भागीरथीबाई - अभंग संग्रह ६१ ते ७०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद ६१
चाल -पितया नमिते तव पायां०

अग बायांनो तुम्ही पाहा ।

नका करुं संतांची चाहा ॥ध्रृ०॥

कामक्रोधाची नासाडि करिती ।

मोह ममतेसी दूर सारिती ॥१॥

संशया देशोधडी लाविती ।

निजबोध हाती देती ॥२॥

प्रपंच मिथ्या स्पष्ट दाविती ॥३॥

संत आपुला अनुभव देती ।

जिवाशिवाचे रुप दाविती ॥४॥

गुरुप्रचीति आत्मप्रचीती ।

शास्त्रप्रचीतीने निर्लज्ज करिती ॥५॥

ठकु म्हणे सद्गुरुंच्या मूर्ती ।

ब्रह्मस्वरुप करुनि सोडिती ॥६॥

पद ६२

चाल -कशी मोहनी घातली गुरुने०

पुरुषार्थ हेचि हो चारी । सद्गुरुंसि आळवा नरनारी ॥ध्रृ०॥

धर्म तो असे हो कैसा । त्रिभुवनीचा राजा जैसा ॥

अखिल जगी भरला खासा । धर्म हाचि जाण निर्धारी ॥१॥

अर्थ तोचि असे निर्धारी । ओळखा स्वरुप सुविचारी ॥

रुपाब्धि करी निर्विकारी । संशयरहित निर्धारी ॥२॥

कामस्वरुप तेंचि जाणावे । सद्गुरुचरण सेवावे ॥

निशिदिनी त्यांसी रिझवावे । न्हाणावे प्रेमसागरी ॥३॥

मुक्तरुप होउनि राही । देहबुध्दि कदापि न घेई ॥

सद्गुरुवचन दृढ पाही । भक्तीसि आरंभ लवलाही ॥४॥

पुरुषार्थ नसे शेंडीसी । वरिवरी सांवरिशी मीशी ॥

ज्यांसि भीति जन्ममरणाची । ते नव्हे पुरुष परि नारी ॥५॥

सद्गुरु कृष्ण परिपूर्ण । दावि पुरुषार्थाची खूण ॥

धर्मार्थ काम मोक्ष चारी । सद्गुरुपाशिं निर्धारी ॥६॥

सद्गुरु पुरुष निर्धारी । म्हणे स्वये कृष्ण मुरारी ॥

समरसोनि अंतःकरणी । आनंदब्रह्म सुखकारी ॥७॥
भक्तिरुपचि होउनि पाही । बलभीमचरणि दृढ राही ॥

भागिरथी प्रेमे गाईं । गुरुरायांची नवलाई ॥८॥

पदे ६३

चाल -झाली ज्याची उपवर दुहिता०

होता सगुणदर्शन नयनी ।

त्यांत शिरोनी झाले पाणी ॥ध्रृ०॥

सद्गुरुकृपा हे पूर्ण कसोनि ।

अनुभावी तुर्या दिली स्थापोनी ॥१॥

प्रत्यक्ष अनुभवी तूर्या देउनी ।

सगुणचि दावीयेले नयनी ॥२॥

सगुणभाव हा हृदयी धरिती ।

भाव दुणावे अंतःकरणी ॥३॥

सद्गुरुचरणी लक्ष लावितां ।

प्रेम उपजे तेव्हां नयनी ॥४॥

नवविध भक्ती अवश्य जाणुनी ।

मृत्युलोकिं दिली स्थापोनी ॥५॥

दहावी भक्ती सुद्धापासुनी ।

घेई मना तूं प्रेम लक्षणी ॥६॥

बलभिमराये दयाळु माउली ।

कृपादृष्टिने अवलोकोनी ॥७॥

भागिरथिसी हाती धरोनी ।

घेतले आपणांमाजी मिळवुनी ॥८॥

पद ६४

चाल -वैशाख मास वासंतिक०

स्वहिताकारणे असे मंदिर बनविले ।

त्यांत सद्गुरुराज पहा सगुण बसविले ॥ध्रृ०॥

पाया असा खणीयेला भावभक्तिने ।

कामक्रोध षड्रिपु हे चिरे बनविले ।

चौदेहांचे चार असे , कोट बनविले ॥१॥

चार अवस्थांचे त्यावरि घुमट चढविले ।

आशामनशांचे असे बुरुज बनविले ।

अज्ञानाची कळी करुनी , भिंतीस रंगविले ॥२॥

विवेकाचे केले असे हेचि दरवाजे ।

शोभिवंत शिखर साजे मुक्ताबाईचे ।

मायेचे रंग करुनी , भिंतीस चढविले ॥३॥

ज्ञानरुप चित्र काढुनि सुशोभित केले ।

सत्रावीच्या निर्मळ जळे , पाद प्रक्षाळिले ॥४॥

बोधाचे चंदन घासुनि मळवट भरियेला ।

त्रिगुणांच्या अक्षता करुनि लाविल्या ।

जीवशीव मोगरा आणुनि हार गुंफिले ॥५॥

प्रेमभक्तिने मी असा गळ्यांत घातला ।

अहं धूप जळतांचि सुवास चालला ।

विज्ञानदीप उजळितां , तेज फांकले ॥६॥

शाति क्षमा दयेचा पेढा नैवेद्य अर्पिला ।

भागिरथीने प्रदक्षिणेस देह वाहिला ।

बलभीमचरणि मस्तक ठेवोनि , तन्मय जाहले ॥७॥

पद ६५

चाल -हा नको नको संसार०

नको नको आतां संसार । नाहिं जगि सार ॥ध्रृ०॥

माझे माझे म्हणुनी केले । यामुळे समुळ बुडवीले ॥

यांतुनी करावे पार ॥१॥

येईना देव ना धर्म । जाणोना कांहिच मी कर्म ॥

धनांतची लुब्धले फार ॥२॥

मज बहिणभाऊ नाही । काकामामा कांहिच नाही ॥

न करी पिता भव पार ॥३॥

नाहिं दीर नाहीं जाऊ । नाहिं नणंद नाही सासू ॥

धंद्यांत होती गार ॥४॥

भागिरथी शरणचि येते । बलभिमरायासि विनवीते ।

मज द्यावा चरणी थार ॥५॥

पद ६६

चाल -या मंदिरी सद्गुरु राया०

किती राहुं मी माहेरी आतां । सासरिं ने गुरुनाथा ॥ध्रृ०॥

मूळमाया माझी माता ।

पिता माझा अहंकार राणा ।

ज्येष्ठ भगिनी आशा तृष्णा ।

काम क्रोध बंधु हे पाहतां ॥१॥

देहबुद्धि माजी चुलती ।

रजतम काकामामा होती ।

शबल अहंकार माझे आजोबा ।

पंचप्राण गोत मज आतां ॥२॥

दशेंद्रिये ही शेजारी होय ।

यांच्या कर्मे सांपडेना सोय ।

लक्ष चौर्‍यांशी भटकत फिरतां ।

नसे कोठे सुखाची वार्ता ॥३॥
कृपाळु माझ्या बलभिम ताता ।

पतिसांनिध्यें ठेविं तत्त्वतां ।

भागिरथीची करुनि ऐक्यता ।
हीच चरणी प्रार्थना आतां ॥४॥

पद ६७

चाल -एवढा अन्याय पोटांत घाला०

भक्तवत्सल सद्गुरुनाथा ।

तुमच्या चरणी ठेविते माथा ॥ध्रृ०॥

काम , क्रोध , लोभ , मोह भारी ।

यांची नित्य करिते मी वारी ।

यांतून काढा -काढा मज आतां ॥१॥

भ्रतार , पोरे , सासू , जाऊ ।

यांचा जाच कितीतरि साहूं ।

यांच्यात फसले -फसले मी आतां ॥२॥

शास्त्रिं पुराणी कथिले कर्म ।

जन यासिच म्हणती धर्म ।

हेंचि करा -करा म्हणती आतां ॥३॥

तीर्थे , व्रते करा हे म्हणती ।

यांनी होइल मुक्तिची प्राप्ती ।

इथे येते -येते संशयाची वार्ता ॥४॥

तीर्था जाती बहुतचि लोक ।

जन्ममरणाचा जाय न शोक ।

नसे तेथे -तेथे मुक्तिची वार्ता ॥५॥

सदअसद विचार करितां ।
चौ -देहांचे निरसन होतां ।

अपरोक्ष ज्ञान -ज्ञान येई हातां ॥६॥

बलभिमरायासी विनवीले ।

त्यांनी संशयाचे छेदन केले ।

दिली ठकुसी -मुक्ति हातोहातां ॥७॥

पद ६८

चाल -अग सखे बाई , सांगु०

सद्गुरु आई , काय सांगू बाई , मी झाले उपवर ।

मज पहा गे शोधुनि वर ॥ध्रृ०॥

देह मंडप करुनि तयार , आशामनशांची मुंडावळ ।

ती बांधिली कर्मावर । जीव नवरा येऊनि बैसला , नामरुप पाटावर ॥१॥

जीव नवरा धरुनि बैसले , चित्तासी नाही स्थीर ।

वासनेची घातली माळ । सद्गुरुनाथा विनवितसे मी ,

दुसरा पहा गे वर ॥२॥

शीव नवरा पाहुनि आणिला , त्यांशि माझा न जमे मेळ ।

पाहे दोहींकडे वेळोवेळ ॥ शीव नवरा आहे गडे जोगी ,

हाही नको मज वर ॥३॥

काय सांगु बाई हा न घाली जेवण्यास पोटभर ।

साक्षीक्रियेत गुंतला फार ॥ सद्गुरुनाथा प्रार्थितसे मी

तो रत तूर्येवर ॥४॥

रंग मंडप करुनि तयार बुद्धीचा दृढ निश्चय ।

आनंद बोहल्यावर बैसुन ॥ मग झाले बाई त्यासि संलग्न ,

मीपणाचे नाहि मज भान ॥५॥

बलभीमआइने पाहिला वर , त्याचे नाव सदाशिव ।

ठकुसी केले हो निर्भय ॥ मुक्ताबाईसासुचे चरणी ठेवियेले शीर ॥६॥

पद ६९

चाल -मना किती प्रार्थु तरी०
बुद्धि किती शिकवुं तरी तुजला ॥

करी तूं आनंद निश्चयाला ॥ध्रृ०॥

सासरा धर्म , नीति सासू । सदिच्छा नणंद , विवेक दीर ॥

यांचा करिसी आदर । ते तुज करितील सहाय्याला ॥१॥

निजबोध पती , भक्ति जाऊ । सुमन हा पुत्र हाती घेऊं ॥

शांति क्षमा कन्या जवळिं ठेवूं । दावितील या सन्मार्गाला ॥२॥

सेवक करी प्रबोध वैराग्यासी । ठेवि गुण सत्व प्रधानासी ॥

स्नुषा होइं तुं सद्गुरुची । ते तुज देतील ज्ञानाला ॥३॥

ऐसे साधिसि जरि आतां । न चाले विषयाची सत्ता ॥

धरी तूं बलभीमचरणांला । भागीरथी प्रार्थितसे तुजला ॥४॥

पद ७०

चाल -आनंदाचा कंद हरि०

चला चला हो साजणि आपण । निश्चलपद पाहूं या ॥ध्रृ०॥

पिंडब्रह्मांड त्यागुनिया । वेदान्त शास्त्रार्थ सोडूं या ॥

अन्वय व्यतिरेक दोन्हि पंख हे । सोडुनि निःशंक राहुं या ॥१॥

कल्पनातीत सत्य वस्तुसी । डोळांभरुनी पाहूं या ॥

एक वृत्ति गेली दुसरि निमाली । मध्यस्थिती राहूं या ॥२॥

बलभीमस्वरुप पाहोनिया । पाहण्यांत पाहणे मिळवूं या ॥

सद्गुरुचरणी भागिरथी असतां । धीट झालि जगिं पहा पहा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP