अध्याय ५ वा
आता आम्ही " अग्रोपहरणीय " अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१॥२॥
कर्म तीन प्रकारचे आहे . पूर्वकर्म मुख्य उपचाराच्या पूर्वी करावायाचे असते ते , अथवा शस्त्रप्रयोग करण्यापूर्वी जे उपाय करावयाचे ते , प्रधानकर्म ( रोगावरील प्रत्यक्ष उपाय ), पश्चातकर्म म्हणजे ( मागाहून करावयाचे उपचार ) ह्या तीनही कर्माची उपचारांमध्ये कशी योजना करावयाची ते सांगतो ॥३॥
ह्या धन्वंतरीशास्त्रांत " शस्त्रचिकित्सा " हाच मुख्य असल्यामुळे आधी आम्ही शस्त्रकर्मासंबंधी माहिती सांगतो . व त्या कामी लागणारी साधानसामुग्रीही सांगतो ॥४॥५॥
ती शस्त्रक्रिया आठ प्रकारची आहे . ते प्रकार असे छेद्यकर्म ( कापणे ), भेद्य ( फोडणे ), लेख्य ( खरवडणे ) वेध्य ( भोक पाडणे ) एष्य ( व्रणात सळई घालून ती किती खोल जाते ते पहाणे ), आहार्य ( बाहेर काढणे ), विस्त्राव्य ( वाहविणे ), आणि सीव्य शिवणे .
ह्या आठ कर्मांपैकी कोणतेही कर्म करावयाचे असले तरी वैद्याने त्यासाठी पुढे सांगितलेली सर्व सामग्री आपल्याजवळ तयार ठेवावी . ती अशी -
सर्व तर्हेची यंत्रे , सर्व प्रकारची शस्त्रे ( हत्यारे ), आवश्यक लागणारे क्षार , अग्नि , सळ्या , शिंग , जळवा , रक्त काढण्यासाठी तयार केलेली तुंबडी , ( कडुभोपळा - ह्याचा उपयोग तुमडीप्रमाणे करितात ), जांबबोष्ठ ( व्रणासंबंधी झालेले क्षत कसे आहे ते पाहण्याची सळई ), पिचुप्रोत ( कापसाचा जाड पट्ट ), सूत्र ( शिवण घालण्याचे बारीक दोरे ), पत्र ( चकत्य ), पट्ट ( लांब धादोट्या ), मध , तूप , चर्बी , दूध , तेल , जखम भरुण आणणारी औषधे , धुण्याचे , शिंपण्याचे वगैरे काढे , लेप करण्याची मलमे , कल्क ( औषधे पाण्यात वांटून गंधाप्रमाणे रबट तयार करितात तो ), पंखे , थंड व ऊन पाणी , कढया वगैरे आवश्यक लागणारी भांडी , सर्व कर्मात कुशल किंवा प्रेमळ , धैर्यवान व बलवान असे सेवक ह्याप्रमाणे सर्व सामग्री तयार ठेवावी ( आधुनिक सर्व साधनेही असावी ॥६॥
नंतर तिथि , करण , मुहुर्त व नक्षत्र वगैरे शुभ अशी पाहून दही , अक्षता , अन्नपान व रत्ने वगैरे पदार्थांनी अग्नी ( होम करुन ), ब्राह्मण व वैद्य ह्यांचे पूजन करुन , देवतादिकांना बली द्यावे . ब्राह्मणांकडून मंगलकारक असे वेदमंत्राचे पाठ करवावे व पुण्याहवाचन करावे . नंतर रोग्याला हलके अन्न खाण्यास घालून पूर्वेकडे तोंड करुन बसवावे आणि तो हालचाल न करील अशा बेताने त्यास पीडा न होईल असे बंधन करावे . मग वैद्याने त्याच्यापुढे पश्चिमाभिमुख बसून मर्मस्थान , शिरा , स्नायु , हाडे , धमनी ह्यांना इजा न करिता अंगावरील लवीच्या भोवतालच्या वळणाला अनुसरुन पू बाहेर पडेल इतक्या खोलीपर्यंत एकदाच शस्त्र चालवावे . ( भोकसावे ) व झटकन काढून घ्यावे . व्रण शोथाचा पक्व भाग बराच मोठा असेल तर दोन किंवा तीन अंगुळे शस्त्रपद ( शस्त्राची खूण किंवा चिन्ह ) करावे . शस्त्राने फाडून क्षत करावयाचे ते पक्व सुजेच्या मानाने लांब , रुंद , विशाल ( पसरट ) चांगल्या पक्व शोथावर केलेले व चांगले विभक्त ( चिरलेले ) असावे . वाकडेतिकडे कुरतडल्यासारखे वगैरे नसावे . हे शस्त्राने केलेल्या क्षताचे लक्षण आहे . ह्याप्रमाणे क्षत केलेले उत्तम समजतात ॥७॥८॥
शस्त्र कर्म करणार्या वैद्याचे गुण
योग्य प्रमाणात लांब , रुंद , चांगला पसरट , चांगला चिरलेला , निराश्रय ( वर सांगितलेली मर्मादि स्थाने सोडून केलेला ) व फाडण्याला योग्य असा पक्व होताच फाडलेला असा जो शस्त्राने केलेला व्रण तो शस्त्रकर्मात प्रशस्त ( उत्तम ) मानला आहे ॥९॥
धैर्य , हातचलाखी ( अति जलद काम करणे ), शस्त्रे तीक्ष्ण धारेची असणे , काम करताना घाम न येणे , हात न कापणे , मनाचा व बुद्धीचा स्थिरपणा कायम असणे , काम चालू असतांना काय करावयाचे ह्याविषयी भ्रांति न पडणे , हे काम शस्त्रकर्म करणार्या वैद्याच्या अंगी अवश्य असले पाहिजेत ॥१०॥
एके ठिकाणी क्षत करुन त्यामधून वगैरे अशुद्ध भाग निघून गेला नाही तर धैर्याने आपल्या मनाशी चांगला विचार करुन ( आधी केलेल्या क्षतापासून दोन तीन अंगुळावर अशा अंतराने ) दुसरीही क्षते करावी ॥११॥
व्रणशोथात ज्या ज्या भागाकडे आतील पूवाची गति आहे म्हणजे जिकडे तिकडे मोकळा भाग ( नाडीव्रण आहे ), त्याचप्रमाणे सुजेचा उंचवट्याचा भाग ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी वर सांगितल्याप्रमाणे क्षत करुन आत पू वगैरे घाणेरडा दोषाचा भाग शिल्लक राहणार नाही अशी खबरदारी घ्यावी ॥१२॥
छेदन प्रकार
छेद करावयाचा तो भुवया , गाल , डोळ्याच्या बाजूने दोन्ही आख , कपाळ , अक्षिपुट ० ( डोळ्याच्या पापण्या ) ( " अक्षिपुट " ह्या ठिकाणी " अक्षिकुट " असा पाठ वाग्भट व वृद्ध वाग्भट ग्रंथातून आहे . वृद्ध वाग्भटांत तर हेच सूत्र थोड्या अधिक शब्दांनी जसेच्या तसेच घेतले आहे . तेव्हा अक्षिकूट ( डोळ्याच्या कोपर्याकडील खोलगट भागाचा कोश ) ( हा पाठ व अर्थ शुद्ध दिसतो ). ओठ दातांच्या हिरड्या , काख , कुशी , वक्षणसंबंधि ( आडसंधि - जांगाड ) ह्या ठिकाणी तिर्यक -( तिर्कस ) असा छेद करावा , असे सांगितले आहे ॥१३॥
हात , पाय ह्या ठिकाणी छेद करावयाचा असल्यास तो चंद्रमंडलाकार ( वर्तुळ ) आणि गुद व मेढ्र ( लिंग ) ह्या ठिकाणी छेद करावयाचा तो अर्धचंद्राकृति करावा ॥१४॥
वर सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी जसा छेद करावयाचा तसा केला नाही तर एकादी शीर ( रक्तवाहिनी ) किंवा स्नायु ( चिवट असा मांसरज्जु ) तुटण्याची भीति असते , आणि तसे झाले तर शीर किंवा स्नायू कापला गेल्यामुळे अतिशय वेदना होतात , व्रण लवकर भरुन येत नाही व जखमेवर मांसाच्या गाठी उद्भवतात ॥१५॥
मूढगर्भ , उदर , मुळव्याध , अश्मरी , भगंदर व मुखरोग ह्या विकारांत जेवणापूर्वी शस्त्रकर्म करावे ॥१६॥
शस्त्राचे काम झाल्यावर रोग्याच्या अंगावर थंड पाणी शिंपावे व गोड बोलून त्याला हुषारी आणावी . व त्यातील स्त्राव निघून जाण्याकरिता व्रणाच्या सभोवार हळूहळू दाबावे आणि व्रणावरही हळूहळू मर्दन करावे . व सद्योव्रण चिकित्साप्रकरणांत सांगितलेल्या धुण्याच्या काढ्याने सात दिवसपर्यंत धुवावे . नंतर दोषानुरुप काढे करुन त्यांनी धुवावे , व फडक्याच्या बोळ्यांनी हळूच टिपून व्रण कोरडा करावा . नंतर तिळाचा कल्क , तूप , मध व पुढे ह्याच स्थानांत मिश्रकाध्यायांत सांगितलेल्या तिळवण , मेढशिंगी वगैरे व्रणशोधक औषधांनी युक्त अशी वात व्रणांत घालावी . व त्यावर सद्योव्रणावर बांधावयास सांगितलेला औषधांचा कल्क ( मलम ) लावावा ; आणि त्यावर भग्न - चिकित्साप्रकरणांत सांगितल्याप्रमाणे पळसाची पाने किंवा उंबराची पाने बसवावी किंवा मऊ अशा कापडांची दुहेरी अगर तिहेरी घडी किंवा कापसाची जाड घडी ( कवलिका ) ठेवून वर पट्टा बांधावा . ( वाग्भटाने भाजलेले सातूचे पीठ तूपात मळून याची कवलिका ( लाथंबी ) बसवावी असे म्हटले आहे . ) वेदना शांत होण्याकरिता हिंग , सैंधव वगैरे वेदनाशामक औषधांची धुरी द्यावी . व रक्षोघ्नमंत्रांनी त्याची रक्षा ( दृष्टी - भूतादिकांच्या वाधेचे निवारण ) करावी ॥१७॥
नंतर गुग्गुळ , अगरु , राळ , वेखंड , पांढरे शिरस यांचे चूर्ण मीठ , कडुनिंबाचा पाला ही एकत्र तुपात कालवावी व त्याची धुरी द्यावी . ती धुरीची औषधे काढून घेतल्यावर त्या भांड्यात तळाला जे तूप राहिले असेल ते त्याच्या छातीस , मस्तकास वगैरे लावावे म्हणजे त्याच्या प्राणाला त्याने थोडे अवसान येते . ( शक्ती येते ॥१८॥१९॥
भरलेल्या घागरीतील पाणी घेऊन ते थोडे त्याच्या अंगावर व आसपास शिंपून पुढील मंत्रांनी रक्षाकर्म करावे ते सांगतो .
कृत्या ( डाकिनी वगैरे ) ह्यांचा नाश होण्याकरिता तसेच राक्षस ( भूत पिशाचादि ) वगैरेंचे भय ( पीडा वगैरे ) दूर होण्याकरिता मी रक्षाकर्म करितो . त्याकरिता ब्रह्मदेवाने मला अनुमोदन द्यावे . ( सहाय्य करावे ).
नाग , पिशाच्च , गंधर्व , पितर , यक्ष , व राक्षस वगैरे जे जे तुला पीडा करितात त्यांचा ब्रह्मादिदेवता नाश करोत . तसेच पृथ्वीवर अंतरिक्षात वगैरे संचार करणारे , तसेच घरात व घराच्या आसपासच्या दिशांचे ठिकाणी असणारे निशाचर तुझे रक्षण करोत . महर्षि , देवर्षि , राजर्षि , पर्वत , सर्व नद्या व सर्व सागर तुझे रक्षण करोत . अग्नी तुझ्या जीभेचे रक्षण करोत . वायु प्राणाचे रक्षण करोत . चंद्र व्यानाचे , पर्जन्य अपानाचे रक्षण करो . विद्युत उदान वायुचे रक्षण करो . मेघ समानाचे रक्षण करो . तुझ्या कानाचे गंधर्व रक्षण करोत . इंद्र सत्याचे रक्षण करो . वरुण राजा तुझ्या प्रज्ञचे व समुद्र नाभिमंडळाचे रक्षण करो . नक्षत्रे सतत तुझ्या रुपाचे व रात्र ही छायेचे रक्षण करो . आपोदेवता ही तुझ्या वीर्याचे रक्षण करो . औषधी ह्या रोमांचे रक्षण करोत . तुझ्या देहाच्या द्वारांचे आकाश रक्षण करो . तुझ्या देहाचे वसुंधरा रक्षण करो . वैश्वानर अग्नी तुझ्या मस्तकाचे रक्षण करो . विष्णु तुझ्या पराक्रमाचे रक्षण करो . पुरुषोत्तम तुझ्या पुरुषार्थाचे रक्षण करो . ब्रह्मदेव आत्म्याचे रक्षण करो . ध्रुव भुवयांचे रक्षण करो . ह्या देवता विशेषतः तुझ्या देहामध्ये नित्य आहेतच . ह्या तुझे सर्वदा रक्षण करोत . आणि त्यायोगे तु दीर्घायु हो . भगवान ब्रह्मदेव तुझे कल्याण करो . आणि सर्व देवही तुझे कल्याण करोत . अग्नि व वायु तुझे कल्याण करोत . नारद व पर्वत हे तुझे कल्याण करोत . सूर्य व चंद्र तुझे कल्याण करोत व महेंद्र पर्ववातासी देव किंवा महेंद्रादिदेव तुझे कल्याण करोत . ब्रह्मदेवाने केलेली ही रक्षा ( मंत्र ) तुझे कल्याण व आयुष्य ह्यांची वाढ करो . तुझे सर्व प्रकारचे उपद्रव ( संकटे वगैरे ) हे शांत होवोत . आणि सर्व व्यथा दूर होवोत . इति स्वाहा . ( रक्षा करणे म्हणजे त्याच्याजवळ बसून हे मंत्र म्हणून अंगारा मंत्रून त्याच्या कपाळास वगैरे लावावा . )
डाकिन्यादि दोष व व्याधि ह्यांचा नाश करणार्या ह्या वेदमंत्रांनी तुझे रक्षण केले आहे . तू दीर्घायु हो ॥२०॥३३॥
ह्याप्रमाणे रक्षाविधि केल्यावर त्याला घरांत न्यावा व कसे वागावे ह्याविषयी तपशीलवार माहिती सांगावी ॥३४॥
नंतर तिसरे दिवशी पट्टी सोडून पुनः पू वगैरे दोष काढून व्रण धुवून कोरडा करुन वात मलम वगैरे पूर्ववत लावून पुनः फडक्याने पट्टा बांधावा . घाईने लवकर बरे करावे अशा समजुतीने दुसरे दिवशी सोडू नये . दुसर्याच दिवशी जर पट्टी सोडली तर व्रण गाठाळतो व तो भरुन येण्यास उशीर लागतो . आणि अतिशय ठणकाही होतो . त्यानंतर दोषकाल , बळ इत्यादिकांचा विचार करुन काढा , लेप , बंधन , आहार व आचार वगैरे गोष्टीत योग्य तो फरक करावा ॥३५॥३८॥
व्रणात दोष शिल्लक असल्यास त्याजवर व्रण भरुन आणण्याची औषधे लावू नयेत . कारण यात दोष थोडा जरी शिल्लक राहिला तरी तो पुनः सुजेची फुगोटी उत्पन्न करतो व पुनः विकोपास चढतो . ( विकार करतो . )
ह्यासाठी अंतर्बाह्य शुद्ध अशाच व्रणाला भरुन आणण्याचे उपाय करावे .
व्रण भरुन आल्यावरदेखील त्या जागेला पूर्ववत बळकटी येईपर्यंत खाऊं नये , फार श्रम करु नयेत व मैथून वगैरे अपथ्यकारक गोष्टी वर्ज कराव्या . तसेच अतिशय हर्ष , क्रोध व भय ह्या गोष्टीही वर्ज कराव्या ॥३९॥
हेमंतऋतु , शिशिरऋतु व वसंतऋतु ह्या काळांत तीन तीन दिवसांनी व्रण सोडून तो स्वच्छ करावा , शरदऋतु व वर्षाऋतु ह्या काळात बुद्धिवानाने दोन दिवसांनी व्रणाचे शोधन करावे . जर रोग ( जखम ) अतिशय वाढलेली असेल तर त्याला मात्र हा नियम घेऊं नये . पेटलेल्या घराला विझवण्यासाठी करावी लागते त्याप्रमाणे अशा फार विकोपास गेलेल्या व्रणाची प्रतिक्रिया लवकर करावी . त्यावर उपचार रोजच्या रोज करावे ॥४०॥४१॥
शस्त्राच्या आघातामुळे ज्या तीव्र वेदना होतात , त्या मनुष्याच्या शरीराला फार पीडा देतात . अशी वेदना तूप , व जेष्ठमदाचा सुखोष्ण काढा शिंपल्याने कमी होतात ॥४२॥
अध्याय पाचवा समाप्त