३२८१
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥
तयाचें करा रे चिंतन । मग तुम्हां न पडे न्यून ॥२॥
वाचे वदा विठ्ठल साचा । सोइरा साचा अंतकाळी ॥३॥
मागें पुढें उभा असे । एका जनार्दनीं दिसे ॥४॥
३२८२
भुक्तिमुक्तीचा पांग आमुचिये गांवीं । जनीं जनार्दन वागवी देह सर्व ॥१॥
भुक्ति आणि मुक्ति कासया तें वोझें । जनार्दनें सहजें निर्दाळिलें ॥२॥
कल्पिक कल्पना आवरुनी ठायीं । जनार्दन पाहीं सबराभरीत ॥३॥
त्याचियेनी सत्ते जाहलीसे मिळणी । एका जनार्दनीं एकमय ॥४॥
३२८३
विश्वपाळिता हे हरी । दासा केवीं तो अव्हेरी ॥१॥
नव मास गर्भवास । नाहीं भागला आम्हांस ॥२॥
बाळपणीं वांचविलें । स्तनीं दुग्ध तें निर्मिलें ॥३॥
कीटक पाषाणांत वसे । त्याचें मुखीं चारा असे ॥४॥
धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनीं त्याचा दास ॥५॥
३२८४
जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें ॥१॥
स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें श्रुति पिसें लागलेंसे ॥२॥
जाणीव नेणीव सांडोनियां मागें । शरण रिघे वेगें एका जनार्दनीं ॥३॥
३२८५
मेघदर्शनें मयूर नाचतीं । चंद्रदरुशनें चकोर सुखावती ॥१॥
धेनुदर्शन वत्सें सुखावती । साधुदर्शनें जीवा आनंदवृत्ती ॥२॥
सुर्यदर्शनें जीवाते सुख होय । पितृदर्शनें सुपुत्रा आनंद होय ॥३॥
मातृदर्शनें कन्या सुख मानें । मित्रदर्शनें सुमित्रा आनंदी ठाणें ॥४॥
या रिति सतत चिंतितां हरी । एका जनार्दनीं धन्य संसारीं ॥५॥
३२८६
स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥
यापरी आनंद सदा मनीं हरि । वांचूनी छंद दुजा नाहीं मनीं ॥२॥
एका जनार्दनीं प्रेमयुक्त छंद । गीता गातां आवडी गोविंद ॥३॥
३२८७
होउनी उदास । मागा प्रेम सावकाश ॥१॥
उभा विटेवरी उदित । देतां न पाहे चित्त वित्त ॥२॥
जें जें पाहिजे जयालागीं । तें तें देतो त्या प्रसंगीं ॥३॥
न म्हणे उत्तम चांडाळ । ऐसा भक्तीचा भुकाळ ॥४॥
एका जनार्दनीं म्हणा दास । करा आस निर्भय ॥५॥
३२८८
अगाध चरणाचें महिमान । वेदशास्त्रां पडिलें मौन ॥१॥
चरणें तारिलें पाषाण । चरणें तारिलें भक्तजन ॥२॥
तारियेलें प्रल्हादासी । उद्धारिले अजामेळासी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । चरण तिहीं लोकीं पावन ॥४॥
३२८९
चरणांची थोरी । जाण गौतम सूंदरीं ॥१॥
हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरी ॥२॥
करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी ॥३॥
समचरणींची शोभा । एका जनार्दन उभा ॥४॥
३२९०
चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥
एक तरले चरण पूजितां । कोणी तरलें चरण ध्यातां ॥२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिले शिशुपाळा ॥३॥
ऐसें चरणाचें महिमान । एका जनार्दनीं शरणक ॥४॥
३२९१
नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥
ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥
मंथन करितां बुडाला रवी । सर्वांगी सर्व निज नाचवी ॥३॥
एका जानर्दनीं अवघेंचि सार । मानस मंथोनी पावलों पार ॥४॥
३२९२
नवजों योगाचिया वाटा । न चढों आगम निगम ताठा । न लागों उपामाळा खटपटा । आत्मनिष्ठ होउनी असों ॥१॥
विठ्ठल उघड विराजित । साबाह्माभ्यंतर नांदत ॥२॥
कर्मे करुनीं नव्हों कर्मठा । निष्कर्माच्या न लागों झटा । संतरज आमुचा वांटा । मुक्ति फुकटा तेणें लाभे ॥३॥
न करूं दुस्तरें तीं तपें । न पडो अध्यात्म खरपें । एका जनार्दनीं कृपें । आत्मसुख अमुप विचरिजेक ॥४॥