भागीरथीबाई - अभंग संग्रह ४१ ते ५०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद ४१

चाल -जन्ममरण चक्रावर

आत्मप्राप्तीवांचुनि प्राण्या धर्म म्हणूं नये ॥

अनूभवावांचुनि जीवा कर्म करणे नोहे ॥धृ०॥

भौतिक म्हणती जीवा कर्म , हेंचि करणे आहे ॥

राजकीय प्राप्त करुनि घेणे हाचि धर्म आहे ॥१॥

राज नष्ट क्रीया नष्ट फल नष्ट होय ॥

कीर्ती कोठे राहे शाश्वत , कोठे बैसुनि पाहे ॥२॥

अर्जुनासी कर्म लाविले , काय शिल्लक आहे ॥

नातू पणतू खाती म्हणती , त्यांचे कोण आहे ॥३॥

शमदमादि साधन करिती , परमात्मप्राप्ती ऐसी ॥

त्याचे फल कीती कैसे , मुंगी नाशिवंत ऐसे ॥४॥

बलभीम बाळ बोले ऐसे , नादी लागुं नये ॥

भागिरथी -दष्टी घेउनि , निजानंदी राहे ॥५॥

अभंग ४२
सकळांसी माझी हेचि विनवणी ॥

अनुभव जनी थोडा बोला ॥१॥

एक हात लाकूड , नऊ हात ढलपी ॥

ऐसी ही ख्याती करुं नका ॥२॥

शब्दज्ञानमीषे करुनीया ख्याती ॥

येईल तो हाती ज्ञानगर्व ॥३॥

गाऊनी दावीती परेहूनी पर ॥

नसे ती करणी तीळमात्र ॥४॥

इंद्रियदमन सांगे लोकांप्रति ॥

स्वये आंगी नाही वैराग्य ते ॥५॥

भागीरथी सर्व भक्तांसी प्रार्थीते ॥

सद्गुरुचरण स्मर सदा ॥६॥

पद ४३

चाल -अहो या मालूच०

अहो या गुरुला शरण जाऊं ।

निजबोध घेऊनि येऊं ॥धृ०॥

तनमनधन हे अर्पण करुनी ।

निजस्वरुप पाहुनि घेऊं ॥१॥

जागृति स्वप्न सुषुप्ति नाही ।

तुर्या होऊनि आपण राहूं ॥२॥

विराट हिरण्यगर्भ माया त्यजुनी ।

ईश्वर होउनि राहूं ॥३॥

स्थूल सूक्ष्म कारण आनंद ।

गुरुपदिं जाउनि वाहूं ॥४॥

स्थूल सूक्ष्म जाणिव नेणीव ।

निश्चल पदिं मिळवुनि राहूं ॥५॥

बलभिमचरणी भागिरथीही ।

आनंदि रंगुनि राहूं ॥६॥

अभंग ४४

चारी देहावेगळी झाली । वाचा आतां नाही उरली ॥१॥

उन्मनीत क्रिया चालली । भक्तिभावे आदरली ॥२॥

सेवा सद्गुरुची उरली । अन्य देवा न पाहे मी ॥३॥

पाहिन ब्रह्मरुप सर्व । यांत मिळे सर्व वर्म ॥४॥

बलभीमवचन विवरद्वार । त्यांत भागिरथि राहे स्थिर ॥५॥

पद ४५

चाल -मनरंजनि बालक०

अहो प्रभो अगाध किति तव करिणी ॥धृ०॥

जग नग सारे दिसती मजला ।

भासे शुक्ति रुप्याचे परी ॥१॥

ज्ञानामृत मज पाजुनि निरंतर ।

घोटविले हृदयांतरी ॥२॥

बोधवाटी लावूनि कानी ।

मन हे लाळचि घोटी ॥३॥

सद्गुरु माझे बलभिमराया ।

देऊनि आपुली निजदृष्टि ॥४॥

भागिरथीहि असतां चंचळ ।

नीजविली निश्चळ पदी ॥५॥

अभंग ४६

आम्ही झालो ब्रह्मरुप । नाहिं आम्हांसी साक्षोप ॥१॥

साक्षोप पाहूं जातां । आक्षोप वाटे चित्ता ॥२॥

नाहिं संदेहाचा लेश । निर्भय झालो खास ॥३॥

जड चैतन्याची गांठ । सोडूनि झालो धीट ॥४॥

कर्म धर्म दोन्ही नाही । निःशंक होऊनि पाही ॥५॥

बलभिमराय ऐसे करी । निश्चय झाला भागीरथीसी ॥६॥

पद ४७

चाल -देरे हरि संत पदाची०

दे रे हरि ब्रह्मरसाची गोडी ॥ध्रृ०॥

विषयानंद तुच्छ दाखविसी । छंद लाविसी चरणी ॥१॥

पंचविषय विषतुल्य करोनी । अमृत दावि नयनी ॥२॥

कर्मोपासना करितां न चुके । जन्ममरण -फेरी ॥३॥

बलभिमराये सद्बल देउनि । जडवीले कोंदणी ॥४॥

ठकूदासी विनवीते तुज । ठेवी रत चरणी ॥५॥

अभंग ४८

चाल -त्यजि भक्तासाठी०

धरुनि सद्गुरुचा हात । जन्ममरणाच करा घात ॥१॥

मरणासी मरणे मरुनी । राहे निर्भय तूं होवोनि ॥२॥

पिंडब्रह्मांड शोधोनि । पाहा चैतन्य नयनी ॥३॥

माया मूळमाया त्यागोनि । राहे चिदानंदभुवनी ॥४॥

बलभीम माझे सद्गुरु । नाही तेथे भेदाभेदू ॥५॥

पद ४९

चाल -निःसंग मुरली झाले०

गुरुरायाने नवलाव केले । अद्भुत पद दावियेले ॥ध्रृ०॥

ना मी स्त्री ना मी नपुंसक । ना मी पुरुष असे ॥१॥

ना मी तीर्थ ना मी क्षेत्र । ना मी नक्षत्र असे ॥२॥

ना मी भूत ना मी दैवत । ना मी अष्टसिद्धि असे ॥३॥

ना मी जीव ना मी शीव । ना मी ज्ञानाज्ञान असे ॥४॥

बलभीमचरणी भागिरथीही । परब्रह्मी सदैव डोले ॥५॥

अभंग ५०

सद्गुरु माझी आई , कृपापान्हा देई ॥

कर्माची पत्रिका मज कां आली ॥१॥

तुझी माझी तुटी न साहे , जननी ॥

कधी भेट देशी तान्हुल्याशी ॥२॥

कधी ऐसी दशा येइल माझे आंगी ॥

चित्त सहजानंदी रंगीजेल ॥३॥

ऐसी पात्र कधी होईन लाभासी ॥

मन उत्साह मूर्तीशी लावीन मी ॥४॥

बलभीमचरणी बलची घेईन ॥

ठकूऽशी ठक , पडेल केव्हां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP