श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


धृतराष्ट्र म्हणाला,

हे संजया ! धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युध्दाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? ॥१॥

संजय म्हणाला,

तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन तो म्हणाला. ॥२॥

अहो आचार्य ! तुमच्या बुध्दिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करुन उभी केलेली ही पाडुपुत्राची प्रचंड सेना पहा. ॥३॥

या सैन्यात मोठमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, ॥४॥

धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित्, कुन्तिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, ॥५॥

शक्तिमान् उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥६॥

अहो ब्राह्मणश्रेष्ठ ! आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥७॥

आपण - द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युध्दात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥८॥

इतरही माझ्यासाठी जिवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युध्दात पारंगत आहेत. ॥९॥

भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥१०॥

म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारांत आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच नि:संदेह भीष्म-पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥११॥

कौरवांतील वृध्द, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अन्त:करणात आनन्द निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करुन शंख वाजवला. ॥१२॥

त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदङग, शिंगे इ. वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला. ॥१३॥

त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले. ॥१४॥

श्रीकृष्णांनी पाञ्चजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणार्‍या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठ शंख फुंकला. ॥१५॥

कुन्तीपुत्र राजा युधिष्ठिराने अनन्तविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. ॥१६॥

श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशिराज, महारथी शिखण्डी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, ॥१७॥

राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा ! सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले. ॥१८॥

आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात् आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥१९॥

महाराज ! त्यानंतर ध्वजावर हनुमान् असणार्‍या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली. ॥२०॥

तेव्हा धनुष्य उचलून तो हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला- हे अच्युता! माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥२१॥

मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥२२॥

दुष्टबुध्दी दुर्योधनाचे युध्दात प्रिय करु इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥२३॥

संजय म्हणाला,

धृतराष्ट्रमहाराज ! अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करुन म्हटले, ॥२४॥

हे पार्था ! युध्दासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. ॥२५॥

त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. ॥२६॥

तेथे असलेल्या त्या सर्व बान्धवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुन्तीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. ॥२७॥

अर्जुन म्हणाला,

हे कृष्णा ! युध्दाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून, ॥२८॥

माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥२९॥

हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥३०॥

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युध्दात आप्तांना मारुन कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥३१॥

हे कृष्णा ! मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविन्दा ! आम्हांला असे राज्य काय करायचे ? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे ? ॥३२॥

आम्हांला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युध्दात उभे ठाकले आहेत. ॥३३॥

गुरुजन, काका, मुलगे , आजे, मामा सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥३४॥

हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयात झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा ? ॥३५॥

हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारुन आम्हांला कोणते सुख मिळणार ? या आततायींना मारुन आम्हांला पापच लागणार. ॥३६॥

म्हणूनच हे माधवा, आपल्या बान्धवांना-धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारुन आम्ही कसे सुखी होणार ? ॥३७॥

जरी लोभामुळे बुध्दी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोषा आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी, ॥३८॥

हे जनार्दना ! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करु नये ? ॥३९॥

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असत त्या कुळात मोठया प्रमाणात पाप फैलावते. ॥४०॥

हे कृष्णा ! पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया ! स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. ॥४१॥

वर्णसंकर हा कुळाचा नाश करणार्‍यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राध्द, जलरर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥४२॥

या वर्णसंकर करणार्‍या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म आणि कुळधर्म उध्वस्त होतात. ॥४३॥

हे जनार्दना ! ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. ॥४४॥

अरेरे ! किती खेदाची गोष्ट आहे ! आम्ही बुध्दिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे ! ॥४५॥

जर शस्त्ररहित व प्रतीकार न करणार्‍या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥४६॥

संजय म्हणाला,

रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP