श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ७

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


श्रीभगवान म्हणाले,

हे पार्था ! अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्या गुणांनी युक्त, सर्वांचा आत्मा असणार्‍या मला निःशंयपणे जाणशील, ते ऐक . ॥१॥

मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहात नाही. ॥२॥

हजारो मनुष्यांत कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करतो आणि त्या प्रयत्‍न करणार्‍या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खर्‍या स्वरूपाने जाणतो. ॥३॥

पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. ॥४॥

आणि हे महाबाहो! हिच्याहून दुसरी, जिच्यायोगे सर्व जग धारण केले जाते, ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. ॥५॥

हे अर्जुना ! तुं असे समज आहे. सर्व भूतमात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे. आणि मी सर्व जगाची उप्तत्ती व प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. ॥६॥

हे धनंजया ! माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोर्‍यात दोर्‍याचे मनी ओववे, तसे माझ्यात ओवलेले आहे. ॥७॥

हे अर्जुना ! मी पाण्यातील रस आहे. चन्द्रसुर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. ॥८॥

मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व भूताचे जीवन आहे आणि तपस्वांतील तप आहे. ॥९॥

हे अर्जुना ! तू संपुर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. ॥१०॥

हे भरतश्रेष्ठा ! मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यांतील धर्माला अनुकुल अर्थात शास्त्राला अनुकुल असा काम आहे. ॥११॥

आणखीही जे सत्त्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उप्तन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उप्तन्न होणारे आहेत, असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. ॥१२॥

गुणांचे कार्य आसणार्‍या सात्त्विक, राजास आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जगप्राणिसमुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणार्‍या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. ॥१३॥

कारण ही अलौकिक अर्थात अति अद्‌भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात. ॥१४॥

मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसूरी स्वभावाचे, मनुष्यांत नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. ॥१५॥

हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ! उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी , आर्त , जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात. ॥१६॥

त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेल्या अनन्य प्रेम-भक्ती असलेली ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वतः जाणणार्‍या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. ॥१७॥

हे सर्वच उदार आहेत. परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे. असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन-बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. ॥१८॥

पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष ' सर्व काही वासुदेव ' च आहे, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. ॥१९॥

त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळुन इतर देवतांची पूजा करतात. ॥२०॥

जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो , त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. ॥२१॥

तो त्या श्रेद्धेन युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. ॥२२॥

पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त, मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात. ॥२३॥

मुढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणार्‍या, सच्चिदानन्दघन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात. ॥२४॥

आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणुन हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या, अविनाशी, मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा-मरणारा असे समजतात. ॥२५॥

हे अर्जुना ! पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणार्‍या सर्व प्राण्यांना मी जाणतो. पण श्रद्धा भक्ती नसलेली कोणीही मला जाणत नाही. ॥२६॥

हे भरतवंशी अर्जुना ! सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. ॥२७॥

परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणार्‍या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते रागद्वेषाने उप्तन्न होणार्‍या द्वन्द्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. ॥२८॥

जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्‍न करतात ते पुरुष , ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. ॥२९॥

जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह ( सर्वाच्या आत्मरूप अशा ) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताते पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP