|
अ.क्रि. १ चूक , प्रमाद करणें ; नको तें करणें ; अपराध करणें . लिहिणार चुकतो पोहणार बुडतो . २ मार्गापासून चळणें ; बहकणें ; भकणें ; भलत्या रस्त्याला जाणें . उंडळ उंडळ चुकों नये । हेकाडपणें । - दा १४ . ४ . १३ . चुकला फकीर मशिदींत शोधावा ३ कामांत कसूर , कुचराई करणें ; कामचुकारपणा करणें . मी चाकरीमध्यें कधीं चुकलों नाहीं . ४ ( नेम , लक्ष्य इ० ) न साधणें ; न लागणें ; अंतरणें ; हुकणें . वाटा लागे तरि गगना भेटे । एर्हवीं चुकें । - ज्ञा ८ . २५३ . ५ व्हावयाचेम टळणें ; न घडणें . गेलें तें येत नाहीं , होणार तें चुकत नाहीं . सरकारचें देणें चुकावयाचें नाहीं . अपमृत्यु चुकला . ६ ( इष्ट , योग्य वेळांत , पध्दतींत ) कमी किंवा जास्त होणें . तुम्ही वेळ चुकलांत . चुकला तो मुकला . ७ संख्येमध्यें आंकडयाचा फरक पडणें , लागणें ; आंकडा कमी येणें . ८ गफलतीनें , नजरचुकीनें वगळला , टाकला जाणें ; गळणें . ९ ( हिशेब ) चुकता करणें ; फेड करणें ; ( कज्जा ) तुटणें ; तोडणें , ( खटल्याचा ) निवाडा होणें , करणें . हिशेब , खटला , कज्जा चुकला . १० ( कांहीं एक काम , गोष्ट ) केली जाणें ; समाप्त होणें . मी तर त्यास वचन देऊन चुकलों . [ सं . स्कु = चुक + णें = चुकणें . स्कु म्हणजे उडी मारणें , गति करणें . करून चुकणें म्हणजे करून पुढें जाणें ; - भाअ १८३५ ; सं . च्यु = मार्गभ्रष्ट होणें ; च्युत ; सं . चुक्क = दु : ख देणें अथवा भोगणें ; प्रा . चुक्कइ ; का . चुक्की = डाग . ] ( वाप्र . ) चुकल्या चुकल्या सारखें होणें - आपल्या संवयीचें माणूस किंवा वस्तु जवळ नसल्यामुळें , परक्या ठिकाणीं गेल्यामुळें चित्तास अस्वस्थ वाटणें . घरची सर्व मंडळी परगावीं गेल्यानें मला आज चुकल्या चुकल्यासारखें झालें आहे . सामाशब्द - चुकतचुकत , माकत , वांकत - क्रिवि . चुका करीत ; घसरत ; चुकतां चुकतां ; वेडयावांकडया पध्दतीनें ; अडखळत . चुकत वांकत आठवलें । इतुकें संकळित बोलिलें । न्यूनपूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं । - दा १३ . ५ . १९ . त्याला श्लोक पाठ येत नाहीं , चुकतमाकत म्हणेल . [ चुकणें द्वि . ] चुकलामाकला , वाकला - वि . नजरचुकीनें राहून गेलेला ; योग्य वेळीं हजर न राहिलेला ; वाट चुकून भलतीकडे गेलेला . [ चुकला द्वि . ] चुकून माकून , वाकून - क्रिवि . चुकीमुळें ; नजरचुकीनें ; दुर्लक्ष होऊन . [ चुकून द्वि . ] चुकूनसुध्दा - क्रिवि . चुकीनें देखील ( नेहमी अकरणरूपी प्रयोग ). मी चुकूनसुध्दा त्याच्या वाटेस जात नाहीं .
|