अध्याय बत्तिसावा
आता मनुष्याच्या शरीराच्या नेहमीच्या स्थितीमध्ये पडणार्या फरकावरून जाणावयाची अरिष्ट ज्यांत सांगितली आहेत तो ‘‘स्वभावविप्रपत्ति ’’ नावाचा अध्याय भगवान् धन्वन्तरीनी सुश्रुतास जसा सांगितला तसाच आम्ही सांगतो ॥१ -२॥
शरीराचे भाग नेहमी जसे असतात त्या स्थितीमध्ये काही कारण नसता एकदम फरक पडला म्हणजे ते मरणाचे लक्षण जाणावे . जसे -डोळ्यांमधील पांढर्या भागाप्रमाणे जे भाग नेहमी पांढरेच असावयाचे ते काळे पडणे ; डोळ्यामधील बुब्बुळ , (तारुण्यामध्ये ) केस , मिशा व लव वगैरे काळे भाग पांढरे होणे ; डोळ्याचे कोपरे , टाळू , ओठ , जीभ वगैरे तांबड्या भागांना काहीतरी निराळाच वर्ण येणे ; केस , मिशा , नखे , दात , शिरा , स्नायू व स्त्रोते वगैरे घट्ट भाग मऊ होणे ; मांस , रक्त , मेद , मज्जा , शुक्र , नाभि , हृदय यकृत , प्लीहा वगैरे मऊ भाग घट्ट होणे , सांधे , जीभ वगैरे हालणार्या भागांची हालचाल बंद पडणे ; मांस , मेद , हाडे , नाभि वगैरे न हालणारे भाग हालावयास लागणे ; कपाळ , तोंड , पाठ वगैरे रुदं भाग संकुचित होणे ; डोळ्यांतील बुब्बुळ , नखे , केस वगैरे संकुचित भाग रुंद होणे ; हात , बोटे , पेरे वगैरे भाग आखूड होणे ; जांध , शिश्न , मान वगैरे भाग लांब होणे ; बोटे वगैरे ताठ रहाणारे भाग खाली लोंबावयास लागणे ; केस वगैरे खाली लोंबावयाचे भाग ताठ होणे ; अकस्मात् हात , पाय , उच्छ्वास वगैरे उष्ण भागांना थंडपणा येणे , नेहमी थंड असणारे भाग उष्ण होणे , केसासारख्या रुक्ष भागांना स्निग्धपणा येणे ; बुब्बुळासारख्या स्निग्ध भागाना रुक्षत्व येणे ; व शरीराचे अवयव एकदम बधिर होणे , त्यांचा रंग पालटणे , किंवा त्यांना थकवा येणे , अशा तऱ्हेने अकस्मात् फेरफार झाले असता ते अरिष्ट लक्षण समजावे ॥३॥
शरीराचा एकादा भाग खाली पडून लोंबणे . (भुवया , ओठ वगैरे ) किंवा ओठ , भुंवया वगैरे भाग वर चढणे , डोळे भ्रमिष्ठासारखे फिरविणे , तिरवे पहाणे , डोके , मान वगैरे सावरता न येणे (पतितत्व ); सांधे हलके पडणे , तसेच जीभ , डोळे व नाक ही तीनही अगर एकादे आत ओढणे , शरीराचे अवयव एकाएकी जड किंवा हलके वाटणे , (म्हणजे हात , पाय , मांड्या वगैरे हलक्या वाटणे व डोळ्याच्या पापण्या वगैरे जड वाटणे ), शरीराला पोवळ्याप्रमाणे तांबूस वर्ण येणे अथवा अंगावर अकस्मात् तांबड्या रंगाचा वांग (व्यंग ) नावाचा क्षुद्र रोग होणे , कपाळावर तांबुस शिरा दिसणे , नाकाच्या दांडीवर व कपाळावर तांबड्या पुटकुळ्या उठणे , प्रातःकाळी कपाळास घाम येणे (हे प्रत्येक ज्वराचे असाध्य लक्षण आहे ), डोळ्याचा वगैरे विकार नसताना डोळ्यातून सारखे पाणी जाणे गाईच्या शेणाच्या गोवरासारखा रंग मस्तकास दिसणे किंवा त्या गोवराचे चूर्ण मस्तकावर आहेसे दिसणे , (ह्या अरिष्टाची मुदत एक महिना असते ,) पारवा किंवा होला , कंकपक्षी व कावळा ह्यापैकी कोणीतरी डोक्यावर बसणे , अन्न वगैरे काही खात नसतानाही लघवी व शौचास पुष्कळ होणे , अथवा यथेच्छ खातपीत असूनही मलमूत्र न होणे , स्तनांच्या मूळांच्या ठिकाणी , हृदयाच्या ठिकाणी व छातीत अतिशय दुखणे , मध्ये शरीराच्या मधील भागी (पोट , पाठ , मान वगैरे भागी ) सूज असून हातपाय शुष्क (बारीक ) होणे किंवा हातापायांस सूज असून मधील भाग (पोट वगैरे ) कृश असणे
( हे अरिष्ट एक महिन्याच्या मुदतीत असते .) अथवा शरीराच्या अर्ध्या अंगाला उजव्या किंवा डाव्या कोणत्याही एका भागाला सूज असून दुसरा भाग कृश होणे , मुळीच बोलता न येणे , आवाज आंत ओढल्यासारखे बोलणे , अडखळत बोलणे किंवा नेहमीच्या आवाजात विलक्षण बदल होणे , दांत , तोंड , नखे किंवा सर्वांग ह्यांच्या ठिकाणी फिक्कट रंगाचे ठिपके दिसणे , ही सर्व मृत्युसूचक चिन्हे आहेत .
ज्या रोग्याची थुंकी (कफ ), मळ (शौच ) किंवा शुक्र ही पाण्यात टाकली असता बुडतात . (ह्या तीनही गोष्टी एकदम जर घडल्या तर दुश्चिन्ह समजावे . ह्याची मुदत एक महिन्याची आहे .) ज्याच्या दृष्टीला विकृतावस्थेमुळे बेल , घोडे वगैरे किंवा विद्रूप आकृति (कोणाला तीन पाय ती डोकी आहेत असे विपरीत दिसते ). दिसतात त्याला हे दुश्चिन्ह समजावे . अंगाला व केसाला तेल लावले नसूनही अंगाला तेल लावल्या सारखे वाटते , तसेच ज्या दुर्बल मनुष्याला अन्न मुळीच नकोसे होते व जो अतिसाराने पीडलेला असतो तो मरणार म्हणून समजावे . तसेच ज्याला खोकला अतिशय असून तहान फार लागते , किंवा जो क्षीण झाला असून ओकारी व अन्नद्वेष ह्यांनी पिडला आहे तो मरणार म्हणून समजावे .
फेसयुक्त रक्त व पू मिश्र अशी वांती होत असून ज्याचा आवाज बसला (क्षीण झाला आहे ) आणि पोट दुखण्याने किंवा सर्वांग दुखण्याने व्यापला आहे तो रोगी असाध्य समजावा .
ज्या क्षीण झालेल्या मनुष्याला अन्नद्वेष आहे , ताप व खोकला ह्यांनी बेजार आहे , हातापायाला सूज आहे व ज्याच्या पिढर्या , खांदे , पाय वगैरे गळल्यासारखे वाटत आहेत तो मरणार असे समजावे .
ज्याचे आदले दिवशी खाल्लेले अन्न दुसरे दिवशी तसेच ओकून पडते किंवा पचन न होता तसेच जुलाब होऊन पडते आणि तो ज्वर व खोकला ह्यांनी बेजार होतो , त्याला श्वासाचा आजार झाला असता तो मरण पावतो .
अंड उतरल्यामुळे जो बोकडाप्रमाणे ओरडतो आणि जमिनीवर पडतो , ज्याचे शिस्न ताठते , किंवा आंत ओढल्यामुळे नाहीसे होते व मान सावरत नाही तो मरणार असे समजावे . अशा लक्षणाचा मनुष्य देखील श्वासाच्या आजाराने मरतो .
स्नान केल्यावर सर्व अंग ओले असून ज्याचे हृदय (छाती ) आधी कोरडी होते त्याला ते अरिष्टसूचक आहे . (ह्याची ) मुदत पंधरा दिवस असते .
जो मनुष्य ढेकळाने ढेकळे फोडेतो अथवा लाकडाने लाकूड फोडतो , अथवा नखांनी गवताच्या काड्या मोडतो , खालचा ओठ दातांनी चावतो . किंवा वरचा ओठ जिभेने वरचेवर उपटतो , त्याचा मृत्यु जवळ आला म्हणून समजावे .
जो रोगी देव , ब्राह्मण , गुरू , आपले इष्टमित्र व वैद्य ह्यांचा द्वेष करितो तो ‘‘गतायु ’’ समजावा . ह्या अरिष्टाचा रोगी एक वर्षपर्यंत जगतो .
वक्री झालेले किंवा वक्री होऊन नुकतेच मार्गी झालेले ग्रह अनिष्टस्थानी (जन्मराशीस अगर लग्नास सहा , आठ , बारा ह्या स्थानी ) असल्यामुळे पीडा करितात अथवा जन्मराशीला असल्यास पीडा करितात ; हेही अरिष्टच समजावे . ज्याच्या जन्मनक्षत्री चंद्र असता किंवा जन्मलग्नी चंद्र असता त्या नक्षत्रावर अगर लग्नावर उल्कापात होतात (तारे पडतात ) किंवा वीज पडते तेही अरिष्टच समजावे .
तसेच घरावर अशुभ पक्षी वगैरे बसणे , पत्नीला अपशकून होणे , आंथरूण , पांघरूण , बैठक , गाड्या , घोडी वगैरे वाहने , मणी , रत्ने वगैरे अलंकार ह्यांच्या संबंधात देखील जर अशुभ दिसू लागली तर ती सर्व मरणसूचक समजावी ॥४॥
ज्याचे बल व मांस क्षीण झाले आहे (जो फार अशक्त झाला आहे ) अशा रोग्याला यथायोग्य उपचार चालूनही जर त्याचा रोग वाढतच चालला तर त्या रोग्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे .
ज्या मनुष्याचा वातरोग , उदररोग , ह्यासारखा महानरोग बरा झाल्यासारखा दिसतो , पण तो जो आहार करितो (खातो पितो ) याचा मात्र थोडा देखील उपयोग झाल्याचे दिसत नाही , तो मरणार म्हणून समजावे .
ही मरणसूचक चिन्हे योग्य रीतीने ज्या वैद्याला समजतात , तो रोग्याचा साध्यासाध्यतेविषयी निर्णय करण्याच्या कामी राजाकडून देखील पूज्य मानला जातो ॥५ -७॥