पद ११ वे
नर तनु व्यर्थ जाणार , काळ खाणार , हे मना ,
ऐक सज्जना अशी तनु पुन्हा कधिं न मिळणार ॥धृ०॥
देवाने दिधली काया । आपुलेचि स्वरुप ओळखाया ॥
हरिभक्त शोधुनी फक्त । दत्तपदी विनित कसे होणार ॥१॥
नरदेह दिला अव्यंग । भलभलते करिसी ढंग ॥
विषयाचा धरुनी संग । सांग श्रीरंग कुठे मिळणार ॥२॥
मम राज्य तुला ही पदवी । सखया , तुज दिधली बरवी ॥
इंद्रिये स्वाधिन ठेवियली । विषयांत दिननिशी रमता ॥
कळेना अंत कसा होणार ॥३॥
षडरिपुंना करुनी राजी । श्रीहरीचे भजनी लागी ॥
यमराज दिवस बहु मोजी । अवचित घालुनी वित्त ॥
नेलिया स्वहित कसे होणार ॥४॥
सुखदुःखसम हा पैका । ही प्राप्त जाहली नौका ॥
भवतारका केली कैका । नावाडी बलभीमराज ॥
तयाचे पाय ठकू धरणार ॥५॥
पद १२ वे
चाल - वैशाख मास
नाथजिने सघनदाट रुप दाविले ।
सुवर्णाच्या खाणि आंत लोटिले ॥धृ०॥
स्फुरण होतां वृत्तिवरी त्वरित आदळते ॥
जगदाभास पाहतां शिवनाम पावते ॥
जीवत्व घेतां नामरुप भासले ॥१॥
पाहणे उठतां किंचित आकाश हाले ॥
मी म्हणतांची अर्ध पर्व आकाश भासले ॥
मी देह भावितांची मोठे जहाले ॥२॥
दृष्टिदोष काढुनी विभुत्व ठसविले ।
दाखविता प्रत्यक्ष संधिमाजी थबकले ॥
अलक्ष वस्तु नेत्रांमाजी दाविले ॥३॥
स्वकरे सामान्यत्व उघड दाविले ॥
परंतु घ्यावया हातांनी ते न कधी हले ॥
काय सांगू शब्द नाही उरले ॥४॥
सद्गुरुबलभीमकृपे आकळितां आले ॥
व्यापकत्व पाठिपोटी दिसूं लागले ॥
भागिरथी नांव नाहि राहिले ॥५॥
पद १३ वे लुगडे
आत्माराम हा प्रिय कांतेची समजूत घाली परोपरी ।
कां न बोलसी सांग जिवलगे रीत मौन्य ही नव्हे बरी ॥धृ०॥
तव हौसेचे विश्वमंदिर सजविले मी पहा कसे ।
चित्रविचित्र बाग लाविले पुष्पगुच्छ किती गमतीचे ॥१॥
तव प्रेमास्तव निर्गुण असतां सगुणाची झालो सुंदरी ।
पुरे पुरे हा सोड अबोला लीलावती हो सत्वरी ॥२॥
काय कमी तुज सांग लाडके वस्त्राभरणे अलंकारा ।
प्रणयरुपिणी राणी असतां कारण अससी आकारा ॥३॥
पंचरंगाची बारिक चुनडी आठ रंगि हा दोरवा ।
सत्राचे ते चंदेरी पातळ एकोणीस गुंजि पारवा ॥४॥
पंचविसांची चंद्रकळा ही आवडते कां प्रिये तुला ।
त्याहूनि सुंदर लुगडे असे हे बावन्नांचे सांग मला ॥५॥
तीनशेसाठांचा शालु बुट्याचा मागचि याचा सहजपुरी ।
हजार रुपये पदर अमोलिक कांठचि याचे जरतारी ॥६॥
अंबर पातळ मुक्त पदर हे मोल असे नव लाखांचे ।
चोळी अंजेरी बनारसेची लेणे फार दिमाखांचे ॥७॥
होती रुसली खुदकन हसली जवळ बैसली येऊनी ।
बोलुं लागली समजूत पटली भागिरथी बलभिमचरणी ॥८॥
पद १४ वे पायघड्या
पायघड्या घातल्या ग माय सद्गुरुरायाला ॥
अखंड सेवा घ्यावी म्हणुनी विनंति पायाला ॥धृ०॥
पंच रंगांची शाल अमोलिक पायघड्या खाली ॥
स्वानुभवाचे कांठ अमोलिक शोभति जरतारी ॥
तनमनधन वाचेने सेवा करीन सुखकारी ॥१॥
श्रवणी श्रवण प्राप्त होउनि रुप स्वानुभवा आले ॥
कीर्तनयोगे वाणीचे मळ समूळ ते झडले ॥
विष्णुस्मरणे सद्गुरुस्वामी त्रिभुवनांत भरले ॥२॥
अंतःकरणे पाद सेवुनी शुद्ध ज्ञान झाले ॥
अर्चन करितां चित्ताचे ते चिद्स्वरुप झाले ॥
अहंकारादिक मस्तक नमुनी चरणी बळि दिधले ॥३॥
दास्यत्वासी सद्गुरुराजा चराचरी भरला ॥
मोहाने तो सखा मानुनी हृदयी बसवीला ॥
शुभ इच्छेने आत्मनिवेदन केले सद्गुरुने ॥४॥
आर्त भक्त तो इच्छित फल ते मागे देवासी ॥
अर्थार्थी तो दंभ करितसे जन भुलवायासी ॥
जिज्ञासू तो एकचि शोधी आत्मस्वरुपासी ॥५॥
गुरुकृपेने ज्ञानचि होतां जन्मदुःख गेले ॥
प्रेमलक्षणे सद्गुरु आपण एकरुप झाले ॥
भिन्नपणा त्यागुनी एकमेकां आलिंगीले ॥६॥
यथामतीने क्रमाक्रमाने पायघड्या वरती ॥
गुरुरायाच्या संगे मी हो गेले मुळघरती ॥
भागिरथी मुरली नाही उरली , उरली बलभिममूर्ती ॥७॥
अभंग १५
धन्य दिन फळला । कार्तिकी पौर्णिमा ॥
पूर्ण चंद्र नौका । मीळालीसे ॥१॥
नौका हे गुरुराव । भवनदी उतराया ॥
नेवोनी पैलपार । ठाव दीला ॥२॥
वाट पाहूं जातां । फुटल्या दाही दीशा ॥
ग्रंथोग्रंथी अर्थ । एक दीसे ॥३॥
आतां नसे गुंता । कोठेची ऊरला ॥
सर्वत्र संचला । सद्गुरुनाथ ॥४॥
बलभीमचरणी । ठेवोनीया डोई ॥
भागिरथी लीन । अनन्यभावे ॥५॥
पद १६
एक घरांत मांजर
एक मी पूजी दैवत ॥ सद्गुरुनाथ ॥धृ०॥
एकवीस स्वर्गावरचे फळ ॥ ते म्यां पाहिले निर्मळ ॥
सद्गुरुने दाविले सोज्वळ ॥ काय सांगू मात ॥१॥
सप्त पाताळाचे वर ॥ तिथे नाही लोकलोकांतर ॥
तेथुनि झाला असे हा खेळ ॥ दावि साक्षात ॥२॥
पर खेळाची तेथे वार्ता ॥ खेळ खेळती दोघे सुत ॥
पहा त्यांचे होउनि लेक ॥ सौख्य वाटत ॥३॥
बलभीमराया यांचा सुत ॥ भागिरथि त्यांच्या पोटी येत ॥
ऐसी ठकूने कथियेली मात ॥ पहा तुम्हि हीत ॥४॥
अभंग १७
ज्ञानवैराग्य या बाळा ॥ भक्ति माउलि पाजी पान्हा ॥१॥
नको ज्ञान - सुत ते काळे ॥ जेणे वैराग्य वीटाळे ॥२॥
गुरुभक्ति सटावली ॥ बाळे दोन्ही सूक्ष्म झाली ॥३॥
न ऐकिती कोणाचे ॥ भक्त लागे सद्गुरुवाचे ॥४॥
भागीरथि बाळ बोले ॥ गुरुभक्ती ठेवी ओले ॥५॥
पद १८
आन बान जियामे
सद्गुरुराय अधिक आले ॥ ब्रह्मा विष्णु शिवाहुनि ॥
सदैव आगळे हो ॥धृ०॥
वर्षमास अधिक नोहे ॥ व्रतनेम अधिक नोहे ॥
सद्गुरुनाथ अधिक खरे ॥ कैवल्यपदी निजवीले ॥१॥
पापपुण्य समान झाले ॥ तेव्हा नरतनु हातांसि आले ॥२॥
आपुप वायन तयार केले ॥ स्नेह - घृती तळियेले ॥
रोमरोमी ब्रह्म भरले ॥ आत्म तुळशी अर्पियेले ॥३॥
बलभीमराये स्वीकारिले ॥ मीपण माझे नाहि उरले ॥४॥
अभंग १९
सद्गुरुचरण घडी घडी सेवितां ।
नसे तेथे वार्ता दुःखाची ती ॥१॥
वरिवरी परमार्थ नका करुनि दावूं ।
होईल घातकू तुमचाची ॥२॥
श्रवण मनन कीर्तन असावे ।
दास हे बनावे सद्गुरुपायी ॥३॥
समर्थांच्या सांनिध्ये येत असे ताठा ।
न धरावा ताठा लोकांमाजी ॥४॥
याचा तो उपकार लोकांसी बा काय ।
याचा तो उपाय स्वतांलागी ॥५॥
ठकू म्हणे न करा जीवाची नासाडी ।
बलभीमचरणी धरा गोडी ॥६॥
पद २०
हम तो भिकारी०
आम्ही भिकारी भिकारी । भिक्षा मागतो दारोदारी ॥धृ०॥
नको साडी चोळी मला । नको घरदारही मला ।
नको मला पुत्र संपत्ती ॥१॥
नको मला मोहिनी अस्त्र । पतीस धरुं दे मजवरी शस्त्र ।
नको मला द्रव्य संपत्ती ॥२॥
नको मला राजकीय सत्ता । होऊं दे क्लेश कायेसी आतां ।
नको मला जगाशी मैत्री ॥३॥
नको मला लोकेषणा । नको ज्ञान वैराग्यही मला ।
न मागते मी विवेकवारी ॥४॥
नको मला शांती दया । नको मला मुक्ती दारा ।
देईं प्रेम लक्षणा भक्ती ॥५॥
प्रेमाची भिक्षा दे रे बापा । बोले भागिरथी बलभीमनाथा ॥
एकानंद लाभे चरणी ॥६॥