मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग २६३६ ते २६४१

जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२६३६

आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥

आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥

आहारे तामसा कोण तुझी गती । संताची प्रचीति नाहीं तुज ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा हीनभागी । भूभार जगीं वायां जाहला ॥४॥

२६३७

कामक्रोध लागले मागें । तप करुनी काय सांगें ॥१॥

कायसा जाशी वनांतरीं । कामक्रोध भरले अंतरीं ॥२॥

वनीं जाऊनियां चिंता । रात्रंदिवस घोकिशी कांता ॥३॥

योग अभ्यास न कळे वर्म । शिणतो मूढ धांवतें कर्म ॥४॥

कर्मे लिहलीं न चुके रेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥

२६३८

आष्टांग साधन मौनी जटाधारी । एक चरणावरी करती तप ॥१॥

वायु ते आहार असती दिंगबर । परि न कळे विचार देव कोठें ॥२॥

कैशी तया भ्रांती असोनी देव जवळा । रिगती साधन कळा हुडाकिती ॥३॥

एका जनार्दनीं तया नाहीं सुख । संतांवांचुनी देख मार्ग न लागें ॥४॥

२६३९

विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥

काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तयां ॥२॥

दाविती वरी वरी भक्ति । अंतरीं युक्ति वेगळीच ॥३॥

एका जनार्दनीं जप । वाउगें तप करितो ते ॥४॥

२६४०

सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे ॥१॥

तैसें ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥

नेणती नेणती रामनाम महिमा । व्यर्थ तप श्रमा शिणती वायां ॥३॥

एका जनार्दनीं तपांचें हें तप । तो हा सोपा जप श्रीरामनाम ॥४॥

२६४१

जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं ॥१॥

वाउगी कां वायां शिणती बापुडीं । काय तया जोडी हातीं लागे ॥२॥

पंचाग्रि साधन अथवा धूम्रपान । तेणें काय संपूर्ण हरी जोडे ॥३॥

एका जनार्दनीं वाउगीं तीं तपें । मनाच्या संकल्पें हरी जोडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP