श्रीभगवान म्हणाले,
आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ असलेल्या , ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्त्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणाणारा आहे. ॥१॥
त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशु-पक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहंता-ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत. ॥२॥
या संसारवृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे, तसे येथे विचारकाली आढळत नाही कारण याचा ' आदि ' नाही. 'अंन्त' नाही . तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणुन या अहंता, ममता आणि
वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून.॥३॥
त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसारवृक्षाची प्रवृत्तिपरंपरा विस्तार पावली आहे, ता आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे.॥४॥
ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहिशा झाल्या, ते सुख- दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. ॥५॥
ज्या परम पदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सुर्य प्रकाशित करू शकत , ना चन्द्र, ना अग्नी, तेच माझे परम धाम आहे. ॥६॥
या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थिर मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. ॥७॥
वारा वासाच्या वस्तुतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो तसाच देहादिकंचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणार्या शरीरात जातो. ॥८॥
हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. ॥९॥
शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही ( त्या आत्मस्वरूपाला ) अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेली विवेकी ज्ञानीच तत्त्वतः ओळखतात. ॥१०॥
योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वतः जाणतात; परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. ॥११॥
सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे. असे तू जाण. ॥१२॥
आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. ॥१३॥
मीच सर्व प्राण्यांचा शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. ॥१४॥
मीच सर्व प्राण्याच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माज्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदान्ताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. ॥१५॥
या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवत्मा अविनाशी म्हटला जातो. ॥१६॥
परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे. जो तिन्ही लोकांत प्रवेश करुन सर्वाचे धारण पोषण करतो.याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. ॥१७॥
कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणुन लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. ॥१८॥
हे भारता ! जो ज्ञानी पुरुष मला अशापकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणुन जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. ॥१९॥
हे निष्पाप अर्जुना ! असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे, याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. ॥२०॥