३१२१
येवोनिया काळ बैसलासे उसां । झाकितोसी कैसा डोळे आतां ॥१॥
वाचे नारायण वदे तूं सादर । काळपाश साचार चुके जेणें ॥२॥
वायां हा संसार करसी हावभरी । काळाची तो फेरी निकट आली ॥३॥
एका जनार्दनीं नको यातायाती । संसार फजिती जन्म दुःख ॥४॥
३१२२
आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी ॥१॥
बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगीं ॥२॥
यातायाती करतां जन्म वायां गेला परी नाहीं वदला मुखीं राम ॥३॥
एका जनार्दनीं फजितखोर जिणें । सवेंचि मरणें पुढती जन्म ॥४॥
३१२३
देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥
जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥
प्रपंच काबाड एरंडाचे परी । रसस्वाद तरी कांहीं नाहीं ॥३॥
नाशिवंतासाठीं रडतोसी वायां । जनार्दनीं शरण निघे तूं पायां ॥४॥
एका जनार्दनीं भेटी होतां संतांची । मग जन्ममरनाची चिंता नाहीं ॥५॥
३१२४
सावधान सर्व आहे । तुझे हात आणि पाय । तोंवरीं तूं जाय । तीर्थयात्रेकारणेकं ॥१॥
सरलीया आयुष्यकाळ । इंद्रिये होतील विकळ । कांही न चाले बळ । वाउगी ते तळमळ ॥२॥
डोळे कान नाक आहे । तोंवरी संतां शरण जाय । हीं मावळलीया होय । हाय हाय तुजलागीं ॥३॥
काय म्हणशी माझें माझें । हें तों शेवटींचें वोझें । एका जनार्दनीं दुजें । तुज कोण सोडवील ॥४॥
३१२५
काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें ॥१॥
काय याचे कर्ण बधिर पैं वहिले । हरिकीर्तनीं जाहले पांगुळ ते ॥२॥
काय याचे नेत्रां अंधत्व तें आलेक । न देखती सांवळें रूप कधीं ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा तो चांडाळ । त्याचा मन विटाळ नको नको ॥४॥
३१२६
सुखरूप असतां म्हणे माझें माझें । संकट देखोनियां घाली देवावरी वोझें ॥१॥
पापी तो अधममती । कदा नेणे नामस्मरण गती ॥२॥
नामावांचोनि गती नाहीं । ऐसेंक वेदशास्त्र बोलती पाहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे भुलला । पुनः अधम जन्मा आला ॥४॥
३१२७
होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥
आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥
जंववरी आहे इद्रियसंबंध । तोंवरी तूं बोध करी मना ॥३॥
एका जनार्दनीं मावळलिया दीप । सहजची खेप येईल बापा ॥४॥
३१२८
चौर्यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनीं सोय न धरे ॥१॥
दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥
मरतीयां हांसे । आपण स्वयें मरतसे ॥३॥
एका जनार्दनीं भांड । जन्मोनी लाजविली रांड ॥४॥
३१२९
चोर्यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥
अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥
जन्मोनियां मनुष्यदेहीं । परमार्थ साधिला तो नाहीं ॥३॥
सदा विषयीं अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥
तया नोहे संतभेटी । एकाजनर्दनीं जातां भेटी ॥५॥
३१३०
देहाचि तों देह जोडी । साधी परमार्थ घडी ॥१॥
हेंचि निकें रे साधन । येणें न घडे बंधन ॥२॥
देहीं देह शुद्ध पाहे । सहज परमार्थ होये ॥३॥
सांडोनियां देहीं आटी । एका जनार्दनीं तैं भेटी ॥४॥
३१३१
आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥
आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥
संसाराचा छंद वाउगा पसारा । यांत सैरावैरा हिंडुं नका ॥३॥
एका जनार्दनीं धरा भरंवसा । श्रीराम सरसा वाचे वदा ॥४॥
३१३२
तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें ॥१॥
सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥
नामाचि जाण सत्य सार । वायां कां वाहशील भार ॥३॥
एका जनार्दनीं नाम सार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥४॥
३१३३
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥
वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥
सायास नाहीं अनायासें वर्म । वाचे रामनाम आठवावें ॥३॥
एका जनार्दनीं नामविण काहीं । आणिक थोर नाहीं कलीमाजीं ॥४॥
३१३४
साडंआ वाउगे ते बोल । वाचे म्हणा विठ्ठल विठ्ठल ॥१॥
तेणें तुटती यातना । भवपाश तुटेल जाणा ॥२॥
बैसला जिव्हारीं । व्यापूनि ठेला तो अंतरीं ॥३॥
एका जनार्दनीं ध्यान । ध्यानीं मनीं विठ्ठल पूर्ण ॥४॥
३१३५
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥
महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥
गजरें शब्द करी । एका जनार्दनीं म्हणा हरी ॥३॥
३१३६
नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥
साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥
अभाविकनें मांडिला पसारा । तया नाहीं थारा उभयलोकीं ॥३॥
एकाजनार्दनीं भावाचें भजन । दंभाचें कारण नाहीं देवा ॥४॥
३१३७
नेणतेपण पाडुरंगा ध्याई । सदोदित गाई रामनाम ॥१॥
मग तुज सोपे मार्ग ते असती । पांडुरंग चित्तीं दृढ धरी ॥२॥
एका जनार्दनीं काया वाचा मन । करी समर्पण देवापायीं ॥३॥
३१३८
कां रे नायकसी गव्हारा । कां रे न भजसी ईश्वरा ॥१॥
सोपा मंत्र विठ्ठराज । तेणें पुरे सर्व काज ॥२॥
नको संसाराचें कोड । अंतकांळीं यमदंड ॥३॥
एका जनार्दनीं कींव भाकी । रामनाम वदा मुखीं ॥४॥
३१३९
मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥
म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥
संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार नौका जगीं ॥३॥
तापत्रयें तापली भवार्णवीं पीडिली । तयां विठ्ठलवली प्रकाशली ॥४॥
जाणिवेचे डोहीं नको पडुं फेरे । विठ्ठल उच्चारें कार्यसिद्धि ॥५॥
एका जनार्दनीं विठ्ठलाची आण । दुजा तारी कोण मज सांगा ॥६॥
३१४०
एक वेळ वाचे वेद कां रे नाम । निरसे सर्व श्रम भवदूःख ॥१॥
नाम हे नौका नाम हे नौका । जगीं तारक देखा भाविकांसी ॥२॥
एका जनार्दनीं नाम हें अमृत । सेवितां त्वरित मुक्ति होय ॥३॥