२७४१
कां रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं ॥१॥
उत्तर चांगलें रें मुख । रामनाम न म्हणती विख ॥२॥
उत्तम क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हातीं ॥३॥
उत्तम पद ते शोभती । परि तीर्थयात्रे न जाती ॥४॥
पुष्ट दिसतें शरीर । व्यर्थ वांचोनि भूमीभार ॥५॥
ऐसे अभागी जन्मले । एका जन्मार्दनीं वायां गेलें ॥६॥
२७४२
भूमीभर वायां । कां रें जन्मली ही काया ॥१॥
न घडे वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥
न घडे करें दानधर्म । कर नोहेती सर्प जाण ॥३॥
पायीं तीर्थयात्रा न घडे । पाय नोहेते ते केवळ लाकडें ॥४॥
एका जनार्दनीं ते वेडे । नरदेहीं प्रत्यक्ष रेडे ॥५॥
२७४३
आयुष्य तें तीन भाग जाहलें । परी मुखीं राम न बोले ॥१॥
सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥
चित्त शुद्ध झालें नाहीं । ज्ञान कोरडें सांगोनी कायीं ॥३॥
उपाधीचा निषेध भेद । सदा वाद अपवाद ॥४॥
एका जनार्दनीं मना । तेथें राहुं नको जना ॥५॥
२७४४
साधनें कासया करसी रे गव्हारा । चौर्यांयशींचा फेरा चुकवी कांहीं ॥१॥
वाउगेंचि माझें म्हणोनि घेशी वोझें । आदी अंती तुझें कोण होती ॥२॥
वाउगीयाच्या छंद लागशी तूं मूढा । पतनाचा खोडा चुकवी वेगें ॥३॥
एका जनार्दनीं श्रीरंगवांचुनीं । धांवण्या धांवणीं कोण धांवे ॥४॥
२७४५
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणें नासे स्वधर्माचरण ॥१॥
ऐसें द्वेषें बांधलें घर । ते ठायीं क्रोध अनिवार ॥२॥
ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ॥३॥
स्वभाव बाधी सत्य जाण । शरण एक जनार्दनीं ॥४॥
२७४६
अज्ञानीं विश्वासें साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी ॥१॥
ऐशी उभयतांचि क्रिया । पाहतां चर्या एकची ॥२॥
वंदुं निंदूं कोणी ऐसा एक भाव । तेथें तो देव वसे सदा ॥३॥
ज्ञान अज्ञानाचा निवाडा होय । एका शरण जनार्दनीं जाय ॥४॥
२७४७
पराचे ते दोष आणू नये मनीं । जयाची ते करणी त्याजसवें ॥१॥
विषाचिया अंगी नोहे अमृतकण । मारकक तें जाण विष होय ॥२॥
सर्पाचिये अंगीं शांतीचा कळवळा । कोणा पाहे डोळा भरूनि दृष्टी ॥३॥
एका जनार्दनीं जैसा ज्याचा गुण । तैसें तें लक्षण बद्धक त्यांसी ॥४॥
२७४८
एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अबद्ध नरक जोडे ॥१॥
शुद्ध अशुद्ध हें विठोबाचें नाम । जपतां घडे सकाम मोक्ष मुक्ति ॥२॥
सकाम निष्काम देवाचेंक भजन । तेणें चुके पतन इहलोकीं ॥३॥
एका जनार्दनीं शुद्ध आणि अशुद्ध । टाकूनियां भेद भजन करी ॥४॥
२७४९
भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें ॥१॥
म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचें । अभाविकां साचें नावडे नाम ॥२॥
वैष्णवांचा संग नावडे कीर्तन । अभाविकांचा दुर्गुण हाचि देखा ॥३॥
अभाविकांच्या संगें परमार्थ नावडे । एका जनार्दनीं न घडे सेवा कांहीं ॥४॥
२७५०
नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म ॥१॥
अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनीं । तया चक्रपाणी धांवे मागें ॥२॥
देहींचे देहपण देहाचिये माथां । कर्म धर्म सत्ता देहालागीं ॥३॥
एका जनार्दनीं कर्म धर्म पाठीं । वायीं भ्रम पोटीं घेती जीव ॥४॥
२७५१
देहिचेनि सुखें सुखावत । सुख सरतां दुःख पावत ॥१॥
ऐशी आहे बरोबरी । वायां शिणती निर्धारी ॥२॥
सुख दुःख ते समान । मुळींचेच हे दोन्हीं जाण ॥३॥
एकाजनार्दनीं सुखदुःख । अवघा जनार्दन एक ॥४॥
२७५२
देहबुद्धि जयापाशीं । पाप वसे त्या मानसीं ॥१॥
दोष जाण अलंकार । तेणें सत्य हा संसार ॥२॥
समूळ अहंतेच्या नाशीं । ब्रह्माप्राप्ति होय त्यासी ॥३॥
एकाजनार्दनीं अहंकार । त्याग करावा सत्वर ॥४॥
२७५३
होउनि विठोबाचा दास । करी आस दुजियाची ॥१॥
वायां माता व्याली तया । भूमार कासया अवनीसी ॥२॥
पूर्वज तया कंटाळती जन्मला । म्हणती खर हा ॥३॥
एकाजनार्दनीं म्हणे । तया पेणें यमलोकीं ॥४॥
२७५४
राहुनी पंढरी । आणिकाची आस करी ॥१॥
तो पातकी चांदाळ । खळाहुनी अमंगळ ॥२॥
सांडोनियां विठ्ठल देव । आणिकासी म्हणे देव ॥३॥
साडोनियां पुडलिका । गाय आणिकासी देखा ॥४॥
ऐसा पातकी तो खळक । तयाचा न वहावा विटाळ ॥५॥
म्हणे जनार्दनाचा एका । तया तेथें ठेवूं नका ॥६॥
२७५५
हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें ॥१॥
भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौर्यांयशीची बेडी दृढ पायीं ॥२॥
जैसें कर्म केलें तैसेक फळ आलें । कुंथतां वाहिले भार माथां ॥३॥
एका जनार्दनीं संशय न धरावा । आला तो भोगावा विषमकाळ ॥४॥
२७५६
जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें ॥१॥
प्रसवोनी तयां वांझ तो जननी । बुडविलीं दोन्हीं कुळें त्यानें ॥२॥
पूर्वज पतनीं पडती बेचाळीस । नाम न ये मुखास ऐसा प्राणी ॥३॥
एकाजनार्दनीं पतित दुराचारी । यम तया अघोरीं घालितसे ॥४॥
२७५७
अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण ॥१॥
तया व्यालीसे जननी । अभागी तो पापखाणी ॥२॥
न जाय पंढरपुरा । मांडी वेदान्त पसारा ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे । श्वानापरी जायाचें जिणें ॥४॥
२७५८
नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वायां जाण ॥१॥
न करी भजन न जाय पंढरीं । अभाविक दुराचारी सदा मनीं ॥२॥
जनार्दनाचा एक न पाहे त्याचें मुख । नरदेही देख पशुवत ॥३॥
२७५९
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥
ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥
जन्मोनी मरती पुन्हा जन्मा येती । होतसे फजिती मागें पुढें ॥३॥
एका जनार्दनीं नरकाचें बिढार । यमाचें तें घर माहेर केलें ॥४॥
२७६०
ऐसें कृपण मनाचें । तें या पंढरीसी न वचे ॥१॥
पापीयासी पंढरपुर । नावडे ऐसा निर्धार ॥२॥
ब्रह्माज्ञान पाषांडियां । नावडे काया वाचा जीवेंसी ॥३॥
विषयीं जो दुराचारी । तया नावडे ज्ञानेश्वरी ॥४॥
अभक्तांसी संत भेटी । झाल्या नावडे म्हणे चावटी ॥५॥
एका जनार्दनीं म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥६॥