श्रीभगवान म्हणाले,
भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान , इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्राचे पठन-पाठन, भगवंताच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता. ॥१॥
काया-वाचा-मानाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण , आपल्यावर अपकार करणार्यावरही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाला त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे. ॥२॥
तेज, क्षमा, धैर्य, बाह्म, शुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणी स्वतः विषयी मोठेपणाचा अभिमान नसणे- ही सर्व हे अर्जुना ! दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. ॥३॥
हे पार्था ! ढोंग, घमेंड, अभिमान, राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसूरी संपत्ती घेऊन जन्मेलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. ॥४॥
दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणुन हे अर्जुना ! तु शोक करूं नकोस. कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. ॥५॥
हे अर्जुना ! या जगात मनुष्यसमुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणी दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यांपैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसूरे प्रकृतीच्या मनुष्यासमुदायाबद्दलही माझ्याकडुन सविस्तर ऐक. ॥६॥
आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणी सत्य भाषणही असत नाही. ॥७॥
ते आसूरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की , हे जग आश्रयरहित, सर्वाथ खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ, स्त्रीपुरुषांच्या संयोगांतुन उप्तन्न झाले आहे. म्हणुनच केवळ 'काम' हेच त्याचे कारण आहे. त्याशिवाय दुसरे काय आहे ? ॥८॥
या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे. आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ॥९॥
ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणार्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धान्त स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. ॥१०॥
तसेच ते आमरणान्त असंख्य चिंतांचे, ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यांत तप्तर असलेले 'हाच काय तो आनंद आहे' असे मानणारे असतात. ॥११॥
शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम - क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ॥१२॥
ते विचार करता की, मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हासुद्धा हे मला मिळेल. ॥१३॥
या शत्रुला मी मारले आणि त्या दुसर्या शत्रुंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. ॥१४॥
मी मोठा धनिक आणि मोठ्या कूळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे ? मी यज्ञ करीन. दोन देईन. मजेत राहीन. अशाप्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, ॥१५॥
अनेक प्रकारांनी भ्रान्त चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगांत अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ॥१६॥
ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणी मन यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन यज्ञ करतात. ॥१७॥
ते अहंकार, बळ , घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसर्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरांत असलेल्या मज अन्तर्यामीचा द्वेष करणारे असतात. ॥१८॥
त्या द्वेष करणार्या, पापी, क्रूर कर्मे करणार्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनींतच टाकतो. ॥१९॥
हे अर्जुना ! ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनींतच जन्मतात. उलट त्याहूनही आत नीच गतीला प्राप्त होतात. अर्थात घोर नरकांत पडतात. ॥२०॥
काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणुनच त्या तिहींचा त्याग करावा. ॥२१॥
हे अर्जुना ! या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परम गती मिळवतो. अर्थात मला येऊन मिळतो. ॥२२॥
जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडुन स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. ॥२३॥
म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणुन तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ॥२४॥