ह्मणे चतुरानन ॥ हे गुरुभार्या तुवां आणोन ॥
लांछन घेतलें लावोन ॥ अतिनीचपणें ॥१९॥
अरे नष्टा अपवित्रा ॥ वेगीं देईं सोडूनि तारा ॥
नातरी आतांचि यमपुरा ॥ पावसील ॥१२०॥
ह्मणोनि चंद्रें तारा आणिली ॥ ब्रह्मयाचे करीं दीधली ॥
तेणें ते तत्काळ आणिली ॥ देवां जवळी ॥२१॥
मग ते सकळ देवीं तारा ॥ मागुती दीधली गुरुवरा ॥
परि जाहलिया व्यभिचारा ॥ राहिला गर्भ ॥२२॥
जैं तें उपजलें बालक ॥ तैं तारेनें सांडिलें तात्काळिक ॥
तंव देव बोलिले सकळिक ॥ त्या बालकासी ॥२३॥
बाळें केला अनुवादु ॥ ह्मणे माझा पिता विधु ॥
मग नांव ठेविलें बुधु ॥ तयालागीं ॥२४॥
ऐसा तो चंद्रवीर्यें जन्मला ॥ परि पवित्र ह्मणती तारा ॥
पंचकन्यांमध्यें सुंदरा ॥ वाखाणिती कीं ॥२५॥
ऐसा तो सोमवंशीं बुधु ॥ तेणें सूर्यवंशाची केली वधु ॥
जयेसि स्त्रीपुरुष संबंधु ॥ एकाचि देही ॥२६॥
तंव प्रभावती करी विस्मयो ॥ एकाचि शरीरीं स्त्रीनाहो ॥
याचा सांगावा अभिप्रावो ॥ प्रियकरा मज ॥२७॥
मग तयेसि सांगे मदन ॥ श्राद्धदेव सूर्यवंशीं जाण ॥
तेणें पुत्राकारणें यज्ञ ॥ केला थोर ॥२८॥
यज्ञा जाहली पूर्णाहुती ॥ ऋषिवाचा वदे विपरिती ॥
कीं कन्या होईल ह्मणती ॥ धरामर ॥२९॥
ऐसा ऋषींचा आशिर्वाद ॥ श्राद्धदेवें घेतला शुद्ध ॥
स्त्रियेसि कन्यागर्भ प्रसिद्ध ॥ राहिला तेव्हां ॥१३०॥
यथाकालीं कन्या जन्मली ॥ इला नाम ते पावली ॥
परि श्राद्धदेवासि वर्तली ॥ चिंता थोर ॥३१॥
मग सूर्यवंशा कारणें ॥ ब्रह्मा प्रार्थिला तयानें ॥
कीं वंशा नाहीं उद्धरणें ॥ पुत्राविण ॥३२॥
प्रसन्न जाहला सत्यनाथ ॥ रायासि दीधला वर इच्छित ॥
कीं कन्येचा होईल सुत ॥ ममकृपेनें ॥३३॥
ऐसा वर देवोनि रायासी ॥ विधि गेला सत्यलोकासी ॥
रायें नाम ठेविलें पुत्रासी ॥ सुद्युम्न ऐसें ॥३४॥
मग तो सुद्युम्न रावो ॥ सूर्यवंशीं महाबाहो ॥
व्याहाळी हिंडतां अपावो ॥ मागुता घडला ॥३५॥
तंव पुसे प्रभावती ॥ काय घडलें तया भूपती ॥
तें सांगाजी मजप्रती ॥ प्राणेश्वरा ॥३६॥
मदन ह्मणे कोणैककाळीं ॥ गिरिजा आणि चंद्रमौळी ॥
येवोनि काम्यकवनस्थळीं ॥ करितां क्रीडा ॥३७॥
तेथें रुद्रअंकावरी ॥ नग्न बैसली होती गौरी ॥
तंव ऋषि आले त्रिपुरारी ॥ दर्शनासी ॥३८॥
देखोनियां ऋषेश्वरां ॥ वेगें उठिली रुद्रदारा ॥
त्वरेनें नेसली अंबरा ॥ लाजोनियां ॥३९॥
ते निघोनि गेलिया मुनी ॥ मग रुद्रासि पुसे भवानी ॥
कीं म्यां बैसोंनये नग्नी ॥ ऐसिया ठायां ॥१४०॥
येथें पुरुषाचा संचार ॥ हा येकांतींचा नाहीं विचार ॥
तेव्हां उमेसि बोलिला रुद्र ॥ तेंचि ऐका ॥४१॥
या वना येईल जो नर ॥ तो नारी होईल निर्धार ॥
ऐसा शाप बोले रुद्र ॥ तया वनासी ॥४२॥
मग कवणे एके काळीं ॥ सुद्युम्न आला व्याहाळी ॥
प्रवेशला त्या वनस्थळीं ॥ शापाचिया ॥४३॥
वेगें गेला वनाभीतरीं ॥ तंव तो तत्काळ होवोनि नारी ॥
प्रकट जाहलें यौवन शरीरीं ॥ तयाचिया ॥४४॥
नासली पुरुषाची आकृती ॥ ह्मणे केविं जावें नगराप्रती ॥
मग लज्जेस्तव ते युवती ॥ बैसली तेथें ॥४५॥
इतुकियांत वनस्थळीं ॥ बुध आला करुं व्याहाळी ॥
तेणें ते देखिली बाळी ॥ स्वरुपवंत ॥४६॥
येरु आकाशगामी होता ॥ तेथोनि तयेसि जाहला पुसता ॥
ह्मणे तूं कोणाची कांता ॥ सुंदरी सांग ॥४७॥
कोठें गेला तुझा कांत ॥ येरी ह्मणे मी अपर्णित ॥
तरी मज वरावें त्वरित ॥ आतां तुह्मीं ॥४८॥
मम येवोनि दुजियावनीं ॥ स्वरुपवंत ते कामिनी ॥
सांगे सकळ लज्जावचनीं ॥ आपुलें वृत्त ॥४९॥
तें जाणवलें सोमसुता ॥ कीं इसी वर नाहीं सर्वथा ॥
मग देखोनियां स्वरुपता ॥ केली स्त्री ते ॥१५०॥
लाविलें असे गांधर्वलग्न ॥ मंदिरीं आणिली स्नेहें करुन ॥
दोघां जाहलें एकमन ॥ प्रेमभरेंसीं ॥५१॥
ऐसा क्रमिला संवत्सर ॥ तंव सुद्युम्नासि जाहला पुत्र ॥
पुरुरवा नामें पवित्र ॥ सोमवंशीं ॥५२॥
परि हें ऐकोनि विपरित ॥ मग वसिष्ठ आला तेथ ॥
तंव प्रसवला देखे अपत्य ॥ सुद्मुम्न तो ॥५३॥
वसिष्ठ पाहे विचारोन ॥ हा श्राद्धदेवाचा नंदन ॥
आणि आमुचा यजमान ॥ सूर्यवंशीं ॥५४॥
हा सूर्यवंशींचा राजा ॥ बुधाची स्त्री हेतो लज्जा ॥
तरि प्रसन्न करोनि वृषभध्वजा ॥ पुरुषत्व मागों ॥५५॥
मग करोनियां तपनिष्ठा ॥ प्रसन्न केलें नीलकंठा ॥
मागितला स्त्रीदेह पालटा ॥ पुरुषदेहो ॥५६॥
प्रसन्न होवोनि ह्मणे शंकर ॥ वनशाप न टळे दुर्धर ॥
परि तुझे तपाचा आभार ॥ जाहला मज ॥५७॥
कृपेनें ह्मणे त्रिपुरारी ॥ दोन्ही असोत याचे शरीरीं ॥
येका मासांतीं पुरुषनारी ॥ पालट होय ॥५८॥
जैं हा नरपणें असेल ॥ तैं आपुलें राज्य भोगील ॥
मासांतीं युवती होईल ॥ निश्चयेंसी ॥५९॥
ऐसें देवोनि वरदान ॥ गुप्त जाहला उमारमण ॥
मग सुद्युम्न आला नगरा लागुन ॥ आपुलीये ॥१६०॥
पुरुषपणें रमतां स्त्रियेसी ॥ पुत्रत्रय जाहलें तयासी ॥
उत्कल गय विमल परियेसीं ॥ सूर्यवंशीं ॥६१॥
पुरुषपणीं स्त्रीत्वविस्मृती ॥ तैसीच युवतीपणीं नरस्थिती ॥
कीं जैसी स्वप्नजाग्रती ॥ तैशापरी ॥६२॥
ऐसी भोगोनियां स्थिती॥ सुद्युम्ना उपजली खंती ॥
मग राज्य देवोनि पुरुरव्याप्रती ॥ गेला तपासी ॥६३॥
वर्जिले फलोदक आहार ॥ तप केलें परम दुर्धर ॥
मग पावला मुक्तिद्वार ॥ अविनाश जें ॥६४॥
प्रभावतीस सांगे मन्मथ ॥ त्वां मज पुसिला वृत्तांत ॥
तरि या कथेसि संमत ॥ ऐसें आहे ॥६५॥
हा सोमवंशाचा वृत्तांत ॥ तुज सांगितला समस्त ॥
पुरुरवा नातु सत्य ॥ चंद्रासि होय ॥६६॥
ऐसी मन्मथें सांगतां कथा ॥ तंव हंस आला मागुता ॥
निरोप सांगता झाला मन्मथा ॥ श्रीकृष्णाचा ॥६७॥
तुह्मी येथें राहिलेत निश्चित ॥ परि कश्यपयाग आहे किंचित ॥
तरि कृष्णवाक्य कीं त्वरित ॥ वज्र वधावा ॥६८॥
तेथें आलासे वज्रपाणी ॥ तुह्मीं करावी करणी ॥
दैत्यासि त्वरित वधोनी ॥ जावें द्वारके ॥६९॥
मदन बोले पक्षिवरासी ॥ त्वां आतां जावें द्वारकेसी ॥
आमुचा सांगावा कृष्णासी ॥ वृत्तांत सर्व ॥१७०॥
जरी आह्मीं वधावें असुरा ॥ तरि स्त्रिया असती गरोदारा ॥
ऐसें सांकडें निर्धारा ॥ जाहलें प्राप्त ॥७१॥
ऐसें ऐकोनि हंस मागुता ॥ जावोनि श्रुत करी कृष्णनाथा ॥
मग देवें वर देवोनि मागुता ॥ पाठविला हंस ॥७२॥
हंस ह्मणे गा मन्मथा ॥ तुह्मीं काहीं न कीजे चिंता ॥
तुमचिया अर्भकां वर तत्वतां ॥ दीधला देवें ॥७३॥
कीं ते तुमचे प्रियकुमर ॥ उपजतांचि होतील महावीर ॥
आणि तयांसि विद्या समग्र ॥ होईल उदरीं ॥७४॥
एकेचि मासा भीतरीं ॥ वाढतील सुबुद्धी परिकरीं ॥
तुह्मां होतील युद्धावसरीं ॥ पाठिराखे ॥७५॥
ऐसा कृष्णाचा पावलेति वर ॥ मदना सांगे द्विजवर ॥
मग तो निघोनि गेला शीघ्र ॥ निजस्थानासी ॥७६॥
ते पूर्ण दिवशीं प्रभावती ॥ विजय पुत्रासि जाहली प्रसवती ॥
आणि चंद्रप्रभूसि चंद्रावती ॥ प्रसवली ते ॥७७॥
तिसरी जे कां गुणवंती बाळी ॥ ते गुणवंतासि प्रसवली ॥
पुढें ते जाहले महाबळी ॥ राज्यघर ॥७८॥
ऐसे झाले तिघे पुत्र ॥ सर्वज्ञाते महा पवित्र ॥
स्वर्गीं आनंदले सुरवर ॥ देखोनियां ॥७९॥
आतां असो हा विस्तार ॥ मदनें वधिला दैत्येंद्र ॥
तो पुढिले प्रसंगीं विचार ॥ ऐकोत भक्त ॥१८०॥
आणि ते उपजतांचि पुत्र ॥ जाहले परम धनुर्धर ॥
कैसा केला क्षेत्राचार ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८१॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ प्रथम स्तबक मनोहरु ॥
प्रभावतीआख्यानविस्तारु ॥ द्वादशोऽध्यायीं कथियेला ॥१८२॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ओंव्या ॥१८२॥