अर्जुन म्हणाला,
जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन-ध्यानात मगन राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत ? ॥१॥
श्रीभगवान म्हणाले,
माझ्या ठिकाणी मन एकाग्र करुन निरंतर माझ्या भजन-ध्यान्यांत रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरुप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यामधील अति - उत्तम योगी वाटतात. ॥२॥
परन्तु जे पुरुष इन्द्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवुन मन बुद्धीच्या पलीकडे असणार्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरुप आणि नेहमी एकरुप असणार्या नित्य, ॥३॥
अचल, निराकार, अविनाशी , सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणात तप्तर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥४॥
सच्चिदानान्दघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणार्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ॥५॥
परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करुन मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरन्तर चिन्तन करीत उपासना करतात . ॥६॥
हे अर्जुना ! त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरुप संसारसागरातुन उद्धार करणारा होतो. ॥७॥
माझ्यतच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तु माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥८॥
जर तु माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे अर्जुना ! अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥९॥
जर तु वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील. तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही 'माझी प्राप्ती होणे' हि सिद्धी तु मिळवशील ॥१०॥
जर माझी प्राप्तिरुप योगाचा आश्रय करुन वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादिंवर विजय मिळवणरा होऊन सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर. ॥११॥
मर्म न जानता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोबच परम शान्ती मिळते. ॥१२॥
जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित, सर्वावर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावन म्हणजे अपराध करणार्यालाही अभय देणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ॥१३॥
ज्याने शरीर , मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते. तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेल्या माझा भक्त मला प्रिय आहे. ॥१४॥
ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यांदींपासुन अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ॥१५॥
ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणी दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाच्या अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥१६॥
जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥१७॥
जो शत्रु-मित्र आणि मान - अपमान यांविषयीं समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते, ॥१८॥
ज्याला निन्दा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥१९॥
परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥२०॥