मांसवर्ग
आता ह्यापुढे मांसासंबंधी गुणदोष सांगतो . ते असे -पाण्यात वास करणारे , अनुपदेशातील गावांत असणारे , मांस खाऊन उपजीविका करणारे , एक खुराचे व जांगलदेशातील प्राणी ह्यांचे मास , असे मासाचे सहा वर्ग आहेत . जे जे सहा वर्ग सांगितले आहेत ते उत्तरोत्तर गुणाने श्रेष्ठ आहेत ह्या सहा वर्गाचे जांगल अनूप असे दोन भेद आहेत . त्यापैकी जांगल वर्गाचे आठ प्रकार आहेत . ते असे - जांगल (रानातील ), विष्कीर (पायाने जमीन उकरून धान्यादि कण शोधणारे ), प्रतुद (चोचीने टोचून खाणारे ), गुहाशय (दरीत राहणारे ), प्रसह (बळजबरीने भक्ष्य मिळविणारे ), पणंमृग (झाडाचा पाला खाऊन असणारे ), विलेशय (बिळात राहाणारे ), आणि ग्राम्य (गावातील ) ह्या आठ प्रकारात जांगल व विष्किर ह अत्यंत श्रेष्ठ आहेत .
जांगल व विष्किर प्राणी -एण , (काळा हरीण ), हरीण , तांबड्या व निळ्या वृषणाचा हरीण (ऋृक्ष किंवा रुरु ), कुरुंग , (काळ्य़ा तांबड्या मिश्र रंगाचा हरीण ), कराल (कस्तुरीमृग ), कृतमाल (कळप करून हिंडणारे हरीण ), शरभ (ह्याच्या पाठीला चारपाय अधिक असतात . एकंदर आठ पाय असून उंटासारखा असतो हा काश्मीरदेशात असतो .) श्वदंष्ट्र , (चार दाढांचा रुरु हरीण ), पृषत (अंगावर टिपके असलेला ज्याला चितळ म्हणतात तो ) चारुष्कर (लहान अंगाचा सुंदर हरीण ), मृगमातृका (लहान बांध्याचा व स्थूल पोटाचा हरीण ) इत्यादी प्राणी जांगल वर्गातील आहेत . ह्या सर्व हरिणांच्या जाती सामान्यतः तुरट , मधुर , हलक्या , वातपित्तनाशक , तीक्ष्ण , मनाला प्रिय व बस्तीचे शोधन करणार्या आहेत .
ह्या मृग जातीपैकी काळा हरीण तुरट , मधुर हृद्य , रक्तपित्त व कफरोगनाशक संग्रहक , रुचिकर , शक्तिवर्धक व ज्वरनाशक आहे .
पांढरा हरीण मधुर , मधुरविपाकी , दोष (वातादि ) नाशक , अग्निदीपक , थंड , मलमूत्रांचा बद्धक , (अवरोध करणारा ), सुगंधी व हलका आहे . एण हा काळ्या रंगाचा असतो . हरीण तांबड्य़ा रंगाचा असतो . आणि जो काळा किंवा तांबडा नसून मिश्र असतो त्याला कुरंग म्हणतात मृगमातृका ही थंड , रक्तपित्तनाशक , आणि सन्निपात , क्षय , श्वास , खोकला उचकी व अरुची ह्यांचा नाश करिते ॥५३ -५८॥
लावा , तित्तिरपक्षी , (काळा ), कपिंजल (पांढरा तित्तिर ) वर्तीर (गांजीणपक्षी -कपिंजलाचीच एक जात ), वर्तिका (रानचिमणी ), वर्तक (रानचिमणीपैकी एक जात ), नप्तृका (एक जातीची चिमणी ) वर्तिक (चिमण्यातील एकजात ), चकोर (ह्याचे डोळे तांबडे असतात . ह्याला विषाचे ज्ञान असते .) कलविंक (काळी चिमणी ), मोर क्रकर (करढोकपक्षी ) उपचक्र (करकोचा -हा क्रकराचाच एक भेद आहे ) कोंबडा , चातक (सारंग ), शतपत्र (सुतार ), कृत्तितरि (तित्तिराची एकजात -रानतित्तिर ), कुरुव्राहक
( कुरकुरापक्षी ) व यवालक ( यवगुडपक्षी ) हे पक्षी विष्कीर वर्गापैकी आहेत . हे पक्षी पचनाला हलके , थंड गोड , तुरट व सर्व दोषनाशक आहेत .
त्यापैकी लावापक्षी संग्राहक , अग्निदीपक , किंचित तुरट , मधुर , हलका , तिखटविपाकी आणि सन्निपातनाशक आहे .
काळा तित्तिरपक्षी लाव्यापेक्षा थोडा जड , उष्ण , मधुर , वृष्य , बुद्धिवर्धक , अग्निदीपक सर्व दोषनाशक , ग्राहक , आणि अंगकांति चांगली करणारा आहे . कर्पिजल हा रक्तपित्ताशक व थंड असूनही हलका आहे . त्याचप्रमाणे तो कफजन्य रोग व मंदवात (चलनवलन न करणारा ) ह्या विकारात पथ्यकारक आहे . पण विशेषतः गौरतित्तिर (कर्पिजल ) हा उचकी , श्वास व वातनाशक आहे . क्रकरपक्षी हे वातपित्तनाशक , वृष्य , बुद्धिप्रद , अग्निदीपक व बलवर्धक आहेत . तसेच ते हलके व हृद्यही आहेत . उपचक्राचे गुणही असेच आहेत . मोर हा तुरट , गोड , किंचित खारट , त्वचा चांगली करणारा , केसाची वाढ करणारा , रुचिदायक , स्वर चांगला करणारा , वुद्धिवर्धक , अग्निदीपक आणि दुष्टी व कान ह्यांना बळकटी आणणारा आहे . रानकोंबडा स्निग्ध , उष्ण , वातनाशक , वृष्य , घाम आणणारा , स्वर चांगला करणारा , शक्तिवर्धक व पौष्टिक आहे . गावातील कोंबडेही गुणाने असेच असून पचनाला जड आहेत . शिवाय वातरोग , क्षय , वांती व विषमज्वर ह्यांचा नाश करणारे आहेत ॥५९ -६६॥
होला , पारवा , भृंगराज (पारियात्रदेशात ह्याला काळी चिमणी म्हणतात ), कोकीळ , कोयष्टिक (टिटवी ), कुलिंग (रानचिमणी ), गृहकुलिन (गावातील चिमण्या ), गोक्ष्वेड (गोनरपक्षी -कंकपक्ष्यातील एक जात ), डिंडिमानक , (हलगी वाजते त्यासारखा शब्द करणारा ), शतपत्रक (राजशुकराघूची एक जात ), मातृनिंदक (वाघुळातील एक जात ), भेदाशी (पोपटापैकी एक भेद ), शुक (पोपट ), सारिका (साळुंखी ), वल्गुली (वटवाघुळ ), गिरिश पर्वतशिखरावर असणारा एक पक्षी , लटवा (भारद्वाजातील एक जात . भार्गवराम -ह्याची शेवटी तांबडी असते ), अन्नदूषिक (हा पक्षीही भारद्वाजपक्ष्याचाच एक भेद आहे ), सुगृही (ह्याचे मस्तक पिवळे असते ), खंजरीट (कवडी पक्षी ), हारीत (हिरव्या व पिवळ्य़ा मिश्र रंगाचा पक्षी ), दात्यूह (पाणकावळा ) इत्यादि पक्षी प्रतुदवर्गापैकी आहेत ॥६७॥
प्रतुवर्गातील पक्षी सामान्यतः किंचित तुरट , मधुर , रूक्ष , फळे खाऊन उपजीविका करणारे , वातकारक , पित्तकफनाशक , थंड मूत्राचा अवरोध करणारे व मळ थोडा करणारे आहेत त्यापैकी भेदाशी (पोपटाची एक जात ) पक्षी वातादि सर्व दोष वाढविणारा , आणि मलमूत्र दूषित करणारा आहे . काणकपोत (कबुतर ) पक्षी तुरट , गोड , खारट व जड आहे . पारवा हा रक्तपित्तनाशक तुरट , विषद (बुळबुळितपणा रहित ) मधुरविपाकी व जड आहे . रानचिमण्या मधुर , स्निग्ध , कफकारक व शुक्रवर्धक आहेत . गावातील चिमण्या रक्तपित्तनाशक असून अत्यंत शुक्रवर्धक आहेत ॥६८ -७१॥
सिंह , वाघ , लांडगा , तरस , अस्वल , द्वीपी (पट्ट्य़ाचा वाघ -चित्ता ), रानमांजर , कोल्हा , मृगेंवीरुक (हरिणाची शिकार करणारा कोल्ह्याच्या एक हिंस्त्र पशु ) हे पशु गुहेत (दरीत वगैरे ) राहणारे आहेत .
गृहाशय पशु सामान्यतः मधुर , गोड , स्निग्ध , शक्तिवर्धक , वातनाशक असून उष्णवीर्य आणि नेत्ररोग व गृह्यरोग ह्यांना पथ्यकारक आहेत ॥७२ -७३॥
कावळा , कंकपक्षी , कुरर (करढोकपक्षी हा हातातील मासा घेऊन जातो . ह्याचा शब्द ऐकला की मासे पळतात .), तासपक्षी , भास घाती (हा पायाच्या नखाच्या प्रहाराने सशाला मारतो ,) घुबड , घार , ससाणा व गिघाड इत्यादी पक्षी हे प्रसहवर्गातील आहेत .
हे प्रसहवर्गातील पक्षी रसवीर्यविपाकादिकानी सिंहादी गुहाशय पशूच्यासारखेच आहेत . तथापि हे विशेषतः क्षयरोगाच्या मनुष्याला पथ्यकारक आहेत .
मद्गु (मालुया किंवा मालुधान जातीचा साप ), मूषिक (झाडावर राहणारे उंदीर ), वृक्षशायिका (खार ), अवकुश (वानराची एक जात ——गोलांगुल ), पूतिघास (झाडावर असणारे मांजर -ह्याच्या वृषणाला सुगंध असतो .) व वानर इत्यादी प्राणी हे पर्णमृग आहेत .
पर्णमृगापैकी सर्व प्राणी सामान्यतः मधुर , जड , वृष्य , नेत्राला हितकारक , क्षयरोग्याला हितकर , मलमूत्राची प्रवृत्ति करणारे (साफ करणारे ) आणि खोकला , मुळव्याध व श्वास ह्यांचा नाश करणारे आहेत ॥७४ -७७॥
श्वावित (साळईपक्षी -साळु ), शल्लक (साळुचा एक भेद , ह्याच्या पंखाचे काटे फार मोठे असतात ), घोरपड , ससा , मांजर लोपाक (कोल्ह्यातील एक जात ), लोमशकर्ण (खोकड ), कदली (रानमांजर ), मृगप्रियक (घोणस सर्प ), अजगर , सर्प (सामान्य सर्व जातीचे सर्प ), उंदीर , मुंगूस , महाव्रभ्रु (मोठा मुंगूस , मुंगूसाचाच भेद -विजूट ) इत्यादी बिलेशयवर्गातील प्राणी आहेत .
बिलेशय प्राणी हे सामान्यतः मलबद्धकारक , मूत्ररोधक , उष्णवीर्य , वरील पर्णमृगाप्रमाणे मधुरविपाकी , वातनाशक , कफपित्तनाशक , स्निग्ध , खोकला , श्वास व कृशत्व ह्यांचा नाश करणारे आहेत ॥७८ -७९॥
त्यापैकी ससा हा तुरट , गोड , कफपित्तनाशक आणि अतिशय थंड नसल्याकारणाने वाताला वाढवीत नाही . घोरपड ही मधुरविपाकी असून तुरट व तिखट आहे . तशीच ती पित्त शमन करणारी , पौष्टिक व बलवर्धक आहे . साळुपक्षी मधुर , पित्तनाशक , विषनाशक , पचनाला हलका व थंड आहे . घोणसाचे मांस वाताला पथ्यकारक व अजगर मूळव्याधीला पथ्यकारक आहे . साधारण सर्व जातीचे साप मूळव्याध व वातरोगनाशक , कृमि व दूषिविष (गर ) नाशक , डोळ्य़ांना हितकारक , मधुरविपाकी बुद्धिप्रद व अग्निवर्धक आहेत . त्यापैकी नाग हे तिखटविपाकी व अग्निदीपक आहेत . शिवाय ते मधुर , डोळ्य़ांना फारच हितकारक असून मलमूत्र व अधोवायु ह्यांना प्रवृत्त करणारे (साफ करणारे ) आहेत ॥८० -८४॥
घोडे , खेचरे , बैल , गाढव , उंट , बोकड , मेंढा , व मेदःपुच्छक (ही एक मेंढ्य़ाची जात असून ह्याच्या शेपटीत मेद -चरबी ) संचित होते , ती काढून घेऊन तिचा तुपासारखा उपयोग करितात . ही चर्बी काढिली तरी पुनः संचित होते . (ह्याला एडका असेही म्हणतात .) इत्यादी पशु गावात वास करणारे आहेत .
सर्व ग्राम्य पशु वातनाशक , पौष्टिक , कफपित्तकारक , रुचिला व विपाककाळी मधुर , अग्निदीपक व बलवर्धक आहेत . त्यापैकी बोकड हा अति थंड नसून फार जडही नाही . तसाच तो स्निग्ध , किंचित कफपित्तअनभिष्यंदि (ओलसरपणा न करणारा ) व पीनसनाशक आहे . मेंढ्याचे मांस पौष्टिक , कफपित्तकारक व जड आहे . मेदःपुच्छ जातीच्या मेंढ्य़ाचे (एडक्याचे ) मांस वृष्य असून मेंढ्याच्या मांसाप्रमाणेच गुणाने , आहे . बैलाचे मांस , श्वास , खोकला , पडसे व विषमज्वर नाशक असून श्रम व अन्यग्नि (भस्मरोग ) ह्याजवर पथ्यकारक , पवित्र व वातनाशक आहे . एक खुरी प्राण्याचे मांस मेंढ्याच्या मांसाप्रमाणेच खारट असून गुणानेही तसेच आहे . हा इथपर्यंत जांगलवर्ग सांगितला . ह्या जांगलवर्गातील प्राण्याचे मांस सामान्यतः किंचित् अभिष्यंदि आहे . मनुष्यांच्या वस्तीपासून दूर राहणारे व लांब जाऊन पाणी पिणारे असे जे (अरण्यवासी ) पशु व पक्षी ते किंचित अभिष्यंदि आहे . मनुष्यांच्या वस्तीपासून दूर राहणारे व लांब जाऊन पाणी पिणारे असे जे (अरण्यवासी ) पशु व पक्षी ते किंचित् (फार थोडे ) अभिष्यंदि (साधारणतः आमजनक म्हणण्यास हरकत नाही .) असतात आणि मनुष्याच्या वस्तिच्या सान्निध्यात असणारे व पाण्याच्या जवळपास संचार करणारे असे जे पशुपक्षी हे अत्यंत अभिष्यंदि असतात असे समजावे ॥८५ -९२॥