अध्याय तेविसावा
आता ‘‘कृत्याकृत्यविधि ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥
जे तरुण आहेत , सामर्थ्यवान आहेत व धैर्यवान आहेत , त्यांना झालेले व्रण उपचार करण्यास फार सुलभ असतात . आणि हे वरील चारीही गुण जर एकच पुरुषाच्या ठिकाणी असतील तर अशा पुरुषाचे व्रण तर फारच लवकर व अत्यंत सुखकारकपणाने साध्य होतात .त्यापैकी मनुष्य तरुण असला म्हणजे त्याचे रसादि सर्व धातु नव्या जोमाचे असतात व त्यामुळे व्रण लवकर भरून येतात . जो मनुष्य शरीराने बळकट असतो त्याचे मांस घट्ट व पुष्कळ असल्याकारणाने शस्त्रक्रिया करताना शिरा , स्नायु वगैरे विशेष नाजुक भागाला शस्त्र लागण्याची भीती नसते . (त्या भागांना शस्त्र पोहोचत नाही .) जे सामर्थ्यवान आहेत त्यांना वेदना , आघात व पथ्यादिकाचे नियम ह्यांच्या योगाने ग्लानी (थकवा ) येत नाही आणि जे धैर्यवान आहेत त्यांच्यावर जरी दुःसह शस्त्रक्रिया केली तरी त्यांना त्यापासून फारशी व्यधा होत नाही , म्हणून अशा लोकांचे व्रण अत्यंत सुखसाध्य असतात .
तेच हे व्रण ह्याच्या उलट म्हणजे वृद्ध , कृश , सामर्थ्यहीन व भित्र्या अशा लोकांना झाले तर वरील चार हीन गुणांपैकी एकाच हीन गुणाने युक्त असतील तर कष्टसाध्य , दोन तीन हीन गुणाने युक्त असतील तर थोडे जास्त कष्टसाध्य व चारी हीन गुणयुक्त असतील तर अत्यंत कष्ट साध्य समजावे .
नितंब भाग (कुल्ले ), गुद , लिंग , कपाळ , गाल , ओठ , कान अंडकोष्ठ , पोट , मानेच्या मुळाशी व तोंडाच्या आतील भाग ह्या ठिकाणचे व्रण फार आयास न पडता सुखाने भरून येतात .
डोळे , दात , नाक , डोळ्यांचा आखाकडील भाग , कान , बेंबी , पोट , शिवण , नितंब , भाग , बरगड्या , कुशी , हृदय , काख , स्तन व सांध्याचे भाग ह्या ठिकाणी झालेले , फेसाने मिश्रित पू व रक्त ज्यातून बाहेर येत आहे असे , आत मध्ये ज्यांच्या शल्य राहिले आहे ते , असे व्रण चिकित्सा करण्यास फार कठीण आहेत .
शरीराच्या खालच्या भागी झाले असून वर तोंड पडल्यामुळे उलटे वर वाहणारे , केसांच्या , आणि नखांच्या मुळांशी , मर्मस्थानी , पिंढरीचे ठिकाणी व हाडावर झालेले व्रण आत गती असलेले , भगंदर किंवा शिवण व कूटकास्थि (माकडहाड ) ह्यांच्या आश्रयाने झालेले , भगंदर हे व्रणही वरील प्रमाणेच कष्टसाध्य आहेत .
कुष्ठी मनुष्याचे व्रण , विषबाधा झालेल्या मनुष्याचे व्रण , क्षयी मनुष्याचे व्रण , आणि एकदा व्रण होऊन बरा झाल्यानंतर त्याच जागी पुनः झालेला व्रण इतक्या प्रकारचे व्रण फार कष्टाने बरे होतात .
अवपाटिका (लिंगाच्या अग्रभागास इजा ), निरुद्ध -प्रकाश (मूत्रमार्गावरोध ) सन्निरुद्धगुद , पोटावरील गाठीचा व्रण होऊन त्यात कृमी झाले तर ते , पडशामुळे नाकात होणारे कृमी , कोठ्यातील व्रणात होणारे , त्वचेचे रोग व प्रमेह ह्यांच्या व्रणातून झालेले कृमी , कूत्रशर्करा , सिकतामेह , वातकुंडलिका ,अष्ठिला , दंतशर्करा , उपकुश (एक दातांचा रोग ), कंठशालूक (गळ्यात होणारी एक ग्रंथी ), विषारी काडीने दात घासल्यामुळे फुगलेल्या हिरड्या , विसर्प , हाड्याव्रण , उरःक्षत , व व्रणाच्या गाठी अशा प्रकारचे व्रण याप्य (म्हणजे औषध सतत चालू आहे तोपर्यंत बरे असणारे ) आहेत .
जर व्रणावर उपायच केले नाहीत तर ते साध्य असलेले याप्य होतात . याप्य असलेले असाध्य होतात आणि जे असाध्य असतात ते प्राणाची हानि करितात .
औषधोपचार चालू आहेत तोपर्यंत जे बरे असतात ते याप्य समजावे . ते याप्य व्रण (किंवा रोग ) औषधोपचार बंद पडले की तात्काळ रोग्याचा नाश करितात .
पडणार्या घराला उत्तम प्रकारे खांबाचा आधार दिला असता तो , जसा त्या घराला सावरून धरितो , त्याप्रमाणे याप्य रोग आहे , अशा मनुष्याला योग्य औषधोपचार मिळाले असता त्याचे आयुष्य आहे तोपर्यंत तो जगतो .
आता असाध्य व्रण सांगतो . मासाच्या गोळ्याप्रमाणे वर उचललेले , अतिशय स्राव होत असलेले , ज्यांच्या आतील भागात पू असून वेदनायुक्त असे , घोडीच्या
जननेंद्रियाप्रमाणे ज्यांचे काठ वर आलेले आहेत , असे , कित्येक कठीण असून त्यांच्यावर गाईच्या शिंगाप्रमाणे उंच असे मांसाचे मृदु अंकूर असलेले , दुसरे कित्येक दूषित रक्त वाहात असलेले किंवा पातळ , थंड व बुळबुळीत स्राव होत असलेले मध्यभागी उंच असे , ज्यांची छिद्रे फार लांबपर्यंत खोल गेली आहेत असे , तागाच्या किंवा कापसाच्या सुताच्या जाळ्याप्रमाणे ज्यांच्यामध्ये स्नायुचे जाळे पसरले आहे व ज्यांच्याकडे पहावत नाही असे ज्यांच्यामधून वसा , मेद , मज्जा , ह्यांचा व मस्तकातील मेंदूपासून निघणारा एक तुपासारखा पदार्थ (मस्तुलुंग ) ह्याचा स्राव होत आहे असे व्रण जर वातादि दोषापासून व्रणशोथ उत्पन्न होऊन झालेले असले तर ते (आंगंतुक आघातजन्य नव्हते ) व्रण असाध्य असतात . तसेच ज्या कोठ्यातील व्रणाच्या छिद्रातून पिवळा , काळा असा स्राव होतो किंवा तशा रंगाची लघवी त्यातून येते , तसेच त्यातून मळही येतो व वायूही येतो ते व्रण , तसेच कोठ्यात झालेले व्रण कोठ्यातच असल्यामुळे त्यांचा पु रक्त वगैरे स्राव व्रणाच्या तोंडावाटे होऊन शिवाय त्या रोग्याच्या तोंडातून अगर मलभागातून होत असल्यास तसले व्रणही असाध्यच .
त्याचप्रमाणे ज्यांचे मांस क्षीण झाले आहे अशा मनुष्याचे व्रण , ज्यांना अनेक तोंडे असून ती फार बारीक आहेत असे व्रण असाध्य समजावे . ह्यांच्यामधून मासाचे बुडबुडे येत असतात . मस्तक व गळा ह्यांच्या ठिकाणी झालेल्या व्रणातून (व्रणाच्या छिद्रातून ) जर शब्दयुक्त वायु येत असेल तर ते असाध्य समजावे . ज्याचे मांस क्षीण झाले आहे म्हणजे जे रोडले आहेत , ज्या व्रणातून पू व रक्त वाहात असून , अरुची , अपचन , खोकला व श्वास हे उपद्रव होत असेल तर ते व्रण असाध्य असतात . त्याचप्रमाणे मस्तकाचे कवच फुटून झालेली जी जखम निजमधून मस्तुलुंग (मेंदूपासून निघणारा तुपासारखा एक पदार्थ ) बाहेर येत असल्याचे दिसले व त्या जखमेत तीनही दोषांची लक्षणे दिसू लागली किंवा त्या रोग्याला खोकला व श्वासय हे उपद्रव झाले तर ती जखम असाध्य समजावी ॥१ - २॥
ज्या व्रणामधून वसा (चर्बी ) मेद , मज्जा व मस्तुलुंग (मेंदुजन्य स्निग्ध स्राव ) ह्यांचा स्राव होतो असा व्रण जर आगंतुक (आघाताने झालेला ) असेल तर तो साध्य होतो पण तोच जर वातादि दोषजन्य असेल तर साध्य होत नाही .
मर्माचे स्थान सोडून , शिरा , सांधे , हाडे वगैरे सोडून झालेला असा जरी व्रण असला तरी औषधोपचार चालू असूनही जर तो रसादि सर्व धातूंना व्यापील (सप्तधातुगत होईल ) तर त्याचे ते असाध्य लक्षण समजावे .
जो व्रण क्र्रमाने वाढत जाऊन हळु हळु सर्व धातूंना व्यापतो असा व्रण ज्याप्रमाणे फार वर्षांचा मोठा वृक्ष उपटून टाकणे अशक्य असते , त्याप्रमाणे तो व्रण बरा करणे अशक्य असते . (अर्थात तो असाध्य असतो .)
कारण तो फार दिवस झाल्यामुळे (स्थीरपणामुळे ) व त्याच्या स्वाभाविक जोरामुळे तो सर्व धातुगत झाल्याकारणाने , ज्याप्रमाणे एखाद्या दुष्ट ग्रहाची पीडा मंत्र प्रयोगाने देखील दूर होत नाही , म्हणजे त्याजवर मंत्राचे सामर्थ्य निरुपयोगी होते , त्याप्रमाणे असा व्रण औषधांच्या वीर्याचा (गुणांचा ) नाश करितो . (त्याजवर औषध चालत नाही )
ह्यावर सांगितलेल्या लक्षणाच्या उलट ज्याची लक्षणे आहेत म्हणजे जो केवळ त्वचेचाच आश्रय करून आहे , सप्तधातुगत झाला नाही तो , ज्याप्रमाणे मूळ धरले नाही असा रोपटा सहज उपटता येतो , त्याप्रमाणे असा व्रण सहज सुखाने बरा होतो .
तीनही दोषांची असाध्य लक्षणे ज्यात नाहीत , ज्याच्या कडा श्यामवर्ण दिसत आहेत व त्यातून नवीन मांसाचे अंकुर दिसत आहेत , व्रणातील वेदना बंद झाल्या असून स्रावही बंद झाला आहे , अशा व्रणाला शुद्वव्रण असे म्हणतात .
ज्या व्रणाच्या कडा पारव्याच्या रंगाच्या दिसत आहेत व त्यातील ओलसरपणा नाहीसा झाला आहे , व त्या ठिकाणी असून त्यांच्यामधून नवीन त्वचेचे पदर दिसत आहेत तो व्रण भरून येत आहे असे समजावे .
ज्या व्रणाचे सर्व मार्ग (सर्व जागा ) भरून आले आहेत , त्या ठिकाणी गाठी , सूज वगैरे काही नाही , त्या ठिकाणी आसपासच्या त्वचेप्रमाणे रंग आला आहे , व त्या ठिकाणी उंचसखलपणा नसून ती जागा तळहातासारखी किंवा जिभेच्या तळासारखी साफ दिसत आहे अशा स्थितीला जो व्रण चांगला भरून आला आहे म्हणून समजावे .
अपथ्यदिकांनी वातादी दोषांचा प्रकोप झाला असता , अति व्यायामाने , कशाचातरी मोठा धक्का लागल्याने , अजीर्णामुळे , अत्यंत हर्षाने , रागाने किंवा अतिशय भीतीने व्रण नुकताच चांगला भरून आला असला तरी पुनः उत्पन्न होतो . (विदीर्ण होतो ) यासाठी व्रण बरा झाल्यावर देखील पुढे काही दिवस ह्या गोष्टी वर्ज कराव्या . (हा श्लोक अनार्ष -प्रक्षिप्त आहे - नंतर घातलेला - असे टीकाकार म्हणतो ॥१३ - २१॥