अध्याय सातवा
आता आम्ही " यंत्रविधि " नावाचा अध्याय जसा भगवान धन्वंतरीनी सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥
यंत्रे एकशेएक आहेत . त्या सर्वांमध्ये वैद्याचा हात हा अत्यंत श्रेष्ठ ( मुख्य ) असे यंत्रच आहे , असे समज . असे का ? तर ज्याअर्थी हातात धरल्यावाचून यंत्राचा उपयोगच नाही म्हणजे यंत्राकडून कामच होणार नाही . अर्थात यंत्रांचे काम वैद्याच्या हस्त कौशल्यावर अवलंबून आहे . त्याअर्थी वैद्याचा हात हा सर्व यंत्रांचा मुख्य आहे असे ठरते . आधी वैद्याचा हात काम करण्यास हलका , चलाख व यशस्वी असा पाहिजे .
मागे पहिल्या अध्यायात उल्लेख केलेली , बाणाची टोके , बंदुकीच्या गोळ्या इत्यादि शल्ये अंगात घुसली असता ती त्रास देतात व मनालाही बाधा करितात . तेव्हा ती शल्ये काढण्याकरिता यंत्राचे सहाय्य लागते . त्या यंत्राचे सहा प्रकार आहेत . ते असे - स्वस्तिक यंत्रे , संदेश यंत्रे , ( सांडस किंवा चिमटे ), तालयंत्रे , नाडीयंत्रे ( निरनिराळ्या प्रकारच्या नळ्या ), शलाकायंत्रे ( सळ्या ), आणि इतर उपयंत्रे असे यंत्राचे सहा प्रकार आहेत . वर सांगितलेली यंत्राची संख्या केवळ अजमासापुरती आहे . नियत नाही . कार्यानुरोधाने पहाता यंत्रे पुष्कळच आहेत ॥३॥५॥
स्वस्तिक यंत्राचे लक्षण
त्यात स्वस्तिकयंत्रे चोवीस प्रकारची आहेत . यंत्रे ( म्हणजे सांडस किंवा चिमटे ) ह्याचे दोन प्रकार आहेत . तालयंत्राचेहि दोनच प्रकार आहेत . नाडीयंत्रे ( नलिका ) ह्यांचे वीस प्रकार आहेत . शलाकायंत्रे ( सळ्या ) ह्यांचे अठ्ठावीस प्रकार आहेत . आणि उपयंत्रे पंचवीस प्रकारची आहेत . ही बहुतेक उत्तम प्रकारच्या लोखंडाची बनविलेली असतात . तशा लोखंडाची न मिळाल्यास त्या अभावी लोखंडासारख्याच दुसर्या धातूची घ्यावी .
यंत्राची अग्रे म्हणजे तोंडे बनवायची ती निरनिराळ्या प्रकारचे सर्प , मृग म्हणजे रानटी जनावरे ( चित्ते , ससे , कोल्हे वगैरे ), कावळे , मोर वगैरे पक्षी ह्यांच्या तोंडासारखी तोंडे असलेली अशी बनवावी . आपणास हवे असेल तसे यंत्र नसल्यास आपणास जशा तोंडाचे पाहिजे असेल तसे , शास्त्रानुरोधाने किंवा गुरुच्या सांगण्याप्रमाणे अगर दुसरे यंत्रे पाहून किंवा आपल्या कल्पनेने योजून नवे तयार करुन घ्यावे .
जी यंत्रे उपयोगात आणावयाची ती न्यूनाधिक प्रमाणाची नसावी . तसेच ती तीक्ष्ण असूनहि गुळगुळीत तोंडे असलेली असावी . तशीच ती बळकट , दिसण्यात सुंदर व सुबक अशी असावी . त्याचप्रमाणे ती हातात चांगली धरता येतील अशी असावी . आणि चटकन घेता येतील अशा रीतीने व्यवस्थित ठेवलेली अशी असावी ॥६॥९॥
स्वस्तिकयंत्रे अठरा अंगुले लांब असावी . त्यांची तोंडे सिंह , वाघ , लांडगा , तरस , अस्वल , चित्ता , मांजर , कोल्हा , मृगेर्वारुक ( एक जातीचे हरीण ), कावळा , कंकपक्षी ( हा फार मोठा असतो व चोच लांब असते ), कुरर ( बगळ्यासारखा एक पक्षी ), भास , तास ( भारद्वाज ), भृंगराज ( काळी चिमणी ), अंजालिक ( पाणकोंबडा ), कर्णावभंजन ( तित्तिर पक्षी ), नंदीमुख ( पलाटी ) अशा हिंसक पशुपक्ष्यांच्या तोंडाच्या आकाराची असावी . त्यांचे दांडे अंकुशाप्रमाणे वाकविलेले असावे . त्यांच्या स्कंद प्रदेशी ( कित्येकांच्या मते तिसर्या भागात ) मसूरधान्याच्या दाण्याच्या अकाराच्या खिळ्याने दोन्ही दांडे जुळविलेले असावे . अशा यंत्राचा उपयोग हाडात रुतलेले शल्य काढण्यासाठी करावा असे सांगितले आहे . ही स्वस्तिकयंत्रे जरी चोवीस तर्हेची म्हटले आहे तरी उपयोगानुसार संख्येने ती अधिकही असतात व्यालमुखयंत्र म्हणजे त्याचा बहिर्भाग व्वाल ( सिंहादि ) मुखासारखा असावा असे नव्हे , तर त्याचा अंतरभाग सिंहादिकांच्या मुखाच्या अंतरभागासारखा असला पाहिजे . आधुनिक वैद्याकातील ( Line forcep ) लायन फोरसेप हे यंत्र नाव , आकार व उपयोग ह्यांच्या सादृश्याने सिंहमुख स्वस्तिकयंत्रच आहे ॥१०॥
संदेशयंत्र ( चिमटे )
संदेशयंत्रे ( चिमटे ) सनिग्रह व अनिग्रह अशी दोन तर्हेची असून ती सोळा अंगुले लांबीची असतात . ( त्यापैकी सनिग्रह चिमट्याला दांडे असून तो न्हाव्याच्या चिमट्याप्रमाणे मध्ये साधारण वर्तुळाकृति पोकळी नसते . म्हणजे सोनाराच्या चिमट्याप्रमाणे असलेला असा असतो . दुसरा अनिग्रह याला पोकळी असते . ह्याचे दोन्ही भाग एकमेकास चिकटलेले असतात . कित्येकांच्या मनाने सनिग्रह चिमटा हा लोहाराच्या चिमट्याप्रमाणे मध्ये गळ्यापाशी खिळ्याने आवळलेला असतो . अर्थात ह्याचे दोन्ही दांडे वेगळे असतात . हे दोनही प्रकारचे चिमटे त्वचा , मांस , शिरा , ( रक्तवाहिन्या ) स्नायु ह्यामधून असलेले शल्य काढण्याकरिता घ्यावे म्हणून सांगितले आहे . ( वृद्ध वाग्भटात ह्यापेक्षा लहान जातीचा चिमटा अगदी लहान शल्य पापणीचा केस किंवा व्रणावर वाढलेले मांस काढण्याचा उपयोगाकरिता सांगितला आहे . तो सहा अंगुळे लांब , अर्धे अंगुळे रुंद , वाकडा , दोन दांड्यांचा व अंगठा आणि त्याजवळील बोट ह्यांत धरता येईल असा असतो ॥११॥
तालयंत्रे
तालयंत्रे ही बारा अंगुळे लांबीची असतात . एका लोखंडी सळईच्या एका टोकाला माशाच्या खवल्याच्या आकारासारखा पसरट व चमच्याप्रमाणे खोलगट आकार केलेला असतो . त्याला एकतालयंत्र म्हणतात . व त्याचप्रमाणे दुसर्या बाजूच्या टोकाला तसाच आकार केलेला असतो . त्याला द्वितालयंत्र म्हणतात . ह्याच्या तोंडाची रुंदी कानात अगर नाकात ते घालता येईल इतकी असते .
( दुसर्या कित्येकांचे मत असे आहे की " मत्स्यातालुकवत " म्हणजे " भेदुलि " नावाचा मासा आहे , त्याचे तोंड आतून लोखंडाच्या चमच्याच्या आकाराचे असते . तेव्हा त्याच्या तोंडाच्या अर्ध्या भागाच्या आकाराचे जे यंत्र ते एकताल व पूर्णमुखाकार असते ते द्वितालयंत्र असे म्हणतात .
वृद्ध वाग्भटात " मत्स्यगलंतालकवत " असा पाठ आहे . अरुणदत्त आपल्या सर्वांगसुंदराटीकेत माशाच्या घशातील ( गलतालवत ) टाळ्याप्रमाणे दोन्ही बाजूकडे किंवा टोकांकडे आकार असला म्हणजे द्विताल व एकच बाजूकडे आकार असला म्हणजे एकताल असेच म्हणतो . )
ह्यांचा उपयोग कानातील , नाकातील व नाडीव्रणातील शल्य काढण्याकरिता करितात , कानातील मळ काढण्यासही ह्याचा उपयोग होतो . ( अर्थात कानकोरण्याच्या आकाराचे हे यंत्र असावे ॥१२॥
नाडीयंत्रे ( नलिकायंत्रे ) ह्यांचे अनेक प्रकार आहेत . ह्यांचा उपयोगही अनेक ठिकाणी असतो . त्यात काही यंत्रांना एका बाजूकडे तोंडे असतात . काहींना दोन्ही बाजूकडे असतात .
ह्यांचा उपयोग स्त्रोतसातील ( पोकळ्यामधील ) शल्ये कांढण्याकरिता शरीराच्या आतील भागास झालेले रोग पहाण्याकरिता , नासलेले द्रव पदार्थ आकर्षून ( ओढून ) बाहेर काढण्यकरिता व काही काम सुलभ रीतीने करण्याकरिता करितात .
ही यंत्रे जशी बहिर्मुख स्त्रोतसांची द्वारे लहानमोठी असतील त्या मानाच्या आकाराची व जशा तर्हेने उपयोग करावयाचा त्या प्रमाणे त्यांची लांबी असते .
ह्या नाडीयंत्रामध्ये दोन प्रकारची भगंदरयंत्रे ( एकछिद्र व द्विछिद्र , ) त्याचप्रमाणे आर्शोयंत्र दोन प्रकारचे , व्रणयंत्र , बस्तियंत्र , ( नेत्र ) चार प्रकारचे , उत्तरबस्तियंत्र दोन प्रकारचे , ( मूत्रवृद्धि स्त्रावण - लघवी काढणे , जलोदर स्त्रावण - जलोदरातील पाणी काढणे , ) धूमयंत्र तीन प्रकारचे निरुद्ध प्रकाशयंत्र , संन्निरुद्ध गुदयंत्र , अलाबुयंत्र , श्रृंगयंत्र अशीही नाडीयंत्रे अनेक आहेत . त्याची माहिती नंतर सांगू ॥१३॥
शलाकायंत्रे
शलाकायंत्रे ही अनेक तर्हेची असून अनेक कामी त्यांचा उपयोग होतो . जसे काम असेल त्या मानाने ती जाड , वर्तुळाकृति व लांब असतात . शलाका यंत्र म्हणजे निरनिराळ्या आकाराच्या सळ्या . त्यापैकी गंडुपदाकृति सळ्या दोन प्रकारच्या असतात . ( त्यांचा उपयोग नाडीव्रणांतील गती , पू वगैरे शोधून पहाणे ह्या कामी करितात . ) सर्पफणाकृति सळ्या दोन प्रकारच्या . त्या आत असलेले शल्य वर उचलून वर तोंडाला आणणे , ह्या कामी त्यांचा उपयोग करतात . ) शंरपुंखमुखी सळ्या दोन प्रकारच्या . त्या शल्य इकडे तिकडे हलवण्याचे कामी उपयोगी पडतात . बडीशमुख म्हणजे गळाच्या आकड्या दोन प्रकारच्या सळ्या ह्या शल्य उपसून काढण्याच्या कामी उपयोगी पडतात . मसुराच्या डाळीएवढी बारीक तोंडे असून शेंड्याला किंचित वाकविलेल्या अशा सळ्या दोन प्रकारच्या . त्या स्त्रोतसांतील शल्य काढण्याकरिता म्हणून सांगितल्या आहेत . त्यांना " मसुरदलमात्रमुखयंत्र " असे म्हणतात . टोकास कापूर लपेटलेल्या अशा सहा प्रकारच्या सळ्या असतात . त्यांना " कार्पासोष्णिषयंत्र " म्हणतात . ह्या सळ्या कान वगैरे धुवून पुसून काढण्यासाठी असतात . तीन सळ्या डावाच्या ( पळीच्या ) आकृतीच्या असतात . त्यांची तोंडे खोलगट असतात . डावाच्या ( पळीच्या ) आकृतीच्या असतात . दुसर्या तीन सळ्या टोकाला जांभळाच्या फळाच्या आकाराच्या असतात . आणि टोकाला अंकुशासारख्या अशा तीन असतात . अशा ह्या सळ्या अग्निकर्माला ( डाग देण्याला ) उपयोगी पडतात . लहान वाटोळ्या बोराच्या बीच्या , डाळिंबीच्या ( अर्ध्या बीच्या ) आकाराचे तोंड असून ते मध्ये खोलगट व कंठाला तीक्ष्ण धार असलेले असे असते . त्याला " कोलास्थिदलमात्रमुख " असे म्हणतात . त्याचा उपयोग नासार्बुद ( नाकांतील गुळुंब , ) काढण्याकरिता असतो . वाटाण्यासारखी वर्तुळ असून पुढे शेंड्याला फुलाच्या कळीप्रमाणे निमुळती अशी दोन्हीही टोके असलेली एक सळई असते . ती डोळ्यांत अंजन घालण्याच्या कामी उपयोगी असते . ही आठ अंगुळे लांब असते . मालतीच्या ( जाईच्या ) फुलाच्या देठाचे टोकाइतकी वर्तुळाकृति एक सळई असते . तिचा उपयोग मूत्रमार्ग शोधनार्थ लघवी काढून टाकण्याकरिता करितात ॥१४॥
उपयंत्रे
उपयंत्रे म्हणजे यंत्रासारखी किंवा यंत्रकर्मात उपयोगी पडणारी उपकरणे किंवा सहाय्यक वस्तु , जसे - दोरी , वेणी ( वळलेली किंवा गुंफलेली दोरी ), चामड्याचे पट्टे , पळसाच्या वगैरे साली , वेली ( कावळीच्या वगैरे ) कापडाचे पट्टे , पाटा , वरवंटा , खलबत्ते , मुग्दर ( लाकडाचे मोगर ) इत्यादि यंत्रे , तळहात , तळपाय , बोटे , जीभ , दात , नखे , मुख , ह्यांच्या ठिकाणी उपयोग करण्याकरिता केस , अश्वकटक ( " अश्वकटक " ह्या ठिकाणी काही लेखी प्रतीतून " बालाश्च कंटक " असा पाठ आहे . त्याप्रमाणे कड्याच्या ऐवजी काटे असा अर्थ होतो . " अश्वकटक " ह्याचा अर्थ लगामाच्या कड्याही होतो . ) झाडाची डहाळी इत्यादी पदार्थ , हे थुंकणे , वमन , विरेचन व अश्रुपात वगैरे वेग उत्पन्न करण्याकरिता ( कफ , पित्त व डोळ्यातील धूळ , शल्य वगैरे काढण्याच्या कामी ), आनंद , लोहचुंबकमणी ( चार प्रकारचा ), भय , क्षार , अग्नि व औषधे इत्यादी .
ही यंत्रे सर्व देहात कोठेही , तसेच देहाच्या अवयवांचे ठिकाणी , सांध्यांच्या ठिकाणी , कोठ्यावर ( पोटाचे ठिकाणी ) व मज्जातंतूच्या योग्य वाटेल त्या मानाने योजावी ॥१५॥१६॥
यंत्राची कामे
यंत्राने करावयाची कामे - १ इकडे तिकडे हालवून शल्य वर उपसून काढून घेणे , २ वस्तीच्या नळीने वगैरे तेल भरणे , ३ पट्ट्या दोरी वगैरेनी बांधणे , ४ शल्याची जागा उचलून धरुन कापून थोडे तोंड पाडून शल्य काढून घेणे किंवा ५ वर्तन म्हणजे व्रण वाकडातिकडा असल्यास वर्तुलाकार करुन घेणे किंवा मोडलेले हाड बसविणे , ६ गळा वगैरे ठिकाणी हाडात घुसलेले शल्य हलके हलवून काढणे , ७ विवर्तन म्हणजे मागे फिरलेले हाड फिरवून सरळ करणे , ८ विवरण म्हणजे व्रणाचे वगैरे तोंड मोकळे करणे , ९ पीडन म्हणजे दाबून पू बाहेर काढून घेणे , १३ आंछन म्हणजे किंचित तोंडाशी आणणे , १४ उन्नमन म्हणजे वर उचलून धरणे , १५ विनमन म्हणजे खाली वाकविणे , १६ भंजन म्हणजे शल्याचे तुकडे करणे , १७ उन्मथन म्हणजे अंगातील शल्य समजण्याकरिता व्रणात सळई घालून हलवणे , १८ आचूषणं म्हणजे तुमडीने वगैरे रक्त ओढून घेणे , १९ एषण म्हणजे गंडुपदयंत्राने व्रण किती खोल आहे ते पाहाणे , २० दारण म्हणजे विषम रीतीने एकत्र झालेले अवयव तोडून वेगळे करणे , २१ सरळ करणे , २२ व्रणादिक धुणे , २३ नळीने नाकात औषध फुंकणे , २४ प्रमार्जन म्हणजे डोळ्यांतील कस्पट वगैरे झाडून काढणे , अशी ही चोवीस कामे यंत्राच्या सहाय्याने करावी .
शल्यांचे नानाविध प्रकार असल्यामुळे बुद्धिवान वैद्याने आपल्या सोईला येईल असे यंत्र नवीन कल्पून पाहिजे तितके प्रकार करावे ॥१७॥१८॥
यंत्राचे दोष
१ यंत्र फार मोठे असू नये , २ अशुद्ध लोखंडाचे नसावे , ३ अति लांब नसावे , ४ फार आखूड नसावे , ५ सहज धरता न येण्यासारखे नसावे . ६ धरण्यास अवघड नसावे , ७ वांकलेले नसावे ८ सैल किंवा ढिले नसावे . ९ अति उंच खिळे असलेली , १० खिळे मृदु असलेली , ११ बोथट तोंडाची १२ शल्य चटकन धरता न येणारी असे हे यंत्राचे बारा दोष आहेत . हे बहुधा स्वस्तिकयंत्रात असतात .
( वरील यंत्रापैकी कोणती यंत्रे हल्लीच्या पाश्चात्त्यपद्धतीच्या यंत्रांशी जुळतात ते इतरत्र सांगितले आहे ॥१९॥
हे वरील दोष ज्यांत नाहीत असे अठरा अंगुले लांबीचे यंत्र उत्तम असे समजून ते वैद्याने उपयोगात आणावे .
शास्त्र व युक्ति ह्याच्या साहाय्याने बाहेर दिसणारी शल्ये सिंहमुखादि यंत्रांनी उपसून काढावी आणि आत खोल गेलेली न दिसणारी अशी शल्ये कंकमुखादि यंत्रांनी काढावी .
जे आंत घालण्यास व बाहेर काढून घेण्यास सोपे असते व ज्याच्या योगाने शल्य धरुन बाहेर काढता येते , असेच यंत्र उत्तम ; त्याअर्थी सर्व यंत्रात कंकमुखयंत्र श्रेष्ठ आहे . हे सर्व ठिकाणी काम करण्यास उपयोगी पडते .
( आधुनिक वैद्यकाच्या शस्त्रक्रियेत जी यंत्रे वापरतात तशाच प्रकारची थोड्याबहुत फरकाची यंत्रे आयुर्वेदाच्या शस्त्रक्रियेत आहेत . फरक एवढाच की आयुर्वेदाची शस्त्रक्रिया प्रचारात नाही व नवीन वैद्यकाची शस्त्रक्रिया प्रचारात आहे . यंत्रांत थोडा फरक असला तरी कार्य उभयतांचे एकच आहे . फरक हा भिन्न शास्त्रत्वाने असतोच . आर्य वैद्यकांत देखील काही काही यंत्रांच्या बाबतीत निरनिराळ्या ग्रंथकारांचे मतभेद आहेतच . म्हणूनच ह्याच ग्रंथांच्या ह्याच अध्यायात म्हटले आहे की , कामाप्रमाणे अन्य यंत्रे पाहून किंवा कल्पनेने यंत्रे तयार करावी . तेव्हा आधुनिक वैद्यकाच्या यंत्रांशी सर्वस्वी आर्यवैद्यकाचा यंत्रे तंतोतंत सारखी असली पाहिजेत असे नाही . देशानुरुप व कल्पनेरुप फरक असणारच . तथापि नूतन शास्त्रवैद्यकाच्या यंत्रांची व त्यांशी बरेचसे साम्य असणार्या यंत्रांची नावे ह्या पुढे दिली आहेत ॥२०॥२२॥
अध्याय सातवा समाप्त .