मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
वमनद्रव्यविकल्प

सूत्रस्थान - वमनद्रव्यविकल्प

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय त्रेचाळिसावा

आता ‘‘वमनद्रव्यविकल्प विज्ञानीय ’’ नावाचा अध्याय सांगतो जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

कुडा , देवडांगरी , कडु भोपळा वगैरे वातकारक अशी जी फळे आहेत त्यात गेळ्य़ाच्या झाडाची फळे फार श्रेष्ठ आहेत .

गेळ्याच्या झाडाची फुले (अथवा फळे ) आणून ती उन्हात वाळवून त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे . नंतर ते चूर्ण चार तोळे आणि आघाड्याचे मूळ रुईचे मूळ किंवा कडुनिंबाची साल ह्यापैकी कोणत्याही एका द्रव्याचा काढा करून त्या काढ्यात थोडा (काढ्यात चतुर्थांश ) मध व थोडे सैंधव घालून त्यात ते चार तोळे चूर्ण मिसळून पाजावे . व त्याने वांती करवावी . अथवा वरीलप्रमाणे गेळ्य़ाची फळे उन्हात वाळवून त्याचे चूर्ण करून ते चूर्ण आणि बकुळीच्या फुलाचे अथवा बकाण्या निंबाच्या बियांचे चूर्ण ही चूर्णे मध व सैंधव ही द्रव्ये वरील आघाडा , रुईचे मूळ किंवा कडुनिंबाची साल ह्यापैकी कोणत्याही एका द्रव्याच्या काढ्याशी मिश्र करून पाजून वांती करवावी , अथवा वरीलप्रमाणे केलेले गेलफळाचे चूर्ण घालून तयार केलेली तीळ व तांदूळ ह्याची यवायु (कणेरी ) पाजून वांती करवावी .

अतिशय हिरवी नाहीत किंवा अति पांढरीही नाहीत अशी पाडाला आलेली गेळ्य़ा झाडाची फळे आणून ती दर्भाच्या काड्याच्या सुगडात बांधून त्याजवर मातीने व गाईच्या शेणाने लिपावे . आणि सातुचा कोंडा किंवा भूस , मुग , उडीद किंवा साळी वगैरे कोणत्यातरी धान्याच्या राशीत आठ दिवसपर्यंत पुरून ठेवावी . आठ दिवसानंतर ती फळे काढावी . ती फुटून ओली झालेली असतात . त्यांतील बिया काढून त्या उन्हात वाळवून ठेवाव्या . नंतर पुनः त्या बिया दही , मध मांस एकत्र वाटून त्यात कालवून वाळवाव्या व चांगल्या भांड्यात भरून ठेवाव्या . मग ज्या रोग्यास वांती करवावयाची त्याच्या नखे झाकलेल्या मुठीत जेवढ्या बिया मावतील तेवढ्या घेऊन जेष्ठमधाचा काढा किंवा ‘कोविदारादि ’ गणातील एकाद्या औषधाचा (योग्य त्या ) काढा करून त्या बिया वाटून रात्रभर तशाच ठेवाव्या . मग सकाळी त्या वाटून रात्रभर तशाच ठेवाव्या . मग सकाळी त्या वाटून रात्रभर तशाच ठेवाव्या . मग सकाळी त्या कल्कात मध व सैंधव घालून पुढील मंत्रानी तो कल्क अभिमंत्रित करावा (मंत्रावा ) ब्राह्मणाकडून पुण्याहवाचनादि आशीर्वाद घेऊन रोग्याने उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसून ते औषध घ्यावे . औषध अभिमंत्रित करण्याचा मंत्र . (मंत्राचा अर्थ ).

‘ ब्रह्मदेव , दक्षप्रजापति , अश्निकुमार , रुद्र , इंद्र , पृथ्वी , चंद्र , सूर्य , अग्नि , वायु ह्या देवता . सर्व ऋषी , औषधीसमुदाय , सर्व भूतसमुदाय हे तुझे रक्षण करोत . ऋृषींना ज्याप्रमाणे रसायन गुणकारक होते , किंवा देवांना अगर नागांनासुद्धा अमृत ज्याप्रमाणे गुणदायक होते त्याप्रमाणे हे औषध तुला गुणकारक हाऊ दे .’

हे वरील प्रयोग बहुधा कफज्वर , पडसे व अंतर विद्रधि ह्या विकारात वांती करवून दोष काढण्याकरिता योजावे . हे योजूनही जर वमन होऊन दोष निघाले नाहीत तर पिंपळी , वेखंड पांढरे शिरस , ह्यांच्या कल्कात पूर्ववत् त्या गेळफळातील बिया घालून , त्यात सैंधव व पुष्कळशी कांजी घालून , वरचेवर थोडे प्यावयास देऊन योग्य वमन झाल्याची लक्षणे दिसेपर्यंत ओकवावे . अथवा त्या गेळफळाच्या बियांच्या चूर्णाला गेळफळाच्या काढ्याची भावना देऊन ते चूर्ण गेळफळाच्याच काढ्यातून पाजावे .

किंवा गेळफळाच्या बियांचा दुधामधेच काढा करून तो पाजावा . अथवा गेळफळांच्या बियांचे चूर्ण टाकून सिद्ध केलेल्या दुधावरील साय मधाशी मिश्र करून चाटवावी . किंवा गेळफळांच्या बिया टाकून सिद्ध केलेले (दुग्धावशेष काढा केलेले ) दूध पाजून वांती करवावी . किंवा गेळफळाच्या बियांनी वरीलप्रमाणे तयार केलेले दूध घेऊन त्यात तांदुळाची कणेरी मिळवून पाजावी . हा यवागूचा प्रयोग बहुतेक अधोगामी रक्तपित्त व हृदयातील दाह ह्यांजवर योजावा .

कफाने मळमळणे , ओकारी येणे , मूर्च्छा व तमकश्वास ह्या विकारात गेळफळातील बिया टाकून दुग्धावशेष काढा करून त्या दुधाला विरजण लावून त्याचे दही करावे व त्या दह्यावरील साय चाटावयास देऊन वांती करवावी किंवा ते सर्व दही पाजूनही वांती करवावी .

पित्त वाढून कफस्थानी गेले असता चिकित्सास्थानातील द्विव्रणीय अध्यायात बिब्ब्याचे तेल काढण्याची रित सांगितली आहे , त्या रीतीने गेळफळांच्या बियांचा रस काढून तो अग्नीवर शिजवून काकवीप्रमाणे दाट करून चाटवावा किंवा तो दाट केलेला रस उन्हात वाळवून त्याचे चूर्ण जीवंतीच्या काढ्यातून पाजावे व वांती करावी . (जीवंती ही एक डोंगरी वेल असून तिचा वर्ण वाळलेल्या शाळूच्या कडब्यासारखा असतो .)

गेळफळाच्या बियांचा काढा करून त्यात पिप्पल्यादि गणातील औषधांचे चूर्ण टाकून पाजावा . किंवा त्या गेळफळाच्या बियांचे चूर्ण कडुनिंबाच्या सालीच्या काढ्यातून किंवा रुईच्या मुळ्य़ाच्या काढ्यातून पाजावे . हे तीन वांतीचे प्रयोग संतर्पण औषधाच्या प्रयोगापासून कफ वाढून त्या कफाने होणारे जे विकार त्यांचा नाश करितात . अथवा ज्येष्ठमध , शिवणीची फळे व मनुका ह्यांचा काढा करून त्य काढ्यात गेळफळाच्या बियांचे चूर्ण टाकून पाजावे व वांति करवावी . हा प्रयोगही वरील प्रकारच्या कफविकारात योजावा . ह्याप्रमाणे हे गेळफळाचे निरनिराळे एकतीस कल्प सागितले आहेत ॥३॥

देवदालीकल्प प्रयोग

वर गेळ्य़ाच्या फुलांचा जो विधि सांगितला त्याच विधीने देवडांगरीची फुले आणून वाळवून त्यांचे चूर्ण करून , वर गेळ्य़ाच्या फुलाचे जे कल्प सांगितले आहेत त्याचप्रमाणे ह्या फुलांच्या चूर्णाचेही कल्प योजावे . दूर्वांप्रमाणे दुधाशी हे चूर्ण देऊन वांती करवावी . देवडांगरीची कोवळी फळे आणून त्या फळांनी पक्व केलेल्या दुधाशी तांदुळाची कणेरी मिश्र करून पाजून वांती करवावी . जर देवडांगरीच्या फळावर कूस आली असेल , तर त्या फळांनी पक्व केलेल्या दुधावरील साय चाटावयास देऊन वांती करवावी . आणि जर त्या फळावर कूस नसेल तर त्या कूस नसलेल्या फळांनी पक्व केलेल्या दुधाचे दही करावे व त्या दह्यावरील साय द्यावी . ती फळे किंचित हिरवट , पांढरी (पाडाला आलेली ) असल्यास त्या फळांच्या चूर्णाने सिद्ध केलेल्या दुधाचे दही करून ते पाजून वांती करवावी .

कफदोष , अरुचि , खोकला , श्वास , पांडुरोग व क्षय ह्या रोगात वांतीचा प्रयोग करणे झाल्यास देवडांगरीच्या वाळविलेल्या फळांचा काढा करून त्या काढ्यापासून बनविलेली सुरा (दारू ) मिश्र करून पाजून वांत करवावी . आणि ही देवडांगरीची फळे पिकली असली , तर त्या फळातील बिया काढून , त्या बियांचे गेळफळातील बियांच्या कल्पाप्रमाणे कल्प योजून वांती करावी . (ह्याप्रमाणे देवडांगरीच्या फळाचे चोवीस योग होतात .)

ह्या देवडांगरीच्या बियाप्रमाणेच कुड्याच्या शेंगातील बी काढून घेऊन त्या बियांचे (इंद्रजवाचे ) कल्प तयार करून त्या कल्पाने वांती करावी .

कडु दोडक्याच्या बियांचाही देवगडांगरीच्या बियांप्रमाणेच उपयोग करावा .

कडु भोपळ्याच्या फुलाचे प्रयोग गेळफळाच्या फुलांच्या प्रयोगाप्रमाणेच करावे . खोकला , श्वास , ओकारी व कफरोग ह्या विकारात गेळफळासंबंधी जे दुधाचे प्रयोग सांगितले आहेत ते ह्या कडु भोपळ्य़ाचेही करावे .

कडु घोसाळ्य़ाचाही गेळफळांच्या बियाप्रमाणे उपयोग करावा . जुनाट विष (गर ) कोठ्यात शिल्लक राहिले असता , गुल्म , उदर , खोकला , श्वास व कफरोग ह्या विकारात व वायु कफस्थानात गेला असता ह्या कडु घोसाळ्य़ाचे कल्प वांती करिता योजावे . कडु दोडक्याच्याच्या बियांना गेळफळ वगैरे वमनकारक द्रव्ये मिळतील तितक्यांचा काढा करून त्या काढ्याच्या बर्‍याचशा भावना द्याव्या . (एकवीस भावना तरी द्याव्या .) नंतर त्या बियांचे चूर्ण कमळे वगैरे सुवासिक फुलावर पेरून त्या फुलाचा वास घ्यावयास सांगावा , म्हणजे त्या वासाने वांती होते . हा प्रयोग ज्याचे दोष फारच वाढले आहेत त्याला , किंवा जो अगदी घशाशी येईपर्यंत कणेरी प्याला आहे त्याला योजावा .

हा जो कडु दोडक्याच्या बियांना भावना देण्याचा प्रयोग सांगितला आहे . त्याचप्रमाणे इतर वांतीची द्रव्ये , ढाकळाची द्रव्ये किंवा शिरोविरेचनाची द्रव्ये ह्यांना त्या त्या गणातील द्रव्यांच्या काढ्याच्या अशाच पुष्कळशा (एकवीस अगर शंभर देखील ) भावना दिल्या असता , ती भावना दिलेली द्रव्ये , अतिशय तीव्र गुण देणारी होतात ॥४ -९॥

वमनकारक द्रव्यांच्या प्रयोगासंबंधाने हे थोडेसे दिग्दर्शन केले आहे . ह्या प्रयोगाची रोगानुरूप निवड करून व रोग्याची शक्ति आणि वमन देण्याचा योग्य कालह्यांचा विचार करून , तया वमनकारक प्रयोगाचे काढे , स्वरस , कल्क व चूर्ण असे जे योग्य वाटतील ते प्रयोग तयार करून , ते पेय पदार्थ (तरवणी वगैरे ), चाटण्याचे पदार्थ (साय वगैरे ) किंवा खाण्याचे पदार्थांशी मिसळून देऊन वांती करवावी ॥१० -११॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP