मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग ३०५२ ते ३०७५

विषय - अभंग ३०५२ ते ३०७५

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३०५२

मातला बोकड भलत्यावरी धांवे । तैसा भरला विषय हावे ॥१॥

नाठवेचि आपपर । सदा हिंडे परद्वार ॥२॥

शिकविलें मानी वोखटें । उताणा नेटें चालतसे ॥३॥

कर्म धर्म नावडेचि कांहीं । विषयप्रवाहीं बुडतसे ॥४॥

एका जनार्दनी तें पामर । भोगिती अघोर कुंभपाक ॥५॥

३०५३

परदारा परधन । येथें धांवतसे मन ॥१॥

मन जाए दुरदेशीं । वोढूनी आणा चरणापाशीं ॥२॥

दुर्बुद्धि मनाचें ठाणें । मोडोनी टाका पुरतेपणें ॥३॥

एका जनार्दनीं मन । आपुलें पदीं राखा जाण ॥४॥

३०५४

जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे ॥१॥

वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥

घरीं कोणी अभ्यागत आलिया मागता । धांवतोम सर्वथा श्वानासम ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा दुराचार । नरक अघोर भोगिताती ॥४॥

३०५५

वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥

काय ऐशा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥

एका जनार्दनीं नको त्याचा संग । अंतरें पाडुरंग तयाचेनीं ॥३॥

३०५६

करितां विषयाचें ध्यान । जीव होय मनाधीन ॥१॥

ऐसें भुलले विषयासी । अंचवले परमार्थासी ॥२॥

संसार सागरीं वाहिला । गोड परमार्थ राहिला ॥३॥

गेलें भुलोनियां मन । विसरला आठवण ॥४॥

जन्मा येवोनियां देख । एका जनार्दनीं ते मूर्ख ॥५॥

३०५७

सलगीनें सर्प हातीं तो धरिला । परि डंश तो वहिला करी बापा ॥१॥

तैसें विषयासी सलगी पैं देतां । नेती अधःपाता प्राणिमात्र ॥२॥

विष उत्तम चांगलें घातलेंसे मुखीं । परि राण शोखी क्षनमात्रें ॥३॥

जाणोनी जाणोनीं नको भुलूं वायां । एका जनार्दनीं पायां भजे आधीं ॥४॥

३०५८

बंधनाचा फांसा बैसलासे गळीं मीनापरि गिळी सर्वकाळ ॥१॥

आमीष विषया भुलला पामर । भोगिती अघोर चौर्‍यायंशी ॥२॥

गुंततांचि गळीं जाईल कीं प्राण । हें तो अधम जना न कळे कांहीं ॥३॥

एका जनार्दनीं न कळेंचि मूढा । सांगावें दगडा किती किती ॥४॥

३०५९

इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं ॥१॥

त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥

विषयाचे कामें करिती विवंचना । परी नारायणा न स्मरती ॥३॥

एका जनार्दनीं कृपा नव्हती पूर्ण । इंद्रियां समाधान केवीं होय ॥४॥

३०६०

काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारीं छळिताती ॥१॥

आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥

एका जनार्दनीं यांचा टाकी संग । मग पांडुरंग हातीं लागे ॥३॥

३०६१

अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेह गमाविला ॥१॥

लाहोनी उत्तम शरीर । वेंचिलें ते विषयपर ॥२॥

ऐशी मूर्खाची गोष्टी । एकनाथ देखोनि होतसे कष्टी ॥३॥

३०६२

श्वानाचिये परी धांवे । विषयासक्त जीवें भावें ॥१॥

नेणे मान अपमान । सदा विषयावरी ध्यान ॥२॥

नाहीं देवाची स्मृती । सदा लोळे विषयावर्ती ॥३॥

नाठवेचि कांहीं धंदा । भुलला तो विषयमदा ॥४॥

एका जनार्दनीं देवा । नाठवी अभागी न करी सेवा ॥५॥

३०६३

श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांहीं ॥१॥

वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळें कांहीं ॥२॥

निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्यागावी न कळे कांहीं ॥३॥

सज्जानांचा धर्म सर्वाभुतीं दया । भेदाभेद तया न कळे कांहीं ॥४॥

संतांचा तो धर्म अंतरी ती शांती । एका जनार्दनीं वस्ती सर्वांठायीं ॥५॥

३०६४

चंदनाचे झाडा भुजंग वेष्टला । प्राणी तो गुंतला तैसा व्यर्थ ॥१॥

कमळणीं पुष्पीं भ्रमर गुंतला । प्राणी वोथंबला तयापरी ॥२॥

मंजुळ गायनी । कुरंग वेधला प्राणी तो गुंतला तैशापरी ॥३॥

मोहळ कंदासी मक्षिका गुंतली । तैशी परी जाहली प्राणियासी ॥४॥

एका जनार्दनीं गुंतू नको वायां । जासी भोगावया सुख दुःख ॥५॥

३०६५

बहु बोलतां वो तोंडें । नायकती जाहले लंडे ॥१॥

करिती कुंथाकुंथीं । शिकविलें नायकती ॥२॥

फजितखोर खर । तैसा अभागी पामर ॥३॥

सुनी धांवे वसवसी । तैसी झोंबे विषयासी ॥४॥

एका जनार्दनीं शरण । शिकवितां नायके ज्ञान ॥५॥

३०६६

तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥

तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥

अंधाचें संगतीं । कोण सुख चालतां पंथीं ॥३॥

एका जनार्दनीं देवा । नोहें सांगात बरवा ॥४॥

३०३७

विषयालागीं उपाय जाण । नानापरी करिसी शीण ॥१॥

पोट भरावया भांड । वाजविताती जैसें तोंड ॥२॥

विशयवासना ती थोर । वरी दाविती आदर ॥३॥

एका जनार्दनीं शरण । तंव न चुके देहींचें पतन ॥४॥

३०६८

दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक ॥१॥

पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगाचें गळ गुप्त ॥२॥

गळीं अडकला जो मासा । तो जीत ना मरे चरफडी जैसा ॥३॥

जन्ममरण लागले खांदीं । एका जनार्दनीं धरा शुद्धी ॥४॥

३०६९

अडके कमळिणीं कोशीं । भ्रमरू जैसा आमोदासी ॥१॥

तैसा विषया लोधला । रामनामें विवंचला ॥२॥

कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला राहे ॥३॥

ऐसा विषयीक सायासी । एका जनार्दनीं धरीं मानसीं ॥४॥

३०७०

साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसें आयुष्य जोडिलें जोडी नरदेहा ॥१॥

मातियाचें आवदाणें घालिताती अंगीं । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥

गेलें गेलें बापा हित हातोहातीं । पुढें आली राती काळवंखी ॥३॥

आयुष्याच्या शेवटीं सुखाचिया गोष्टी । काळा नळा पोटीं पडसील बापा ॥४॥

सोलवी सुकृत भरूनियां मापा । विषयासाठीं पाहे पां लावितोसी ॥५॥

अमृत जोडोनि सायासी गळीं कां लावितोसी । घालूनि मत्स्यासी कवण काज ॥६॥

मिनली चिंतामणीची शिळा घोटिव चौबळा । कां रे नेउनी पायातळा रचितोसी ॥७॥

तेथें जें जें कांहीं चिंतिसी तें अधिकची पावसी । नरकासी चौपासी वाढविली ॥८॥

कल्पतरू देखोनि डोळां उभा राहुनी तया तळां । म्हणसी मर मर निर्फळा काय करूं ॥९॥

तेथें मर मर उच्चारिलें मरण अधिक जालें । तुझिया कल्पना केलें वैर तुज ॥१०॥

येवोनि ये जनीं जन्म उत्तम योगी । कां रे भजन नारायणीं चुकलासीं ॥११॥

जंववरी आयुष्य आहे तंववरी हिताची सोये । एका जनार्दनीं शरण जाये एकपणें ॥१२॥

३०७१

व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय ॥१॥

तैसा विषयभोग साचा । भोगितां सुखाचा सुख म्हणती ॥२॥

येतां यमदुतें बापुडीं । कोण सोडी अधमासीं ॥३॥

म्हणोनि मारितसे हाका । भुलुं नका संसारा ॥४॥

शरण एका जनार्दनीं । सोडवील धनी त्रैलोक्याचा ॥५॥

३०७२

भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचें ॥१॥

चालतां देह भोगातें भोगिती । अंतकाळीं होतीं दैन्यवाणे ॥२॥

भुलला पामर धरूनी भोग आशा । पुढे यमपाश कळेचिना ॥३॥

एका जनार्दनीं न कळेचि वर्म । कोण भवकर्म सोडवील ॥४॥

३०७३

विषयाचें सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती ॥१॥

मारिती ताडिती यमाचे किंकर । कोण सोडी साचार त्यासी तेथें ॥२॥

कळोनी पडती न कळोनी पडती । कोण होईल गती न कळे तया ॥३॥

एका जनार्दनीं येतसे करुणा । म्हणोनि वचना बोलणें हें ॥४॥

३०७४

छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल ॥१॥

मूळ छेदितां वृक्ष खुडें । तैं समुळ विषय उडे ॥२॥

ऐसा अनुराग धरीं मनीं । देईं विषयासी पाणी ॥३॥

एका जनार्दनीं गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥

३०७५

विषयीं होउनी उदास । सांडी संसाराची आस ॥१॥

तरीच पावाल चरण । संतसेवा घडेल जाण ॥२॥

होऊन उदासवृत्ति । भजन करा दिनरातीं ॥३॥

ऐसी आवड धरा मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP