कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग विचार करिती प्रधान ॥ वडिलासि द्यावें सिंहासन ॥ परी तयासि नयन ॥ नसतीच कीं ॥१॥

ह्नणोनि धाकुटा पंडू नृपवर ॥ तया दीधला राज्यभार ॥ आणि प्रधान केला विदुर ॥ भीष्मदेवें ॥२॥

प्रथम वर्‍हाडाची आयती ॥ ज्येष्ठ पर्णावा हे धर्मनीती ॥ ह्नणोनि नोवरी द्विज पाहती ॥ धृतराष्ट्रासी ॥३॥

सुबळ नामें गांधारनृपवर ॥ तो यादव महाथोर ॥ त्याचा असे शकुनी पुत्र ॥ आणि कन्या गांधारी ॥४॥

तयेनें आराधोनि शंकरा ॥ प्रसन्न केले अवधारा ॥ ह्नणे मज द्यावें शतकुमरां ॥ कन्या येकीसह ॥५॥

असो तें श्रुत जाहलें विदुरा ॥ मग सांगों धाडिलें गांधारा ॥ कीं द्यावी आमुचे धृतराष्ट्रा ॥ कन्या तुमची ॥६॥

सुबळें तया दीधला शब्द ॥ तंव कन्येनें ऐकिला पति अंध ॥ मग गांधारीही बांधी सुबत्ध ॥ पट नेत्रांसी ॥७॥

ह्नणे पति न देखे नयनीं ॥ तरी आपण कां मिरवावें अंजनीं ॥ असो ते वरिली कामिनी ॥ धृतराष्ट्ररायें ॥८॥

मग विवाहो पंडूनृपवरा ॥ चित्तों चिंता वाटे विदुरा ॥ तंव ऐकिली दूतद्वारा ॥ कन्या येकी ॥९॥

कीं शूरसेनाचा कुमर ॥ वसुदेव नामें यादववीर ॥ त्याची भगिनी असे निर्धार ॥ कुंती नामें ॥१०॥

कुंतिभोज निपुत्रिक जाणोनी ॥ त्यासी ते कन्या दीधली पोसणी ॥ परि ते असे नंदिनी ॥ शूरसेनाची ॥११॥

होती कुंतिभोजनाचे पाळणीं ॥ ह्नणोनि कुंती बोलिजे जनीं ॥ तिनें प्रसन्न केला सेवादानीं ॥ दुर्वासदेवो ॥१२॥

ह्नणे मज द्यावे जी पुत्र ॥ ईश्वरभक्त महावीर ॥ मुनीनें तीस दीधले पांचमंत्र ॥ पुत्रबीजांचे ॥१३॥

ह्नणे जें तूं कल्पिसी दैवत ॥ त्याचेंच होईल अपत्य ॥ तें वाक्य मानोनि सत्य ॥ कुंती होती ॥ ॥१४॥

परि बाळपणीं कुंती माता ॥ तयेनें आराधिला सविता ॥ तो प्रत्यक्ष रमोनि भारता ॥ जाहला कर्णवीर ॥ ॥१५॥

कुंडलें आणि वज्रकवचा ॥ सह पुत्र जाहला वीरेंशा ॥ तेव्हां ते होती बाळवयसा ॥ पितृगृहासी ॥१६॥

तिनें टाकिला तो जळीं निंगुतीं ॥ तेथें होता धृतराष्ट्राचा सारथी ॥ तो बोलिजे राधापती ॥ प्रसिद्ध जनीं ॥१७॥

मगरमाशी करोनि पेटी ॥ कर्ण घातला तिचे संपुटीं ॥ मग सोडिला गंगातटीं ॥ उदकामाजी ॥१८॥

तंव ते पेटी गंगाजीवनीं ॥ वाहतहोती प्रवाहें करोनी ॥ ते सांपडली सारथ्यालागोनी ॥ राधापतीतें ॥१९॥

भारता तो कुंतीचा नंदन ॥ राधेनें वाढविला कर्ण ॥ तेणें प्रसन्न केला चंडकिरण ॥ तप करोनी ॥२०॥

तया सूर्ये दीधला मंत्र ॥ जो हेम करी येकभार ॥ दानशीळ उदार धीर ॥ जगामाजी ॥२१॥

तो बाळपणाचे वयसां ॥ कुंतीत जाहला पुत्र ऐसा ॥ मग ते मेळविली डोळसा ॥ पंडुरायातें ॥२२॥

विदुराची मांडिली वर्‍हाडिका ॥ कन्या पाहतां अनेका ॥ तंव आली सुलग्नपत्रिका ॥ गांगेयासी ॥२३॥

महापार्श्वदेशींचा नरेंद्र ॥ देवक नामें महाथोर ॥ त्याची कन्या असे साचार ॥ लावण्यकळिका ॥२४॥

ते नोवरी पर्णिली विदुरें ॥ ऐसीं जाहलीं तीन सैवरें ॥ मग पृथ्वी जिंकिली पंडुवीरें ॥ पराक्रमेंकरोनी ॥२५॥

राजे जिंकोनिया बहुत ॥ त्यांचें करभारें हरिलें वित्त ॥ अश्वमेध केले येकशत ॥ पंडुरायें ॥२६॥

तंव आला कृष्णद्वैपायन ॥ गांधारीनें पूजिला जाण ॥ मग तो जाहला प्रसन्न ॥ अंधकांतेसी ॥२७॥

ह्नणे तुज होतील शत पुत्र ॥ आणि येक कन्या निर्धार ॥ हें बोलोनि शुभ उत्तर ॥ गेला व्यासदेवो ॥२८॥

मग दोघी जाहल्या गरोदरी ॥ शत पुत्र प्रसवली गांधारी ॥ आणि पांच पुत्र प्रसवल्या परिकरी ॥ माद्रिकुंती ॥२९॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ मुने तूं ज्ञानसागरींचा डोहो ॥ तरी येवढा फेडीं संदेहो ॥ माझे मनींचा ॥३०॥

शत पुत्र प्रसवली गांधारी ॥ ते कैंसे सामावले उदरीं ॥ आणि त्यां स्तनपान सुंदरीं ॥ दीधलें कैसें ॥३१॥

जरी ह्नणों वर्षाच्या अंतरीं ॥ तरी बावनांवर्षाच्या शिरीं ॥ रजस्वला नव्हे नारी ॥ भरंवसेनी ॥३२॥

तेव्हा कैंची पां संतती ॥ आणि पांच पुत्र प्रसवली कुंती ॥ मग ऋषी ह्नणे गा नृपती ॥ ऐक आतां ॥३३॥

कोणे एके काळवेळीं ॥ सवें घेवोनि राजबाळी ॥ पंडू गेला असतां व्याहाळी ॥ हिमगिरीसी ॥३४॥

तंव तेथें प्रसवली कुंती ॥ तये पुत्र जाहला धर्ममूर्ती ॥ तो समाचार आणिला दृतीं ॥ हस्तनापुरा ॥३५॥

तें ऐकोनिया गांधारी ॥ दुःखपावली अभ्यंतरीं ॥ कीं मज आधीं कुंतीनारी ॥ प्रसवली पुत्र ॥३६॥

आतां कुंतीचे ज्येष्ठकुमर ॥ तेचि होतील की राज्यधर ॥ तरी माझे सुत किंकर ॥ होतील त्यांचे ॥३७॥

ह्नणोनि पाषाण घेतला करीं ॥ उदर कुटिलें घायेंवरीं ॥ तंव गर्भ पडिला सत्वरीं ॥ धरणीप्रती ॥३८॥

पाहें तंव लवथवीत वार ॥ मध्यें अंगुष्ठप्रमाण कुमर ॥ तें देखोनि मग सुंदर ॥ लोटली धरणीं ॥३९॥

तेथें आला वेदव्यास ॥ त्याचा सतीनें केला निर्भर्त्स ॥ ह्नणे तूं जाहलासि कां तापस ॥ प्रसन्न मज ॥४०॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ नाभी नाभी वो धरी धीर ॥ कार्यावांचूनि अलंकार ॥ न करी कर्ता ॥४१॥

नातरी सागरीं मुक्ताफळ । कीं सरोवरीं दिव्य कमळ ॥ तें कार्याविणें निर्फळ ॥ न करी कर्ता ॥४२॥

मग कुंडें येकोत्तरशतें ॥ व्यासें भरिलीं मधुघृतें ॥ मध्यें तीं घातलीं अपत्यें ॥ पृथकाकारें ॥४३॥

गांधारिसि ह्नणे मुनीश्वर ॥ येक क्रमिलिया संवत्सर ॥ तैं काढावा यांतील कुमर ॥ प्रथमकुंडींचा ॥४४॥

तये अंतरें मासमासां ॥ पुत्रं काढावे भरंवसा ॥ हा सांगोनिया संदेशा ॥ गेला व्यासदेवो ॥४५॥

मग भरतांचि मास बारा ॥ अष्टांगें पूर्ण जाहलीं कुमरा ॥ तो दुर्योधन जन्मला पहिला ॥ प्रथम कुंडींचा ॥४६॥

तो तरी दुर्योधन कुमर ॥ कलीचा असे अवतार ॥ ह्नणोनि देवधर्म निर्धार ॥ नावडे तया ॥४७॥

तैं जाहले उल्कापात ॥ भूकंप मेघशोणित ॥ रासभें विक्राळ ध्वनी करित ॥ नगरामाजी ॥४८॥

नगराचिये बाह्यप्रदेशी ॥ भालुवा भूंकती कर्कशी ॥ नगरीं गीधें आणि वायसीं ॥ मांडिला गजर ॥४९॥

ब्राह्मण ह्नणती समस्त ॥ हें अंधा बरवें नव्हे अपत्य ॥ यश कीर्ति कुळ बहुत ॥ नासेल येणें ॥५०॥

तंव भरला मास येक ॥ सप्तधातु जाहला पाक ॥ टाहो करी बाळक ॥ कुंडामाजी ॥ ॥५२॥

तो काढिला पैं सत्वरा ॥ दुःशासन नाम त्या कुमरा ॥ ऐसे शतपुत्र गा नरेंद्रा ॥ जाहले जाण ॥ ॥५३॥

तयांमाजी धाकुटी सकळां ॥ कन्या जन्मली गा भूपाळा ॥ तियेचें नाम दुःशीला ॥ ठेवियेलें ॥५४॥

कोणी येके वैश्यें धृतराष्ट्रा ॥ कन्या दीधली अवधारा ॥ तिचे पोटी जाहला नरेंद्रा ॥ युयुत्सव ॥ नामें ॥५५॥

परि तो दुर्योधनाधरा ॥ प्रधान जाहला कुरुकुमरां ॥ ऐसे एकोत्तरशत धृतराष्ट्रा ॥ झाले कुमर ॥५६॥

तंव जन्मेजय ह्नणे नावें ॥ त्यांचीं सांगावीं निश्वयें ॥ तुह्मांपाशीं व्यासदेवें ॥ कथियेली जीं ॥५७॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया बरवा केलासि प्रश्न ॥ तरी प्रथम जाहला दुर्योधन ॥ युयुत्सु त्यापाठीं ॥५८॥

दुःशासन दुःसह दुःशील ॥ जलसंध सम भीमबळ ॥ सुबाहू सहिष्ण चित्रकुंडल ॥ धनुर्धर वीर तो ॥५९॥

दुर्बर आणि दुर्मूख बिंदू ॥ कृप चित्र कीं दुर्मदू ॥ दुर्मरहन मरुबिंदू ॥ आणि चित्ताक्ष तो ॥६०॥

ऊर्णनाभी चित्रवाहू सुलोचन ॥ सुनाभ चित्रवर्मा अश्वसेन ॥ माहाबाहो समदुःख मोचन ॥ आणि सुवर्प्ना तो ॥६१॥

विवसु विकटु चित्रशरासनु ॥ प्रगाहा सोमवरु मानु ॥ सत्यसंधू विवसु विकर्णू ॥ आणि उपचित्र तो ॥६२॥

चित्रकुंडल भीमबाहो संदु ॥ बळाकी उग्रयोद्धा बळावर्धू ॥ दृढायो भीमकर्मा उपनंदु ॥ अनासिंधू तो ॥६३॥

सोमकीर्ती कुडपाइ अघबाहो ॥ घोर रौद्रकर्मा वीरबाहो ॥ कनकध्व कुंडासी दीर्घबाहो ॥ आणि वीटरुप तो ॥६४॥

प्रथम प्रमाथी वीर्यनादु जाण ॥ दीर्घताल विकटबाहो पूर्ण ॥ वीर दृढरथ दुर्मर्हण ॥ आणि उग्रश्रवा तो ॥६५॥

उग्र अभये कुंडभेरी ॥ भीमस्थ अपलाप जळसंधी ॥ कनकपा सेनानी दृढसंधी ॥ आणि बृंहक तो ॥६६॥

विशाळा सुवाना नागदंता ॥ सत्यसंधी अनंतरुप राजीता ॥ बृहत्क्षेत्र सुदनु दृढहस्ता ॥ आणि उग्राहीत तो ॥६७॥

कवचि कथकुंड अहिकेत ॥ कुंडधारी दुराधर शुंभहस्त ॥ शुभकर्ण सर्पाक्ष दुप्राजित ॥ आणि बहुयासी तो ॥६८॥

ऐसे पुत्र प्रसवली गांधारी ॥ आणि दुःशीला असे कुमरी ॥ ते जयद्रथातें सुंदरी ॥ दीधली जाणा ॥६९॥

मग मुनीसि ह्नणे भूपती ॥ हें तुह्मीं आणिलें व्यक्ती ॥ आतां पांडवांची उत्पत्ती ॥ सांगा मज ॥७०॥

मग ह्नणे महामुनी ॥ सवें स्त्रिया घेवोनि दोनी ॥ पंडू निघाला महावनीं ॥ पारधीसी ॥७१॥

सवें कुंती आणि माद्री ॥ ते मद्ररायाची कुमरी ॥ पारधी खेळतसे हिमगिरी ॥ दक्षिणभागीं ॥७२॥

ऐसी पारधी रायें खेळतां ॥ तंव अपूर्व वर्तली येकी कथा ॥ ब्रह्महत्या बैसली माथां ॥ पंडुरायाचे ॥७३॥

ऐकोनि ह्नणे जन्मेजयी ॥ पंडू धर्मात्मा असोनि रावो ॥ त्यासी घडला अपावो ॥ कैसियापरी ॥७४॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ कर्दम नामें ऋषीश्वर ॥ तो जुनाट अतिपवित्र ॥ असे त्या वनीं ॥७५॥

तेणें पूर्वी पर्णिली नोवरी ॥ विवाह जालिया पंचरात्री ॥ तयेतें त्यजोनि ब्रह्मचारी ॥ जाहला कर्दमू ॥७६॥

भारता मग ते कुमारिका ॥ यौवनीं दाटली आणिका ॥ परी ते न पाहे परपुरुषा ॥ दृष्टिमात्र ॥७७॥

मग ते निमाली दैवगतीं ॥ सातजन्में जन्मली मागुती ॥ परी आणिक न करी पती ॥ जातिस्मरणें ॥७८॥

पिता करुं पाहे सैवर ॥ ते ह्नणे माझा आहे भ्रतार ॥ हा करितां व्यभिचार ॥ नरक मजसी ॥७९॥

मग ते जाहली हरिणी ॥ दृष्टीं देखतां कर्दममुनी ॥ आणि रतीही असे तेचि वनीं ॥ कामकांता ॥ ॥८०॥

ऐशीं हीं तिन्ही असती त्या वनीं ॥ तंव येक पुरुष आला तेक्षणीं ॥ पतिव्रतेशीं करुंपाडे झडपणी ॥ कामाभिलाषें ॥८१॥

त्यासी रति ह्नणे रे मूर्खा ॥ परस्त्रियेचे अभिलाषां ॥ येणें जाशील महानरका ॥ निश्वयेंसीं ॥८२॥

परी तो मानीच वचन ॥ कामें नेणे लज्जा मरण ॥ मग रतीनें टाकिलें तें स्थान ॥ कर्दमाचें ॥८३॥

आणि तयातें बोले वनिता ॥ थोरशब्दीं ऋषिदेखतां ॥ कीं मजसीं बोलसी तरी आतां ॥ करीन भस्म ॥८४॥

मागुती ह्नणे ते कांता ॥ मी परस्त्री असोनि पतिव्रता ॥ साउमा येसी तरी तुझे माथां ॥ पातक या कर्दमाचें ॥८५॥

पैल पाहें ते मृगिणी ॥ हे कर्दमाची पर्णित कामिनी ॥ सातजन्में तयावाचोनी ॥ न करी भ्रतार ॥८६॥

तारुण्यें दाटली वयसा ॥ रजस्वला होय मासांमासां ॥ त्या ब्रह्महत्यां शतसहस्त्रां ॥ गणित नाहीं ॥८७॥

कीं स्त्री जाहल्या ऋतुवंती ॥ संकोचें पडिली काळस्थिती ॥ परि हें बोलिलें असे श्रौतीं ॥ पातक ऋतूचें ॥८८॥

स्त्रियेसी न देता ऋतु ॥ जरीं पती होय अवधृतू ॥ जाणों तेणें केला पितृघातू ॥ शस्त्रेवीण ॥८९॥

तरी या कर्दमाचे दुप्कृंता ॥ पृथ्वी न पुरे गा लिहिता ॥ तें ऐकिलें गा भारता ॥ कर्दमें तेणें ॥९०॥

आतां असो हे संवादवाणी ॥ कर्दम विचारी निजमनीं ॥ मग ते जाणितली हरिणी ॥ स्त्री आपुली ॥९१॥

अंतरीं करोनि उद्वेगु ॥ ऋषी जाहला कुरगुं ॥ करावया रतिसंयोगु ॥ तये मृगिणीसी ॥९२॥

तंव ते जाणोनियां हरिणी ॥ हरिखें आली धांवोनी ॥ प्रदक्षिणा करोनि चरणीं ॥ ठेविला माथा ॥९३॥

ते सहज होती ऋतुमनी ॥ मृगें आरंभिली कामरती ॥ इतुक्यांत बाण लाविला शितीं ॥ पंडुरायें ॥९४॥

परी काम नव्हतां संपूर्ण ॥ राया हातींचा सुटला बाण ॥ दोहीकडे भेदोनि हरिण ॥ पडिले भूमीं ॥९५॥

राव संतोषला निजमनें ॥ ह्नणे म्यां दोन्हीं पाडीली हरिणें ॥ रायां पारधीहूनि व्यसनें ॥ बाधक नव्हती ॥९६॥

मग पंडू आला जवळी ॥ तंव तो मृग बोले मंजुळी ॥ कीं तुवां वंशवल्लीचे मुळीं ॥ घातला अंगार ॥९७॥

तुवां केले बहुत यज्ञ ॥ ते गेले रे निष्कारण ॥ मी तरी कर्दमऋषी जाण ॥ मृगरुपी असें ॥९८॥

मग ते मागील सर्व कथा ॥ ऋषीनें कथिली नृपनाथा ॥ आणि ह्नणे हे हारिणी कांता ॥ पूर्वील माझी ॥९९॥

आतां असो हे पुढती ॥ स्त्रीपुरुषांची होता रती ॥ समई वधिलें गा भूपती ॥ हें उचित नव्हे ॥१००॥

मृग पक्षी आणि मच्छी ॥ हीं तुह्मां वधणें अहर्निशी ॥ परी मिथुनीं असतां यमपाशीं ॥ बंधन सत्य ॥१॥

ऐकोनि बोले भृपती ॥ मी अज्ञात जी मंदमती ॥ परि शाय बोलिली भारती ॥ कर्दमाची ॥२॥

ह्नणे आह्मीं दोन्ही हरिणें ॥ तुवां वधिलीं रुद्रवाणें ॥ तरी तूं जाशील रे मरणें ॥ कामवेळेसी ॥३॥

स्त्रियेसी देत असतां रती ॥ तुझा प्राण जाईल दुर्मती ॥ ऐसी बोलोनियां भारती ॥ निमाला हरिण ॥४॥

राव करी हाहा कटकटा ॥ बापा बळिया कर्मा विकटा ॥ दुग्ध घेतां विषकांटा ॥ रुतला जिव्हे ॥५॥

मग पंडू आला बिढारा ॥ कुंती आदी सहपरिवारा ॥ पातक सांगे समग्रां ॥ विप्रहत्येचें ॥६॥

हत्या घडली अवचिता ॥ अपकीर्ती बैसली माथां ॥ तरी मी न जायीं मागुता ॥ हस्तनापुरातें ॥७॥

मग वस्त्रें अलंकार ॥ अश्व आणि रथ कुंजर ॥ ब्राह्मणां वाटिले समग्र ॥ पंडुरायें ॥८॥

राव ह्नणे कुंतीप्रती ॥ तुह्मीं जावें हस्तनावती ॥ मी तपसाधनें शांती ॥ करीन देहाची ॥९॥

तंव ह्नणती कुंती माद्री ॥ आमुचें काय असे नगरीं ॥ आह्मीं असों बरोबरी ॥ सेवेलागीं ॥११०॥

मग दूत धाडिले हस्तनापुरा ॥ त्याहीं कथिलें शंतनुकुमरा ॥ कीं शाप जाहला नृपवरा ॥ ब्राह्मणाचा ॥११॥

आपण झाला जी तापस ॥ सांडोनियां सर्व आयास ॥ ऐसें ऐकोनि उश्वास ॥ सांडिला सकळीं ॥ ॥१२॥

मग अंधें केला कटकटा ॥ ह्नणे राज्य बुडालें सुभटा ॥ इकडे पंडू लागला वाटां ॥ उत्तरेचिया ॥१३॥

गंधमादन गिरिवर ॥ जेथें ऋषीं येकसहस्त्र ॥ तेथें येकसंवत्सर ॥ क्रमितसे राव ॥१४॥

मग पंडू निघे सामोरा ॥ ऋषी ह्नणती गा राजेंद्रा ॥ येथें गती नाहीं अपुत्रा ॥ जावया पुढें ॥१५॥

मार्ग न फुटे कदा नयनीं ॥ हिमें दाटे सदा मेदिनी ॥ पुत्रेंवीण आपमरणी ॥ झालासि तूं ॥१६॥

राव मनीं जाहला दुश्विती ॥ ह्नणे आह्मा मरणमूळ रती ॥ आणि पुत्रेंवीण तरी गती ॥ आथीच ना ॥१७॥

मग कुंतीसि राव ह्नणे ॥ पुत्र नसतां व्यर्थ जिणें ॥ तरी मी सांगतों तें करणें ॥ स्त्रिये तुवां ॥१८॥

उत्तम पाहोनियां द्विजा ॥ त्यासीं रमावें पुत्रकाजा ॥ माझे बोलें पुत्रप्रजा ॥ रचावी तुवां ॥१९॥

मागें तरी आमुचा वंश ॥ वाढविता होय वेदव्यास ॥ संकटीं वडिलीं केल्या सौरस ॥ पातक नाहीं ॥ ॥१२०॥

तेच जाणिजे पतिव्रता ॥ पतिवचन नुलंघी सर्वथा ॥ मग बोलिली मूळकथा ॥ कुंती तयातें ॥२१॥

कुंती ह्नणे जी अवधारीं ॥ मज असतां आपुले माहेरी ॥ तैं म्यां दुर्वासा नानापरी ॥ प्रसन्न केलें ॥२२॥

तेणें दीधले मंत्रबाण ॥ ज्या देवाचें करावें आवाहन ॥ तो देईल पुत्रदान ॥ रतिसंगेंसी ॥२३॥

पंडू हर्षे जाहला निर्भरु ॥ ह्नणे हा तंव दैवें पाविजे वरु ॥ वन हिंडतां कल्पतरु ॥ पाविजे जैसा ॥२४॥

मग राव बोले पुढती ॥ कीं सर्वकारण मूळस्थिती ॥ तो पूजावा धर्ममूती ॥ वल्लभे आधीं ॥२५॥

तयांहीं मांडिलें तपाचरण ॥ नानापरी देहदंडण ॥ तिघें करिती अनुष्ठान ॥ अब्द येक ॥२६॥

कुंती जपे धर्ममंत्र ॥ तंव तो आला सत्वर ॥ कुंतीस देवोनियां कुमर ॥ गेला धर्मरावो ॥२७॥

तोचि उपजला धर्मरावो ॥ जया शत्रुमित्र सम पहाहो ॥ त्यासी पुष्पीं केला वर्षावो ॥ देवगणांहीं ॥ ॥२८॥

मग वर्षाचेनि अंतरें ॥ मंत्र आव्हानिला सुंदरें ॥ तो मारुतं येवोनि शरीरें ॥ रमला रते ॥२९॥

तो जाहला पवननंदन ॥ महाबळिया भीमसेन ॥ जरासंध आणि दुर्योधन ॥ ययांचा काळ ॥१३०॥

दहावे दिवशीं अंगनां ॥ सवें घेवोनि भीमसेना ॥ कुंती आली जंव पूजना ॥ सूर्यचिया ॥३१॥

तंव द्वारीं देखिला पंचानने ॥ धाकें निष्टला भीमसेन ॥ परि खालीं होता चंडपाषाण ॥ तो चूर्ण झाला ॥३२॥

असो मागुती वर्षाचे अंतरें ॥ इंद्र आव्हानिला सुंदरें ॥ तेणें येवोनि पुरंदरें ॥ दीधली रती ॥३३॥

तोचि नवमें मासी पूर्ण ॥ उपजला पुत्र अर्जुन ॥ जेणें सैंवरी जिंकिला पण ॥ द्रौपदीचा ॥३४॥

तंव वदली आकाशवाणी ॥ कीं हा ख्याती करील त्रिभुवनीं ॥ हरिखें देव वर्षले सुमनीं ॥ पार्थावरी ॥३५॥

तेव्हां कुंतीस ह्नणे राजा ॥ तुं प्रसवलीस पुत्रप्रजा ॥ कांहीं दे पां मंत्रबीजा ॥ माद्रीप्रती ॥ ॥३६॥

मग तयेसि दीधले दोनी मंत्र ॥ ते आव्हानिले अश्विनीकुमार ॥ साक्षांत येवोनि सुंदर ॥ भोगिली तिहीं ॥३७॥

तया मंत्राचेनि कुमर ॥ नकुळ सहदेव सहोदर ॥ ते दोनी जाहले पवित्र ॥ माद्रीलागीं ॥३८॥

आतां असो हे मूळकथा ॥ तुवा पुसिलें गा भारता ॥ तरी पांडव लाधले पंडुनाथा ॥ ऐसियापरी ॥३९॥

ऐसी जाहलिया संतती ॥ मग पंडू निमाला सुरतीं ॥ तें ऐकावें सकळ श्रोतीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ कौरवपांडवजन्मविस्तारु ॥ दशमोऽध्यायी सांगितला ॥१४१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP