कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणती वैशंपायन ॥ आतां गंगेचा ऐकें प्रश्न ॥ जेणें करोनि सुखावे मन ॥ श्रोतयांचे ॥१॥

तरी येणें प्रसंगें कथा ॥ पांडवांची सांगतों भारता ॥ आणि गंगादेवीचिया सुता ॥ भीष्मदेवाची ॥२॥

असो कोणे येके दिवशीं ॥ महाभिष राजा सूर्यवंशी ॥ प्रतापप्रौढी पुण्यराशी ॥ पुत्र इक्ष्वाकूचा ॥३॥

तो समुद्राचा अवतार ॥ तेणें याग केले शतसहस्त्र ॥ अश्वमेधादि नृपवर ॥ करी कर्म ॥४॥

तंव ह्नणे भारतवीर ॥ समुद्रें कां धारिला अवतार ॥ मनुष्य जाहला तो विचार ॥ सांगें मज ॥५॥

ऋषी ह्नणे गा अवधारीं ॥ ब्रह्मा इंद्र सहपरिवारीं ॥ विचारकरीत समुद्रतीरीं ॥ बैसले होते ॥६॥

दैत्यांचा करावा निःपात ॥ ह्नणोनि मांडिला येकांत ॥ तंव गर्जना करी सरितानाथ ॥ ऊर्मिचेनी ॥७॥

ह्नणोनि तेणें महागजरें ॥ कोणी कोणाचीं नायके उत्तरें ॥ मग सिंधु शापिला निकरें ॥ ब्रह्मदेवें ॥८॥

कीं उन्मत्त झालासि कल्लोळीं ॥ तरी पडसील भवजाळीं ॥ तोचि महाभिष उपजला कुळीं ॥ इक्ष्वाकूच्या ॥९॥

तंव तो कोणेयेके वेळीं ॥ आला ब्रह्मया जवळी ॥ जेथें सभा असे दाटली ॥ सकळदेवांची ॥ ॥१०॥

तेथें गंगा आली नमस्कारा ॥ जे पुण्यपावनी चराचरा ॥ तंव वातघातें तिचिये अंबरा ॥ जाहला फेडू ॥११॥

तेणें नावेक जाहली नग्न ॥ सकळ देवी झांकिले नयन ॥ कीं परस्त्री आणि जन्मस्थान ॥ पाहों नये ॥१२॥

देव जाहले पाठिमोरे ॥ परि पाहिलें इक्ष्वाकुकुमरें ॥ नग्न असतां पाहिली आदरें ॥ महाभिषरायें ॥१३॥

तें जाणोनियां अंतःकरणी ॥ ब्रह्यानें तीं शापिली दोन्ही ॥ कीं तुह्मी पावाल मनुष्ययोनी ॥ येणें पापें ॥१४॥

भारता मग तो इक्ष्वाकुपुत्र ॥ सोमवंशीं जन्मला परिकर ॥ प्रतीपकुमर राज्यधर ॥ शंतनू नामें ॥१५॥

आणि ते गंगा उतरतां स्वर्गी ॥ तये अष्टवसू भेटले मार्गी ॥ ज्यांसी शापिले होतें अंगीं ॥ वसिष्ठाने ॥१६॥

तुह्मीं पावालरे पतनीं ॥ महीवरी मनुष्याचे योनी ॥ तरी वसु ह्नणती त्वां व्हावें जननी ॥ आह्मां सकळां ॥१७॥

आह्मां झालिया उत्पत्ती ॥ तत्काळ वधावें स्वहस्तीं ॥ जेणें होय निर्गती ॥ मनुष्यदेहाची ॥१८॥

तुवां आमुचा करितां वध ॥ तरी तुज न लागे बाध ॥ तो हा आह्मां मानवला शब्द ॥ सत्य जाण ॥१९॥

येवढें तूं करीं उचित ॥ मग अष्टप्तभाग देऊं सत्य ॥ येक मिळेल हो अपत्य ॥ तुजलागीं पैं ॥२०॥

तुझिये बुडालिया अंतीं ॥ प्राणिया होय ऊर्ध्वगती ॥ ह्नणोनि आमुची निर्गती ॥ तुझेनि हातें ॥२१॥

तंव ते गंगा बोले गुज ॥ तुमचें मानलें मज काज ॥ परी पाहिजे पुरुषबीज ॥ तुह्मायोग्य ॥२२॥

वसु ह्नणती गंगेसी ॥ शंतनु राव सोमवंशी ॥ तो सिंधुअंश हो डोळसी ॥ वरावा तुवां ॥२३॥

मग गंगेनें दिधली भाष ॥ ह्नणे तुमचा फेडीन दोष ॥ आणि येणें प्रसंगें पुत्रमुख ॥ देखेन मी ॥२४॥

असो गेलिया अष्टवसू ॥ गंगा धरी मनुष्यवेषु ॥ मनीं धरोनियां उद्देशू ॥ शंतनूचा ॥२५॥

ऐसी निघाली ते वनिता ॥ तंव तो शंतनूचा पिता ॥ प्रतीपराजा गेला होता ॥ वनामाजी ॥२६॥

तेथें जावोनि येकायेकीं ॥ गंगा बैसली तयाचे अंकीं ॥ ह्नणे तूं मज अभिलाषीं ॥ स्त्रीपणें राया ॥२७॥

तंव तो ह्नणे राजेंद्र ॥ हा नघडेचि अनाचार ॥ ऐसा करितां व्यभिचार ॥ नरकीं जावें ॥२८॥

आणि जाणवो अविवेकी ॥ तूं बैसलीस माझिये सव्यांकीं ॥ तरी सुनेनें किंवा बाळकीं ॥ बैसणें येथें ॥२९॥

आतां माझा शंतनु कुमर ॥ तो तुवां वरावा वर ॥ तुजसी योग्य सुकुमार ॥ कुमारिके तो ॥३०॥

मग ह्नणे गंगादेवी ॥ तें मानवलें माझिये जीवी ॥ परि भ्रतार कोपलिया कुभावीं ॥ न राहें क्षणभरी मी ॥३१॥

माझें उल्लंघितां उत्तर ॥ तैं न राहें मी क्षणमात्र ॥ तरीच घालीन कंठसूत्र ॥ शंतनूसी ॥३२॥

मग प्रतीप बोले तथास्तू ॥ तुझा बोल होईल सत्यू ॥ ऐसा करोनि निश्वयार्थू ॥ गेली गंगा ॥३३॥

तंव शंतनु आला ते अवसरीं ॥ राव ह्नणे तुज वराया नोवरी ॥ येईल ते पर्णावी सत्वरीं ॥ न विचारितां ॥३४॥

तिचा करीं सांभाळ शब्द ॥ शुभाशुभीं न करीं खेद ॥ ऐसें न करिताचि संबंध ॥ तुटेल पुत्रा ॥३५॥

तें मानवलें राजपुत्रा ॥ दोघे आले हस्तनापुरा ॥ काहीं काळ लोटतां पितरा ॥ जाहला मृत्यू ॥३६॥

मग मिळूनियां प्रधानीं ॥ शंतनू बैसविला सिंहासनीं ॥ तैं आनंद जाहला त्रिभुवनीं ॥ तें असो आतां ॥३७॥

जन्मेजय ह्नणे गा मुनी ॥ अष्टवसु शापिले कवणेगुणी ॥ तें सविस्तर घालिजे श्रवणीं ॥ चरित्र त्याचें ॥३८॥

मग मुनी ह्नणे आपण ॥ वसूंचे आदिअवसान ॥ ते कैसे पावले पतन ॥ ऐकावें गा ॥३९॥

सुरभी नामें दक्षकुमरी ॥ ते कश्यपाची अंतुरी ॥ तियेचे उपजली उदरीं ॥ नंदिनी धेनू ॥४०॥

ते वसिष्ठाचे वनीं विचरे ॥ होम देती तिचेनि घृतक्षीरें ॥ तंव वसु आले काळांतरें ॥ तया ठायां ॥४१॥

ते अष्टही स्त्रियांसहित ॥ हिंडत आले अयाचित ॥ तंव देखिली अकल्पित ॥ धेनु तेथें ॥४२॥

त्यांतील दिव्य नामें वसु ॥ स्त्रियेसि बोले विलासु ॥ कीं इचा भक्षितां क्षीरसु ॥ नासे वृद्धत्व ॥४३॥

मग दहासहस्त्र वर्षी ॥ शरीरीं तारुण्य भोगिजे देखा ॥ आणि इचे प्राशितां पीयूषा ॥ न लागे व्याधी ॥४४॥

तंव ते बोले कामिनी ॥ माझी वृद्ध आहे सांगातिणी ॥ तरी हे धेतु न्यावी चोरोनी ॥ तयेलागी ॥४५॥

तें मानवलें प्राणनाथा ॥ मग धेनू जाहला हाकिता ॥ परि स्त्री बोधें गा भारता ॥ घडला अपावो ॥४६॥

ह्नणोनियां स्त्रियेचे वुद्धीं ॥ जो नर लागे झकवादी ॥ तो नासेल अथवा त्रिशुद्धी ॥ पडेल पतनीं ॥४७॥

इकडे वसिष्ठ वरुणनंदनू ॥ दृष्टीं न देखे कामधेनू ॥ मनीं पाहे तंव चोरुन ॥ नेती वसु अष्ट ॥४८॥

मग तयां शाप बोले मुनी ॥ तुह्मीं पडालरे मनुष्ययोनीं ॥ तंव ते बोलती वचनीं ॥ अष्टही वसू ॥४९॥

मुनी तुमचा न टळे शापु ॥ आह्मां जडला महा दोषु ॥ परी आतां दीजे उःशापु ॥ अमृतवचनी ॥५०॥

मुनि ह्नणे येकावर्षाचे अंतरीं ॥ मोक्ष पावाल निर्धारी ॥ येके सुंदरीचेनि करीं ॥ पावाल स्वर्ग ॥५१॥

परी हा दिव्यनामें वसु ॥ विषयीं लंपट बहुवसु ॥ येणें केला असे नाशु ॥ सकळिकांचा ॥५२॥

हा चिरकाळ असो मेदिनी ॥ यासी कन्यापुत्र ना कामिनी ॥ भक्तीनें पावेल निर्वाणी ॥ स्वलोकातें ॥५३॥

ऐसें उःशापिलें ऋषेश्वरें ॥ तंव धेनु सांडोनि शब्दमात्रें ॥ मग निघाले अंतरें ॥ अष्टवसू ते ॥५४॥

परि ते गेले भयाभीत ॥ दिव्यवसू तो भीष्म सत्य ॥ हें सांगितलें समस्त ॥ भारता तुज ॥५५॥

आतां असो त हे वसु ॥ शंतनूसि आठवला उपदेशू ॥ स्त्रीचा धरोनियां उद्देशू ॥ निघे व्याहाळीसी ॥५६॥

तंव ते भागीरथीचे तीरीं ॥ गंगा देखिली सुंदरी ॥ जार्णो स्वर्गीगना खेचरी ॥ दिव्यरुपें ॥५७॥

तिचा देखोनि श्रृंगार ॥ राव जाहला विरहातुर ॥ मग दूर ठेवोनि परिवार ॥ गेला जवळी ॥५८॥

शंतनु ह्नणे वो सुंदरी ॥ तूं कोण कोणाची नारी ॥ कुमारी कीं पर्णित स्त्री ॥ तें सांग मज ॥५९॥

तेणें जाहली लज्जित ॥ रायें जाणिली अपर्णित ॥ मग उपदेशिली बहुत ॥ कामदृष्टीं ॥६०॥

ह्नणोनि धरिली वामकरीं ॥ ह्नणे माझी बांधीं गळसरी ॥ तंव ते बोले सुंदरी ॥ रायाप्रती ॥६१॥

तुमचें मी बांधीन जी सूत्र ॥ परी माझें न भंगावें उत्तर ॥ तें न मानितां सत्वर ॥ जाईन मी ॥६२॥

शंतनु ह्नणे तथास्तु ॥ तुझा बोल करणें यथार्थू ॥ ऐसी भाष देवोनि तंतू ॥ बांधिला कंठीं ॥६३॥

ऐसी ते पर्णिली चतुरा ॥ मग राव आला गजपुरा ॥ पुढें ते गंगा प्रसवली कुमरां ॥ आठांजणांतें ॥६४॥

जौ पुत्र होय संवत्सरीं ॥ तो सांडी उदकांतरीं ॥ ऐसे नाशिले याचिपरी ॥ सातही सुत ॥६५॥

मग जाहला आठवा पुत्र ॥ राव ह्नणे राखीं तंतुमात्र ॥ ह्नणोनि वोडविला कर ॥ शंतनूरायें ॥६६॥

ह्नणे हा मज देतां भिक्षेसी ॥ झणें विटशील मानसीं ॥ परी राखें वो कुलवृद्धीसी ॥ येवढा तरी ॥६७॥

देवी संतोषली भिक्षादानीं ॥ रावही संतोषला निजमनीं ॥ मग नाम ठेविलें मेदिनी ॥ भीष्म ऐसें ॥६८॥

परी तोही टाकिला जळीं ॥ राव हात पिटी निढळी ॥ कटकटा ह्नणे चांडाळी ॥ काय केलें ॥६९॥

तंव गंगा होवोनि सद्नद ॥ ह्नणे हे अष्टवसु शापदग्ध ॥ मग सांगती जाहली मुग्ध ॥ वृत्त तयांचें ॥७०॥

गंगा ह्नणे रायासी ॥ हे तरी आहेत अष्टवसु ॥ यांचा तोडिला शापपाशु ॥ येणे गुणें ॥७१॥

मग ते मागील सर्वकथा ॥ देवी सांगे नृपनाथा ॥ आणि ह्नणे मी स्वर्गसरिता ॥ भाळलें तुह्मां ॥७२॥

ह्नणोनि यांचे तोडिले पाशु ॥ स्वर्गा धाडिले अष्टवसु ॥ परी तुह्मां भोगेल अंशु ॥ पुत्र येक ॥७३॥

ऐसीं भरतां वर्षे छत्तिस ॥ ते गगना गेली डोळस ॥ तेणें मन जाहलें उदास ॥ शंतनूचें ॥७४॥

मग कोणे एके अवसरीं ॥ राव आला गंगातीरीं ॥ तंव तो देखिला नेत्रीं ॥ भीष्मदेव ॥७५॥

राव पाहे जंव दृष्टीं ॥ तंव गंगा जातसे उलटी ॥ भीष्में बांधिला शरपुटीं ॥ वीघ तीचा ॥७६॥

कुमरासि राव पुसे कौतुकीं ॥ तुवां गंगा बांधिली कां निकी ॥ तंव तो गेला उदकीं ॥ क्षणमात्रें ॥७७॥

परि तया धरोनि करीं ॥ गंगा आली तटावरी ॥ रायासि ह्नणे अवधारीं ॥ पुत्र तुझा हा ॥७८॥

हा सर्वविद्याअनुकूळ ॥ पितृसेवेसि अळिउळ ॥ भक्तिरसाचा प्रेमळ ॥ होईल जाण ॥७९॥

परशुराम आणि शुक्रू ॥ वसिष्ठ आणि देवगुरु ॥ यांपासाव शस्त्रमंत्रू ॥ लाधेल सकल ॥८०॥

ह्नणोनि दीधला रायाचे करीं ॥ मग अदृश्य जाहली सुंदरी ॥ तो भीष्म आणिला हस्तनापुरीं ॥ शंतनूनें ॥८१॥

ऐसें तया राज्य करितां ॥ चाळीस वर्षे गेलीं भारता ॥ तंव शंतनू जाहला निघता ॥ व्याहाळीसी ॥८२॥

वनीं राव खेळतां व्याहाळी ॥ सुगंध आला परिमळीं ॥ पाहे तंव देखिलीं बाळी ॥ नावेवरी ॥८३॥

तयेची देखोनियां आकृती ॥ आणि परिमळाची वस्ती ॥ मग तो भ्रमला भूपती ॥ विरहें तेणें ॥८४॥

राव ह्नणे वो सुंदरी ॥ तुवां बांधावी माझी गळसरी ॥ निश्वर्यै राणी हस्तनापुरीं ॥ होई वेगें ॥८५॥

तंव ते ह्नणे धरीं धीर ॥ दास नामें आहे ढीवर ॥ तो माझा पिता जाणे विचार ॥ स्वयंवराचा ॥ ॥८६॥

मग तिचिये उत्तरावरी ॥ राव आला दासाचे मंदिरीं ॥ ह्नणे तुझी कन्या नोवरी ॥ द्यावी मज ॥८७॥

तयासि ह्नणे तो ढीवर ॥ तूं महाराज आहेसि थोर ॥ परी माझा ऐकें विचार ॥ दुर्बळाचा ॥८८॥

येक असे जी विचार ॥ या कन्येस होईल जो पुत्र ॥ तोचि करावा नृपवर ॥ हस्तनापुरींचा ॥८९॥

तुह्मी राजे महासमर्थ ॥ घरीं स्त्रिया पुत्र बहुत ॥ तरी राज्यधर करीन इचा सुत ॥ ऐसी भाष देइंजे ॥९०॥

मनीं विचारी नरेंद्र ॥ भीष्मासारिखा धनुर्धर ॥ तो असतां ज्येष्ठ पुत्र ॥ सांकडेम थोर हैं ॥९१॥

ह्नणोनियां उपजली खंती ॥ राव आला हस्तनावती ॥ तंव भीष्म बोले ताता कांती ॥ कोमाइली कां ॥९२॥

मग सांडोनियां उश्वास ॥ ह्नणे येका नेत्रीं नव्हे डोळस ॥ तैसा एकापुत्रें अखंड वंश ॥ न ह्नणावा कीं ॥९३॥

आणिक येक अवधारीं ॥ तूं धनुर्धर महाक्षेत्री ॥ वीरां मिळालिया समरीं ॥ न देसी पाठी ॥९४॥

परि वाटतें येक दुस्तर ॥ ह्नणोनि कोमाइलें वक्त्र ॥ तुज नाहींत सहोदर ॥ सवंगडे पुत्रा ॥९५॥

मग तें आणोनियां मना ॥ भीष्म पुसे प्रधानजना ॥ ते ह्नणती गंगानंदना ॥ ऐकावें जी ॥९६॥

आह्मां पारधी हिंडता ॥ रायें देखिली येक कांता ॥ तयेसि देखोनि अवस्था ॥ उपजली राया ॥९७॥

ते असे गा नोवरी ॥ दासाढीवराचे घरीं ॥ आतां ते करावी सत्वरी ॥ माता तुवां ॥९८॥

मग तो निघे गंगासुत ॥ योजनगंधेचा धरोनि हेत ॥ ऐसा आला पाहत पाहत ॥ ढीवराजवळी ॥९९॥

ह्नणे आगा ये ढीवरा ॥ माझा पिता असे नोवरा ॥ त्यासी देई हे सत्वरा ॥ कन्या तुझी ॥१००॥

सुगंधा हे सत्यव्रता ॥ तुवां माझी करावी माता ॥ ढीवरा कांही न करीं चिता ॥ कुमारिकेची ॥१॥

मग ह्नणे तो नावकर ॥ भीष्मा येक ऐकें विचार ॥ इयेचे पुत्र ते किंकर ॥ करुं पाहसी किं ॥ ॥२॥

तुज असतां ज्येष्ठसुता ॥ तेथें कोण राज्यभोक्ता ॥ ह्नणोनि वाटे परम चिंता ॥ भीष्मा मज ॥३॥

मग बोले गंगाकुमर ॥ इयेसी जो होईल कुमर ॥ तोचि करीन राज्यधर ॥ हे भाष माझी ॥४॥

ऐकोनि बोले ढीवर ॥ तूं सत्यवचनी निर्धार ॥ परी तुझे होतील पुत्र ॥ ते घेतील राज्य ॥५॥

भीष्म ह्नणे तरी अवधारीं ॥ मी न करीं गा अंतुरी ॥ गंगेसमान सकळा नारी ॥ असती मज ॥६॥

ह्नणोनि दीधला भाषकर ॥ मग संतोषला पैं ढीवर ॥ कन्या निरवूनि नमस्कार ॥ केला भीष्मदेवातें ॥७॥

ते रथीं वाहोनि नोवरी ॥ भीष्में आणिली गजपुरीं ॥ लग्न लाविलें सत्वरीं ॥ शंतनूसीं ॥८॥

मग बोले गंगासुत ॥ मी असें स्त्रीपुत्रविरहित ॥ मज द्यावाजी मोक्षार्थ ॥ पितृराया ॥९॥

भारता ऐसा तो पितृभक्त ॥ ब्रह्मचारी सत्यव्रत ॥ तंव पुष्पें वर्षला सुरनाथ ॥ भीष्मावरी ॥११०॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ अपूर्व वर्तली येकी कथा ॥ बाळपणीं प्रसवलीं व्याससुता ॥ हेचि कन्या ॥११॥

तंव जन्मेजय बोले वचन ॥ हे उपजली कवणे गुणें ॥ व्यास जन्मला तें वर्तमान ॥ सांगें मज ॥१२॥

आणि ते ढीवरकन्या सत्यवती ॥ तिचिये अंगीं सुगंधप्राप्ती ॥ कां जाहली तें मजप्रती ॥ सांगा मुनी ॥१३॥

आतां असो हा गंगावंश ॥ भीष्म जाहला तापस ॥ ते पुढें कथा असे सुरस ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ शंतनुविवाह परिकरु ॥ अष्टमोऽध्यायीं कथियेला ॥११५॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP