अर्जुन म्हणाला,
हे कृष्णा ! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती ? सात्विक, राजस की तामस ? ॥१॥
श्रीभगवान म्हणाले,
मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उप्तन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. ॥२॥
हे भारता ! सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अन्तःकरणानुरुप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणुन जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे. तो स्वतःही तोच आहे. ॥३॥
सात्विक माणसे देवांचे पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची तसेच जी इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. ॥४॥
जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे धोर तप करतात तसेच, दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. ॥५॥
जे शरीराच्या रुपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणार्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसूरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण. ॥६॥
भोजनही सर्वांना आपपल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप आणि दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. ॥७॥
आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे स्वभावातः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. ॥८॥
कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उप्तन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. ॥९॥
जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गन्ध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. ॥१०॥
जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे. असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणार्या पुरूषांकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. ॥११॥
परन्तु हे अर्जुना ! केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज. ॥१२॥
शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्राशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणर्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. ॥१३॥
देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्या आणि अहिंसा हे शरीरिक तप म्हटले जाते. ॥१४॥
जे दुसर्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ, भाषण असते ते, तसेच वेदशास्त्राचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. ॥१५॥
मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवच्चिंतन करण्याचा स्वभाव , मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. ॥१६॥
फळाची इच्छा न करणार्या योगी पुरुषांकड्न अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकरच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात. ॥१७॥
जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसर्या काही स्वार्थासाठिही स्वभावाप्रमाणे किंवा पांखडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे. ॥१८॥
जे तप मूर्खतापूर्पक हट्टाने, मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसर्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे. ॥१९॥
'दान देणेच कर्तव्य आहे' , या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणार्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे. ॥२०॥
परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे. ॥२१॥
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जते, ते दान तामस म्हटले गेले आहे. ॥२२॥
ॐ तत् , सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण , वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. ॥२३॥
म्हणुन वेदमंत्रांचा उच्चार करणार्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. ॥२४॥
' तत् ' या नावाने संबोधिल्या जाणार्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकरच्या यज्ञ, तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणार्या पुरुषांकडून केल्या जातात. ॥२५॥
'सत्' या परमात्म्याच्या नावाच्या सत्य भावात आणी श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था ! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो. ॥२६॥
तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती ( आस्तिक बुद्धी ) असते, तिलाही सत् असे म्हणतात, आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते. ॥२७॥
हे अर्जुना ! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. ॥२८॥