अनुपवर्ग
अनुपवर्गाचे पाच प्रकार आहेत ते असे -कुलचर (जलशयांच्या काठी संचार करणारे ), प्लव (पाण्यावर पोहत पोहत भक्ष्य मिळविणारे ), कोशस्थ , (शंख , शिंपा वगैरे कोशांत राहणारे ) पादिन (पायांनी जलसंचार करणारे ) आणि मत्स्य (मासे ) असे पाच प्रकार आहेत .
त्यापैकी हत्ती , गवे , रेडे , रुरु , (रोहे हरणाची जात ), चमर (ज्याच्या शेपटीच्या केसाच्या चवर्या करितात तो (रानडुक्कर ), रोहित (तांबडा हरीण ), हुक्कर , खडगी (गेंडा ), गोकर्ण (सांबर ), कालपुच्छक (भेकर ), ओन्द्र (पाणमांजर -उद ), पाणमांजर -उद , न्यंकू (सांबराची एक जात .) व रान गाय इत्यादि पशु कुलचर आहेत ॥९३ -९४॥
कुलचर पक्षी सामान्यतः वातपित्तनाशक , वृष्य , रुचीला व विपाकाला मधुर , थंड , शक्तिवर्धक , स्निग्ध , मूत्रवर्धक व कफकारक आहेत .
हत्ती हा रूक्ष , लेखन , ऊष्णवीर्य , पित्ताला दूषित करणारा , रुचिला गोड , किंचित् आंबट व खारट आणि कफवातनाशक आहे . गव्याचे मांस स्निग्ध , मधुर , खोकल्याचा नाश करणारे , मधुरविपाकी व कामोद्दीपक आहे . रेड्याचे मांस स्निग्ध , उष्ण , मधुर , वृष्य , तृप्तिकारक , जड , निद्राकारक , पुरुषत्वदायक , शक्तिवर्धक , स्त्रियांच्या दुधाची वाढ
करणारे आणि मांसवर्धक आहे . रुईचे मांस मधुर , किंचित् तुरट , वातपित्तनाशक , जड व शुक्रवर्धक आहे , तसेच चमर जातीच्या पशूचे मांस स्निग्ध , मधूर , खोकल्याचे नाशक आहे . तसेच ते मधुरविपाकी असून वातपित्तनाशक आहे . रानडुकराचे मांस किंचित् तुरट , वातपित्तनाशक , जड व शुक्रवर्धक आहे . गावातील डुकराचे मांस स्वेदन (घाम आणणारे ), पौष्टिक , वृष्य , थंड , तृप्तिकारक , जड , श्रम व वातनाशक , स्निग्ध व बलवर्धक आहे . गेंड्याचे मांस कफनाशक , तुरट , वातनाशक , पितरांना प्रिय , पवित्र (श्राद्धकर्मात ), आयुष्यवर्धक , मूत्राचा अवरोध करणारे व रुक्ष आहे . गोकर्ण (सांबराचे ) मांस मधुर , स्निग्ध , मृदु , कफकारक , मधुरविपाकी आणि रक्तपित्तनाशक आहे ॥९५ -१०५॥
हंस , सारपक्षी , क्रोच (करकोचा ), चक्रवाक , कुरर (करढोकपक्षी ), कांदबक (कलहंस ), कारंडव (ह्याची चोच कावळ्य़ाप्रमाणे लांब असून रंग काळा असतो . ह्याला करडुवा असे म्हणतात .),
जीवंजीवक (हा विषदर्शन झाले असता मरतो ), बगळा , बदक (बलाका ), पुंडरीक , प्लव (पाणकावळा ), शरीरमुख (आडी बगळ्य़ाचा भेद ), नंदीमुख (आडी पक्ष्याचाच एक भेद ), मद्गु (पाणकावळ्य़ाचाच एक भेद ), उत्क्रोश (हा कुरर पक्ष्याचा भेद आहे . हा मासे खातो ), काचाक्ष , मल्लिकाक्ष , शुक्लाक्ष पुष्करशायिका , (कमळीणीच्या पानावर वस्ति करणारा ), कोनालक ह्याची पाठ काळी व पोट पांढरे असते , (कोणी ह्याला पाण चिमणी म्हणतात ) पाणकोंबडा , मेघराव (चातकपक्षी ), श्वेतबारल (बदकातील मोठी जात ) इत्यादि पक्षी प्लववर्गातील आहेत . हे कळप करून राहातात .
प्लववर्गातील पक्षी सामान्यतः रक्तपपित्तनाशक , थंड , स्निग्ध , वृष्य , वातनाश्क , मलमूत्र साफ करणारे आणि रुचीला व विपाकाला मधुर आहेत त्यापैकी हंस जड , उष्ण , मधुर , स्निग्ध , असून स्वर व अंगाचा वर्ण चांगला करणारा , बलदायक , पौष्टिक , शुक्रवर्धक व वातनाशक आहे ॥१०६ -१०७॥
शंख , क्षुद्रशंख , समुद्रातील शिंपा , शंबुक (शंखातील गोगलगाय ), कवडी ह्यामध्ये असणारे प्राणी हे कोशस्थवर्गातील आहेत .
कासव , कुंभीर , (नक्र किंवा सुसर ह्याचे अनेक भेद आहेत ), कर्कटक (खेकडा ), काळा खेकडा , शिशुमार (ही देखील सुसरीचीच जात आहे . ही फार मोठी असते .) इत्यादि जलचरप्राणी हे पादीनवर्गातील आहेत .
शंख कासव वगैरे पादीनवर्गातील बहुतेक प्राणी रुचीला व विपाकाला मधुर , वातनाशक , थंड , स्निग्ध , पित्तरोगात पथ्यकारक , मळ अधिक करणारे व कफ वाढविणारे आहेत . त्यापैकी काळा खेकडा शक्तिवर्धक , किंचित् उष्ण व वातनाशक आहे आणि पांढरा खेकडा मोडलेले हाड सांधणारा , मलमूत्र साफ करणारा आणि वातपित्तनाशक आहे ॥१०८ -१११॥
माशांचे दोन भेद आहेत . एक नदीतील (गोड मासे ) आणि दुसरे समुद्रातील (खारे मासे ), त्यापैकी नदीतील मासे रोहित (रोहीमासा ), पाठीन (हा लांबट , खवलेरहित व स्वच्छ असतो ) पाटला राजीव , वर्मि (वांब ), गोमत्स्य , कृष्णमत्स्य (ह्याला खवले व कांटे फार असतात .), वागुंजार , मुरल , सहस्रदंष्ट्र , इत्यादि मासे नदीत राहाणारे आहेत .
नदीतील सर्व मासे सामान्यतः मधुर , जड , वातनाशक , रक्तपित्तकारक , उष्ण , वृष्य , स्निग्ध व मळ थोडा करणारे आहेत . त्यापैकी रोहीमासा किंचित् तुरट असून पाण्याच्या काठचे कोवळे गवत व शेवाळ खाऊन असतो . हा वातनाशक व पित्तप्रकोप करणारा आहे . पाठीन मासा कफकारक , वृष्य झोप आणणारा , मांसभक्षक , रक्त व पित्त ह्यांना दुषित करणारा व कुष्ठ उत्पन्न करणारा आहे . मूरलमासा पौष्टिक , वृष्य , स्त्रियांचे दूध वाढविणारा व कफकारक आहे . सरोवर व तलाव ह्यातील मासे स्निग्ध व मधुर असतात . मोठ्या डोहातील (पुष्कळ पाण्यातील ) मासे शक्तिवर्धक असतात आणि थोड्या पाण्यातील मासे शक्ति न वाढविणारे (अल्पबल ) असतात ॥११२ -११७॥
तिमिमासा (हा फार मोठा असतो ), तिमिंगिलमासा (त्याहूनही मोठा असतो .) कुलिशमासा , पाकमत्स्य , निरुलक (निरालक मासा ), नंदीवारलक , मकर , गर्गरक , चंद्रक (हा वर्तुलाकृति असतो .) महामीन आणि राजीव इत्यादि मासे समुद्रामध्ये असतात .
साधारणतः समुद्रातील सर्व मासे जड , स्निग्ध , फारसे पित्त न करणारे , उष्ण , वातनाशक , वृष्य , मळ वाढविणारे , कफवर्धक आहेत . हे समुद्रातील मासे मांसभक्षक असल्यामुळे शक्तिवर्धक आहेत . समुद्रातील माशांपेक्षा नदीतील मासे पौष्टिकपणामुळे अधिक गुणाचे आहेत . न बांधलेल्या किंवा बांधीव विहिरीतील मासे वातनाशक असल्यामुळे नदीच्या माशांपेक्षाही गुणाने अधिक आहेत . आणि स्निग्ध व मधुरविपाकी असे वापीतील मासे असल्यामुळे ते विहिरीतील व चौंडीतील माशाहूनही गुणाने श्रेष्ठ आहेत .
नदीतील मासे तोंड व शेपटी ह्यांच्या सर्व प्रकारच्या हालचाल करितात , म्हणून त्यांच्या शरीराचा मधील भाग (मधील भागातील मांस ) जड असतो . सरोवर व तळे ह्यातील माशाचे मस्तक विशेषतः हलके असते . पर्वतातून निघणार्या झर्याच्या पाण्यातील माशांना तेथल्या तेथेच फिरण्यामुळे फार श्रम होत नाहीत . त्यामुळे त्याच्या मस्तकाचा काही भाग हलका असतो , पण बाकीचे सर्व शरीर जड असते . सरोवरातील माशांचा मागील भाग जड असतो . आणि ते छातीने पाण्यात संचार करीत असल्यामुळे त्यांचा पुढील भाग हलका असतो , ह्याप्रमाणे हा अनूपवर्गातील मांसवर्ग सांगितला . ह्या वर्गातील प्राण्यांचे मास फार अभिष्यंदि असते ॥११८ -१२५॥
वाळलेले मांस , कुजलेले किंवा दुर्गंधियुक्त मांस , रोगट प्राण्याचे मांस विषारी सर्पाने स्पर्श केलेले मांस , विषारी द्रव्यादिकांनी लपेटलेले मांस , शस्त्रादिकांनी छिद्र पडलेले मांस , वृद्ध पशूंचे मांस , रोडक्या पशूंचे मांस अति लहान पशूंचे मांस व भलतेसलते भक्ष्य खाणार्या पशूंचे मांस , अशा प्रकारचे सर्व मांस हीनवीर्य , दूषित , विषाराने ज्याचे गुण नष्ट झाले आहेत असे , जीर्णपणामुळे निसत्त्व व बालांचे मांस अल्पवीर्य , असल्यामुळे ते दोष उत्पन्न करिते . ह्यासाठी वर सांगितलेले सर्व प्रकारचे मांस वर्ज करून चांगले मांस असेल तेच घ्यावे .
शुष्क मांस , बेचव पडसे असणारे व जड आहे . विषाचा संसर्ग झालेले व विषारी रोगयुक्त पशूंचे मांस ओकारी उत्पन्न करणारे आहे . वृद्ध पशूंचे मांस खोकला व श्वास उत्पन्न करिते . रोगयुक्त पशूचे मांस त्रिदोषकारक असते . कुजकट मांस मळमळ उत्पन्न करिते . आणि कृश पशूचे मांस वाताचा प्रकोप करिते ॥१२७ -१२८॥
चतुष्पाद पशूंमध्ये स्त्रीजातीचे मांस , पक्ष्यांमध्ये पुरुषजातीचे (नराचे ) मांस , स्थूल शरीराच्या प्राण्यांमध्ये त्यांतल्यात्यात लहान बांध्याच्या प्राण्याचे मास लहान बांध्याच्या प्राण्यांमध्ये त्यांतल्यात्यात मोठ्या प्राण्याचे मांस , हे गुणाने श्रेष्ठ असतात . ह्याच रीतीने एकाच जातीच्या प्राण्यामध्ये मोठ्या अंगाच्या प्राण्यापेक्षा लहान बांध्याचा प्राणी विशेष श्रेष्ठ आहे ॥१२९॥
आता शरीराच्या निरनिराळ्या स्थानपरत्वे कोणाचे मास हलके व कोणाचे जड ते सांगतो . ते असे ——रक्तापासून शुक्रापर्यंतचे जे धातु त्या क्रमाने उत्तरोत्तर जास्त आहेत , म्हणजे शुक्र हे सर्वात अत्यंत जड आहे .
त्याचप्रमाणे मांड्या , खांदे , हृदय , मस्तक , पाय , हात , कंबर , पाठ , चर्म , कालेयक (वृक्क ) यकृत व आतडी ह्या अवयवांच्या ठिकाणचे मांस क्रमाने फार जड आहे , म्हणजे आतड्याचे मांस सर्वात फार जड समजावे .
मस्तक , खांदे , कंबर , पाठ , मांड्या , ह्या अवयवांचे मांस शेवटाकडून क्रमाने पूर्वीचे (आधीचे ) जड समजावे . म्हणजे मस्तकाचे मांस सर्वात जड व वरच्या भागाचे हलके ह्या
क्रमाने जाणावे आणि रक्तादि धातु मात्र उत्तरोत्तर (पुढच्या पुढच्या ) जड समजावे . म्हणजे शुक्रधातु सर्वात अत्यंत जड समजावा . सर्व प्राण्यांच्या शरीरापैकी मध्यभाग हा जड असतो . पुरुषजातीचा पुढला भाग व स्त्रीजातीचा मागील भाग जड असतो . पक्ष्यांच्या शरीरामध्ये त्याच्या छातीचा भाग व मानेचा भाग हा जड असतो . आणि पंख हलविण्याच्या योगाने (श्रमाने ) पक्ष्यांचा मध्यभाग फार जड किंवा फार हलका नसून समस्थितीत असतो .
फळे खाणार्या पक्ष्यांचे मास फार रुक्ष असते . मांस भक्षक पक्ष्याचे मांस फारच पौष्टिक असते . मासे खाणार्या पक्ष्याचे मांस पित्तकारक असते आणि धान्य खाणार्या पक्ष्याचे मांस वातनाशक असते .
जलज (पाण्यात संचार करणारे ), अनूपज (पाण्याच्या सन्निध असणारे ) ग्राम्य (गावात असणारे ), क्रव्याद (मांसभक्षक ) एकशफ (एक खुराचे ) प्रसह (जबरीने भक्ष्य मिळविणारे ) बिलावास (बिळात राहणारे ) तसेच जे जांगलवर्गातील आहेत ते म्हणजे प्रतुद (चोचीनें टोचून भक्ष्य खाणारे ) व विष्किर (पायानी उकरून भक्ष्य मिळविणारे ), हे उत्तरोत्तर हलके आहेत व किंचित् अभिष्यंदि (आर्द्रता करणारे ) आहेत . म्हणजे विष्किर पक्षी सर्वात हलके व फारच कमी अभिष्यंदि (ओलसरपणा करणारे ) आहेत . आणि हेच शेवटाकडून पूर्वी पूर्वीचे जड व फार अभिष्यंदी (ओलसरपणा आणणारे ) आहेत . म्हणजे जलचर प्राणी फार जड असून फारच अभिष्यादि (ओलावा आणणारे आहेत ॥१०३ -१३६॥
ज्या जातीचा पशू किंवा पक्षी असेल त्या जातीच्या पशूंची किंवा पक्ष्यांची सामान्यतः शरीराची पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्या शरीराच्या स्थूलपणाचे जे सामान्य मान त्यातून एखादा पशू किंवा पक्षी अधिक स्थूल असेल तर त्याचे मांस सत्त्वाने कमी असून पचनाला जड असते . प्राण्याच्या सर्व शरीरापैकी अत्यंत श्रेष्ठ भाग म्हणजे जे यकृत त्या यकृताच्या भागात असणार्या वळ्य़ाचे मांस विशेषतः घ्यावे . तसे नच मिळाले तर मध्यम वयाच्या प्राण्याचे ताजे व मनाला आवडणारे असे मास घ्यावे .
ज्या प्राण्याचे मास घ्यावयाचे तो प्राणी जांगलादि कोणच्या देशात संचार करणारा आहे , त्याचा आहार उष्ण , थंड किंवा जड , हलका वगैरे कशाप्रकारचा आहे , त्याचे शरीरावयव कशाप्रकारचे आहेत , (निर्दोप किंवा कोणी दंश वगैरे केलेले अगर रोगट ) त्या प्राण्याचा स्वभाव कसाआहे , म्हणजे हिंसक अगर निरुपद्रवी आहे , त्याचा जो धातु घ्यावयाचा तो जड आहे किंवा हलका आहे , त्याची क्रिया काय आहे , म्हणजे तो हालचाल कशाप्रकाराने करितो , तो नरजातीपैकी आहे की मादीजातीपैकी आहे , त्याचा शरीर बांधा त्याच्या जातीच्या मानाच्या मानाने स्थूल आहे की कृश आहे , जे मांस खाण्याकरिता तयार केले असेल त्यावर तळण्याचे वगैरे काय काय संस्कार केले आहेत आणि ते किती खाल्ले असता आपल्या प्रकृतीला मानवेल इत्यादि सर्व गोष्टींचा विचार करून व पाहून मग ते मांस खाण्यास घ्यावे ॥१३७ -१३८॥