कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे राव भारत ॥ कैसा योजिला द्रव्यार्थ ॥ तो लाक्षागृहींचा वृत्तांत ॥ सांगिजे मज ॥१॥

मग मुनी ह्नणे गा ऐक ॥ राळ सनकाडिया लाख ॥ घृततेलाचे परिपाक ॥ गोमयमिश्रित ॥२॥

ऐसें गृह रचिलें कुटिळ ॥ वरती मृत्तिका अळुमाळ ॥ ऐसें तें करितां राऊळ ॥ क्रमिला संवत्सर येक ॥३॥

त्याचिये गांवात निर्धारी ॥ पांडव होते बिढारीं ॥ तंव विदुरें धाडिला खणकरी ॥ नेणतां कवणा ॥४॥

दृष्टी चोरोनियां समग्रां ॥ गंगेतीरीं कोरिलें विवरा ॥ मंदिरीं पाडोनियां द्वारा ॥ ठेविली शिळा वरी ॥५॥

आणि ते विवरींची मृत्तिका ॥ मेळविलीसे गंगोदका ॥ मग बीळ सांगितलें पुण्यश्लोका ॥ धर्मासि खनकें ॥६॥

मंदीर पूर्ण होतां तेथ ॥ पाहोनि उत्तम मुहूर्त ॥ घरी स्थापिले पंडुसुत ॥ पुरोचनें पैं ॥७॥

शांतिक केलें भोजन ॥ आरोगिले ब्राह्मणजन ॥ तंव भिल्ली मागों आली अन्न ॥ सायंकाळी ॥८॥

तयेसवें होते पंच नंदन ॥ जाणोनि धर्मे घातले भोजन ॥ तंव रात्री जाणोनि तीं शयन ॥ करिती तेथें ॥९॥

परि पुरोचन मनीं विचारी ॥ कीं आजि गेलिया अर्धरात्री ॥ अग्नी लावोनियां मंदिरीं ॥ जाळूं समस्तें ॥१०॥

ऐसें चिंतोनि पुरोचन ॥ शस्त्रशाळे राहिला लपोन ॥ तंव निद्रा येवोनि अचेतन ॥ विसरला तो ॥११॥

इकडे तेणें भीमसेनें ॥ घरगंधी घेतली घ्राणें ॥ मग तो पवनपुत्र ह्नणें ॥ धर्माप्रती ॥१२॥

गंधीं न करवे जी भोजन ॥ ऐसें अपूर्व काय हें भुवन ॥ तंव धर्म ह्नणे हें मरण ॥ रचिलें असे ॥१३॥

मागें विदुराची उत्तरें ॥ तींच आतां कथिली खणकरें ॥ कीं व्यसन पडतां गंगाविवरें ॥ जावें तुह्मीं ॥१४॥

तरी मागिले शिळेचे बिळ ॥ तेंच तुह्मां जावया स्थळ ॥ हें न सांगावें केवळ ॥ बीज कवणांसी ॥१५॥

ऐसें भीमसेनाप्रती ॥ धर्मे कथिलें येकांतीं ॥ ह्नणे गंध येतसे भिंती ॥ येणेंचि विचारें ॥१६॥

मग होतां अर्ध रजंनी ॥ पांडव पहुडले शयनीं ॥ परी भीम येवोनि आंगणीं ॥ करी विचार ॥१७॥

कीं ऐसियासी करुं प्रयत्न ॥ पाणी न येतां बांधू वळण ॥ कीं देही न लागतां खङ्ग बाण ॥ लेहूं कवच ॥१८॥

हा कौरवांचा प्रधान ॥ घेऊं इच्छितो आमुचा प्राण ॥ हेंचि वाटतसे अनुमान ॥ पुरोचनाचें ॥१९॥

जैसा गीघ झडपी आमिषा ॥ तंव तो स्वयेंचि सांपडे पाशा ॥ तैसें करुं या कौरवदासा ॥ पुरोचनासी ॥२०॥

ह्नणोनि हाती घेतला वन्ही ॥ घर लाविलें चहूकोनी ॥ कपाट बांधिलें वोढोनी ॥ पुरोचनाचें ॥२१॥

मग भीम ह्नणे धर्माप्रती ॥ जागे करा जी बंधु कुंती ॥ अग्नी लागला शीघ्रगती ॥ निघा वहिले ॥२२॥

भीमें स्कंधीं वाहोनि कुंती ॥ शिळा लोटली चरणघातीं ॥ विवरीं बंधूसह शीघ्रगतीं ॥ प्रवेशला तो ॥२३॥

ऐसा भीम जातसे विवरीं ॥ तंव इकडे हाक फुटली नगरीं ॥ कीं अग्नि लागला मंदिरीं ॥ धर्माचिये ॥२४॥

लोक धांवोनि आले समग्र ॥ तंव जळोनि पडिलें मंदिर ॥ लाखेचे दाटले पूर ॥ खदखदीत ॥२५॥

सकळी तें विझविलें मंदिर ॥ आहा कटकटा करिती समग्र ॥ कीं पंडुरायाचे कुमर ॥ नासले अग्निमुखीं ॥२६॥

परी त्यां न कळे ब्रह्मलिखीत ॥ कीं पांडव वांचले समस्त ॥ असो भिल्लटी पांचपुत्रांसहित ॥ आणि पुरोचनही ॥२७॥

ऐसी राख पाहती ग्रामस्थ ॥ तंव जळालीं देखती सात ॥ मग लोकीं धाडिलें लिखित ॥ हस्तनापुरा ॥२८॥

कीं पांडव आणि कुंती ॥ पुरोचन यवन मूर्ती ॥ हीं अग्निमाजी मध्यरातीं ॥ जळालीं मंदिरीं ॥२९॥

मग समस्तांचिया अस्थी ॥ जनीं निवडिल्या जी निगुती ॥ त्या धाडिल्या कौरवांप्रती ॥ हस्तनापुरा ॥३०॥

तीं जाणोनियां अग्निदग्धें ॥ रुदन केले पैं अंधें ॥ परी कौरव नाचती आनंदें ॥ मनामाजी ॥३१॥

मग पांडवाचें क्रियापर ॥ अंधें करविलें समग्र ॥ परि दुखावले परिवार ॥ तें असो आतां ॥३२॥

इकडे भरली मध्यराती ॥ पुत्रांसहित माता कुंती ॥ भीम निघाला दक्षिणपंथीं ॥ घेवोनियां ॥३३॥

त्यांहीं टाकितां महावन ॥ कुंती शिणली बोले वचन ॥ भीमा पाजीं रे जीवन ॥ आह्मांलागीं ॥३४॥

भीमें दूरी पाहोनि जीवन ॥ परि पात्रेंवीण चिंतावलें मन ॥ ह्नणोनियां भिजविलें वसन ॥ अंगावरील ॥ ॥३५॥

ऐसें हिंडोनि महावन ॥ भीमें आणिले जीवन ॥ परि सकळीं केलें असे शयन ॥ भूमीवरी ॥३६॥

भीम करितसे खंती ॥ जिये सुमनें अंगा खुपती ॥ ते भूमीसि लोळे कुंतीसती ॥ पुत्रांसहित ॥३७॥

परी निद्रे होईल भंजन ॥ ह्नणोनि घ्या न ह्नणे जीवन ॥ मग जागत राहिला आपण ॥ वृकोदर तो ॥३८॥

तंव हेडंब नामें राक्षस ॥ ह्नणे मनुष्याचा येतसे वास ॥ मग हा करावया प्रकाश ॥ तेणें धाडिली सहोदरीं ॥३९॥

तंव ते आली हेडंवा ॥ तयेनें पाहिलें पंडुडिंभा ॥ जाणो मदनमूर्तीचा गाभा ॥ कांचनमय ॥४०॥

त्याची देखोनि स्वरुपता ॥ कामें भुलली राक्षसवनिता ॥ ह्नणे हा भ्रतार होईल सर्वथा ॥ तरीच माझें जीवित ॥४१॥

भीमासि ह्नणे निशांचरी ॥ प्रियकरा तूं मज अंगिकारीं ॥ नाह्नणसी तरी तुजवरी ॥ देईन प्राण ॥४२॥

भीम ह्नणे न घडे ऐसें ॥ तूं राक्षसी आह्मीं मनुष्यें ॥ आणि या वडिलांचे आयासें ॥ वागणें मज ॥४३॥

ऐसा करितां विचारु ॥ तेणें लागला पैं उशीरु ॥ ह्नणोनि आला शुद्धी करुं ॥ हेडंब तो ॥४४॥

तेणें पुढां देखिला वृकोदर ॥ क्षुधेनें आथिला महाथोर ॥ ह्नणोनि धांवे निशाचर ॥ भोजनासी ॥४५॥

परी भीमें वारितां वीर ॥ आगीं आदळला निशाचार ॥ मग सरसावला वृकोदर ॥ निर्घातासी ॥४६॥

कीं कुंतीची भंगेल निद्रा ॥ ह्नणोनि ठेविलें निशाचरा ॥ मग आदळ जाहला दोहीं वीरां ॥ वनामाजी ॥४७॥

आतां असो हा खळबळ ॥ भूमी धुतां नव्हे निर्मळ ॥ तरी शुक्ती सांडोनि मुक्ताफळ ॥ घेऊं ग्रंथीं ॥ ॥४८॥

मग तेणें कुंतिकुमरें ॥ हेडंब आपटिला धरे ॥ आत्मा धाडोनि मुखरंध्रें ॥ वमिला रुधिर ॥४९॥

ऐसा तो मारिला मुष्टिघातीं ॥ इकडे जागिन्नलीं धर्म कुंती ॥ तंव तो आणिला तयांप्रती ॥ भीमसेनें ॥५०॥

मग त्याची समस्त कथा ॥ भीमें कथिली धर्मपार्था ॥ आणि उदक पाजिलें भारता ॥ कुंतियेसी ॥५१॥

तंव ते हेडंबा कामिनी ॥ लागे धर्म कुंतीच्या चरणीं ॥ कीं भीमसेन माझे अंतःकरणीं ॥ व्हावा वरु ॥५२॥

ऐशा ऐकोनि उत्तरा ॥ कुंती ह्नणे बा वृकोदरा ॥ हे त्वां पर्णावी सुंदरा ॥ माझेनि वचनें ॥५४॥

मग तिये वनांतरीं ॥ गांधर्व लग्नाचिये परी ॥ भीमें वरिली निशाचरी ॥ हेडंबी ते ॥५५॥

ते नित्य भीमासि निशाचरी ॥ दिवसा नेतसे आपुले मंदिरीं ॥ सेजे रमूनियां सत्वरीं ॥ आणि रात्रसि तेथें ॥५६॥

ऐसी ते महा निशाचरी ॥ भीमसेनाची अंतुरी ॥ तंव पुत्र जाहला तिचे उदरीं ॥ घटोत्कच नामें ॥५७॥

मग ते कुंतीप्रती ॥ कीं मज झाली पुत्रसंतती ॥ आतां तुह्मीं जावें पुढती ॥ मी राहेन येथें ॥५८॥

जैं तुह्मां मांडेल अवसर ॥ तैं पाचारावा हा कुमर ॥ तुमचे कायीं अव्हेर ॥ न करुं जाणा ॥५९॥

ऐकोनि निघाला युधिष्ठिर ॥ तंव तेथें आला राव इंद्र ॥ तो सांगता झाला विचार ॥ घटोत्कचाचा ॥६०॥

कीं हा जिंकोल वीर कर्णा ॥ आणि राखील अर्जुना ॥ हें सांगोनि अमरभुवना ॥ गेला इंद्र ॥६१॥

पुढें चालिला युधिष्ठिर ॥ तंव व्यास आले वेगवक्र ॥ त्याहीं सांगितला विचार ॥ पांडवांसी ॥६२॥

व्यास ह्नणे युधिष्ठिरा ॥ तुह्मीं जावें येकचक्रनगरा ॥ आणि येक मास गा नरेंद्रा ॥ रहावें तेथें ॥६३॥

हें सांगोनि जातां व्यासदेवो ॥ धर्मे जाणिला अभिप्रावो ॥ मग पावले देशवैभवो ॥ एकचक्रनगराचें ॥६४॥

तेथें बक नामें निशाचर ॥ तो करी मनुष्यांचा संहार ॥ ह्नणोनि नेम केला निर्धार ॥ नागरिकांहीं ॥६५॥

कीं नित्य नित्य दोन महिष ॥ गाडा अन्न एक मनुष्य ॥ ऐसें त्यास द्यावें आमिष ॥ क्षुधाशमना ॥६६॥

तंव कोणेएके वेळी ॥ येका ब्राह्मणाची आली पाळी ॥ सांगोनि गेला सायंकाळी ॥ काठीकर ॥६७॥

असो त्याचेचि मंदिरीं ॥ पांडव राहिले होते रात्रीं ॥ रुदन करितां त्याची स्त्री ॥ तें ऐकिलें कुंतीये ॥६८॥

त्यासी येक कन्या येक कुमर ॥ स्त्रीसहित करी विचार ॥ कोण राखूं कोण देऊं आहार ॥ राक्षसासी ॥६९॥

स्त्री ह्नणे मज कन्या प्रीतिवंत ॥ द्विज ह्नणे पुत्रेंविण नरकपात ॥ तंव तें ऐकिलें गा समस्त ॥ कुंतिमातेनें ॥७०॥

मग त्या राक्षसाची कथा ॥ ब्राह्मणें कथिली गा भारता ॥ तंव कुंती ह्नणे मी आपुले सुता ॥ देतें सत्य ॥७१॥

जैसी सुखासनीं गा नरेंद्रा ॥ गतिगमनीं न भंगे निद्रा ॥ तैसें जाहलें मातापितरा ॥ कुंतिवचनें ॥७२॥

तेणें आनंदें विप्र हर्षित ॥ तंव भिक्षा करोनि आले पंडुसुत ॥ मग भीमास कथिलें समस्त ॥ वृत्त राक्षसचें ॥७३॥

तंव उगवला दिनकर ॥ पाळी मागों आला काठी कर ॥ मग कुंतीनें दीधला वृकोदर ॥ त्याचेनि हातीं ॥७४॥

मग ते घेवोनि आयती ॥ भीमसेन बैसल रथीं ॥ परी अन्न देखोनियां चित्तीं ॥ आनंदला तो ॥७५॥

वाटेसि पाहूनि जीवन ॥ घृतेंसह भक्षिलें अन्न ॥ मग बाहु केले स्फुरण ॥ युद्धालागीं ॥७६॥

झाला जाणोनियां उशीर ॥ क्रोधें कांपतसे निशाचर ॥ तंव रथासहित वृकोदर ॥ देखिला तेणें ॥७७॥

मग मुख पसरोनि भयंकर ॥ ग्रासूं धांवला सत्वर ॥ तंव उतरला वृकोदर ॥ रथाखालीं ॥७८॥

तो तयाअंगीं आदळतां ॥ भीमें उचलिली वामलाथा ॥ मुष्टिघातें गा यमपंथा ॥ धाडिला तो ॥७९॥

मग त्याची बांधोनि मोट ॥ भीमें टाकिला नगरानिकट ॥ ऐसें करोनियां अदृष्ट ॥ आला भीमसेन ॥८०॥

तें देखिलें ग्रामजनीं ॥ ह्नणती जाहली देवकरणी ॥ परि पांडव निघाले तेथोनी ॥ नेणतां कोणा ॥८१॥

तंव आले व्यासमुनी ॥ पांडवांसी सांगती वचनीं ॥ कीं तुह्मीं जावें साहिजणीं ॥ पांचाळदेशा ॥८२॥

तेथें सुभिक्ष सुकाळ ॥ भिक्षेचा नाहीं दुष्काळ ॥ ऐसा करोनियां चावल ॥ गेला व्यासदेवो ॥८३॥

तेथोनि धर्म जाहला निघता ॥ वेगें पावला सोमतीर्था ॥ तें अंगारपर्णपवन भारता ॥ गंगेतीरीं ॥८४॥

तेथें गंधर्व अंगारपर्ण ॥ कुंभिनी स्त्रीतें श्रृंगारोन ॥ क्रीडा करीत पंचानन ॥ जेवीं वनामाजी ॥८५॥

तेथें पंडुरायाचे सुत ॥ राहिले जाणोनि सूर्यास्त ॥ तैं अर्जुनें पेटविलें कोलित ॥ उजेडासी ॥ ॥८६॥

तंव तो अंगारपर्ण बोलिला ॥ ह्नणे हे आमुची सांजवेळा ॥ वनीं हा कोण रे प्रवेशला ॥ महाधीट ॥८७॥

ह्नणोनि टणत्कारिलें सीत ॥ बाण सोडिले अपरिमित ॥ तंव अर्जुनें तें सोडोनि कोलित ॥ जाळिले बाण ॥८८॥

त्याचा रथ आणि सारथी ॥ कोलितें जाळिले मंत्रशक्तीं ॥ तंव पळाला गंधर्वपती ॥ माघारपणें ॥८९॥

मागुता आला युद्धासी ॥ मग संग्रामं जाहलें दोघांसी ॥ परि अर्जुनें जिंकूनि धरिला केशीं ॥ गंधर्व तो ॥९०॥

जैसें कमळ धरावें हातीं ॥ तैसा आणिला धर्माप्रती ॥ तंव आला काकुळती ॥ गंधर्वरावो ॥९१॥

धर्म ह्नणे सखया पार्था ॥ धरिल्या न मारीं सर्वथा ॥ मग अर्जुनें सोडिला त्वरितां ॥ धर्माज्ञेस्तव ॥९२॥

गंधर्व ह्नणे ऐकें वचना ॥ तूं पवित्र मानलासी मना ॥ तरी विद्या देतों पंडुनंदना ॥ अलोलिक जे ॥९३॥

ते चाक्षुषी विद्या देईन पार्था ॥ परी मी अग्निशस्त्राचा मागता ॥ मग तें मानवलें चित्ता ॥ दोघांचिया ॥९४॥

चाक्षुषी विद्या दीधली अर्जुना ॥ अग्न्यस्त्र दीधलें अंगारपर्णा ॥ मग त्या क्रमोनियां वना ॥ गेले पांडव ॥९५॥

तेथोनि गेले उक्ततीर्था ॥ तंव धौम्य भेटला अवाचिता ॥ तो गुरु केला गा भारता ॥ धर्मरायें ॥९६॥

मग मागील आपुलें चरित्र ॥ विप्रा जाणवी युधिष्ठिर ॥ तंव धर्मासि अभिषेक ऋषीश्वर ॥ करी कल्याणप्रद ॥९७॥

ऐसी क्रमोनियां रजनी ॥ तेथोनि गेले धौम्यमुनी ॥ मग प्रातःकाळीं विप्रश्रेणी ॥ भेटली तयां ॥९८॥

ते पांडवांसि ह्नणती विप्र ॥ तुह्मीं पांचाळदेशा जावें समग्र तेथें मिळेल अन्नवस्त्र ॥ उदंड तुह्मां ॥९९॥

तें द्रुपदरायाचें राष्ट्र ॥ त्याची कन्या महासुंदर ॥ तयेचें मांडिलें सैवर ॥ महोत्साहें ॥१००॥

ऐसें ऐकोनि उत्तर ॥ पांडव निघाले वेगवक्र ॥ मग वेगें पावले नगर ॥ द्रुपदरायाचे ॥१॥

तंव ह्नणे पारिक्षिती ॥ द्रौपदीची कैसी उत्पत्ती ॥ आणि तयेची पांडवां प्राप्ती ॥ जाहली कैसी ॥२॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ जन्मेजया तूं विचक्षण ॥ तरी द्रौपदीचा मूळ प्रश्न ॥ ऐक आतां ॥३॥

पांचाळदेशाभीतरीं ॥ कुसुमावती नामें नगरी ॥ तेथें राजा राज्य करी ॥ द्रुपद तो ॥४॥

तया नाहीं कन्यापुत्र ॥ ह्नणोनि वसिष्ठा पुसे नरेंद्र ॥ कीं कांहीं सांगा जी विचार ॥ संततीचा ॥५॥

मग वसिष्ठ करी अनुवादु ॥ याज उपयाज दोनी बंधू ॥ ते अपुत्रपणाचा संबंधू ॥ खंडितील राया ॥६॥

तरी गंगेचें पवित्र तीर ॥ जेथें कल्माक्षीरायाचें नगर ॥ तेथें असती सहोदर ॥ दोन्ही ऋषी ॥७॥

मग तेथें जावोनि पांचाळें ॥ दोनी विप्र पूजिले निढळें ॥ आणि जोडोनि करकमळें ॥ विनवी त्यांतें ॥८॥

ह्नणे मज द्यावी पुत्रप्रजा ॥ जो जिणोंशके द्रोणद्विजा ॥ आणि येक कन्या धर्मकाजा ॥ द्यावी मज ॥९॥

मग ते याजु उपयाजू ॥ त्यांहीं मांडिला यज्ञराजू ॥ नानाप्रयत्नीं शमिआत्मजू ॥ केला प्रसन्न ॥११०॥

ऐसा पूजितां कृशान ॥ पूर्णाहुती निघाला धृष्टद्युम्र ॥ खेटक मुकुट धनुष्यबाण ॥ गदेसहित ॥११॥

आंगें असे लोहितवर्ण ॥ रुपें उपमिजे दुजा मदन ॥ तो विप्रीं दीधला नंदन ॥ द्रुपदरायासी ॥१२॥

मग दूसरी घातली आहुती ॥ तंव निघाली द्रौपदीसती ॥ कृष्णवर्ण अंगकांती ॥ रुपें सुंदर मनोहर ॥१३॥

तिचें नाम ठेविलें कृष्णा ॥ मग विसजिंलें पुत्रेष्टियज्ञा ॥ आणि रथीं वाहोनि दोघांजणां ॥ गेला द्रुपद ॥१४॥

तंव अंबा काशीश्वराची नंदिनी ॥ जे होती अभिमान धरोनी ॥ तिनें येवोनि द्रुपदाचे यज्ञीं ॥ घातली उडी ॥१५॥

मनीं कल्पोनि घातली उडी ॥ कीं रणीं भीष्मातें विभांडीं ॥ तो दुजा जाहला शिखंडी ॥ पुत्र द्रुपदासी ॥१६॥

असो ऐसी जन्मली अध्वरीं ॥ राया ते द्रुपदाची कुमरी ॥ परी ते स्वर्गलक्ष्मी अवधारीं ॥ शापदग्ध ॥१७॥

तंव जन्मेजय ह्नणे हो मुनी ॥ स्वर्गलक्ष्मी कां उपजली यज्ञीं ॥ कोणें शापिली कवणेगुणीं ॥ तें सांगा मज ॥१८॥

मुनी ह्नणे गा भारता ॥ व्यासें कथिली होती कथा ॥ ते सविस्तर ऐक पां आतां ॥ मनोभावें ॥१९॥

स्वर्गलक्ष्मी कोणे काळीं ॥ आली होती भूमंडळीं ॥ तंव धेनू वेढिली पांचां पोळी ॥ ऋतुलागीं पैं ॥१२०॥

ह्नणोनि हांसली ते सुंदरा ॥ कीं येक स्त्री कैसी पांचां वरां ॥ जळोजळो या व्यभिचारा ॥ जिणें ऐसीचें ॥२१॥

तंव धेनु बोलिली शापवचन ॥ कीं तूं हांसलीस मजलागुन ॥ तरी तुज भोगितील पांचजण ॥ महापुरुष ॥२२॥

तें ऐकोनि शापवचन ॥ तेणें दुखावलें मन ॥ नेत्रींचें लोटलें जीवन ॥ रुदन करितां ॥२३॥

तियेचे नेत्रकमळींचें जळ ॥ तें गंगेमाजी पडे निर्मळ ॥ मग ते गोठोनि ठाके कमळ ॥ कांचनाचें ॥२४॥

ऐसीं कमळें सातकोटी ॥ वाहत चालिलीं गंगातटीं ॥ तीं पडलीं इंद्राचे दृष्टी ॥ तें ऐक आतां ॥२५॥

कोणे येके अवसरीं ॥ नैमिषारण्याभीतरीं ॥ याग मांडिला गंगातीरीं ॥ यमरायें ॥२६॥

समस्त आले ऋषीश्वर ॥ यक्ष गंधर्व देव किन्नर ॥ ब्रह्मा इंद्र आणि शंकर ॥ आले समस्त ॥२७॥

तंव देखिलें गंगाजळ ॥ महाअनुपम्य निर्मळ ॥ माजी देखिलें कनककमळ ॥ वाहत येतां ॥२८॥

मग तें इंद्रें घेतलें करीं ॥ पाहे तंव दुजें आलें दूरी ॥ ह्नणोनि चालिला सत्वरीं ॥ पहावया तें ॥२९॥

तों देखे कमळें सहस्त्र ॥ जाणों उदेले सहस्त्रंकर । अंतीं देखिली समोर ॥ स्वर्गलक्ष्मी ॥१३०॥

तियेचे नेत्रींचें जें जळ ॥ तेंचि होतसे कनकमळ ॥ परि इंद्रें देखतां ते वेल्हाळ ॥ उपजला काम ॥३१॥

मग इंद्र ह्नणे हो कमळे ॥ तूं येथें येकली कां अबळे ॥ मज व्यापिलें विरहानळें ॥ तुझीयेनी ॥३२॥

तुवां अनुसर द्यावा मज ॥ तूं तरी वियोगिणी सहज ॥ आतां माझें पुरवीं भोज ॥ अनंगाचें ॥३३॥

तंव ते बोलिली कामिनी ॥ येक पुरुष आहे महामुनी ॥ त्याच्या आलिया हें मनीं ॥ भोगीन तुह्मां ॥३४॥

मग निघालीं दोघेजणें ॥ वेगें लंधिती गिरीवनें ॥ तंव एक देखिला नयनें ॥ महापुरुष ॥३५॥

तो साक्षात् सर्वश्रेष्ठु ॥ जो ब्रह्मरंध्राचा आडपटु ॥ तो बैसलासे वरिष्ठु ॥ दिगंबर पैं ॥३६॥

तया पुढें ठाकला इंद्र ॥ परी उभा न राहे दिगंबर ॥ तेणें कोपला सुरेश्वर ॥ तयावरी ॥३७॥

तंव तो बोलिला ईश्वरु ॥ इंद्रा झालासि कामातुरु ॥ तरी या विबरामाजी स्थिरु ॥ होई आतां ॥३८॥

विवरीं जातां शचीवर ॥ पाहे तंव तेथें चार इंद्र ॥ आपणासारिखे समग्र ॥ आयुध अळंकारीं ॥३९॥

संभ्रमें इंद्र पुसे तयातें ॥ तुह्मां दंडिलें कां जी येथे ॥ बंधन जाहलें कोणनिमित्तें ॥ तें सांगा मज ॥ ॥१४०॥

ते ह्नणती आह्मीं छेदिले पर्वत ॥ तेणें झालों महामत्त ॥ मग पुण्य सरोनि होतां पतित ॥ घातलें विवरीं ॥४१॥

असो तेणें आदिनाथें ॥ इंद्रही कोंडिला तेथें ॥ बंधन करुनि कामव्यथे ॥ राखिला विवरीं ॥४२॥

तंव जन्मेजयो प्रश्न करी ॥ कीं चार इंद्र होते विवरीं ॥ ते कोण कोण गा पूर्वापारीं ॥ सांगा मज ॥४३॥

मुनी ह्नणे राया अवधारी ॥ विश्वभुक आणि शिभ्री ॥ रुतुधामा महाक्षेत्री ॥ चौथा शांतिराखो ॥४४॥

असो इंद्र आला काकुळती ॥ ह्नणे मज सोडावें वेदमूर्ती ॥ तंव बोलिला पांचांप्रती ॥ दिगंबरु तो ॥४५॥

ऋषिदेव बोले मंजुळीं ॥ कीं देवकार्य असे भूमंडळीं ॥ तरी अवतरावें त्या स्थळीं ॥ तुह्मीं पांचांजणांही ॥४६॥

मग ऊर्ध्व करोनि करयुगुळ ॥ दोन्ही उत्पाटिले धम्मीळ ॥ दक्षिणभागींचा गोपाळ ॥ तो कृष्णकेश ॥४७॥

श्वेतकेशाचा श्वेतवर्ण ॥ वामभागींचा संकर्षण ॥ ऐसा करोनियां प्रश्न ॥ टाकिले दोन्ही ॥४८॥

एक रोहिणीचे उदरीं ॥ दुजा देवकीचे जठरीं ॥ उदय पावले द्वापारीं ॥ देवकार्यार्थ ॥४९॥

यम इंद्र आणि पवन ॥ अश्विनौदेव आणि वरुण ॥ यांची तेजशक्ती घेवोन ॥ अवतरावें इंद्रीं ॥१५०॥

आणिक ह्नणे आदिमूर्ती ॥ हे स्वर्गलक्ष्मी गा सुरपती ॥ ते तुह्मां जोडेल युवती ॥ पांचांजणासी ॥५१॥

ऐसें बोलोनि आद्यमूर्ती ॥ पांचही सोडिले भूपती ॥ मग अदृश्य जाहली ज्योती ॥ दिगंबर तो ॥५२॥

तेचि हे कुंतीच्या उदरीं ॥ पांच पांडव जन्मले द्वापारीं ॥ आणि ते स्वर्गलक्ष्मी विप्राचे घरीं ॥ जन्मली प्रथम ॥५३॥

तया विप्रें तप करोनी ॥ देह सांडिला मेदिनीं ॥ मग हे द्रुपदाचे यज्ञीं ॥ प्रगटली सत्य ॥५४॥

पूर्वीं तयेने पूजिला ईश्वरु ॥ पांचवेळ मांगितला वरु ॥ तंव शंभू ह्नणे बोल साचारु ॥ होईल तुझा ॥५५॥

ऐसी द्रौपदीची मूळकथा ॥ तुज सांगितली भारता ॥ तरी तेचि हे द्रौपदी दुंहिता ॥ द्रुपदरायाची ॥५६॥

वैशंपायन ह्नणे भारता ॥ व्यासें द्रुपदासी प्रबोध करितां ॥ तैं मी हे ऐकिली कथा ॥ सैंवरी द्रौपदीचे ॥५७॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ येक असे जी संदेहो ॥ स्वर्गलक्ष्मी यावया अपावो ॥ काय जाहला ॥५८॥

मग सांगता होय मुनी ॥ दुर्वास कोणे येके स्थानीं ॥ बैसला असे अनुष्ठानीं ॥ नित्यनेंमें ॥५९॥

तेथे ऐरावतीवरुन स्वार ॥ सहजें आला राव इंद्र ॥ परी ऋषीस देखोनि नमस्कार ॥ न करी सुरपती ॥१६०॥

तंव कोपोनि बोले दुर्वासा ॥ ह्नणे राजमदें झालासि पिसा ॥ शाप द्यावा तंव तो शिरसा ॥ आला इंद्र ॥६१॥

तो लागतां चरणकमळा ॥ मग आपुले कंठींची कुसुममाळा ॥ ते दुर्वासें घातली गळां ॥ सुरपतीचिया ॥६२॥

मग ते सुरेशें सुमनमाळा ॥ ऐरावतीस दीधली लीळा ॥ परी तेणें झाडोनि चरणातळा ॥ मर्दिली सुमनें ॥६३॥

तें दुर्वासें देखतां नयनीं ॥ ह्नणे मत्त झाला वज्रपाणी ॥ तरी याची स्वर्गलक्ष्मी मेदिनी ॥ जावो निश्वयें ॥६४॥

ह्नणोनि ऐसी गा भूपती ॥ स्वर्गलक्ष्मी आली खालती ॥ मग ते प्राप्त जाहली मागुती ॥ पांचां इंद्रातें ॥६५॥

असो दुर्वासाचे वचनीं ॥ स्वर्गश्री आली मेदिनीं ॥ हें भविष्योत्तरपुराणीं ॥ बोलिलें व्यासें ॥६६॥

आतां असो हे अबळा ॥ पांडव पावले पांचाळा ॥ तो पुढील ऐका जी सोहळा ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥६७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ द्रौपदीउत्पत्तिप्रकारु ॥ द्वादशोऽध्यायीं कथियेला ॥१६८॥

॥ ओव्या ॥ १६८ ॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP