अध्याय एकतिसावा
आता ‘‘छायाविप्रतिपत्ति ’’ नावाचा अध्याय जसा भगवान् धन्वंतरींनी सांगितला आहे तसा सांगतो ॥१ -२॥
ज्या मनुष्याच्या शरीराची वर्णकांति काळसर , तांबुस , निळी , पिवळट , अशी दिसू लागते तो गतप्राण होणार असे निःसंशय समजावे .
ज्याची लज्जा नाहीशी होते , तसेच प्रभा (अंगावरील तेज ), धैर्य , स्मरणशक्ति व अंगकांती (सौंदर्य ) हे देखील नाहीशी होतात , किंवा अकस्मात् ज्याला प्राप्त होतात , त्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे ॥३ -४॥
ज्याचा खालचा ओठ खाली लोंबतो व वरचा वर जातो किंवा दोन्हीही जांभळाच्या फळासारखे जांभळे दिसतात त्याचे जीवित दुर्लभ समजावे .
ज्याचे दात तांबडे किंवा काळे होतात अगर पडतात किंवा दातवण लावल्याप्रमाणे काळसर पांढरे होतात त्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे .
ज्याची जीभ काळी होते , हालत नाही , कफाने वगैरे लपेटल्यासारखी होते , सुजते किंवा कर्कश होते , तो लवकरच मरणार असे समजावे . (ह्याची मुदत पंधरा दिवस .)
ज्याचे नाक वाकडे होते , विस्तृत होते , कोरडे होते , नाकातून शब्द होतो किंवा नाक खाली बसते (कारणावाचून ) तो मनुष्य जगत नाही .
ज्याचे डोळे अगदी आकुंचित होतात , एक लहान व एक मोठा असे विषम होतात , ताठतात (म्हणजे ज्यांची बुबुळे हालत नाहीत ), लाल होतात , गळल्यासारखे वाटतात , किंवा दोन्ही डोळे पसरतात त्याचे आयुष्य संपले आहे असे निश्चयाने समजावे .
ज्याच्या केसात भांग पडतात , भुवया आकुंचित व गळल्यासारख्या होतात , डोळ्य़ाच्या पापण्याचे केस गळतात त्याला लवकरच मृत्यु येतो ॥५ -१०॥
तोंडात घातलेला अन्नाचा घास ज्याला गिळता येत नाही , ज्याला सावरता येत नाही , दृष्टी सारखी एकच ठिकाणी असते व जो बेशुद्ध असल्यासारखा असतो तो तात्काळ गतप्राण होतो .
बलवान असो किंवा दुर्बळ असो ज्याला उठविताना वारंवार मूर्च्छा येते , तो मृत्युपंथास लागला म्हणून समजावे . ह्या चिन्हाचा मनुष्य सात दिवस वाचतो .
जो सर्वकाळ उताणा निजतो , पाय सारखे मागेपुढे करितो किंवा नुसते आखडूनच ठेवतो तो मनुष्य जगत नाही (हे चिन्ह तात्काळ मृत्यूचे आहे .)
ज्याचे हातपाय गार असून श्वासही थंडच आहे , तसेच ज्याचा तुटक तुटक असा उर्ध्वश्वास चालू आहे , अथवा कावळ्याच्या चोचीप्रमाणे तोंड पसरून जो श्वासोच्छ्वास
करीत आहे त्याला ज्ञात्या वैद्याने औषध देऊ नये .
ज्याला सारखी झोप लागत आहे , किंवा जो सारखा जागाच आहे (झोप मुळीच नाही ), अथवा जो बोलण्याचा प्रयत्न करीत असता मूर्च्छित होतो त्याला औषध देऊ नये .
जो मनुष्य वरचा ओठ सारखा चाटीत असतो , व ढेकर देत असतो , अथवा जो पिशाच्चाशी संभाषण करितो तो मूतवत् समजावा .
ज्याला विषाची बाधा असूनही नाक , कान , वगैरे स्रोतोमुखातून व रोमरंध्रातून ज्याच्या रक्त वाहते तो तात्काळ प्राण सोडणार म्हणून समजावे .
वाताष्टीला नावाची वाताची गाठ वर चढून हृदयामध्ये शिरली आहे व तिजमुळे ज्याला फार पीडा होत असून अन्नद्वेषही आहे तो निश्चयाने मरणार म्हणून समजावे .
कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे नसताना जर पुरुषाच्या पायांना प्रथम सूज येईल तर ती त्याचा नाश करणार म्हणून समजावे . तसेच स्त्रियांच्या जर तोंडाला सूज येईल तर तिचाही नाश होईल . आणि गुह्य भागी जर सूज आली तर ती उभयतांचाही नाश करील म्हणून समजावे .
श्वासाचा अगर खोकल्याचा रोगी असून त्याला अतिसार , ज्वर , उचकी , वांती हे उपद्रव व अंड व शिश्न ह्याला सूज आली असेल तर त्यांचे आयुष्य क्षीण झाले आहे समजावे . (ह्यांची मुदत सात दिवसांची आहे .)
घाम व अंगाचा दाह ही दोन्ही लक्षणे वाढत्या प्रमाणात असून उचकी श्वास हे उपद्रव झाले आहे तो बलवान असला तरी नक्की मरण पावतो म्हणून समजावे ॥११ -२२॥
जीभ काळी झाली असून डावा डोळा नाहीसा होतो , (खोल जातो ) व तोंडाला घाण येते , अशा रोग्याला औषध देऊ नये ,
ज्याच्या तोंडावरून सारख्या अश्रुधारा चालल्या आहेत , पाय घामाने बोले झाले आहेत व डोळे व्याकूळ (ग्लान ) झाले आहेत तो मरणार म्हणून समजावे .
ज्याचे शरीरावयव एकाएकी अतिशय हलके किंवा कृश किंवा अतिशय जड अथवा स्थूल होतात तो मरणार म्हणून समजावे .
ज्याच्या ओकारीला चिखल , मासे , चर्बी , तेल , तूप ह्यासारख्या वास येतो किंवा सुगंध येतो तो मरणार म्हणून समजावे .
ज्यांच्या कपाळावर उवा येतात , ज्याने टाकलेला बळी कावळे खात नाहीत आणि ज्याचे मन कोठेही रमत नाही ते मरणार म्हणून समजावे . ज्वर , अतिसार व सूज हे तीनही रोग परस्पराचे उपद्रव होऊन ज्याला झाले आहेत , व तो शक्तिहीन व अतिशय व कृश (मांसहीन ) आहे अशा रोग्याला उपचार करणे अशक्य आहे .
क्षणी झालेल्या ज्या मनुष्याची भूक व तहान आवडत्या , मिष्ट (रुचिकर ) व पथ्यकर अशा अन्नपानादिकांनी शांत होत नाही त्याचा मृत्य जवळ आला म्हणून समजावे .
प्रवाहिका (कुंथून आव पडणे ), मस्तक दुखणे व पोटात दुखणे ह्या व्याधी भयंकर वाढल्या असून ज्याला तहान फार लागत आहे व जो फार क्षीण झाला आहे त्याचा मृत्यु जवळ आला म्हणून समजावे ॥२२ -२९॥
प्रकृतिमानाला अनुसरून योग्य उपचार न झाल्याने , पूर्विजत कर्मफलाने आणि प्राण्यांचे जीवन हे अनित्य असल्यामुळे त्याला मरण येते .
मरणोन्मुख झालेल्या रोग्यासन्निध प्रेते , भूते , पिशाच्चे , व अनेक प्रकारचे राक्षसगण हे नेहमी येतात आणि ते त्याला मारण्याच्या हेतूने त्याला दिल्या जाणार्या औषधाचा गुण नाहीसा करितात . त्यामुळे ज्या रोग्याचे आयुष्य संपले आहे त्याजवर केलेले सर्व उपचार व्यर्थ होतात ॥३० -३५॥