कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

पांचाळनगर प्रवेशतां ॥ व्यास भेटले पंडुसुतां ॥ ह्नणती भिक्षा मिळेल जी पार्था ॥ ती घेइंजे वांटोनियां ॥१॥

मग ते कुलालाचे घरीं ॥ पांडव राहिले अवधारीं ॥ तंव राय मिळाले सैंवरी ॥ द्रौपदीचे ॥२॥

बळिभद्र सात्यकी दुर्योधन ॥ शाल्व शकुनी आणि श्रीकृष्ण ॥ जयद्रथ बाल्हीक कर्ण ॥ विकर्णही आला ॥३॥

दुःशासन कीं दुःशील ॥ सुत आणि दुजा सबळ ॥ युयुत्सु आणि भीमबळ ॥ शतकौरव पातले ॥४॥

अंग वंग चीनभोट ॥ माळवे मलय मर्‍हाट ॥ तेलंगण गौड गंगातट ॥ कर्णाटकींचे सर्वही ॥५॥

झाडी गौड मारवाड ॥ द्राविड गांधार बंगाल ॥ कलिंग भोज कुंतल ॥ हिमाचळपाठारींचे ॥६॥

हे आदि करोनि समग्र ॥ राव मिळाले थोरथोर ॥ अश्व रथ नर कुंजर ॥ थोरथोर असंख्यात ॥७॥

झाली मंडपाची आयती ॥ द्रुपदें बोलाविले भूपती ॥ यथानुक्रमें कुळयाती ॥ बैसवी समस्त ॥८॥

ऐसे दिवस जाहले सोळा ॥ रायें केला महासोहळा ॥ मग घेवोनि आली माळा ॥ द्रौपदी ते ॥९॥

इकडे कुलाल ह्नणे पंडुकुमरां ॥ तुह्मीं जावें राजमंदिरा ॥ सैंवर पहावें परिकरा ॥ मिळेल भिक्षाही ॥१०॥

आणि धर्मासि ह्नणे जननी ॥ तुह्मीं जावें राजभुवनीं ॥ भिक्षा मिळेल ती वांटोनी ॥ घ्यावी समस्तीं ॥११॥

मग ते निघाले ब्रह्मचारी ॥ पुढें धर्म मागें चारी ॥ पंडु येकचि परी वेव्हारीं ॥ दिसती भिन्न ॥१२॥

ऐसे ठाकले मंडपातळीं ॥ महापंडित भगवीं लुगडी ॥ तो बळदेवास ह्नणे वनमाळी ॥ कीं हे पांडव वोळखें ॥१३॥

पैल धर्मामागें भीमसेन ॥ नकुळसहदेवांपुढें अर्जुन ॥ ते बळदेवासि दावी कृष्ण ॥ संकेत करुनी ॥१४॥

मग उभारिलें रायें यंत्र ॥ वरी लक्ष केलें विचित्र ॥ सभेसि ठेविले पांचशर ॥ राजवर्गी ॥१५॥

दृष्टद्युस्त्र ह्नणे नृपवरां ॥ या रंध्राआंतून वरील यंत्रा ॥ अधोदृष्टीनें पांचशरा ॥ भेदील जो ॥१६॥

त्यासीच हे द्रौपदी सुंदरा ॥ माळ घालील अवधारा ॥ ऐसें जटिल तापसी ऋषी नरेंद्रा ॥ झाला सांगत तो ॥१७॥

परि त्यां न घेववे मानसें ॥ कीं दृष्टीविण विंधावें कैसें ॥ लक्ष चुकेल तैं आपैसें ॥ झांकेल माथा ॥१८॥

ऋषिवाक्याहोनि उंचनीच ॥ तें ज्ञाते न मानिती साच ॥ ऋतुकाळेंवीण फोपस ॥ मेघ जैसे ॥१९॥

लटिकेंचि मत्स्ययंत्र बोलती ॥ हें बोलिलें असे प्राकृतीं ॥ परी व्यासदेव संस्कृतीं ॥ बोलिले नाहीं ॥२०॥

गवाक्षद्वारींहूनि लक्ष ॥ आणि छाया पाहोनि अधोमुख ॥ तें यंत्र भेदों न शके आणिक ॥ अर्जुनाविणें ॥२१॥

ऐसा रायें करितां विचार ॥ तंव क्रमिला येक प्रहर ॥ द्रौपदी करोनियां श्रृंगार ॥ आली मंडपीं ॥२२॥

तंव पार्थ करी अनुवादु ॥ धर्मा तूं आमुचा ज्येष्ठ बंधु ॥ तरी वाचे द्यावा प्रसादु ॥ लक्षभेदनाचा ॥२३॥

आपण कांहीं न करावी चिंता ॥ या रायां देखतां समस्तां ॥ आतां उजळ करीन माथा ॥ पंडुपितयाचा ॥२४॥

मग धर्म ह्नणे तथास्तु ॥ ऐकोनि उठिला वीरपार्थु ॥ कृष्णासि केला प्रणिपातु ॥ तें जाणती उभय ॥२५॥

पार्थें नमस्कारिलें धनुष्य ॥ आणि वामहस्तें पिटिले बाहुस ॥ मग चढविलेंसे संदिश ॥ धनुष्य तें ॥२६॥

उभा राहोनि अधोदृष्टी ॥ गगना वाहिली वाममुष्टी ॥ चाक्षुषी जपिन्नल सुभटी ॥ हदयामाजी ॥२७॥

मग शितीं लाविला बाण ॥ जैसी ब्रह्मरेखा नुलंघे प्रमाण ॥ तैसें लक्ष भेदोनि पण ॥ जिंकिला पार्थे ॥२८॥

मग जाहला जयजयकार ॥ द्रौपदीनें वरिला धनुर्जर ॥ पुष्पें वर्षला सुरेश्वर ॥ अर्जुनावरी ॥२९॥

तंव लागलीं निशाण भेरी ॥ मृदंग काहळा रणतुरीं ॥ परि राव लाजोनि झडकरी ॥ उठिले समस्त ॥३०॥

ते उठिले द्रुपदावरी ॥ ह्नणती हिरोनि नेऊं नोवरी ॥ कैसी राखतील भिकारी ॥ तें पाहुं आतां ॥३१॥

ह्नणोनि उठिले हाणित ॥ द्रुपदाची सेना भंगित ॥ नगरलोक जाहले भयाभीत ॥ आकांत घोर प्रवर्तला ॥३२॥

ऐशिये वेळीं राव पांचाळ ॥ भयें जाहला व्याकुळ ॥ श्वास सांडोनि तळमळ ॥ बैसला करित ॥३३॥

परि आवेशला अर्जुन ॥ जो अरिगजांवरी पंचानन ॥ पाठीं चालिला भीमसेन ॥ महाबाहो ॥३४॥

भीमेम द्रुम घेवोनि हातीं ॥ क्षणें झोडिले पदाती ॥ गजीं गज ह्नणोनि निर्धातीं ॥ फोडी गंडस्थळें ॥३५॥

मोडिले अश्व रथ स्वार ॥ हातीं सांपडे तेंचि घे अस्त्र ॥ इकडे अश्वरथांचा संहार ॥ करी अर्जुन ॥३६॥

विधित चालिला फाल्गुन ॥ जैसा प्रळयकाळींचा घन ॥ तंव उठावला वीर कर्ण ॥ पार्थावरी ॥३७॥

येक सूर्य येक शक्र ॥ तेथें काय बोलावें चरित्र ॥ परी अपराधिया निर्धार ॥ नाहीं जयो ॥३८॥

दोघे येकमेकां विंधिती ॥ बाणीं लोपविला गभस्ती ॥ ध्वजस्तंभ पाडिला खालती ॥ कर्णवीराचा ॥३९॥

मागुती हदयीं लाविला बाण ॥ तेणें विकळ गेला कर्ण ॥ मग न विंधीचि अर्जुन ॥ दुजिये बाणें ॥४०॥

कर्ण जाहलिया सावध ॥ अर्जुनासी करी अनुवाद ॥ तूं कोणगा प्रसिद्ध ॥ सांग मज ॥४१॥

मजसीं परशुराम कीं सुरपती ॥ हे कदाचित झुंजों शकती ॥ तंव अर्जुन बोले तयाप्रती ॥ कीं आह्मी द्विजोत्तम ॥४२॥

तो जाणोनियां ब्राह्मण ॥ मग मुरडला वीरकर्ण ॥ परी मनीं धरिला अभिमान ॥ वाटिवेचा ॥४३॥

मग ह्नणे दुर्योधन ॥ येणें आकळिला हा कर्ण ॥ जौ आपणातें अग्रगण्य ॥ महाबाहो ॥४४॥

तंव उठिला शाल्ववीर ॥ हांव धरोनियां फार ॥ त्यावरी धावला वृकोदर ॥ भयानक ॥४५॥

वृक्ष घातला भवंडोन ॥ शाल्वाचा रथ केला चूर्ण ॥ सारथी घोडियांचा प्राण ॥ वृक्षघातें घेतला ॥४६॥

तेणें शाल्व घातला तळीं ॥ मग दोघे मिसळले केशकवळीं ॥ हाणिताती वज्रमुसळीं ॥ येकमेकां ॥४७॥

आवेशला वृकोदर ॥ शाल्वाचा मर्दिला उरें ऊर ॥ तेणें अशुद्ध बंबाळ अपार ॥ वमिता झाला ॥४८॥

मोडिलें देखोनि शाल्ववीरा ॥ कौरवीं सांडिलें पांचाळनगरा ॥ समस्त राव पळाले निजपुरा ॥ आपापुले ॥४९॥

आतां असो हा न सरे वीरं ॥ येथेंचि कायसा ग्रंथविस्तार ॥ भिंगें भिंग भेदितां पदर ॥ नसरे जैसा ॥५०॥

मग त्या द्रुपदराजबाळे ॥ पांडवीं नेलें कुलालशाळे ॥ तंव कुंतीप्रति विनविलें ॥ धर्मरायें ॥५१॥

ह्नणे भिक्षा मिळाली विचित्र ॥ येरी ह्नणे वांटुनि घ्या सर्वत्र ॥ द्वारीं येतां तंव सुंदर ॥ देखिली द्रौपदी ॥५२॥

मग धर्मासि ह्नणे कुंती ॥ माझी लटिकी नव्हे भारती ॥ आणि व्यासदेवाचे चित्तीं ॥ ऐसेंचि असे ॥५३॥

ह्नणोनि त्या पांचांचे हातीं ॥ पाणिग्रहण करवी कुंती ॥ धर्मादि करोनि वित्पत्ती ॥ अनुक्रमेंसी ॥५४॥

मग तें भिक्षेंचें पक्कान्न ॥ त्याचें समस्तीं केलें भोजन ॥ आणि दर्भासनीं शयन ॥ केलें समस्तीं ॥५५॥

तंव धृष्टद्युम्र राजपुत्र ॥ तेणें गुप्तरुपें धाडिले हेर ॥ ऐकावया वार्ताविचार ॥ पांडवांचा ॥५६॥

तंव ते झुंजाचिया वार्ता ॥ कुंतीप्रती सांगती समस्तां ॥ ह्नणती तृप्ति नव्हेचि पाहतां ॥ रणमंडळ ॥५७॥

ऐसी वार्ता सांगती हेर ॥ तेणें हर्षला राजकुमर ॥ सकळ कथिला समाचार ॥ द्रुपद पित्यासी ॥५८॥

ह्नणे हे नव्हती जी ब्राह्मण ॥ मज वाटती देवगण ॥ निश्वयें कुटिळ माव करोन ॥ आले असती ॥५९॥

उदयो झालिया दिनकरा ॥ रायें धाडोनि पुरोहित परिवारा ॥ पांडवां नेलें स्वमंदिरा ॥ समस्तांसी ॥६०॥

मग पांचही पांचां रथीं ॥ येकरथीं द्रौपदी कुंती ॥ ऐसी आणिलीं सुमुहूर्ती ॥ मंडपासी ॥६१॥

विस्मयें धर्मासि ह्नणे द्रुपद ॥ तुह्मी कोठील जी द्विज वंद्य ॥ मजसीं करावा अनुवाद ॥ सत्यवचनें ॥६२॥

तयासि ह्नणे युधिष्ठिर ॥ आह्मी पांडव पंडुकुमर ॥ आमुचे कृष्ण आणि बळिभद्र ॥ मातुळपक्षी ॥६३॥

मग द्रुपदें केलें वाधावणें ॥ समस्तां केली गंधमार्जनें ॥ वस्त्रें देवोनि साहीजणें ॥ सन्मानिलीं ती ॥६४॥

हेमरत्नांचें सुलक्षण ॥ अर्जुनासि घातलें आसन ॥ लावावयासी सुलग्न ॥ द्रौपदीसीं ॥६५॥

तंव धर्म बोलिला आपण ॥ राया ऐसें न घडे जाण ॥ आह्मां पांचांसीं लावावे लग्न ॥ अनुक्रमेंसीं ॥६६॥

हा ऐकोनि अनुवादु ॥ शंकला मनीं द्रुपदु ॥ ह्नणे पांचजणां एक वधु ॥ कैसी घडे ॥६७॥

धर्म ह्नणे गा नृपनाथा ॥ ऐक पां येक प्राचीन कथा ॥ जटील नामें तपिया होता ॥ कोणी एक ॥६८॥

त्याची कन्य उपवरी ॥ गोमती नामें मनोहरी ॥ ते सप्तऋषींसि वेदमंत्रीं ॥ दीधली होती ॥६९॥

परीं ते नये द्रुपदाचे चित्ता ॥ तंव व्यास आले अवचिता ॥ ते सांगते झाले नृपनाथा ॥ पांचाळासी ॥७०॥

व्यास ह्नणती गा हे नृपती ॥ धर्म बोलिला जे भारती ॥ तेणें न भंगे धर्मनीती ॥ सत्यजाण ॥७१॥

आतां तुझी कन्या कृष्णा ॥ ते द्यावी पांचांजणां ॥ हे स्वर्गलक्ष्मी मृत्युभुवना ॥ आली असे ॥७२॥

पाहें पां हे पांचवीर ॥ अमरावतीचे सुरेश्वर ॥ व्यासें इतुकें कथिलें साचार ॥ परी साच न वाटे त्या ॥ ॥७३॥

ह्नणोनि द्रुपदा नेवोनि एकांता ॥ सांगे पांचां इंद्राची कथा ॥ परी सत्य न वाटे गा भारता ॥ द्रुपदरायासी ॥ ॥७४॥

मग तो सत्यवतीसुत ॥ द्रुपदाचे नेत्रीं लावी हात ॥ तंव राव असे देखत ॥ दिव्यचक्षूंहीं ॥७५॥

पाहे तंव ते सुरेश्वर ॥ आयुधमंडित समग्र ॥ आणि द्रौपदी हे खेचर ॥ स्वर्गलक्ष्मी ॥७६॥

मग तो संतोषला पांचाळ ॥ ह्नणे माझें जन्म जाहलें सुफळ ॥ धर्म जोडला सुशीळ ॥ तुमचे चरणप्रसादें ॥७७॥

बोलाविला धौम्यगुरु ॥ सर्व केला कुळाचारु ॥ लग्न लावी द्विजवरु ॥ पांचांजणासी ॥७८॥

तेथें जाहला जयजयकार ॥ वाद्यें कोंदलें अंबर पुष्पें वर्षला सुरेश्वर ॥ पांडवांवरी ॥७९॥

अश्व गज रथ दास दासी ॥ कनकपाट गौ महिषी ॥ देश देऊनि समस्तांसी ॥ केला नमस्कार ॥८०॥

मग तये द्रौपदीप्रती ॥ आशीर्वाद देतसे कुंती ॥ कीं पतिव्रतांचिये पंक्ती ॥ वंदिती तुज ॥८१॥

नलरायाची दमयंती ॥ वसिष्ठाची अरुंधती ॥ कीं सौभाग्यगंगा ते पार्वती ॥ आणि वैदेही जैसी ॥८२॥

हो कां गुरुदेवाची तारा ॥ अहिल्या आणि लोपामुद्रा ॥ ऐसियांचे पंक्तीं सुंदरा ॥ वर्तसी तूं ॥८३॥

इकडे दूतद्वारें वार्ता ॥ कौरवीं ऐकिली तत्वत्तां ॥ कीं पांडवीं पर्णिली दुहिता ॥ द्रुपदरायाची ॥८४॥

लाक्षागृहीं जळालीं सात ॥ ऐसें होतें पैं लिखित ॥ परि तें जाहलें विपरीत ॥ ऐसियापरी ॥८५॥

तरी तो मेला पुरोचन ॥ तंव बोलिला वीर कर्ण ॥ कीं मजसीं झुंजला तो अर्जुन ॥ सत्य होय ॥८६॥

शाल्व गांजिला महावीर ॥ तरी तो सत्य होय वृकोदर ॥ आणिका हाणावया कुंजरें कुंजर ॥ शक्ति कैंची ॥८७॥

परि दोन्हीच मिळाले झगडां ॥ तिघे होते वाहूनि मेंढा ॥ ते पांडव महासांकडां ॥ वांचविले देवें ॥८८॥

मग अश्वत्थामा आणि द्रोण ॥ शकुनि जयद्रथ आणि कर्ण ॥ कृपाचार्य आणि दुःशासन ॥ जाहले विस्मित ॥८९॥

अंध आणि दुर्योधन ॥ विदुर आणि भीष्मकर्ण ॥ हे करिते जाहले प्रश्न ॥ राजनीतीचा ॥९०॥

कीं दान पराक्रम भेद ॥ साम कुटिळ अवरोध ॥ या नीतीनें करावा वध ॥ पांडवांचा ॥९१॥

परि भीष्म आणि विदुर ॥ द्रोण कृपाचार्य पवित्र ॥ स्थापिते जाहले वेव्हार ॥ पांडवांचा ॥९२॥

भीष्म ह्नणे गा दुर्योधना ॥ या करुंनको विवंचना ॥ त्यांचा साह्य कृष्णराणा ॥ संरक्षिता ॥९३॥

तरी हाचि ऐकें विचार ॥ तयां अर्धराज्याचा अधिकार ॥ ऐसा आहे नीतिविचार ॥ शिष्टलोकांचा ॥९४॥

ऐसें वोलिला भीष्मवीरु ॥ त्यासी समस्त होते सादरु ॥ तंव अंधासि बोले विदरु ॥ हेंचि सत्य ॥९५॥

मग अंध ह्नणे विदुरातें ॥ वेगीं आणीं पांडवातें ॥ आमुचे माथांचें अनंतें ॥ टाळिलें अणेश ॥९६॥

अग्नीचिया मुखी देख ॥ वांचले पंडूचे बाळक ॥ आह्मांलागीं निमित्त लोक ॥ ठेवित होते वायांचि ॥९७॥

मग विदुर जाय पांचाळपुरा ॥ तेथें द्रुपदपांडवां समग्रां ॥ भेटोनियां कथिलें मंत्रा ॥ पांडवांतें धृतराष्ट्राच्या ॥ ॥९८॥

आणि द्रुपदासि ह्नणे विदुर ॥ हे पंडुरायाचे कुमर ॥ तुझे उद्धरितील पितर ॥ सत्य जाणें ॥९९॥

मग विदुर ह्नणे गा युधिष्ठिरा ॥ चला जाऊं हस्तनापुरा ॥ तुमच्या हिताच्या मोहरा ॥ असों आह्मीं ॥१००॥

येतां पांचाळदेशप्रदेशीं ॥ भेटले बळदेव हषीकेशी ॥ तैं विदुर आला जाणोनि हितासी ॥ गेला श्रीकृष्णनाथ ॥१॥

असो विदुरासी लेणीं वस्त्रें ॥ द्रुपदें वाहिलीं महागजरें ॥ मग हस्तनापुरातें त्वरें ॥ निघाले मिरवत ॥२॥

द्रौपदी आणि माता कुंती ॥ दोघी सुखासनीं येके रथीं ॥ सकळही हस्तनापुराचें पंथीं ॥ चालिले रथ ॥३॥

मार्गी विदुर आणि पंडुकुमर ॥ परस्परें बोलती उत्तर ॥ वेगें पावले हस्तनापुर ॥ पांडव ते ॥४॥

तंव भीष्म आणि द्रोण ॥ कृपाचार्य कर्ण विकर्ण ॥ साउंमे जावोनि सन्मान ॥ केला पांडवांसी ॥५॥

मग विदुराचिये मंदिरीं ॥ पांडव राहिले तीनरात्रीं ॥ कौरवीं दीधली राजपुरी ॥ इंद्रप्रस्थ तयातें ॥६॥

ते अंधा आदिकरुनि समस्तां ॥ भेटोनि गेले शक्रप्रस्था ॥ तंव व्यास आले पां अवचितां ॥ पांडवांपाशीं ॥७॥

व्यासें आशिर्वादेंसिं केला अभिषेक ॥ कीं तुह्मां सखा होईल यदुनायक ॥ देशीं रचोनियां प्रजालोक ॥ राज्य कराल सुखानें ॥८॥

ऐसा करोनियां प्रश्न ॥ गेला कृष्णद्वैपायन ॥ तंव द्वारकेहूनि श्रीकृष्ण ॥ आला रथेंसीं ॥९॥

श्रीकृष्णासि पांडवकुंती ॥ भेटलीं गा अनुक्रमगतीं ॥ आणि द्रौपदीस भेटला श्रीपती ॥ बंधुभावें ॥११०॥

मग मागील समस्त कथा ॥ पांडवीं श्रुतकेली गोपिनाथा ॥ ह्नणती तवप्रसादें व्यसनव्यथा ॥ गेली आमुची ॥११॥

जेवीं कांसवीचिये दृष्टीं ॥ बाळक पडतां नव्हे कष्टी ॥ तैसी तूं माउली संकटीं ॥ अससी आह्मां ॥१२॥

मग कृष्ण ह्नणे धर्माप्रती ॥ युक्तीं रहावें शक्रप्रस्थीं ॥ हें सांगोनियां यदुपती ॥ गेला द्वारके ॥१३॥

आनंदले प्रजालोक ॥ नगरा केला पैं खंदक ॥ दुर्ग रचिले अलोलिक ॥ नगरामाजी ॥१४॥

ऐसी श्रृंगारिली राजधानी ॥ तंव आला नारदमुनी ॥ समस्त गेले लोटांगणी ॥ ब्रह्मसुतासी ॥१५॥

नारद ह्नणे गा राया धर्मा ॥ येक स्त्री पांचांजणां तुह्मां ॥ तरी रतीचेनि संगमा ॥ करावा नेम ॥१६॥

नातरी सुंद उपसुंद बंधु ॥ यांचा जैसा जाहला संबंधू ॥ तैसा तुह्मां न घडो वधु ॥ स्त्रियेकरितां ॥१७॥

तंव धर्म ह्नणे जी ब्रह्मसुता ॥ सुंदउपसुंदांची कथा ॥ आह्मां सांगावीं सर्वथा ॥ सविस्तर पैं ॥१८॥

मग ह्नणे ब्रह्मकुमर ॥ हिरण्यकश्यपूचा पुत्र ॥ निकुंभ नामें महाअसुर ॥ विख्यात जो कां ॥१९॥

त्याचे दोनी असती कुमर ॥ सुंदोपसुंद सहोदर ॥ तिहीं तप केले अधोर ॥ नानापरींचे ॥१२०॥

एकांगुष्ठ निराहारी ॥ ऊर्ध्वदृष्टी ऊर्ध्वकरीं ॥ मांस होमिती समग्रीं ॥ आपुले अंगीचें ॥२१॥

ऐसें तयांनीं करितां देखा ॥ प्रसन्न केलें चतुर्मुखा ॥ मग ब्रह्मा ह्नणे तय बाळकां ॥ मागा मज ॥२२॥

तंव दोघे बोलिले वचन ॥ आह्मीं जिंकावें गा त्रिभुवन ॥ आणिका वीराचे हातें मरण ॥ न यावें आह्मां ॥२३॥

मग ब्रह्मा ह्नणे तथास्तु ॥ तुमचा पूर्ण होईल मनोरथु ॥ यापरी मस्तकीं ठेवोनि हातु ॥ गेला विरिंची ॥२४॥

तैं मृत्यु पाताळ अमरावती ॥ जिंकोनि पळविला त्यांहीं सुरपती ॥ तिहीं लोकीचें राज्य करिती ॥ बंधु दोघे ॥२५॥

डाकिनी भूतभैरव त्रिनयन ॥ रणीं पळविला नारायण ॥ इंद्र चंद्र आणि वरुण ॥ जिंकिले देखा ॥२६॥

मग वधिते जाहले ब्राह्मणां ॥ कीं हे करिती होमहवनां ॥ तेणें बळ चढे देवगणां ॥ ह्नणोनियां ॥२७॥

गजरुपें येवोनि रात्रीं ॥ कुंडें फोडोनि मारिती अग्निहोत्री ॥ तयांची सबळ तपसामुग्री ॥ न चले शाप ॥२८॥

ऐसे जाणोनि अनिवार ॥ पळते जाहले ऋषीश्वर ॥ देवांसि सांगती समग्र ॥ आवर्त त्यांचा ॥२९॥

मग इंद्र आणि ऋषी तत्वतां ॥ ब्रह्यापाशीं गेले त्वरिता ॥ ह्नणती असुर आले जैता ॥ तववरदें गा ॥१३०॥

तिहीं मोडिला धर्माचार ॥ याग हवन अग्निहोत्र ॥ ब्राह्मण मारिले वेदपात्र ॥ असंख्यात पैं ॥३१॥

तंव ब्रह्यानें विचारोनि निजमनीं ॥ बोलाविला विश्वकर्माविंदानी ॥ ह्नणे तिळतिळ तेज घ्यावें येक्षणीं ॥ सकळदेवांचें ॥३२॥

मग तो विंदानी विश्वकर्मा ॥ तिळतिळतेजें रजिली रामा ॥ ते बोलिजे तिलोत्तमा ॥ सुरांगना पैं ॥३३॥

तिची देखोनि स्वरुपता ॥ भूल पडली देवां समस्तां ॥ मग ते धाडिली पर्वता ॥ विंध्याचळासी ॥३४॥

जेथें होते सुंदोपसुंद ॥ तेथें येऊनि करी विनोद ॥ फुलें वेंची मंदमंद ॥ हावभावेंसीं ॥३५॥

पैल आली कैंची सुंदर ॥ महाअनुपम्य सुकुमार ॥ ऐसें ह्नणोनि आले असुर ॥ मोहिनीपाशीं ॥३६॥

दक्षिण कर धरिला सुंदें ॥ वाम कर धरिला उपसुंदें ॥ माझी माझी ह्नणतां विवादें ॥ गेले निकुरा ॥३७॥

सुंद ह्नणे हे तुझी माता ॥ उपसुंद ह्नणे भाउजई तत्वता ॥ ऐसें करितां त्या उभयता ॥ वाढला विरोध ॥३८॥

मग ते सोडोनि नायका ॥ गदा हाणिती येकमेकां ॥ क्षणे गेले गेतलोका ॥ दोघे बंधू ॥३९॥

ह्नणोनि ऐकें गा धर्मा पार्था ॥ कामिका बंधु ना माता पिता ॥ तरी नेम करावा सुरता ॥ संगमाचा ॥१४०॥

तुह्मी या द्रौपदीनिमित्तें ॥ पांचही नासल अपघातें ॥ मग कौरव वाहतील देवातें ॥ आनंदभोज ॥४१॥

तें वचन मानवलें पंडुपुत्रां ॥ विवंचना केली संवत्सरा ॥ कीं दोनमास दिवस बारा ॥ येकासि रती ॥४२॥

हा नेम उल्लंघन जो करी ॥ तो महापातकी दुराचारी ॥ तेणें द्वादशवर्षेवरी ॥ करावें तीर्थभ्रमण ॥४३॥

ऐसी करोनि विवंचना ॥ नारद गेला इंद्रभुवना ॥ यापारि वर्ततां पंडुनंदनां ॥ काळ लोटला बहुत पैं ॥४४॥

भारता ऐसी ते द्रौपदी सती ॥ येकासी क्रमिलिया ऋतुरती ॥ अग्निमाजी न्हावोनि पती ॥ भोगी दुसरा ॥४५॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ गंगा तुमची पूर्वमाता ॥ तैसीच पुर्वील गा सरिता ॥ तपती तुह्मां ॥४६॥

तंव जन्मेजय ह्नणे हो मुनी ॥ तपती कैसी पूर्वजननी ॥ हें आणावें माझिये मनीं ॥ सकळू आतां ॥४७॥

मग ह्नणे वैशंपायनु ॥ कोणैक वेळीं शिणला भानु ॥ हातें सांडिला निरपोनु ॥ घाम निढलीचा ॥४८॥

तो पडला वंशजाळीवरी ॥ तेथें जन्मल्या दोनी कुमरी ॥ येकी सावित्री आणि दुसरी ॥ तपती नामें ॥४९॥

परी त्या दोंप्रकारीं शक्ता ॥ येकी सुंदरा येकी सरिता ॥ ऐसें पवित्र गा भारता ॥ सामर्थ्य त्याचे ॥१५०॥

त्या रुपवंतमनोहरी ॥ सूर्यदेवाचिया कुमरी ॥ वयसें जाहल्या उपवरी ॥ दोघीजणी ॥५१॥

त्या करिती तपसाधना ॥ नानाव्रतें महादाना ॥ कीं भ्रतार द्यावा नारायणा ॥ महाराज ॥५२॥

तंव सोमवंशींचा विख्यात ॥ सुवर्ण नामें नृपनाथ ॥ तो आला पारधी खेळत ॥ तये स्थानीं ॥५३॥

मग त्या रायें लावण्यवती ॥ देखोनि आनंदला चित्तीं ॥ त्यांची पाहोनि आकृती ॥ भुलला रावो ॥५४॥

तंव त्याही जाहल्या लज्जित ॥ रायें जाणिल्या अपर्णित ॥ ह्नणोनि नम्रत्वें स्वइच्छित ॥ बोलिला राव ॥५५॥

तपतीतें ह्नणे अवधारीं ॥ माझी बांध वो गळसरी ॥ मग ते बोलिली सुंदरी रायाप्रती ॥५६॥

कीं माझा पिता दिनकर ॥ तो हा जाणे विवाहविचार ॥ त्याचे विचारें गळसर ॥ बांधीन तुमचा ॥५७॥

मग तो राव सुवर्ण वर्णू ॥ तयानें तपें आराधिल भानू ॥ ऊर्ध्वकरेंसीं दुजा चरणू ॥ न लावी भूमीं ॥५८॥

मुखें जपे सूर्यमंत्रा ॥ ऐसे लोटले दिवस बारा ॥ तंव तें जाणवलें ऋषीश्वरा ॥ वसिष्ठासी ॥५९॥

ह्नणोनि आला ऋषीश्वरु ॥ जो कुळींचा कुळगुरु ॥ त्यासी कथिला समाचारु ॥ कन्यकांचा ॥६०॥

मग तो वसिष्ठ ऋषीश्वरु ॥ तेणें प्रार्थिला भास्करु ॥ कीं कन्या द्यावीं परिकरु ॥ सुवर्णरायासी ॥६१॥

यापरी ते सुमुहूर्ती ॥ वसिष्ठाचे मंत्रशक्तीं ॥ कन्या पर्णिली तपती ॥ सुवर्णरायें ॥६२॥

मग तये तपतीचे उदरीं ॥ पुत्र जाहला महाक्षेत्री ॥ कुरु नामें चराचरीं ॥ विख्यात जो ॥६३॥

त्या कुरुपासाव संतती ॥ वंश वाढला गा भूपती ॥ ह्नणोनि कौरव तुह्मां ह्नणती ॥ तेणें गुणें ॥६४॥

मुनी ह्नणे राया भारता ॥ तुवां पुसिली नामकथा ॥ तरी तपती तुझी वृद्धमाता ॥ ऐसियापरी ॥६५॥

असो आतां हे तपती ॥ नामोच्चारें अघें नासती ॥ पुढें कथा ऐकावी श्रोतीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥६६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ कौरवोत्पत्ती तपतीकथाप्रकारु ॥ त्रयोदशोध्यायीं कथियेला ॥१६७॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP