कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नम: ॥

रायासि ह्यणे मुनेश्वरु ॥ एकदा कैलासा सुरेश्वरु ॥ गेला कराया नमस्कारु ॥ शिवशक्तीसी ॥१॥

तेथें द्घारीं होता द्घारपाळ ॥ महावीर पवित्र शीळ ॥ तेणें वारिला वज्रपांळ ॥ निघता भुवनीं ॥२॥

तया पुसतसे सुरनाथ ॥ तुं कोणरे कोणाचा भुत्यं ॥ अमंगळा तो वृत्तांत ॥ सांग मगला ॥३॥

परी तो नायके बोली ॥ ह्यणोनि इंद्र कोपला तत्काळीं ॥ मग हाणिला कंठनाळीं ॥ महावज्रें ॥४॥

वज्र बैसले कंठनाळीं ॥ तेथें रेखा जाहली निळी ॥ आणि रुद्र झाला तत्काळीं ॥ द्घारपाळ तो ॥५॥

तो क्रोधें आवेशला भारी ॥ ह्यणे जाळीनरे सुरनगरी ॥ कीं तुझी करीन बोहरी ॥ क्षणमात्रें पै ॥६॥

ह्यणोनि उघडिला तृतीयनेत्रु ॥ तेणें थरारिला वज्रधरु ॥ तंव धाविन्नला देव गुरु ॥ त्याचिवेळी ॥७॥

मग स्तुती करी बृहस्पती ॥ जयजयाजी पशुपती ॥ हा तुझाचि स्थापित सुरपती ॥ अमरावतीये ॥८॥

आणि हें सकळ चराचर ॥ तुझेनि रोपिलें गा समग्र ॥ तुज कोपलिया अमर ॥ कैंचे आह्यी ॥९॥

ऐसा तो अनेकांपरी ॥ गुरुनें स्तविला त्रिपुरारी ॥ मग शांत केला शरीरी ॥ क्रोधाग्रि तो ॥१०॥

असो वाचविला सुरपती ॥ तेणें जीवनम बोलिजे बृहस्पपी ॥ परि क्रोधाग्नी धरिला हातीं ॥ शंभुदेवें ॥११॥

मग तो सिंधुगंगेचे मेळीं ॥ सरितापतीचे कल्लोळीं ॥ अग्नी टाकित चंद्रमौळी ॥ हातांतुनी ॥१२॥

तंव तेथें जन्मला कुमर ॥ महाविक्राळ भयंकर ॥ रुदन करिंता भुगोळ ॥ थरारि ला पैं ॥१३॥

टाहो न माये त्रिंभुवनी ॥ धाकें थरथरां कांपे मेदिनी ॥ तंव ब्रह्या आला धावोनि ॥ सिंधुसंगमा ॥१४॥

तयासि ह्यणे सरितापती ॥ याची कराजी जन्मपंक्ती ॥ ऐसें ह्यणोने दिला हातीं ॥ ब्रह्ययाचे ॥१५॥

विधींनें तो बैसवितां मांडी ॥ पुत्रे तयाची धरिली दाढी ॥ काहीं केलियाही न सोडी ॥ बाळकु तो ॥१६॥

तेणें ब्रह्या दुखावला ॥ जळ सुटलें नेत्रकमळा ॥ ह्यणॊनि जालंधर नाम बाळा ॥ बोलिला ब्तह्या ॥१७॥

मग आपुले करकमळें ॥ ब्रह्याने खांड सोडविलें ॥ तैं पासाव नाम जाहलें ॥ जामधंर हें ॥१८॥

हा नाटोपे सुरवरां ॥ महावीर भयंकरा ॥ तेणें त्रासविलें हरिहरा ॥ झूंजता रनीं ॥१९।

मग तो कुमर जालंधर ॥ जालंधपुरी केला नृपवर ॥ आणि प्रधान करोनि शुक्र ॥ विधि गेला सत्यलोका ॥२०॥

इकडे जालंधर ह्यणे शुक्रा ॥ दैत्य बोलावीं सत्वरा ॥ त्यांसि ह्यणावे जालंधरनगरा ॥ यावें सकळीं ॥२१॥

मग दैत्य आले समग्र ॥ राहुचें रुंडें विण शरीर ॥ तें देखॊनिया विचित्र ॥ बोले रावो ॥२२॥

जालंधर ह्यणे गा शुक्रा ॥ रुंडेविण देखतो शरीरा ॥ तरी कोणें कापिलें या असुरा ॥ तें मग सांग ॥२३॥

मग तयासि ह्यणे शुक्र ॥ जैं देवीं मंथिला सागर ॥ तेव्हा रत्नें काढिली समद्र ॥ सुरासुरीं ॥२४॥

कापट्यें वाढितां अमृतसुरा ॥ अनंते कापिलें या असुरा ॥ धड चेपोनियां अंबरा ॥ गेलें शिर ॥२५॥

कापट्य करोनिया करणीं ॥ देवी रत्नें नेलीं हिरोनी ॥ ऐसें बोले एकनयनीं ॥ दैत्याप्रती ॥२६॥

मग ऐसिये वचनावरी ॥ दैत्य कोपला अवधारीं ॥ ह्यणे आतां तो कपटी मुरारी ॥ वांचेल कैसा ॥२७॥

माझा पिता तरी सागर ॥ तो मंथोनि केला जर्जर ॥ आतां कैसा वाचेल इंद्र ॥ पाहुं आह्यी ॥२८॥

मग घस्मरु नामें दैतु ॥ तो बोलाविला त्त्वरित ॥ ह्यणें तुं राजकार्यी सावचित्त ॥ राहसीगा ॥२९॥

तरी त्वां जावें अमरपुरा ॥ बोध करावा सुरेश्वरा ॥ कीं रत्नें देवोनि जालंधरा ॥ जाई शरण ॥३०॥

नातरी हे अमरपुरी ॥ क्षणें जाईल कीं निर्धारी ॥ तुझा कोणी येईल कैवारी ॥ तोही दंडीन ॥३१॥

ऐसा ऐकोनिया मंत्र ॥ त्वरें निघाला घस्मर ॥ अविलंबेंसीं पातला शीघ्र ॥ अमरभुवना ॥३२॥

तो ह्यणेरे सुरेश्वरा ॥ तुह्यीं मंथन केलेंति सागरा ॥ तरि रत्नें नेलीं कां तस्करा ॥ चोरोनियां ॥३३॥

आतां तीं देवोनि सुरेश्वरा ॥ शरण जाई जालंधरा ॥ नातरी निरोपाचिया उत्तरा ॥ देई मज ॥३४॥

ऐकोनि मनीं चिंती इंद्र ॥ रुद्रांश आहे जालंधर ॥ यासीम झूंजता शारंगधर ॥ पुरों न शके ॥३५॥

ह्यणॊनि सन्मानिला तो दुत ॥ तयासि ह्यणे सुरनाथ ॥ समुद्र मंथिला तो वृत्तांत ॥ ऐकें आतां ॥३६॥

पर्वतांचे छेदिता पांख ॥ काहीं उडाले जे शेष ॥ त्यांही सेविलें उदक ॥ सागराचें ॥३७॥

आणिक एक शंखासुर ॥ वेदचोर महाउग्र ॥ तो राहिला होता तस्कर ॥ सागरामाजी ॥३८॥

त्याचा करावया वधु ॥ धाविन्नला माझा बंधु ॥ पर्वतांचा कराया पक्षछेदु ॥ मंथिला अब्धी ॥३९॥

ऐसें सांगावें जालंधरा ॥ आह्यां बोल नाहीं या विचारा ॥ तंव आला जालंधरपुरा ॥ घस्मरु तो ॥४०॥

मग त्या इंद्राचा विचार ॥ दैत्यासि सांगे घस्मर ॥ तंव कोपला जालंधर ॥ तें ऐकोनी ॥४१॥

वेगी सुतळा धाडिले कागद ॥ मेळविले दैत्य अगाध ॥ दळपती केले युगुळ ॥ शुंभनिशुंभ दोघे ॥४२॥

सैन्य मिळाले लक्षकोटी ॥ पवाडें न मावती सृष्टीं ॥ वाद्यशब्दाचे बोभाटी ॥ दाटले गगन ॥४३॥

मग निशाणी देवोनि घावो ॥ वेगे चालिला दैत्यरावो ॥ थरारिला ब्रह्यकटाहो ॥ घोषें तेणें ॥४४॥

नंदनवनीं केलें पेणें ॥ तें जाणविलें ब्रह्यनंदनें ॥ तेणें इंद्र आला धावणें ॥ देवासहीत ॥४५॥

इंद्रें देखिला दैत्यभार ॥ शुंभनिशुंभादि वीर ॥ मग उठविले सुरव र ॥ दैत्यावरी ॥४६॥

दोनदिळा जाहला आदळ ॥ आपपरां नाहीं सांभाळ ॥ दिवस असता सायंकाळ ॥ वाटला तेथे ॥४७॥

ऐसे मिळता समरंगणी ॥ वींरा जाहली झॊटधरणी ॥ जे जे देव पडती रणी ॥ ते ते उठवी देवगुरु ॥४८॥

आणि जे दैत्य पडती रणीं ॥ ते उठवी एकनयनी ॥ शुक्र जाणे संजीवनी ॥ ह्यणॊनि यां ॥४९॥

ऐसा गेला कित्येक काळ ॥ परि न मावळे दोघांचे दळ ॥ मग जालंधर पुसे सकळ ॥ भार्गवासी ॥५०॥

ह्यणे अगा ये एकनयना ॥ रणी पडे देवसेना ॥ ते उठें कैसेन हे मना ॥ आणीं माझिये ॥५१॥

तंव तयासि सांगे शुक्रु ॥ की यांचा असे देवगुरु ॥ तो उठवीतसे परिवारु ॥ देवाचा पैं ॥५२॥

द्रोणगिरी नामें पर्वत ॥ तेथें तो जावोनिया त्वरित ॥ औषधी आणोनि येथ ॥ उठवी दळ ॥५३॥

ऐसा ऐकोनिया विचार ॥ मग धाविन्नला जालंधर ॥ समुद्रीं टाकिला डोंगर ॥ द्रोणागिरी तो ॥५४॥

जव तेथे गेला गुरु ॥ तव दृष्टी न देखे डोंगरु ॥ मग आला वेगवक्रु ॥ देवाजवळी ॥५५॥

ह्यणे नका सरु झूंजारी ॥ औषधी असुरे बुडविल्या सागरीं ॥ तरी सांडोनि अमरपुरी ॥ निघा वहिले ॥५६॥

आता देव पडती रणी ॥ ते नुठती गा मागितेनी ॥ मग पळाला वज्रपाणी ॥ देवासहित ॥५७॥

सकळदेवेंसीं इंद्र बृहस्पती ॥ गेले हेमगिरी पर्वतीं ॥ इकडे जालंधरें अमरावती ॥ घेतली जाणा ॥५८॥

देवांसि ह्यणे बृह्यस्पती ॥ तुह्यीं स्मरावा श्रीपती ॥ तो करील क्षणें शांती ॥ दैत्यकुळाची ॥५९॥

मग मांडिला पुकारा ॥ जयजयाजी करुणाकरा ॥ तुजवांचोनिया सुरवरा ॥ रक्षिता कोन ॥६०॥

जयजयाजी जगदीश्वरा ॥ जयजयाजी सर्वेश्वरा ॥ भक्तवत्सला शारंगधरा ॥ भ्यालों आह्यी ॥६१॥

तंव वैकुंठी होते श्रीहरी ॥ सुखशयनीं सेजेवरी ॥ विडिया देतसे कुमरी ॥ सागराची ॥६२॥

ऐसा असतां सुखशयणीं ॥ तंव धांवा ऐके चक्रपाणी ॥ मग बोलिला वचनीं ॥ कमळजेसी ॥६३॥

कीं अमरावतीये जालंधर ॥ तेणें झूंजी पळविला इंद्र ॥ तो श्रवणीं ऐकिला गजर ॥ देवगणांचा ॥६४॥

तरी तेथें जवें धांवणे ॥ ह्यणोनि उठिला तेचि क्षणें ॥ तंव विनविलें वचनें ॥ सिंधुतनयेंनें ॥६५॥

ह्यणे ऐकावे प्राणेश्वरा ॥ न मारावें ममसहोदरा ॥ सिंधुगंगेचिया कुमरा ॥ जालधंरासी ॥६६॥

ऐकोनि ह्यणे शारंगधर ॥ त्यासी ब्रह्ययाचा आहे वर ॥ तो रुद्रावाचोनि असुर ॥ अवध्य आह्यां ॥६७॥

देव ह्यणे तो तुझा बंधु ॥ तरी मी त्याचा न करीं वधु ॥ ऐसें बोलोनि गोविंद ॥ जाहला निघता ॥६८॥

मग बोलावोनि सुपर्ण ॥ वरी आरुढला नारायण ॥ हातीं घेवोनि घनुष्यबाण ॥ त्राहाटिला शंख ॥६९॥

जेथें असे जालंधर ॥ तेथें आला वेगचक्र ॥ तंव दृष्टी देखिला भार ॥ दैत्यसैन्याचा ॥७०॥

मग गरुडाचे पाखवातीं ॥ दैतु पळाले नेणों किती ॥ तंव जालंधरे श्रीपती ॥ देखिला येंता ॥७१॥

विष्णु ह्यणेरे जालंधरा ॥ त्वां गांजिले सुरेश्वरा ॥ तरी तुझा मोडिन दरारा ॥ वाटिवेचा ॥७२॥

ह्यणोनि लाविले शतबाण ॥ जैसे भुजंगाचे दशन ॥ ते जालंधरें केलें खंडन ॥ क्षणामाजी ॥७३॥

मग जालंधरे सोडिले बाण ॥ तेणें सकळ व्यापिले गगन ॥ येक येकासी निर्वाण ॥ करुं पाहती ॥७४॥

तंव जालंधराचे ध्वजा छत्र ॥ धनुष्य आणि तरवार ॥ हें छेंदिले पैं सत्वर ॥ नारायणें ॥७५॥

मागुती रथ आणि सारथी ॥ बाणें छेदेत श्रीपती ॥ तेणें दैत्य जाहला विरथी ॥ जालंधर तो ॥७६॥

तंव तया जालंधरे हरी ॥ खडें हाणितला मुरारी ॥ परि देवें छेदिलें तें सत्वरीं ॥ गदाघातें ॥७७॥

सवेंचि मग तो नागारी ॥ दैत्यें हाणीला शिरावरी ॥ तेणें घायें पडिला चांचरी ॥ भुमीगत ॥७८॥

ऐसा पडंता वाहन ॥ भुमीसी आला नारायन ॥ मग माजलें घोर रण ॥ दोघांजणांसी ॥७९॥

येकमेकाम घालिती गिरीवर ॥ ते वरचेवरी करिती चुर ॥ थरारिले सप्त सागर ॥ आणि कुळाचळ अष्टसंख्या ॥८०॥

मग सरलीं शस्त्रात्रें ॥ ह्यणोनि भिडले मुष्टिकरें ॥ जाणों मेरुमांदारशिखरें ॥ लढताती पैं ॥८१॥

दोघे वर्तले मल्लयुद्घा ॥ येकमेकांचा करिती चेंदा ॥ द्घेंषें काढुंपाहती मेंदा ॥ मस्तकींच्या ॥८२॥

येकमेकां करिती ठेला ॥ तेणें विष्णु शीण जाहला ॥ मग आंगेसिं आदळला ॥ मल्लविद्ये ॥८३॥

दाविती कळा विकला वांगडी ॥ अंगें टाकिती परवडी ॥ टेंकी गुड्या मस्तकमांडी ॥ हाणीती येका ॥८४॥

वरी फिरविती हनुवटी ॥ कांस फिरवी मनगटीं ॥ महामदें आदळिती सृष्टी ॥ येकमक ॥८५॥

ते भिडती रणमंडळी ॥ येकाहुनि येक बळी ॥ ऐसी जाहली हातोफळी ॥ वर्षे सहस्त्र ॥८६॥

होंता सहस्त्र संवत्सरां ॥ दैत्यें आदळिलें शारंगधरा ॥ हरि ह्यणे मागरे जालंधरा ॥ प्रसन्न जाहलों ॥८७॥

मग बोले दैत्यनाथ ॥ आमुचा होई तुं जामात ॥ तरीच राहेन गा निवांत ॥ शारंगधरा ॥८८॥

तंव तो विष्णु लक्ष्मीसहित ॥ जालंधरपुरासि जात ॥ ऐसा सर्वा जाहला अजित ॥ दैत्येद्र तो ॥८९॥

तो शुंभनिशुंभा बोले उत्तर ॥ कीं शेष फेडावा सत्वर ॥ पृथ्वी राखावी समग्र ॥ आपुलेनि बळें ॥९०॥

असो ऐसे फेडिले समद्र ॥ आपुले स्थापिले असुर ॥ आणि अमरावतीचें नगर ॥ भोगी आपण ॥९१॥

मग त्रिभुवना भीतरीं ॥ काळनेमीची कन्या उपवरी ॥ ते मेळविली नोवरी ॥ जालंधरासी ॥९२॥

तयेंचे नाम असे वृदां ॥ जे महसती बोलिजे सर्वदा ॥ ते पर्णिलीसे मुग्धा ॥ जालंधरें ॥९३॥

तयेंनें प्रसन्न करोनि दुर्वासा ॥ ह्यणे मज वर द्यावा जी ऐसा ॥ कीं माझा गळसरु नाशा ॥ न जावा कधीं ॥९४॥

तंव ऋषी ह्यणे तथास्तु ॥ आपणा आपण न करीं घातु ॥ परपुरुषीं जालिया एकांतु ॥ नासेल पती ॥९५॥

हें त्वां चुकवावें कुसरी ॥ तरीच अखंड गळसरी ॥ ऐसा दिव्य वर पावली ॥ दुर्वासाचा ॥९६॥

ऐसी जालंधराची कांता ॥ स्त्रिंयामाजी पतिव्रता ॥ दु;खव्याधी नेणिजे सर्वथा ॥ प्रजाजनीं त्याचे ॥९७॥

असो तेणें राज्य करितां ॥ तंव नारदु आला अवचिता ॥ जैसा काळ पावे अंता ॥ आमिषरुपे ॥९८॥

जालंधर ह्यणे हो नारदमुनी ॥ तुह्यी हिंडता त्रिभुवनीं ॥ काहीं अपुर्व देखिलें नयनीं ॥ तें सांगा मज ॥९९॥

मग आरंभिली वचनी कथा ॥ थोर वानिलें दैत्यनाथा ॥ ह्यणती तुझे घरीं गा न्युनता ॥ न देखो काहीं ॥१००॥

तुं वाढिवेचा मरिगळा ॥ वस्तुमात्रांचा येकवळा ॥ परि तुझे घरीं गा अबळा ॥ नाहीं योग्य ॥१॥

तुजसी योग्य ऐसी राणी ॥ न देखॆ मी या त्रिभुवनीं ॥ परिं येक असे शिवभुवनीं ॥ पार्वती नामें ॥२॥

जीतें देखोनिया विधाता ॥ वीर्य द्रवला अवचिता ॥ काम जाळिला परि जगन्नाथा ॥ तिचाचि वेध ॥३॥

ते रुपाची पुर्ण राशी ॥ परि रुद्र असे महातापसी ॥ निधाना जवळी विवशी ॥ मिरवे जेवीं ॥४॥

ऐसी अपर्णा सर्वमंगळा ॥ तेथे रुद्र येकला भोळा ॥ ते तुज आणितां खळखळा ॥ न करी कवण ॥५॥

ते येता तुझिये घरीं ॥ तरी तुचिं धन्य संसारीं ॥ तया सुखाची परमथोरी ॥ न बोलावे मज ॥६॥

तें मानवलें दैत्यनाथा ॥ मनीं लागली तिची अवस्था ॥ मग नारदु जाहला निघता ॥ तेथोनिया ॥७॥

मीन पाडावया गळीं ॥ जैसें आमिष टाकिजे जळीं ॥ तैसें करोनिया तात्काळी ॥ गेला नारद ॥८॥

कामें व्यापिला जालंधर ॥ बोलाविला राहु असुर ॥ जो सिंहिकेचा कुमर ॥ मुंडहीन ॥९॥

जालंधर ह्यणेरे दुता ॥ तुं कैलासा जाई आतां ॥ तेथें शैलजा माग कांता ॥ शिवाजवळी ॥११०॥

जें दुर्बळा घरीं निधान ॥ तें तया प्रत्यक्ष मरण ॥ जैसेम सर्पमस्तकींचें रत्न ॥ करी नाश ॥११॥

ह्यणावें कुरंगा मारवी कस्त्री ॥ केळी नाश पावे कर्पुरी ॥ तैसी तुझे घरीं गौरी ॥ तुज नाशक ॥१२॥

नातरी कमळीं दर्दुर ॥ की चंदनासीं फणिवर ॥ तैसा तुं तापसी भ्रतार ॥ शैलतयनयेसी ॥१३॥

तरी आतां ही सिंधुकुमरा ॥ पार्वती द्यावी सत्वरा ॥ जरी तुज भोगणे दिगंबरा ॥ हें शरीर ॥१४॥

ऐसें ऐकोनिया वचनीं ॥ राहु निघाला तये क्षणीं ॥ तो पावला शिवभुवनी ॥ क्षणामाजी ॥१५॥

द्घारीं भेटला नंदिकेश्वरा ॥ तेणें जाणविले शंकरा ॥ आणि ह्यणे तुं कोणरे विनशिरा ॥ तंव तो ह्यने मी राहु ॥१६॥

मी जालंधराचा दुर ॥ मग सर्व कथिला वृत्तांत ॥ तंव कोपला भुतनाथ ॥ ऐकोनियां ॥१७॥

मग बोलिले नीळकंठें ॥ जैं सर्पाचें आयुष्य खुंटे ॥ तै गर्वे चाले नेहटें ॥ मार्गामाजी ॥१८॥

कीं दीपकळिका सुरंग ॥ देखॊनि उडी घाली पतंग ॥ कां मगरमुखी मातंग ॥ सांपडे जैसा ॥१९॥

जैं मरणाचे होती डोहळे ॥ तैं कर्दळी पावे फळें ॥ कीं मुंगी जाय अंतराळे ॥ पाखं फुटता ॥१२०॥

तापसासी बांधी कळी ॥ विप्र दुखवी ह्रुदयकमळीं ॥ सती दुखवी येकवेळीं ॥ खुंटलेपणें ॥२१॥

तैसें जाजले सिंधुसुता ॥ तुज काय मारुंरे दुता ॥ परि कोप आला जगनाथा ॥ तये वेळीं ॥२२॥

तेणें गरगरां भोवें दृष्टीं ॥ भिंवया घाली व्यंकटी ॥ तंव पुरुष जन्मला ललाटीं ॥ महाविशाळ ॥२३॥

आंगें असे शुभ्रवर्ण ॥ बाबरझॊटी विशाळ नयन ॥ त्या भेणें पळाला नंदन ॥ सिंहिकेचा ॥२४॥

तो पुरुष लागला पाठी ॥ तेणें राहु धरिला मुष्ठीं ॥ मुखीं घालावा तंव धुर्जटी ॥ बोभाइला ॥२५॥

ह्यणे याचा न करी नि:पात ॥ हा तरी हाणियारा दुत ॥ अपराधी तो सिंधुसुत ॥ वेगळा असे ॥२६॥

परि कोप चढला तयासी ॥ तेणें राहु टाकिला बर्बरदेशी ॥ तंव शंभु ह्यणे भला होसी ॥ भृकुटिभवा ॥२७॥

मग पुरुष बोले आपण ॥ मज शीघ्र पाहिजे भोजन ॥ भुकेम पीडलों देई अन्न ॥ शंभुदेवा ॥२८॥

भर्ग बोले तया पुरुषा ॥ आपणा आपण करीं ग्रासा ॥ हस्तपादादि रुंड मांसा ॥ खाई आपुले ॥२९॥

मग तो भाळॊदव पुरुष ॥ आपुलाचि आपण करी ग्रास ॥ तें देखोनियां महेश ॥ संतोषला मनीं ॥१३०॥

ह्यणे तुझें नावरें कीर्तिमुख ॥ तिं माझे भाळींचा पुरुष ॥ ऐसा बोलिला त्र्यंबक ॥ वर तयासी ॥३१॥

तुजवाचोनि देवस्थान ॥तें निर्फळ जेवीं स्मशान ॥ मजआधीं भजन पुजन ॥ पावसी तुं ॥३२॥

ऐसें तें कीर्तिमुखशिर ॥ देवस्थानीं केले थोर ॥ तव राहु गेला सत्वर ॥ जालंधरपुरासी ॥३३॥

राहु ह्यणे दैत्यनाथा ॥ मज थोर जाहली व्यथा ॥ र्द्र कोपला त्यासि आता ॥ काय सांगों ॥३४॥

कीं रविरश्मीची किळा ॥ पिळुनि काढिजे मुक्ताफळा ॥ नातरी दुर्लभ जेवीं अबळा ॥ नेत्रींची जैसी ॥३५॥

अथवा आपु ले छाय्चें शिर ॥ धरु धावती जैसे कर ॥ कीं गगन कापावया शस्त्र ॥ न करवे कवणा ॥३६॥

तैसी राया ते शैलबाळी ॥ विपायें होय वेगळी ॥ ऐसी ऐकोनिया बोली ॥ कोपला जालंधर ॥३७॥

मग बोले सिंधुकुमर ॥ आतां धरीन महारुद्र ॥ ह्यणोनि बोलाविला शुक्र ॥ विचारासी ॥३८॥

मेळवोनि ह्यणे दैत्यसेना ॥ जाणें लागे शिवभुवना ॥ हिरोनि आणाया अंगन ॥ ईश्वराची ॥३९॥

रणवाद्यांचा जाहला गजर ॥ सकळ घेवोनि दैत्यभार ॥ वेगें चालिला जालंधर ॥ शिवावरी ॥१४०॥

मुनी ह्यणे गा भारता ॥ आंता यापुढें संग्रामकथा ॥ ते ऐकावी सकळ श्रोता ॥ ह्यणे कृष्णयाज्ञवल्की ॥४१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ जालंधरआख्यानप्रकारु ॥ चतुर्थाsध्यायीं सांगितला ॥१४२॥

॥ श्रीकृष्णापर्णमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP