श्रीगणेशाय नमः
वैशंपायन ह्नणती गा भूपती ॥ तुवां पुशिली आदिशक्ती ॥ तरी ऐक पां येकचित्तीं ॥ जन्मेजया आतां ॥१॥
ते निरंतरी नारायणी ॥ जे पढिजे वेदपुराणीं ॥ जगद्वंद्य त्रिभुवनीं ॥ महाशक्ती ॥२॥
तरी तें ऐक गा भूपती ॥ शेषशयनीं होता जैं श्रीपती ॥ क्षीरसागरीं कल्पांती ॥ योगनिद्रे ॥३॥
अठ्ठावीसयुगेंवरी ॥ देव निद्रिस्थ क्षीरसागरीं ॥ तंव दैत्य उदेले कर्णद्वारीं ॥ मळास्तव ॥४॥
ते मधुकैटभ गा दोनी ॥ पराक्रमी जाहले अवनीं ॥ अवलोकूं लागले नयनीं ॥ दिशा चारी ॥५॥
तंव पद्मनाभ कमळदळीं ॥ ब्रह्मा देखिला वीरयुगुळीं ॥ मग तयावरी चालिले बळी ॥ मारावयासी ॥६॥
तंव विरिंचीनें सांडोनि आसन ॥ भेणें केलें पलायन ॥ वेगें धांवोनि आला आपण ॥ विष्णुजवळी ॥७॥
भेणें जाहला शरणागत ॥ परि विष्णु असे निद्रिस्थ ॥ मग होवोनि भयभीत ॥ मांडिला धांवा ॥८॥
मग त्या योगमायेची स्तुती ॥ चौंमुखें बोले भारती ॥ ह्नणे जयजयवो आदिशक्ती ॥ योगनिद्रे ॥९॥
जय ईश्वरी जगदोद्धारी ॥ स्वाहास्वधा वषट्रकारी ॥ स्वरात्मके अक्षरसिद्ध परात्परी ॥ जय परमेश्वरीं तूं ॥१०॥
जय ईश्वरी जगदोद्धारे ॥ स्थितिसंहारमहारौद्रे ॥ जय माहेश्वरी योगनिद्रे ॥ जय भगवती ॥११॥
तूं तिन्ही मुख्य मातृक ॥ आणि अर्धमात्रा अशेषा ॥ तूं संध्या सावित्री अंबिका ॥ देवजननी ॥१२॥
तूं वो विष्णुचें तुल्य तेज ॥ विश्वधारिणी महाबीज ॥ विश्वपाळणी आनंदभोज ॥ सर्वरुपे ॥१३॥
सृष्टिसंहार तूंचि स्थिती ॥ महाविद्या तूं महामती ॥ जगन्माता शुभ शांती ॥ तूं परमानंदे ॥१४॥
तूं महामाय महादेवी ॥ महामेधा श्रीशांभवी ॥ जय लज्जा बुद्धि भैरवी ॥ श्रीईश्वरी तूं ॥१५॥
पुष्टि तुष्टि महास्मृती ॥ तूं महामोहा भगवती ॥ परिधायुधा महाशक्ती ॥ कीतिंघोरे घोर तूं ॥१६॥
सौम्या सौम्यवारा शंखिनी ॥ भैरवी चंडी परमंदिनी ॥ सर्वशक्ती चक्रिणी ॥ तूं योगमाया ॥१७॥
मधुकैटभ कर्णजात ॥ महादुष्ट ब्रह्मघात ॥ तरी करीं माये जागृत ॥ नारायणा ॥१८॥
तूं अखिल चापिनी बाणिनी । तू अजित भूतांतकारिणी ॥ उदोकारिणी कौलिनी ॥ नारायणा उठवी कां ॥१९॥
महाजळशयनीं श्रीपती ॥ तुवां केला सविस्मृती ॥ तरी निघें वो शीघ्रगती ॥ खेचरे तूं ॥२०॥
ऐसी स्तवितां योगनिद्रा ॥ तंव बाहू नासिक मुख नेत्रां ॥ ऊरु हदयापासाव सुंदरा ॥ निघाली हरीचे ॥२१॥
ऐसी ते शक्ती तामसी ॥ विभक्त जाहली प्रयासीं ॥ तो जागृत झाला हषीकेशी ॥ तये वेळीं ॥२२॥
मग ब्रह्मा करी स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥ मधुकैटभ भातले दुर्मती ॥ मी भ्यालो तयांतें ॥२३॥
यांची करिसी गा शांती ॥ तरी प्रजा रचीन क्षितीं ॥ ऐकोनि चालिला श्रीपती ॥ तयांवरी ॥२४॥
हाक दीधली शारंगधरें ॥ तंव ते आले श्रवणमात्रें ॥ मग सोडिली गदाचक्रें ॥ नारायणें ॥२५॥
परि तें हरीचें गदाचक्र ॥ त्यासी लागलें जेवीं शमीपत्र ॥ बाण मोडिले लक्ष सहस्त्र ॥ गोविंदाचे ॥२६॥
अस्त्रे शस्त्रे न चले कांही ॥ ह्नणोनि आदळला ऊरबाही ॥ परी गोविंद केला दोहीं ॥ खेदक्षीण ॥२७॥
ऐसें पंचसहस्त्रवर्षेवरी ॥ युद्ध जाहलें परस्परीं ॥ मग आठवली मुरारी ॥ बुद्धि येक ॥२८॥
हरि ह्नणे हो महावीरा ॥ प्रसन्न जाहलों मागा वरा ॥ तंव मोहितसे योगनिद्रा ॥ हदय त्यांचे ॥२९॥
ते ह्नणती बंधु दोन्ही ॥ तूं याचक आह्मीच दानी ॥ मागमाग रे चक्रपाणी ॥ वल्लभ तुज जें ॥३०॥
तेव्हां हरि ह्नणे आपण ॥ मज द्यावे तुह्मीं आपुले प्राण ॥ ते ह्नणती ॥ वांचोनि जीवन ॥ घेइं देवा ॥३१॥
मग देवं जाणोनि सांकडी ॥ उचलिली आपुली मांडी ॥ तेथें धरोनि दुखंडी ॥ केलीं धडशिरें ॥३२॥
त्यांचिया मेदें करोनी ॥ जळ मुरोनि जाहली धरणी ॥ तेचि हे जाणिजे मेदिनी ॥ मेदास्तव ॥३३॥
आतां असो हे योगनिद्रा ॥ ब्रहयानें स्तविली ते भद्रा ॥ तैं वधिलें सहोदरां ॥ मधुकैटभांसी ॥३४॥
असो सृष्टी झालिया सर्वत्रा ॥ तंव दैत्य उदेला दुसरा ॥ महिषासुर नामें चराचरा ॥ अजिंक्य जो ॥३५॥
तेणें मृत्युपाताळभूपती ॥ देवांसहित सुरपती ॥ जिंकोनि घेतली अमरावती ॥ दैत्यें तेणें ॥३६॥
ऐसे येक दिव्यसंवत्सरु ॥ इंद्र आणि महिषासुरु ॥ झुंजतां पळाला देवगुरु ॥ भयास्तव ॥३७॥
मग चंद्र सूर्य दिशापती ॥ त्यांनीं टाकिली अंगशक्ती ॥ पळोनियां भयभीत होती ॥ असुरभेणें ॥३८॥
मग महाविष्णूसि त्वरित ॥ देव जाहले शरणागत ॥ ह्नणती महिषासुरें घेतलें समस्त ॥ राज्य आमुचें ॥३९॥
जयजयाजी चक्रधरा ॥ वेगीं वधीं या महिषासुरा ॥ तुजवांचोनियां दुसरा ॥ वधील कोण ॥४०॥
ऐसी देवांची ऐकतां गोष्टी ॥ देवें चढविली ऊर्ध्वभृकुटी ॥ क्रोध वाहिला ललाटीं ॥ उग्ररुपें ॥४१॥
तेणें विष्णुचे वदनीं ॥ तामसी उपजली कामिनी ॥ महादीप्ती मदभेदिने ॥ दैत्यकुळाची ॥४२॥
तैशाचि विरिंचिरुद्राचें वदनीं ॥ शक्ती निघाल्या गा दोनी ॥ महातेजरुपा गगनीं ॥ प्रकाशक ॥४३॥
आणिकही देव इंद्र समस्त ॥ यांचीं तेजें निघालीं अद्भुत ॥ कुंकुमवर्ण लोहित ॥ तीव्र पैं ॥४४॥
मग तीं येकवटलीं समस्त ॥ मुखापासाव धगधगीत ॥ जाणों इंद्रगोपांचे पर्वत ॥ अग्निरुपें ॥४५॥
तया तेजांचें अभ्यंतरीं ॥ येकी उदेली खेचरी ॥ जे आद्यशक्ती आदिकुमरी ॥ योगनिद्रा ॥४६॥
रुद्रापासाव तिचें वदन ॥ सौम्यदेवापासाव स्तन ॥ तिन्हीअग्नींपासाव नयन ॥ जाणा तयेचे ॥४७॥
यमरायापासाव केश ॥ विष्णुतेजाचे बाहु निर्दोष ॥ वरुणापासाव घोर वास ॥ जाहलें राया ॥४८॥
नितंब तो देवतेजांशु ॥ इंद्राचा दंडप्रदेशु ॥ करांगुळिया अष्टवसु ॥ सूर्य अंगोळिका ॥४९॥
विरंचीपासाव चरण ॥ वायुतेजाचे जाहले श्रवण ॥ प्रजापतीचे दिव्यदशन ॥ नासिक कुबेराचें ॥ ॥५०॥
आणिक अन्यतेजांचें सहज ॥ सर्वदेवांचें रुपबीज ॥ तें पाहतहोते ठेले चोज ॥ ब्रह्मादिसर्व ॥५१॥
मग आपुलालीं शस्त्रें सकळ ॥ त्रिशूळापासाव त्रिशूळ ॥ तें दीधलें महाबळ ॥ रुद्रदेवें ॥५२॥
चक्रापासाव सुदर्शन ॥ तें विष्णुनें दीधलें जाण ॥ पवनें दीधले धनुष्यबाण ॥ शक्ति अग्नि देत ॥५३॥
वज्रापासाव जें वज्र ॥ तें पुरंदरें दीधलें तीव्र ॥ घंटा दीधली अतिघोर ॥ ऐरावतीनें ॥५४॥
तेजाळ खङ्ग दीधलें काळें ॥ प्रजापती देत अक्षमाळे ॥ अर्धचंद्र कंकणें कुंडलें ॥ चूडामणीचीं ॥५५॥
रोपकूप दीधला सवितें ॥ कमंडलू वाहिला विधातें ॥ सिंहरत्न दीधलें हिमवंतें ॥ समुद्रें अमल कमळमाळा ॥५६॥
हारअंबर क्षीरसागरें ॥ फरश मुद्रिका देवसुतारें ॥ मद्यपात्र दीधलें कुबेरें ॥ आणि वारुणी पैं ॥५७॥
सर्पंहार वाहिला मेदिनीं ॥ शेषें दीधला महामणी ॥ ऐसी शोभागळी योगीनी ॥ महाशक्ती ते ॥५८॥
तिचा देखोनि श्रृंगार ॥ देवीं केला जयजयकार ॥ तंव येरीनें शब्द केला गंभीर ॥ तेणें उचंबळला सागरु ॥५९॥
नादें दुमदुमिलें अंबर ॥ हाह घेघे महाघोर ॥ तें ऐकोनियां असुर ॥ सन्नद्धले ॥६०॥
तंव समस्त दैत्यजाती ॥ दृष्टीं देखती आदिशक्ती ॥ मग चालिले आयतीं ॥ आपुलालिया ॥६१॥
तंव पुढां आला हाकित ॥ चक्षुर नामें महादैत्य ॥ सहापद्में रथांसहित ॥ आला तेथें ॥६२॥
असिलोमा महावीरु ॥ पन्नासअयुतेंपरिवारु ॥ उदग्राक्ष दैत्य थोरु ॥ पायदळीया ॥६३॥
बाहाळिका वीरा सांगातें ॥ अश्व गज जाहलीं गणितें ॥ साहोत्तरशत अयुतें ॥ रथ येककोटी ॥६४॥
व्रतकाळ पन्नास अयुते ॥ अर्धकुंजर अर्धयुतें ॥ आणि पन्नाससहस्त्र अयुतें ॥ बिडाळाक्षाचे ॥६५॥
मग कोटीकोटी रथउभार ॥ घेवोनि आल महिषासुर ॥ भेणें लपाला देवभार ॥ शक्ति मागें ॥६६॥
पृथ्वीं दाटलें दैत्यकुळ ॥ रजें दाटलें नभमंडळ ॥ सागरीं डहुळे समुद्रजळ ॥ वातयोगें ॥६७॥
ऐसी देखोनि दैत्यजाती ॥ मग आवेशली आदिशक्ती ॥ तंव हस्त गेले दिशांप्रती ॥ सहस्त्र येक ॥६८॥
चरण असतां धरणीं ॥ मुकुट लागला गगनीं ॥ त्रिकाळरुपें निर्वाणी ॥ दीधली हाक ॥६९॥
धनुष्या करोनि टणत्कार ॥ हाहाशब्दें महाघोर ॥ ऐसें देखोनि दैत्यभार ॥ सरसावला पुढें ॥७०॥
उठावले दैत्यभार ॥ शंख भेरी आणि डंबर ॥ अश्व पदाती रथ कुंजर ॥ भयानक ॥७१॥
मग धनुष्या लावोनि शर ॥ विंधितेजाहले असुर ॥ जाणों जैसे जळधर ॥ वर्षताती ॥७२॥
तोमर भिंडिमाळा फरश ॥ शक्ती मुसळ खङ्ग पट्ठीश ॥ हाणिताती बहुवस ॥ अंबिकेसी ॥ ॥७३॥
तें जाणोनियां संधान ॥ भयभीत जाहले देवगण ॥ कीं अग्नीसि देखतां पुष्पवन ॥ कोमे जैसें ॥७४॥
खङ्गें खेटकें तोमरें ॥ येक हाणिती प्रचंड चक्रें ॥ येक हाणिती तरुवरें ॥ उपटोनियां ॥७५॥
मग कोप आला त्रिलोचने ॥ घेघे ह्नणोनि ग्रासी दैत्यसेने ॥ तंव अट्ठाहास्य केलें पंचाननें ॥ भयंकरु ॥७६॥
तेणें भ्याली दैत्यसेना ॥ कंप सुटला त्रिभुवना ॥ मग धनुष्या लावोनि बाणा ॥ चालिली शक्ती ॥७७॥
जाणों कोपला प्रळयकाळ ॥ तैसा शस्त्रीं जाहला आदळ ॥ मग जाहला पळापळ ॥ दैत्येसेनेसी ॥७८॥
तंव धांवले सुरवर ॥ घेघे ह्नणती येकसर ॥ रणीं पाडिले हयकुंजर ॥ असंख्यात ॥७९॥
खङ्ग बाणीं परशुशक्तीं ॥ दैत्य वधिले तेजमूर्ती ॥ येक फोडिले नखदांतीं ॥ पंचाननें ॥८०॥
कितीयेक चेपिले चरणीं ॥ येक दुखंड केले धरणीं ॥ शोणित घेतसे वदनीं ॥ येकावीराचें ॥ ॥८१॥
येक टोंचिले त्रिशूळें ॥ कित्येक मर्दिले बाहुबळें ॥ येक शरणागत जाहले ॥ चरणावरी ॥८२॥
येक विदारिले नखदांतीं ॥ येक कंबधें रणीं नाचती ॥ घेघे ह्नणोनि हाणिती ॥ देव तेथें ॥८३॥
रणीं लोटले रक्तपूर ॥ वाहत चालिले कुंजर ॥ मग देवीं केला जयजयकार ॥ अंबिकेसी ॥८४॥
आनंदें नाचती अप्सरा ॥ हातीं घेवोनि शंखपात्रा ॥ योगिणी प्राशिती सुरसुरां ॥ अशुद्धातें ॥८५॥
क्रीडा करितीए रणचक्रीं ॥ हातीं घेवोनियां वक्रीं ॥ नाचती त्या रणरक्तपूरीं ॥ आनंदोनी ॥८६॥
एके वीरांचीं धडमुंडे ॥ सिंह विदारी नखतोंडें ॥ ऐसी रणीं खेळती कोडें ॥ चेंडूफळी ॥८७॥
कीं अग्नि लागतां तृणवन ॥ क्षणामाजी होय दहन ॥ तैसें नाशिले दैत्यसैन्य ॥ कुमारिकेनें ॥८८॥
मग समस्त देवगणीं ॥ जयजयकारें केली ध्वनी ॥ आणि वर्षाव केला सुमनीं ॥ आनंदसीं ॥८९॥
ऐसा देखोनि संहार ॥ परम कोपला महिषासुर ॥ मग घेवोनि मुख्यभार ॥ निघाला आपण ॥९०॥
वर्षता जाहला बाणयंत्र ॥ जैसे मेरुवरी जळधर ॥ तैसे मांडिलें दुस्तर ॥ युद्ध दोघां ॥९१॥
तंव बाहुलक नामें असुर ॥ हत्तीवरी होवोनि स्वार ॥ देवीसि केला प्रहर ॥ परशुघातें ॥९२॥
तंव शक्तीनें केला हुंकार ॥ तेणें लोटला कुंजर ॥ उरीं हाणितला असुर ॥ त्रिशूळघातें ॥९३॥
त्यासि धरुनियां कुरळी ॥ भूमी मर्दिला अतुर्वळी ॥ गज विदारिला करकमळीं ॥ पंचाननें ॥९४॥
मग धांवला बिडालाक्ष ॥ जो वाटिवेचा महादक्ष ॥ हाती घेवोनियां वृक्ष ॥ धांवला तो ॥९५॥
त्राणें हाणितसे आदिमाते ॥ तंव सिंहें गवसिला चपेटघातें ॥ कंठ फोडोनि अंत्रपातें ॥ काढिली बाहेरी ॥९६॥
सर्वेचि विंधिला कुमारीं ॥ तया दाविली यमपुरी ॥ हातचपेटे देतसे केसरी ॥ दैत्यावरी ॥९७॥
तंव उग्राक्ष महाबळी ॥ हाणीत चालिला मुसळीं ॥ त्यांतें हाणूनियां त्रिशूळी ॥ मारीत देवी ॥९८॥
मग उठिला महिषासुर ॥ महाप्रतापीया गिरिवर ॥ भेणें मोडला देवभार ॥ पाहतांची ॥९९॥
येका हाणी चरणखुंरी ॥ येका घालितसे वक्रीं ॥ येकाचे रोवी उदरीं ॥ महाश्रृंगें ॥१००॥
रणीं करीतसे हुषरवा ॥ तेणें पळ सूटला देवां ॥ मग चालिली शांभवा ॥ तयावरी ॥१॥
दोहींसि जाहला आदळ ॥ जाणों मिळाले मंदराचळ ॥ पृथ्वी होतसे कल्होळ ॥ जंतुजीवां ॥२॥
येकमेकां घनसांबळ ॥ घालिताती खङ्ग त्रिशूळ ॥ परि सिंह जाहला व्याकुळ ॥ तये वेळीं ॥३॥
नक्षत्रें लोटती गगनीं ॥ तैशा तिडकिया पडती अवनीं ॥ आणि दिशा पेटल्य वन्ही ॥ झुंजें तेणें ॥४॥
देवीनें हातीची घेवोनि सुरा ॥ ते पाजिली वाहना मृगेंद्रा ॥ ह्नणे धरीं धरीरें पुत्रा ॥ महिषासुरातें ॥५॥
तें जाणोनि पंचाननें ॥ महिष धरिला मुखें माने ॥ सर्वेचि हाणिला त्रिनयने ॥ त्रिशूळघातें ॥६॥
मग फिरवोनियां चक्र ॥ चारी छेदिले चरणकर ॥ तंव उदरीं घातलें दिव्यशस्त्र ॥ महाशक्तीनें ॥७॥
श्रृंगें टांकी पर्वतावरी ॥ रुंड पुच्छ टाकी सागरीं ॥ चर्म दरींत टाकिलें सत्वरीं ॥ महिषासुराचें ॥८॥
रक्तमांसाचे मदगळें ॥ दिशा दाटल्या वागुळें ॥ मग शंख डोर त्राहाटिले ॥ महादेवीनें ॥९॥
आपण घेवोनियां मदिरा ॥ आनंदें डोले सुंदरा ॥ ह्नणे वारुणी घेघे पुत्रा ॥ पंचानना तूं ॥११०॥
भारता ऐसा तो महिषासुर ॥ सर्व गोत्रेंसी परिवार ॥ तयाचा रणीं केला संहार ॥ चंडरुपें ॥११॥
जैसा धातूचा चुरा ॥ चुंबकें गवसिती झारा ॥ तैसें कुळ वधी सुंदरा ॥ महिषासुराचें ॥१२॥
कीं सिंह गजातें विध्वंसी ॥ नातरी इंधना अग्नि ग्रासी ॥ तैसे दैत्य मर्दिले तामसी ॥ देवतेनें ॥१३॥
आतां असो हा महिषासुर ॥ देवीं केला जयजयकार ॥ तैं स्तविता जाहल इंद्र ॥ तयेतें पैं ॥१४॥
शरण होवोनि सुरपती ॥ ह्नणे जयजय हो विश्वमूर्ती ॥ आदिमाये तेजस्फूर्ती ॥ भक्तवत्सले ॥१५॥
तूं अतुर्बळी जगपाळिणी ॥ जय असुरसंहारिणी ॥ बुद्धी लक्ष्मी गुणवर्धिनी ॥ तूंचि देवी ॥१६॥
क्रिय मद आणि दुष्कृती ॥ त्यांतें दुष्टबुद्धी अंतर्गती ॥ येका घालिसी नरकपातीं ॥ तूंचि देवी ॥१७॥
तूं सर्वाद्य मूळपीठिका ॥ तूंचि देवी त्रिगुणात्मिका ॥ तुझा पार हरिहरादिकां ॥ नलागेची ॥१८॥
तूं सर्वाधार अंसभूत ॥ तूं आपपराहूनि व्यक्त ॥ तूं सकळांसी अससी व्याप्त ॥ आदिमाये ॥१९॥
तूं रणयागाची पद्धती ॥ दैत्यांच्या घेवोनि आहुती ॥ स्वाहास्वधाकारें तृप्ते ॥ केली पितरां ॥१२०॥
योगी अभ्यासिती तत्वज्ञान ॥ ते तूं महाशक्ती कारण ॥ मोक्षपदाचें निजभुवन ॥ भगवती तूं ॥२१॥
ऋग्वेद अथर्वण साम ॥ यजुर्वेद पराक्रम ॥ रहस्याक्रिया आदिधर्म ॥ तूंचि देवी ॥२२॥
वाचा मेधा त्रयी भगवती ॥ तूं विज्ञान धन यश कीर्ती ॥ सर्वशास्त्र सारयुक्ती ॥ भवतारणे तूं ॥२३॥
हास्यवदनी चंद्रवदनी ॥ गौरी दुर्गा पद्मलोचनी ॥ कनककांती कामिनी ॥ सिंहासने तूं ॥२४॥
जे तृतें वो आराधिती ॥ त्यांतें धन राज्य संपत्ती ॥ संतती आणि अवसानीं मुक्ती ॥ देसी तयां ॥२५॥
तुझें जाहलिया स्मरण ॥ तेथें दुरिता कैचें राहाण ॥ आणि करिसी निवारण ॥ महारौरवांचें ॥२६॥
मग इंद्रदेव सहपरिवारीं ॥ नमन करोनि उभयकरीं ॥ ह्नणती रक्ष वो शस्त्रास्त्रीं ॥ चंडिके तूं ॥२७॥
खङ्ग घंटा आणि त्रिशूळ ॥ धनुष्य बाण मुसळ ॥ शक्ती खेटक लांगूल ॥ घेवोनि रक्षीं आह्मांतें ॥२८॥
प्राचीभागीं रक्षीं अंबिके ॥ पश्चिमे उत्तरे काळिके ॥ दक्षिणे रक्ष वो चंडिके ॥ सर्वदा पैं ॥२९॥
मग अन्न गंध दिव्यसुमनीं ॥ पूजा वाहिली सुरगणीं ॥ सानंदें लागली वाद्यध्वनी ॥ महावाद्यांची ॥१३०॥
मागुती विनवी सुरपती ॥ आह्मां मांडेल जैं विपत्ती ॥ तैं व्यथा हरावी त्वरितीं ॥ येवोनि माते ॥३१॥
तंव देवांसि बोले शक्ती ॥ गौरीपासाव जन्मेन मागुती ॥ तैं येईन शीघ्रगती ॥ धांवोनियां ॥३२॥
आतां न करीं गा चिंता ॥ सुखें राज्य करीं सुरनाथा ॥ मग अदृश्य जाहली देवता ॥ महाशक्ती ॥३३॥
ऐसें देवां राज्य करितां ॥ काळ क्रमिला गा भारता ॥ मागुती उत्पत्ती जाहली दैत्यां ॥ शुंभ निशुंभां ॥३४॥
शुंभ निशुंभ सहोदर ॥ ते हिरण्याक्षाचे कुमर ॥ त्याहीं तप केलें संवत्सर ॥ अयुत एक ॥३५॥
मुखीं मौन ब्रह्मचारी ॥ भूमिशय्य निराहारी ॥ तिहीं स्तविला नानापरीं ॥ ब्रह्मदेव ॥३६॥
ब्रह्मा ह्नणे जाहलों प्रसन्न ॥ मागामागा हो वरदान ॥ तुमचे करीन परिपूर्ण ॥ मनोरथ ॥३७॥
तंव ते बोलती असुर ॥ आह्मीं जिंकावे जगत्र ॥ पुरुष मात्रा असो शरीर ॥ अवध्य आमुचें ॥३८॥
तंव ब्रह्मा ह्नणे तथास्तु ॥ तुमचा पुरेल मनोरथू ॥ मग मस्तकी ठेवोनि हातु ॥ गेला विरिंची ॥३९॥
असुरीं पावतां वरदान ॥ प्रौढीनें जिंकिलें त्रिभुवन ॥ अमरावतीचें राज्य संपूर्ण ॥ घेतलें हिरोनी ॥१४०॥
त्रिदशेश्वर देव समस्त ॥ इंद्राचे भाग यागभुक्त ॥ दिक्पाळ फेडोनि भृत्य सुत ॥ स्थापिले तेथें ॥४१॥
इंद्र चंद्र आणि दिनकर ॥ फेडोनि व्यापिले किंकर ॥ ऐसें राज्य करिती असुर ॥ बहुकाळ पैं ॥४२॥
इकडे दीनवदनें समग्रा ॥ देव गेले हिमगिरीपाठारा ॥ तेथें वृत्त कथिलें नरेंद्रा ॥ हिमवंतासी ॥४३॥
कीं आमुचें राज्य अमरावती ॥ शुंभे घेतलें हो भूपती ॥ तरी ऐशा विघ्नाची शांती ॥ करीं कांहीं ॥४४॥
तंव तो पार्वतीचा पिता ॥ नाभीनाभी ह्नणे सुरनाथा ॥ आतां असुराचिया निःपात ॥ रचूं मंत्र ॥४५॥
असो तो राव हिमवंत ॥ त्रिपथगंगे जाहला स्त्रात ॥ ध्यान धरोनि जगन्नाथ ॥ वंदिला आधीं ॥४६॥
मग त्या अंबिकेची स्तुती ॥ करिता जाहला भूपती ॥ ह्नणे माते धांवें हो सुरपती ॥ गांजिला असुरीं ॥४७॥
नमो देवी महादेवी ॥ नमो भद्रायै शांभवी ॥ प्रकृति परायै शिवायै ॥ नमो नमो ॥४८॥
गौरी धात्री ज्योत्स्त्रायै ॥ सुखायै शांतायै ॥ भीमा भैरवी रौद्रायै ॥ नमो नमो ॥४९॥
तुज चंद्ररुपा नित्यायै ॥ सिध्यैककृष्णा करुणायै ॥ शुद्धी शांती पूर्णायै ॥ नमो नमो ॥१५०॥
कूर्मादुर्गा दुर्गपारायै ॥ लक्ष्मीनैऋ सर्वसारायै ॥ अतिसौम्या अतिरौद्रायै ॥ नमो नमो ॥५१॥
जगत्प्रतिष्ठे आचारनिष्ठे ॥ विष्णुवरिष्ठे नमो अरिष्टे ॥ दुष्कळकूटे सर्वमुकुटे ॥ नमो नमः ॥५२॥
सिद्धि बुद्धि आणि चेतना ॥ क्षुधा निद्रा आणि तृष्णा ॥ सर्वकारिणी सर्वगुणा ॥ स्वस्तिदा तूं ॥५३॥
क्षुधा क्षमा आणि इच्छा ॥ श्रत्धा मेधा दुजी हिंसा ॥ लज्जा आणिक तामसा ॥ स्वस्तीहि तूंची ॥५४॥
यशप्रज्ञा प्रजा जाती ॥ इंद्रियें देवता भ्रांती ॥ भूतरुपेण अधिष्ठाती ॥ संस्थिता तूं ॥५५॥
रती कांती आणि दया ॥ स्फूर्ती प्रज्ञा आणि माया ॥ लक्ष्मीरुपेण सर्वकार्या ॥ संस्थिता तूं ॥५६॥
ऐसें करितां स्तवन ॥ पार्वती हांसली आपण ॥ तंव काळिका निघाली मुखापासोन भयानक ॥५७॥
ते शरीरकोपापासाव शक्ती ॥ कृष्णवर्ण महादीप्ती ॥ ह्नणोनि काळिका बोलती ॥ तये लागीं ॥ ॥५८॥
ते पार्वतीबिंब केवळ ॥ जैसें स्फुलिंगा पासाव जाळ ॥ नातरी समुद्राचें जळ ॥ मेदिनीसी ॥५९॥
तैसी उदेली काळिका ॥ महासुंदर जगदंबिका ॥ ग्रासूं शकेल त्रिलोका ॥ क्षणामाजी ॥१६०॥
आतां असो हे वित्पत्ती ॥ नारद गेला स्वर्गाप्रती ॥ जेथें होते देवघाती ॥ शुंभनिशुंभ ॥६१॥
तो येतां जाणोनि मुनी ॥ दैत्यें सन्मानिला वचनीं ॥ नमन करोनियां आसनीं ॥ बैसविला तो ॥६२॥
मग शुंभ ह्नणे गा मुनी ॥ तुह्मी हिंडतां त्रिभुवनीं ॥ तरी अपूर्व देखिलें असेल तें वचनीं ॥ सांगा मज ॥६३॥
तंव ह्नणे ब्रह्मपुत्र ॥ तूं गा त्रिभुवनींचा दैत्येद्र ॥ निधिरावो आणि समुद्र ॥ भांडारी तुझे ॥६४॥
अश्व गज रथ पदाती ॥ प्रजा परिवार सखे संतती ॥ परी तुझे घरीं युवती ॥ नाहीं योग्य ॥६५॥
हेंचि कारण यावयाप्रती ॥ कीं तुझे घरीं नाहीं युवती ॥ ह्नणोनि लागली असे खंती ॥ अहर्निशी मज ॥६६॥
तरी ऐकें दैत्यटिळका ॥ हिमवंतीं आहे काळिका ॥ जीचे रुपावरोनि त्रिलोका ॥ सांडणें कीजे ॥६७॥
ते जरी तुज अनुसरे ॥ तरीच जन्म होईल साजिरें ॥ न ये तरी प्रौढीबलात्कारें ॥ आणावी तुवां ॥६८॥
तिसी सांगतां आडवचन ॥ कोण घेईल मोलें मरण ॥ परी देव इंद्रादिक जाण ॥ जिंकिले तुवां ॥६९॥
तिची सांगतां स्वरुपता ॥ वर्णितां विसरेल विधाता ॥ दग्ध जाहलिया मन्मथा ॥ माजवणें ती ॥७०॥
आंगीं तारुण्याची समरसा ॥ सकळकळा लोळती नवरसा ॥ मदन करितसे आशा ॥ लावण्याची ॥७१॥
ते सर्वगुणाची आथिली ॥ जाणों इंद्रनीळें ओतिली ॥ तैसी प्रभाकांती गा मिरवली ॥ काळिकेची ॥७२॥
तारुण्यें मोहरली वयसा ॥ मुखशोभा नाहीं शीताशा ॥ जाणों कृष्णपक्षींची निशा ॥ धम्मीळ माला ॥७३॥
वेढिला कावेचा पातळू ॥ बोटधारीचा पायघोळू ॥ मागें मिरवला अंचळू ॥ अरुणरंगें ॥७४॥
वरी मदवियेची कांचोळी ॥ बिरडें कसिलें मुक्ताफळीं ॥ त्या वरी मिरवे येकावळी ॥ नवरत्नांची ॥७५॥
मुखीं मिरवे तांबूल ॥ अधरु जाहले रातोत्पल ॥ द्विज रत्नें कीं अळिउळ ॥ मगले तैसे ॥७६॥
पक्कदाळिंबाचा गाभा ॥ तैसी वदनकळीची शोभा ॥ कीं मुखमांदुसेची नभा ॥ थोकवी बीज ॥७७॥
देखोनियां नितंब लोचन ॥ मृगकेसरीं धरिलें रान ॥ वेणी शोभली माथां कृष्ण ॥ पद्मिणी जैसी ॥७८॥
नासिकीं मुक्त डळमळी ॥ जाणों शुक्र शशिमंडळीं ॥ चंदन चर्चूनियां भाळीं ॥ रेखिलें कुंकुम ॥७९॥
भंवई जाणों कामकोदंड ॥ नयन बाणले कापखंड ॥ पातीं पातरिलें कळखंड ॥ अंजनाचें ॥१८०॥
कर्णी शोभलीं कनकपत्रें ॥ रत्नखचित नागोतरें ॥ फुलें भवरिया कनकेश्वरें ॥ मुक्तमंडित पैं ॥८१॥
माथां मोंतियांची जाळी ॥ अर्धचंद्र मिरवे भाळीं ॥ हदय मुहुरलें युगुळी ॥ प्रौढवयसेचे ॥८२॥
करीं कळाविया चुडे कंकणें ॥ मुद्रिका रत्नें सुलक्षणें ॥ नखें चंद्रासि आणोनि उणें ॥ दीधली वोप ॥८३॥
उदरीं मिरवे रोमरेख ॥ जाणों कृष्णवर्ण पिपीलिंका ॥ नाभिरंध्रींहूनि अधोमुखा ॥ अनुक्रमें ॥८४॥
कंठीं किंकिणी क्षुद्रघंटा ॥ किंकिणी कलिवरें पायवटा ॥ अंदुवांकीचिया बोभाटा ॥ वरी दशांगुळी ॥८५॥
गतीं पिसाटल्या हत्तिणी ॥ उपमा थोडकी पद्मिणी ॥ ऐसें अनुपम्य रत्न कामिनी ॥ काळिका ते ॥८६॥
ऐसी वर्णितां वनिता ॥ दैत्या उपजली विरहव्यथा ॥ जाणों अग्नि लागला पर्वता ॥ उष्णकाळीं ॥८७॥
ऐसी लावोनियां अवस्था ॥ नारद गेला गा भारता ॥ जेवीं कुंडीं खोवोनि कोलिता । जाय व्यसनी ॥८८॥
कीं गळीं खोवोनि आमिषा ॥ जिव्हे गंवसत असे मासा ॥ तैसा घालोनि कामपाशा ॥ गेला मुनी ॥८९॥
येथें कोप न करावा श्रोतां ॥ ह्नणाल वृथा वाढविली कथा ॥ तरी वोडविलीया उचिता ॥ चुकों नये ॥१९०॥
परी हें ठायीचें असे होणार ॥ जैं जालंधरासीं झुंजले सुर ॥ तैं दोघे शापिले असुर ॥ महारुद्रें ॥९१॥
तेथें मावेची करोनि पार्वती ॥ येरीं मारिली शस्त्रघातीं ॥ तैं शापिता जाहला पशुपती ॥ शुंभनिशुंभां ॥९२॥
अरे तामसा दुष्टा असुरा ॥ तुह्मीं मारिली मावेची भद्रा ॥ तरी तिचेचि पासाव यमपुरा ॥ पावाल तुह्मीं ॥९३॥
आतां असो हा नारदमुनी ॥ जो कळिलावा त्रिभुवनी ॥ तेणें अवस्थे लाविला कामबाणीं ॥ शुंभवीर तो ॥९४॥
आतां असो हे अवस्था ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ तें ऐकावें संतश्रोता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९५॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ काळिकाउत्पत्तिप्रकारु ॥ षोडशोऽध्यायीं सांगितला ॥१९९६॥ शुभंभवतु ॥