अभंग १११
अहो पंढरी पंढरी ।
काया नगरी पंढरी ॥१॥
औटपीट चंद्रभागा ।
पाणी वाहे ज्ञानगंगा ॥२॥
प्रेमद्वार भीमातीर ।
भाव ऊभा पुंडलीक ॥३॥
चिद्घन उभा पांडुरंग ।
चौदेही वीटेवर ॥४॥
भागिरथी उभी द्वारी ।
मागे प्रेमरुप वारी ॥५॥
अभंग ११२
खर्या देवाचा तो लावा हो तपास ।
वेंचा हो आयुष्य संसारीचे ॥१॥
खरा देव माझा सद्गुरुनायक ।
त्याचे वचन देख , वेदश्रुती ॥२॥
ब्रह्मा विष्णु शिवाचे दावीती ते स्थान ।
माया ब्रह्म उभय ऐक्य करी ॥३॥
ऐसा सद्गुरुनाथ देवांचाही देव ।
ब्रह्माची उपमा तया गौण असे ॥४॥
परम कृपाळू सद्गुरु बलभीम ।
भागिरथीस भाव दुजा नाही ॥५॥
पद ११३
राधाबाईकृत
धन्य सद्गुरु माय गे । दावियेले तूं पाय गे ।
गेली मम हाय हाय गे । झाले सुखरुप पाय गे ॥धृ०॥
होत अज्ञान कुपांत । म्हणुनी धरिले तुझे हात ।
दाखविले स्वरुप सागर गे ॥१॥
पंच कोशा पलीकडे नेले गे ।
चिन्मय होउनी गेले गे ।
अनुभव बोलतां नयेच गे ॥२॥
अक्षय ठेवी त्या ठायी ।
अहंकार वारा लागुं न देई ।
मीपण चरणी वाहाते गे ॥३॥
भागिरथी चरणी मुरले गे ।
द्वैतची नाही उरले गे ।
राधेचे राधेपण सरले गे ॥४॥
पद ११४
देव किती चांगला चांगला चांगला ॥
माझ्या अंतरी रंगला ॥ध्रृ०॥
शरणची जातां या चरणां ॥
चुकवी भवभय मरणा ॥१॥
भीति नसे त्या पापपुण्यांची ॥
खंति नसे त्या सुखदुःखांची ॥२॥
भीति नसे ती जन्ममृत्यूची ॥
खंति नसे त्या लोकनिंदेची ॥३॥
सदा आवड मज संतसंगाची ॥
वार्ता नको ती कांनी दुःखाची ॥४॥
दुःखची नाही सुखची नाही ॥
फिटली भ्रांती मनाची ॥५॥
अंतरी बाहेरी एकची भरला ॥
सद्गुरु माऊली सांगे मजला ॥
नको विसरुं या बोला ॥६॥
पद ११५
चाल -आनंदाचा कंद०
भाग्य उदय हा खचितची झाला ।
सद्गुरुराया भेटला । तिळगुळाचा सक्रांतीचा ।
सण आम्हांसी पातला ॥ध्रृ०॥
सद्गुरु म्हणती तिळाएवढी भक्ति करा तुम्ही नेमाने ॥
आनंदाची भेट गुळाची देइन तुजला प्रेमाने ॥१॥
ज्ञानसूर्य हा एक उगवला बारा राशी फिरत असे ।
बारा राशी कोणकोणत्या ऐकुनी घ्या सद्गुरुमुखे ॥२॥
पांच ज्ञानेंद्रिय पांच कर्मेंद्रिये जीव शीव मिळुनी बारा ॥
जाणीवेचा एक फिरतसे ज्ञान सूर्य हा खरा ॥३॥
श्रीभागीरथी सद्गुरु जीने तिळगुळ राधेसी दिधला ॥
भासहि नुरला भाव जिराला आनंद बहु जाहला ॥४॥
पद ११६
चाल -जयजय राममाई बोला०
जयजय ब्रह्म माई बोला ।
दुःखी जिवाला सुखी करोनी पोंचवी स्वरुपाला ॥धृ०॥
बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध येती श्रवणाला ॥
बद्ध जनता कशी करीते विपरीत अर्थाला ॥१॥
मुमुक्षु जन हे नित्य येती श्रवणाला ॥
किर्तन ऐकता तल्लीन होउनी लागते भक्तीला ॥२॥
साधक सारे नित्य नेमाने येती श्रवणाला ॥
श्रवण ऐकतां तल्लिन होउनि लागति डोलाला ॥३॥
सिद्ध सादु एकचि रुप भाव नाही उरला ॥
दोघांचीहि एकच स्थिती भोगिती उन्मनिला ॥४॥
भागिरथीने माझ्या करितां कष्ट फार सोशिले ॥
दीन ताइचे अंतःकरण गहिवरुनी आले ॥५॥
पद ११७
लोणी साखर चाल -मीच स्वये परब्रह्म०
सद्गुरु नाथा रे प्रेमाची साखर घेई रे ॥धृ०॥
मनाचे हे दूध देवा बोधाने विरजीले , बोधाने विरजीले ,
बोधाने विरजीले ॥१॥
सदसत विचारमंथा करुनी ज्ञान लोणी काढिले ,
ज्ञान लोणी काढिले , ज्ञान लोणी काढिले ॥२॥
चित्तशुद्धि वाटी देव नवी तूं घडवीली ,
नवी तूं घडवीली , नवी तू घडविली ॥३॥
स्वानुभव मृदु लोणी वाटी भरोनी ठेविले ,
वाटी भरोनी ठेविले , वाटी भरोनी ठेविले ॥४॥
सद्गुरु भागीरथि माउली ग माझे लोणी घेई ग ,
माझे लोणी घेईं ग , माझे लोणी घेईं ग ॥५॥
पद ११८
चाल -पाळणा०
जो जो जो जो रे सच्चिदानंद सद्गुरु बालमुकुंदा ॥धृ०॥
कोठे होतासि , इतके दिवस। आला ह्या समयास ॥१॥
त्रिविध तापांतुनि काढियेले । चित्त चरणी जडवीले ॥२॥
अवतार तुझा , खाडिलकर कूळी । रखमाबाइच्या उदरी ॥३॥
आषाढ वद्य चतुर्दशीचे रात्री । कन्या झालि सुपात्री ॥४॥
निराकार तूं निर्गूण । भक्तासाठी झाला सगुण ॥५॥
ब्रह्माविष्णूला ठकविले । मायेला चकवीले ॥६॥
चहू देहांच्या पाळण्यांत । अखंड राहा खेळत ॥७॥
सद्गुरु भागिरथी हृदयी राही । राधा पाळणा गाई ॥८॥
पद ११९
चाल -गुन्हेगारी धन्याची०
गुरुनाथ दया करी तारी सकलांस ॥धृ०॥
हिंडुनफिरुन कष्टी झाले आले शरण चरणास ॥
गुरुनाथांनी नौका दिधली उद्धरुनी नेले खास ॥१॥
पुणे मुक्कामी आले प्रभु उद्धरिले बहुतांस ॥
कुणी म्हणती त्यांच्या जिवाला बहूत झाला त्रास ॥२॥
सुखादुःखा विरहित माउली माझी ॥
त्यांची तुम्हां सर्वांना कशाला हवी काळजी ॥३॥
राग नसावा प्रेम असावे माफि मागते चरणास ॥
दर्शन घेतां स्पर्श होतां आनंद होतो खास ॥४॥
माउलीचे गुणवर्णन किती मी करणार ॥
झटकन जाउन पटकन त्यांचे पाय हो धरणार ॥५॥
तुम्हां सर्वांना हात जोडुनी करिते विनवणी ॥
भागिरथी माउलीला माझ्या सोडुं नका कोणी ॥६॥
सार्या जगामध्ये अशी माउली नाही मिळणार ॥
म्हणोनि राधा पुन्हा पुन्हा गळी त्यांच्या पडणार ॥७॥
पद १२०
ऐसे करी प्रभू ऐसे करी प्रभू , ।
ऐसे करी मम चित्ताला ॥
क्षण पळही फुकट न जावो ।
पाहो तुझ्या स्वरुपाला ॥धृ०॥
जिकडे पाहे तिकडे तूझा ।
खेळ असे हा वाटो मला ॥
मीपण नाहिंसा करी बा ।
शेषही नको मजला ॥१॥
घातक मोठा वैरी मीपणा ।
अंतर पाडी स्वरुपाला ॥
यासि पकडुनी नेईं देवा ।
बांधी आपुल्या चरणांला ॥२॥
सोडुं नको हा माझा वैरी ।
घालिल पुनरपि जन्माला ॥
हीच कटकट माझी असे ।
सांगूं आतां कोणाला ॥३॥
मला आवड आहे देवा ।
सदा स्वरुपी राहण्याची ॥
मीपणा हा फसवुनि नेतो ।
खोडा मोडा हो त्याची ॥४॥
वृत्ती उठतां बसतां तिजला ।
स्वरुपरुचि लावा तुमची ॥
सच्चिदानंद सर्वत्र भरला ।
पहा पहा बाई तो तूंची ॥५॥
ज्ञान अफू घालून निजवी ।
झोंप लागो उन्मनी ॥
मीतुंपणाचे स्वप्न नको मज ।
उदासपणा हा वाटो मनी ॥६॥
भागिर्थी माउली दयाळू ।
माझी हौस पुरवी क्षणोक्षणी ॥
चरणि लोळेन स्वरुपी खेळेन ,
हीच राधेची विनवणी ॥७॥
आरती १२१
भागीरथीकृत०
जयदेव जयदेव जय बलभिमदेवा ।
आरति करितां देशी चिन्मय मज मेवा ॥धृ०॥
त्वंपद शोधून वार्ता वळियेल्या ।
तत्पद घृतामाजी भिजवुन ठेवील्या ॥१॥
चैतन्य दीपे निरांजन लाविले ।
चिदात्म प्रकाशे सामान्य दिसले ॥२॥
सामान्य स्वरुपाचा प्रकाश पाहतां ।
वाणी कुंठित झाली नये बोलतां ॥३॥
बलभिमराये ऐसे नवलाव केले ॥
भागिरथीसी चरणी मेळवीले ॥४॥