मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
शोणीतवर्णन

सूत्रस्थान - शोणीतवर्णन

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय १४ वा

आता " शोणीतवर्णन " नावाचा अध्याय जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥

पंचमहाभूतात्मक , भोज्य , ( खाण्यायोग्य ) पेय , लेह्य , ( चाटणे ) भक्ष इत्यादी चार प्रकारचा , तसेच मधुरादि सहा रसानी युक्त , शीत व उष्ण वीर्यात्मक किंवा शीत , उष्ण , स्निग्ध , रुक्ष , विशद , पिच्छिल ( बुळबुळीत ) मृदु व तीक्ष्ण असा अष्टविध वीर्यात्मक , गुरु , मंद इत्यादि वीस गुणांनी युक्त , अशा नानाविध पदार्थांनी बनलेला आहार उत्तम रीतीने पचन झाल्यावर त्यापासून अग्नि संयोगामुळे उत्पन्न होणारे ( घृताप्रमाणे ) तेजस्वी आणि परमसूक्ष्म आहे जे सार ( सत्व ) त्याला " रस " असे म्हणतात . त्याचे स्थान हृदय आहे . तेथून तो [ चोवीस धमनीत प्रवेश करुन हृदयाच्या व मस्तकाकडे जाणार्‍या दहा , खाली जाणार्‍या दहा व उजव्या व डाव्या बाजूला जाणार्‍या दोन दोन अशा चार मिळून चोवीस धमनीतून प्रवेश करुन ] ( कंसातील वाक्यशेषाचे मूल संस्कृत वाक्य नंतर घातले असावे असे टीकाकाराचे मत दिसते . ) सर्व देह व्यापतो . आणि अशा रीतीने शरीराचे नित्य पोषण करितो , त्याला वाढवितो , धारण करितो . निदान आहे त्या स्थितीत कायम ठेवतो . ही कार्ये तो करतो खरा ; पण ती कशी करतो त्याचा हेतु म्हणजे त्याची प्रक्रिया कळत नाही ; म्हणून हा रसधातू शरीरातून संचार करीत असता केव्हा तो कमी होतो , केव्हा केव्हा तो वाढतो , केव्हा केव्हा तो विकृत होतो ; ह्याप्रमाणे त्याच्या निरनिराळ्या अवस्था होतात त्यावरुन अनुमानाने गती लक्षात आणावी . शरीराचे सर्व अवयव , दोष धातु व मल ह्यांच्या आशयातून सर्वदा संचार करणारा हा रस सौम्य आहे की तेजस ( आग्नेय ) आहे हे समजून घेण्याची इच्छा असेल तर सांगतो . हा द्रवरुप आहे . शरीरांतर्गत अवयवांना स्नेह ( स्निग्धता ) पुरविणारा आहे . हा देहाचे जीवन आहे . आणि शरीरपुष्टी व धारण वगैरे जे त्याचे गुण वर सांगितले आहेत त्यावरुन हा सौम्य आहे असे वाटते .

हा जलतत्त्वप्रधान रस यकृत व प्लीहा ह्या ठिकाणी गेला म्हणजे त्याला रंग उत्पन्न होतो . ( म्हणजे आरक्तपणा येतो ॥३॥

पण येवढे निश्चित की , तो द्रवरुप रस यकृत व प्लीहा ह्या ठिकाणी गेला येतो आणि त्या योगाने त्याला लाल रंग प्राप्त होतो ; ह्याप्रमाणे त्याचा रंग अगदी लाल झाला म्हणजे त्याला " रक्त " म्हणतात .

स्त्रियांचे " रज " नांवाचे जे रक्त ते देखील रसापासूनच उत्पन्न होते . ते स्त्रियांना बारा वर्षापर्यंत उत्पन्न होते . व दरमहा आर्तव रुपाने दिसते होते . आणि पन्नास वर्षानंतर बंद होते .

स्त्रियांचे आर्तव नावाचे रक्त हे " आग्नेय " आहे . कारण " गर्भ " हा अग्नि व सोमतत्त्वात्मक आहे ( ह्यात पुरुषाचे शुक्र हे सोमतत्त्वात्मक आहे . )

दुसरे कांही आचार्य ’ जीवरक्त ’ हे पंचभूतात्मक आहे असे म्हणतात ॥४॥८॥

विस्त्रता ( चमत्कारिक वास ), द्रवता ( पातळपणा ), राग ( लाग रंग ), स्पंदन ( थरथर गति ) व लाघव ( हलकेपणा ) हे पृथिव्यादि पाच भूतांचे वेगवेगळे पाचही गुण रक्तामध्ये दृग्गोचर होतात , म्हणून रक्त हे पंचभूतात्मक आहे .

रसापासून रक्त , रक्तापासून मांस , मांसापासून मेद , मेदापासून अस्थि , अस्थिपासून मज्जा आणि मज्जेपासून शुक्र उत्पन्न होते .

नित्याच्या अन्नपानापासून मनुष्याची उत्पत्ति आहे असे समजावे . आणि ह्यासाठी बुद्धिवानाने अन्न , पान व आचारविचार ह्याविषयी योग्य ती खबरदारी घेऊन रसधातूचा बिघाड होणार नाही असे पहावे ( ’ रस ’ हा धातु गति वाचक आहे आणि देहातील हा जलतत्वप्रधान पदार्थ नित्य सर्व शरीरभर फिरतो , म्हणून त्याला ’ रस ’ ही संज्ञा आहे ॥९॥१३॥

हा रस धातु तीन हजार पंधरा कला इतका कालपर्यंत एका एका धातूंचे ठिकणी राहतो . नंतर दुसर्‍या धातूत प्रवेश करितो . ह्या प्रमाणे एक महिन्याने रसाला शुक्राचे स्वरुप येते व स्त्रियांचे ठिकाणी आर्तव स्वरुप येते .

अठरा हजार नव्वद काल इतका काळ लोटला म्हणजे रसाचे शुक्र किंवा आर्तव तयार होते . ही संस्था ह्या ग्रंथात सांगितली आहे त्याप्रमाणे आमच्या ( शाखेच्या ) व इतर तंत्रकारानीही ( आत्रेयादिकांनीही ) सांगितली आहे ॥१४॥१५॥

शब्द , ज्वाळा किंवा पाणी हे पदार्थ जसे एकसारखे गतियुक्त असतात त्याप्रमाणे रस हा अति सूक्ष्म रुपाने देखील सर्व शरीरात सारखा गतिमान असतो .

वाजीकरण औषधे ही आपल्या स्वतःच्या गुणप्रभावाने व बलाने तात्काळ वीर्य उत्पन्न करुन विरेचन औषधाप्रमाणे ते रतिप्रसंगी लवकर सोडतात .

जसा फुलाच्या कळीमध्ये असलेला वास त्या ठिकाणी आहे असे म्हणता येत नाही व त्या ठिकाणी नाही असेही म्हणता येत नाही , तथापि तो वास त्या कळीमध्येच आहे असे गृहित धरावे लागते ; कारण ज्या वस्तूंचे अस्तित्व असते त्याच वस्तू केव्हा तरी प्रगट होतात . ह्या न्यायाने वास त्या कळीत अव्यक्त रुपाने असतोच , पण त्यांच्या अति सूक्ष्मत्वाने त्यांचे ज्ञान होऊन आतील केसर बाहेर पडले म्हणजे तो वास व्यक्त होतो . ( त्याप्रमाणे मुलांना देखील ती वयात आली म्हणजे त्यांचे शुक्र व्यक्त होते ; व त्यांना दाढी इत्यादि तारुण्यात येणारे केस येऊ लागतात . विशेषतः स्त्रिया वयात येऊ लागल्या म्हणजे जसजसे हळू हळू त्यांचे आर्तव संचित होऊ लागते तसतसे त्यांचे स्तनगर्भाशयादि अवयव वाढू लागतात )

तोच अन्नरस वृद्ध मनुष्याचे शरीर जीर्ण झाल्यामुळे त्यांच्या धातूंचे पोषण करु शकत नाही . केवळ जगवितो .

ते हे रसादि शुक्रापर्यंतचे सात धातु मनुष्याचे शरिराचे धारण करितात म्हणून त्यांना धातु असे म्हणतात .

त्या धातुची क्षय व वृद्धीही रक्तावर अवलंबून आहे . म्हणून सुरवातीला रक्तासंबंधी माहिती सांगतो .

रक्त फेसाळ , तांबडे , काळसर , किंवा काळे , रुक्ष , पातळ , शीघ्रगामी घट्ट न होणारे असले म्हणजे ते वातदोषाने दूषित आहेत असे समजावे .

ते निळे , पिवळे , हिरवट काळे , चमत्कारिक ( वाईट ) वास , मुंग्या व माशा ह्यांना न आवडणारे व घट्ट न होणारे असे असले म्हणजे ते पित्ताने दूषित झाले आहे असे समजावे . जे सोनकावेच्या पाण्याच्या रंगाचे , स्निग्ध थंड , दाट , बुळबुळीत , हळूहळू वाहणारे व घट्ट असल्यामुळे मांसाच्या चकतीसारखे दिसते ते रक्त कफदोषाने दूषित असे समजावे .

ह्या वातादि तीनही दोषांच्या लक्षणांनी युक्त , कांजीसारखे दिसणारे , विशेषकरुन दुर्गंधी असे जे रक्त ते सन्निपात ( त्रिदोषाने ) दुष्ट समजावे . आणि केवळ ते स्वदोषाने दूषित असेल तर त्यात पित्तदोषांची लक्षणे असतात व ते अति काळे असते . दोन दोषांनी दूषित असल्यास त्यात दोन दोषांची मिश्र लक्षणे असतात . जीव शोणितांचे ( रक्तांचे ) लक्षण दुसरीकडे सांगणार आहो .

जे रक्त इंद्रगोप किड्याप्रमाणे गर्द लाल , जे अति पातळ किंवा अति घट्ट नाही असे , व वस्त्रादिकावर पडलेले धुताना रंगात बदल न होणारे असे असते ते रक्त निर्दोष समजावे ॥१६॥२२॥

कोणाकोणाचे रक्त काढून टाकण्यासारखे आहे ते इतर ठिकाणी सांगितले आहे .

रक्त कोणाचे काढू नये ते येथे ज्याच्या सर्व अंगाला सूज आहे , अशक्त मनुष्य असून त्याच्या अंगाला सूज आहे , अति आंबट पदार्थ खाऊन सूज आली आहे असे , पांडुरोगी , मुळव्याध , उदर , क्षय व गर्भिणी ह्यांच्या सुजेतून रक्त काढू नये . ह्याची व्रणासंबंधी एकांगी ( एकच बाजूस ) सूज असली तरी देखील तिजमधून रक्त काढू नये .

शस्त्राने रक्त काढण्याचे दोन प्रकार आहेत . एक फासण्या वगैरे घेऊन व दुसरा शिरा वेध करुन शस्त्राने रक्त काढावयाचे असल्यास मर्मस्थानच्या रक्तवाहिन्या स्नायू व सांधे ह्यांना धक्का न लागेल अशा बेताने सरळ परंतु फार मोठी जखम होणार नाही अशा रीतीने बारीक , सारख्या प्रमाणात , फार खोल किंवा फार उथळ नाही असा छेद पडेल अशा बेताने झटकन शस्त्र चालवावे .

आकाश ढगांनी व्यापले असता किंवा पाऊस पडत असता , वेध चांगला झाला नाही तर , गारठा किंवा वारा असेल तर , त्याला स्वेदन क्रिया , केली नसेल तर , जेवल्याबरोबर ( काहींच्या मताने उपाशी असता ) किंवा रक्त घट्ट असल्यामुळे बरोबर स्त्राव होत नाही किंवा स्त्रवल्यास फार थोडे स्त्रवते . ( पाझरते . )

उन्माद व मूर्च्छा ह्यांनी व श्रमाने दमलेला , अपान वायु व मलमूत्र यांचा अवरोध असलेला , व भ्यालेला अशा माणसाचे रक्त स्त्रवत नाही .

दूषित रक्त काढून टाकले नाही तर त्यामुळे कंडु , खाज , सूज , लाली , दाह , पुरळ येणे व वेदना हे विकार होतात . कडक उन्हाचे वेळी ( किंवा अतिशय उष्णता असता ), रोग्याला अति स्वेदन केले असता , जखम फार खोल व मोठी झाल्यामुळे व अडाणी वैद्याकडून रक्तस्त्राव केल्याने , अतिशय रक्तस्त्राव होतो . अति रक्तस्त्राव झाला तर मस्तक तापणे , डोळ्यास आंधेरी , अधिमंथ ( एक नेत्र विकार ), दृष्टिनाश , धातुक्षीणता , आक्षेपक ( एक वातरोग ), पक्षघात , एकांगविकार ( एकादा अवयव लटका पडणे ), तहान , दाह , उचकी , खोकला श्वास , पांडुरोग हे विकार होतात अथवा मरणही येते ॥२३॥३०॥

ह्यासाठी अतिशय थंडी नाही , अतिशय उष्णता नाही , रोग्याचे फार स्वेदन केले नाही , तो उन्हाच्या वगैरे तापाने तापलेला नाही अशा सर्व गोष्टी अनुकूल असता रोग्याला यवागु ( कणेरी ) पाजून मग त्याच्या रक्ताचा स्त्राव करावा . ( हल्ली शिरेतून ग्लुकोज इ० देतात )

दूषित रक्त निघून गेल्यावर योग्य असे तांबडे रक्त दिसू लागले म्हणजे विस्त्रावण चांगले झाले असे समजावे . ( मर्मातील रक्तवाहिनी तुटली नसल्यास . ) ते रक्त वाहण्याचे आपोआप थांबते . ह्याप्रमाणे रक्तस्त्राव झाला म्हणजे त्याला योग्य स्त्राव झाला असे म्हणावे .

शरीराला हलकेपणा येणे , वेदना कमी होणे , रोगाचा जोर नाहीसा होणे आणि मनास हुषारी वाटणे ही लक्षणे योग्य प्रकारे रक्तस्त्राव झाल्याची आहेत .

त्वचेचे रोग , गाठी , सूज व इतर रक्तजन्य रोग हे रक्त काढून घेणाराला केव्हाही होत नाहीत ॥३१॥३४॥

शस्त्राने केलेल्या क्षतातून रक्त न येईल तर - वेलचीदाणे , कपूर , कोष्ठ , तगर , पहाडमूळ , देवदार , वावडिंग , चित्रकमूळ , सुंठ , मिरे , पिंपळी , घेरोसा , हळद , रुईच्या पानांचे अंकूर व थोर करंजाच्या बिया ह्या पैकी ज्या तीन , चार किंवा सर्व जिनसाचे चूर्ण करुन ते तेल व सैंधव यांचेसह मिश्र करुन त्याने त्या क्षतावर घासावे . ह्या प्रयोगाने रक्त चांगले वाहू लागते .

( शुद्ध रक्तवाहिनी कापली जाऊन ) रक्त अति वाहू लागले तर लोध्र , जेष्ठमध , गहुला , पतंग , सोनकाव , राळ , रसांजन , शेवरीची फुले , शंख , शिंपा , उडीद , सातु व गहू यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन ते थोडे त्या क्षतावर टाकून बोटाने दडपावे . किंवा सागवान किंवा सुरुवृक्ष , राळेचा वृक्ष , अर्जुनसादडा ( अंजनवृक्ष ), खैर , मेढशिंगी , धावडा , धामणीचे झाड यांच्या सालीचे वस्त्रगाळ चूर्ण करुन ते चूर्ण वरीलप्रमाणे दडपावे किंवा तागाच्या वस्त्राची राख करुन ती दडपावी . अगर समुद्रफेस व लाख ह्यांचे चूर्ण दडपावे ; आणि तागाच्या अगर कापसाच्या फडक्याने पट्ट्याने बळकट बांधावे . त्याजवर थंड पाण्याची घडी ठेवावी . थंड पदार्थ खाण्यास द्यावे . गारव्याच्या जागेत ठेवावे . आणि थंड औषधाचे थंड गार केलेले काढे व थंड औषधांचे लेप करावे किंवा मागील क्षार अग्निकर्म अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्या क्षतावर क्षाराचा किंवा अग्नीचा प्रयोग करावा . अथवा आधी पाडलेल्या क्षताखाली पुनः वेध करावा . अथवा काकोल्यादि गणातील औषधांचा काढा मध व साखर पुष्कळ घालून गोड करुन पाजावा . किंवा हरीण , तांबडे हरीण , ससा , म्हैस ( रेडा ) किंवा रानडुकर यांचे रक्त पाजावे . त्याला दूध , मुगांचा यूष , मांसरस व तूप वगैरे स्निग्ध पदार्थ खाण्यास घालावे . मस्तक तापणे वगैरे उपद्रव असतील तर त्या त्या विकारानुरुप औषधोपचार करावे .

अति रक्तस्त्रावामुळे जर धातू क्षीण होतील तर जठराग्नि मंद होतो . आणि वात अतिशय वाढतो . म्हणून त्या रोगाला दक्षतेने अतिशय थंड नाही असा , हलका , रक्ताची वृद्धि करणारा , स्निग्ध पदार्थांनी युक्त , आंबट नाही असा किंवा किंचित आंबट असा आहार द्यावा ॥३५॥३८॥

अति रक्त वहाण्याचे बंद करण्याचे चार उपाय आहेत . ते असेः - संधान ( व्रणाचे तोंड साधणे , बंद करणे ), स्कंदन ( रक्त घट्ट होण्याचे उपाय ), व्रण पक्व करणे आणि क्षतावर डाग देणे ( क्षारादिकांनी ), लोध्र वगैरे तुरट द्रव्ये व्रणाचे संधान करितात , ( तोंड बंद करितात ). थंड उपाय रक्त घट्ट करितात . तागाच्या वस्त्रांची वगैरे राख व्रणाचे पाचन करिते ( स्वरुप बदलते ). आणि क्षार अग्नि ह्यांचा डाग शिरांना आकुंचित करितो .

जर रक्त गोठत नसेल तर संधानीक ( जोडणारी चूर्णे टाकणे वगैरे ) औषधे योजावी , संधानीक औषधांचा उपयोग झाला तर पाचन औषधे योजावी . हे वरील तीन प्रकारचे उपाय विधियुक्त करण्याविषयी फार दक्षतेने रक्षण करावे . कारण रक्त हेच जीवन आहे .

ज्याचे रक्त काढले आहे अशा मनुष्याच्या क्षतस्थानी थंड पाणी शिंपणे वगैरे उपचार केल्याने वात वाढून जर त्या ठिकाणी सूज व ठणका सुरु झाला तर त्यावर कोमट असे तूप लावावे ॥३९॥४५॥

अध्याय चवदावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP