भागीरथीबाई - अभंग संग्रह २१ ते ३०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद २१ .

किति किति सांगू तुला ग

प्रभु किती सांगू तुला रे। मज चैन नसे ॥धृ०॥

लक्ष चौर्‍यांयशी फेरे फिरतां । कोठेहि तव ठाव नसे ॥१॥

सुतकांतादिक पाहुनि सगळे । कोठेहि समत्व नसे ॥२॥

शास्त्रिं पाहतां वैकुंठादिक । तेथे हीच रड असे ॥३॥

इंद्रासी स्वामी म्हणती सर्वहि । त्यालाहि बहु धाक असे ॥४॥

शंकर सर्वांसि वरदान देतो । त्यासहि प्रलय काल असे ॥५॥

येथे पाहतां तेथे नाही । अंतरी तंव वास असे ॥६॥

बलभीम बाळ बोले ऐसे । निरंजनी वस्ती असे ॥७॥

अभंग २२

धरता धरविता , कर्ता करविता ।

देता देवविता तूंचि एक ॥१॥

पाहता पाहविता , बोलता बोलविता ।

चालता चालविता तूंचि एक ॥२॥

खाता खावविता , तोडता तोडविता ।

घेता घेवविता तूंचि एक ॥३॥

रडता रडविता , हंसता हंसविता ।

गुपचुप करविता तूंचि एक ॥४॥

लेता लेवविता , नेता नेवविता ।

बलभीमचरणी ठेविं ठकू माथा ॥५॥

पद २३

चाल -रामा अभिमाना

सद्गुरु तुला कळेल तैसे तार । नेई पैलपार ॥धृ०॥

हीन दीन मी , अपराधी गा । तुम्ही कृपाळू फार ॥१॥

जाणे ना पूजा , येई ना मंत्र । येई न सगुण ध्यान ॥२॥

करवेना स्तुती , सेवा घडेना । येई न हावभाव ॥३॥

बलभीमचरणी भागिरथी ही । विनंति करितसे फार ॥४॥

अभंग २४

गुरुमाउली ये प्रेमपान्हा देईं ।

तुजवीण नाही कोणी मज ॥१॥

तुजवीण कोण पुरवील आळी ।

कृपाळू माऊली तूंचि एक ॥२॥

पाहुणचार करी पिता होउनिया ॥

अंतःपुरामाजी येउनिया ॥३॥

बोलूं जातां नाही येथे अवकाश ।

होईं माझा सखा तूंचि आतां ॥४॥

बलभीम माय देई मज बोल ।

वरदवचन भागिरथीसी ॥५॥

पद २५

चाल -घडि घडि चरण

दाखवि तूं दिव्य पाय , सहजानंद आई । उत्सव मूर्ति

घेउनिया धांव लवलाही ॥धृ०॥

दोन्हीही बाळ लाउनि स्तनी । प्रेम पान्हा पाजिसि मनी ।

चिदशक्ति लोटुनिया । दूर करिसि लवलाही ॥१॥

चार देहांचि करुनि वीट । विटेवरि उभा नीट ।

उन्मनीची घेउनि गांठ । देत असे ग्वाही ॥२॥

त्वम पद ते शोधूनिया । तत पदासि मिळवूनिया ।

असि पदासी पाहुनिया । तेचि होउनि राही ॥३॥

शक्तिविण भक्ति नाही । भक्तिविण मुक्ति नाही ।

मुक्तिविण प्रेम नाहि । प्रेमेविण कांही ॥४॥

बलभीम बाळ बोलतसे । गोविंदराज पति पाहे ।

भागिरथी न बोले कांहि । मौन्य धरुनि राही ॥५॥

अभंग २६

तुम्हिआम्हि भाऊ , एका जागी जेऊं ॥

दोघेजण पाहूं एक स्थान ॥१॥

मला नको नवरा तुला नको बाईल ।

तुम्हिआम्हि वरुं दोघेजण ॥२॥

शून्य शेजेवरी दोघेजण निजूं । अनुभव घेऊं ऐक्यत्वाचा ॥३॥

बलभीम आई स्वसंधाने देई ॥ निरंजनी राहे भागीरथी ॥४॥

पद २७

चाल -मूर्तिमंत भीति उभी०

प्रेमरुपि मोतियासि , पाणि हे चढले ।

संतरुपि भेटि होतां ऐसे हे घडले ॥धृ०॥

देव भक्त मिळुनि मज , कंठी धरियेले ।

चहुं भुजा पसरुनि मज आलिंगन दिधले ॥१॥

पाणि न उतरे ऐशि करणि मी करिते ।

संतचरणि लोळण घालुनि , मौन्य मी धरिते ॥२॥

प्रश्नउत्तर कांहि न उरले , ऐसे मज केले ।

सगुण -निर्गुणभ्रांति फिटलि , ऐसी मज झाले ॥३॥

त्वम पद तत पद असि पदासी , ऐक्ये मिळविले ।

सगुणनिर्गुण दोन्हि डोळां , भरोनि दाविले ॥४॥

बलभीमराये दातृत्त्वासि , पूर्ण संपादिले ।

अनुभव घेउनि भागिरथीने , चरण धरिले ॥५॥

अभंग २८

धरिली सद्गुरुची पाउले ॥ तेणे लेवविले लेणे ॥१॥

विवेक रत्नांचे दागिने ॥ मज लेवविले यत्ने ॥२॥

काय सांगू त्याची थोरी ॥ मज लागलीसे गोडी ॥३॥

संसारि असोनि न भासे ॥ दावी आनंद निराभासे ॥४॥

बलभिमचरणी ठेविले मन ॥ भागीरथी झाली लीन ॥५॥

पद २९

चाल -मनरंजनी बाळक खेळे०

गुरुरायांनी नवलाव केले ॥

र्‍हस्व होते ती दीर्घ " मी " झाले ॥धृ०॥

आतां मला नाही कोणाशी कामे ।

जगामधून मी वायां गेले ।

जिवा घेऊन शिवपण दीले ॥१॥

’ मी ’ ’ तू ’ चा तिथे ठावच नाही ॥

शास्त्रपुराणांचे न चले कांही ॥

लावणि लावून बिज पेरिले ॥२॥

वेदशास्त्र ते पाया लागती ॥

श्रुतिस्मृतिंच्या पताका उडती ॥

अनुभवाचे लयही केले ॥३॥

बलभीमचरणी होतां लीन ॥

ठकूसि केले प्रेमपूर्ण ॥

ब्रह्मानंदी मग्न झाले ॥४॥

अभंग ३०

चाल -भक्ति हेचि०

जिव शिव पाहतां नामाचा घोंटाळा ॥

पाहुं जातां दीसे एकची तो ॥१॥

शिवची पाहतां नाही कोठे आतां ॥

जीव पाहूं जातां जेथे तेथे ॥२॥

पिंडी व ब्रह्मांडी जीव हा भरला ॥

प्रणवरुप झाला जीवची तो ॥३॥

गायत्रीची पदे करुनि तीन देह ॥

अर्ध मात्रा तेथे नांदतसे ॥४॥

चारी मिळोनिया झाला तो ॐकार ॥

पहावा साचार नील बिंदू ॥५॥

व्यवहार करीतां घ्यारे सद्गुरुलक्ष ॥

तेव्हा होय साक्ष आत्मयाची ॥६॥

भागिरथी म्हणे बलभीम कृपादृष्टी ॥

कैवल्याचे पोटी नांदतसे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP